☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – २ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
(‘‘सगळे मान्यवर स्थानापन्न झाले… (हे शब्द कसे माहिती गण्याला? … पुन्हा कुजबूज) पण गण्या जणू आता तलवार परजून उभा होता… बुवाच भांबावून, अवाक् होऊन थोडे मागे सरकले होते.)
इथून पुढे – –
‘‘आणि तो क्षण आला बरं का मंडळी… त्या नववधूने रंगमंचावर पाऊल टाकले… नुकतीच ब्युटी पार्लर मधून मेकअप करून आलेली… (गण्याच्या मित्रांनी कपाळावर हात मारला. पण गण्याच्या डोळ्यासमोर फक्त ती सुंदर वधू होती आणि वाचेवर शब्दांचे उधाण)… आणि दागदागिन्यांनी नशखिशांत मढलेली ती वधू… तुम्हाला सांगतो… अगदी नक्षत्रासारखी सुंदर दिसत होती… सगळे उपस्थित डोळे विस्फारून तिच्याकडेच बघत राहिले होते. राजपुत्र राजेसाहेबांच्या शेजारीच उभे होते… जागेवरच खिळल्यासारखे. राजांची मात्र थोडी पंचाईत झाल्यासारखी वाटत होती… मनमोकळं बघूही शकत नव्हते ना ते…”
‘‘अहो गणोजी… हे किर्तन चालू आहे.. विसरताय का तुम्ही? ”… बुवांनी गणूला कोपराने ढोसलं… पण आता गण्याला भानावर आणणं कुणाच्या बापालाही जमणार नव्हतं.
– – अखेर बुवांनी जयघोष सुरू केला… ‘जय जय रामकृष्ण हरी’… आणि गणूने त्यांच्याकडे रागाने पाहिलं खरं…. पण स्वत:च्या उफाळणाऱ्या मनाला कसंतरी आवरलं आणि त्या मुलीचं वर्णन आवरतं घेऊन एकदाचं ते लग्न लावून टाकलं, आणि आपणहूनच म्हणायला लागला… ‘जय जय राम कृष्ण हरी’…
… आणि मग त्याने बुवांना खूण केली… ‘‘आता बोला तुम्ही. ”… पण आता ही कथा पुढे कशी न्यायची ते बुवांना कळत नव्हतं. गण्या सलग बोलत होता… मध्ये ना अभंग… ना श्लोक…
हे असे “अत्याधुनिक“ कीर्तन सुरू होऊन जेमतेम पाऊण तास झाला होता… त्यांना दीड तासाच्या कीर्तनाचे पैसे मिळाले होते… आता काय करायचं? .. गण्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचा प्रॉब्लेम हुशार गण्याच्या लगेच लक्षात आला. ‘‘तुम्ही थांबा… मीच सांगतो…” त्याने बुवांना खूण केली… आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’… स्वत:च्या भसाड्या आवाजात म्हणायला सुरुवात केली.. श्रोत्यांची चुळबूळ चांगलीच वाढलेली त्याच्या लक्षात आली…
‘‘तर मंडळी, आता त्या लग्न सोहळ्यातून बाहेर या आणि पुढची कथा ऐका… ‘जय जय रामकृष्ण हरी’… आता फक्त पेटीवर वाजलं…
‘‘तर अशा रीतीने राज्याला पुन्हा सुस्वरुप तरुण अशी राणी मिळाली… राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसली. आता राजपुत्रानेही कारभारात लक्ष घालावे… निर्णय घ्यायला शिकावेत असा राजेसाहेब त्यांना आग्रह करायला लागले होते. खुशालचेंडू असला तरी राजपुत्र चांगलाच हुशार होता… त्याहीपेक्षा धूर्त होता. ‘राजेसाहेबांची नवी तरुण राणी ही माझ्या दृष्टीने फक्त राज्याची राणी आहे… ती माझी आई होऊच शकत नाही…मुळात मी तसं कधीच समजणार नाही’.. ही खूणगाठ तिला पहिल्यांदा पाहताक्षणीच त्याच्या मनात आपोआपच बांधली गेली होती. आणि नव्या राणीसाहेबांची मनोभूमिकाही याहून फार काही वेगळी नव्हती… ‘‘
.. गण्यामधला सुप्तावस्थेतला कथाकार जसजसा जागा होत होता तसतशी राजेंद्रबुवांची अस्वस्थता वाढत चालली होती. खरंतर गण्याच्या गोष्टीत पुढे काय होणार याची त्यांनाही खूप उत्सुकता होती, पण ते ती दाखवू शकत नव्हते… आणि श्रोते? ते तर विसरूनच गेले होते की ते कीर्तनाला आले होते. आता सगळा माहोल केवळ कथाकथनाचा होता… ‘तर मंडळी’ हा शब्दही अनावश्यक वाटायला लागला होता..
‘‘ तर आता राज्याची घडी पुन्हा व्यवस्थित बसली होती. नव्या राणीसरकारही मान-सन्मानाला चांगल्याच चटावल्या.. म्हणजे सरावल्या होत्या हो… भरजरी पैठण्या…शालू-शेले, पेलवणार नाहीत इतके दाग-दागिने या गोष्टींना तर फार झटकन् आपलंसं केलं होतं त्यांनी… मात्र राजपुत्र समोर आले की त्या का इतक्या गडबडून जातात, स्वत:ला विसरल्यासारख्या भांबावून का जातात हे काही त्यांना कळत नव्हतं, आणि बहुतेक राजपुत्रालाही…” गण्या क्षणभर थांबला.. स्वत:च भारावल्यासारखा… पण लगेच सावरला… आणि सांगायला लागला…
‘‘काळ स्थितप्रज्ञासारखा त्याच्या गतीने पुढे चालला होता…” (पण हा आपला पूर्वीचाच गण्या आहे का या विचाराने त्याची मित्रमंडळी मात्र वेगाने अस्वस्थ होत होती)… क्षणभर थांबून गण्या पुन्हा बोलायला लागला… “ सगळं काही पूर्ववत् सुरू झालं होतं. राणीसाहेब गेल्याचं दु:खही मावळलं होतं. राजांच्या बरोबरीने राजपुत्र कारभारात लक्ष घालत होते… नव्हे आता तरबेज व्हायला लागले होते… आणि… आणि…” गण्या बोलायचा थांबला… ‘‘काय सांगू श्रोतेहो…(इथे गण्याने चेहेऱ्यावर त्याला अतीव दु:ख झाल्याचा मस्त अभिनय केला).. आणि अचानक एक दिवस राज्य पुन्हा एकदा दु:खाच्या गर्तेत कोसळलं … फक्त कोसळलं नाही…जोरात आपटलं…अचानक राजेसाहेबांचं निधन झालं… संपूर्ण राज्य हादरून गेलं… राज्याला सुतकी कळा आली… (आणि एकीकडे गण्याचं शब्दभांडार मात्र बहरत होतं… राज्यावर कोसळलेला दु:खाचा पहाड त्याने आपल्या ओघवत्या वाणीने उत्तमपणे जणू चित्रित केला.) राजेसाहेबांचा असा अचानक मृत्यू कसा झाला हा प्रश्न काही सुटत नव्हता… अनेक प्रकारे तपासून पहाणं कितीतरी दिवस चालू होतं. जनतेच्या विचारातून मात्र हा प्रश्न एव्हाना हळूहळू पुसला गेला होता. जनजीवन पुन्हा बरंच सुरळीत सुरू झालं. जगरहाटीनुसार राजपुत्राचा राज्याभिषेक केला गेला गेला, आणि जनतेला नवा राजा मिळाला….
… तर मंडळी, असेच काही महिने गेले आणि नव्या राजाच्या विवाहाची चर्चा सुरू झाली… वाढली… आणि अनपेक्षितपणे एक दिवस त्यांच्या विवाहाचा मुहूर्त घोषित केला गेला… सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलं होतं… संपूर्ण राज्यच सजवलं गेलं होतं…. युवराज्ञी कोण हे जरी तोपर्यंत गुलदस्त्यातच होतं तरी तिच्या स्वागताची तयारी मात्र जोरदार सुरू होती… दरम्यान राजांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे निदान जाहीर केले गेले होते, पण ते अगदी अनपेक्षित म्हणावं इतक्या झटकन् पडद्याआडही गेले होते…” गणू नकळत क्षणभर थांबला… आणि पुन्हा बोलायला लागला… ‘‘आणि अखेर ती विवाह घटिका समीप येऊन ठेपली. ”… गण्याची भाषा एव्हाना फारच ओघवती झाली होती…
.. ‘‘आणि काय सांगू श्रोते हो… युवराज्ञी मंचावर दाखल झाल्या… कमालीच्या सुंदर… राजघराण्याच्या एका वेगळ्याच तेजाचं वलय त्यांच्याभोवती स्पष्ट जाणवत होतं… एक एक पाऊल हळुवारपणे टाकत त्या पुढे आल्या… राजपुत्रासमोर उभ्या राहिल्या… राजपुत्र भान हरपून त्यांच्याकडे बघत राहिले होते…” (आणि इकडे स्वतःच्या लग्नासाठी कमालीचा आतुर झालेला गण्या मात्र फारच भावविवश झाल्याचं त्याच्या मित्रांनी अचूक हेरलं होतं).. “ आणि.. आणि… बाकी सगळे उपस्थित…काय सांगू तुम्हाला.. अहो कधी चक्कर येतेय याची वाट पहात असल्यासारखे… प्रचंड संभ्रमित… स्वत:लाच चिमटा काढून बघत होते… आ वासून एकमेकांकडे बघत होते… ‘या आहेत युवराज्ञी…? या?? … काहीच महिन्यांपूर्वी महाराणी म्हणून स्वागत केलं होतं ना आपण यांचं? … आणि आता…” आता मात्र गण्या अतिशय भांबावून गेल्याचं बुवांच्या नेमकंच लक्षात आलं होतं…
‘.. जय जय राम कृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी…’.. बुवांनी कसंबसं स्वत:ला सावरून जयघोष सुरू केला होता… तोल जाऊन पडता पडता गण्यानेही स्वत:ला सावरलं होतं… ‘ही गोष्ट मला माहिती होती? खरंच की…’ तो भंजाळून गेला होता. ‘
‘आता गण्याच्या या स्वप्नरंजनात पुढे आणखी सांगण्यासारखं काय असणार आहे? ’ या सूज्ञ विचाराने सगळे जाणते श्रोतेही एकएक करत जायला निघाले होते…
… आणि बुवांसमोर दक्षिणेसाठी ठेवलेल्या तबकावर मात्र आज नाणी टाकल्याचा ‘खण खण’ आवाज येत नव्हता.. बुवा डोळे फाडून बघायला लागले तर काय.. चक्क नोटा फडफडत होत्या त्या तबकात… अजिबात आवाज न करता..
बुवा गजर थांबवत मागे वळले. खूश होऊन मुरलीधरापुढे हात जोडायला… पण त्याच्या गाभाऱ्याचे दार मात्र घट्ट बंद झाले होते… बहुतेक आतून…
☆ जय जय राम कृष्ण हरी… भाग – १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
दुपार कलत आली तशी त्या गावच्या जत्रेसाठी जमलेली गर्दी पांगायला लागली… ‘किसनपूर’ म्हणजे कृष्णपूर हे त्या पंचक्रोशीतलं त्यातल्या त्यात मोठं गाव. या गावात मुरलीधराचं एक बरंच जुनं आणि मोठं देऊळ होतं. दरवर्षी तिथे गोकुळ अष्टमीचा उत्सव दणक्यात साजरा केला जायचा. आणि त्यावेळी भरणाऱ्या जत्रेसाठी आजूबाजूच्या गावातले लोक आवर्जून यायचे. खूप गर्दी जमायची… जी दरवर्षी वाढतच होती. त्या देवळात संध्याकाळी कीर्तन होणे हा उत्सवाचा अविभाज्य भाग झाला होता. नारायणबुवा नावाचे एक प्रतिष्ठित कीर्तनकार जणू यासाठीच बऱ्याच वर्षांपासून नेमलेलेच होते. गावात जागोजागी तसे बोर्डही टांगले जायचे.
यावर्षीही सगळं काही रीतीनुसार सुरु होतं. गर्दी कमी झाल्यावर आत्ता कुठे लोकांचं त्या कीर्तनाच्या बोर्डाकडे लक्ष जायला लागलं…आणि लोक आश्चर्यचकित होऊ लागले. यंदा नारायणबुवांच्या जागी हे कुठलं नाव आहे… ‘राजेंद्रबुवा? ’.. आणि शेजारी एका तरण्याबांड कीर्तनकाराचा फोटो? कधी नव्हे ते कीर्तन ऐकण्याची उत्सुकता वाढल्याचं जाणवायला लागलं होतं.
देवळाच्या प्रशस्त सभामंडपाकडे आता श्रोत्यांची पावलं वळू लागली. चक्क गर्दी जाणवायला लागली. हमखास येणारी वृध्द माणसं तर होतीच, पण यंदा चक्क काही तरुण मंडळी कीर्तन ऐकायला (की राजेंद्रबुवांना बघायला?) तिथे आली होती.
ठरल्यावेळी साथीदार आले आणि राजेंद्रबुवा कीर्तनकाराच्या टिपिकल वेषात तिथे दाखल झाले… ‘‘आयला हा बुबा टी शर्ट-जीन्स मध्ये काय फाकडू दिसेल राव ”… गण्या न राहवून बोललाच, पण मित्राने चिमटा काढला आणि गण्या गप्प बसला.
‘‘जय जय राम कृष्ण हरी…” गाभाऱ्यातल्या मुरलीधराला आणि श्रोत्यांना नमस्कार करुन बुवांनी जयघोष सुरु केला… ठेका सुरू झाला… पुढच्या रांगेतली मुंडासी डोलायला लागली… पण १० मिनिटे झाली तरी बुवांचा जयघोष काही थांबेनाच… गण्या आणि कंपनी वैतागली आणि त्यांनी बुवांना खूण केली. बुवाही नाही म्हटलं तरी घाबरलेलेच होते… ‘कीर्तन शिकलो खरा आजोबांच्या हट्टापायी… पण आता एवढ्या लोकांसमोर…’ चतुर गण्याने त्यांची अवस्था नेमकी टिपली आणि ‘हं… करा सुरू…’ असं खुणेनेच सांगितलं… त्यांना त्यांच्या गुरुने परवानगी दिल्याच्या आविर्भावात..
‘‘तर मंडळी आज मी तुम्हाला एक वेगळीच कथा सांगणार आहे… ऐका हं… एक आटपाट नगर होतं…”..
.. ‘आता यात काय वेगळं आहे? ’ गण्याचा चेहेराच बोलला.
‘‘एव्हाना त्या नगराचं एक राज्य झालं होतं…” राजेंद्रबुवाही गण्याच्याच वयाचे… ‘‘त्या राज्याचा राजा ‘आदर्श’ म्हणावा असाच… प्रजेसाठी जणू देवच. राणी सरकारही तशाच… प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या… कनवाळू उदार… त्यांना एक मुलगा होता… देखणा… उमदा… पण खुशालचेंडू म्हणावा असा… ‘जय जय रामकृष्ण हरी’ …” पुन्हा २ मिनिटं जयघोष…
‘‘मग पुढे…? ” गण्याला काही गप्प बसवत नव्हतं.
‘‘तर मंडळी असं सगळं उत्तम चाललेलं होतं ते राज्य… दिवसागणिक लौकिक वाढत होता. आणि अचानक एक दिवस… ” बुवांच्या चेहेऱ्यावरचे हावभाव बदलले… अभिनय हा त्यांच्या पेशाचा एक अविभाज्य भाग होता ना… ‘‘मंडळी आणि अचानक एक दिवस अतिशय दु:खद बातमी हा हा म्हणता राज्यभर पसरली… राणीसाहेबांचे आकस्मिक देहावसान झाल्याची बातमी… आणि संपूर्ण राज्यावर दु:खाचा जणू डोंगरच कोसळला… ‘जय जय रामकृष्ण हरी’ ”
…. ‘हां इथे हे ठीक आहे’… गण्याने मान हलवली. श्रोतेही जरासे हळहळले…. ‘ पण आता पुढे बोला की बुवा…’.. गण्याने बुवांना खुणावलं. बुवांनाही एव्हाना सावरायला वेळ मिळाला होता…
‘‘त्यावेळी सगळ्यांवर काय परिस्थिती ओढवली होती ते काय सांगावं महाराजा … सगळं राज्य जणू आईविना पोरकं झालं होतं”… या वाक्याने मात्र गण्या जरा दुखावला होता… गप्प बसला… ‘‘ अहो राजेसाहेब विमनस्क अवस्थेत तास न् तास शून्यात बघत बसत होते. पण असं किती दिवस चालणार हो… राज्यकारभाराचा गाडा चालू ठेवायलाच हवा हे त्यांनाही कळत होतं. त्यांनी स्वत:ला कसंबसं सावरलं. राजपुत्रही एव्हाना सावरले होते. हळूहळू सगळं काही पूर्ववत झालं… ‘जय जय रामकृष्ण हरी’…” पुन्हा ठेका धरला गेला. बुवा नव्या कोऱ्या उपरण्याने घाम पुसत होते… गण्या उठण्याच्या बेतात होता… बुवांनी त्याला खुणेनेच बसायला सांगितलं आणि पुन्हा कथा सांगायला सुरूवात केली… ‘‘अहो काळ काही थांबतो का कुणासाठी? सांगा बरं…” बऱ्याच माना हलल्या… ‘‘आता राज्याला साम्राज्ञी हवीच, म्हणून राजेसाहेबांनी इतरांच्या आग्रहाखातर पुनर्विवाह करायला संमती दर्शविली… आणि वधू-संशोधन सुरू झाले…”.. ’पुन्हा जय जय राम कृष्ण हरी…’
पुढची कथा बुवांना आठवत नाहीये हे चाणाक्ष गण्याच्या लक्षात आलं… तो घाईने उठून बुवांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला… ‘‘तुम्ही दमलेले दिसता बुवा… साहजिकच आहे म्हणा… इतका वेळ सारखं बोलल्यावर दम लागणारच हो. मी तुम्हाला मदत करू का? म्हणजे कथा मी सांगतो, तुम्ही मधून मधून ‘राम कृष्ण हरी’ म्हणा…” आणि बुवांनी काही बोलायच्या आत गण्या बोलायला लागला…..
‘‘तर मंडळी आता तुम्हीच सांगा… आता राजेसाहेब वयाने इतके मोठे… म्हणजे राजपुत्र खरं तर लग्नाच्या वयाचा… मग त्यांच्या वयाला साजेशी बायको कशी मिळणार नाही का त्यांना? … म्हणजे तो काळ खूप वेगळा होता ना हो? म्हणून मग त्यांच्या आप्तांनी आणि मंत्रीमंडळानेही पुढाकार घेतला. राजघराण्यातली त्या वयाची वधू मिळणं शक्यच नव्हतं आणि एखादी तरुण राजकुमारी या म्हाताऱ्याशी…” गण्याने जीभ चावली… ‘‘अशा इतक्या वयस्कर राजेसाहेबांशी लग्न करायला कशी तयार होणार ना? आणि मी म्हणतो का म्हणून तयार व्हावं तिने? ” … बुवांनी गण्याला चिमटा काढला आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’.. मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. गण्याने स्वत:चा आवेग कसाबसा थोपवला आणि तो पुढे बोलायला लागला…
‘‘मग जवळच्याच गावातल्या एका गरीब माणसाची मुलगी सापडली. चांगली तरतरीत, नाकी डोळी नीटस होती, आणि हो, थोडीफार शिकलेलीही होती. नीट टापटीप रहाण्याची आवड उपजतच असावी हे लक्षात येत होतं. आणि बोलायलाही चटपटीत होती. भेटायला आलेल्या बड्या लोकांशी न घाबरता डोळ्याला डोळे भिडवून बोलत होती. अखेर वडलांना कर्जातून मुक्त करायचं या कर्तव्यभावनेने नाईलाजानेच लग्नाला होकार दिला त्या बिचारीने ”… गण्याचा घाम पुसून होईपर्यंत बुवा ‘रामकृष्ण हरी’ म्हणत राहिले. ‘आता पुढे मी सांगतो’, ते गण्याला म्हणाले, पण गण्यामधे उफाळून आलेला कथाकार काही थांबायला तयार नव्हता…
‘‘तर मंडळी, अशा तऱ्हेने राजेसाहेबांसाठी दुसरी वधू मिळाली. लग्नाचा दिवस ठरला… भव्य शामियाना… सुंदर सजावट… मोठा रंगमंच…” (‘रंगमंच? ’… श्रोत्यांमध्ये कुजबूज झाली…) पण गण्या थांबला नाही… ‘‘सगळे मान्यवर स्थानापन्न झाले… (हे शब्द कसे माहिती गण्याला? … पुन्हा कुजबूज) पण गण्या जणू आता तलवार परजून उभा होता… बुवाच भांबावून, अवाक् होऊन थोडे मागे सरकले होते.
☆ नवीन अध्याय… (अनुवादित कथा) – मूळ हिन्दी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆
उज्जैनची कडाक्याची थंडी आणि महाकालेश्वर महादेवांच्या शहरातून वाहणारी थंड हवा अजूनही रूपाच्या मनात एक विचित्र भावना निर्माण करत असते.
रूपा ही एक अतिशय शांत आणि सुसंस्कृत मुलगी होती जिचे लग्न उज्जैनमधील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाले होते. रूपाचा नवरा, केशव, या शहरातील एक मोठा धान्य व्यापारी होता. तो स्वभावाने थोडा कडक होता आणि शिस्त हाच घर चालवण्याचा एकमेव मार्ग आहे असे त्याला वाटत होते. त्याच्यासाठी, फक्त व्यवसायातील नफा महत्वाचा होता व त्याच्या ठायी भावनांची किंमत शुन्य होती.
रूपाची दिनचर्या पहाटे चार वाजता सुरू व्हायची. ती उठायची, क्षिप्रा नदीवरून वहाणाऱ्या थंड बर्फाळ वाऱ्यात आंघोळ करायची आणि नंतर ती मंदिर स्वच्छ करायला लागायची. थंडीमुळे तिचे हात सुन्न पडायचे, पण तिने कधीही तक्रार केली नाही.
केशवची आत्याही त्यांच्याच घरात राहत होती. तिचा स्वभाव फारच कडक होता आणि ती प्रत्येक वाक्यावर तिच्यावर डाफरत असे. रूपा तिचे प्रत्येक शब्दबाण मान खाली घालून झेलत असे आणि तरीही तिची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडत नसे.
त्या डिसेंबरमध्ये धुके इतके दाट होते की अंगणातले तुळशीचे रोपही अस्पष्ट दिसत होते. रूपाला तिच्या आईवडिलांच्या घराची सतत आठवण येत असे, जिथे तिची आई तिला गरम दूध देऊन उठवत असे. इथे तिला सर्वांची काळजी घ्यावी लागत असे.
केशव बऱ्याचदा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जात असायचा. रूपाला घरी अगदी एकटे पडल्यासारखे वाटायचे. आत्यांचे कठोर शब्द आणि केशवची उदासीनता यामुळे तिची अवस्था वाऱ्याच्या झोताबरोबर उडणाऱ्या वाळलेल्या पानासारखी झाली होती.
एकदा त्यांच्या घरी एका उत्सवाची तयारी सुरू होती. रूपा सकाळपासूनच स्वयंपाकघरात स्वयंपाकाला लागली होती. तूप आणि मसाल्यांचा सुगंध घरात दरवळत होता. मग, आत्यांनी एका क्षुल्लक गोष्टीवरून रूपाला सर्वांसमोर खूपच फटकारले.
रूपाचे डोळे अश्रूंनी भरून आले, पण ती काहीच बोलली नाही. शांतपणे, तिने तिच्या साडीच्या पदराने डोळे पुसले आणि परत कामाला लागली. पण त्या दिवशी, तिचं हृदय खुपच दुखावलं गेलं होतं. तिला याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं की तिचे अस्तित्व फक्त इतरांची सेवा करण्यापुरतंच मर्यादित आहे का?
त्या संध्याकाळी केशव परत आला तेव्हा त्याला दिसले की रूपाची तब्येत बरी दिसत नाहीये. पण तिच्या प्रकृतीबद्दल विचारण्याऐवजी त्याने फक्त एवढेच म्हटले की उद्या उत्सवासाठी पाहुणे येणार आहेत आणि सर्व तयारी वेळेपूर्वीच झाली पाहिजे. रूपाने फक्त मान हलवली आणि गप्प राहिली.
रात्री, जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपी गेलेले होते, तेव्हा रूपा छतावर एकटी उभी होती. आकाशात धुके पसरले होते आणि थंड वारा तिच्या चेहऱ्याला बोचत होता. तिला राहून राहून असं वाटत होतं की ती तिचे संपूर्ण आयुष्य असेच मुक्या बाहुलीसारखे घालवेल का?
मग तिने मनात एक संकल्प केला. तिला असं जाणवलं की आदर, प्रेम हे मागून मिळणार नाही, ते मिळवावे लागेल. तिला तिचे मौन सोडावे लागेल, पण सन्मानाने, कुणाचं मन न दुखावता.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाहुणे आले तेव्हा रूपाने तिच्या साधेपणाने, सेवाभाव आणि बुद्धिमत्तेने सर्वांची मनं जिंकली. तिने सहजतेने तिची शालीनता आणि व्यवहारकौशल्य दाखवले. तिने पाहुण्यांकडून कौतुकाची थाप मिळवली. आत्या आणि केशव त्यांच्या ठायी असलेल्या या मुक्या बाहुलीकडे पहातच राहिले. त्यांना पहिल्यांदाच जाणवले की रूपा ही फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही तर तिचं स्वतःचंही काही अस्तित्व आहे.
जेव्हा आत्याने तिला पुन्हा टोमणे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा रूपाने मोठ्या प्रेमाने आणि आदराने त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. ती म्हणाली, “आत्या, मोठ्यांचे आशीर्वाद तेव्हाच फळ देतात जेव्हा लहानांचा आदर केला जातो. “
संपूर्ण घर स्तब्ध झाले. केशवलाही त्याच्या पत्नीचे एक नवीन रूप दिसले. संपुर्ण घर एकहाती सांभाळत असलेल्या रत्नाच्या अस्तित्वाची त्याला जाणीव झाली. त्या रात्री पहिल्यांदाच केशव रूपासोबत बसला आणि शांतपणे तिचं मनातलं ऐकून घेतलं.
थंडी अजूनही तशीच होती, पण आता रूपाची खोली उबदारपणाने भरलेली होती, हिटरने नाही तर प्रेम आणि आदराच्या उबदारपणाने. आत्यांचा स्वर आता हळूहळू मवाळ होत गेला. तिच्या संयमाने, रूपाने त्या जुन्या घराचे वातावरण बदलून टाकले होते.
आता, जेव्हा जेव्हा रूपा क्षिप्रा नदीच्या काठावर जायची तेव्हा तिला वाऱ्याच्या झुळूकीत संगीत ऐकू येत असे. तिला कळले होते की धुके कितीही दाट असले तरी, सूर्यप्रकाशाचा एक किरण त्याला छेद देण्यासाठी पुरेसा असतो. तो किरण तिचा स्वतःचा आंतरिक आत्मविश्वास होता.
संवादाच्या अभावामुळे अनेकदा नातेसंबंधात कटुता येते. रूपाने ती पोकळी तिच्या गोडव्याने भरून काढली. केशव आता रुपाच्या स्वप्नांमध्ये आणि त्याच्या व्यवसायात अधिक रस घेऊ लागला. त्याने तिला कुटुंबाच्या व्यवसायाच्या कामामध्येही समावून घेतले.
उज्जैनचे रस्ते आता रूपाला परके वाटत नव्हते. तिला असे वाटले की तिने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा जुना भव्य वाडा आता तिला तुरुंगासारखा वाटत नाही, तर आपल्या स्वतःच्या घरासारखा वाटत होता. धुके दूर झाले होते आणि सूर्यप्रकाश आणखी सोनेरी वाटत होता.
आजही, थंडी पडली की रूपा तिच्या सासू आणि आत्यांसाठी आल्याचा चहा बनवते. पण आता तिच्यात मनात भीतीची नाही, तर जवळीकतेची भावना आहे. त्याग आणि संघर्षातून तिने तिचे स्थान मिळवले आहे.
शेवटी, रूपाला जाणवले की प्रत्येक माणसामध्ये एक शक्ती असते; फक्त ती ओळखण्याची गरज आहे. तिने तिचा खरा स्वाभिमान शोधला व आपला सन्मान राखला, हा तिचा सर्वात मोठा विजय होता आणि तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आता सुरु झाला होता.
मूळ हिंदी कथालेखक : अज्ञात
मराठी अनुवाद : मेघःशाम सोनवणे
नाशिक.
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“भरली, भरली, भरली मंगलघटिका भरली “… तशी लग्न मंडपातील धावपळ वाढली. घोड्यावरून नवरदेव आला. त्याच्या स्वागताला वधुकडील मंडळी मंडपाच्या दाराशी मंगल कलश, पुजेचं ताट घेऊन उभी होती. आगत स्वागत झालं.
” वधूला आणा ” माझे काका म्हणाले, तसे मामांनी मला उचलून मंडपात आणले.
नवरदेवासह मला फुलांच्या राशिवर चालवत स्टेजवर आणले, डी जे वर गाणे वाजत होते ” बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है “
गुरूजींनी दोन्ही हात वर नेले टाळी वाजवून वाजंत्रीला इशारा देण्यासाठी. अक्षतांची बरसात आमच्यावर होऊ लागली. आंतरपाट दूर झाला व मी वरमाला घालणार तोच अशोकला त्याच्या मित्रांनी वर उचलले. मी बावरले, आता कशी घालणार वरमाला. तोच माझा भाऊ व त्यांच्या मित्रांनी मलाही वर उचलले. मी आणखीनच गडबडले. मी वरमाला घालण्यासाठी वाकले, तोच अशोकच्या मित्रांनी त्याला मागे खेचले. या गडबड, गोंधळ, हसी मजाकमध्ये एकदाची मी अशोकच्या गळ्यात वरमाला घातली.
आम्हांला खाली उतरविले तसा मी निःश्वास सोडला. शालूचा पदर व शाल सावरत रूमालाने मी घर्मबिंदू टिपले. नजरेच्या कडेतून अशोक मला न्याहाळत होते, तशी नकळत मी ही लाजले. आरक्त गाल आणखी लाल झाले.
सप्तपदी, कन्यादान सगळे विधी पार पडले. जेवणावळी उठल्या. व प्रत्येक वधूला हळवा करणारा विदाईचा क्षणही आला. फुलांनी सजवलेली कार तयारच होती. आई बाबा, काका काकी, मामा मावशी माझ्या मैत्रिणी सगळ्यांचा निरोप घेऊन साश्रू नयनांनी मी लग्नमंडप ओलांडून बाहेर आले.
कारजवळ भाऊ उभा आपले दोन्ही हात पसरवून, मी रडतच त्याच्या कुशीत शिरले. डोळ्यातील पाणी थांबवत भाऊने कारचा दरवाजा उघडला मला विदाई देण्यासाठी. ” ताई, तुला काय भेट देऊ मी. ” ” अरे हा एवढा मोठा आनंद दिलास तू. मला लग्नाच्या बोहल्यावर चढवलंस. आणखी काय हवं आणि हे केवळ तुझ्यामुळे तर शक्य झालं, विद्येचं दान तू मला भरभरुन दिलंस “
मी सासरी निघाले, हळूहळू निरोप देणारे हात मागे पडले अन मी भूतकाळात शिरले.
“सोनाली, ए पोरी प्रकाशचा डबा भरलास काय? त्याची तयारी कर, आटप लवकर आणि शाळेला सोडून ये त्याला. सोनालीची आई रखमा बोलत होती.
” हो मी केलीय त्याची तयारी, नेते त्याला शाळेत “
“अन हे बघ, शाळेतून लवकर घरी ये, इकडे तिकडे भरकटू नकोस, घरातलं सगळं आवर आणि शेवंता आजीने बोलावलंय, त्यांची मोलकरीण चार दिवस रजेवर आहे, त्यांची कामं करशील, चार पैसे मिळतील तर घरखर्चाला कामा येतील. चल मी निघते कामावर “
प्रकाशचा हात धरून आम्ही दोघी भावंडं शाळेकडे चालू लागलो.
प्रकाशला सोडलं आणि माझी पावलं तिथंच थबकली. प्रार्थना सुरु होती
” खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ” नकळत माझेही मन गुंतले. प्रार्थना संपवून मुले वर्गात केव्हा गेली मला कळलेही नाही. वर्गात गणिताचा तास सुरु झाला. आणि माझेही कुतूहल वाढले. मी वर्गाच्या खिडकीशी लपून तर मध्येच डोकावून गुरूजींनी शिकवलेले, ऐकत होते, पाहात होते.
” काय गं, सोनाली शेवंता आजीकडे इतक्या उशीरा का कामाला गेलीस? कोठे होतीस तू? “
” काही नाही आई, घरातलं काम आवरलं नी गेली की त्यांच्याकडे “
” खोटं नको बोलूस? उद्या वेळेवर जा त्यांच्याकडे ” ” हो आई, जाईन मी वेळेवर “
प्रकाशला शाळेत सोडले, पण आजही माझा पाय तेथून निघत नव्हता. आज इतिहासाचा तासात पानिपतचे तिसरे युध्द शिकवले जात होते, मराठा साम्राज्य व अहमदशाह अब्दालीचे अफगाण सैन्यात हे युध्द झाले. या युद्धात मराठ्यांचा दारूण पराभव झाला व अहमदशाह अब्दाली विजयी झाला. पण त्याला फारसा लाभ झाला नाही व नरसंहारात त्याचेही सैन्य बरेच मारले गेले.
संध्याकाळी आई घरी परतली ती संतापातच. ” कार्टे कुठे भटकत असतेस ग. आज शेवंता आजीकडे गेलीच नाहीस म्हणत फाडकन माझ्या मुस्कटात मारली. मी कळवळले. प्रकाश माझा भाऊ मध्ये आला, नको आई, ताईला मारु नकोस, ताई माझ्यासाठी शाळेच्या आवारातच होती. ” ” आवारात होती, तिथे काय करत होती ही ” ” आई, ताई माझ्या वर्गाच्या खिडकीतून अभ्यासाकडे लक्ष देत होती. तिलाही शिकायचंय आई, तिलाही येऊ दे ना शाळेत ” ” हिला शाळा शिकवू? मग घरातल्या भाकरी कोण भाजणार? तू? का मी काम सोडून घरी बसू. मी घरी बसली तर तुम्ही खाणार काय? हवा कि पाणी? हवा खाऊन, पाणी पिऊन जगता आलं असतं ना तर काहीच कमवायची गरज नसती पडली रे. पण खायला तर कमीत कमी दोन टाईम तर लागतंच. महागाई या प्रकारची, एकट्या तुझ्या बापाच्या कमाईत काय भागतं.? पुढे हिचं लगीन पण करावं लागील ना, कोठून आणायचा एवढा पैसा? आता शिक्षण, पुढे लगीन. बस झाली तुझी बडबड. तुला शिकवतोय आम्ही हेच भाग्य समज. जास्त शहाणपणा करू नकोस. ‘ प्रकाश गप्प झाला.
रात्री झोपतांना माझा दुर्मुखलेला चेहरा पाहून प्रकाश म्हणाला, तू काळजी करू नकोस ताई, रोज शाळेत काय शिकवलं ते मी तुला शिकवत जाईन. दुपारी माझी शाळा सुटली कि मी तुला शिकवत जाईन. आई बाबा दुपारी कामावर गेलेले असतात. मी तुला घरकामातही मदत करीत जाईन. ‘ ” पण प्रकाश मला परीक्षा कशी देता येईल, माझा जर शाळा प्रवेशचं झाला नाही तर ” ” ताई परीक्षा नाही देता येणार, पण मी घरी आल्यावर प्रश्नपत्रिका सोडवत जा ना. म्हणजे तुला प्रश्नांचे स्वरूप कळत जाईल, परीक्षा, गुणांकन, निकाल या गोष्टी तुझ्यासाठी नाही घडल्यात तरी तुझं ज्ञान तर वाढेल.
मी अठराव्या वर्षात पदार्पण केलं तशी आई बाबांना माझ्या लग्नाची चिंता सतावू लागली. स्थळ पाहणी सुरु होती, , रुप रंग जरी असलं तरी माझ्याकडे शिक्षण नव्हतं. मध्यंतरीच्या स्त्री भ्रूण हत्येमुळे सगळ्याच समाजातील मुलींची संख्या घटली होती, त्यामुळे मुलींच्या बाबतीत हुंडा, मान पान, रूप रंग या बाबी गौण ठरू लागल्या. फक्त मुलगी द्या, खर्च आम्ही करू म्हणणारी मंडळींचे प्रमाण वाढले होते.
अशोक चे स्थळ माझ्यासाठी सांगून आले. पण माझ्याकडे रूप रंग असले तरी शिक्षण नव्हते. अशोक शिक्षित व आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर होता. मुलगी फार शिकलेली नसली तरी त्याला अशिक्षित नको होती. रूपाने देखणा उंचपुरा, अशोक मलाही भावला होता, पण माझं शिक्षणचं आडवं येत होतं.
बैठकीत मंडळी बसली होती. ” मुलगी पसंत आहे, पण शिक्षण नाही, फार नाही पण नवर्याला व्यवसायात मदत होईल एवढं शिक्षण हवं होतं ” ‘ नमस्कार, मी तुम्हां सगळ्यांमध्ये लहान आहे तरी बोलण्याचं धाडस करतोय. माझी बहीण अशिक्षित नाही, तिला सगळं लिहिता वाचता येतं, हवं तर यावर्षी दहावीच्या परिक्षेला बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून फाॅर्म भरावा, ती नक्कीच पास होईल याची मी गॅरंटी घेतो, व लगेच पुढच्या वर्षी बारावीचीही परीक्षा देईल. “प्रकाश बोलत होता.
” मग हरकत नाही. मुलीचं शिक्षण होईल व तोपर्यंत ती 21 वर्षांचीही होईल. चालेल आम्हांला “
आणि आज प्रकाशने माझी विदाई केली होती. त्याच्यामुळेच तर मला शिक्षणाचं अनमोल रत्न मिळालं व अशोकसारखं सोनं लाभलं. तरी माझा भोळा भाऊ म्हणतो ताई तुला मी काय भेट देऊ “
सनईचे सूर वाजू लागले. स्वागताला सवाष्णी आल्या, तशी माझी तंद्री भंग पावली. ” ये सुनबाई, पहिला उजवा पाय टाक ” म्हणत कुटुंबातील जेष्ठ स्त्रियांनी माझा गृहप्रवेश केला, व मी एका नव जीवनाला सुरूवात केली.
दर शनिवारी, आजोबा आणि मी आमच्या घराजवळ असलेल्या बुढ्ढाश्रमात तिथल्या आजीआजोबांना भेटायला जातो. “त्याला बुढ्ढाश्रम नाही म्हणत, ” आजोबा मला सांगत, आणि मग काहीतरी खूप जोडाक्षरं असलेला एक कठीण शब्द म्हणत, पण मला काही तो शब्द म्हणता येत नाही.
तिथे आजोबांचे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना भेटायला आजोबांना आणि मला फार आवडतं. शिवाय आजोबा नेहमी म्हणतात, “जे आजारी लोकांना भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांचं मनोरंजन करतात, ते त्यांना नवीन उभारी देतात, खूप पुण्याचं काम करतात. ”
तिथं आम्हाला अन्नपूर्णाअम्मा भेटायच्या. त्या चेन्नईजवळील एका गावाहून आलेल्या आहेत. त्या नेहमी त्यांच्या गावातील एकाहून एक सरस खाद्यपदार्थांबद्दल सांगायच्या. त्यांचे तिथं एक छोटे हॉटेल होतं आणि त्यांच्या हातचं इडलीसांबार खायला लोक दूर-दूरहून येत असत.
नंतर भेटायचे पेस्तनकाका, ते खूप गमतीशीर बोलायचे. त्यांच्या पारशी ढंगात वेगवेगळे जोक्स सांगायचे. त्यांचे काही जोक्स फार फनी असत, काही मला समजतही नसत. पण ते स्वत:च्याच विनोदांवर जोरजोराने हसत, हसताना त्यांची ढेरी अशी गदागदा हलायची आणि नुसतं ते बघूनही मला हसू यायचं.
त्यांच्या शेजारी संगीतकाका असतात, हे नेहमीच काहीतरी गुणगुणत असत. खूप मूडमध्ये असले की ते आम्हालाही कोरसमध्ये गायला लावायचे.
मग भेटतात मेहताआजी! त्या नेहमी आपल्या नातवंडांच्या गोष्टी सांगतात, त्यांच्याकडे त्यांच्या नातवंडांचे ढीगांनी फोटो आणि अल्बम आहेत.
बापटकाकू शाळेत इतिहासाच्या शिक्षिका होत्या. त्या नेहमी आम्हाला जुन्या काळातल्या पौराणिक, ऐतिहासिक कथा सांगत.
सिंग साहेब सैन्यातून निवृत्त झाले आहेत. एका युद्धात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला होता. ते आम्हाला सैनिकांच्या शौर्याच्या कथा सांगतात.
गुप्ताकाका फार बोलत नाहीत, फक्त माझी वटवट ऐकतात, मान डोलावतात आणि “पुढच्या शनिवारी परत ये ग” असं मला म्हणतात.
मला आणि आजोबांना या सगळ्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं आणि ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो, दर आठवड्याला आम्ही त्यांना भेटायला जायचोच.
पण एकदा माझे आजोबा आजारी पडले आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. “ते क्रिटिकल आहेत, कोमात गेले आहेत, ” असं काहीतरी डॉक्टर म्हणाले, म्हणजे काय ते मला नीटसं कळलं नाही, पण एवढं नक्की समजलं, की या शनिवारी ते माझ्याबरोबर त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटायला येऊ शकणार नाहीत.
मग मी त्या शनिवारी एकटीच बुढ्ढाश्रमात गेले. सगळे मला पाहून खूप आनंदी झाले. आजोबा का नाही आले असं सगळ्यांनी विचारलं, मी त्यांना हॉस्पिटल, क्रिटिकल, कोमा वगैरे सांगितलं. त्यांना काय कळलं कोणास ठाऊक, पण आज ते सगळेच मला हसवण्याच्या प्रयत्नात होते. अन्नपूर्णाअम्मानी त्यांची फेवरेट रेसिपी मला सांगितली, पेस्तनकाकांनी जोक्स सांगितले, मेहता आजींना माझा रेड फ्रॉक खूप आवडला असं त्या म्हणाल्या, बापट काकूंनी एका शूर छोट्या मुलीची गोष्ट सांगितली.
मी परत जायला निघाले, तेव्हा का कोणास ठाऊक पण सगळे आजीआजोबा डोळे पुसत होते. मी पुढच्या आठवड्यात नक्की आजोबांना घेऊन येईन असं त्यांना प्रॉमिस केलं आणि निघाले.
पण पुढच्या शनिवारीसुद्धा आजोबा हॉस्पिटलमध्येच होते. ते काही खातपीत नव्हते, बोलत नव्हते, हसत नव्हते, नुसते छताकडे बघत पडून राहायचे. बाबा गप्प गप्प असायचे, आईचे डोळे लाल दिसायचे.
आजही आजोबा माझ्यासोबत येणार नाहीत हे मला कळलं, मग मी पाचच मिनिटांसाठी बुढ्ढाश्रमात जाऊन आले. त्यांना सांगितलं की आजोबांना अजून बरं वाटत नाहीये आणि आई बाबा पण बोलत नाहीयेत, तर मी आज त्यांच्याशी गप्पा मारायला जाते.
आजी आजोबा काही बोलले नाहीत. का माहीत नाही, पण गुप्ताकाकांनी मला जवळ घेतलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि “सगळं ठीक होईल, बरं, बाळ! ” असं मला म्हणाले.
“मला कुठं काय झालं होतं? ” या आजोबांची गंमतच आहे, मला वाटलं.
दुसऱ्या दिवशी, रविवारी, आईबाबांसोबत मी हॉस्पिटलमध्येच होते. आता ते डोळे उघडत होते, पण ते काही खातच नव्हते, त्यामुळे त्यांना ताकद येत नव्हती. मी त्यांना कित्ती कित्ती सांगितलं, की vegetables खाल्ल्या पाहिजेत, दूध प्यायलं पाहिजे, पण ते ऐकतच नव्हते.
एवढ्यात आजोबांच्या हॉस्पिटलच्या खोलीबाहेर खूप आवाज ऐकू यायला लागले. “ऐसा कैसा खबर नहीं? मेरे को पक्की खबर हैं के इधर आज पार्टी है! ” असं मोठमोठ्यांदा बोलत पेस्तनकाका आजोबांच्या खोलीत घुसले. अम्माने गरमागरम इडलीसांबार आणलं होतं. सिंगसर बाबांशी बोलत होते, बापट काकू आईच्या पाठीवरून हात फिरवत होत्या, मेहताआजी त्यांच्या नातवंडांनी केलेलं “get well soon” ग्रीटिंग कार्ड आजोबांना देत होत्या, संगीतकाका कुठलं तरी, जुन्या काळातलं “सुहाना सफर, और ये मौसम हसीन” वगैरे गाणं म्हणत होते, गुप्ताकाका माझा हात घट्ट धरून उभे होते.
रूममध्ये नुसता आरडाओरडा चालला होता, इतका की तिथल्या नर्सताईसुद्धा काय चाललं आहे बघायला, आम्हाला गप्प करायला खोलीत आल्या. पण ही सगळी मंडळी पाहिली, नर्सताईला काय झालं माहित नाही, पण त्या डोळे पुसत – आम्हाला काहीच न बोलता बाहेर निघून गेल्या.
आजोबांनी हाताने खूण करून बाबांना बोलावलं, “मला जरा बसतं करतोस का? मला भूक लागली आहे, ” एकदम हळू आवाजात ते म्हणाले.
मग त्यांनी अम्माने आणलेली इडली खाल्ली.
आई बाबा आणि आलेले सगळे आजी आजोबा वेडे आहेत! तिकडे आजोबा खात होते, आणि इकडे या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं.
“आता तुझे आजोबा लवकर बरे होणार, बरं का! ” माझ्या डोक्यावर टपली मारत डॉक्टरकाका सांगत होते, आणि मी आजोबांबरोबर पुढच्यावेळी बुढ्ढाश्रमात गेले की काय करायचं याचे प्लॅन्स करण्यात गुंग झाले होते.
(दिपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. टिपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानातून सामान आणायचे आणि रात्र 11 पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढेच बाकी होते.)
इथून पुढे – –
दिपूच्या आईने अंगण शेणाने सारवले. पानंदीपासून घरापर्यंत रांगोळी घातली. आता तिचे लक्ष येणाऱ्या एसटीवर होते. कधी एकदा पैसे हातात येतात आणि दुकानाचे मन आणतो असे तिला झाले होते.
त्यांच्या गावात एसटी नदीपलीकडे थांबत असे. टिपूच्या घरातून गाडी आल्याचा अंधुकसा आवाज येत असे. इतक्या वर्षाच्या सरावाने गाडी थांबल्याचा आणि वळण्याचा आवाज कळत असे.
दोन वाजायला आले आणि दिपूची आई आत बाहेर करू लागली. पण दुपारच्या गाडीने दिपूचे बाबा आले नाहीत. पण तिला निश्चित माहित होते चारच्या गाडीने ते येणारच. पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा तिच्या आत बाहेर सुरु झाल. साडेपाचच्या सुमारास गाडीचा आवाज आला तशी ती बाहेर येऊन उभी राहिली. लांबून तिला दिपूचे बाबा येताना दिसले. तसा तिला खूप आनंद झाला, तिने दिपूला हाक मारली ” दिपू ती सामानाची यादी आणि पिशव्या घेऊन ये बाहेर. बाबा आले, त्यांचे कडून तीन चार हजार घे आणि यादी घेऊन दुकानात जा. आणि सर्व सामान व्यवस्थित आण. ‘
” हो आई येतो, म्हणत दिपू यादी आणि पिशव्या घेऊन आला. तोपर्यंत दिपूचे बाबा घराजवळ पोहोचले होते. पण तिच्या लक्षात आले त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता.
” मिळाले ना पैसे? दिपूच्या आईने विचारले. बाबा रडविले होत म्हणाले ” नाही, बँकेत त्यांच्या अकाउंट वर पैसेच नाही ‘.
” काय? दिपूची आई रडविली होत किंचाळली.
” सकाळपासून बँकेत होतो, स्टेट बँकेच्या अकाउंट वर त्यांच्या अकाउंटला फक्त 220 रुपये होते, म्हणून परत त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा तेथे मॅनेजर म्हणाले ” काळजी करू नका, आजच एक मोठा चेक पास होऊन गेला म्हणून पैसे कमी झाले. मी दोन वाजता पुन्हा पैसे भरतो. तुम्ही दोन नंतर तुमचा चेक पास करा. म्हणून न जेवता परत दोन पासून बँकेत उभा. अडीच वाजता चेक बँकेत दिला तर तो बँकेचा माणूस म्हणाला अहो या लोकांनी अनेकांना असे चेक दिलेत, सर्वांचे चेक परत गेलेत, यांच्या अकाउंटला काही रक्कम नाहीच आहे. त्यामुळे कुणाचे चेक पास झालेले नाहीत. ‘ मी परत या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसला भले मोठे कुलूप. चार वाजेपर्यंत मी तेथे वाट पाहिली आणि शेवटी कंटाळून एसटी पकडली “.
दिपूच्या बाबांचे शब्द दिपूच्या आईच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. तिच्या लक्षात आले आपल्या डोळ्यासमोर अंधार येतोय. आता आपण निश्चित खाली पडणार हे तिला कळत होते. पण तिच्या मनाने उसळी घेतली. ” छे छे, मला खाली पडून चालणार नाही. आपला नवरा साधा आहे. तो हातपाय गळून बसेल. आपल्याला धडपड करायलाच हवी ‘. पटकन ती सावरली. खुर्चीला धरून उभी राहिली. आईला बरं वाटत नाही हे पाहून दिपू घरात धावला आणि पाणी घेऊन आला. त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला आणि घटाघटा पाणी प्यायली. दिपूचे बाबा डोकं धरून बसले. शेवटचा प्रयत्न म्हणून ती दिपूला म्हणाली ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज म्हाई येणार आमच्याकडे,. एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘. दिपू यादी आणि पिशव्या घेऊन गेला. तिला अंदाज होता वासू वस्तू द्यायचा नाही. कारण गेल्या चार महिन्यापासून त्याचे बिल द्यायचे होते. पाच मिनिटात दिपू धावत आला. ” आई वासू काका म्हणतात, म्हाईच्या दिवशी आम्ही कुणाला उधार देत नाही. ‘ तिला अंदाज होताच. आता म्हाई यायला पाच तास बाकी होते. एवढ्या माणसांचे जेवणखांन व्हायलाच हवे. तिचा डावा हात गळ्याकडे गेला. गळ्यातील मंगळसूत्रात तीन चार ग्रॅम सोने होते. आता हाच एकमेव उपाय. तिला खूप वाईट वाटले. गावातील सर्वात प्रतिष्ठित मानकर यांची ही परिस्थिती. प्रतिष्ठित मानकरी म्हाईच्या भक्तांना जेवण घालू शकत नाही? ज्या घरात कुळाकडून वसुलीसाठी घोडे ठेवले होते, रोज दहा वीस बाहेरची माणसे जेवून जात होती, सकाळपासून चुलीवर ठेवलेले चहाचे आधन बंदच होत नव्हते, ज्या घरातील शिल्लक अन्नावर तीन चार कुटुंब रोज जेवत होती, त्या कुटुंबाची आज काय परिस्थिती? घरात रिकामे डबे या कुटुंबाच्या आश्रयावर मोठा झालेला वासू दुकानदार म्हाईसाठी माल नाही म्हणतो?? “.
दिपूच्या आईला रडू येत होते. हुंदक्यावर हुंदके येऊन गळ्यावर आदळत होते. पण तिने डोळे पुसले. दिपूला म्हणाली ” दिपू चल माझ्याबरोबर. ‘
” कुठे आई?
” रघु सोनार किती पर्यंत दुकान उघडे ठेवतो? तिने गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत विचारले.
” सहा पर्यंत ‘.
” मग चल चप्पल घाल ‘.
तिने घरात नेसलेली साडी ठीकठाक केली. डोळे कोरडे केले. केसावरून हात फिरविला आणि पायात चप्पल घातली. चप्पल घालून ती आणि दिपू चार पावले चालली एवढ्याच संज्या डोक्यावरून टोपली आणताना दिसला. ती संजय कडे पहात म्हणाली ” काय हे संज्या?
” आईने पाठवले तुमच्याकडे, ‘. संजयच्या डोक्यावर जड होणारी टोपली दिपूच्या आईने हाताला धरून खाली घेतली. उतरलेल्या टोपलीकडे दिपूची आई पहातच राहिली. टोपली तीन चार किलो तांदूळ, गव्हाच्या पिठाच्या दोन पिशव्या, तेलाची पिशवी, कांदे बटाटे, वाटाणे, साखर इत्यादी होते.
” अरे हे कोणासाठी संज्या? दिपूची आई आश्चर्याने ओरडली.
” तुमच्यासाठी काकी, तुमच्याकडे म्हाई येणार ना, मग हा दिपूचे बाबा एसटीतून उतरले तेव्हा माझ्या बाबांना वाटेत भेटले. तेव्हा ते रडत होते. माझ्या बाबांना म्हणाले, ” संस्थेने फसवलं, खोटा चेक दिला, आज आमच्याकडे म्हाई येणार, तिच्याबरोबर वीस पंचवीस लोक असणार त्यांचे जेवण करावे लागणार. घरात अन्न शिजवायला धान्य नाही ‘. माझ्या बाबांनी आईला हे सांगितलं. आई म्हणाली” संजय ताबडतोब हे सामान दिपूच्या घरी पोहोचव, आज त्यांना याची गरज आहे. गावच्या मानकऱ्यांचे घर ते. त्या घराण्याच्या जीवावर अनेक जण जेवले, मोठे झाले, आज त्यांची परिस्थिती खराब आहे. पुन्हा त्यांचे दिवस येतील. माझ्या आईने ही टोपली भरली आणि आणि तुमच्याकडे हे सामान पोहोचवायला सांगितलं ‘.
दिपू ची आई रडत रडत खाली बसली. ” काय हे संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू मी. म्हाई रात्री येणार खरी पण संज्याच्या आई मला खरी म्हाई तुमच्याच रूपात आत्ताच भेटली. ‘. दिपू ची आई चटकन उभी राहिली डोळे पुसले आणि पुढे येऊन संजयला जवळ घेतले. ” बाळा, माझ्यासाठी डोक्यावर टोपलीतून एवढे सामान आणलंस, तुला द्यायला लाडू पण नाही रे घरात ‘. संजाने आणि दिपू ने सर्वसामान घरात घेतले. आईने त्यांना डबे दाखवले त्या डब्यात भराभर भरले.
आता दिपूच्या आईच्या अंगात हत्तीचे बळ आले. तिने भराभर दोन चुली पेटवल्या. वाटाणे पाण्यात फुगत घातले. बटाटे कांदे चिरायला घेतले. कोथिंबीर मोडून ठेवली. एका चुलीवर तेल तापवून पुऱ्या करायला घेतल्या.
इकडे देवळात ढोलांचे ताशांचे आवाज सुरू झाले. ढम… धम.. ढम, ताशांचे आवाज ताड ताड ताड, शिंग वाजले पु… उ… पु…
म्हाई निघाली, म्हाई निघाली, भक्तांच्या भेटीला म्हाई निघाली. सगळ्या गावात उत्साह संचारला.
दिपूच्या आईची घाई होत होती. दोन चुली रट्टा रट्टा पेटत होत्या. तिने दोन अडीच तासात सगळा स्वयंपाक पुरा केला. आधी पूजा बाबांनी आंघोळ केली आणि सोवळे नेसून ते तयार राहिले. दिपूच्या आईच्या मदतीला शांती भाजीवाली हजर झाली तसेच शेजारची शोभा काकी पण आली. दिपूच्या आईने अंघोळ करून घेतली, आणि त्यातल्या त्यात चांगले लुगडे ती दिसली. दिपू ही आंघोळ करून तयार झाला.
साडेअकरा वाजले आणि ढोल ताशे जवळ वाजायला लागले. ढम… ढम… ढम, ताड.. ताड… ताड… , शिंग वाजू लागले. दिपूच्या बाबांनी म्हाईला घरापर्यंत आणलं. दिपूच्या आईने सर्वांच्या पायावर पाणी ओतून त्यांना आत घेतलं. म्हाईची पालखी आत ओसरीवर आली. दिपूच्या आईने तिची ओटी भरली. पुजार्यांनी गाऱ्हाणे घातले. तीर्थप्रसाद सर्वांना दिला. मग सोबतची मंडळी विसावली. गेले कित्येक वर्षे देवीच्या मानकर यांच्या घरी सर्व भक्तांना जेवण असते. त्याप्रमाणे पत्रावळी मांडून त्यांना जेवण वाढले. दिपू च्या मदतीला शांती भाजीवाली आणि शोभा काकी पण होत्या. भराभर वाढून झाले. मंडळींनी ” पुंडलिक वरदे ‘ म्हणत जेवणाला सुरुवात केली. वरण-भात, वाटाण्याची बटाट्याची भाजी, कोशिंबीर, शेवयाची खीर आणि पुरी. भक्त मंडळी भरपूर जेवली. सर्वांनी दिपूच्या आई-वडिलांना आशीर्वाद दिले. आणि म्हाईची पालखी दुसऱ्या घरी जायला निघाली.
रात्री दिपूची आई अंथरुणावर पडली पण तिच्या डोळ्यासमोर संज्याची आई होती. संजय ची आई म्हाई सारखी धावली म्हणून गावच्या मानकरांची अब्रू वाचली, नाहीतर…
दिपू च्या आईला झोप येईना. आज दिवसभर जो मनस्ताप झाला त्याची तिला एक सारखी आठवण येत होती.
सकाळ झाली. म्हाईच्या ढोलांचा आवाज लांब लांब ऐकू येत होता. दिपूच्या आईने डब्यात शेवयाची खीर आणि पुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी घेतली. आणि ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली. त्याच अळीत शेवटचं घर संज्याच. संजयच्या घरी मागच्या दरवाजावर तिने टकटक केले. संजयच्या आईने मागचं दार उघडलं. तिला पाहता दिपूची आई पुढे गेली आणि तिने सध्याच्या आईला मिठीच मारली. रडत रडत ती बोलू लागली ” संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही काल सामान पाठवले नसते तर गळ्यातील मंगळसूत्र मोडाव लागणार होतं. त्यात तरी काय तीन-चार ग्रॅम सोनं. पण गावातील सोनारसमोर घराण्याची अब्रू जाणार होती. सज्यांच्या आई, माझी म्हाई मला काल संध्याकाळीच भेटली. संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई “.
” असं बोलू नका दिपूच्या आई, अश्रू आवरा.
” कशी आवरू संज्याच्या आई, रात्री आलेल्या म्हाईला आमची काळजी असती, तर आमचे कष्टाचे पैसे त्या संस्थेने बुडवले असते का, आणि ज्यांनी पैसे खाल्ले ते गाड्या घेऊन मजेत. आमची म्हाईत्यांना शिक्षा देत नाही. संज्यच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाय. ‘.
संजयच्या आईला मिठी मारून दिपूची आई रडत होती आणि संजय ची आई तिला समजावत होती. त्यांचे बोलणे रडणे ऐकून तेथे आलेले संजय चे बाबा आणि संजय आपले डोळे पुसत होते.
शांती भाजीवाली डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आळीत घरोघरी फिरत होती. दिपूच्या आईचं घर येताच तिने टोपली जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने हाळी दिली ” ओ दिपूच्या आई, भाजी घेणार काय? ‘
तिची हाळी ऐकून दिपूची आई पदराला हात पुसत बाहेर आली.
शांतीला पाहतात दिपूच्या आईला आनंद झाला. तशी दोन दिवसाआड येणारी शांती ही त्यांची मैत्रीणच. दोघी एकमेकांसमोर आपलं मन मोकळ्या करायच्या.
” होतीस कुठे इतकं दिवस? लय दिसानं आलीस? ‘
” ताप येत होता दादल्याला, त्याला डागदर कडे नेत व्हते ‘.
आता बर हाय का?
” व्हय, घेणार का भाजी? ‘
” लाल माठ दे दोन जुड्या, “.
शांतीने माठाच्या दोन जुड्या दिपूच्या आईच्या हातात दिल्या.
” मग दिपूच्या आई, म्हाई येणार की आता लवकरच ‘. “म्हाई ‘ म्हटल्याबरोबर दिपूच्या आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला.
“काय झालं, गप का रवला? शांतीने विचारले.
” काय सांगावं शांते, घर वाल्यांची नोकरी राहिली नाही, पैसे मिळाले होते फंडाचे ते त्या संस्थेत ठेवले होते नव्हे “. कुठल्या? ती
ती बुडाली त्या संस्थेत की काय?
” होय बाई, ‘
” लई लोकांचे बुडाले बघा, मग मग आता म्हणणं काय त्यांचं? ‘
” पैसे मिळणार, बुडायचे नाहीत म्हणत्यात, पण आता”म्हाई ‘ यायची झाली आणि खिशात पैसे नाहीत अशी परिस्थिती.
” होय बाई, आणि दिपू अजून लहन हाय.
” हो बाई, खूप दिवसांनी झालाय ना तो. ‘
” पण तुम्ही देवीचे मानकरी, म्हणजे तुम्हास्नी म्हाईचा लई खर्च असणार?
” होय बाई, आम्ही मानकरी देवीचे, म्हाई आमच्याच घरी येणार, सोबत वीस पंचवीस देवीचे भक्त पण असतात, एवढ्या मंडळीचे जेवण व्हायला पाहिजे. 50 60 लोकांचे चहापाणी, देवींची पूजा, ओटी भरणे हायचं. “
मग दिपूच्या बाबांनी काहीतरी व्यवस्था केलीच असेल?
” ते काय करतात, साखर कारखान्यातून रिटायर झालेत, त्यात त्यांचा पगार तो कितीचा होता, पेन्शन वगैरे काही नाही, काय फंड मिळाला तो त्या संस्थेत घातला, चार वर्षात डबल होणार म्हणून सांगितलं, ठेवून दोन वर्षे झाली, सहा लाखाचे बारा लाख होणार म्हणून ठेवले, पण आता संस्था बुडाली म्हणे “.
” अरे देवा, मग फुड काय व्हायचं ‘.
” बघूया ‘ असं म्हणून दिपूच्या आईने माठाच्या दोन जुड्या घरात नेल्या. शांतीला दहा रुपये दिले तशी शांती गेली.
दिपूच्या आईच्या लक्षात आलं, फेब्रुवारी महिना आला म्हणजे, या महिन्यात “म्हाई ‘ येणार, त्यात आपण देवीचे मानकरी, उत्पन्न काही नसलं तरी खर्च थांबत नाहीत. तिने डबे उघडले. तांदुळाच्या डब्यातले तांदूळ तळाला टेकले होते. पिठाच्या डब्यात जेमतेम चार दिवसापूर्वी पीठ शिल्लक होते. तेल जवळ जवळ संपले होते. वाटाणे हरभरे शेंगदाणे सर्व संपत आले होते. अजून पंधरा दिवस आहेत म्हाईला. अजून पंधरा दिवसाला खायला तर पाहिजे.
एका महिन्यापूर्वी तिच्या आईने धान्य पाठवलं होतं. जोंधळे, शेंगदाणे, तांदूळ गहू इत्यादी. आता परत तिच्याकडे कसे मागायचे? आता आईचे काही चालत नाही घरात. भावजई चा कारभार. आणि तेथे सुद्धा रयत फारसे देत नाहीत. आपला भाऊ तसा सतत आजारीच असतो. त्यांची परिस्थिती पण आता फारशी बरी नाही. त्यांच्याकडे परत मागायला नको. तिने नवऱ्याला हाक मारली “अहो, ऐकलंत का, घरातलं धान्य तसेच पीठ संपत आलंय. पाच-सहा दिवसा पुरते आहे. या महिन्यात”म्हाई ‘ येणार, तिच्या पालखीसोबत वीस-पंचवीस माणसे असतात. त्यांना दरवर्षी आपल्याला जेवण खान करावे लागतं. आणि 50 60 माणसांना चहा पाणी.
” मग मी तरी काय करू? सगळे पैसे त्या संस्थेच्या बोडक्यावर टाकलेत ना?
” पण मी म्हणत होते, असल्या संस्थेमध्ये पैसे ठेवू नका, ते पैसे घेतात आणि मग खाका वर करतात, “
” बघू, आबा म्हणत होता, रिझर्व बँक काहीतरी करेल.
” त्या आबावर विश्वास ठेवून पैसे ठेवलेत ना, मग मग आबाला सांगा आमचे पैसे दे म्हणून ‘.
” आबा काय देतो, त्याचा पोरगा त्या संस्थेत मॅनेजर होता म्हणून तो सर्वांना तेथे पैसे ठेवायला सांगायचा, आता सर्वजण त्याला विचारतात, तेव्हा तो रिझर्व बँकेकडे बोट दाखवतो “.
” म्हणजे पैसे मिळवले ह्या लबाडानी आणि पैसे कोण देणार म्हणे तर रिझर्व बँक. ते काही नाही, तुम्ही या पतसंस्थेच्या तालुक्याच्या ऑफिसात जाऊन खडसावून विचारा, म्हणावं आम्ही खावं काय? आमचे फंडाचे सर्व पैसे विश्वासाने तुमच्याकडे ठेवले, पैसे तुम्ही खाल्ले आणि ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसलात “.
” जातो मी उद्या’. “
” चावाच आणि खडसावून विचारा, त्यांना सांगा पंधरा दिवसांनी आमच्याकडे “म्हाई ‘ येणार आहे, आम्हाला मोठा खर्च आहे, तोपर्यंत आम्हाला काहीतरी पैसे द्या ‘. शेवटी मानकरी ना तुम्ही देवीचे, उत्पन्न काही नसले तरी मानकरी, जमीन सगळी कुळांना गेली. पण मान फक्त तुम्हालाच. खर्च फक्त तुम्ही करायचे “.
दिपू च्या आईचा संताप संताप झाला. खरं तर ती आपल्या नवऱ्याला जास्त बोलायची नाही. कारण तिला माहीत होते आपला नवरा स्वभावाने गरीब आहे. त्यांचा जन्म झाला जमीनदाराच्या कुटुंबात पण चुलत भावांनी फसविले. घरातील दाग दागिने, सोने, रोख रक्कम घेऊन पळाले. मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. आता ढुंकूनही गावाकडे पाहत नाहीत. कुळांकडे असलेल्या जमिनी आपल्या नवऱ्याकडे आल्या. कुळ कायद्याने त्या जमिनी गेल्या. राहिले फक्त फुकटचे मोठेपण. हे जुने मातीचे पडणारे घर सोडून दुसरे काही नाही. आपल्या नवऱ्याचे शिक्षण फारसे झाले नाही. या जमीनदार कुटुंबाकडे पाहून आपल्या वडिलांनी आपल्याला या घरात दिले. त्यावेळी घर गजबजलेले होते. येणे जाणे होते. कुळाकडून वसुली करण्यासाठी घोडे ठेवले होते. स्त्रियांसाठी मेणे होते. सर्व गेले. राहिली फक्त भोके. उत्पन्न काही नाही.
नशीब त्यावेळी खासदार जयवंतराव नवीन साखर कारखाना काढत होते. आम्ही या गावचे मानकरी म्हणून देवीला नमस्कार करून सरळ ते आमच्या घरी आले. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. आमच्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही हे त्यांना सांगितले. त्यांनी नवऱ्याला कारखान्यात नोकरी देण्याचा शब्द दिला. दोन वर्षांनी कारखाना उभा राहिला तेव्हा जयवंतरावांना मी परत भेटले. त्यांनी आपल्या नवऱ्याला नोकरीला ठेवले. पण शिक्षण जास्त नसल्याने उसाच्या वजन काट्यावर वजन नोंदवून ठेवण्याचे काम दिले. थोडाफार पगार घरात येऊ लागला आणि संसार टुकूटुकू का होईना चालू झाला.
बारा वर्षांपूर्वी दिपू चा जन्म झाला, दोनाची तीन माणसे झाली. पण दोन वर्षांपूर्वी आपला नवरा निवृत्त झाला आणि पगार थांबला. दिपू शाळेत. उत्पन्न काही नाही. फंडाची रक्कम आली ती गावातल्या आबांना कळली. त्यांच्या रोज सायंकाळी फेऱ्या वाढू लागल्या. चार वर्षात डबल पैसे होतील, तुझ्या दिपूच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे येतील अशी आश्वासने देऊ लागले. आम्हाला ते खरेच वाटले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आता हा पश्चाताप झाला. नवऱ्याने पतसंस्थेचे सर्टिफिकेट दाखवली तेव्हा आपण पण खुश झालो. आपले शिक्षण पर फारसे नाही. बाहेरच्या लबाड जगाची एवढी कल्पना नव्हती. पैसे डबल झाले म्हणजे दिपूला शिकवायचं, मग घर बांधायचं, मग दिपूला नोकरी मिळेल, मग दिपू च लग्न…
पतसंस्था अडचणीत आल्याचे कळले, लोकांचे पैसे मिळत नाहीत याची कल्पना आली आणि पायाखालची वाळू सरकली. मग संस्थेत आपल्या नवऱ्याच्या रोज खेपा सुरू झाल्या. आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हाता
पाया पडून पुढची आश्वासने देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले.
” साहेब मी गरीब माणूस. कारखान्यातून मिळालेली सर्व फंडाची रक्कम तुमच्या संस्थेत ठेवली. आम्हाला पेन्शन वगैरे काही नाही. आमच्या पैशांचे काय? पंधरा दिवसांवर आमच्या गावातली “म्हाई ‘ आली. आम्ही देवीचे मानकरी. आम्हाला दरवर्षी मोठा खर्च असतो. तातडीने काहीतरी पैशाची व्यवस्था करा.
” अहो काका, इथे रोज शेकडो माणसे येऊन गर्दी करतात. सर्वांचेच पैसे अडकले. अडकले याचा अर्थ बुडाले असे नव्हे. पैसे मिळणार पण ते केव्हा ते मी सांगू शकत नाही. रिझर्व बँकेने तात्पुरते निर्बंध घातलेत. आपले चेअरमन जाऊन दिल्लीला अर्थमंत्र्यांना भेटलेत. सर्व व्यवस्थित होणार काळजी करू नका ‘.
” पण साहेब पंधरा दिवसावर आमची म्हाई आली. खर्चाला आमच्याकडे पैसे नाहीत ‘.
” हो का केव्हा आहे तुमची म्हाई? ‘
” या महिन्याच्या 22 तारखेला साहेब ‘. 22 तारखेला ठीक आहे, मी 22 तारीख ची तुमची व्यवस्था करतो. तुम्हाला 22 तारीख चा स्टेट बँकेचा चेक देतो. त्यादिवशी येऊन बँकेतून पैसे घेऊन जा ‘. साहेब यांनी 50 हजाराचा चेक लिहून दिला. खाली आपली जोरदार सही केली. दिपूचे बाबा खुश झाले. दुपारच्या एसटीने गावी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी दिपूच्या आईला पन्नास हजाराचा चेक दाखवला. ती पण खुश झाली. आता निर्धास्तपणे 22 तारखेच्या म्हाई ची तयारी सुरु केली.
गावात सगळीकडे लगबग सुरू होती. देवीच्या देवळात झाडलोट केली गेली. देवळाला नवीन रंग दिला. देवीची पालखी तसेच भांडीकुंडी सर्व काही झकपक झाले. गावातील प्रत्येक घराघरात म्हाईची तयारी सुरू झाली. घरांची साफसफाई झाडलोट सुरू होती.
दिपूच्या घरी दिपूच्या आईने घर वर पासून खालपर्यंत झाडलं. प्रत्येक भांड धुतलं. घरातली अंथरूण पांघरून पुन्हा टाकली. घराकडे येणाऱ्या पानंदी स्वच्छ केल्या.
नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आपल्या गावात यायला लागले. वर्षभर बंद असलेली घर उघडून साफसूफ करायला लागले. गावाला जाग आली. अनेक चाकरमानी गावात दिसायला लागले.
दिपूचे बाबा परत परत तो 50000 चेक पाहत होते. त्या खालची ती झोकदार सही पाहत होते. 22 तारखेला सकाळी आठच्या गाडीने दिपूचे बाबा तालुक्याच्या गावी गेले. दिपूच्या घरची तशी सर्व तयारी झाली होती. फक्त घरात धान्य सामान आणि साखर वगैरे नव्हते. पैसे आले की ताबडतोब वासूच्या दुकानातून सर्व सामान आणण्याची तयारी दिपूच्या आईने केली. सामान घरात आले की ताबडतोब जेवण करायला सुरुवात करायची. दिपूच्या आईने दिपूला कागद पेन घेऊन लिहायला सांगितले. दिपूच्या आईने यादी करायला घेतली
तांदूळ पाच किलो, गव्हाचे पीठ पाच किलो, साखर पाच किलो, वाटाणे दोन किलो, बटाटे दोन किलो, कांदे दोन किलो, गोडेतेल दोन लिटर, शेवया दोन पॅकेट, वेलची 100 ग्रॅम, गूळ दोन किलो.
दिपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. टिपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानातून सामान आणायचे आणि रात्र 11 पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढेच बाकी होते.
“अगं अनाया, तू दिवसभर या कामातच गुरफटलेली असतेस! थोडा वेळ स्वतःसाठीही काढ ना! ”
अनाया हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली – (ते हसू तोंडावर होतं, मनात नव्हतं)
“वेळ माझ्या वाट्याला फक्त झाडू आणि भांडी घेऊनच आला आहे, ताई. ”
—
सायंकाळी मुलं परत आली.
त्यांच्यासाठी दूध, खाऊ, गृहपाठाचा डोंगर तयार होता.
रोहन आला तेव्हा फोनवर कुणाशी तरी बोलत हसत होता.
“आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का? ” अनायाने हळूच विचारलं.
तो म्हणाला, “हो, थकलोय, ” आणि थेट टीव्हीसमोर बसला.
– – अनाया काही बोलू पाहत होती…
“मीसुद्धा थकलेय, रोहन…”
पण तिचे ओठ बंद झाले. कारण तिला ठाऊक होतं, या घरात तिला थकण्याचा हक्क नव्हता.
—
रात्र गडद झाली. मुलं झोपली, सासू-सासरे त्यांच्या खोलीत गेले.
अनाया अजूनही स्वयंपाकघरातच होती – गॅस बंद करत होती, सिंक पुसत होती, उद्यासाठी भाजी चिरत होती.
– – अचानक तिचं डोकं गरगरलं, तिने भिंतीचा आधार घेतला. डोळे मिटले,.. आणि कधी झोप लागली हे कळलंच नाही.
—
रात्री दोनच्या सुमारास रोहन जागा झाला. स्वयंपाकघराची लाईट लागलेलीच होती.
तो चिडला, “ही अजून काय करतेय? ”
तो तिथं गेला.. अनाया खुर्चीवर बसलेली,.. डोकं खाली, पूर्ण शांत.
“अगं अनाया, झोपलीस का? ” – – कुठलाही प्रतिसाद नाही.
त्याने खांदा हलवला – शरीर गार झालं होतं.
त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो किंचाळला – “आई! आई! ”
—
सगळं घर धावत आलं. डॉक्टर आले.. पण उशीर झाला होता – –
डॉक्टर म्हणाले,
“शरीर पूर्ण थकलं होतं… कदाचित अनेक दिवस तापात होती, पण विश्रांती घेतली नाही. ”
रोहनच्या कानात जणू कुणीतरी हातोडा मारला.
तो पुटपुटला –
“पण तिने कधी सांगितलंच नाही की ती आजारी आहे. ”
डॉक्टर शांतपणे म्हणाले –
“सांगण्यासाठी ऐकणारा तरी हवा ना. ”
—
सकाळ झाली.
सूर्य उगवला, पण त्या घरात काळोख होता.
स्वयंपाकघरात तेच अर्धवट ताट पडलं होतं… थंड आणि निःशब्द.
सासूबाई चहा बनवत रडत होत्या,
“कधी विचारच केला नाही की ती इतकं सहन करत होती. ”
मुलांनी विचारलं, “आई कुठे आहे? ”
रोहन काहीच बोलू शकला नाही.
—
काही दिवस गेले.
घर चालू होतं, पण जीवन थांबलं होतं.
एका संध्याकाळी रोहनला कपाटात एक डायरी सापडली – वर लिहिलं होतं, “माझं मौन”.
पहिलंच पान उघडलं, आणि डोळ्यातून अश्रू ओघळले –
“आज ताप आहे, पण काम तर करायचंच आहे मला. मी थांबले तर हे घर थांबेल. कुणी विचारेल का की मी ठीक आहे का? बहुतेक नाही… मी आता एक मशीन झालेय, जी सकाळी सुरू होते आणि रात्री बंद होते. ”
“मला भीती वाटते की एखाद्या दिवशी मी कोसळेन, आणि कुणाला कळणारही नाही. कदाचित तेव्हा लक्षात येईल —
– – घर भिंतींनी नाही… एका स्त्रीच्या श्वासांनी चालतं. ”
शेवटच्या ओळीवर रोहन थांबला – “जर माझ्या जागी कधी दुसरी कुणी आली, तर तिला एवढंच विचार…
“थकलीस का? “… हे शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतात. ”
रोहनचे हात थरथरू लागले.
… त्याचे डोळे पाण्याने भरले. पहिल्यांदा तो खऱ्या अर्थाने रडला.
त्या दिवसानंतर त्याने स्वयंपाकघरातले ते ताट जपून ठेवले…
आठवण म्हणून की…
स्त्रीची मेहनत कधीच हलकी नसते – – जरी तिचा आवाज कुणाला ऐकू येत नसला तरीही.
प्रत्येक घरात एक “अनाया” असते… जी सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःला विसरते.
ती बोलत नाही, पण तिचे हात, तिचे डोळे, आणि तिचा थकवा रोज ओरडतो.
… कधी तिच्या शेजारी बसून फक्त एवढंच विचारा –
“थकलीस का? ”
… कारण हेच शब्द एखाद्याचं जीवन वाचवू शकतात.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
९८६०००६५९५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वासंतीकडे तरी कुठून फारसा पैसा असणार? कुटुंबाचा आधार तर बिलकुलच नव्हता. घराचं भाडं, रोजचं दूध, भाजीपाला आणि लहानग्याचं संपूर्ण भविष्यच आ वासून समोर उभं होतं. माझ्या आणि पोलीस स्टेशन मधल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने, तिने ते सर्व सोपस्कार पूर्ण केले. सरकारी कामकाज म्हटलं की त्याची कार्यवाही व्हायला वेळ तर लागणारच. या सगळ्यात तीन महिने असेच निघून गेले.) —
इथून पुढे – – –
या मधल्या काळात आणखीही काही घटना घडल्या. माझे वडील गुजरातमध्ये फिरतीवर असताना त्यांना हार्ट अॅटॅक आला. मी सावत्र आईला सोबत घेऊन सुरतला गेलो. औषध उपचारांसोबतच, त्यांच्या हिंडण्या फिरण्यावर काही निर्बंध आले. शिवाय आहाराचं पथ्यही सांभाळणं गरजेचं होतं. मग त्यांनी सुरतमध्ये घर घेऊन राहण्याचं ठरवलं आणि माझी सावत्र आईही तिथेच राहू लागली. त्यांना कंपनीनं गुजरातमध्येच कमी फिरतीचं काम देण्याचं मान्य केलं. मी काॅलेज आणि नोकरीमुळे डहाणूला परत आलो.
विजयराव गेल्यापासून मी माझ्या घरात.. हाॅलमध्ये झोपायचो. आता पूर्ण घरात मी एकटाच होतो. अभ्यास आणि नोकरी सांभाळून, जमेल तशी वासंतीला मदत करत होतो. तिचे पैसे आॅफिस कडून मिळण्यासाठी, पोलीस स्टेशनला, त्यांच्या हेड ऑफिसला, मंत्रालयात अशा अनेक ठिकाणी बऱ्याच फेऱ्या माराव्या लागल्या.
विजयरावांच्या फंडाचे पैसे मिळायलाही खूप
त्रास झाला. कारण नोकरीला लागताना विजयरावांनी जे फाॅर्म भरले त्यात आईच्या नावाचं नाॅमिनेशन होतं. कायदेशीर वारसाची कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वासंती आणि तिच्या सासूला ते पैसे विभागून मिळाले. काही रक्कम खर्चासाठी ठेवून बाकी देशपांडे सरांच्या सल्ल्यानुसार पोस्टाच्या योजनेत गुंतवले, जेणेकरून वासंतीला दरमहा एक ठराविक रक्कम हातात मिळेल.
माझ्या B. Com. फायनल परिक्षेचं वेळापत्रक आलं, तशी मी देशपांडे सरांकडून सुट्टी मागून घेतली. नेटाने अभ्यास करायला हवा होता. मला नाश्ता, जेवण देण्याची जबाबदारी वासंती निभावत होती. मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देत होतो. अधून मधून वासंतीच्या छोट्याला सांभाळत होतो. एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात B. Com. ची परीक्षा एकदाची पार पडली. आता जूनमध्ये ICWA ची फायनल होती… तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं.
मे च्या तिसर्या आठवड्यात वासंतीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी मुलाखतीला बोलावण्यात आलं. ठाण्याच्या हेडआॅफिसला त्यासाठी तिला घेऊन गेलो. मग परत एकदा तिच्या कागदपत्रांची पडताळणी म्हणून जावं लागलं. छोट्या लेकराला घेऊन सगळीकडे एकटीनं जाणं अवघडच होतं ना! तिला इतर कोणाचा आधार नसल्याने ती माझीच जबाबदारी झाली होती. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या सिव्हिल हाॅस्पिटलला बोलावण्यात आलं. आणि वासंतीवर अजून एक बाँम्बगोळा पडला. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचं निष्पन्न झालं. साडेतीन महिने उलटले होते. ही गोष्ट आधी तिच्या लक्षातच आली नव्हती. विजयरावांच्या निधनाने झालेल्या आघातामुळे, तिचं स्वतःच्या तब्येतीकडे लक्षच राहिलं नव्हतं. त्यामुळे तिचे इतर वैद्यकीय अहवालदेखील चांगले नव्हते. लोह आणि इतर जीवनसत्त्वांची कमतरता, वजन आणि उंचीचं प्रमाण इत्यादी गोष्टी योग्य प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे लगेच नेमणूक होणं शक्य नव्हतं. आता हे सगळं कसं निभावायचं हा फार जटील प्रश्न झाला होता. वासंती खूप निराश झाली होती. तिला डहाणू मधल्या महिला डाॅक्टरकडे घेऊन गेलो. त्यांनी वासंतीला नियमित औषधे, तपासणी आणि आरामाची आवश्यकता असल्याचं सांगितलं.
तिच्या हातात येणाऱ्या मोजक्या पैशांमुळे महिन्याचा खर्च जेमतेम भागत होता. त्यामुळे घरकामाला नोकर ठेवणं परवडणारं नव्हतंच. औषधांचा खर्च करणं तर भागच होतं. गर्भपात करणंही अतिशय जोखमीचं आहे, असं सांगून डाॅक्टरांनी त्याला नकार दिला.
मला मिळणाऱ्या पगारात माझा खर्च कसाबसा भागत होता. जमेल तेवढी मदत मी वासंतीला करत होतो. तिच्या नाजूक तब्येतीमुळे काहीवेळा रात्रीदेखील मला तिच्यासोबत थांबावं लागत होतं. स्त्री-पुरूष नात्याला एकाच दृष्टीने बघणाऱ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये यावरूनही कुजबुज सुरू होती. मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्यांची तोंड कसं धरणार? आम्ही दोघेही यामुळे दुःखी होत होतो. या सर्व तणावपूर्ण वातावरणातच माझी ICWA ची अंतिम परीक्षा पार पडली.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात माझा B. Com. चा रिझल्ट लागला. मी फर्स्ट क्लासने पास झालो. तिसऱ्याच आठवड्यात मला जे. अँड एम. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणं आलं. मी नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज करत होतो. त्यापैकी ही खूप मोठी कंपनी होती. त्यांच्या भारतभर अनेक शाखा होत्याच शिवाय काही शाखा परदेशातही होत्या. त्यांनी अकाउंटंटच्या पदासाठी मुलाखतीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर मला नरिमन पाॅइंटच्या मुख्य आॅफिसात दोन तीन वेळा जावं लागलं… प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी इत्यादी साठी. या साऱ्यात एक महिना कुठे गेला ते कळलंच नाही. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ात मला कंपनीकडून नेमणुकीचं पत्र आलं. मला प्राथमिक प्रशिक्षणासाठी एक महिना दिल्लीला जावं लागणार होतं, त्यानंतर प्रत्यक्ष कार्यालयात नेमणूक होणार होती.
इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली. वासंतीची परिस्थिती नाजूक होती. तिला एकटीला असं सोडून दिल्लीला जाणं मला अवघड वाटत होतं. पण नोकरीची एवढी चांगली संधी गमावणंदेखील शक्य नव्हतं. अखेर देशपांडे सरांकडे घरकाम करणाऱ्या मावशींच्या ओळखीने एक बाई मिळाली. ती विनापाश विधवा वासंतीकडे राहून तिची काळजी घ्यायला तयार झाली.
या एक महिन्यात वासंतीच्या मुलानं तिला खूपच त्रास दिला. त्याला माझी सवय झाली होती. मी घरात न दिसल्याने तो सारखा रडारड, चिडचिड करून वासंतीच्या मागे लागत होता.
माझं ट्रेनिंग संपण्याच्या आदल्या दिवशीच माझी नेमणूक भोपाळच्या आॅफिसला झाल्याचं पत्र मला मिळालं. एक आॅक्टोबरला म्हणजे तीनच दिवसानंतर मला भोपाळच्या कार्यालयात हजर व्हायचं होतं. कंपनीतर्फे तिथे मला राहायला जागा मिळणार होती.
मी दिल्लीहून डहाणूला आलो. भोपाळला राहण्याच्या दृष्टीने काही सामानही न्यायचं होतं. मी भोपाळला जाणार या कल्पनेनं वासंती कासावीस झाली.
वासंतीला आणि मलाही एकमेकांची सवय झाली होती. त्यामुळे असं वेगळं राहणं दोघांनाही त्रासदायक वाटत होतं. दोघांनाही जीवाभावाचं असं कोणीच नव्हतं. वासंतीचा मुलगा तर मला एक क्षणही एकटं सोडत नव्हता. मलाही त्याचा लळा लागला होताच. मी त्या दोघांना माझ्यासोबत भोपाळला घेऊन जायचं ठरवलं. पुढील आयुष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तशी सूचना विवाह-निबंधक कार्यालयात दिली. मी माझ्या वडिलांनाही फोन करून कळवलं. पण त्यांना हे अजिबात आवडलं नाही आणि यापुढे आपला संबंध संपला, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला.
मी भोपाळला कामावर रूजू झालो. एक महिन्यानंतर नोंदणी पद्धतीने आमचं लग्न झालं. मग पुढच्या आठवड्यात सर्व सामान बांधून आम्ही भोपाळच्या घरात राहायला गेलो. वासंतीची काळजी घेणाऱ्या मावशी मात्र आमच्यासोबत आल्या. त्या मग आपल्या घरातल्याच झाल्या. त्यांचे उपकार आजन्म फिटणार नाहीत.
नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात वरदाचा जन्म झाला. वडील म्हणून तिच्या जन्म दाखल्यावर माझंच नाव लावायचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यानंतर दोघांत भावंडांच्या नावात फरक असल्याने कोणतीही भावनिक आणि कायदेविषयक समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मोठ्या मुलाला, म्हणजे तुला, मी दत्तक घेण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. मनाने तर ते नातं आधीच स्वीकारलं होतं. त्यामुळे दत्तक विधानातील अट असली तरी या दत्तक प्रकाराचा उच्चार न करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि तशी कधी गरजही वाटली नाही.
सावत्रपणाचा कटू अनुभव मी घेतला होता, तो तुम्हां दोघां भावंडांच्या वाट्याला कधीही येऊ नये ही मनोमन इच्छा होती माझी!
तुझा आय. पी. एस. चा रिझल्ट लागला आणि वासंती पुन्हा भूतकाळात गेली. त्या सर्व दुःखद घटनांची मनात उजळणी झाली आणि त्या तणावामुळेच तिचा रक्तदाब एकदम कमी झाला आणि तिला अॅडमिट करायची वेळ आली.
विराजचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते आणि त्यानी श्रीधरला घट्ट मिठी मारली. या बाप-माणसाबद्दल प्रेम, आदर, कृतज्ञता अशा अनेक भावना त्याच्या मनात उचंबळून आल्या होत्या.