मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अलोपेशिया (Alopecia) — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ अलोपेशिया (Alopecia) — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(.. त्या दिवशी  लाराने प्रियाला घरी बोलावले.प्रिया छानशी फुले आणि परफ्यूम घेऊन लाराच्या घरी गेली.) – इथून पुढे – – – 

“ये ना प्रिया..” लाराने  प्रियाचे मनापासून स्वागत केलं. एका लहानशा अपार्टमेंटमध्ये लारा एकटीच रहात होती.स्वतःच्या जिद्दीवर ही मुलगी शिकून छान शिक्षण घेऊन नोकरी करत होती.

तिने आस्थेने प्रियाची सगळी चौकशी केली. प्रियाने तिला आपल्या  ऍलोपेशियाबद्दल सांगून टाकलं.

“ मला आता केस नसल्याची लाज वाटत नाही लारा या देशात. किती मोकळा आणि फ्री देश आहे  हा.

मी मॉल मध्ये कितीतरी तुमच्या बायका, पूर्ण शेव्ह केलेले डोके घेऊन मजेत जाताना बघते.फॅशन म्हणून गोऱ्या बायका सुद्धा अशा दिसतात इकडे. पण म्हणून कोणी त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही ग.

मी फार सोसलंय आमच्या देशात.कुचेष्टा अवहेलना.” .. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं.

लारा तिच्या जवळ बसली… 

“किती सुंदर आहेस तू प्रिया.काढून टाक मनातून हा कॉम्प्लेक्स.तुझी हुशारी हाच तुझा खरा ऍसेट आहे ग. भेटेल, भेटेल तुलाही तुझा योग्य मिस्टर राईट..” हसत हसत लारा म्हणाली. “ आमच्याकडे असल्या गोष्टींना कोणी फारसे महत्व देत नाही.” 

त्या दिवशी खूप गप्पा मारून आणि लाराने केलेले सुंदर डिनर करून प्रिया घरी परतली.

आज तिच्या मनावरचं कित्येक वर्षे  असलेलं ओझं अगदी हलकं झाल्यासारखं वाटलं तिला.ऑफिस मध्ये अगदी रुळून गेली प्रिया. त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा सॅम तिला रोज बघायचा बोलायचा तिच्याशी.सॅम तिचा बॉस होता आणि ही साधी इंडियन मुलगी आवडायची त्याला. अनेक वेळा ते  ब्रेकमध्ये कॉफी घ्यायला जात.

.. .. हा कृष्णवर्णीय तरुणही खूप झगडा करूनच वर आला होता.मोठ्या जिद्दीने आपल्या मानेवर बसलेले दारिद्र्य त्याने झटकून टाकले होते. उंच सडसडीत  आणि पुन्हा राठ कुरळे केस असलेला सॅम  फार सज्जन होता. 

त्या वीकएंडला ऑफिसची जवळच एका लेकजवळ ट्रिप होती. लारा आणि प्रिया एकाच कार मधून गेल्या.प्रियाने जीन्स आणि इंडियन टॉप घातला होता.

“ वाव.कसली क्यूट दिसतेस ग तू.” लारा म्हणाली.

 त्यादिवशी त्या सगळ्यांनी खूप धमाल केली.प्रियाने नेलेलं इंडियन फूड सगळ्याना खूप आवडलं.

.. .. दूर नदीत कयाकिंग करताना प्रिया आणि सॅम एकाच कयाकमध्ये होते.

 “ बाबा रे. मला भीति वाटते .मी कधी केलं नाही कयाकिंग.”

हसून सॅम म्हणाला,” जमेल जमेल. जरा ते वल्हे मारायचं टेक्निक समजलं की बघ एन्जॉय करशील तू.” 

प्रियाला थोड्या धडपडीनंतर त्या वल्ह्याचा तोल जमला.

.. .. अचानक सॅम म्हणाला,” मला फार आवडतेस तू प्रिया.माझ्याशी लग्न करशील?मला इंडियन मुली त्यांचे कल्चर फार आवडते. मला फॅमिलीच नाही.लहानपणापासून ऑर्फनेजमध्ये वाढलो मी. जेव्हा तुमच्या इंडियन मित्रांकडे जातो ना तेव्हा बघतो मी त्यांची फॅमिली, मुलं, तुमचे संस्कार. मला तू आवडतेस.पण मी असा काळा कृष्णवर्णीय आहे… बघ विचार कर.”

प्रिया म्हणाली, “उलट तू विचार कर सॅम.मी हा विग घालते.,मला अलोपेशिया आहे.म्हणजे केसच नाहीत.उलट तुमच्या दाट कुरळ्या केसांचा हेवाच वाटतो मला. मला लहानपणीच हा ऑटो इम्यून आजार जडला.का ते माहीत नाही.हा हेरिडिटरी नाही.आमच्या घरात कोणालाही नाही.मग मीच का?असं म्हणत रात्रीच्या रात्री जागून काढल्या आहेत मी सॅम.माझा काय दोष यात? ”

मग प्रियाने त्याला परागची हकीगत सांगितली… ”अरे,लोक तयार होत नाहीत अशी मुलगी स्वीकारायला. मी विग काढून दाखवते तुला.मग तूही मला नाही म्हणशील.” .. शांतपणे प्रियाने विग उतरवला.

सॅमने तिच्याकडे बघितलं… 

“ मला तू अशीसुद्धा सुंदरच दिसतेस.मला काहीही फरक पडत नाही. मला लग्न करायचं आहे ते तुझ्याशी.तुझ्या केसांशी नाही.” 

प्रियाला गहिवरून आलं.हा पहिला पुरुष जो तिला  तिच्या नसलेल्या केसांसकट तिच्यावर प्रेम करत होता. प्रिया रडायला लागली.सॅमने तिचे डोळे पुसले. “ चल परत फिरुया.”.. दोघे परत फिरले.

सॅम म्हणाला,”सावकाश विचार करून उत्तर दे मला.आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे हा.मला घाई नाही.”

 

प्रिया दोन दिवस अस्वस्थ होती.तिने न राहवून हे लाराला सांगितलं.

लारा म्हणाली “ फार सज्जन आणि चांगला मुलगा आहे ग सॅम.तू फार सुखी होशील त्याच्याबरोबर लग्न करून प्रिया. नाहीतरी तुझ्या देशात तुझ्याशी कोण लग्न करणार?तूच म्हणालीस ना असं? अर्थात कॉम्प्रमाईज म्हणून करू नकोस हं तू सॅमशी लग्न.मनापासून आवडला असेल तरच पुढे जा. तू सुखी होशील बघ प्रिया.फार गुणी निर्व्यसनी मुलगा आहे सॅम. पण तुझ्या आईवडिलांना काय वाटेल?”

प्रिया म्हणाली, “ नक्की धक्का बसेल त्यांना.पण मी जर सॅमशी लग्न केलं तर भारतात परत जायचा प्रश्न येतो कुठं? मी कायम इथे रहाणार.माझी मुलं इथेच जन्मतील वाढतील. मी मिसेस सॅम म्हणूनच ओळखली जाईन ना? लारा मी हो म्हणायचं ठरवलं आहे सॅमला.मग मला मुलं होतील ती त्याच्यासारखे केस असलेली होऊ देत.भरपूर दाट आणि कुरळे.मी सोसलं ते माझ्या मुलांनी नको सहन करायला.” .. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं.

लारा गप्प बसून राहिली. लहानपणापासून केवळ केस नाहीत म्हणून या मुलीने किती सहन केलं असेल हे समजलं तिला.

प्रिया पुढच्या आठवड्यात सॅमच्या घरी गेली.दोन बेडरूम्सचे सुंदर अपार्टमेंट होतं ते.नीटनेटके ठेवलेलं आणि हॉल मध्ये चक्क श्रीकृष्णाची मूर्ती.

“ मला माझ्या एका इंडियन मित्राने दिली ही.” सॅम म्हणाला. प्रियाला गहिवरून आलं.

 ” सॅम, आपण लग्न करू.मला वचन दे.. तू मला या माझ्या बाल्ड डोक्यावरून कधीही हिणवणार नाहीस. मी फार सोसलंय रे लहानपणापासून.आता नाही मला सहन होणार.मी मोडून जाईन सॅम.”

प्रिया हुंदके देऊन रडायला लागली., सॅमने तिला घट्ट जवळ घेतलं. 

”असं मनातसुद्धा आणू नकोस डिअर. तू विग घालतेस हे माझ्या अगदी पहिल्या चार दिवसातच लक्षात आलं नसेल का? तुला तो शोभूनच दिसतो डिअर.इथे आणखीही अगदी  नॅचरल दिसणारे विगस् मिळतात.तुला हवं तर आपण घेऊया ना. मला तू कायम माझी बायको म्हणून हवी आहेस.खेळणे म्हणून नाही. माझ्या मुलांची आई म्हणून ,माझी पत्नी म्हणून हवी आहेस तू मला.तुझ्या डोक्याकडे माझं लक्षच जात नाही मग. आमचे केस हाही शापच नाहीये का आम्हाला?किती सहन करतोय आम्हीही.आमचा हा डार्क  गडद कृष्णवर्ण आम्हाला किती वर्षे समाजात अवहेलना सहन करायला लावत होता. लावतो.. अजूनही हे पूर्ण कुठं थांबलंय? पण मी आलोच ना त्यातूनही वर? तुझा होकार असेल तरच आपण लग्न करू.तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही करणार नाही डिअर.”

.. .. पुढच्याच महिन्यात प्रियाने इंडियामध्ये तिचा आणि सॅमचा फोटो पाठवला.

“ आई बाबा, मी याच्याशी लग्न करणार आहे. मला माहीत आहे,तुम्हाला हा मोठा धक्का आहे.पण आई, मला माझ्या या व्यंगासकट स्वीकारणारा आणि मनापासून माझ्यावर प्रेम करणारा हा  पहिला पुरुष आहे.मी याला चांगली ओळखते.खूप शिकलेला सुसंस्कृत मुलगा आहे हा.मी पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे याच्याशी.”

प्रियाला आईचा फोन आला .. ” बाळा, जरूर कर तू सॅमशी लग्न.आम्हाला थोडा धक्का बसला.पण तुझी सुखाची वाट जर तुला मिळाली आहे तर जरूर सुखी हो.आमचे तुला आशीर्वाद आहेत बरं. इतक्यात शक्य नाही पण तुझ्या  डिलिव्हरीला मात्र नक्की येऊ. सॅमला भेटायला आणि नातवंडांसाठी.”

प्रिया आणि सॅमचं लग्न झालं. त्या इतक्या वर्षात प्रियाला कधीही आठवलं नाही की सॅमचे तिचे वाद झालेत,भांडण झालं. कधीच नाही.

प्रियाचे आईबाबा तिच्या  डिलिव्हरीसाठी येऊन सहा महिने राहून गेले. उजळ रंग, प्रियासारखा घारा आणि केस मात्र सॅम सारखे दाट कुरळे असलेला जॉश बघून प्रिया आनंदून गेली.

.. “आई, याला नाही कोणी टकल्या म्हणणार .बर झालं हा मुलगा झाला.माझ्यासारखे  सहन नाही करावे लागणार त्याला”. तिने बाळाला जवळ घेतलं.

प्रियाच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.त्या बाळाला तिने जवळ घेतलं.

“नाही ग बाई.वडिलांसारखे केस घेऊन आलाय हा.याला नाही अलोपेशिया होणार.छान आहे हो बाळ.”

.. आपल्या जावयाच्या घरी चार महिने राहून आणि सॅम सारखा जावई लाभला म्हणून तृप्त होऊन प्रियाचे आईबाबा परत भारतात गेले.

.. .. आत्ता घराच्या मागच्या डेकवर बसलेल्या प्रियाला हे मागचं सगळं आठवलं. चार वर्षे झाली जॉश जन्मून. त्याच्या आईपणात प्रिया तृप्त झाली. तिला आपल्या निर्णयाचा कधीही  पश्चाताप झाला नाही.

“ममा, चल ना.डॅडी बोलावतोय म्हणत जॉश तिच्याजवळ आला.   आले रे सॅम, म्हणत जॉशचा हात धरून प्रिया आपल्या घरात गेली.आपल्या सुंदर उबदार आणि  सॅमच्या  प्रेमात न्हाऊन गेलेल्या आपल्या घरात…

समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अलोपेशिया (Alopecia) — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ अलोपेशिया (Alopecia) — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

प्रियाचा जन्म झाल्यावर घरात सगळ्यांना खूप आनंद झाला. तशाही साठ्यांच्या घरात मुली कमीच. सुधाच्या जावेला, नणंदेला दोन दोन मुलगेच. म्हणून सुधाला पहिली मुलगी झाल्यावर सगळे खूष झाले. मोठ्या थाटामाटात मुलीचं बारसं केलं आणि आत्याने नाव ठेवलं प्रिया. होतीच प्रिया सुंदर गोरी आणि कुरळे केस तिच्या चेहऱ्यावर महिरप करत. दोन वर्षानी सुधाला आणखी एक मुलगी झाली ती रिया.. दोघी मुली अगदी गोड आणि खूप सारख्या दिसायच्या.

मुली चार वर्षाच्या झाल्या. अचानक प्रियाचे केस गळायला लागले. डॉक्टरांनी सांगितले, ही तुम्ही म्हणता तशी चाई आहे. या भागातल्या केसांच्या मुळातल्या पेशी नष्ट होतात आणि केस उगवणे बंद होते. तिथे केस येत नाहीत. हे का होते याला उत्तर नाही. हे आपण थांबवू शकत नाही. डॉक्टरांनाही वाईट वाटले सांगताना…

“पण डॉक्टर, याला काहीतरी औषध असेल ना? कितीही महाग असू दे, आम्ही करू शकतो कितीही खर्च. ”

.. डॉक्टरांनी साठ्यांना शहरातील त्वचारोग तज्ञांची चिठ्ठी दिली.

डॉक्टरांनी प्रियाची सगळी नीट तपासणी केली. स्कॅन केले. त्यात असं दिसलं की तिच्या हेअर फॉलिकल्सवरच अँटॅक झालाय आणि ती नष्ट होत आहेत. हळूहळू सम्पूर्ण स्काल्पच असा होणार हे सत्य डॉक्टरांनी प्रियाच्या आईवडिलांना सांगितले… 

“ हा ऑटोइम्युन रोग आहे आणि त्यावर औषध नाही. काही इंजेक्शन दिली तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. आता हे कठोर सत्य तुम्हाला स्वीकारायला हवं. तुम्ही धीर धरा आणि प्रियालाही धीर द्या.

ती अजून खूप लहान आहे आणि शाळेत किंवा कुठेही बाहेरच्या जगात तिला खूप काही सोसावे लागणार आहे. अजूनही आपला समाज हे समजून घेत नाही आणि अशा मुलांच्या वाट्याला कुचेष्टाच येते. ”

.. डॉक्टरांनाही हे सांगताना वाईट वाटत होते. ” अशा केसेस दुर्मिळ असतात पण असतात.

ती मोठी झाली की विगचा पर्याय आहे पण आत्ता तिला त्याचा त्रासच होईल. म्हणून तिला तिचे नॉर्मल आयुष्य जगू दे. ”

हताश होऊन साठे दाम्पत्य प्रियाला घेऊन घरी आले. प्रियाचे सुंदर कुरळे केस रोज उशीवर गळताना दिसू लागले. काही दिवसांनी प्रियाचे पूर्ण टक्कल झाले. डोक्यावर एकही केस उरला नाही तिच्या.

सुंदर गोजिरवाणी प्रिया आता विद्रूप दिसायला लागली.

रोज शाळेत जाताना प्रिया रडायची. “आई मी नाही शाळेत जाणार. सगळी मुलं मुली मला चिडवतात. टकली टकली म्हणतात. मला खूप रडू येतं ग. मला नको शाळा. ”

प्रियाची आई तिची समजूत घालायची.

“असं नको म्हणू बाळा. देवाने तुला किती छान बुद्धी दिलीय ना? मग केस नसले तर नसले.

रोज हा स्कार्फ बांधून शाळेत जायचं. मुलांकडे लक्ष देऊ नको बाळा. ”

हे सांगताना आईच्याही डोळ्यांना धारा लागलेल्या असत.

एकदा प्रियाची आई शाळेत जाऊन प्रिंसिपल बाईना भेटली. ” मॅडम, तुमच्या शाळेतल्या प्रियाची मी आई. तिला असा असा दुर्मिळ आजार आहे आणि तिचे केस गळून गेलेत. ते पुन्हा येणार नाहीत. लहान आहे ती अजून. तुम्ही मुलांना सांगाल का की तिला चिडवू नका? यंदा बघा सहा तुकड्यात ती पहिली आलीय. पण तिला अतिइन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे. फार वाईट वाटतं हो आम्हाला तिचं. ”.. डोळ्यात पाणी आणून साठेबाई बोलत होत्या.

“हो मिसेस साठे. मी समजू शकते. अनेकवेळा मी स्वतः मुलांना वॉर्निंग दिली आहे. पण शेवटीआम्ही तरी किती लक्ष ठेवणार? शेवटी मुलंच ती. पण तरीही मी पुन्हा सांगते वर्गशिक्षकांना. ”

फारसा काही याचा उपयोग होणार नाही हे समजून साठेबाई घरी आल्या.

रोज प्रिया काळा स्कार्फ बांधून शाळेत जाई. तिची जवळची मैत्रीण निशा मात्र सदैव तिच्याजवळ 

असे. कोणी तिची चेष्टा केली तर निशा धावून जाई त्या मुलाच्या अंगावर.

प्रिया खिन्नपणे म्हणायची, ” निशा, तू किती जणांशी अशी भांडणार माझ्यासाठी? मलाच हे सहन करायचे आहे. तेही जन्मभर. बघ ना. इतकं सुंदर रूप असून मला कोणत्याही कार्यक्रमात घेत नाहीत. मी उत्तम पळते तरी मला सगळ्या स्पर्धांपासून लांब ठेवतात. मला किती वाईट वाटत असेल? ”

निशाने प्रियाचे डोळे पुसले. ” प्रिया देवाने तुला तीव्र बुद्धी दिलीय. तू सगळ्यात वर जाऊन दाखव बघ. नुसते सुंदर रूप काय कामाचे? तू पहिली येशील बघ दहावीला. मग बघ कसे हेच लोक सत्कार करतील तुझा. ” निशाने प्रियाला समजावले.

– – सगळी कुचेष्टा आणि अवहेलना सहन करत प्रिया दहावीला बोर्डात पहिली आली. शाळेने तिचा सत्कार केला.

सत्कार स्वीकारताना प्रिया म्हणाली, “मी आभारी आहे माझ्या सगळ्या वर्गबंधू भगिनींची. मला लोकांनी विचारलं ‘तुझे केस का गेले? तुला कॅन्सर झालाय का? ’ पण त्यांना हा आजार माहीत नाही. पण मला त्याची आता खंत वाटत नाही. पण मित्रांनो, यापुढे असे कोणी भेटले तर टिंगल नका करू. सोसणारा काय सोसतो ते फक्त आणि फक्त त्यालाच ठाऊक असते. ” सगळा ऑडियन्स स्तब्ध झाला.

— प्रियाने कॉलेजला ऍडमिशन घेतली. आता मात्र आईबाबांनी प्रियाला चांगल्या नावाजलेल्या हेअर स्पेशालिस्ट कडून अगदी नॅचरल दिसणारा विग करून आणला. तिच्या चेहऱ्याला कोणत्या कटचा विग छान दिसेल हे त्यांनी अनेकवेळा फोटो सेशन करून ठरवले.

आता प्रिया सुंदर शॉर्ट स्टेपकट असलेल्या केसांचा विग घालून कॉलेजला जायला लागली. तिला फार शोभून दिसे तो. एकदमच तिच्या पर्सनॅलिटीत आमूलाग्र बदल झाला. सदैव मागे मागे असणारी प्रिया आता आत्मविश्वासाने वावरू लागली. अगदी जवळून बघितल्याशिवाय तो विग आहे हे समजत नसे. खूपच किंमत द्यावी लागली होती त्यासाठी. पण आपल्या लाडक्या गुणी लेकीसाठी साठे काका काकूंनी मागेपुढे बघितलं नाही. ,

… आपली गुणी सुंदर लेक स्कूटीवरून जाताना निघाली की धन्य धन्य वाटे आईबाबांना. दिवस उलटत होते. प्रिया बघता बघता इंजिनीअर झाली. तिला इतके सुंदर मार्क्स होते की तिला एका अतिशय नावाजलेल्या आय टी कंपनीत लगेच जॉब मिळाला. प्रिया कामावर रुजू झाली. तिला हा जॉब अतिशय चॅलेंजिंग वाटला… प्रियाला लवकरच टेक लीड चे प्रमोशन मिळाले.

एक दिवस ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये कॉफी पीत असताना तिच्या टीम मधला पराग तिला म्हणाला,

“प्रिया एक विचारू? तुझं कोणाशी लग्न ठरलं आहे का? कुठे कमिट केलं आहेस का? ”

“ नाही रे बाबा ”.. प्रिया गंभीरपणेम्हणाली. माझ्याबाबतीत गोष्टी इतक्या सोप्या नाहीत पराग. पण तू हे का विचारतो आहेस? ”

“ मला आवडतेस तू. मला लग्न करायचं आहे तुझ्याशी. ”

“ आज माझ्या घरी ये. मग बोलू आपण. ” प्रिया शांतपणे म्हणाली.

बुचकळ्यात पडलेला पराग संध्याकाळी प्रियाने पाठवलेल्या पत्त्यावर तिच्या घरी गेला.

घरी प्रिया तिची बहीण रिया आणि आईबाबा होते. प्रिया आईजवळ बसली.

“ पराग, तुला माझ्याशी लग्न करायचे आहे ना? मग हे बघ. ”.. शांतपणे प्रियाने आपला विग काढला.

हे बघ आता. मलाअँलोपेशिया हा आजार आहे. आजार नाही पण हा ऑटो इम्युन डिसीज आहे. मला लहानपणा पासून केस नाहीत. मला हेअर ट्रान्सप्लांट करता येणार नाही कारण मला हेअर रूटसच नाहीत.

आता नीट विचार कर आणि सावकाश सांग. ”,

पराग हे बघून हादरून गेल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. चहा संपवून तो घाईघाईने निघूनच गेला.

रिया म्हणाली, ”दीदी, कशाला ग सांगत बसतेस? अशाने जन्मात तुझं लग्न होणार नाही. ”

“ हे बघ रिया, मला कोणालाही फसवायचं नाही. आधीच मी खरं काय ते सांगणार. मग मी जन्मभर अशीच बिनलग्नाची राहिले तरी चालेल ”.

दुसऱ्या दिवशी पराग ऑफिस मध्ये आलाच नाही. प्रियाला त्याचा मेल आला.

“सॉरी प्रिया. मला शॉकच बसला तुला अशी बघून. मला हे सहनच होणार नाही. मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी. मी राजीनामा देऊन जातोय. बेस्टलक तुला. आणि मी हे कोणालाही सांगणार नाही प्रिया.

इतका दुष्ट तर मी मुळीच नाही. ”

प्रियाने शांतपणे मेल डिलीट केला.

तिला कंपनी दोन वर्षासाठी यूएस ला पाठवणार होती.

“ आई, मी कंपनीला होकार कळवलाय. मी निदान दोन वर्षे तरी पुन्हा भारतात येऊ शकणार नाही ग. आणि हो. रियाच्या लग्नाचंआता बघायला लागा आणि करून टाका ”.

प्रिया पुढच्याच महिन्यात यूएसए. ला रवाना झाली. तिच्या कंपनीमध्ये फारच कमी इंडियन लोक होते. बाकी सगळे गोरे किंवा ऍफ्रो अमेरिकन.

प्रिया कंपनीत चांगलीच रुळली. तिची काळी मैत्रीण लारा तिची फार चांगली मैत्रीण झाली. लारा अफ्रो अमेरिकन होती. शिसवीच्या बाहुलीसारखी काळी आणि राठ कुरळे केस. कधीकधी लारा निरनिराळे रंगीत विग घालून यायची. तर कधी पूर्ण गोटा करून मिरवत यायची. अगदी बिनधास्त होती लारा.

.. त्या दिवशी लाराने प्रियाला घरी बोलावले. प्रिया छानशी फुले आणि परफ्यूम घेऊन लाराच्या घरी गेली.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खारीचा वाटा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ खारीचा वाटा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

मी कृष्णा साळवी, ज्ञानसाधना शाळेच्या रूट क्रमांक ७ च्या बसचा ड्रायव्हर.

आमची ज्ञानसाधना शाळा CBSE आहे, आणि शहरात एक नंबरची शाळा आहे. दहावी बोर्डात असो, स्कॉलरशिप परीक्षा असो, किंवा अभ्यासाव्यतिरिक खेळ, नाट्य अशा काही स्पर्धा असोत, आमच्या शाळेचा झेंडा नेहमीच फडकत असायचा.

इतर CBSE शाळांप्रमाणेच आमच्याही शाळेची फी जास्त होती – वर्षाला लाख रुपयांच्यावर. त्यामुळे या रूट क्रमांक ७ ला विद्यार्थी होते हेच आश्चर्य होतं – कारण रूट क्रमांक ७ होता झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) क्षेत्राचा भाग.

लोकांकडे धुणीभांडी करणारे, कारखान्यात रोजंदारीवर काम करणारे, रखवालदार म्हणून काम करणारे या इमारतींत राहत. त्यांना या शाळेची फी परवडणं शक्यच नव्हतं. पण एका भल्या माणसाच्या संस्थेने या झोपु क्षेत्राला दत्तक घेतलं होतं. दरवर्षी २० मुलांचा शाळेचा खर्च आणि अगदी बसने येण्याजाण्याचा खर्चही त्या संस्थेने उचलला होता.

त्यामुळे या महागड्या शाळेत मी इथून मुलांना घेऊन जातो.

शाळेची फी भरली गेली, पण म्हणून बाकीच्या खर्चांचा ताळमेळ बसायचाच असं नव्हतं. मुलांचे कपडे, त्यांच्या दप्तरांची परिस्थिती, आणि बरेचदा नसलेले डबे – या सगळ्यातून ही ओढगस्ती जाणवायची.

तो शिवम् – रोज दोन पाच मिनिटे उशीरा यायचा. वडील रात्रपाळी करून यायचे, आई कुठेतरी पहाटेच कामाला जायची, याला कधी सकाळी पाणी भरावं लागायचं, तर कधी धाकट्या बहिणीला सांभाळावं लागायचं. मग याला व्हायचा उशीर.

पण मी थांबायचो त्याच्यासाठी.

ती राधिका, एकटीच बसायची – गुमसुम असायची. तो संतोष, तो सचिन, ती सोनू – प्रत्येकाचे काहीतरी प्रॉब्लेम असायचे, काहीतरी अडचणी असायच्या, एवढ्याश्या खांद्यांवर मणामणाचे ओझं असायचं. कधी गृहपाठ झाला नाही म्हणून, कधी गणित अडलं म्हणून, कधी शाळेत शिकवलेलं काही समजलं नाही म्हणून, तर कधी सकाळपासून काही खाल्लंच नाही म्हणून.

शाळेच्या बसमध्ये शांतता असायची, कोणी कोणाशी बोलायचं नाही, एकमेकांच्या नजरा चुकवायचे सगळेजण.

जो तो आपापल्या दुःखाच्या आणि अडचणींच्या ओझ्याखाली दबलेला.

आता मी काही फार शिकलेलो नाही, त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या अडचणींबाबत तर मी काही मदत करू शकत नाही.

पण गेले दोन तीन दिवस मी बघतोय, संतोषच्या हातात डब्याची पिशवीच नसते, त्याची आई आजारी आहे – मुलं म्हणत होती.

घरी मी बायकोशी बोलताना सहज हे सांगितलं. ती महिला बचत गटात स्वयंपाक करायला जाते. एका मोठ्या कंपनीच्या कॅन्टीनला जेवण जातं त्यांचं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी बस घेऊन जायला निघालो, तर तिनं दोन डबे दिले माझ्या हातात, मी प्रश्नार्थक नजरेनं दुसऱ्या डब्याकडे बघितलं, तर म्हटली, “द्या संतोषला. ” 

मी खुळावलो.

कोणाला काही न सांगता, गुपचूप, संतोष जिथं बसायचा तिथं, त्याचं नाव लिहून, तो डबा ठेवून दिला मी. मुलं शाळेत उतरल्यावर, मी पाहिलं, डबा जागेवर नव्हता. संध्याकाळी मुलांना घरी सोडल्यावर पाहिलं, स्वच्छ घासून ठेवलेला डबा जागेवर ठेवला होता, आणि सोबत एक छोटंसं फूल.

मी हसलो.

तीन चार दिवस हा क्रम रोज चालला. मग एक दिवस हसऱ्या चेहऱ्याने संतोष आपणहून माझ्याकडे आला, “काका, आईची तब्येत छान झाली आता, हे पहा आज डबा दिलाय तिनं मला. “

मला भरून आलं.

एके दिवशी कळलं, एका लेकराची १५ ऑगस्टच्या संचलनात निवड झाली होती, पण त्याच्याकडे गणवेशाचे बूट नव्हते. मी माझ्या शेजाऱ्याशी बोललो. तो एका कंपनीत सिक्युरिटी म्हणून काम करतो. गेल्याच आठवड्यात त्याला कंपनीकडून नवा गणवेश, नवे बूट मिळाले होते.

आज सकाळी मी कामाला निघताना तो धावत आला, हातात पॉलिश केलेले चकचकीत बूट होते, म्हणाला, “जुने आहेत, पण चांगले आहेत. बघ रे होतात का लेकराला, नाहीतर त्याच्या पायाचा साइज सांग, मी आमच्या दोस्तदारांना विचारतो. “

मी ते बूट त्या मुलाला दाखवले, त्याला परफेक्ट झाले ते, ते बूट घालून त्याने कडक सॅल्युट ठोकला मला. आणि मी घरी गेल्यावर माझ्या शेजाऱ्याला तो सॅल्युट तितक्याच आदराने देऊ केला.

मग आमच्या मित्रमंडळीत, हिच्या बचतगटात आम्हाला हा नादच लागला. आमच्या बसमधल्या मुलांचे आम्ही काका – मामा – मावश्या – आत्याच झालो होतो. मग कोणाला गॅदरिंगसाठी काहीतरी झकपक शिवून द्यायचं, पावसाळ्यात कोणाची तरी छत्री दुरुस्त करून द्यायची, एखादी बाहुली – आपल्याकडे असेल, कोणाच्या पाहण्यात असेल तर त्यांना गळ घालून आणायची.

आमच्या या रुटची ही गंमत हळूहळू सगळ्या शाळेत पसरली आहे. शाळेत वर्ष संपत आलं, तेव्हा परीक्षेच्या शेवटच्या दिवशी नववीतला चिन्मय त्याची सगळी पुस्तकं, गाईड घेऊन माझ्याकडे आला, “काका, तुमच्या मुलांना उपयोगी पडतील, त्यांना द्या. ” ऋत्विकाला स्पर्धेत बक्षीस म्हणून रंगपेटी मिळाली, ती तिनं परस्पर मलाच आणून दिली.

हिंदीच्या मॅडमनी त्या शिष्यवृत्तीच्या माहितीचं पत्रक मला आवर्जून आणून दिलं, शारीरिक शिक्षणाच्या सरांनी जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धांच्या निवड चाचणीची माहिती मला दिली.

आजसुद्धा शिवम् थोडासा उशीराच आला, पण पाहिलं तर तो सचिनला सांभाळून आणत होता. सचिन काल शाळेत धडपडला, पाय फ्रॅक्चर झाला होता त्याचा. “काका, सॉरी, उशीर झाला, पण सचिनला एकट्याला दप्तर – डबा, सगळं आणता येत नव्हतं, त्याच्या चालीने यायला थोडा वेळ लागला, ” शिवम् सांगत होता.

ज्या शिवम् साठी आजवर मी थांबत होतो, तो शिवम् आता इतरांना मदत करण्यासाठी थांबत होता.

आता आमच्या बसमध्ये गलबला असतो, हसीमजाक असतो, गप्पाटप्पा असतात. छोटी मुलं मोठ्यांना दादा ताई म्हणतात, आणि दादा ताई आपल्याला जमेल तशी छोट्यांना मदत करतात.

माझे मित्र, आमचे बालगोपाळ, त्यांचे शिक्षक, पालक – सगळेच या मुलांना मदतीचा हात देण्यासाठी आता तत्पर असतात, सजग असतात.

उद्या माझ्या रुटची ही मुलं मोठी होतील, या समाजात आपला ठसा उमटवतील, आणि तेही तेव्हा या रूटला असणाऱ्या मुलांना मदत करतील, आपला खारीचा वाटा उचलतील.

– – एक वर्तुळ पूर्ण होईल.

 श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाचे पान… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ आनंदाचे पान… ☆ डॉ. शैलजा करोडे

सकाळी साडेपाचचा अलार्म वाजला तशी मी खाडकन उठले. अंग ठणकत होतं. उठण्याची अजिबात इच्छा नव्हती. रात्री माझ्या तान्हुल्यानं बरंच जागवलं होतं. त्याला दात येत असल्याने सारखं किरकिरतं होतं. बराच वेळ त्याला अंगा खांद्यावर थोपटत राहिले तेव्हा तो झोपला.

मी चूळ भरली, दात ब्रश केले आणि गिझर ऑन केला. पण गरम पाणी येईना. याचीही काॅईल आजच जळायची होती काय? सगळा मूड खराब झाला. घरात एक जुनं वाॅटर हिटर होतं आणि विशेष म्हणजे हाताशी लवकर लागेल अशा जागी ठेवलेलं असल्यानं लगेच सापडलं. तेवढाच मनाला दिलासा.

बाथरूममधून निघून किचनकडे मोर्चा वळवला. गॅस लायटर लावला. गॅस शेगडी पेटेना. दोन तीन वेळा ट्राय केलं पण परीणाम शून्य. गॅस पाईप लाईन बंद तर नाही? शेजारी वर्मांकडे फोन केला. “दीदी, मैने पूछताछ की तो आधा घंटा लगेगा बोला है।” 

“ओ. के. ” मी फोन ठेवला. अशाच अर्जन्सीसाठी माझा “कूक फूड टापही” होता म्हणून बरं. वेळ असा फटाफट गेल्याने स्वयंपाकाचा मला मेनू बदलावा लागला. मसाले भात व कोकमची कढी केली.

बाळाचे दूध गरम करून ठेवले. त्याची औषधं, दुपटी सगळं सासूबाईंजवळ ठेवलं. “आई, बाळाला सांभाळा, घरातील कामाची चिंता करू नका, मी करीन ऑफिसातून आल्यावर. बाळाची काळजी घ्या. “

“अगं घेईन मी बाळाची काळजी, माझाही नातू आहे ना तो. माझ्या मुद्दलावरचं व्याज आहे ते, आणि व्याज नेहमीच प्रिय असतं ना. “

“आई, काय करू हो. माझ्या सगळ्या रजा संपल्यात. बाळाला सोडून जायला मन नाही होत आहे. ऑफिसाचे ऑडीट चालू आहे. कामाचं प्रेशर आहे. नाही तर बिन पगारी रजा टाकली असती. “

“जा तू, नको काळजी करुस. छाया पण येईलच आता कामाला. “

माझा व सुधीरचा डबा भरला आणि मी निघाले. आज नेमक्या सगळ्याच ट्रेन लेट होत्या. कोठे अपघात झाला होता म्हणे. तूफान गर्दीतून कशीबशी गाडीत चढले. पॅसेजमध्ये सरकले तर समोरच माझी मैत्रिण सीमा दिसली. “हाय मीना, ये इकडे” तिने हात उंचावला. मी तिच्याजवळ गेले तशी सगळ्यांनी सरकून थोडीशी जागा मलाही बसायला दिली.

सीमाने मोगर्‍याचा गजरा दिला. मोगर्‍याच्या घमघमाटाने सकळपासुन चिंताक्रांत असलेल्या चित्तवृत्ती थोड्या फुलून आल्या. एवढ्यात ट्रेनमध्ये खेळणी विकणारी बाई आली. मोर, घोडा, ससा, ड्रम वाजवणारा विदूषक, “घ्या ताई खेळणी घ्या, हा विदूषक घ्या, ड्रम वाजला कि बाळ खुदकन हसेल. “

तिने बाळाचे नाव काढले आणि माझा छकुला माझ्या नजरेसमोर आला. घेऊन जाते मी त्याच्यासाठी हे खेळणं, खेळेल तो सायंकाळी, बरं वाटेल त्याला तोपर्यंत. या खेळणी विकणारीमुळेच माझ्या मनात हा सकारात्मक विचार आला आणि मी चटकन ते खेळणे घेतले.

गाडीत नेहमीच आपल्या अंदाजात येणारी लता किन्नर आली, “तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत, इच्छा पूर्ण होवोत, तुम्हांला नोकरीत बढती, पगारवाढ मिळो” ती म्हणत होती.

“माझ्या बाळाला लवकर बरं वाटावं असा आशीर्वाद दे ना”.

“अगं वाटेल बरं, काळजी करू नकोस. डाॅक्टरांकडे ने, अजिबात हयगय करू नकोस. “

माझं स्टेशन आलं, मी उतरले. स्टेशनपासून पाच मिनिटांच्या अंतरावर माझं ऑफिस होतं. रस्त्याने चालतांना एक आठ दहा वर्षाचा असेल तो मुलगा. “ताई पेन घ्या ना. ” 

मला पेन नको होता. “नाही रे बाळा, मला पेन नको, आहे माझ्याकडे. “

“ताई घ्या ना, आज एकही पेन विकला गेला नाही, खूप भूक लागलीय, पण खाण्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडे. ” त्याचा चेहरा केविलवाणा रडका झाला.

“आण, किती पेन आहेत तुझ्याकडे? ” 

“दहा आहेत ताई, ” 

“दे सगळे, हे घे शंभर रूपये. ” 

त्या मुलाला खूप आनंद झाला. त्या हास्यात मला माझ्या बाळाचं हास्य दिसलं. नकळत माझ्याही ओठांवर हास्य आलं.

ऑफिसात कामाचा डोंगर मी उपसला आणि महिन्याभरापासून चालू असलेलं ऑडीट आज संपलं. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मी घराकडे धाव घेतली आणि प्लॅटफाॅर्मवरील चालू होत असलेली लोकल पकडली. आतील सहयात्रींनी मला मध्ये खेचले.

मी घरात पाऊल ठेवलं आणि हसतं खेळतं माझं बाळ पाहून माझंही ह्रदय आनंदानं उंचबळून आलं. मी ड्रम वाजविणारा विदूषक बाळापुढे ठेवला. त्याच्या ढुम ढुम, तड तड आवाजानं बाळ हसू लागलं आणि सकाळी निराशेनं ग्रासलेलं माझं मन आनंदानं फुललं. आनंदाचं पान उघडलं गेलं होतं.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सरप्राइज… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ सरप्राइज… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“अरे तू आधी मला बोलून दाखव तू स्टेजवर काय काय बोलणार आहेस,…तेवढीच तुझी प्रॅक्टिस होईल,..फार घाबरल्यासारखं होत बरं त्या स्टेजवर तो काही तुझा नेहमीचा भाषणं ठोकायचा स्टेज नाही ,,.. इथे प्रॅक्टिस करून घे आमच्यासमोर,.”

तो आरश्यात बघुन भांग पाडताना थांबला,..” आई ,अग त्याची काही गरज नाही,..मला काय बोलायचं आहे त्या वधुवर मेळाव्यात ते माझं फिक्स आहे,..सो डोन्ट वरी,.. लेट्स गो ते बोलणं तुझ्या वाढदिवसाचं खास बड्डे गिफ्ट असेल,… ” .. असं म्हणत कारची चावी घेऊन तो पळाला देखिल,.. 

नंदा आणि सुनिल एकमेकांना बघून हसले,..तिने निघताना त्या सुंदर काळ्याभोर कृष्ण मूर्तीसमोर दिवा लावला,..सकाळी घातलेला सुंदर मोगऱ्याचा हार अजून टवटवीत होता,..नेहमीप्रमाणेच समाधानाने डोळे मिटुन ती म्हणाली,..”कृष्णा तू ऋषीच्या रूपाने खरा बाळकृष्ण होऊन माझ्या अंगणी आलास,… आता फार महत्वाचा टप्पा आहे माझ्या ऋषीचा,..जोडीदार चांगला मिळाला म्हणजे झालं,..” 

तेवढयात बाहेरून जोरात हॉर्न आला,..सुनीलने नंदाचा हात पकडला “ चल लवकर,..उशीर होईल आपल्याला,.. “ 

दोघे गाडीत येऊन बसले,..नंदाच्या मनात ऋषीचं लग्न म्हणजे अगदी धाकधूक सुरू होती,..कारण ह्या वधू संशोधनात तिने बऱ्याच फोटोखाली दिलेल्या माहितीत,..’सासू सासरे नसल्यास उत्तम’ ,किंवा ‘ज्यांना आई वडील नाही त्यांनी सम्पर्क करा’,  असंही लिहिलेलं होतं.  मोठया पोराच्या बाबतीत ती ते अनुभवत देखील होती,…’आज मेळाव्यात तर काय काय ऐकायला मिळणार आहे कि,..’ ती मनात विचार करत होती.

छोट्याश्याच हॉल मध्ये सगळी तयारी दिसली,..शंभर एक खुर्ची,..छान बारिक सनई आणि छोटंसं फुलांनी सजवलेलं स्टेज,..खरंतर नंदा आणि सुनील यांना ह्या ग्रुपवर वधू शोधणं नकोच होतं,…त्याचा हट्ट इथे येण्याचा .. ..  इथं स्पष्ट बोलून विवाह ठरतात हे तो ऐकून होता,,..पन्नास एक वधू वर आलेले दिसत होते,…प्रत्येक जण येऊन अगदी आत्मविश्वासाने आपल्याला हव्या असणाऱ्या जोडीदाराच्या अपेक्षा सांगत होता,..नंदाला आश्र्चर्य वाटत होतं,…’ किती बदललं सगळं आपल्या वेळी काही बोलायची हिम्मत नव्हती आणि आता मुलं मुली किती सरसावून बोलत आहेत,…’ 

वधु वरांचे पगार,शिक्षण सगळंच किती एकाचढी एक,..स्त्री पुरुष समानता पाळणारा मुलगा हवा,..कमावणारी जोडीदार हवी,…घरकामात पन्नास टक्के मदत करणारा,एकुलता एक,एकटा राहणारा ,  आईवडील असतील तरी जवळ नको,..दोन्ही वेळेस गरम जेवण देणारी,..लाजता येणारी,….काय ह्या अपेक्षा प्रत्येकाच्या बोलण्यात ऐकू येत होत्या,…ऋषीचा नंबर जवळ आला तसं नंदालाच धडधडायला लागलं,…

ऋषीने नाव,शिक्षण सांगितलं,.. जातीच्या बंधनात न अडकणारं विवाह मंडळ होतं हे, त्यामुळे तो उल्लेख नव्हता,…ऋषीने घरची माहिती दिली आणि ‘मला माझ्या आईबाबांसह स्वीकारणारी सहचारिणी हवी आहे’ असं सांगितलं,..’ माझ्या शिक्षणामुळे मला कुठेही चांगला जॉब मिळेल पण तिथे मी माझे आई बाबा नेणार,..त्यामुळे ज्यांना माझा पैसा, शिक्षण ह्याच्याशी लग्न करायचं आहे त्यांना सॉरी पण ज्यांना आमच्या तिघांसोबत राहण्याची तयारी असेल असेच ठिकाणं वेलकम आहेत,..’ 

.. .. ‘ ह्याच एक आणखी कारण,’ तो पुढे म्हणाला .. ‘ पंचवीस वर्षांपूर्वी अनाथालयात रडणाऱ्या एका मुलाचा वाढदिवस आहे हे कळल्यावर तिथे संस्थेला भेट द्यायला आलेल्या दोघा नवरा बायकोने विचारलं..  “ मुला तुला काय सरप्राईज आवडेल तुझ्या वाढदिवसाला,..?” 

ते मुल म्हणालं,” तुम्ही द्याल का ते मी सांगितलं तर,..?” 

ते म्हणाले “हो नक्की,.”

… त्यावर ते मुल म्हणालं “ मला आई बाबा हवेत,..” 

.. .. त्याक्षणी ज्यांनी दत्तक घेऊन मला एवढं सुंदर जगणं दिलं त्या आई वडिलांना मी येणाऱ्या सहचरिणीसाठी सोडून देऊ शकत नाही.  त्यामुळे कृपया ह्या अटी लक्षात ठेवूनच सम्पर्क साधा,..’ 

.. तो स्टेजवरून खाली येऊन बसला,..

.. .. .. नंदा अखंड रडत होती,..आज तिचा वाढदिवस होता आणि तो म्हंटलाच होता ‘ माझं बोलणं हेच तुला सरप्राईज गिफ्ट आहे ‘ आणि खरंच होतं ते,  कारण सख्खा मुलगा सुनेच्या म्हणण्यावर दुसरीकडे राहात होता,..ह्याने मात्र सुरुवातच अशी केली होती,..पंचवीस वर्षांपूर्वीचं सरप्राईज आता वापस मिळालं होतं,..

.. .. सुनील आणि नंदा दोघेही भरून पावले होते,..ऋषीने आईला जवळ घेतलं,.. ‘मी आहे’  हा विश्वास नंदाला त्याच्या मिठीत होता,..तिने पाणावल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं.  तिला आता त्याच्या चेहऱ्याच्या जागी काळी कृष्णमुर्ती दिसत होती,….

.. आयुष्यातल्या काही निर्णयांना मोगऱ्याचा दरवळ असतो हेच खरं,.. असंच तिच्या मनात आलं,….

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “भारी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “भारी…” ☆ श्री मंगेश मधुकर

सकाळचे अकरा वाजून गेलेले, चौकातला सिग्नल बंद आणि पोलीससुद्धा नव्हते. जो तो आपली गाडी दामटण्याच्या प्रयत्नात. प्रत्येकाला पुढं जायची अतोनात घाई त्यामुळे सगळा गुंता झालेला. ट्राफिक जाम. आरडाओरडी त्यात हॉर्नच्या आवाजाची भर. गर्दीत अडकलेल्या अंब्यूलन्सचा सायरन अस्वस्थता वाढवत होता.

“ए भारी, इथं का बसलाय. ” वैतागलेल्या नथूशेठनं विचारलं.

“असंच, भारी ना”दुकानाच्या पायऱ्यावर बसलेल्या भारीनं उत्तर दिलं.

“शिट्टी कुठयं, ”नथूशेठ

“ही काय, ” 

“तुझं काम कर की.. समोर बघ. ”

“काम??? ”भारीच्या प्रश्नावर नथूशेठनं कपाळावर हात मारला. त्यांना स्वतःची चूक लक्षात आली.

“भारी, इथून उठ. चौकात जा. ट्राफिक मोकळं कर. काम झाल्यावर दोन वडापाव आणि चहा देईन. ”नथूशेठ बोलल्यावर खुष झालेला भारी जोरजोरात शिट्टी वाजवत काठी घेऊन चौकात गेला आणि एकेक गाड्या मागे ढकलायला लागला. भारीचा आवेश बघून काही गाडीवाले नरमले. आपसूक गाडया मागे घ्यायला लागले. कोंडी सुटायला लागली. भारी मात्र त्वेषानं काम करत होता. हातातली काठी तलवारीसारखी फिरवत होता. त्याचा तडाखा बसल्यानं दोनचार आरसे आणि इंडिकेटर्स फुटले. गाडीवाले ओरडायला लागले पण भारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एकदोघं आडवे आले तेव्हा डोळे मोठे करून भारी बेंबीच्या देठापासून जोरात किंचाळला तेव्हा फारच भयानक वाटला. पुढे आलेले चुपचाप मागे सरकले. रणभूमीवरच्या योध्यासारखा भारीचा आविर्भाव होता. पंधरा-वीस मिनिटांत ट्राफिक सुरळीत झालं. पोलिस आले. गाडीचं नुकसान झालेल्यांनी तक्रार केल्यानं पोलिस भारीला चौकीत घेऊन गेले.

— 

जेमतेम पाच फुटाची ऊंची, दणकट शरीरयष्टी, गोल चेहरा, मोठाले डोळे, खुरटी दाढी-मिशी, तिशीतच पडलेलं टक्कल, अंगात मळकट कपडे, अंगात हाफ शर्ट, पॅन्ट कायम वितभर दुमडलेली अशा अवतारातल्या ‘भारी’चा मुक्काम दिवस-रात्र चौकात असायचा. कसलाही आगापिछा नाही की घरदार नाही. दहा-बारा वर्षापूर्वी वर्षापूर्वी चौकात आला आणि तिथलाच झाला. मंदबुद्धी भारीविषयी कोणालाच माहिती नव्हती आणि त्यालासुद्धा स्वतःविषयी काही सांगता येत नव्हते. बोलताना भारी, भारी’ सारखं म्हणायचा. म्हणून सगळे त्याला ‘भारी’ म्हणायला लागले. चौक म्हणजेच भारीच विश्व झालं. तिथले दुकानदार, रिक्षावाले खायची-प्यायची काळजी घ्यायचे. कपडे द्यायचे पण त्याला कपडे बदलायचा कंटाळा. मनात आलं तरच मनपाच्या शाळेत जाऊन आंघोळ करायचा. दिवसभर कसल्या ना कसल्या कामात असायाचा. काम नसेल तर कुठल्याही दुकानाच्या पायरीवर एकटाच बडबडत बसायचा. भारी म्हणजे सांगितलेलं काम बरोबर करणारा. शंभर टक्के सांगकाम्या. जेवढं सांगितलं गेलं तेवढंच काम करणार. पाण्याची बादली आणायला सांगितलं तर फक्त बादलीच घेऊन येणार वाहणारा नळ बंद करणार नाही अशी कामाची पद्धत. कामाच्या मोबदल्यात फक्त खाण्याची अपेक्षा. पैसे कशासाठी लागतात हेच त्याला माहिती नव्हतं. खायला मिळालं की काहीही काम करायला तयार. म्हणून तो सर्वांचा लाडका होता. अनेकजण त्याच्याशी बोलायचे. चेष्टा करायचे पण त्रास द्यायचे नाहीत उलट काळजी घ्यायचे. डोकं चालत नसलं तरी भारीकडे अफाट ताकद शक्ती होती. खरं सांगायचं तर आयुष्य असावं तर भारीसारखं. कसली काळजी नाही. जबाबदारी नाही की टेंशन नाही. काम करा आणि खात रहा. एकदम निवांत सुखी आयुष्य. असं सर्वांना मनोमन वाटत होतं.

भारीला चौकीत नेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हातातली कामं सोडून अनेकांनी तिकडं धाव घेतली. ‘भारी’साठी गर्दी जमलीय हे कळल्यावर इन्सपेक्टरांना आश्चर्य वाटलं.

“साहेब, चूक झाली. सोडून द्या. पुन्हा असं होणार नाही”नथूशेठनं हात जोडून विनंती केली.

“अहो, त्यांनं गाड्या फोडल्यात. तक्रार दाखल झालीये”

“मुद्दाम केलं नाही. ट्राफिक जाम सोडवायला गेला त्यावेळी जोशात.. ”

“बरं झालं काठी गाड्यांवर बसली. माणसांना मारलं असतं तर.. ”

“तो खुळा आहे. डोक्यानं जरा कमीयं. जे नुकसान झालंय ते आम्ही भरून देतो. त्याला सोडून द्या. ”नथूशेठच्या बोलण्याला सोबतच्या दुकानदारांनी दुजोरा दिला. इन्सपेक्टर विचारात पडले. नुकसान झालेल्या गाडीवाल्यांना नथूशेठनं भारीची वस्तुस्थिती आणि नुकसान भरपाई देण्याविषयी सांगितल्यावर तक्रार मागे घेतली गेली. त्याचवेळी भारी नथूशेठकडे “वडापाव” मागत होता. वडापाव मिळाल्यावरच तो शांत झाला.

“कोण आहे हा”इन्सपेक्टर 

“आमच्या चौकाचा दत्तक पुत्र”

“म्हणजे”

“एकटा जीव सदाशिव. मागंपुढं कोणी नाही. कायम चौकात असतो. दुकानांची काळजी घेतो. सांगेल तेवढीच कामं करतो. बदल्यात फक्त खायला द्यायचं. पैशे नाही. सगळे मिळून त्याची काळजी घेतो. ”नथूशेठ.

“चांगलंयं की, तुम्हां सर्वांचे फार कौतुक. ”

“साहेब, एक विनंती होती. आमच्या चौकात ट्राफिकचा प्रॉब्लेम नेहमीचा आहे. लोक कशाही गाड्या पार्क करतात. भारीच्या मदतीनं गाड्या नीट पार्क करण्यासाठी आग्रह करतो. हळूहळू फरक पडतोय. आता तुमची परवानगी असेल तर ट्राफिकसाठी भारीची मदत घेता येईल”

“विचार चांगलाय पण त्यानं गाड्या फोडल्या, लोकांना मारलं तर.. ”

“त्याची जबाबदारी आम्ही घेतो. भारीला फक्त एक शिट्टी देतो. लाल सिग्नलला गाड्या झेब्रा क्रॉसिंगच्या मागे राहतील आणि व्यवस्थित गाड्या पार्क केल्या जातील हे पहायचं एवढंच काम भारी करेल. काय करायचं नाही ते समजावून सांगू आणि लक्ष ठेवू. ”

“हरकत नाही. काही दिवस ट्रायल करून बघा पण हात उचलायचा नाही हे त्याला आवर्जून सांगा.”

“नक्कीच.. ”आभारी आहे.

गाड्या नीट कशा पार्क करायच्या तसंच ट्राफिक कंट्रोल कसं करायचं याविषयी भारीला दाखवलं गेलं. पुन्हा पुन्हा समजावलं. “भारी, आता काम सुरु कर. गाड्या व्यवस्थित लावायला सांगायचं. ओरडायचं नाही. भांडणं, माऱ्यामाऱ्या नाही. शिव्या द्यायच्या नाहीत कळलं. हे नीट केलंस तर दोनदा चहा-नाश्ता, सकाळ-संध्याकाळ जेवायला मिळेल”नथूशेठनं सांगितल्यावर भारीनं मान डोलावली. नवीन पॅन्ट शर्ट, शिट्टी आणि टोपी मिळाल्यावर भारी खुष झाला आणि अचानक ओरडत चौकाच्या दिशेनं पळाला “ए गाडी, मागं मागं घे”पांढऱ्या पट्ट्यावर उभ्या असलेल्या बाइकवाल्याला गाडी मागे घ्यायला लावली. “आता काही खरं नाही. भारी सोडत नाही” नथूशेठच्या बोलण्यावर सगळे हसले.

वर्ष झालं, भारीचं काम चालूयं. त्यानिमित्तानं सत्कार कार्यक्रम होता. चौकातलं ट्राफिक पूर्णपणे नाही तरी बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित झालंय. खासकरून पिक अवर्समध्ये भारीचा खूप उपयोग होतो. इतके दिवस झाले तरी भारीचा उत्साह अजूनही तसाच. गाडीवालेसुद्धा सहकार्य करतात. निदान चौकापुरते तरी नियम पाळतात. गाड्या व्यवस्थित पार्क करतात. याचं सगळं श्रेय भारीला. ”नथूशेठच्या बोलण्याला सर्वांनी कौतुकानं टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला तेव्हा सत्कारमूर्ती भारीच लक्ष समोसा आणि वेफर्सकडे होतं. नथूशेठनं शाबासकी दिल्यावर भारी समोर बोट दाखवत म्हणाला “समोसा, ”

“खा की मग”. शेठ.

भारीनं प्लेट उचलून खायला सुरवात केली.

“कसाय समोसा” शेठनं विचारलं हसत हसत भारीनं उत्तर दिलं.. “भारी, जाम भारी ”.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋण – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

 

? जीवनरंग ?

☆ ऋण – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

पोस्टमनने आणलेले पोस्ट हातात तोलत दत्तू ऑफिसकडे आला. चार पाच चेहरे त्याच्याकडे नेहमीच्या आशेने पहात होते. हो..कारण या ‘आशा दीप’ नावाच्या वृद्धाश्रमात पन्नास एक वृद्ध रहात असले तरी पत्र यायची ती फक्त मोजक्या चार पाच जणांनाच. त्यामुळे अधून मधून पोस्टमन येउन पोस्ट गेटवरच दत्तूकडे देउन जायचा, तेंव्हा हे ठरावीक लोकच त्यांच्या नावाचे पत्र आलय का हे ऐकायला उत्सुक असायचे. बाकीचे सिनीयर सिटीझन्स आपले त्याच्याशी काही देणे नाही या अविर्भावात, बाजूच्या वाचन कट्ट्यावर पेपर किंवा पुस्तक घेउन वाचत बसलेले असत. किंवा मग कोप-यावरच्या हॉलमधे जाउन कैरम, पत्ते खेळत बसत असत.

त्यामुळे दत्तूने जेंव्हा हाक दिली ‘देशमुख काका… तुमच्या नावाचं पाकीट आलय..घेउन जा..’ तेंव्हा पुस्तक वाचनात गढून गेलेले आप्पा देशमुख आधी चपापलेच.

‘आपल्याला कोणाचे पत्र आले असेल?’ असा आधी विचार करुन त्यांनी शेजारी बसलेल्या नाना वर्टीकर यांच्याकडे पाहिले. नानांनी तोंडात ‘बार’ भरला होता. मानेनेच ‘जाउन या..बघा काय आलय..’ असे नानांनी आप्पांना सुचवले तसे आप्पा लगबग ऑफिसमधे आले. रजिस्टरला नोंद करुन ते जाडजूड envelope आपल्या हातात घेउन ते उठले.

पाकीट दिल्लीवरुन स्पिड पोस्टने पाठवलेले होते.

त्यावर पाठवणा-याचे नाव नव्हते. फक्त एवढेच लिहीले होते

If undelivered, please return to

Assistant Secretary-Planning

Ministry of Finance

10, Sansad Marg, New Delhi-01

आप्पा देशमुख ला दिल्लीवरुन कसलेसे जाडजूड टपाल आलय हे एव्हाना दत्तूकरवी सर्वांना समजले होते.

सारेजण आप्पांभोवती जमा झाले..

मग एक एक प्रतिक्रिया येउ लागल्या..

‘काय रे आप्पा, या वयात लव्ह लेटर आले काय तुला? एवढं दिवस सांगितलं नाहीस आम्हाला ते..’ आबा क्षिरसागरने आप्पांची खेचली आणि एकच हास्य कल्लोळ झाला.

‘अरे आबा..लव्ह लेटर नसेल..उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घ्यायला दिल्लीला बोलावलं असेल राष्ट्रपतींनी आप्पाला..तो मास्तर म्हणून रिटायर होउन पाच वर्षे झालीयेत हे लक्षात नसेल आले त्यांच्या..’ बापू देशपांडे बोलले तसे सगळे पुन्हा एकदा हसले.

‘छे रे..बापू..अरे पत्र बघ कोणाकडून आलय..Department of Planning, Ministry of Finance. आयला, म्हणजे आप्पाला planning commision मधे घेताहेत की काय? अभिनंदन आप्पा..!!’ पांडूकाका पवार बोलले.

तेवढ्यात आपला तंबाखूचा तोबरा थुंकून परत जागेवर आलेल्या नाना वर्टीकरने सगळ्यांना शांत केले..

‘अरे बाबांनो..असा अंदाज लावत बसण्यापेक्षा आप्पाला ते पाकीट उघडू तरी द्यात. काय ते कळेलच…ए आप्पा.. उघड रे ते पाकीट..’

आप्पानी नानांच्या आदेशा प्रमाणे पाकीटाची एक कड कात्रीने सावकाश कापली. आता तसेही त्यांच्या आयुष्यात काही सिक्रेट्स नव्हते. तीन वर्षापूर्वी पत्नी गेली अन सुने बरोबर पटेनासे झाले तसे ते मुलाला सांगून स्वतःच या वृद्धाश्रमात येउन राहिले होते. मुलगा महिन्यातून एकदा येउन त्यांना भेटून जायचा. शाळेची पेन्शन यायची त्यात त्यांचे भागायचे. आता हा वृद्धाश्रम आणि इथले मित्र हेच त्यांचे कुटुंब झाले होते. आता त्यांचे खाजगी, वैयक्तिक असे काही नव्हतेच. म्हणूनच हे पाकीट सर्वांसमक्ष उघडायला त्यांना कुठली भिड वाटली नाही.

पाकीटात तीन चार गोष्टी होत्या. आधी एक ग्रिटींग कार्ड निघाले. त्यावर गुरु आणि शिष्याचे एक सुंदर भित्तीचित्र होते व त्यावर सुवाच्य अक्षरात एक मेसेज लिहीला होता..

‘माझ्या शालेय जीवनातच मला जीवनाची खरी दिशा दाखवणारे माझे देशमुख गुरुजी यांना शिक्षक दिना निमीत्त सप्रेम नमन.’

खाली फक्त नाव होते..आरती.

नानांनी ते ग्रिटींग पाहिले व म्हणाले..’अरे आप्पाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छापत्र आहे हे..आरती नावाच्या…’

आप्पा विचारात पडले. पस्तीस वर्षांच्या शिक्षकी कारकिर्दीत, आरती नावाच्या अनेक मुली त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. तीन चार विद्यार्थिनी त्यांना आठवतही होत्या. पण ‘ही’ त्यातली नक्की कोण हे त्यांना लक्षात येत नव्हते.

‘ते बघ आत एक चिठ्ठी देखील आहे ती वाच..’

आतून एक छान गुळगुळीत पण उच्च प्रतिच्या स्टेशनरीचा कागद बाहेर आला व त्यावर सुवाच्य अक्षरात एक पत्र लिहीले होते. आश्रमात ‘पत्र वाचन’ हा बापू देशपांडेंचा प्रांत.

आप्पांनी त्यांच्याकडे ते पत्र वाचायला दिले.

बापू देशपांड्यांनी आपल्या खणखणीत आवाजात पत्र वाचायला सुरु केले..

‘प्रिय सर,

मी तुमची विद्यार्थिनी आरती देसाई.

मला ठाउक नाही की तुम्हाला मी पटकन चेह-यानिशी आठवेन की नाही. कारण ‘देसाई बाल अनाथ आश्रमा’त वाढलेल्या माझ्यासारख्या बहुतेक मुला मुलींची आडनावे ही देसाईच असायची व अशी बरीच मुले मुले आपल्या शाळेत होती. तुमच्या हातून कुठल्या न कुठल्या इयत्तेत इंग्रजी शिकला नाही असा एकही विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळेतून बाहेर पडला नसेल. त्यातली एक भाग्यवान विद्यार्थिनी मीही होते.

सर, आम्ही अनाथालयात राहणारी मुले. इतर मुलांसारखे मधल्या सुट्टीत डबे नसायचे आम्हाला. मला अजूनही आठवतं..वर्गातल्या प्रत्येक देसाई आडनावाच्या मुला मुलीला तुम्ही रोज मधल्या सुट्टीत पाच रुपये द्यायचात. खरे तर आम्हीच मिळून तुमच्याकडे यायचो व ते तुमच्याकडून हक्काने घ्यायचो. आपल्याच गुरुकडून पैसे मागायची भिड नाही वाटायची तेंव्हा आम्हाला. त्यात तुम्ही आम्हाला जवळचे वाटायचात.

तुम्ही दिलेल्या त्या पैशातून आम्ही ‘देसाई मुले मुली’ मिळून कधी चिरमुरे, कधी बिस्कीटे, कधी भडंग पाकीट असे काही एकत्र घेउन खायचो. बिकट परिस्थितीला एकत्र लढण्याची ताकत व हिंमत, दोन्ही, तुम्ही आम्हा मुलांना त्या न कळत्या वयात दिलीत. तुमच्यामुळेच आज ही मुले कुठे ना कुठे सुव्यवस्थित पोजीशन वर कार्यरत आहेत.

मला तुम्ही मी आठवीत असताना शिकवलेली ती कविता, जशी तुम्ही शिकवली, तशीच अजूनही आठवते

‘The Woods are lovely dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep..’

या कवितेतून तुम्ही दिलेली प्रेरणा मला आजन्म पुरणारी होती..आहे. मी आता गेल्यावर्षी IAS ची परिक्षा उत्तीर्ण होउन दिल्ली मधे अर्थ खात्यात Planning Department मधे Assistant Secretary या पदावर गेल्या सहा महिन्यांपासून रुजु झाली आहे. इथे आल्यापासून मी तुमचा शोध सुरु केला व मला काही जुन्या मित्रांकरवी ही माहिती मिळाली की तुम्ही..’इथे’ आहात.

सर, मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्या बाबांच्या जागी असलेल्या माझ्या सरांना आज वृद्धाश्रमात रहावे लागत आहे, ही कल्पनाच मी सहन करु शकत नाही. या लिफाफ्यात एक विमानाचे तिकीट पाठवत आहे. तुम्ही दिल्लीला माझ्याकडे, आपल्या मुलीकडे या, हवे तितके दिवस, महिने माझ्याबरोबर रहा. कायमचे राहिलात तर सर्वात भाग्यवान मुलगी मी असेन..

असे समजू नका की मी तुमचे ऋण फेडत आहे. कारण मला कायम तुमच्या ऋणातच रहायचे आहे…

खाली माझा ऑफीस व मोबाइल दोन्ही नंबर आहेत.

मला फोन करा सर..

वाट बघते आहे..

याल ना सर………बाबा…?

तुमचीच,

– आरती देसाई

पत्र वाचताना नानांचा आवाज कधी नव्हे ते कापरा झाला…. त्यांनी आप्पांकडे पाहिले..

आप्पा ते पाकिट छातीशी धरुन रडत होते…

.. .. .. शेवटी एवढेच म्हणेन.. .. 

माणसाचे अश्रू सांगतात ..  तुम्हाला दुःख किती आहे.

संस्कार सांगतात .. कुटुंब कसं आहे.

गर्व सांगतो .. पैसा किती आहे.

भाषा सांगते .. माणूस कसा आहे.

ठोकर सांगते .. लक्ष किती आहे.

आणि सर्वात महत्त्वाचे .. 

वेळ .. सांगते नातं कसं आहे.

💦🌨️

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड -पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आम्हाला समजून घ्या…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? जीवनरंग ?

☆ ‘आम्हाला समजून घ्या…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आलिशान गाडीत बसलेल्या, गीता वाचनात दंग असलेल्या, सुटाबुटातील राघवदास शेठच्या पुढे एकदम टाळी वाजली. ड्रायव्हर त्या व्यक्तीला हाकलत होता… “ए चल! हो बाजूला. एक तर ट्रॅफिक जाम झालंय. शेठना महत्वाची काम आहेत. आणि तुझं काय रे मधेच हे झेंगटं? काही काम धंदा करा. तुम्हाला दुसरा उद्योग काय आहे म्हणा प्रत्येकापुढे टाळी वाजवून हात पसरण्या शिवाय”… गोविंदा जुना वयस्कर ड्रायव्हर होता म्हणून शेठसमोर इतकं बोलू शकला होता..

शेठ गोविंदावरच चिडले, “ही काय बोलण्याची पद्धत झाली कां तुझी? “.

“अहो साहेब नेहमीचचं आहे यांचं हे! टाळ्या वाजवून आपलं लक्ष वेधून घेतात आणि पैसे दिल्याशिवाय हालतच नाहीत. पावडर फासायला ओठ रंगवायला पैसा हवा असतो त्यांना. हा आतां भेटला ना! तो रोज येतो या चौकात. नंतर जातो समोरच्या मंदिरात आणि तिथे बसतो टाळ कुटत. “.

तृतीयपंथाच्या अगदी जवळून भराराsss.. गाडी पुढे गेली. तो घाबरून मागे सरकला. हो! तृतीयपंथीच होता तो. जगाच्या शाळेतला, वाट्याला आलेल्या भोगाने, परिस्थितीने, ग्रासलेला त्याचा चेहरा राघवदासांच्या डोळ्यासमोरून हालतच नव्हता. कां कोण जाणे शेठजींच्या मनांत त्याच्याबद्दल दया, उत्सुकता निर्माण झाली आणि योगायोग असा की दुसऱ्या दिवशी त्याचं रस्त्यावर त्याचं चौकात तो दिसला.

… समोर महादेवाच्या मंदिराचा कळस कोवळ्या उन्हात चमकत होता. सोमवार असल्याने गोविंदाला गाडी मंदिरासमोरच थांबवायला सांगितली.

आरती संपली आणि प्रसाद पुढे आला. घोगरट आवाज कानावर पडला..

“शेठ हा घ्या प्रसाद. एक सांगु कां, तुमच्या ड्रायव्हरदादांचं बोलणं मी ऐकलं, त्यांची रागारागाने माझ्या अगदी जवळून नेलेली गाडी माझ्या जीवावरही बेतली असती. तुम्हीं दिलेली भीक आम्ही या वीतभर पोटासाठी आणि या भोले बाबाच्या प्रसादासाठी वापरतो हो.! “.. असं म्हणून त्याने शेठजींच्या हातावर प्रसाद ठेवला आणि तो मंदिराच्या ओसऱीवर जाऊन बसला.

इकडे शेठजींच्या मनांत आल, कसं असेल ह्यांचं आयुष्य? कशा असतील याच्या व्यथा? …

ह्या विचाराने राघवदास अस्वस्थ झाले. आपलेपणा आणि उत्सुकता त्यांच्या मनांत दाटून आली आणि नकळत त्यांनी त्याच्याकडे मोर्चा वळवला.

… सांवरून आणि घाबरून तो बाजूला सरकला. त्याला प्रेमाने चुचकारत शेठनी विचारले,

“नांव काय रे बाळ तुझं? “.

खाली मान घालून तो म्हणाला, “भागू म्हणतात मला”

“अरे लाजतोस काय असा? तुला कुणी नात्याचं नाही कां? मला जवळचा मित्र समज आणि खुल्या दिल्याने मनातलं सांग. ”.

भरून आलेले डोळे पुसत तो म्हणाला, ” शेठ इतकी आपुलकी कुणीच दाखवली नाही हो मला, आमच्याकडे समाज कुचेष्टेने, तिरस्काराने बघतो नां! तेव्हां हृदय जळत हो आमचं! आम्हीही माणसं आहोत. आम्हाला मन, भावना आहेत. मला कुणीच नाही. पण मग मी या भोलेनाथाला माझी व्यथा आणि कथा सांगतो. कारण तोही अर्धनारी नटेश्वर होता ना”! ..

शेठजींनी भागूच्या पाठीवर शाबासकीची थाप दीली. “किती छान बोलतोस तु! शिकलास कां? किती शिक्षण झालंय तुझं? “.

 “होय शेठ. इथल्या शंकरबाबा साधुंनी मला वाढवलं. शिक्षण दिलं. समाज मला मागे रेटत होता. मला झिडकारत होता. पण बाबांनी मला पाठीशी घातलं. शंकर बाबा म्हणाले, “भूतकाळ विसर भविष्याची आशा धर आणि वर्तमानात बिनधास्त जगं. देवाला आणि दैवाला दोष देऊ नकोस जीवनाबद्दल तक्रार करू नकोस. आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून समाज सेवा कर. ”.

शेठजी त्याच्या जवळ सरकले, त्याच्या पाठीवर हात फिरवून तें म्हणाले, विचार किती सुंदर आहेत तुझे, शंकरबाबांनी तुझ्या मनाला आशा आणि आयुष्याला दिशा दाखवलीय”..

“हो शेठ माझे शंकर बाबा दुसरे भोले बाबाचे अवतारच आहेत या मंदिराची देखभाल साफसफाई माझ्यावर सोपवून तें केदारनाथला गेले आहेत. माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी मार्गी लावलंय समाजाने आम्हाला झिडकारले, वेगळ्या नजरेने बघितले नां की उरातली जखम भळभळते हो! पण आपण याच समाजाचं काहीतरी देणं लागतोय ही भावना मनांत ठेवण्याचा गुरुमंत्र आमच्या गुरूंनी, शंकर बाबांनी आम्हा तृतीयपंथांनां दिला आहे.”

शेठजींची उत्सुकता चाळवली गेली होती. भळभळती जखम उरात दडवून जीवन प्रवास करणारा महाभारतातला ‘अश्वथामा’ त्यांच्या समोर बसला होता. शेटजी पण दुःखी होते. कारण एका अपघातात त्यांच् विश्व उध्वस्त झालं होतं. मनातलं दुःख बाहेर पडून ते कुठेतरी व्यक्त होणं प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असतं. आणि तो विश्वास भागुला त्यांनी दिला..

ते म्हणाले, “बाळा मला सांग, तुझे इतर बांधव भगिनी समाजासाठी काय काय करतात? सांगशील कां सगळं मला? खूप जण काही काही करतच असतात हो शेठ! अभिमानाने नुकताच घडलेला किस्सा मी तुम्हाला सांगतो, अमित उर्फ आम्रपाली यांनी दारोदारी चौकाचौकातून फिरून पूरग्रस्तांसाठी जोगवा मागून, आठ दिवसात, चाळीस कट्टे तांदूळ, 350, ब्लॅंकेट्स, ५०० सॅनिटरी पॅड, 100 वह्या, चणाडाळ, तेलतुपाचे डबे, साखर, चहा, पीठ, मीठ मसाला गोळा करून कार्यकर्त्यांच्या मदतीने घरोघरी पोहोचवला.

असें अनेकजणांचे अनेक किस्से आहेत. शेठजी सांगायला गेलो नां! तर आमच्या कथेची गाथाच होईल. “

हे सारं ऐकून शेठजी अवाक् झाले. त्यांच्या मनांत आलं आपण आपलचं दुःख उगाळत बसलो होतो. घरदार आहे, मानमरातब आहे, धनसंपदा प्रसन्न आहे आपल्यावर. तिचा सदुपयोग व्हायला हवा. ह्या तृतीयपंथांचेही आपण देणं लागतो. ही पण समाजसेवा, देशसेवाचआहे..

– – – स्वातंत्र्यवीर सावरकर राघवदास शेठजींचे आदर्श होते. त्यांच्या पुस्तकांचं अनेक वेळा त्यांनी पारायण केलं होतं. सावरकरांचं एक वाक्य त्यांना आवलं, “देह आणि देव यांच्या मधला प्रवास देशसेवेसाठी असावा. ” राघवदासांनी ठरवलं भागुला मदत करून, आपली धनसंपत्ती ह्या लोकांसाठी खर्च करायची. कारण हे पण माझे देशबांधव आहेत. विश्वकर्मा नाही पण महादेवापुढचा नंदी होऊन आपण सत्कर्म साधायचं. असा संकल्प सोडून, भागुच्या पाठीवर हात फिरवून, पुन्हां भेटण्याचे आश्वासन देऊन शिवलिंगापुढे ‘ओंकार’ प्रार्थना त्यांनी केली. आणि शेठजी निश्चयाने शिवमंदिराच्या बाहेर पडले..

|| ॐ नमः शिवाय ||

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भरली वांगी – – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ भरली वांगी – – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

“हॅलो सुमा, सुशी बोलतेय. मघापासून फोन करतेय तर एंगेज्ड् लागतोय. “

“अगं, नागपूरहून ताईची मृणाल गप्पा मारीत होती. मधेच म्हणाली ‘मावशी, आता किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला? ‘ ५० होतील म्हटल्यावर ‘अभिनंदन, अभिनंदन’ म्हणायला लागली. तर मी म्हटलं, त्यात कसलं अभिनंदन? आमच्या वेळी घटस्फोटाची पद्धत नव्हती ना, म्हणून झाली पन्नास वर्ष”!

” हाऽ हाऽ हा! काय ग बाई बोलणं तुझं सुमे! “

” गंमत केली जरा. पण पेपरातून डोकं वर उचलून यांनीही रोखून बघितलं माझ्याकडे चष्म्यातून. संसारातल्या बारीकसारीक गोष्टी टोकाला न्यायच्या नसतात हे या नवीन मुलींच्या कानावर असलेलं बरं! तू का फोन करीत होतीस? “

“तुझ्याकडे भरल्या वांग्याचा गरम मसाला आहे ना, तो थोडा तुझ्या कुंदाबरोबर पाठवून दे ना! “

“पाठवते. पण चार दिवसांपूर्वी भेटली होतीस तेव्हा म्हणालीस की भरली वांगी करायला ताजा मसाला करून ठेवलाय म्हणून. “

” केलाय ग, पण तोच मेला सापडत नाहीये. फ्रीज उघडला तर छोले, सांबार, गावरान, मालवणी, चायनीज कसल्या कसल्या मसाल्यांच्या बाटल्या इकडून तिकडून हसताहेत मला. पण माझा भरल्या वांग्यांचा मसाला कुठे सापडत नाहीये. “

“सुमेधाने कुठे उचलून ठेवलाय का विचारलस का? “

“ती घरात कुठाय? राकेशला मराठीच्या क्लासला घेऊन गेलीय आणि तिथून… “

“काय? मराठीचा क्लास? रविवारचा? दुसरीतल्या मुलाला? “

“काय करणार? तुला माहितीये हा आमचा धाकटा नातू मोठ्या सुरेशसारखा शांत, समंजस नाहीये. अर्क आहे अगदी अर्क. एकसारखा इंग्लिशमधून बोलतो. म्हणून त्याला म्हटलं ‘अरे, घरात तरी मराठी बोलावं. आपली मातृभाषा आहे ती. तर म्हणाला, “ममा स्पिकस् इन इंग्लिश. सो व्हॉट इज माय मदरटंग? ” असली घोड्याच्या पुढे धावणारी अक्कल! वर्गात टिचरने ‘गाय’या विषयावर मराठीत दहा ओळी लिहायला सांगितल्या. तर याने काय लिहावं? “अमेरिकेत मुलांना ‘गाय’ असं हाक मारतात. भारतात गाय हा चार पायांचा प्राणी आहे. ती गवत खाते. ती दूध देते. पण आम्ही चितळे यांचे दूध पितो. “

” हाऽ हाऽ हा”

” ऐक पुढे… गाईच्या शीला शेण म्हणतात. त्याच्या ‘गौऱ्या’ बनवतात. गाईची पूजा करतात. वर्गात माझ्या शेजारी पूजा बसते. ती मला खूप आवडते.

” छान, छान! अगदी मनापासून आणि मनःपूर्वक निबंध लिहिलाय राकेशनं. “

“आणि अगदी चक्क ‘गौऱ्या’… ग ला काना आणि दोन मात्रा असं लिहिलं होतं. ‘ अरे, ‘गवऱ्या’असा लिहायचा तो शब्द!

” नो. टिचरने असाच सांगितलाय. “

‘ टिचरने सांगितलं आहे’या ब्रह्मवाक्यानंतर काहीही बोलण्यात अर्थच नसतो. ‘

‘त्याला म्हणावं, टिचरला पण घेऊन जा क्लासला”.

‘राहु दे, राहु दे. पुसेन मी नंतर’

“काय झालं? कुणाशी बोलत आहेस?

“मिस्टर कुरकुरे. “

” कोण? “

” ‘हे’च ग आमचे! आज सकाळी थोडा वेळ होता म्हणून टीव्ही जवळचा प्लास्टिक फुलांचा गुच्छ, फ्लॉवर पॉट सगळं छान धुतलं. टॉवेलवर वाळत घातलं. टीव्ही आणि त्याच्या आजूबाजूची धूळ पुसून सगळं

छान स्वच्छ केलं आणि ती धुतलेली फुलं फ्लॉवरपॉटमध्ये घालून जागेवर ठेवताना जराशी झटकली. त्या झटकलेल्या पाण्याचे चार थेंब जमिनीवर पडले तर झाली ह्यांची बडबड सुरू. ‘मी इथे घसरुन पडलो म्हणजे? पाणी किती पडलं आहे? ‘म्हणजे सगळं छान स्वच्छ झालं त्याचं कौतुक वगैरे नाहीच. उलट कुरकुर सुरु. “

“जाऊदे ग! सगळेच ‘मिस्टर’ असेच कुरकुरेच असतात”.

“तर मी काय सांगत होते, राकेशला क्लासला पोचवून सुमेधा जाणार आहे ब्युटी पार्लरला. तिथून राकेशला घेऊनच घरी येईल. जाताना माझ्या भरल्या वांग्याचं कौतुक करीत मला भरली वांगी करायचं गोड आवाजात फर्मावून गेलीय. दोन-तीन तास पार्लरमध्ये जाऊन काय स्वतःच्या जिवाचे चोचले करून घेतात कुणास ठाऊक! आम्ही आपली करतोय भरली वांगी. “

” आपल्या साळुंक्या पुष्कळ बऱ्या म्हणायच्या! परवा वसू तिच्या अमेरिकेहून आलेल्या सुनेबद्दल काय- काय सांगत होती! तीन आठवड्यांसाठी आलेल्या या पाहुण्या सुना त्यांच्या माहेरी आणि माहेरच्या गोतावळ्यात जास्त असतात. वसुकडे होती चार दिवस, तेव्हा वसू तिला म्हणाली, ‘अगं घरात असताना नीलला डायपर लावू नकोस. दीड वर्षाच्या मुलाच्या नाजूक स्कीनला त्रास होतो’. नाराजीने आणि मनाविरुद्ध सुनेनं नीलला डायपर लावला नाही आणि त्याचे कपडे खराब झाल्यावर हातातल्या मोबाइलवरची नजर सुद्धा न उचलता, त्याच्या रडण्याकडे ढिम्म पाहिलं नाही. शेवटी या शीतयुद्धात आजोबांनीच नातवाला स्वच्छ केलं”.

” धन्य ग बाई! मागच्या महिन्याच्या आपल्या ‘चम्मतग’ ग्रुपच्या मीटिंगला तू नव्हतीस ना! सुनेच्या बाळंतपणासाठी सहा महिने अमेरिकेला राहून आलेली शुभा काय काय मजा सांगत होती! तिच्या नातवाच्या महिन्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुनेच्या मैत्रिणी सहकुटुंब आल्या होत्या. त्यातल्या एका मैत्रिणीने पैठणीचा सुंदर ड्रेस घातला होता. तिच्या सहा महिन्यांच्या बाळाला डायपर बांधलेला असूनही तिच्या ड्रेसच्या हातावर त्याच्या शीचा थोडासा ओघळ आलाच. तर काय करावं त्या मुलीने? सरळ त्या ड्रेसचा हात कापून टाकून दिला. आहे की नाही? “

” शालन आली होती का ग ‘चम्मतग’ला? “

” नव्हती आणि त्या आधीच्या ‘चम्मतग’ला तरी कुठे होती? मोबाइलवर फोन केला तर कध्धी उचलत नाही. ती एकीकडे आणि तिचा मोबाईल कुठे दुसरीकडे ठेवलेला. तिच्या लँडलाईनवर फोन करायचा म्हणजे आपल्या सहनशक्तीची परीक्षा! “

” का बरं “?

“पुटुपुटु येऊन तिच्या सासूबाईच फोन घेतात आणि साऱ्या जगाच्या चौकशा करीत राहतात. नाहीतर तेच तेच पुन्हा नव्याने सांगत बसतात. “

” वय फार वाढलं की कठीण होत जातं जगणं. नव्वदीच्या पुढे असतील ना आता त्या? “

” हो तर! पण त्यांची गंमत माहितीये ना तुला? “

” कसली गंमत? “

” महिन्यापूर्वी त्या घरातच पडल्या थोड्याशा. शालनच्या मिस्टरांनी डॉक्टरांना बोलावून कुठे हाडबीड मोडलं नाही ना याची खात्री करून घेतली. डॉक्टरांनी सांगितलं की, ‘ आता तुम्ही आजींना चालताना काठी वापरायला सांगा. तर नातवाने लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येताना छान चार पायांची काठी आणली. ती कशी वापरायची याचं आजीकडून प्रात्यक्षिक करून घेतलं. आजींनी दोन-तीन दिवस ती काठी वापरली. मग लागल्या पुन्हा पहिल्यासारखं तुरुतुरु चालायला. ते बघून नातवानं विचारलं, ‘अगं आजी, काठी कुठाय तुझी? डॉक्टरांनी चालताना काठी वापरायला सांगितलेय ना? ‘ तर त्या म्हणाल्या, “नको अरे! काठी घेऊन चाललं की म्हातारं झाल्यासारखं वाटतं. “

हाऽहाऽहा. ग्रेटच आहेत अगदी. दोन दिवसांपूर्वी मोहिनी भेटली होती. ती तिच्या नणंदेकडील वेगळीच गंमत सांगत होती. नणंदेच्या नवीन सुनेच्या माहेरचे लोक ‘हरे राम हरे कृष्ण ‘च्या पंथातले. ती सून सुद्धा कांदा-लसूण काही खात नाही. दर रविवारी सकाळपासून बाहेर. कधी मंदिरात भजन-कीर्तन तरी असतं नाहीतर कुणाकडे तरी साजुक तुपातल्या १०८ पदार्थांचा अन्नकोट! मूर्तीवर गुलाब पाकळ्यांचा अभिषेक करायचा आणि प्रसाद म्हणून सर्वांनी ते नाजूक-साजूक ड्रायफ्रूटचे पदार्थ, फळं खायची. कपाळभर गंधाचा मळवट आणि पांढऱ्या साड्या! नस्ती एकेक थेरं. साधं घरात शेंगदाणे भाजले तरी त्याचा ‘भोग’ दाखवायचा.

“मी म्हटलं ना तुला की, आपल्या साळुंक्या पुष्कळ बऱ्या. “

“पुढच्या महिन्यात आपल्याला चारूच्या मुलाच्या लग्नाला जायचंय ना, त्या आधी आपण एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन यायचं का? बघूया तरी तिथे काय काय प्रकार असतात ते!

काय होतं की, आपण घरी रंगवलेल्या केसांचा काही दिवसांनी तिरंगा झेंडा तयार होतो. केसांचा मूळ रंग, रंगवलेल्या केसांचा अर्धवट उडालेला रंग आणि मधे मधे डोकावणारे पांढरे केस. “

“चालेल- चालेल. आपली विद्या नेहमी फेशिअल करून घेते. तेही करून बघूया. “

“चल, ठेवते फोन. इतका वेळ मी फोन अडवून बसलेय म्हणून फोनकडे आणि माझ्याकडे रोखून बघत यांच्या अस्वस्थ येरझाऱ्या सुरू झाल्या आहेत. आजची पत्त्यांची बैठक कुणाकडे ठरली ते विचारायला मोबाईलवरून फोन करून ते त्यांचा बॅलन्स कमी करणार नाहीत. मागच्या रविवारी आमच्याकडे होता तो पत्त्यांचा गोंधळ. अच्छा, पाठव लवकर मसाला. “

“पाठवते. पण आपल्या गप्पांची ‘भरली वांगी ‘अगदी मसालेदार झाली नाही? “

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीर्णोद्धार… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ जीर्णोद्धार…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(मॉलमध्ये हजारात खर्च करणारे, लिंबं, भाज्या विकणाऱ्या आजीकडे दोन पाच रूपयासाठी घासाघीस करताना दिसतात. शेतमालाचे भाव वाढले की ‘महागाई वाढली’ असा गळा काढणारे नेते, भाव कमी झाले की शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार, म्हणून सरकारविरुद्ध मोर्चे काढायला मोकळे असतात.” 

 “बरं ते समदं श्यानपन सोड. त्या अडत्यानं मला काय इच्यारलं, ते म्हाईत हाय का न्हाई तुला? त्येच्याबद्दल बोल, काय करायचं ते सांग?”)

इथून पुढे – – – 

त्यावर पांडुरंग खळखळून हसत म्हणाला, “देऊन टाक की त्याला मंदिर चालवायला. बिघडलं कुठं? अरे, तुम्ही लोक शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत नाही. पण आता दक्षिणेत खाजगी मंदिर स्थापन करण्याचा एक मोठा व्यवसाय झालाय. तो अडत्या पाच लाख देतोय तर घे. बॅंकेचे हप्ते फेडून, नवीन सिंचन कर्ज घे आणि पुढची पिकं लावून टाक. तो अडत्या आणखी पाच लाख रुपये खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार करेल. मलाही थोडा बदल हवा आहे. वर्षानुवर्षे त्याच वास्तुत आम्ही घुसमटतोय. त्याचं नूतनीकरण झाल्यावर नवनवीन भक्तगण येतील. माझ्या भेटीसाठी शहरापासून विठ्ठलवाडीपर्यंत टेम्पोंच्या चकरा वाढतील. बुधवारच्या अभिषेकासाठी भक्तांची रांग लागेल. तो अडत्या ह्यातून खूप पैसा कमावेल, हे मात्र नक्की. पण तू काळजी करू नकोस. दहा वर्षानंतर, तो मंदिर सोडून जाईल किंवा पुन्हा तुझ्यासमोर नवीन वाढीव रकमेचा प्रस्ताव ठेवेल. त्यावर योग्य तो निर्णय घ्यायचा अधिकार तुलाच असणार आहे. ” एवढं सांगून पांडुरंग अंतर्धान पावला.

खरंतर, शेतकी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आणि कुशाबाच्या मनात चाललेला खेळच स्वप्नात प्रकट झाला होता. काही का असेना, त्याला मनातल्या द्विधा मनस्थितीतून बाहेर तरी येता आलं. गावात मात्र कुजबुज सुरू झाली—“कुशाबानं देऊळ इकायला काडलंय म्हनतात, खरंय का? ” एक वयस्क म्हातारा खाकरत खाकरत म्हणाला, “देऊळ म्हंजे गावाचा आत्मा हाय. असं कसं इकंल कुशाबा? ” हे ऐकून कुशाबाच्या मनात अपराधाची सल चाळवायची, पण लगेच पांडुरंगाची मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर उभी राहायची. “देऊन टाक की त्याला मंदिर चालवायला. बिघडलं कुठं? ” असं विठ्ठलाचे शब्द त्याच्या कानात घुमायचे.

थोड्याच दिवसात त्याचं आणि अडत्याचं रीतसर रजिस्टर करारपत्र झाले. पाच लाखाचा चेक घेऊन कुशाबा कुसुमच्या सोबतीने बॅंकेत लगबगीने आला. आज त्याला दरसालाप्रमाणे कर्जमुक्तीचा आनंद अनुभवायचा होता. “हा घ्या चेक. कर्ज किती हाय त्येचा हिसाब बघा अन समदं एकदाचं बार करून टाका. ”

मॅनेजर हसत हसत म्हणाले, “कुशाबा, चेष्टा करताय होय? तुमचं कर्ज तुमच्या दोन्ही मुलांनी मिळून केव्हाच भरून टाकलेलं आहे, शिवाय तुमच्या बचत खात्यात पाच लाखाच्यावर रक्कम जमा आहे. ” कुशाबाला काय बोलावं, हे समजेनासं झालं. मॅनेजरनं पुढं सांगितलं, “हे पाच लाख आणि खात्यातले पाच लाख मिळून तुमच्या नावाने तसंच कुसुमताईंच्या नावाने मुदत ठेव करायला सांगितलं आहे. दर तीन महिन्याला तुमच्या खात्यात त्याचं व्याज जमा होईल. दोन मिनिटं थांबा” असं म्हणून मॅनेजर साहेब आत जाऊन आले, त्यांच्या हातात लाल रंगाचं पाकिट होतं. त्यातला डाग काढून त्यांच्या हातात देत म्हणाले, “हा घ्या तुमचा डाग. डाग मिळाला म्हणून इकडे सही करा. ” कुसुमच्या डोळ्यांत पाणी आलं. कुशाबानं ही धोतराच्या सोग्याने हळूच डोळे पुसले.

कुशाबा भावविभोर मनस्थितीत घरी आला. कुसुम मात्र शांत राहिली आणि तिने मुलाला मोबाईल लावून कुशाबाच्या हातात दिलं. “अनंता, लेकरा. तुझा भाऊ वसंता कुठाय? ” वसंता त्याच्याकडेच बसल्याचं अनंताने सांगितलं. “माझी अडचण न सांगताच, तुमी दोघांनी बॅंकेचं कर्ज फेडलंत, आईचं डाग सोडवलंत. मुदतठेवीत पैसे ठेवायला सांगिटल्याचं बॅंक मॅनेजरनं सांगिटलं. पन मुलांनो, माजी खूप मोठी चुकी झालीया. कर्जाचे हफ्ते फेडायचं हुते म्हनून मी तुमा दोघान्ला न सांगताच आपलं देऊळ दहा वर्सासाठी राजमल सेठना चालवायला द्यायचं म्हनून अ‍ॅग्रिमेंट केलं हाय. ” 

 “आबा, तुम्ही जे काही केलं आहे, ते आपल्या कुटुंबाचं हित बघूनच केलं असेल. आम्हा दोघांना एका गोष्टीचं वाईट वाटलं. एवढं मोठं संकट आलं असताना देखील तुम्ही आम्हा दोघांनाही सांगितलं नाही. आबा, तुमच्यावर संकट आलं तर ते आमच्यावरचं संकट असते हे विसरू नका. आम्ही का वेगळे आहोत? आम्ही जे काही केलं ते आमचं कर्तव्यच आहे. यंदा दिवाळीला आम्ही सगळेच गावी येत आहोत, तेव्हा समक्ष बोलू” असं म्हणून त्याने फोन ठेवला.

बॅंकेचे संपूर्ण कर्ज फिटल्याने कुशाबाला नवीन सिंचन कर्ज सहज मंजूर झालं. परंतु जे काही झालं ते बॅंक मॅनेजरच्या नजरेतून सुटलं नाही. ते सहज म्हणाले, “कुशाबा, हे संपूर्ण कर्ज शेतीच्या उत्पन्नातून भरलं असतं तर मला खूप आनंद झाला असता. असो. कुशाबा, राग मानू नका. अहो, शेतीपुढे हवामानातील बदलांचे मोठे आव्हान असते. बाजारभावात चढउतार होत असतात. अशा स्थितीत तुम्ही बहुपीक पद्धतीकडे वळायला हवं. कारण त्यातील काही पिकांना जरी चांगला भाव मिळाला तरी इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊन जाते. बाजाराचा अभ्यास करून आंतरपीक पद्धतीच्या अवलंबावर भर द्यायला हवं. प्रत्येक पिकाच्या जमा खर्चाचा हिशेब नीट ठेऊन अनावश्‍यक खर्च टाळावा. काही फळझाडं लावावीत, गाई आणि म्हशींचे पालन करून दूध उत्पादन करावं. कुक्कुटपालन, शेळीपालन याकडेही लक्ष पुरवावं. त्यातून नियमित उत्पन्न मिळवता येते. ” कुशाबाला मॅनेजरचं म्हणणं पटलं. नव्या उत्साहाने बाहेर पडला.

थोड्याच दिवसात कुशाबाच्या वावरातल्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराचा विलक्षण कायापालट झाला. विठ्ठलवाडीत भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती. मंदिराच्या मागेच असलेलं कुशाबाचं शिवारही हिरवंकंच होऊन त्यात वेगवेगळी पिकं आणि फळझाडं जोमानं डोलत होती.

एका संध्याकाळी कुशाबा बांधावर उभं राहून झुळुझुळु वाहत असलेल्या पाण्याकडे पाहत होता, त्यात अस्ताला चाललेल्या सूर्याच्या किरणांचं प्रतिबिंब पडलं होतं. कुशाबाने नकळत हात जोडले आणि पुटपुटला—“अगा पांडुरंगा मायबापा! हे सगळं तुझ्यामुळेच घडून आलंय. मी खचलेलो असताना तूच मला उचलून घेतलंस. आता एकवार आम्हा दोघान्ला पंढरीला बोलवून घे, मला तुझ्या लोण्यासारख्या मऊशार पायाची लई ओढ लागून राह्यली हाय. ” आणि कुशाबा कृतार्थ मनाने घराकडची वाट चालू लागला.

समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares