मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बदल — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ बदल — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(माधवन बिचारा काहीच बोलला नाही.

नयना दोन महिन्यांनी भारतात परत आली. दिलीपला तिने हे सगळं सांगितलं.

“काय करू मी दिलीप? अशीच ही वागणार असली तर माझा तिकडे काहीही उपयोग नाही बघ. मी नाही जात तिकडे. करू दे त्यांनाच बाळंतपण. अरे, मुग्धाचं माझ्यावाचून काहीही अडणार नाहीये. ”हताश होऊन नयना म्हणाली.) — इथून पुढे – – – 

दिलीपने विचार केला. ”हे बघ. आपण फक्त माधवन आणि नवीन बाळासाठी जाऊया. मीही येतो तुझ्याबरोबर. म्हणजे तू एकटी पडणार नाहीस नयना. तीन महिने राहूया आणि परत येऊया.

कसं उलटं आहे बघ. जावई सज्जन लाखात एक तर मुलगीच मूर्ख आणि तऱ्हेवाईक. आपलेच दात आणि आपलेच ओठ. कोणाला सांगणार? पण तू गेली नाहीस तर जन्मभर उगाळत बसेल ती. आपली एकच तर मुलगी आहे ही. बघूया.

तिने बोलावलं तरच जाऊया. ” 

मुग्धाला सातवा महिना लागला. तिने आईवडिलांना विचारलं,

बाबा, यावेळी तुम्ही आणि आई दोघेही या. मी तिकीट पाठवते. मी शेवटपर्यंत जॉब करणार आहे. माझी तब्बेत चांगली आहे. नंतर मला रजा घेता येईल.

तुम्ही दोघेही तीन चार महिने रहा. वाटलं तर व्हिसा वाढवून घेता येईल तुमचा. मग मी बाळाला ठेवीन क्रेश मध्ये. ”

आत्ता तरी हा प्लॅन नयनादिलीपला बरा वाटला. हो म्हणाला दिलीप.

तिकिटे आल्यावर नयना दिलीप अमेरिकेला पोचले. एअरपोर्टवर आलेल्या माधवन आणि मुग्धाला बघून नयनाला गहिवरून आलं.

आपली गर्भभाराने जडावलेली लेक बघून नयनाला अश्रू आवरेनात.

आई म्हणत मुग्धाने आईला मिठी मारली. कारने सगळे घरी आले.

दिलीप ते मोठं घर बॅकयार्ड बघून खूष झाला.

“वावा. आता इथे मस्त बाग करू आपण”. तो हसत म्हणाला.

मागच्या अनुभवावरून नयनाने जरा बिचकत स्वयंपाकघराचा ताबा घेतला. आज काय करू ग स्वयंपाक मुग्धा? ”

आई, तुला हवं ते कर. मी खाईन ते. ” 

नयनाने माधवनकडे बघितलं. तो हसत होता. मग सांगतो अशी खूण केली त्याने.

नयनाने सुंदर शिरा केला. मुग्धाला आवडायची तशी मटकीची उसळ केली. भजी केली.

“आई, कित्ती दिवसांनी मी इतकं सुंदर सुग्रास अन्न खातेय ग. “मुग्धाच्या डोळ्यात पाणी आलं.

चार दिवसांनी माधवन त्या दोघांना घेऊन मॉलमध्ये गेला होता.

नयना म्हणाली “माधवन, ती खरेदी जाऊ दे. आधी मला सांग, हा बदल झाला कसा मुग्धामध्ये? अरे मी तर येणारच नव्हते मागचा अनुभव बघून. अशी ही वागली तर माझीच अवस्था कशी होईल या कल्पनेनेच मला घाम फुटला. हे कसं काय झालं सांग बाबा. ”

माधवन हसत म्हणाला, ”तुमची लेक गुणी आहे हो. फक्त संतापी आणि पुस्तकी आहे फार. म्हणजे बुकिश.

त्या दिवशी काय झालं, माझा मित्र अमोल आहे ना, त्याची बायको रमा पण प्रेग्नन्ट आहे.

तिच्या डोहाळजेवणासाठीआम्हाला बोलावलं होतं. तिथे तिची आई आणि आजी भारतातून आल्या आहेत.

आजींनी मुग्धाला जवळ बसवलं.

तुझी तारीख किती आहे, आईवडील काय करतात अशा चौकश्या केल्या.

 म्हणाल्या “अशी काय अशक्त दिसते आहेस ग तू? नीट खात पीत नाहीस का? तुम्ही मुली म्हणजे कठीण आहात हो. सारखं काय ते गूगल का काय बघून आयुष्य ठरवता?

ते सांगेल तेच खायचं म्हणे. मग डिलिव्हरी पण गुगललाच करू दे की. आचरटपणा सगळा.

चांगलं छान आई आजी देते ते खावं. त्यांना अनुभव असतो पोरी. आमची रमा असलीच पण आता बघ. सगळं खूळ काढूनटाकलं आम्ही तिच्या डोक्यातून. पुस्तकी विद्या नुसती.

व्यवहार नको का जोडीला? फुकट झालोय का आम्ही म्हाताऱ्या? ”

माधवन हसून सांगत होता.

मुग्धाचं वजन अजिबात वाढत नव्हतं आई. तुम्ही गेलात आणि मग समजलं की डॉक्टर म्हणाले वजन कमी आहे बाळाचं.

मुग्धाची डॉक्टर साऊथ इंडियन आहे ती म्हणाली” मुग्धा, आपलं इंडियन फूड सगळ्यात उत्तम असतं. ते खा. हे यू ट्यूब खूळ आधी काढून टाक डोक्यातून.

वजन कमी आहे बाळाचं. मला वाढलेलं दिसलं पाहिजे. मग मात्र मुग्धा घाबरली. मुकाट्याने सगळं खायला लागली. मला उत्तम येतो ना स्वयंपाक. पोळ्या आणतो बाहेरून.

तुम्ही गेल्यावर रडत होती कीआईने केलेलं मी काही खाल्लं नाही आणि तिलाच बोलले मी वाटेल तसं. रोज वाद घातले, तिला वाटेल तसं बोलले मी.

माधवन, येईल ना रे आई पुन्हा?

मला हवी आहे तिची मदत. माझं खूप चुकलं. त्यात रमाच्या आजींनी चांगली कान उघाडणी केली.

आता गाडं ठिकाणावरआलंय. ”

माधवन हसत होता.

“बाबा, मुग्धा हुशार तर आहेच. पण मला माहीत आहे, ती संतापी असली तरी खूप सरळ आणि भाबडी आहे. मला तिची नस बरोबर माहीत आहे. आता हळूहळू तीआणखी समंजस होईल बघा.

मी चार भावंडामध्ये वाढलोय म्हणून मला माणसे समजतात, ऍडजस्ट करता येते. आपलाच हेका दरवेळी चालवता येत नाही हे समजतं मला. पण मुग्धाला ही सवय नाही. एकटीच असल्याने तिला सवय नाही नमते घ्यायची.

पण बदलेल ती हळूहळू. ”

नयनाला माधवनचं फार कौतुक वाटलं. किती समंजस होता हा मुलगा. आपल्या मुलीला अगदी योग्य जोडीदार मिळालाय हे समजलंच त्यांना.

मुग्धातला हा बदल फार सुखावह होता. दोघी मायलेकी मागे बॅकयार्ड मध्ये झोपाळ्यावर बसून तासनतास गप्पा मारत.

मुग्धाला आजीची आठवण येई. तिने सांगितलेल्या गोष्टी तिला आठवत.

“आई मला मुलगीच होऊ दे. मी आमच्याकडे आधीच सांगतात तसे मुलगा का मुलगी आहे हे विचारलं नाहीये. असू दे की सस्पेन्स. ,

पण मला मुलगीच व्हायला हवीय. आणि तीही माझ्यासारखी चिडकी नको. माधवन सारखी शहाणी शांत समजूतदार होऊ दे. ”

नयनाने तिला जवळ घेतलं. “मुग्धा, तू सुद्धा खूप गुणीच आहेस बाळा. खूप बदल झालाय तुझ्यात आणि तो चांगलाच आहे.

असं कमी नको लेखू स्वतःला.

सगळी माणसं कशी सर्वगुण सम्पन्न असणार? किती हुशार इंजिनीअर आहेस तू. किती मोठ्या पोस्टवर समर्थपणे एवढी हाताखालची माणसे संभाळतेस ना?

तूही खूप बदललीस. मला तर माझी नात तुझ्यासारखीच व्हायला हवी. गुणी हुशार. , आणि थोडीशी चिडकी पण. ”

मुग्धाने आईच्या कुशीत तोंड लपवलं. नयनाने तिला थोपटलं.

नऊ महिने भरल्यावर मुग्धा प्रसूत झाली.

“माधवन, आई, काय झालं ग मला?

मुलगीच झाली ना? मला दाखवा ना. “

जवळ उभ्या असलेल्या नयनाला आणि माधवनला मुग्धा म्हणाली.

माधवन म्हणाला, “ हो मुग्धा. तुला हवी होती तशी राणी झालीय तुला. ही बघ. ”

मुग्धाने त्या बाळाला जवळ घेतलं.

दोन दिवसांनी राणीला घेऊन सगळे घरी आले.

आता मुग्धाचं आई शिवाय पान हलेना.

आई, राणीला अंघोळ घालायला शिकव मला. तू करतेस तसं तिला मॉलिश करून बघू दे मला तुझ्या समोर.

तू सांग, आता बाळाला पेज कधी सुरू करायची? ”

नयनाने सांगितलेलं सगळं लक्षात ठेवत मुग्धा राणीची काळजी घेऊ लागली. राणी चांगली गुटगुटीत झाली.

तिकडच्या सारखी सीरिअल्स नकोत म्हणत मुग्धाने नयनाच्या देखरेखीखाली छान मऊ भात घालायला सुरवात केली राणीला. आणि तिलाही तो फार आवडायचा.

चार महिने कसे गेले ते कोणालाच समजलं नाही. जायची तारीख जवळ यायला लागली तशी मुग्धा बेचैन झाली.

“आई, मी खूप त्रास दिला तुला. भारतात पण आणि इथेसुद्धा.

 मला माफ कर. मुलगी झाली की तिच्यासाठी जीव कसा तळमळतो हे आता समजतं मला.

राणी पोट दुखून रडायला लागली की मलाच रडू येतं.

मला लहान वयात आणि मोठेपणी पण कधी तडजोडीची वेळच आली नाही. माझं चुकलं खूप. ”

नयनाने तिला जवळ घेतलं. ”नाही ग मुग्धा. आई होणं सोपंनसतंच. तूही चुकत शिकशीलच. काळजी नको करू. सुदैवाने आम्ही अजून येऊ शकतो तुमच्याकडे. या गोड राणी साठी. तब्बेती चांगल्या आहेत. पैसा भरपूर आहे. आणखी काय हवं?

आणि माफी कसली ग मागतेस?

माझंही चुकत असेलच की थोडसं.

मीही नोकरी करत होते. झालंही असेल थोडं दुर्लक्ष तुझ्याकडे. पण आजी होती ना तुझ्याकडे लक्ष द्यायला.

तर आता डोळे पूस आणि या गोड बाळाला छान मोठी कर. ”

कधीही अडचण आली तर हाक मार. आम्ही नक्की येऊ. ”भरल्या डोळ्यांनी नयना म्हणाली.

सगळी आवरासावर करून ठरलेल्या दिवशी नयना आणि दिलीप भारतात परतले ते निःशंक होऊन आणि मुग्धामधला सुखावह बदल अनुभवूनच..

समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बदल — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ बदल — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

मुंबई एअरपोर्ट वर विमान पोचले आणि दिलीप आणि नयनाने सुटकेचा निश्वास टाकला. एवढा मोठा कंटाळवाणा प्रवास संपला एकदाचा म्हणून.

रघू ड्रायव्हर कार घेऊन आला होता एअरपोर्टवर. मोठ्या मोठ्या बॅग्ज डिकीत ठेवून त्याने अदबीने विचारलं, “सरळ घरीच जायचं ना सर? का वाटेत जायचं आहे कुठं? ”

“नको नको रे बाबा. फूड मॉलला थांबव आता डायरेक्ट. मस्त कॉफी पिऊया आणि घरची वाट धरू या. ”नयना म्हणाली.

आज जवळजवळ चार पाच महिने अमेरिकेत लेकीकडे राहून आज ते भारतात परत आले.

लाडक्या नातवंडांना सोडून येताना सगळ्या आजीआजोबांच्याडोळ्यात पाणी येतं. नयना दिलीपलाही चिमुकल्या राणीला आणि मुग्धा माधवनला सोडून येताना अश्रू आवरेनात. गोड गुटगुटीत राणी त्यांच्याकडे झेप टाकून येत होती.

इमिग्रेशन मध्ये गेल्यावर राणी आणि मुलगी जावई दृष्टीआड झाले. आणि जड अंत:करणाने दिलीप नयना विमानात चढले.

आत्ता, परतीच्या वाटेवर कारमध्ये बसल्यावर नयनाच्या डोळ्यासमोरून सगळा पट सरकला.

नयना दिलीपच्या बँकेत नोकरीला आली होती. नुकतीच नाशिकहून बदली होऊन नयना रुजू झाली होती. दिलीप तिचा मॅनेजर होता.

सुरवातीला गोंधळलेली नयना आता नवीन बँकेत आणि शहरात चांगलीच रुळली. तिला पुणं फार आवडायला लागलं.

तिला नव्या मैत्रिणी मिळाल्या आणि दर आठवड्याला नाशिकला पळणारी नयना आता महिन्याने सुद्धा नाशिकला जायचे टाळू लागली.

दिलीपने एकदा तिला घरी सहज चहाला बोलावले.

त्याचे आईबाबा, धाकटी बहीण आणि घरातले मोकळे वातावरण तिला फार आवडले.

साधारण चार महिन्यांनी दिलीपने तिला लग्नाबद्दल विचारलं. ,

एका छानशा हॉटेलात तिला कॉफी प्यायला त्याने बोलावले आणि मागणी घातली.

हसून दिलीप म्हणाला”अग, माझ्या हे मनात सुद्धा नव्हतं. पण माझ्या आईला तू फार आवडलीस.

बघ आता.

माझ्या आईने, मला सून फार आवडलीय तर तिला विचार बघू असे सांगितलंय बरं मला. म्हणून मी तुला लग्नाचं विचारतोय. ”हसून दिलीप म्हणाला. म्हणजे माझ्याआधीच तुला सासूने पसंत केलीय. “

नयना हसत म्हणाली” हो का? मग अजूनही तुम्ही मला नाही म्हणू शकता. बळजबरी नाहीये कोणाची.”

दिलीप हसला आणि म्हणाला, “मला तर तू आवडतेसच. पण आईसाहेबांना आवडलीस म्हणजे आता काळजी नाही. होणारच तू लाडकी सून त्यांची. ” असं ते लग्न ठरलं आणि थाटामाटात झालं सुद्धा.

नयनाला माहेरी एकत्र कुटुंबाची सवय होती. , सासरी तिला जड गेलं नाही. उलट तिला सासू आणि नणंद मैत्रिणीसारख्याच झाल्या.

लग्नानंतर जरा उशिराच झाली तिला मुग्धा.

सहा वर्षानी घरात लहान बाळ आलं म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. मुग्धा आजीआजोबा आईबाबांच्या सहवासात मोठी होत होती. आत्या लग्न होऊन आपल्या घरी गेली होती. आपल्या भाचीच्या ओढीने आत्यासुद्धा मुग्धाला भेटायला जवळजवळ रोज येई.

मुग्धा अत्यंत तीव्र बुद्धी घेऊन आली होती. शाळेत सतत पहिली. दिसायला सुंदर. कधीही दुसरा नंबर न बघितलेली मुग्धा हट्टी हेकेखोर व्हायला लागली.

त्यादिवशी शाळेतून आली ती हातपाय आपटतच.

दप्तर फेकून देऊन जोरात भोकाड काढून रडायला लागली.

”काय झालं मुग्धा? “आजीने घाबरून विचारलं. आजी माझा दुसरा नंबर आला. असं कसं झालं? आदित्यचा कसा आला पहिला नंबर? तू शाळेत चल आणि सांग बाईना. ”हुंदके देत देत मुग्धा म्हणत होती.

“मुग्धा, आधी हे खा बघू. मग जाऊ हं उद्या शाळेत. ”आजी म्हणाली.

मग आजी म्हणाली,

हे बघ बाळा कायम तूच कशी नेहमी पहिली येशील? बाकीची मुलं पण छान अभ्यास करतातच. असा त्रागा करायचा नाही. तू काय कमी हुशार आहेस का? ”

आजीने समजूत घातली खरी, पण नयना बँकेतून आल्यावर हा प्रकार त्यांनी तिच्या कानावर घातला.

नयना, मुग्धा हुशार आहे मान्य. पण हा स्वभाव चांगला नाही. मी म्हणेन तेच खरं, मीच हुशार.

त्या विचारात पडल्या. म्हणाल्या, दिलीपची आजी होती अशी हेकट आणि संतापी. अतिशय त्रागा करायच्या त्या, काही मनाविरुद्ध झालं की.

मुग्धा अशीच झालीय. कोण कोणाचे कसे गुण अवगुण घेतं बघा. ”त्या सुस्कारा टाकून तिथून निघून गेल्या.

दिवस भराभर निघून जात होते.

मुग्धा अतिशय हुशार तर होतीच. उत्तम करिअर करत ती इंजिनिअर झाली.

तिच्याच वर्गातल्या माधवनशी तिने लग्न ठरवलं.

माधवन तमिळ ब्राह्मण. अतिशय हुशार आणि आपल्या व्हॅल्यू जपणारा. स्वभावाने मृदू. नम्र आणि कमालीचा शांत. तमिळ असला तरी उत्कृष्ट मराठी समजत होतं त्याला आणि अस्खलित मराठी बोलायचा तो.

दिलीपने त्याला एकदा सांगितलं”माधवन, तुम्ही फार गुणी आहात. नाव ठेवायला जागा नाही तुम्हाला. पण आमचीच मुलगी फार आक्रस्ताळी आहे. ती अतिशय संतापी आहे. तिला संताप आला की भानच रहात नाही. तुम्हाला तिची ही बाजू माहीत हवी म्हणून मी हे सांगतोय”.

माधवन शांतपणे म्हणाला”काळजी करू नका. मी समजून घेईन मुग्धाला. खूप गुणी मुलगी आहे तुमची. ”

आणि ते लग्न झालं. अतिशय हौसेने करून दिलं नयना दिलीपने.

माधवनचे आईवडील लग्नाला आले आणि उपऱ्या सारखे निघून गेले. त्यांना ही मराठी सून अजिबात पसंत नव्हतीच. नशिबाने मुग्धा माधवन त्यांच्याजवळ रहाणार नव्हते.

माधवनला अमेरिकेचा उत्तम जॉब मिळाला.

मुग्धालाही तिकडे चांगला जॉब मिळायची शक्यता होती. मोठ्या आनंदाने दोघेही अमेरिकेला निघून गेले.

नयनाने तिची सगळी हौसेने तयारी करून दिली. भांडी, कुकर रोजची सगळी पोळपाट लाटण्या पासून तयारी दिली करून.

मुग्धा माधवन गेले. आता घरात फक्त दिलीप आणि नयना.

वडीलधारी माणसे एका मागोमाग एक काळाच्या पडद्याआड गेली आणि नयनाला घर खायला उठलं. तरी अजून तिची नोकरी चालू होती म्हणून बरं.

आता मुग्धाला दिवस गेले.

कोडकौतुक करायला, आवडीचे खायला घालायला म्हणून हौसेने रजा घेऊन नयना दोन महिने मुग्धाकडे गेली. मुग्धाने आईचे छान स्वागत केलं. ” आई किती मस्त वाटलं तू आलीस म्हणून ग. ”

नयना उत्तम सुगरण होतीच.

दुसऱ्याच दिवशी तिने हौसेने पौष्टिक धिरडी केली.

मुग्धा म्हणाली, ”हे मी खाणार नाही. यात न्यूट्रिशस काहीच नाहीये.

माधवनने ती अतिशय आनंदाने खाल्ली. आई, काय सुंदर चव झालीय हो. मला आणखी वाढा. ”

मुग्धाने एकाही धिरड्याला हात लावला नाही. ”अग मुग्धा, यात सगळी पिठे आहेत, मेथ्या आहेत, भाज्या घातल्या आहेत. तू खाऊन बघ. ”पण तिने एकही धिरडे खाल्ले नाही.

नयना कानकोंडी झाली. हे असंच चालू राहिलं तर आपण इथे का आलोय असा प्रश्न तिला पडला.

मुग्धा रोज इंटरनेट बघून त्यातले पदार्थ नयनाला करायला सांगे आणि तेच खाई ती. त्याला ना चव ना ढव.

आता हिचं आणि आपलं पुढे बाळंतपणात कसं होणार याचा प्रश्न नयनाला पडला. बरं काहीबोलायला समजवायला जावं तर लगेच,

माझी डॉक्टर आणि डाएटीशियन सांगेल तेच मी करणार हे उत्तर.

अग, त्या गोऱ्या आहेत, आपली संस्कृती खाणे पिणे वेगळे आहे असं सांगूनही त्यातून भांडणेच होऊ लागल्यावर नयना गप्पच बसली.

अक्षरश:ते दोन महिने कसे जातील असं झालं नयनाला. रोज हे असे सहन करून नयना वैतागली. ना कुठे तिला मुग्धाने फिरायला नेलं ना कुठे नीट संवाद साधला. सतत ती एक तर घरून काम करताना घरच्या ऑफिस मध्ये असायची किंवा वर बेडरूम मध्ये.

तिचा नयनाशी संवादच होत नसे. ना कधी मुग्धाने तिला आवडीचे काही खायला करायला सांगितलं, ना कधी तिने केलेलं कौतुकाने खाल्लं. कधी आणलेले सुंदर ड्रेस घालून बघितले नाहीत की साडी नेसून दाखवली नाही नयनाला..

बिचारा माधवन कानकोंडा होऊन जाई. त्यानेच नयनाला मॉल मध्ये नेलं, तिला हवी ती खरेदी करून दिली.

नयना म्हणाली, ” माधवन, मी तर चालले पण तुमचं कठीण आहे हो.

माझीच मुलगी ही पण कशी वागतेय हो. जगात कोणाला दिवस जात नाहीत का? आणि मी आई आहे ना हिची? आता मी हिच्या डिलीव्हरीला येऊन तरी माझा उपयोग होईल असं वाटत नाही. ”

माधवन बिचारा काहीच बोलला नाही.

नयना दोन महिन्यांनी भारतात परत आली. दिलीपला तिने हे सगळं सांगितलं.

“काय करू मी दिलीप? अशीच ही वागणार असली तर माझा तिकडे काहीही उपयोग नाही बघ. मी नाही जात तिकडे. करू दे त्यांनाच बाळंतपण. अरे, मुग्धाचं माझ्यावाचून काहीही अडणार नाहीये. ”हताश होऊन नयना म्हणाली.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तेरी मेरी प्रेमकहानी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तेरी मेरी प्रेमकहानी… ☆ डॉ. शैलजा करोडे

सूर्य मावळतीला गेला आहे. चोहीकडे संधीप्रकाश पसरला आहे. डिसेंबर महिना असल्याने हुडहुडी भरवणार्‍या थंडीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरूवात केली आहे. शहराबाहेर फारशी वर्दळ नसणार्‍या व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यालयात मी माझे बाबा, आई व आमच्या दोन कुटुंब हिंतचिंतकासह बसलेली आहे. दिव्याच्या अगदी मिणमिण प्रकाशात अंधुकसा अंधार जणू अंगावर येत आहे.

गेल्या वर्षभरापासून या केंद्रात पुनर्वसनासाठी भरती असलेल्या माझ्या नवर्‍याला आज डिस्चार्ज मिळणार म्हणून आम्ही सगळे जमलेलो. बाबा कार्यालयीन पूर्ततेत गुंतले होते. पत्नी म्हणून माझ्या नवर्‍याला मी सोडवून नेऊ शकत असल्याने आम्ही हे पाऊल उचललेले.

“मॅडम, या लेटरवर सही करा “

मी सही केली. अक्षय माझ्या नवर्‍यासह पुनर्वसन केंद्राला आम्ही बाय करून निघालो.

सावित्री तू होतीस म्हणूनच मी जगू शकलो. तू नवजीवन दिलं आहेस मला. आता तुला सावित्री याच नावानं मी हाक देत जाईन.

“अक्षय, कितीही अडथळे आले तरी आपलं प्रेम अक्षय आहे, ते कधीच संपणार नाही. “

O my love. म्हणत अक्षयने एक प्रेमळ कटाक्ष माझ्याकडे ठाकला.

आज कशा अवस्थेतून मी त्याला सोडवलं होतं.? कोणत्या अशा शक्ती होत्या कि ज्यांनी व अक्षयमध्ये दुरावा निर्माण केला होता? . कशी सांगणार ही कथा दोन शब्दात. ” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील, दो लब्जों मे ये बया ना हो पाए “

“अक्षयचं स्थळ माझ्यासाठी सांगून आलेलं. घरची गरीब परिस्थिती, पण मुलगा डाॅक्टर असल्याने बाबांनी स्थळाला होकार कळवला.

” बाबा, हा डाॅक्टर आहे. दारू पित असेल तर, ” माझी शंका.

” बाबांनी सरळ मुद्यालाच हात घेतला. अक्षय दारू पित होता, पण पिणार नाही शपथेवर बोलला.

लग्नानंतर सुरूवातीचे दोन /चार वर्ष चांगले गेले. माझ्या घरात प्रथमेश चिमणा ही आला. घर कसं आनंदानं भरलं.

हळूहळू अक्षयने रंग दाखवायला सुरूवात केली. रात्री बेरात्री उशीरा घरी येणंं, पार्ट्यांमधून दारू पिऊन येणं सुरू झालं. मी विरोध करताच, चारचौघात तसं वागावं लागतं. माझ्या व्यवसायाचा तो एक भाग आहे म्हणायचा. ” 

अक्षयचे नातेवाईकही पैशांना लोचणारे होते. याचं लग्न आम्ही करायलाच नको होतं इथपर्यंत यांची मजाल गेलेली. अक्षयला चुकीचे सल्ले देणं, त्याच्यात व माझ्यात दुरावा निर्माण करणं सुरू झालं.

अक्षय तसा imotional fool होता. हलक्या कानाचा होता. त्यांच्या आडसट्यात तो वाहवत गेला. त्यातचं त्याच्याच हाॅस्पिटलमधील विधवा डाॅक्टर त्याच्यावर प्रेमजाळं टाकत होती.

चारी बाजूंनी मला नेस्तनाभूत करण्यात ही मंडळी यशस्वी झाली. अक्षय दुरावला. वहिनीच्या अंकित असलेला अक्षय तिच्या हातचं बाहुलं झाला. अक्षयचं दारूचं व्यसन तिनं नवर्‍याच्या मदतीनं वाढवलं. आणि दारूच्या नशेत अक्षयचं घर, बँक बँलन्स, शेअर्स, विमा, कॅश सगळं सगळं हडप केलं. सगळं लुटून झाल्यावर, ” निघ आमच्या घरातून म्हणत अक्षरशः त्याचं सामान फेकलं. अक्षयने विरोध करताच त्याला जबर मारहाण केली व या व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेऊन, त्यांना खोटंनाटं सांगत त्याची रवानगी इथे केली.

वर्षभर या केंद्रात खितपत पडल्यावर आज मी याची सुटका केलेली.

राम सीतेसारखा चौदा वर्षाचा माझा वनवास आज संपला होता. अक्षरशः मरणाच्या दारातून मी अक्षयला आणलं होतं. माझ्या मंगळसूत्रात व भाळावरच्या कुंकवाच्या शक्तीनेच तो माझ्यापर्यंत पुन्हा पोचला होता. कितीतरी वर्षाने नववर्ष माझ्या जीवनात आनंद घेऊन आलं होतं.

“काय सावित्री काय म्हणतेस ” ” आज आपलं प्रेम जिंकलं अक्षय ” ” होय, तुझ्या प्रेमात ती शक्ती आहेच ” FM Radio वर गाणे सुरू होते.

” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील

दो लब्जों मे ये बया ना हो पाए “

 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिरीप… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तिरीप… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

आज शर्वाणी लग्नानंतर दोन – तीन वर्षांनी दिवाळीतून तिच्या माहेरी म्हणजे बेळगावला जायला निघाली होती. लग्न झाल्यावर ती शशांकबरोबर म्हणजे तिच्या नवर्‍याबरोबर कामाच्या निमित्ताने पूण्याला राहत होती शशांक एका आय. टी. कंपनीत कामाला होता. लग्नानंतर तिचे बेळगावला जाणे क्वचितच व्हायचे. म्हणून हा बेत तिने खूप दिवस अगोदरच ठरवला होता. व्यवस्थित सर्व ठरवून ती प्रायव्हेट बसने बेळगावला जाणार होती. तीन ते चार दिवसांपूर्वी तिने सीटचे आरक्षण करून ठेवले होते. तिने तिच्याबरोबर एक आटोपशीर बॅग घेतली होती. सगळ व्यवस्थित सांभाळत ती बसमध्ये जागेवर येऊन बसली. अजून बाजूच्या सीटवर कोणी आलेले दिसत नव्हते. “आले बाबा एकदाची आता काही काळजी नाही. ” ती स्वतःला म्हणाली. तिला आठवले काल रात्री बाबांशी बोलताना ते म्हणाले होते, ” शरू, काही काळजी करू नकोस. तुझी बस बेळगावला स्टाॅपवर यायच्या अगोदरच हा तुझा बाबा तुला उतरवून घ्यायला हजर असलेला तुला दिसेल.” शर्वाणीचे बाबा म्हणजे अच्युत गोळे. बँकेतील नोकरीतून निवृत्त झालेल एक व्यक्तिमत्व. हुशार, गप्पिष्ट व थोडं मिश्किल. बस सुसाट धावत होती. पण शर्वाणी तर आठवणींच्या गाडीवर स्वार होऊन वेगाने निघाली होती.

बसच्या खिडकीला असलेल्या पडद्यातून उन्हाची किरणे आत प्रवेश करत होती. बसच्या आतल्या त्या अकृत्रिम अंधाराला छेदू पाहत होती. तेवढ्यात नकळत शर्वाणीसुदधा वर्तमानकाळातून भूतकाळाच्या त्या अंधार्‍या विश्वात प्रवेशली. तिला डोळ्यांसमोर लहानपणीची दिवाळी दिसू लागली. नविन कपड्यांची खरेदी, फटाके खरेदी. ते आठवून ती हळूच हसली. पुरूष मंडळींची खरेदीची लगबग, घरातल्या बायकांची फराळाची धावपळ असे कितीतरी प्रसंग तिला खिडकीतून आत येणार्‍या प्रकाशाच्या तिरीपेप्रमाणे लख्ख आठवू लागले. तिच्या मनातील आठवणींचा कोपरा प्रकाशित होऊ लागला. आजोबांचे ते दिवाळीसाठी किल्ला बनविणे.. पण आजोबा वारल्यानंतर ते थांबले होते. पुढच्याच क्षणी तिने विचार केला, ” अरे, मी जर ह्यावर्षी किल्ला बनविला तर? अनायसे मी तिथे असणारच आहे. तर काय हरकत आहे? आई बाबांना पण बर वाटेल. आणि तिचे डोळे आनंदाने चमकले.

पुढच्या दोन तीन तासांत शर्वाणी बेळगावला पोहचली. तिला म्हटल्याप्रमाणे तिचे वडील तिची बस यायच्या अगोदरच बस स्टाॅपवर हजर होते. त्यांना पहाताच शर्वाणी सुखावली. वडिलांनी आणलेल्या गाडीत बसून ते घरी जाण्यास निघाले. पुढल्या दहा मिनिटांत गाडी बंगल्याच्या दारात येऊन थांबली. आजोबांच्या वेळेसचा तो बंगला अजून चांगला होता.

गाडीच्या हाॅर्नचा आवाज ऐकून आई बाहेर आली. ” कशी आहेस शरा. चल आत. कधीची वाट बघते आहे. शशांक कसे आहेत? ” आईचे प्रश्न ऐकून बाबा म्हणाले ” अग किती प्रश्न विचारशील. घरात येऊ दे तिला. राहणार आहे आहे आता दहा पंधरा दिवस. मग हव्या तेवढ्या गप्पा मारा मायलेकीने. ” सगळे हसत घरात गेले. हात पाय धुवून, ड्रेस बदलून शर्वाणी डायनिंग टेबलजवळ आली. आई व बाबा तिची वाट पाहत होते. आईच्या हातचे गरमागरम जेवण जेऊन ती तृप्त झाली. आई वडीलांबरोबर गप्पा मारत ती त्यांचे जेवण होईपर्यंत डायनिंग टेबलवर थांबली.

हळूहळू दिवस कलू लागला. बंगल्याच्या गच्चीवर उभी राहून ती समोर पहात होती. वर्षानुवर्षे आहे तसेच सर्व होते. सूर्य अस्ताला जाताना दिसत होता दृश्य फारच विलोभनीय होते. तिच्यामागे आई कधी येऊन उभी राहिली ते तिच्या लक्षात पण आले नाही. शर्वाणीच्या आईचे नाव शैलजा. शैलजाताई तिच्याजवळ येत तिल्रा म्हणाल्या. ” अग इथे आहेस होय? आणि मी आपली तुला सगळीकडे शोधते आहे. ” “हो ग. किती छान वाटत होते सूर्य मावळत असताना पाहीला. आमच्या इथे पूण्याला तर उंचच उंच इमारती त्यातून हे असे सुंदर दृश्य कुठून पहायला मिळणार? “शर्वाणी म्हणाली. ” हो ग बाई. छान एन्जाॅय कर आता आली आहेस तेव्हा. ” आई प्रेमाने म्हणाली.

दुसर्‍या सकाळी लवकर आवरून शर्वाणी आजोबांबरोबर ज्या दुकानात किल्ला बनविण्यासाठी लागणारे सामान आणायला जायची त्या दुकानात गेली आणि सामान घेऊन आली. दुकानात जायच्या अगोदर तिने कामाला येणार्‍या राधा ताईंकडून गेस्ट हाऊसच्या भिंतीची जागा साफ करून घेतली होती. लवकरच तिने पन्हाळा किल्ल्याची छान प्रतिकृती त्याजागी बनविली. जवळ उभे राहून मुलीची कला अवलोकीणार्‍या आईवडीलांनी एकदमच तिला म्हटले, ” तू खरच आज आजोबांची नात शोभतेस खरी. ” शर्वाणी हे ऐकून खूप खूश झाली.. मावळतीला निघालेल्या सूर्याची किरणे झाडांच्या पाठीमागून तिरीपेच्या रुपात त्या प्रतिकृतीवर पडली होती आणि ती किल्ल्याची प्रतिकृती सुंदर भासत होती.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिन्हीसांजा – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ तिन्हीसांजा – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(“तुझ्या मनासारखे होईल याची मी खात्री देते. अगं, आपण स्त्रियांनीच स्त्रियांची मदत करायची. फक्त तुझ्या मनात काय आहे ते मोकळेपणाने सांग.”… रेवतीने ठरविले आता सारे काही या ताईंना स्पष्ट सांगायचे.) – इथून पुढे – – 

“आमचा अभिजीत खूप हुशार आणि शिस्तीत वाढलेला मुलगा! स्वतःच्या कर्तृत्वाने सीए झाला. अभिजीतची जमेल तशी हौस- मौज आम्ही केली पण भास्करने कुठल्याच बाबतीत हात सैल सोडला नाही. बहिणींची लग्न, आई-वडिलांची जबाबदारी सांभाळून त्याने चाळीतल्या दोन खोल्यातून आम्हाला हाउसिंग कॉलनीत आणलं. तीन खोल्यांची छोटीशी पण स्वतंत्र आणि स्वतःची जागा. जागेसाठी घेतलेलं लोन हळूहळू फिटत होतं. भास्करचे मित्रच होते आजूबाजूला. आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहणारे नरेंद्र आणि सुलभा ह्यांची आणि आमची दोघांची खूप घट्ट मैत्री!

 अनघाचे वडील एक नावाजलेले सॉलिसिटर आहेत. त्यांची स्वतःची फर्म आहे. तिथेच काम करणाऱ्या अभिजीतच्या दिसण्या- वागण्यावर, कर्तृत्वावर खुश होऊन अनघाच्या श्रीमंत वडिलांनी घरजावई म्हणून त्याला बरोबर हेरला. आपली एकुलती एक, जेमतेम पदवीधर झालेली, श्रीमंतीचा गर्व असलेली अहंमन्य मुलगी अनघा, चतुराईने अभिजीतच्या गळ्यात अडकवली.

 भास्करला हे लग्न एवढं पसंत नव्हतं. अभिजीत त्या श्रीमंती थाटाला, उत्तराच्या नखऱ्यांना भुलला. अगदी खरं सांगायचं तर मलाही त्या श्रीमंतीचं थोडं आकर्षण वाटलं होतं.

 ती दोघं आणि आम्ही कधीही एकत्र राहिलोच नाही. अभिजीतही हळूहळू तिकडचा होऊन गेला. सुखोपभोगाच्या सवयी चटकन लागतात. दोन्ही नातवंडांच्या बारशाच्या वेळी मीच तिथे पाहुण्यासारखी जाऊन आले. भास्करने मात्र त्या घराचा उंबरठा कधीच ओलांडला नाही.

 दोन-तीन महिन्यांपूर्वी भास्करने एका दुपारी मला जवळ बसवून एक महत्त्वाची फाइल दाखविली. साऱ्या फिक्स्ड डिपॉझिटच्या पावत्या, विम्याच्या पॉलिसी, आमच्या घराचे कागदपत्र सारं व्यवस्थित दाखवून ती फाईल कुठे ठेवली आहे तेही दाखवले. या सगळ्याच्या झेरॉक्सची फाईल नरेंद्रकडे दिली आहे असेही सांगितले.

 “आत्ता कशाला हे सगळे सांगत आहात मला? “

“अगं, तुला आपल्या आर्थिक व्यवहाराची सगळी नीट माहिती पाहिजे. तुझ्या एकटीसाठी पुरेल अशी सगळी व्यवस्था मी केलेली आहे. माझ्यानंतर हे घर तुझ्याच नावावर होईल. घराच्या कागदपत्रांवर दुसरं नाव कुणाचं घालायचं हे तू ठरव. नीट विचार करून सगळे निर्णय शांत डोक्याने घ्यायचे बर का! ‘

 भास्करने जणू काही सारं आधीच समजल्यासारखं सगळी निरवानिरव करून ठेवली होती. भास्करला मी काटकसरी समजत होते. काही वेळेला माझ्या साध्या हौशी पुरवल्या गेल्या नाहीत म्हणून रुसत होते. पण भास्करने मुला- सुनेला बरोबर ओळखले होते. भास्करच्या दूरदृष्टीमुळे मी आज आर्थिक दृष्टया कुणावर अवलंबून नाही. जमेल तेवढे दिवस मला स्वतंत्र आणि मनासारखं जगायचं आहे. भास्कर एकाएकी गेला आणि आणि ध्यानी- मनी नसताना मुलावर विश्वास ठेवून अकस्मात मी इथे येऊन पोहोचले आहे. “

 ” रेवती, तू अजून सर्व दृष्टीने सक्षम आहेस. तुला जमेल तेवढे दिवस स्वतंत्रपणे राहण्याचा आनंद जरूर घे.

 तुला घरी परत जायचं आहे एवढंच ना. करूया तशी व्यवस्था आणि इथेही तुझं एक हक्काचं माहेर आहे हेही लक्षात ठेव. “

कृतज्ञतेने रेवतीने सुधाताईंच्या खांद्यावर मान ठेवली आणि आनंदाश्रूंना वाट करून दिली.

जाताना धुरकटलेला वाटलेला कशेडीचा घाट आता परतीच्या प्रवासात रेवतीला हिरवळ अंगावर लेऊन प्रसन्नपणे हसत असलेला वाटला.

 जायच्या आदल्या रात्री रेवतीने संधी साधून सुलभाला हळूच फोन केला होता आणि उद्या अभिजीतबरोबर बहुतेक त्याच्या घरी जात आहे असं सांगितलं होतं. तुझ्याकडे दिलेली किल्ली माझ्याशिवाय कुणाला देऊ नको असेही सांगायला ती विसरली नव्हती.

 बेल वाजली आणि दारात रेवती असल्याचे पाहून सुलभाला आश्चर्याचा धक्काच बसला. बरोबर एक पाहुणीही दिसत होती.

 “चहा आणते ग. हात पाय धुऊन घ्या”

“भाऊजींनाही घेऊन ये बरोबर. थोडं बोलायचं आहे. “

रेवतीने सांगितलेली सगळी हकीगत ऐकून नरेंद्र आणि सुलभा आवाक् झाले. अभिजीतला आईची जबाबदारी तर नकोच होती आणि संपत्तीत लोळणाऱ्या अनघाला आणि अभिजीतलासुद्धा आईच्या जागेचा, पैशाअडक्याचा लोभ सुटला होता. बायकोच्या नादाने बहकलेल्या अभिजीतचा नरेंद्रला खूपच राग आला होता. सुलभा म्हणाली, “पण एवढं तरी नशीब म्हणायचं की, त्यांनी जिथे तुला पोहोचवलं त्या सुधाताई अगदी समंजस निघाल्या. “

 महाबळेश्वरला आठ दिवस शाही विश्रांती घेऊन परतलेल्या अभिजीत- अनघाने दोन दिवसांनी आई राहत असलेल्या कॉलनीत मोर्चा वळवला. खिशातून किल्ली काढून दार उघडायचा प्रयत्न करीत असलेल्या अभिजीतच्या लक्षात आलं की दाराचं कुलूप बदललेलं आहे. आतून हसण्या बोलण्याचे, कपबशांचे आवाज येत आहेत. आश्चर्याने आणि नाईलाजाने त्याने बेल वाजवली आणि समोरचे दृश्य बघून दोघेही थिजून गेले.

आईच्या सहासात मैत्रिणी गोळा झाल्या होत्या. आई कुणाला विणकाम शिकवत होती तर कोणाला भरतकाम.

 रेवती त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवून निर्भयपणे म्हणाली,

अरे त्या सुधाताई खूप चांगल्या आहेत बरं का! मी कुणालाच न सांगता, नातेवाईकांचा मैत्रिणींचा निरोप न घेताच इथे आणून सोडले गेले आहे हे त्यांना कळल्यावर त्यांनी मला लगेच घरी जाण्याची मोकळीक दिली. तू तुझ्या घरात आनंदाने राहा आणि कधी वाटलं तर इथे हक्काने ये असंही सांगितलं. तू त्यांना दिलेले पैसेही त्या परत करणार आहेत.

तेवढ्यात रेवतीची गाण्याची वही हातात असलेली नीला म्हणाली, “रेवती, तुझ्या वहीतलं हे नवीन गाणं किती छान आहे… 

या सखयांनो परत फिरा ग

घराकडे अपुल्या

तिन्हीसांजाऽऽ करा सुखाच्या.

 रेवतीच्या मनात येत होतं, नरेंद्र भाऊजींनी आपल्याला दाराचं कुलुप लगेच बदलण्याचा किती योग्य सल्ला दिला होता.

“निघतो आम्ही. ” रागारागाने अभिजीत जाण्यासाठी वळत म्हणाला तेव्हा त्याच्या खिशातून अनघाच्या सल्ल्याने, दरवाजाचे बदलायला म्हणून आणलेले कुलूप त्याला बोचकारत होते.

 समाप्त – 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिन्हीसांजा – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ तिन्हीसांजा – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन भास्कर गेला.

*दिवसकार्य झाले. आलेली सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. फक्त मुलगा आणि सुन राहिले होते. *

*गेले दोन तीन दिवस रेवती बघत होती की मुलगा आणि सुन* *तिचीही बॅग भरत होते. *

*तिच्या साड्या, भरतकाम* *विणकामाचं साहित्य, गाण्याच्या वह्या. *

*स्पष्ट बोलणं झालं नसलं तरी मुलगा त्याच्या घरी घेऊन जात असणार असा रेवतीचा अंदाज होता. *

*एकदोनवेळाच पाहिलेलं त्याचं अलिशान घर तिच्या डोळ्यासमोर तरळून गेलं*…

*”उद्या सकाळी लवकर आपण निघणार आहोत” रात्री झोपतांना मुलाने सांगितलं*

*ती बरं म्हणाली*..

*पण मुलाची अलिशान कार जेव्हा मुंबईच्या बाहेर पडली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण मुलाच्या घरी चाललेलो नाही. *

*कुठे चाललोय आपण? तिने विचारलं*

*”कळेल” मुलाचं अल्पाक्षरी उत्तर*…

*गाडी आता कशेडी घाट उतरत होती*.

रेवतीला चिपळूणपर्यंतचा रस्ता माहित होता कारण ती आणि भास्कर अनेकदा संगमेश्वरला देवदर्शनाला आली होती.

‘संगमेश्वरला देवदर्शनाला चाललोय का आपण? ‘ न राहवून रेवतीने विचारले.

‘तसंच काहीसं’ अभिजीतचं– मुलाचं- तुटक उत्तर आलं. अनघाने— सुनबाईने–गाडी सुरू झाल्यापासून झकास झोप काढली होती. वाटेत थोडं खाणंपिणं झाल्यावर अनघाने मोबाइलमध्ये जे डोकं खुपसलं होतं ते वर केलंच नव्हतं. या क्षुद्र जगाशी काही संबंधच नसल्यासारखंच वागणं होतं तिचं!

चिपळूणनंतर गाडी एका वेगळ्याच आडरस्त्याला वळली. खाचखळग्यांचा रस्ता पार करत एका कौलारू घरापुढे उभी राहिली.

‘तिन्हीसांजा’ ही त्या घरापुढील पाटी वाचून रेवतीच्या लक्षात आलं की, आपल्याला आता एका वृद्धाश्रमात ठेवण्यात येत आहे.

अनिच्छेने रेवती खाली उतरली. तेवढ्यात एक गोरटेल्या, सतेज, साठी ओलांडलेल्या बाई बाहेर आल्या. “या मंडळी! तुमचीच वाट पाहत होते. ” हसतमुखाने त्या म्हणाल्या.

अभिजीतने रेवतीच्या दोन बॅगा काढून त्या बाईंच्या ताब्यात दिल्या. त्यांच्याबरोबर काही बोलून अभिजीत गाडीत बसण्यासाठी वळला.

“थोडं चहा पाणी घेऊन जा”.

“नको, नको. आम्हाला काळोख व्हायच्या आत महाबळेश्वरला पोहोचायचं आहे. आमची दोन्ही मुलं आजी-आजोबांबरोबर तिथल्या हॉटेलमध्ये आमची वाट पहात असतील”. अनघाने तर गाडीतून उतरण्याचीसुद्धा तसदी घेतली नव्हती.

रेवती गाडीतून उतरून, अंगण ओलांडून घराच्या पायऱ्या चढत होती. तिला कुणाकडेच बघण्याची, बोलण्याची इच्छा नव्हती. आपल्याला न सांगतासवरता फसवून या इथे आणून सोडलं म्हणून तिच्या मनातला संताप डोळ्यातून बाहेर पडत होता. सर्वांग गदगदंत होतं.

सुधाताईंना अशा प्रसंगांची सवय होती. त्यांनी शांतपणे रेवतीच्या पाठीवर हात फिरवला.

“सकाळपासूनच्या प्रवासाने दमला असाल. हात पाय धुवून घ्या. चहा पोहे खाऊ आणि मग बोलू”.

रेवतीचे हुंदके थांबत नव्हते. सुधाताईंनी तिला हळूच धरून मागील दारी नेले. गार पाण्याने स्वच्छ हात पाय धुतल्यावर आणि चहा पोहे पोटात गेल्यावर रेवतीला थोडं बरं वाटलं.

सुधाताईंबरोबर मागच्या वाडीत फिरताना स्वच्छ मोकळी हवा आणि ताजा वारा यामुळे रेवतीच्या मनातले काळे ढग थोडे विरळ झाले. क्षितिजावर रेंगाळणारी मावळत्या सूर्याची किरणं माडांच्या झावळ्यांमधून निरोप घेत होती. शेलाट्या, उंच पोफळी वाऱ्याबरोबर डोलत होत्या. आंब्या-फणसांची भारदस्त झाडं तिच्याकडे आश्वस्त नजरेने पाहत होती. हळूहळू फुलणाऱ्या प्राजक्ताचा, गुलबाक्षीचा आणि झाडांच्या पाचोळ्याचा एक विशिष्ट गंध वाऱ्याबरोबर येत होता.

रेवतीच्या मनात आलं, ‘कॉलनीतल्या मैत्रिणींबरोबर दोन दिवस ट्रीपला येण्यासाठी हे ठिकाण नक्कीच छान आहे. पण… पण आपली फसवणूक करून आपल्याला इथे आणून सोडलं आहे याचं शल्य तिच्या अस्वस्थ मनात भरुन राहील होतं. थोड्यावेळाने सुधाताई म्हणाल्या,

“चला, संध्याकाळची प्रार्थना म्हणूया” रेवतीने पाहिलं तर अंगणात आता आठ- दहाजणी बसलेल्या दिसल्या. त्या कातरवेळी, शांत वातावरणात शुभंकरोती, रामरक्षा, श्रीसूक्त ऐकताना रेवतीच्या मिटलेल्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. सुधाताईंनी नुसता पाठीवर हात ठेवला आणि हळूच म्हणाल्या, “रात्री जेवणं झाली की बोलूया बरं”.

गरम भाकरी, भात, त्यावर तुपाची धार, कुळथाचं पिठलं, पापड, तळलेली सांडगी मिरची असा साधा पण आवडता बेत होता. सुधाताईंसह हसत बोलत अंगत- पंगत चालली होती. रेवतीलाही भूक लागली होती. स्वयंपाक करणाऱ्या काकू सगळ्यांना आग्रहाने वाढत होत्या.

स्वयंपाकघर आवरल्यावर सुधाताईंनी हळूच खूण करून रेवतीला मागच्या अंगणात तुळशीच्या कट्ट्यावर बोलावलं. तुळशीजवळ लावलेल्या पणतीचा प्रकाश घराच्या भिंतीवर सावल्यांचा खेळ करीत होता. रेवती अस्वस्थ मनाने सुधाताईंना काय आणि कशा शब्दात सांगायचं याची जुळवाजुळंव करू लागली.

तिचे मन जाणून सुधाताई बोलू लागल्या.

“रेवती, हे आमचं वडिलोपार्जित घर बर का! मुलगा हुशार. पुण्याला राहून शिकला आणि अमेरिकेत पोचला. आता त्यांना कुणालाच परत यायचं नाहीये. ‘हे’ गेल्यानंतर मलाही अमेरिकेत नेत होता पण मला त्या तुरुंगात अडकण्याची इच्छा नव्हती. हे घर, वाडी आणि थोडी शेतजमीन माझ्या नावावर असल्याने आर्थिक दृष्ट्या मी कुणावर अवलंबून नाही. मी शांतपणे पण ठामपणे मुलाबरोबर कायमचे अमेरिकेला जायला नकार दिला. ‘संध्याकाळ’ आपल्या घरातच घालविलेली बरी. नाही का? “

माझ्याबरोबर दुसऱ्या अशाच काही मैत्रिणींना, शाळा कॉलेजात जाणाऱ्या गरजू मुलींना थोडा विसावा देता येईल, मलाही सोबत होईल अशा विचाराने मी इथे राहिले आहे. तुझ्या रडण्यावरून आणि मुला- सुनेच्या वागण्यावरून असं वाटत आहे की, तुझ्या इच्छेविरुद्ध तुला इथे आणून सोडलं आहे. मोकळेपणाने सांग. आपण यातून तुला आवडेल असा मार्ग नक्की काढू. ” 

रेवतीने आश्चर्याने सुधाताईंकडे पाहिलं. खरंच? खरंच असं होईल?

रेवतीच्या डोळ्यातले भाव वाचून सुधाताईच पुढे म्हणाल्या,

“तुझ्या मनासारखे होईल याची मी खात्री देते. अगं, आपण स्त्रियांनीच स्त्रियांची मदत करायची. फक्त तुझ्या मनात काय आहे ते मोकळेपणाने सांग.

रेवतीने ठरविले आता सारे काही या ताईंना स्पष्ट सांगायचे.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षण वेचावे आनंदाचे… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ क्षण वेचावे आनंदाचे… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

श्यामरावांनी पाह्यल,आई सकाळपासून अस्वस्थ आहे. परदेशी शिकायला गेलेल्या संग्रामची तिला खूप आठवण येतीय. आम्हाला दोघांनाही त्याची आज सकाळी खूप आठवण येत होती.. पण मनाची समजूत काढली, शिकून मोठ्ठा होणार आहे आपला लेक. आणि हो! पंख फुटल्यावर पाखरू घरट्यातून आसमंतात भरारी घेरणारच… पण वयानी आणि मनानी हळव्या आजीला ते समजत होतं पण उमजत नव्हतं. नातू गेल्यापासून ती अबोल झाली होती. तिला कसं खुलवावं आम्हाला म्हणजे मला आणि शामलाला कळतच नव्हतं. तिला मनवायला संग्राम.. तिचा लाघवी नातू दूर देशी गेला होता ना! ..

इतक्यात संग्रामचा.. तिच्या नातवाचा फोन आला. आमच्यात खाजगीत बोलणं झालं. संगनमत होऊन विचारांचं मेतकूट जमलं. शामलाला हे गुपित सांगितल्यावर तिचीही कळी खुलली. ती सासूबाईंना म्हणाली, “आई तयार होता का, आपल्याला तुमचा वाढदिवस साजरा करायला बाहेर फिरायला जायचंय”.

तिला अडवतं आजी म्हणाल्या, “अगं काय हे शामला,! विसरलीस का? वाढदिवस साजरा करायला माझा नातू तरी आहे का इथे? ” ” त्याच्याशिवाय कसला वाढदिवस? मला नाही कुठे यायचं”.

“चला ना आई आपण फिरून येऊ म्हणजे तुमची उदासी कुठल्या कुठे पळेल”..

मिनतवारीने आजी तयार झाल्या. गाडी संग्रामच्या आवडत्या मिठाईच्या दुकानाजवळ थांबली. हातातला जिलबीचा पुडा बघून आजी लेकाला,शामरावांना म्हणाल्या,”शाम्या आधीच सांगते हो! मी जिलबीचा एकही तुकडा खाणार नाही. अरे! नातवाशिवाय जाईल कां मला”! हे बोलतांना भरून आलेले डोळे त्यांनी पदराने पुसले. हाच पदर धरून लहाना संग्राम घरभर नाचायचा. पण आता तो मोठा झालाय ना! दूर देशी पळालाय. आता त्याचं बालपण सरलयं. कुठे शोधू त्याचं ते चिमुकलं बालपण? .. हळव्या मनाच्या आजींचा पदराचा शेव अजूनच ओला झाला..

झोकदार वळण घेऊन गाडी एका लहान मुलांच्या आश्रमाजवळ उभी राह्यली. समोर धोतर, कोट, टोपी घातलेले गृहस्थ श्री. आप्पासाहेब आणि बाल मंडळी गुलाब घेऊन उभी होती.. “सुस्वागतम्” असं स्वागत करून तो बालचमुंचा समूह आजींकडे धावला. शामराव पुढे होऊन गोंधळलेल्या आईचा हात धरून म्हणाले, “आई अगं! हा बालआश्रम आहे आई-वडिलांच्या, आजी आजोबांच्या प्रेमाला परिस्थितीमुळे ही मुले पारखी झालीत. ऐक ना आई! पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलंय. तुझा नातू आता वयानी मोठा झालाय. मानाने खूप खूप मोठ्ठा होण्यासाठी आपण त्याला शिक्षणासाठी परदेशी पाठवलंय. तो परत येणारच आहे गं! पण त्याचं बालपण नाही परत येऊ शकत. तुला ते नातवाचं हरवलेलं बालपण हवयं ना? मग तू संग्रामचं बाळरूप ह्या बाळांमध्ये शोध. नक्कीच तुला तुझा नातू ह्यांच्यात दिसेल. “. आजींचा कंठ दाटून आला. डोळे आनंदाने भरून आले. आधीचे अश्रू आठवणींचे होते आणि आत्ताचे आनंदाश्रू होते..

फुगे माळा सुगंधी पुष्प, समई श्रीगणेशमूर्तीपुढची सुरेख फुलांची रांगोळी, औक्षवणाच्या तयारीने हॉल सजला होता.

शामलाने सासूबाईंना औक्षण केले. बावरलेल्या आजींनी हे सारं सुख डोळयात साठवलं. श्रीगणेशाला जिलबीचा नैवेद्य दाखवला गेला. आणि अचानक वेगाने छोटा अबीर प्रसादाच्या ताटाकडे झेपावला. आप्पासाहेब त्याच्या मागे धावतांना म्हणाले,”अरे थांब अबीर,आजी देतील तुला प्रसाद. असा हाताने प्रसाद घ्यायचा नसतो बाळा”

पण हे ऐकायला तो चिमूरडा जागेवर होताच कुठे, आजींचा पदर ओढून तो म्हणत होता,

“अहो आजी,आजी नाही हो मला! तुम्हाला म्हणू कां मी आजी? “.. सगळी माया एकवटली गेली.. प्रेमाने त्याला जवळ घेत आजी म्हणाल्या,. “होय रे होय बाळा! होईन मी तुझी आजी, तू माझा दुसरा संग्रामच आहेस”

अबीरने जिलबीचा तुकडा आजींच्या तोंडात सरकवला. टाळ्या वाजवत तो म्हणाला” हॅपी बर्थडे आजी”.. “अगं बाई हे काय? संग्रामच्या हंसण्याचा आवाज? म्हणजे माझा संग्राम आलाय की काय? ‘ गोंधळलेल्या आजी इकडे तिकडे बघू लागल्या. श्यामरावांनी त्यांच्यासमोर मोबाईल धरला. व्हिडिओतून संग्राम, आजींचा नातू टाळ्या पिटत म्हणत होता, “हैप्पी बर्थडे माय डियर आजी” अगं केव्हापासून मी व्हिडिओ वरून तुला बघतोय. आजी अगं शरीराने मी इथे असलो ना, तरी तुझा नातू मनाने तुझ्या जवळच आहे. खाल्लीस ना तू अबीरच्या हातून जिलबी? ती अगदी माझ्या हातचीचं समज. अबीरच्या डोळ्यात बघ. त्याच्यात लहानपणीचा तुझा नातूच तुला दिसेल. भरपूर प्रेम दिलसं तू मला. आता माझ्या प्रेमात हा चिमूरडा भागीदार झालाय. तुझ्या मायेचा भागाकार नाही गुणाकार होउं दे. माझ्या इतकचं प्रेम, माया संस्कार तू ह्या बालमंडळींना देणार आहेस हो ना गं आजी? ही अशी समाजसेवाच तुझ्या हातून घडेल.. हो ना? “.

आजी खुदकन् हंसल्या. मनाशी म्हणाल्या ‘जग किती पुढे गेलंय,साता समुद्रापलीकडे असलेला माझा नातू मला व्हिडिओतून भेटला ‘ आणि मग,सगळ्या बालमंडळींना कवेत घेतांना आजींचा पदर अपुरा पडला. त्यांच्या कवेत सारं ब्रह्मांड अवतरलं होतं. श्री गणेशाला हात जोडून त्या म्हणत होत्या, “देता किती घेशील दोहो कराने”.

आईचा हसरा चेहरा बघून श्यामराव शामलाला म्हणाले, “आजीला खुलवण्यासाठी नातवानी, संग्रामनी केलेलं सरप्राईज सक्सेस झालं म्हणायचं. जे तुला अन् मला जमलं नाही, ते ह्या पठ्ठयाने, एका मिनिटात जमवलं. “.

आजी गुणगुणत होत्या, “ देव जरी मज कधी भेटला काय हवे ते माग म्हणाला म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन देई माझ्या या बाळांना ”

– – आणि तो क्षण टिपायला संस्थेचे चालक आणि मालक श्री. आप्पासाहेब कॅमेरा घेऊन पुढे सरसावले..

धन्यवाद आप्पासाहेब..        

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “भेटीगाठी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “भेटीगाठी…” ☆ श्री मंगेश मधुकर

यशस्वी उद्योगपती, श्रीमंत अनिवासी भारतीय शशिकांत भारतात यायचे ते फक्त कामाच्या निमित्तानंचं. नातेवाईकांशी फोनवर बोलणं व्हायचं पण कधीही भेटण्याचा योग आला नाही. म्हणूनच भेटीगाठी साठीच शशिकांत बायको विदुला आणि मुलगी विनी सोबत भारतात आलेले. गावी जाताना मुख्य डांबरी रस्ता सोडून गाडी कच्च्या रस्त्याला लागल्यावर एसी गाडीतल्या मायलेकी जाम वैतागल्या.

“हॉरिबल रोड, पपा, व्हेअर वी गोइंग”

“आपलं मराठी बोलायचं ठरलंय ना. ”

“ओके, आय मीन बराय. आपण कुठं चाललोय”विनी.

“आत्याकडे”

“व्हॉट आत्या”

“ग्रँडपांची बहीण”

“व्हाय? आय मीन, का? ”

“खूप वर्षात तिलाभेटलो नाही म्हणून. लहानपणी उन्हाळ्यात, दिवाळीला शाळेला सुट्टी लागली लगेच तिच्याकडेच रहायला जायचो. धमाल करायचो. खूप मस्त दिवस होते. ”शशिकांत जुन्या आठवणीत हरवले.

“इतका त्रास करून जाण्यापेक्षा आत्यांनाच हॉटेलवर बोलवलं असतं तरी चाललं असतं. ”विदुलाच्या बोलण्यावर शशिकांतनी त्रासिक नजरेनं पाहिलं तेव्हा विदुला एकदम बाहेर पाहायला लागली.

“तुझ्या फॉरेन लेकीला गाव दाखवायचं होतं आणि महत्वाचं आत्याला त्रास नको म्हणून आपण चाललोय”

“व्हिडिओ कॉलवर बोलायचं ना”विनी.

“फोनवर बोलायचा एकदोनदा प्रयत्न केला पण आत्याला जमलं नाही. नीट बोलणं झाल नाही आणि आत्या सारखी माझी आठवण काढत असते म्हणून तिच्यासाठीच ही व्हिजिट प्लान केली. ”नंतर आत्या आणि आपल्या बालपणाविषयी शशिकांत भरभरून बोलत होते. गावाला पोचल्यावर तिघांचं गुलाबाच्या पाकळ्या उधळत ओवाळून थाटात स्वागत केलं. ते पाहून विदुला, विनी खूप भारावल्या. घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आजकाल सर्रास दिसतं तसं दिखाऊ, नकली अगत्य नव्हतं.

“आत्या कुठंयं”शशिकांतनं आतेभावाला विचारलं.

“तिकडंय. चला, आपण जाऊ”

“आत्याचं वय सत्तर असेल ना”

‘पंच्याहत्तर पूर्ण पण थकली आता!! फार हिंडत-फिरत नाही. बसूनच असते. नजरसुद्धा फार कमी झालीये पण कान मात्र अजूनही तिखट अन बुद्धी तल्लख आहे. फार स्वावलंबी. ऐकतच नाही. आजही स्वतःची कामं स्वतःच करते. मदत करायला गेलं की खेकासते. आज तू येणार म्हणून खुशीतये”भाऊ कौतुकानं म्हणाला.

“जुनी माणसं फार अभिमानी. दुसऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे यांना अपमान वाटतो”बोलत बोलत सगळे आत्याजवळ पोचले.

“अत्ये” शशिकांतनी डोळे मिटून जपमाळ ओढणाऱ्या आत्याला हाक मारली

“कोण रे? शशी का? ”

“हो”

“आलास का बाबा!! लई वाट पायला लावली”शशिकांत, विदुला आणि विनी तिघांनी वाकून नमस्कार केल्यावर आत्यानं डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. काही वेळ आत्याची विचारपूस करून विदुला, विनी घर बघण्यासाठी गेल्या. शशिकांत मात्र आत्याच्या शेजारी बसले. तिचा सुरकुतलेला थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. काहीच न बोलता दोघं एकमेकांकडे फक्त पाहत होते. आपुलकीच्या नात्याला शब्दांची गरज नसते कारण मायेचा स्पर्श भरभरून बोलतो. आत्या आणि शशिकांत दोघांचे डोळे भरले.

“अत्ये, असं का बघतेस. ”

“लई मोठा माणूस झालास. अबीमाण वाटतो. दादा-वईनीची आटवण आली”आत्यानं डोळ्याला पदर लावला.

“अत्ये, पार म्हातारी झालीस”हुंदका आवरत शशिकांतनी विषय बदलला.

“तर वो. बरं झालं आलास. जीवाला लई बरं वाटलं. आता जायला मोकळी.. ”

“असं का बोलतीस. शंभरी गाठायचीय”

“नको रे बाबा. हातपाय चालतात तवर सुटलेलं बरं!! उगा माझ्यामुळं पोरांना त्रास नग. शशी, आता आलास तर आट-पंधरा दिस रहा. तुझ्या आवडीचं खायला करते”

“पुढच्या वेळी!! यावेळेला जमणार नाही. उद्याच्याला निघेल. खास तुझ्यासाठीच आलोय. भेटून छान वाटलं”

“बरं केलसं. ” त्यानंतर सगळा वेळ शशिकांत आत्याबरोबरच होते. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दोघांनी सोबतच जेवण केलं. आत्याने प्रेमानं गोडाचा घास भरवल्यावर शशिकांत खूप भावूक झाले. विदुलानं घरातल्या सगळ्यांना भेटवस्तू दिल्या. विनी सगळ्या नवीन गोष्टीं एन्जॉय करत होती. एरवी कायम खूप गंभीर असणारे शशिकांत खळखळून हसत होते. मोठ्या आवाजात गप्पा मारत होते. विनोद करत होते. टाळ्या देत होते. जन्मापासून बिझनेसमनच्या रुपातच पाहिलेल्या पपांना एकदम आगळावेगळ्या रूपात पाहणं विनीसाठी फार मोठं सरप्राइज होतं. दुसऱ्या दिवशी निरोप घेताना वेळी आत्याचा बांध फुटला तेव्हा शशिकांतसुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकले नाहीत.

“अत्ये, माझ्याबरोबर चल, ”

“पोरा, आपलं ते आपलंच. कशाप्पयी इतका लांब गेलास. तूच इत्यं ये. ते लई बेस व्हील”आत्याच्या बोलण्यावर सगळे हसले. विनी, विदुला, शशिकांतला जवळ बोलावून आत्यानं शंभर शंभर रुपये हातावर ठेवले. निघताना विनीनं आत्यासोबत सेल्फी घेतला. परतीच्या प्रवासात शशिकांत गप्पच होते. मायलेकी मात्र जाम खुशीत होत्या.

“पपा, या स्पेशल व्हिजिटसाठी थँक्स, ग्रेट इंडियन फॅमिली!! लाईफटाईम वंडरफुल मेमरी” 

“बरं झालं आपण आलो. ही भेट आयुष्यभर लक्षात राहील” विदुला.

“आज कम्युनिकेशन खूप सोपं झालंय. एकमेकांशी कनेक्ट वाढला असला तरीही आपल्यासाठी कोणीतरी वेळ काढून भेटायला येतोय आणि कुणीतरी आपली वाट बघतंयं हे फिलिंग फार ग्रेट आहे. फोन, व्हिडिओ कॉलवर बोलणं हे फार वरवरचं वाटतं. समोरासमोर कडकडून भेटण्यातला आनंद काही औरच!! अशा आवडत्या माणसांच्या भेटीगाठी म्हणजे मनाची पॉवर बँक. कितीही बिझी असलो तरी आपल्या माणसांच्या भेटीगाठी घेणं हे श्वासाइतकंच गरजेचं आहे. ”

“पपा, आत्यानं तुम्हांला हंड्रेड रूपीज दिले ते फार फनी होतं. ”विनी 

“ए गप. काहीही बोलू नकोस”विदुलानं लेकीला दटावलं. ”

“त्यात फनी काय”शशिकांत.

“एका बिलियनरला हंड्रेड रूपीज म्हणजे.. ”विनी हसली.

“ते पैसे खाऊसाठी दिलेत. ”

“व्हॉट खाऊ!! ”

“सगळं एका क्लिकवर मिळणाऱ्या जनरेशनला खाऊच्या पैशाची मजा कळणार नाही. खाऊसाठी पैसे देणारी ही शेवटची पिढी… आत्यानं दिलेली ही सगळ्यात मोठी अमाऊंट आहे. चार आण्यापासून सुरवात झाली आता शंभर पर्यंत पोचलो. फिलिंग सुप्पर हॅपी!! ही नोट मी कधीच खर्च करणार नाही”शशिकांतचं बोलणं संपायच्या आत विदुला आणि विनी दोघीही एकदम म्हणाल्या. “आम्हीसुद्धा!!”.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कक्ष क्रमांक : ४३२…” – (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक : अनामिक – मराठी अनुवाद : सुश्री स्वाती वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “कक्ष क्रमांक : ४३२…” – (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक : अनामिक – मराठी अनुवाद : सुश्री स्वाती वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी

माझे नाव मुकुल, ५८ वर्षांचा, ऊंच, भरदार शरीर यष्टी, बाईक प्रेमी. मोठमोठ्या बाइक्स घ्यायच्या भ्रूम भ्रूम करत गावभर हिंडायचे, दोन्ही हातांवर टॅटू काढून, छातीपर्यंत रुळणारी दाढी मिरवत भटकायचे …आणि हो…आमचा बाईक चालविणाऱ्यांचा एक क्लब आहे…” रक्षक.. मोटर सायकल क्लब.. ”

दर गुरुवारी मी लहान मुलांच्या इस्पितळात जातो स्वयंसेवक म्हणून.. त्यांना बालकथा वाचून दाखवतो. पंधरा वर्षांपूर्वी आमच्या एका मित्राची नात या कॅन्सर च्या बाल रुग्ण विभागात कित्येक महिने होती तेव्हाच आम्ही ही सेवा सुरू केली.

बहुतांश वेळा बालकं मला प्रथम भेटीत घाबरतात. कारण माझी शरीर यष्टी आणि मोठा, जाडा आवाज, लहान मुलांच्या इस्पितळात नव्हे तर मोटर सायकल चालवणाऱ्यांची गँग असलेल्या कुठल्याही हिंदी सिनेमात शोभून दिसेल असा मी. पण एकदा का मी कथा वाचायला सुरवात केली की मग ते माझा अगडबंब देह विसरतात आणि कथेत रमतात. तसेच काहीसे लतिका बरोबर होईल असे मला वाटले होते.

मार्च महिन्यातील एका गुरुवारी मी कक्ष क्रमांक ४३२ कडे निघालो. परिचारिकेने मला आगाऊ सूचना दिली होती.. ही नवी मुलगी आहे सात वर्षांची. न्यूरोब्लास्टोमा (न्युरोब्लास्टोमा हा अपरिपक्व मज्जा पेशींचा (न्युरोब्लास्ट्स) कर्करोग आहे. तो बहुतेक वेळा अधिवृक्क ग्रंथींमध्ये (ॲड्रिनल ग्लँड्स) सुरू होतो, पण तो मान, छाती, पोट किंवा मणक्याच्या आसपासही आढळू शकतो)या चौथ्या स्टेज वर आहे….

“ तीन आठवडे झाले तिला दाखल केले आहे पण तिच्या कुटुंबापैकी कोणीही अजून एकदा ही आले नाही.

काय.. कुटुंबातील कोणीच नाही …कधीच नाही.. तीन आठवड्यातून एकदाही? …” मी जवळ जवळ ओरडलोच विस्मयचकित होत.

परिचारिकेचा चेहरा आक्रसला.. सौम्य शब्दात उत्तरली…”तिची आई तिला येथे अक्षरशः टाकून गेली आहे, उपचार करून घ्यायला पण स्वतः पुनः येथे कधीच फिरकली नाही. आम्ही किती प्रयत्न करतोय तिच्या पर्यंत पोचण्याचा पण यश येत नाही.. आम्ही लहान मुलांच्या काळजी वाहू कितीतरी संस्थांशी संपर्क केला. त्यांनी देखील शोध घेतला, पण तिला अन्य कोणी नातेवाईक ही दिसत नाही, एकदा का तिच्यात जरा सुधारणा झाली की तिची रवानगी अशा कुठल्यातरी जागी करण्यात येईल जेथे तिचे पालनपोषण कोणीतरी करेल. ”

“आणि समजा जर का सुधार झालाच नाही तर “ 

परिचारिकेने आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि म्हणाली…”तर ती येथेच मरेल…एकटी.. ” 

कक्ष क्रमांक ४३२ मध्ये शिरण्याआधी मी थोडा वेळ धीर एकवटत बाहेरच उभा राहिलो. तसे मी मरणाच्या दारी पोचलेल्या मुलांजवळ ही बसलोय त्यांना ही कथा ऐकवली आहे.. पण.. ही…एकटीच …. एकटी मृत्यूशी झुंज देणारी …हे माझ्यासाठी नवीन होते आणि प्रचंड हादरवून टाकणारे.

मी हळुवारपणे टकटक केले, दार हलकेच ढकलले, “ रामराम …मी मुकुल.. तुला आवडत असेल तर मी एक गोष्ट वाचून दाखविणार आहे …आवडेल तुला? ”

पलंगावर झोपलेली ती लहान पोरगी माझ्याकडे कूस बदलून बघू लागली. आजपर्यंत बघितले होते मी त्या पेक्षा किती तरी पटीने मोठे, टपोरे तपकिरी रंगांचे डोळे होते तिचे. किमोथेरेपी मुळे तिचे केस मात्र गेले होते, शरीर मृत्यू शी कसे झगडतेय याची ग्वाही देणारा तिचा काळवंडलेला चेहरा आणि कातडीचा रंग सांगत होता, पण मला बघताच ती हसली.

“ खरेच तुम्ही बलदंड आहात. ”. तिचा आवाज हळू पण घोगरा वाटला.

“ हो सारेच तसे म्हणतात, “ मी आणलेले पुस्तक दाखवत म्हटले, “ जिराफ नृत्य करायला शिकतो,अशी एक कथा आहे माझ्याजवळ…. तुला ऐकायचीय? ” 

ती हो म्हणाली म्हणून मी तिच्या पलंगाशेजारी खुर्चीवर बसलो आणि वाचायला सुरवात केली.

मी पुस्तकाच्या अर्ध्यावर पोचलो होतो तेव्हा तिने मला थांबवले, “ मुकुल काका “ 

“ काय, बेटा “

“ तुम्हाला मुलं आहेत? “

.. प्रश्न माझे काळीज चिरीत गेला. “ मला एक मुलगी होती, पण ती सोळा वर्षांची असताना कार अपघातात वारली. आता त्याला बावीस वर्षे झालीत “ 

लतिका एकदम मूक.. …नंतर म्हणाली …” तुम्हाला बाबापण हरपल्याचं दुःख होतंय? ” 

आवंढा गिळत मी कसाबसा उतरलो…” हो राणी, अगदी दररोज “ 

“ माझे वडील माझ्या जन्माआधीच गेले, “ अगदी सहज बोलावे तसे ती म्हणाली… “ आणि माझ्या आईने मला येथे आणून टाकले, नर्सेस सांगतात आता ती कधीच येणार नाही “ 

मला काहीच समजत नव्हते. मी काय बोलू यावेळेस…सात वर्षांच्या एका मुलीला मी काय सांगू जिला मरणाच्या दारात ढकलून आई निघून गेलीय..

लतिका बडबडत होती…” एक समाज सेविका मला सांगत होती.. तू जरा बरी झाली की तुला सांभाळायला जे तयार असतील त्यांच्याकडे सोपवणार.. पण मी डॉक्टरांचे बोलणे ऐकलेय.. त्यांना नाही वाटत मी आता बरी होईन.. ” 

“ माझी सोनूडी “ 

“ चालतंय की ” ती अगदी शांत होती. सात वर्षांची मुलगी, त्या मानाने जरा जास्तच शांत वाटली मला…. मला माहीत आहे, मी मरणार आहे…त्यांना वाटते मला काहीच समजत नाही पण मला सर्व समजते.. मी ऐकलय.. माझा कर्करोग सर्वदूर पसरलाय.. ते म्हणत होते…बहुदा सहा महिने किंवा त्याहून ही कमी …

मी पुस्तक खाली ठेवले, म्हटले…” लतिका बेटा …सॉरी हं “ 

मोठमोठ्या टपोऱ्या डोळ्यांनी लतिका माझ्याकडे बघत होती, “ मुकुल काका, तुम्हाला एक विचारू? “

“ काहीही विचार सोनूड्या “

“ तुम्ही माझे बाबा व्हाल… मी मरेपर्यंत? “ 

खोलीत एक विचित्र शांतता पसरली…सारे काही स्तब्ध झाल्यासारखे वाटले.. अगदी इस्पितळातील मॉनिटर्स सुद्धा.. माझ्या अठ्ठावन वर्षांच्या खांद्यावर मणामणांचे ओझे असल्याचा मला भास झाला.

मी माझे तोंड उघडले पण शब्दच फुटेना.. मला फक्त दिसत होता माझ्या सोळा वर्षांच्या मुलीचा चेहरा.. माझ्या मोटारीच्या मागील दृश्य दिसणाऱ्या आरशात मला दिसलेले तिचे ते शेवटचे लोभस हास्य.. मला फक्त जाणवले.. त्या दिवसापासून माझ्या हृदयात असलेली अपार वेदना.. निर्वात.. ती पोकळी..

लतिकाची पापणी लवली देखील नाही, ती अगदी शांत होती.. ती इवलीशी बाहुली किती धाडसी,सहनशील आणि अशक्य वाटेल एवढी समजूतदार…

मला.. हो.. म्हणायचे होते, मला.. हो.. म्हणायचेच होते…. पण मी एक भटक्या, एक बायकर, फिरस्ता…कधीतरी आठवड्यातून एका दिवशी बाल रुग्णांना भेटणारा.. त्यांच्यासाठी चित्रांची पुस्तकं नेणारा …भरधाव गाडी चालवत उडणारा, दारू पिणारा, आणि.. आणि.. अजून ही एखाद्या रात्री त्या रिकाम्या घरात माझ्या मृत मुलीच्या नावे ओरडत उठणारा…पुनः एका मुलीचा बाप होण्याची माझी पात्रता तरी आहे का? अगदी काही महिन्यांसाठी म्हटले तरी????

मी आवंढा गिळून पुटपुटलो…”बेटा,मला अगदी आनंदच होईल गं.. पण खरे सांगू मी एक चांगला बाबा होऊ शकेन का आता यासाठी साशंक आहे.. सगळाच गोंधळ करून ठेवेन मी अशी भीती वाटते “ 

तिचा चेहरा अगदी सूर्योदयाप्रमाणे उजळला.. ” ठीक आहे हो, त्यात काय…तुम्ही माझ्यावर बाबा होण्याचा सराव करा.. ” 

… आणि अगदी सहज त्या दिवसापासून मला पुनः एक लेक लाभली.

मी परिचारिकेला सांगितले तर ती रडायलाच लागली, समाज सेवी तर अगदी स्फुंदत होते, जेव्हा मी म्हटले.. “ मला ही मुलगी काही दिवसांसाठी पाहिजे, हिचा मेडिकल पालक व्हायला, देखरेख करायला मी उत्सुक आहे.. ती घरी नेण्याइतकी बरी झाली तर तिला घरी नेईन, नाहीतर रोज तिच्याजवळच राहीन. ”

– – क्लब पूर्ण ताकदीने उभा राहिला. पंचवीस हार्ले बाइक्स हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आल्यात, सिक्युरीटी गार्ड्स घाबरलेच प्रत्येक बाईकवर बांधलेली नवनवीन, कापूस भरलेली रंगीबेरंगी खेळणी दिसली.

कक्ष ४३२ इस्पितळासारखा राहिलाच नाही. कुणी घरात चुकून घेतलेली गुलाबी चादर आणली. कुणी 

“ बाबांची लेक “ लिहिलेले छोटेसे लेदर जॅकेट. पऱ्यांच्या दिव्यांची माळ. कुणीतरी (नियम मोडून) दहा मिनिटांसाठी कुत्र्याचे पिल्लूही आणलं—लतिका इतकी हसली, इतकी हसली की तिला पुन्हा ऑक्सिजन लावावा लागला.

दर गुरुवार म्हणजे आता मला रोजच. जिराफाची गोष्ट आम्हाला तोंडपाठ झाली. मग साने गुरुजींच्या गोड गोष्टी, चिंगी, पंचतंत्र,इसापनीती, फास्टर फेणे,.. कितीतरी गोष्टी झाल्यात………. तिचे हात थकले की मी पुस्तक धरायचो. वेदना वाढल्या की त्या छोट्या पलंगावर शिरून तिला छातीवर घेऊन झोपवायचो, आणि माझ्या मुलीला आवडायची ती जुनी गाणी गुणगुणायचो..

… डॉक्टर्स माना डोलवत, विस्मयचकित होत.. म्हणायचे काही कळतच नाही…स्कॅन चांगले नाहीत … पण इतके वाईटही नाही.. जेवढे आम्हाला वाटले होते की सहा महिन्यात आणखी वाईट होतील… सहाचे नऊ झाले. नऊ महिन्यांचे वर्ष झाले.

 

आठव्या वाढदिवशी सकाळी ती म्हणाली,

 “ बाबा, बाबा, मी स्वप्नात धावत होते. पाय नीट चालत होते. ”

मी तिच्या मऊ केसांवर चुंबन दिलं. “मग ते स्वप्न खरं करूया. ”

दोन आठवड्यांनी डॉक्टरनं मला बोलावलं. हातात रिपोर्ट्स, डोळे विस्फारलेले.

 “पाठीच्या गाठी… कमी होत आहेत. असं मी कधी—” ते थांबले. “लक्षणीय सुधारणा आहे. कसं ते सांगता येत नाही. ”

मला माहीत होतं. ते प्रेम होतं—हट्टाचं, गोंदणांचं, मोठ्या आवाजाचं प्रेम.

“मी मरेपर्यंत माझे बाबा व्हाल का? ” असं विचारणारी लतिका, अठरा महिन्यांनी स्वतः च्या पायांवर चालत हॉस्पिटलच्या बाहेर आली. माझा हात धरून. अंगावर ते छोटंसं लेदर जॅकेट. आणि आभाळापेक्षा मोठ्ठे हास्य.

क्लबनं तिच्या स्वागतार्थ जंगी पार्टी आयोजित केली. शेजारपाजारचे भारावून गेलेत. घोडे होते. गड किल्ले यांचा देखावा होता. हार्ले बाईकच्या चाकाएवढा केक होता.

संध्याकाळी शेकोटीजवळ लतिका माझ्या मांडीवर बसली, ताऱ्यांकडे पाहून म्हणाली,

 “ बाबा “ 

“हो, बाळ? ”

“मला वाटतं… मी आता खूप दिवस मरणार नाही. ”

मी तिला घट्ट मिठीत घेतलं. दोघांच्या हृदयाचे ठोके जाणवले.

 “छान,” मी थरथरत्या आवाजात म्हणालो. “कारण मी तर आत्ताच बाबा होणं सुरू केलंय. ”

आज ती पंधरा वर्षांची आहे. कॅन्सरमुक्त. अजूनही रोज मला “बाबा ” म्हणते. आणि अजूनही त्या गुलाबी बेडशीट्स वापरते—कक्ष ४३२ मधल्या.

… आणि दर गुरुवारी, पाऊस असो वा ऊन, आम्ही दोघं पुन्हा मुलांच्या इस्पितळात जातो. मी हार्लेवर, ती मागे घट्ट धरून—जणू आयुष्यभर असेच करत आली आहे तसं. आणि आम्ही नव्या, घाबरलेल्या, दुखऱ्या मुलांना गोष्टी वाचून दाखवतो.

– – – कारण काही गोष्टी आपल्याला लाभलेल्या वयापेक्षा खचित मोठ्या असतात… आणि काही गोष्टी.. शाश्वत… असतात.


मूळ इंग्रजी लेखक…. अनामिक

मुक्त मराठी भावानुवाद …. सौ. स्वाती वर्तक, मुंबई.

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मालिनी…” – लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “मालिनी…” – लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

वर्ष संपायला जेमतेम पंधरा दिवसही उरले नव्हते. न्यूयॉर्क शहर नवीन वर्षासाठी सजून धजून तयार झालं होतं. येणारा प्रत्येक दिवस जे सुख दु:ख आणेल त्याच्या हिंदोळ्यावर वर खाली होत कसाबसा तग धरून मालिनी उभी होती. हॅपी न्यू इयर म्हणताना पुढं काय वाढून ठेवलय कोण जाणे हे दरवर्षी तिच्या मनात येत असे!

मालिनी एक उत्तम डॅाक्टर होती. 31 डिसेंबर ला तिला पस्तीस वर्षे पूर्ण होत होती. प्रॅक्टिस छान होती. पण बरेच प्रयत्न करूनही आयुष्यात लग्नाचा योग आला नव्हता. ती अनेकांना भेटत होती पण गाडं पहिल्या दुसऱ्या भेटीपुढे जात नव्हतं. आई सतत आडून आडून कोणी भेटलं का विचारत असल्यामुळे चिडचिड होत होती.

बालरोगतज्ज्ञ असलेल्या मालिनीला मुलं फार आवडतं. स्वत:चं मुलं असावं ही इच्छाही हल्ली प्रबळ होत चालली होती पण नवऱ्याचा पत्ता नाही तर मुलाचा विचार कसला या अस्वस्थ मनःस्थिती मध्ये तिनं कित्येक रात्री छताकडे बघत घालवल्या होत्या. मात्र पस्तीशी संपत आल्यामुळे तिनं एक निर्णय घेतला. एक बाळ दत्तक घ्यायचं ठरवून ती “मिरॅकल मेकर्स” या दत्तक एजन्सी कडे गेली..

एजन्सीचे नियम, वेटिंग लिस्ट व अत्यंत कठीण प्रोसेस बघून ती दडपून गेली. हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही हे लक्षात आलं तरी तिनं फॅार्म भरला. मिरॅकल मेकर्सचे सीईओ कार्लोस हे स्पॅनिश वंशाचे होते. त्यांनी तिला दिलासा दिला की वेळ लागेल पण मुल नक्की मिळेल.

महिना गेला.. दोन महिने गेले.. नवं वर्ष नवी आव्हानं घेऊन समोर येऊन उभं राहिलं होतं. कार्लोस काही ना काही माहिती देत होते पण बाळ कधी मिळणार याची अजिबात 

कल्पना येत नव्हती. एक दिवस सगळं असह्य होऊन ती ताडकन उठली व कार्लोसच्या ॲाफिसमधे गेली.

“I am losing my patience, Carlos.. तीन महिने झाले तरी तुम्ही पक्कं काहीही सांगत नाही.. मनातला राग, निराशा व चिडचिड अश्रुंच्या रूपात बाहेर पडली. कार्लोसनं तिच्या खांद्यावर थोपटले.. “आशा सोडू नको मालिनी! नऊ महिने झाल्याशिवाय आईला तरी आपलं मुलं दिसतं का? तसंच आहे असं समज! ” उंच्यापुऱ्या कार्लोसच्या आवाजात प्रेम, करूणा, शांती सारं काही होतं..

“मालिनी.. एक विचारू? I am a single parent. दोन वर्षांची मुलगी आहे मला. माझी बायको मुलगी वर्षांची असताना मला सोडून अर्जेंटिनाला निघून गेली. नोकरी, मुलगी व संसार चालवताना माझ्या नाकी नऊ येत आहे. तू माझी दोन वर्षांची मुलगी संध्याकाळी दोन तीन दिवस बघशील? दत्तक नाही पण मावशीचं प्रेम देशील तिला?” आपण अतीच बोललो असं वाटून तो थांबला..

मालिनी सुन्न होऊन बसली होती. तेवढ्यात एक गोलू गोलू, लालसर गालांची, कुरळ्या केसांची व अपऱ्या नाकाची गोड मुलगी पळत बाहेर आली व पपा ऽऽऽ म्हणून तिनं कार्लोसला मिठी मारली.. टेबलाच्या बाजूने तिनं वाकून मालिनी कडे बघितलं.. “ओला.. स्पॅनिशमधे हॅलो म्हणत स्वत: कागदावर काढलेलं चित्र म्हणजे वेड्या वाकड्या रेषा दाखवल्या..

“किती सुंदर काढलं आहेस ग चित्र.. माय क्यूट लिटिल आर्टिस्ट.. ” म्हणत कार्लोसनं तिला उचलून घेतलं व तिची पापी घेतली. “ही मरिया.. माझी मुलगी.. ”

मालिनीनं तिला उचलून घेतलं.. त्या छोट्या हातांचा पाश तिच्या गळ्याभोवती पडताच मालिनी तिचीच होऊन गेली! वरवर तिनं कार्लोसला विचार करते सांगितलं पण मनात ते प्रपोजल तिला मंजूर होतं.

आठवड्यातील तीन दिवस मरिया मालिनीकडे राहू लागली. मालिनीनं एक स्पॅनिश आया मदतीला ठेवली. मरिया बरोबर खेळताना तिला वेळ अपुरा पडत होता. शेवटचा पेशंट संपवून कधी एकदा घरी जाते असं होत होतं.. कार्लोस काम संपवून रात्री दहाला झोपलेल्या मरियाला घेऊन घरी जात असे.

चार महिने कसे गेले मालिनीला कळलं देखील नाही.. एक दिवस कार्लोसचा मालिनीला फोन आला, “गुड न्यूज आहे मालिनी. तुला बाळ मिळण्यास आता फक्त दोन महिने लागतील.. दिल्लीत जन्मलेला महिन्याचा सिध्दार्थ मालिनीकडे येणार होता. मालिनी गडबडली. “पण मरियाचं काय? मी बाळ व मरिया या दोघांना कसा वेळ देऊ शकेन?”

“मरिया ही तुझी जबाबदारी नाही. तुला वेळ असेल तेव्हा मी तिला घेऊन येत जाईन. ” कार्लोसने फोन बंद केला.

मालिनीला काय करावं कळेना.. मन आता मरियामधे अडकलं होतं. त्या दोन वर्षांच्या निरागस विश्वाला तडा लावणं नकोसं वाटत होतं पण ती आपली नाही हे ही कळत होतं. तसा कार्लोस अगदी साधा व सरळ माणूस होता. दयाळू होता.. मनात दया, करूणा असल्याशिवाय “मिरॅकल मेकर्स” सारखं नाव मिळवता येणार नाही याची मालिनीला खात्री होती.

दोन महिन्यांनी मालिनी दिल्लीहून चार महिन्याचा सिध्दार्थ घेऊन आली. तिचं नवऱ्याविना मुल असणं जगाला विचित्र वाटलं होतं पण तिला त्याची पर्वा नव्हती. आई भेटून गेली पण बाळापासून जरा लांब लांबच होती हे तिला जाणवलं होतं.. त्यातच मरियाच्या आठवणीने डोळे भरून येत होते.

एक दिवस कार्लोसचा फोन आला ”मरिया तुझ्या आठवणीने फार रडते आहे! कधी घेऊन येऊ?” तो दुसरे दिवशी मरीयाला घेऊन आला.. मरियाच्या मिठीत मालिनी जग विसरून गेली.. कार्लोसचेही डोळे पाणावले.. खरचं नाती ईश्वरानं वरती बनवलेली असतात हेच खरं! या दोघींना इतकं कसं प्रेम वाटतं एकमेकीविषयी? खरंतर सिध्दार्थ आल्यापासून त्याला मालिनी भेटत नव्हती आणि मालिनी आपल्याला मनापासून आवडते हे त्याच्या लक्षात आलं होतं.

सर्व धाडस एकत्र करून खिशातून अंगठी बाहेर काढली.. तो गुडघ्यावर बसला. “Will you marry me?” हे त्याचं वाक्य ऐकताच मालिनी गोंधळली.. गडबडली..

हे वाक्य आपण कधी ऐकू असं तिला वाटलं नव्हतं.. सहा फूट उंचीच्या तगड्या कार्लोसकडे ती बघत होती.. सच्चा माणूस.. तिचं सांत्वन करणारा, प्रामाणिक, सिध्दार्थ घरी येईपर्यंत सतत साथ देणारा, आधी मरिया तिच्या हवाली करणारा व सिध्दार्थ येताच तिला दूर नेणारा कार्लोस खरच फार दिलदार होता. आपल्याला विरंगुळा वाटावा म्हणून त्यानं मारियाला आपल्याकडे आणण्यास सुरुवात केली असं तिला नेहमी वाटे.. तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी अंगठीतल्या ओव्हल कट केलेल्या हिऱ्यावर पडत होतं.. तो लखलखणारा हिरा तिच्या प्रेम व कृतज्ञतेच्या अश्रुंमधे भिजून अजूनच चमकत होता..

“Yes Carlos! ” हे शब्द ऐकताच कार्लोसनं हिऱ्याची अंगठी तिच्या अनामिकेत घातली. कार्लोस आणि मालिनी कितीतरी वेळ हातात हात घेऊन बसून राहिले! तो क्षण निसटून जाऊ नये म्हणून पुरेपूर अनुभवत..

पुढचा डिसेंबर आला होता.. न्युयॅार्क परत ख्रिसमस व न्यू इयर साठी सजलं होतं.. मालिनी आता ३६ वर्ष पूर्ण करणार होती. आई तिच्याकडेच येऊन राहिली होती. मरिया, सिध्दार्थसाठी आईच्या मदतीची जरूर होतीच.. त्यातच आता नव्या पाहुण्याची भर पडणार असल्याने तिला खूप मळमळत होतं..

गेल्या ३६५ दिवसात मनासारखा नवरा, मुलगी, दत्तक मुलगा व स्वत:चं मुलं देणाऱ्या भगवंताचे ती लक्ष लक्ष आभार मानत होती.. “एवढं सुख देखील सोसत नाही रे” म्हणत तिनं सिध्दार्थच्या गोबऱ्या गालावरून हात फिरवला.. पोटातील बाळ आपलं अस्तित्व जाणवून देत होतं.. त्या संवेदना अनुभवत तिनं देवाला विनंती केली..

“परमेश्वरा, असचं सुख प्रत्येकाला दे. तू मनात आणलसं काय अशक्य आहे? रंकाला राजा बनव, भुकेल्याला पोटभर अन्न पाणी दे, साऱ्या व्याधी बऱ्या कर.. युध्दं.. जगातील व मनातील मिटवून टाक.. Bless us with good health, healed hearts, and endless opportunities..

मरिया मम्मा म्हणत रडत होती म्हणून ती मरियाच्या खोलीत गेली. सिध्दार्थ कार्लोसकडे बघून खुदुखुदु हसत होता.. अर्जेंटिनामधून आलेला कार्लोस दिल्लीत जन्मलेल्या सिध्दार्थचा बाबा बनून त्याला जोजवत होता.. ईश्वराच्या या चमत्काराकडे बघताना.. ”अंबरपे है रचा स्वयंवर”.. नाती खरच वर जमवलेली असतात हे जाणवून मालिनी प्रसन्न हसली. त्या नात्यांचा सन्मान करून ती ह्रदयात जपून ठेवत तिनं मरियाला थोपटायला सुरूवात केली..


लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares