☆ अति लघु कथा (अ. ल.क.)… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
१. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो.
तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला;
मी स्थिर आहे म्हणूनच
लोकांना त्यांची गती मोजता येते रे….
२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं.
कानात कुजबुजत म्हणालं, “ एवढ्यात शेफारलास??
अरे जी मोजता येत नाही ती खरी उंची….”
३. कुठली ही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो.
तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला. आणि त्याने मला विचारलं,
या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील??
तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल….
४. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार??
एक हिरा लुकलुकला….. म्हणाला,… “ वेडा रे वेडा….”
५. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं.
त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले… ते म्हणत होतं,
“ करून बघायचं की बघून करायचं … ठरवू दे की मला, मी कसं जगायचं…”
७. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं … “ जगलास किती दिवस???? “
८. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं, “ माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?? “
लाकडं म्हणाली, “ मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला???? “
९. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून, रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी
नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या.
रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती. साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड. रोज किमान 56-60 हून अधिक फुले झाडावर असायची. फार लाडकी जास्वंद होती ती माझी. तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली, समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवसभर घरात देखील फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची.
शेजारचे सोनार काका मला रोज सांगत, “अगं भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं. मला त्रास होतो त्याचा.” मला त्यांचा त्रागा समजत असे. पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची, “ काका, एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना. काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल. मग कापतेच मी त्याच्या फांद्या. चालेल ना ?”
“ठीक आहे. पण लवकर काप. मी पडलो पाय घसरून तर ?” इति काका.
“हो, हो, लवकरच कापीन मी फांद्या. प्रॉमिस काका !” माझे ठरलेलं उत्तर .
एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे. “त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप . फार दिवसापासून ऐकतोय तुझं. आज कापते- उद्या कापते. आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या.” एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनारकाका त्यादिवशी इतके का संतापले होते मलाही समजलं नाही. माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं.
ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.
पश्चाताप तर लगेचच झाला. पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता. त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या ? त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही.
पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभर वाढलं. आश्चर्य म्हणजे एकही फांदी सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पुन्हा दहा -बारा फुट झाड वाढलं. पाने हिरवीकंच आणि टवटवीत. पण फूल मात्र एकही नाही. त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले पण याला मात्र एकही नाही. खतं-औषधे सर्व काही प्रयोग झाले. सहा महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली. काय करू मी ? सोनार काकांना पण ही घटना सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटलं.
एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती. झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदीना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर -अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे Beach Garden त्यांनी बनवलेले मी पाहिले होते. झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते . त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली. ‘दीदी, त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुले येतील?” मी अक्षरश: रडवेली झाले होते.
“There is no need for any fertilizer. Did you say sorry to that plant Bharati ? And say it honestly till it responds to you.”
“काय ? झाडाला सॉरी म्हणू ?” खरं तर डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते. वनस्पतींना भावना असतात, ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. Secret of plants सारखी अनेक पुस्तकेही वाचली होती. पण प्रत्यक्षात आपल्याला स्वत:ला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचं, इतरही गप्पा मारायच्या.
झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं पण जसजसे दिवस वाढत गेले, एक व्याकुळता माझ्या बोलण्यात – स्पर्शात आपोआपच यायला लागली.
जास्वंदीशी बोलणं, तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं. तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं ते मला अधिक महत्त्वाचं वाटलं.. दहा-बारा दिवस होऊन गेले. एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली. जणू म्हणत होती, “शोध मला. बघ मी आलेय”. आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं. पण थोडा वेळच. शेवटी मन शंकेखोर. हा निव्वळ योगायोग तर नाही ? पण चार दिवसातच जास्वंदी कळ्यांनी पानोपान बहरली. फुलेही उमलू लागली. मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली आहे.
पहिला फोन सरस्वती दीदींना केला. माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं?
त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले, “आता जन्मात कधी मी असे वागणार नाही. पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी कट्टी घ्यायची नाही बरं का !”
(नर्मदालयाच्या मा. भारती ठाकूर यांनी लिहिलेली अप्रतिम कथा.)
संग्रहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
( तिकडे काहीच पैसे सेव्ह नाही झाले.मला दुसरा फ्लॅट घेणं शक्य नाही. आणि औंधचा माझा फ्लॅट किती लहान आहे. मी कसला तिथे रहातोय. आजींचा केवढा प्रशस्त आहे ग !” रमाला हे ऐकून भयंकर संताप आला.) इथून पुढे —
तिला हे ऐकू गेलंय, हे सुदैवाने अखिलला समजले नव्हते. रमा उठून संध्याकाळी वीणाकडे गेली. वीणाला हे सगळे सांगितलं तिने. म्हणाली, “ वीणा मी आत्तापर्यंत तुला काही सांगितलं नाही ग. आपलेच दात आणि आपलेच ओठ ! माझ्याच मुलीचा मुलगा ग हा … पण काय वागते त्याची ती बायको ! आणि कसली ती मॉंटेसरीतली नोकरी आणि काय तो रुबाब.. वीणा, हे लोक आल्यापासून माझं स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य हरवून गेलंय. तुला सांगितलं नाही मी, पण अखिलने घरात एक पैसाही दिला नाही, की किराणा, दूध किती लागतं तेही विचारलं नाहीये. मला कशालाच कमी नाहीये ग, पण हा युरोमध्ये पैसे मिळवून, परदेशी राहून आलेला मुलगा ना ? इतकी स्वार्थी असतात का ग आपली मुलं?” .. रमाच्या डोळ्यात पाणी आलं. वीणाने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. “ रमा, तू का रडतेस? हे बघ! कित्ती शहाणपणा केलाय आपण, की पूर्वीच मृत्युपत्र करून ठेवलं. तेही रजिस्टर केलं, म्हणजे कोणतीही कायदेशीर त्रुटी नको. त्यात तू स्पष्ट लिहिलं आहेस ना, की हा तुझा फ्लॅट, तुझ्या पश्चात मुलगा आणि मुलीला जावा ! मग आता या नातवाचा संबंधच येतो कुठं? मुळीच देऊ नकोस. हा तुला घराबाहेर काढायलाही कमी करणार नाही रमा. त्यातून तुझ्याच मूर्ख लेकीची फूस आहेच त्याला. तू आता शांतच बस. नुसती गम्मत बघ आता, काय काय होते ते. मग बघू या त्याची चाल. मी आहे ना तुझ्यासाठी ? कशी ग ही आपलीच म्हणायची माणसं … अजिबात खचून जाऊ नकोस तू. घर आपलं, पैसा आपला … का म्हणून भ्यायचं ग यांना. जा निवांत घरी ! काहीही समजलंय असं दाखवूच नकोस. येऊ दे त्यांच्याचकडून पहिली खेळी.” …. वीणाकडून रमा मानसिक बळ घेऊनच आली.
महिना काही न होता गेला आणि एक दिवस अखिल म्हणाला, “आजी, तू अशी एकटी किती दिवस राहू शकणार? आता सत्तरी उलटली की तुझी ! मी काय म्हणतो, आता गेले वर्षभर आपण एकत्र राहतोय, तसं कायम राहायला काय हरकत आहे? मामाच्या मुलाला या घरात इंटरेस्ट नाही. तो परदेशातून काही परत येत नाही बघ. मग राहिलो मीच ! मी कायम राहीन तुझ्याजवळ !” .. रमा धूर्तपणे म्हणाली,” हो रे अखिल, किती छान होईल तू शेवटपर्यंत माझ्याजवळ राहिलास तर ! मलाही नातवाचा आधार होईल.”
— अखिल आणि रेणूची नेत्रपल्लवी रमाच्या लक्षात आलीच.
अखिल म्हणाला, “आजी, मग तू हा फ्लॅट माझ्या नावावर कर ना ! म्हणजे मलाही कायदेशीर हक्क राहील ग … तुला खात्री आहे ना, आम्ही तुला कधीच अंतर देणार नाही याची ? तुझं दुखलं खुपलं, म्हातारपण नीट बघू?” …. “ होय रे अखिल. मला तू आणि शिरीषमामाची दोन, अशी तिघेच तर आहात तुम्ही. ”
अखिलच्या कपाळावर आठी उमटली. “ मामाची मुलं? अमोल आणि अपूर्व? छेछे.. ती काय करणार तुझं ? इथंआली तर करतील ना ! कायम एक दुबईला दुसरा फ्रान्स ला! काय कमी आहे त्यांना? आणि इथं कशाला येतील ती दोघे? अग आजी, मीच बघणार तुझं सगळं ! तू माझ्या नावावर करून दे फ्लॅट. मी फुलासारखा जपेन तुला ! “ रमा तिथून निघून गेली, काहीही न बोलता !
एक महिना तसाच गेला. रमा सगळे अपडेट्स वीणाला देत होतीच. एक दिवस अखिल म्हणाला, “आजी, उद्या आई येतेय. कित्ती दिवसात आलीच नव्हती. मध्यंतरी आम्हीच आईबाबांना भेटून आलो, त्यानंतर ती कुठे आलीय ना पुण्याला? आता खास आपल्या सगळ्यांना भेटायला येतेय आई.” … ‘ आता ही कोणती नवी चाल ‘ असं मनात आलंच रमाच्या ! ठरल्यादिवशी माया बंगलोरहून आली. आल्याआल्या आईच्या गळ्यात पडली ! ‘ किती ग आई तू करतेस, किती पडतं तुला सगळं ‘ , असं म्हणून झालं. चार दिवस लेक सून नात यांच्याबरोबर फिरण्यात गेले.
जायच्या चार दिवस आधी म्हणाली, “आई, किती म्हातारी होत चाललीस ग तू. बरं झालं ना देवानेच अखिल ला पाठवलं,तुझ्यासाठी ! तू आता असं कर.. हा फ्लॅट अखिलच्या नावाने करून टाक. ती शिरीषची पोरं कशाला येतात इकडं आई? आपला अखिलच तुला सांभाळेल बरं! कधी करूया ट्रान्सफर मग डॉक्युमेंट्स? म्हणजे हे पण येतील बंगलोर हून. “
रमा हे ऐकून थक्क झाली. स्वतःच्या पोटची मुलगी इतकी स्वार्थी होऊ शकते? हा अखिल आणि त्याची ती आळशी उनाड बायको काय सांभाळणार मला? देवा ! मी हे जर प्रत्यक्ष माझ्या कानांनी ऐकलं नसतं तर माझाही विश्वास बसला नसता यांच्या मनातल्या स्वार्थी हेतूवर. रमा म्हणाली, “ माया उद्या बोलूया आपण हं.”
दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी हॉलमध्ये जमली. रमाची अशी सुटका होणार नव्हती.
रमा म्हणाली, ” कालपर्यंत तुम्ही सगळे बोलत होतात आणि मी ऐकत गेले, पण आता माझं नीट ऐका. अखिल,आज दीड वर्ष झालं, तू तुझी बायको, मुलगी इथं रहाताय. किती खर्च केलात घरात? परदेशी राहून आलेले लोक ना तुम्ही? साधं दुधाचं बिल, सुलूबाईंचा तुमच्यासाठी वाढवलेला पगार, किराणा, भाजी, याची तरी कधी चौकशी केलीत का? नशीब मला भरपूर पेन्शन आहे. नाहीतर मी कुठून केला असता हा डोईजड खर्च रे? तू खुशाल म्हणतोस, मामाच्या मुलांना गरज नाहीये या फ्लॅटची. हे तू कोण ठरवणार रे? जसा मला तू नातू, तसेच तेही नातूच. कधी पाच वर्षात म्हणालास का, ‘आजी लंडनचा काही फार मोठा प्रवास नाही, ये ना माझा संसार बघायला.’ मी सहज येऊ शकले असते रे,,स्वतः तिकीट काढून ! तू तरी म्हणालीस का ग माया? उलट अपूर्वने मला दुबईला स्वतः बरोबर नेऊन आणले. सगळी दुबई दाखवली. मी फ्रान्सलाही गेलेली आठवतेय का रे? अमोलकडे? काडीची तोशीस पडू दिली नाही मला पोरांनी. आणि किती गोड त्यांच्या बायका… खरोखर सांगते, मला इकडची काडी नाही तिकडे करू दिली त्या मुलींनी ! दुबईची सून तितकीच गोड आणि फ्रान्सची पण अशीच लाघवी. यात तुझी सून कुठेतरी बसते का माया? तूच बघ ना. मारे लंडनहून आजीकडे हक्काने आलात, काय आणलेत आजीला? हे बघ.. मला तुमच्याकडून खरंच काहीही नकोय. इथे सगळं मिळतं. पण तुमची नियत समजली मला ! अनेकवेळा हॉटेलमध्ये जाऊन जेवून येता तुम्ही, कधीही वाटलं नाही का, आजीलाही न्यावं ? मस्त आहे अजून मी तब्बेतीने ! विचारलंत का कधी एकदा तरी?— मी तुमचे दोष उगाळायला इथं बसली नाहीये. खूप दुनिया बघितलीय बरं मी ! म्हणूनच तुमच्या धोरणी आजोबांनी हा फ्लॅट फक्त माझ्याच नावावर केला. मी भाबडी आहे, व्यवहारी नाही, हे त्यांना माहीत होते. किती उपकार फेडू त्यांचे मी? “—- रमाने डोळे पुसले…. “ तर बरं का मंडळी, आहे हे असं आहे. स्वतःचा औंधचा तो तीन खोल्यांचा फ्लॅट भाड्याने दिला आहेस ना, तो लगेचच रिकामा करायला सांग. मला काही माहीत नाही असं वाटलं का? आजीने सुद्धा बँकेत 30 वर्ष नोकरी केलीय आणि ती एम.कॉम. पण होती, हे विसरू नका. जवळजवळ दोन वर्षे आजीकडे अलिशान चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहिलात. आता चार महिने मुदत देतेय. लवकरात लवकर तिकडे शिफ्ट व्हा. नाहीतर मग कुठं जायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. माया, तुझ्या ह्यांना इथे यायची काहीही गरज नाहीये. मुळीच नको बोलावू त्यांना. मी आत्ता हा फ्लॅट तुझ्याच काय, कोणाच्याच नावावर करणार नाही. माझ्या नंतरच तुम्हाला समजेल, त्याचे काय करायचे ते. सहा वर्षाची ही तन्वी मला विचारते — ‘ आजी तू इथे का राहतेस? दुसरीकडे का नाही जात?’ हिचा बोलविता धनी कोण आहे, हे समजायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. माझं बोलून संपलं आहे. चार महिन्यात गाशा गुंडाळायचं बघा. माझ्या म्हातारपणाची नका बरं काळजी करू! तीही व्यवस्था केलीय मी.”
— रमा स्वतःच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि सगळे अचंबित होऊन एकमेकांची तोंडे बघत बसले.
☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
गेले चार दिवस अगदी धो धो पाऊस पडला, म्हणून रमाला बाहेर पडता आलेच नाही. आज छान ऊन पडलं आणि हवाही छान पडली होती. ‘ संध्याकाळी जाऊया जरा फिरायला आणि भाजी, सामान आणून टाकू,’ असा विचार केला तिनं. रमाच्या मैत्रिणींचा छान ग्रुप होता. नुसत्याच गप्पा नसत मारत त्या सगळ्या,तर सतत एकमेकींच्या संपर्कात असत. एकमेकांची सुखदुःखे शेअर करत. प्रसंगी मदतीला धावून जात.
सकाळीच वीणाचा फोन आला होता, “ रमा ,बरी आहेस ना ग. ये की चहा प्यायला आणि पोहे खायला. ये ग! ” वीणाची बिल्डिंग कोपऱ्यावरच होती. साडी बदलून आणि कुंडीतली छान जास्वंदीची फुलं घेऊन रमा वीणाकडे गेली ! दोघींच्या जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. वीणाची दोन्ही मुलं परदेशात. मिस्टर अचानकच गेले चार वर्षांपूर्वी. या फ्लॅटमध्ये वीणा एकटीच रहाते. रमाचीही स्थिती काही वेगळी नाही. फरक इतकाच की तिची मुलं परदेशात नाहीत, तर मुलगा दिल्लीला आणि मुलगी बंगलोरला स्थायिक ! म्हणून रमाही एकटीच. तिचे यजमान माधवराव सहा वर्षांपूर्वी हार्ट अटॅकने गेले, तेव्हापासून रमाही एकटीच पडली.
पण या दोघीही आर्थिक दृष्टया स्वतंत्र होत्या. दोघींचीही नोकरी एकाच बँकेत, त्यामुळे मैत्री अगदी घट्ट झाली. राहणी अतिशय साधी पण अभिरुचीपूर्ण. आणि दोघी मैत्रिणी अगदी रसिक. दोघींनीही छान सेव्हिंग्ज केलेली आणि पुन्हा पेन्शन तर होतेच. अधून मधून दोघीही लहानशी ट्रिप करून येत आणि ताज्यातवान्या होत.यांची मैत्री हा हेव्याचाच विषय होता इतर बायकांचा, पण या ते जाणून होत्या. आणि आपल्या मैत्रीत कधीच कसलीही बाधा येऊ द्यायची नाही, हा अलिखित करार होता त्यांचा ..
कालच रमाला अखिलचा … तिच्या नातवाचा फोन आला होता. अखिलचं पोस्टिंग पाच वर्षासाठी लंडनला झालं होतं आणि तो बायकोला आणि मुलीला घेऊन लंडनला गेला होता. पण ते कॉन्ट्रॅक्ट आता चार वर्षांनीच सम्पले होते, आणि त्याला कंपनीने पुन्हा पुण्यात पोस्टिंग दिले होते. अखिलने आजीला फोन करून विचारलं, “ आजी, मी, रेणू आणि माझी मुलगी तन्वी, तुझ्याकडे काही दिवस राहायला आलो तर चालेल का? तन्वीची शाळा तुझ्या घरापासून जवळच आहे आणि रेणूला पुन्हा नोकरी बघता येईल. अचानकच माझं इथलं कॉन्ट्रॅक्ट एक वर्ष आधीच संपलं म्हणून जरा पंचाईत झालीय. ” रमा म्हणाली “ या की! त्यात काय ! मलाही छान कंपनी होईल तुमची ! ” आज हे रमाने सहज म्हणून वीणाला सांगितलं.
नाही म्हटलं तरी वीणा रमापेक्षा जास्त व्यवहारी होती. रमा भावना प्रधान आणि भावनेच्या भरात पटकन कोणतेही निर्णय घ्यायची. आणि तिचा त्यामागचा हेतू चांगला असला, तरी मागून तिलाच त्याचा त्रास व्हायचा. वीणा हे जाणून होती. म्हणून लगेच तिने रमाला विचारलं, ” रमा, किती दिवस येणार आहे ग अखिल? “ .. “ तसं काही बोलला नाही बाई तो ! मी तरी लगेच कसं विचारणार ना ? नाही म्हटलं तरी मुलीचा मुलगा ! तिकडून तिलाही यायचा राग, की आईनं एवढी सुद्धा मदत नाही केली माझ्या मुलाला म्ह्णून !” रमा म्हणाली. हेही अगदी बरोबरच होते म्हणा !
रमाचा फ्लॅट खूप मोठा आणि सुरेखच होता. तिचे पति माधवराव चांगल्या नोकरीत होते आणि एकूण सधन कुटुंबातलीच होती रमा. वीणाने शांतपणे रमाचे ऐकून घेतले आणि जे जे होईल, ते ते पहावे म्हणत गप्प बसली. ठरल्यावेळी अखिल,रेणू आणि तन्वी रमाच्या फ्लॅट मध्ये दाखल झाले. रमाने मोठी बेडरूम त्यांना दिली. सगळी बेडरूम तिने अतिशय नीटनेटकी करून, कपाटे रिकामी करून ठेवली होती. काम करणाऱ्या बाईना सांगितलं, “ मी तुम्हाला पगार वाढवते सुलूबाई ,आणि तुम्ही माझ्याकडे पोळीभाजी पण करायला या. एकदम तीन माणसं वाढली म्हणजे खूप कामही वाढणार तुमचं. मग मी इतका इतका पगार वाढवते ! चालेल ना? “ सुलूबाई हसत तयार झाल्या. आजींचा उदार हात त्यांनाही माहीत होताच. पहिले काही दिवस खूप गडबडीत गेले. तन्वीची ऍडमिशन, अखिलचे रुटीन, रेणूचेही बस्तान बसवायला– नाही म्हटलं तरी सगळ्यांना अवघड जातच होते. थोड्या दिवसात सगळं नीट लागी लागलं. रेणूला जवळच एका शाळेत पार्टटाईम जॉब मिळाला. सगळं घर अगदी बिझी होऊन गेलं. सकाळी अखिल रेणू आणि तन्वी गेले, की मगच रमा रिकामी होई. त्यांचे नाश्ता, चहा सगळे बाईंकडून रमा करून घेई. रेणू जमेल तशी मदत करे, पण ती तन्वीच्याच मागे असे. तिचा डबा, स्कूल बस, मग आपली तयारी. रमा हे सगळं बघत असे.
गम्मत वाटायची तिला. दोन लागोपाठची आपली मुलं, सासूसासरे, नोकरी, हे सगळं तिनंही लीलया पेललंच की. मग एकच मुलगी, नोकर चाकर, शिवाय मी, असताना हिला एवढे उरकत कसे नाही? या मुलीनं लंडनला कसं काय केलं असेल? तिकडे तर ना नोकर ना मदत. कालच मुलीचा बंगलोरहून फोन आला होता .”आई, कसं चाललंय सगळं? तुझी अडचण नाहीये ना होत? दोन नोकर जास्त ठेव ग बाई ! रेणूला कामाची सवय नाही. तन्वी तर किती पसारा करते ना. आणि अखिल तर कधीच काही आवरत
नाही. ” कौतुकाने बंगलोरहून माया, रमाची मुलगी लाडेलाडे बोलत होती. रमाचे डोके सटकलेच, पण ती वेळ काही बोलायची नव्हती. रमाने काहीतरी बोलत वेळ मारून नेली. आता तिला खूप काम होते.
तिला पसारा अजिबात चालायचा नाही. तिचं घर कसं नेहमी आवरलेलं ,चकचकीत आणि आरशासारखं ठेवलेलं! हा पसारा अजिबात आवडायचा नाही तिला. पण तिनं एक पथ्य पाळलं होतं, त्यांच्या रूममध्ये जायचं नाही, आवरायचं नाही. काय वाटेल तसे का पडलेले असे ना !
अखिल रेणू येऊन सहा महिने होऊन गेले. रेणूनं एक दिवस विचारलं, “ आजी, उद्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी येणार आहेत चहाला. तर सुलूबाई करतील ना इडली सांबार, शिरा? ” रमा म्हणाली, “ नाही ग करणार ! तुला माहीत आहे ना, त्यांना दहा घरची कामं आहेत. तू कर ना! तुझ्या मैत्रिणी येणारेत ना…. बघ आणि मगच ठरव हं !” रमाच्या अपेक्षेप्रमाणे, सुलूबाई नाहीच म्हणाल्या. रेणू शाळेत गेल्यावर त्या रमाला म्हणाल्या, “ बाई,राग नाही ना आला माझा? अहो ! आज सहा महिने बघतेय,जराही जाणीव नाही तुमची या बाईला ! काय हो पसारा,आणि उरक म्हणून न्हाय. काय ती बेडरूम पसरलेली ! माझा घाम निघतोय आवरून ! मी करतेय इडली सांबार— वाट बघा ! करू देत की त्यांना. बाई, तुम्ही बी नका करू बरं का !तुम्ही पडल्या भिडस्त !” सुलूबाई हसायला लागल्या. “ बाई, कायम राहणार का इथं हे लोक? आपण एकमेकींना साहेब असल्यापासून ओळखतो न्हवं का ? बाय,, घेऊ नका हं हे लचांड मागं लावून ! “
रमाही हसली आणि तिला सुलूबाईंचं कौतुक वाटलं. किती बरोबर ओळखलं तिनं सगळ्यांना. रेणू मात्र चिडलेली दिसली..सुलूबाईंच्या नकारानं पार्टीचा बेत कॅन्सल झालेला दिसला. ‘ अजिबात उरक नाही स्वतःला, आणि त्या बिचाऱ्या सुलूबाईंचा जीव घेणार ही ! वर त्यांना चार जास्त पैसेही देणार नाही, मग कसं कोण काम करणार?’
त्या दिवशीही असंच झालं. रेणूच्या शाळेत काही प्रोग्रॅम होता. “ आजी तन्वीला बसस्टॉपवरून आणाल का प्लीज ? मला येता येत नाहीये घरी. “ रेणूचा रमाला फोन आला. धडपडत उन्हाचं तन्वीच्या बस स्टॉप वर जावे लागले रमाला. पुन्हा आल्यावर “ आजी, हेच नकोय खायला, पोहेच करून दे,“ हे करून झालेच! थकून गेली अगदी रमा. तीही आता सत्तरी कडे झुकली होतीच की. रेणू त्या दिवशी संध्याकाळी सहाला आली. आल्यावर एक शब्द नाही की, “ आजी सॉरी! अचानक उशीर झाला. तुम्हाला त्रास झाला ना?” रमाला हे दिवसेंदिवस डोईजड व्हायला लागले. सांगता येईना आणि सहन करता येईना अशी परिस्थिति झाली तिची. असेच एक वर्ष गेले.
एक दिवस अखिलला आईशी बोलताना चुकून रमाने ऐकले, “आई ,गेले वर्षभर राहतोय आम्ही इथं. आम्हाला आवडतो हा आजीचा फ्लॅट! काय हरकत आहे ग हा आम्हाला द्यायला तिनं? बाकीच्या नातवंडांना कोणालाही नकोय. सगळे तर परदेशात आहेत. तू बोलून बघ ना आजीशी ! माझं तर फार सेव्हिंगही नाहीये ग ! तिकडे काहीच पैसे सेव्ह नाही झाले. मला दुसरा फ्लॅट घेणं शक्य नाही, आणि औंधचा माझा फ्लॅट किती लहान आहे ! मी कसला तिथे रहातोय. आजींचा केवढा प्रशस्त आहे ग !”
“अग सुरू जरा खाली येतेस का..?ताजं लोणचं देते तुला.. लवकर ये पण, मला देवळात जायचं आहे गं..” असं म्हणत साने आजी घराच्याबागेतून आत गेल्या…
गॅलरीतली सुरू नवरोबा कडे वळून म्हणाली, “अहो जाऊ ना.. माझी फारशी ओळख नाही म्हणून म्हंटलं…”
त्यावर हसत अवि म्हणाला, “जा जा, फार चवदार पदार्थ असतात आजींच्या हातचे.. आणि तेवढ्याच मायेने देतात देखील. अगं आपलं लग्न ठरलं तश्या मला चिडवत होत्या ‘आता आजीने पाठवलेले पदार्थ आळणी लागतील’, अग आईला देखील बरेच पदार्थ त्यांनी शिकवले….जा बिनधास्त खुप काही शिकवणारं व्यक्तिमत्त्व आहे सानेआजी..”
सुरू आजीच्या दाराजवळ आली तर तिथेच तिला एकदम प्रसन्न वाटलं…. छोटी तुळस.. दारात रांगोळी, दरवाज्याला तोरण… तिने बेल दाबली तश्या लगबगत आजी आल्या.. बुटक्याश्या आजी मस्त गुलाबी कॉटनचे पातळ.. पांढऱ्या शुभ्र केसांचा छोटासा अंबाडा, त्यात मोगऱ्याचं फुल, एका हातात घड्याळ… अगदी गोड हसणाऱ्या आजी.. तोंडात कवळीच असावी पण ती देखील त्यांना अगदी शोभत होती..
फ्लॅट वन बीएचकेच होता आणि मागची थोडी बागेची जागा.. सगळं न्याहाळत सुरू बैठकीत बसली… ‘आपला फ्लॅट मोठा असुन प्रसन्न नाही, आजीच्या घरात किती छान वाटतंय’ ती विचार करत होती तेवढ्यात आजी थंड पन्ह घेऊन आल्या…
काहीतरी बोलावं म्हणुन सुरू म्हणाली, “महिना झाला लग्नाला पण माझं जास्त खाली उतरणंच झालं नाही. आई आजारी आहेत त्यामुळे जरा जास्तच काम पडलंय…”
खरंतर अगदी बरोबर खालचा फ्लॅट असल्याने आजीला सगळा आवाज स्पष्ट येत होता… ह्या नव्या नवरीला सासूच्या तब्येतीची सगळी माहिती देऊनच लग्न ठरलं होतं.. अवि इतका हुशार, देखणा, पण तरिही ‘माझ्या आईची सेवा करायला जी तयार होईल तिच्याशीच लग्न करणार’ असं त्याने ठरवलं होतं…
सुरू तशी फार शिकलेली नव्हती. दिसायला ठिकठाक आणि घरी गरिबी, त्यामुळे त्यांनी चटकन हे स्थळ स्वीकारलं.. कॅन्सरमुळे सासु सहा महिने जगणं तसं कठिण ह्याची कल्पना दिलीच होती.. तरी पण सुरुचा आवाज जरा जास्तच वरच्या पट्टीत लागत होता हे साने आजींनी बरोबर हेरलं.. म्हणून आज हे बोलावणं…
आजी सुरुला म्हणाल्या, “चल तुला बाग दाखवते..”
बागेत जातांना मागच्या खोलीत कुणीतरी पलंगावर तिला दिसलं. “कोण झोपलं आहे आत??” सुरुने विचारताच आजी म्हणाल्या, “माझ्या सासुबाई, नव्वद वर्षाच्या आहेत.. फक्त तोंड सुरू आहे, बाकी सगळं जागेवर..”
हे सांगत असतांना आतुन आवाज आला.. “कोण गं, सुरू आली का..?इकडे आण तिला..” सुरुने साने आजीकडे आश्चर्याने बघितलं..
साने आजी हसून म्हणाल्या, “अगं, आमच्या दोघींमध्ये संवाद हा सगळा भोवतालचा असतो… कोणाकडे सुन आली..? कोणाला लेकरू झालं..? कोणाला नोकरी?? कोण गावाला गेलं ?? अश्या सगळ्या गप्पात तू त्यांना माहीत आहेस, आणि मघाशी हाक मारली तेंव्हा ऐकली की त्यांनी…”
दोघी खोलीत गेल्या.. पलंगावरच्या पांढऱ्या शुभ्र चादरीवर त्या सासुबाई झोपलेल्या होत्या. अगदी प्रसन्न, स्वच्छ छान मंद कापुराचा सुवास दरवळत होता.. पलीकडे सानेआजीचा दिवाण, त्यावर दोन जप माळ, बाजुला दासबोध…
साने आजीने सासुबाईला मानेत हात घालून पाणी पाजलं.. लगेच बाजुच्या रुमालाने तोंड पुसलं.. सासुबाईंनी सुरुला बसायची खुण केली.. हे सगळं बघून सुरुला आपण किती रागारागाने सासूबाईंच करतो हे जाणवलं..
सासुबाई म्हणाल्या, “सुरू, आजारपण कोणाला आवडत नसतं, पण ते वाट्याला आल्यावर त्याचं दुःख जास्त तेंव्हा वाटतं जेंव्हा आपलेच आपला त्रागा करायला लागतात..”
सुरूला जरा अंदाज आला, बहुतेक आपलं सासुशी वाद घालणं ऐकू येत असावं.. आणि मनातून जाणवलं, आपण खरंच त्या मानाने काहीच नीट करत नाही सासुबाईचं. तेवढ्यात साने आजी म्हणाल्या, “तिला आपली बाग दाखवते हं आई.. चल गं..”
दोघी मागे आल्या.. गर्द आंब्याच्या सावलीत खुर्चीत बसवत साने आजी म्हणाल्या.. “हे बघ, हा आंबा सासुबाईंनी माझ्या हाताने लग्नानंतर लावला.. आणि मला सांगितलं ‘तुझा संसार म्हणजे हे झाड.. जशी काळजी घेशील तसं बहरेल,.. रोज प्रेमाचं पाणी झाडाला आणि संसाराला गरजेचं आहे.. त्याभोवती कचरा, दगड, गोटे येतच राहणार, जसे आपल्या संसारात येणाऱ्या अडचणी, न पटणारी माणसं… पण त्यांना तिथेच पडू द्यायचं नाही, त्यांचंच प्रेमाने उचलुन आळं करायचं भोवताली.. मग बघ, मधल्या पाण्याची ओल त्यांनाही लागते… तेही मग झाडाचं रक्षणच करतात. तसंच नात्याचं आळं करायचं आपल्या आयुष्यात, कामीच येतं गं… आणि हो, त्या झाडाला सारखं येता जाता गोंजारायचं, ते तुझ्यासारख्या नव्या नवरीच्या भुमिकेत असतं ना… पण फार दिवस नाही, कारण एकदा का ते रुजलं कि बघ, आज बहर तुझ्या समोर आहे.. आज नशिबाने आम्ही दोघीच राहलोय सोबतीला.. त्या आजारी आणि माझी सत्तरी.. त्या नव्वदिला असल्या तरी माझ्याशिवाय जेवत नाहीत.
नात्यांचा मोहर कायम टिकवावा लागतो. त्यासाठी प्रेमाचं पाणी घालायला विसरायचं नाही.. मला वाटतं तुला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे.. चल हे रोपटं लाव पलीकडे आणि रोज येऊन तू बघायचं त्याला रुजेपर्यंत…”
सुरुने मनापासून रोप लावलं.. घरात येत आजींनी बरणी तिच्या हातात ठेवली.. “बघ हे रुजणं मनातुन झालं कि असं स्वादिष्ट लोणचं आपोआप तयार होतं..”
सुरू घरी आली.. सगळा संवाद तिच्या मनात रुंजी घालत होता.. तिची भूमिकाच बदलून गेली.. आठवडाभरात वरून येणारे सुरूचे आवाज बंद झाले.. साने आजीला सासुबाई म्हणाल्या.. “रुजणं सुरू झालं वाटतं पोरीचं..”
आज आईला घेऊन दवाखान्यातुन घरी जाताना अविने पायऱ्यांवरून मुद्दाम जोरात हाक मारून सांगितलं, “आजी डॉक्टर म्हणाले, आईची प्रकृती सुधारत आहे.. बहुतेक तुम्ही लावलेलं आंब्याचं झाड रुजायला लागलं बरं का…. चांगले विचार घालुन दिलेले लोणचं फारच मुरेल असं दिसतंय…”
“छान छान…” म्हणून आजी आतूनच ओरडल्या आणि खुदुखुदु हसत त्यांनी सासुबाईंना टाळी दिली.. दरवाज्यातून रुजेललं ते रोपटं वाऱ्यावर आनंदाने हलत होतं.. तिथे ह्या दोघींना सुरूचा चेहरा दिसला.
“ अगं, तो म्हणतोय ना? मग आणू दे की त्याला हवं ते गिफ्ट… तू का नाही म्हणतेयस ? “
बाबा सूनबाईंच्या साधेपणावर, विचारीपणावर खुश होऊन म्हणाले.
“ बाबा, तुम्हीपण ऐकत नाही माझे .. मग आईतरी ऐकणार आहेत थोड्याच ? त्या तुमच्याच सुरात सूर मिसळणार…”
ती आत जाता जाता म्हणाली , त्यावर बाबा फक्त हसले. तो दिगमूढ होऊन हे सारे पाहत होता.
‘ किती नाटकी आणि पाताळयंत्री बाई आहे ही… आई बाबांना कसे सांगू ? कसे समजावू ?’ तो मनात म्हणाला खरं..पण ‘ हिच्यापुढे आपला काय निभाव लागणार?’ या विचाराने आणि तिचे वागणं पाहून खरेतर तो मनातून गर्भगळीत झाला होता. ‘ तिचे हे असले वागणे आता कुठंल्या टोकापर्यंत जाणार आहे ? किती काळ चालणार आहे ? आणि या साऱ्याचा शेवट नेमका काय होणार आहे? ’ या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला होता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती.. या साऱ्यात आपले काहीही झालं तरी चालेल पण आपले सरळसाधे आईबाबा भरडून निघता कामा नयेत..असे त्याला वाटत होतं पण ती कधी कशी वागेल याचा त्याला काहीच अंदाज येत नव्हता..
मध्यमवर्गीय मानसिकतेने मनात असणारी बदनामीची भीती.. लोक काय म्हणतील ? याची प्रत्येकक्षणी मनात दाटणारी भीती. अशा भीतीची सावली आयुष्यभर पाठलाग करीत राहत असते. त्याच्याबाबतीतही तेच घडत होतं. त्याला ऑफिसातले, बाहेर असतानाचे क्षण हे त्याच्या मनावरती तिच्या या असल्या वागण्याचा कितीही ताण असला तरी ,काहीसे बरे, काहीसे मुक्त झाल्यासारखे, काहीसे सुटकेचे आणि हवेहवेसे वाटू लागले होते.. लवकरात लवकर काम आटोपून ऑफिसमधून घरी परतायची, तिला भेटायची ओढ उरली नव्हती. त्याचं मन ऑफिसमध्ये जास्तच वेळ रेंगाळू पाहत होते. घरी आले की मनावरचा ताण अधिकच वाढत होता. दिवसेंदिवस तो मनानं अधिकाधिक खचत होता. तो तिच्यापासून, त्या भयापासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत होता पण भय त्याची पाठ सोडत नव्हते. तिच्या वागण्या- बोलण्याने मनात रुजलेलं भय त्याला गिळंकृत करू लागले होते..
तो स्वतःच्याच विचारात राहू लागला.. मित्रांसोबत राहण्याचं टाळू लागला. मित्रांच्यात असला तरी गप्पागोष्टीत त्याचे फारसे लक्ष नसते हे त्याच्या जवळच्या मित्रांनाही जाणवू लागलं होतं.
“ काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे काय?”
त्याच्यातील बदल जाणवून मित्रानं त्याला एके दिवशी एकट्याला गाठून विचारले. तो आपल्याच विचारात होता. मित्राने पुन्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा तो भानावर आला.
“ नाही.. काहीच प्रॉब्लेम नाही.”
“ हे बघ .. गेले काही दिवस पाहतोय, तू खूप विचारात असतोस..एकतर सर्वांना टाळत असतोस.. आणि भेटलास तरी कुठल्यातरी दुसऱ्या जगात असल्यासारखा स्वतःतच गुरफटलेला असतोस, आमच्यामध्ये, गप्पांमध्ये सामील नसतोसच. एकतर तू नसतोस आणि असलास तरी नसल्यासारखाच असतोस. आपल्याचं विचारात असतोस.. कशातच सहभागी होत नाहीस.. मलाच नव्हे तर आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला जाणवतंय ते.. बोललास तर बरं होईल.. काही अडचण असेल सांग. त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल..”
“ नाही रे खरंच काही नाही. “
“ काहीच अडचण , समस्या नसेल तर चांगलंच आहे.. पण मग पूर्वीसारखा मिसळत का नाहीस सर्वांत ? लग्न झालंय तुझे.. पू्र्वीसारखं नियमित भेटणं तुला जमणार नाही हे जाणून आहोत आम्ही… पण भेटल्यावर ही वेगळाच राहतोस.. असं वेगळं राहणं, अलिप्त असणं हा तुझा स्वभावच नाही हे आम्हांला ठाऊक आहे .. त्यामुळे मग आम्हाला प्रश्न पडतो.. तू काहीतरी अडचणीत, समस्येत आहेस असं वाटू लागलंय.. मला एकट्याला नाही तर आम्हां सगळ्यांनाच तसं वाटू लागलंय.. अगदी काहीही अडचण असेल, समस्या असेल तरी बोल. “
“ नाही रे तुम्हाला वाटतंय तसे काहीच नाही… आणि असते तसं काही तर तुमच्याशी नाही का बोलणार मी ? बराच वेळ झालाय.. भेटू पुन्हा.. चल, निघतो मी आता..”
तो घड्याळात पहात म्हणाला आणि झटकन उठून निरोप घेऊन निघून गेला.
तो बोलणे टाळण्यासाठी निघालाय हे मित्राच्या लक्षात आलं होतं. तो निघून गेला तरी ‘ काय झालं असेल? हा प्रश्न मित्राच्या मनात बराच वेळ रेंगाळत राहिला होता.
तो घरी आला दारावरची बेल वाजवली.. तिने हसतमुखाने दार उघडलं.. तिला समोर पाहताच , ‘आता ती काय बोलेल ? कशी वागेल ? ‘ हा विचार मनात आला आणि इतका वेळ त्याच्या मनात झोपलेल्या भयाच्या अजगराने, जागं होऊन त्याच्या तन-मनाला विळखा घालायला सुरुवात केली.
“ ऐक ना .. मी काय म्हणते.. आपण असला डायमंड नेकलेस घेऊया मला ? ओरिजनल डायमंड आहेत हे..”
एका मासिकात आलेली डायमंड ज्वेलरीची जाहिरात दाखवत तिने विचारले.
“ अगं पण खूपच किंमत असेल त्याची.. आपल्याकडे तेवढा बॅलन्स नाहीय.. प्लिज.. दुसरे काहीतरी घेऊया.. एक लाखापर्यंत .. माझ्याकडे तेवढेच आहेत.. “
“ माझ्या वाढदिवसासाठी पण नाहीत ? बाबांकडून घे ना तुझ्याकडे नसतील तर..”
“ बाबांकडून कसे घेणार ? आपण या वाढदिवसाला आपल्या बजेटमध्ये बसेल असे दुसरे काहीतरी घेऊया ना..”
“ नाही मला तेच डायमंड नेकलेस हवंय..”
“ अगं पण पैसे नाहीत तेवढे.. आणि बाबांकडून पैसे घेणं बरं नाही दिसणार..”
तो तिला अजिजीने म्हणाला. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली,
“अगदी बरोबर आहे तुझे.. बाबांकडून पैसे घेणं बरं नाही दिसणार ते.. आई, बाबा, तू .. तुम्ही तिघेही तुरुंगात खडी फोडायला गेलात तर ते मात्र बरे दिसेल .. पेपरात मोठ्या टाईपमध्ये तुमची तशी बातमी आली तर ते बरे दिसेल.. हो ना ?”
“ अगं, काय बोलतेस तू हे ? त्यांचा काय संबंध इथे.. अगं, ते तुझ्याशी किती मायेनं वागतात अन् तू त्यांच्याबद्दल असा विचार करतेस ? “
तिच्या त्या वाक्याने तो क्षणभर दचकला होता. एका क्षणात तिच्या ते वाक्य चलचित्र होऊन त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले होते. मनात भयाची लाट पसरली पण दुसऱ्याच क्षणी त्याला स्वतःच्या हताशपणाचा राग आला होता. आईबाबांचे नाव तिच्या तोंडी अशा पद्धतींने आल्यानं न राहवून रागातच तो म्हणाला. बोलताना त्याच्याही नकळत त्याचा आवाज चढला होता.
“ चुकलंच माझे.. त्यांच्याबाबतीत मी काहीच कृती न करता नुसताच असा विचार करतेय हे खरंच चुकलं माझे…आणि एक तुला सांगायचे राहिलेच बघ. तुझे प्रत्येक वाक्य पुरावा म्हणून माझ्याजवळ असते.. अगदी जपून ठेवलेले असते, तू आवाज चढवून बोललास माझ्याशी तर तो तुझ्याविरुद्धचा कौटुंबीक छळाचा पुरावाच ठरेल हे मात्र तू विसरू नकोस हं ! “
ती खूप शांतपणे बोलत होती.. तो मनातून खूप चिडला होता पण काहीच बोलला नाही.. तिच्या वागण्या- बोलण्यानं मनावर भयाने सावली धरली होती. तिच्या तोंडून ‘कौटुंबिक छळ ‘ शब्द ऐकताच तो गलितगात्र झाला होता. ती म्हणेल तसे वागण्यावाचून आपल्याला दुसरा काही पर्यायच नाही असे त्याला वाटू लागलं होतं.
आपली स्थिती दगडाखाली हात सापडलेल्या माणसासारखी झालीय असे त्याला वाटू लागले होते. त्याला स्वतःपेक्षा जास्त आई- बाबांची काळजी वाटत होती. आयुष्यभर कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारी सरळ स्वभावाची पापभिरू माणसे ती… त्यांना हे सारे समजले तर त्यांना कसे सहन होईल ? ती दोघेही उन्मळून पडतील, कोसळून पडतील ही भीती वाटत होती आणि म्हणूनच तो त्यांना काहीही न सांगता एकटाच सारं सोसत होता.
कधीतरी तिला आपल्या चुकीची जाणीव होईल, तिच्यात बदल होईल आणि सारे सुरळीत होईल हा वेडा आशावादही कधीकधी त्याच्या मनात निर्माण होत होता.. हे ही दिवस जातील असे त्याचे वाटणे त्याला सोसण्याचं बळ देत होतं .
“ बाबा, मला थोडे पैसे हवे होते..”
त्याच्या मनात नसतानाही पहाटे हॉलमध्ये बसून चहा घेताना, काहीसा चाचरतच तो बाबांना म्हणाला. खरेतर बाबांजवळ पैसे मागायला त्याचं मन धजावत नव्हते. त्याची त्याला शरम वाटत होती पण कसंबसं खाली मान घालून जमिनीकडे पहात तो बाबांना म्हणाला होता. बाबांनी क्षणभर त्याच्याकडे पाहिले. त्याची मनस्थिती त्यांच्या ध्यानात आली. त्यांनी त्याच्या खांद्यावर मायेनं हात ठेवला.
“ किती पाहिजेत ? अरे ,बाबा आहे मी तुझा.. काही बोलताना, सांगताना, मागताना असे अवघडून कशाला जायचं बाळा..? सांग ,किती पाहिजेत?”
त्याचे डोळे पाणावले होते.
“ बाबा, वाढदिवस आहे ना तिचा… आपल्या घरातला पहिला वाढदिवस.. ,तिला काहीतरी चांगलं गिफ्ट द्यावं म्हणत होतो. डायमंडचा नेकलेस घ्यावा म्हणत होतो.. माझ्याकडे एक लाख आहेत..”
बाबांनी त्याच्याकडे पाहिले. आपल्याकडे पैसे मागताना त्याला अवघडल्यासारखे झालंय.. तो त्याच्या मनात नसताना नाईलाज म्हणून पैसे मागतोय हे त्यांच्या ध्यानांत आलं होतं. त्याचे अवघडलेपण कमी व्हावं म्हणून बाबा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले,
“ अरे व्वा ss! खूप चांगलं ठरवलंस . सुनबाईच्या पसंतीने हवे ते घे. पैसे किती लागतील ते तेवढं सांग. “
“ बाबा, सांगा ना यांना काहीतरी, अहो, वाढदिवसाला डायमंड नेकलेस आणायचा असं हे म्हणतायत.. उगाच कशाला इतका खर्च.. आपण वाढदिवस साधेपणाने, नुसता केक आणून घरच्याघरी करूया.. हवंतर आपण चौघे बाहेर कुठंतरी जेवायला जाऊया.. असे म्हणत होते मी .. पण हे ऐकायलाच तयार नाहीत. तुम्हींतरी समजावा यांना..”
ती बाबांचं आणि त्याचं बोलणे ऐकत किचनमध्ये उभी होती . तिथून हॉल मध्ये येत तक्रारीच्या सुरांत बाबांना म्हणाली. तिचे बोलणे ऐकून त्याने दचकून तिच्याकडे पाहिले.
का कुणास ठाऊक पण तिचे ते बोलणं ‘ रात गई, बात गई ‘ अशात मोडणारं नाही असा विचार त्याच्या मनात सारखा येत होता. सारखा तोच विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याने तो मनोमन अस्वस्थ ही झाला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे गजर न लावताही त्याला जाग आली. बाबा उठलेले होतेच. ती जागीच आहे असे त्याला वाटलं पण तिच्याशी काहीही न बोलता तो किचनमध्ये गेला आणि चहाचं पातेलं घेऊ लागला.
“ काय चिरंजीव, आज लवकर उठलाय ? … आणि हे काय चिरंजीव ? तुम्ही चक्क चहा ठेवताय ? अरे कशाला? मी करतो माझा चहा. तू जा झोप जा हवंतर. की चहा घेणार आहेस ? माझ्या हातचा फक्कड चहा घेऊन तर बघ.”
बाबांच्या या वाक्यावर तो हसून काहीतरी बोलून चहाचे आदण गॅसवर ठेवायला वळणार इतक्यात ती आत येत म्हणाली,,
“ हे हो काय? मला नाही का उठवायचं ? जाग आली पण पुन्हा जरा डोळा लागला माझा. सरका बाजूला.. मी असताना तुम्ही कुणी नाही हं काही काम करायचं ..“
“ नको. आज मी करतो…आणि माझ्या हातचा चहा तू पिऊन तर बघ… तुझ्याइतका चांगला नाही पण तसा बरा करतो हं मी चहा..”
“ खरंच, आज करू दे त्याला चहा. त्याच्या हातचा चहा पिऊन तर बघू ? “
तिने ‘ नाही हं बाबा..’ म्हणत त्याला बाजूला करून स्वतः चहा केला. बाबा ‘आपल्याला किती चांगली सून मिळालीय.. ‘ अशा विचारानं समाधानानं आणि अभिमानानं तिच्याकडे पहातच राहिले होते.
तो मात्र मनातून अस्वस्थ झाला होता. त्याला तिच्या वागण्याचं कोडे काही सुटेनासे झालं होतं .
बाबा चहा घेऊन फिरायला बाहेर पडले. ती बेडरूममध्ये गेली तरी तो बराच वेळ तिच्या वागण्या-बोलण्याचा विचार करीत तिथंच हॉल मध्ये बसून राहिला होता. तिने बेडरूममधूनच त्याला हाक मारली तसा तो दचकला आणि झटकन आत गेला.
“ कसला विचार करतोयस ?”
“ कसला नाही ..असाच बसलो होतो.”
“ असाच म्हणजे..? तुला सांगितलं होतं ना मी .. की मी नाही म्हणले तरी चहा तूच करायचास म्हणून.. मग..? “
“ पण तू कुठे करून दिलास ?… आणि अशी का वागतेस ? माझे काही चुकलंय काय? “
“ लक्षात ठेव..मला गृहीत धरण्याचा, माझ्यावर नवरेपणा गाजवण्याचा विचारही मनात आणू नकोस..”
“ अगं पण मी कधी नवरेपणा गाजवलाय ? मी तसा कधी वागलोय का तुझ्याशी..?”
“ कधी वागलोय का म्हणजे ? तसे वागायचा विचार आहे की काय ? तसा विचार मनात असेल तर तो काढून टाक मनातून. माझ्याजवळ चालणार नाही ते कधीच. आधीच सांगून ठेवतेय.. “
ती म्हणाली तसे तो काहीच न सुचून तिच्याकडे पहातच राहिला.
” काय रे तुला चारशे अठठ्यांणव कलम माहीत आहे ना ? नसेल तर माहीत करून घे लगेच. “
तो काहीसा दचकला. काहीच प्रत्युत्तर न देता, काहीही न बोलता तिच्याकडे फक्त पहातच राहिला होता. मनात विचारांचे वादळ उठले होते.. त्याला चारशे आठठयांण्णव कलमच काय इत्तर अनेक गोष्टी या फक्त वाचून, ऐकूनच ठाऊक होत्या. तिच्या वाक्क्याने भयाची एक थंडगार लाट त्याच्या पूर्ण मनाला गिळून गेली. क्षणभर वाटले,सारं काही बाबांना सांगावं ..पण त्यांचा विश्वास बसेल आपल्या बोलण्यावर..? तिचे बेडरूम बाहेरचं वागणे, बोलणे असे होते की बाबाच काय जगातलं कुणीच त्याच्यावर विश्वास ठेवण्याची सुतराम शक्यताच नव्हती.
बऱ्याचदा ती त्यांच्याशीही चांगली वागायची पण मधूनच कधीतरी कायदा स्त्रीच्या बाजूने असल्याची जाणीव ती त्याला करून द्यायची. ती कधी कसे वागेल याचा काहीच अंदाज त्याला यायचा नाही. ती अधूनमधून अशी का वागते ? का धमकावते ? याचं कोडं खूप विचार करूनही त्याला सुटत नव्हतं. आपण तिचा विश्वास संपादन करायला कमी पडलो काय? हा प्रश्न त्याच्या मनात रुंजी घालत होता. त्याला तिचे ते वागणं सहन होत नव्हते आणि त्याला त्याबद्दल कुणाला सांगताही येत नव्हतं.. त्याचा आत्मविश्वासही दिवसेंदिवस कमी होत चालला होता.. तो मनोमन खचत चालला होता.
त्याला जाग आली तर ती शेजारी नव्हती. तो झटकन उठला. त्याने घड्याळात पाहिले. साडेचार वाजून गेले होते. ‘बाबा उठले असतील ..’ मनात विचार येऊन त्याने.बाबांची चाहूल घेण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या आणि तिच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. तो बाहेर आला.
“ आता मी आलेय ना बाबा ? मग आता पहाटेचा चहा मी करून देणार हं तुम्हाला.. तुम्ही नाही स्वतः करून घ्यायचा. ”
“ अगं, पण मला सवय आहे त्याची.. उगाच तुझी झोपमोड कशाला ? जा. झोप जा तू.. घेईन मी करून चहा. “
“ ते काही नाही हं …बाबा, मी असताना तुम्ही चहा करून घेतलात तर मला ते नाही हं आवडणार. आजवर तुम्ही खूप केलेत…पण आता नाही. आता तुम्ही फक्त आराम करायचा, तुमच्या आवडी-निवडी जपायच्या, छंद जोपासत राहायचे. आता कुठल्याच कामाला मी नाही हं हात लावू देणार तुम्हांला. चला, तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा बघू, मी आणते लगेच चहा करून.. अगदी तुमच्या आवडीचा.. आलं घालून .”
‘ बरं. तू आण चहा करून..’ असं म्हणून बाबा किचन मधून बाहेर येऊन हॉलमध्ये बसले..’ किती चांगली सून मिळालीय आपल्याला.. आपण खूप नशीबवान आहोत..’ बाबांच्या मनात आले. तो हे सारे ऐकत होता.. तो हॉल मध्ये आला.
“ अरे, तू ही उठलास? ये. “
तो हॉल मध्ये आला. बाबांच्याशेजारी बसला. ती चहा घेऊन आली तेव्हा तिने त्याच्यासाठीही चहा आणला होता.
“ तुमचा आवाज आला म्हणून तुमच्यासाठीही आणलाय चहा.. घ्या. “
ती ओठातल्या ओठात हसत त्याच्या हातात त्याचा चहाचा कप देत म्हणाली.
चहा पिऊन झाल्यावर बाबा फिरायला बाहेर पडले.
बाबा रोज पहाटे साडेचारला उठून, सारे आवरून स्वतःचा चहा स्वतः करून घेऊन पाचला फिरायला जात असत. गेल्या कित्येक वर्षाचा त्यांचा तो नेमच होता. आधी आईही लवकर उठायची, बाबांना तीच चहा करून द्यायची पण तिची झोप पूर्ण होत नाही हे लक्षात येताच बाबांनीच तिला लवकर उठायला मनाई केली होती..
बाबा फिरायला निघून गेले आणि ती आणि तो, दोघेही त्यांच्या बेडरूम मध्ये आले. त्यांच्या लग्नाला काही दिवसच झाले होते पण तिने आपल्या वागण्याने घरच्यांचीच नव्हे तर शेजार-पाजाऱ्यांचीही मनं जिंकली होती.. तोही खुश होता.
“ उद्यापासून तूही उठायचंस लवकर.. मी उठवेन तूला ..”
बेडरूममध्ये शिरताच बेडरूमचे दार लोटून आतून कडी लावत ती त्याला म्हणाली. आईबाबांसमोर, इत्तरांसमोर ती त्याला अहो s जाहो म्हणत असली तरी दोघंच असताना मात्र ती त्याला अरेतूरे करत होती आणि त्यालाही ते खूप आवडत होते.
“ अरे वा ss! पहाटे पहाटे? नेकीं और पुछ पुछ ? “
तो मिश्कीलपणे डोळा बारीक करत म्हणाला. त्यावेळी तिच्या आवाजातला कोरडा आणि हुकमी स्वर त्याच्या ध्यानातच आला नाही.
“ उगाच लाडात येऊ नकोस.. उठून तू बाबांसाठी चहा करायचा आहेस.. मी कितीही तुला ‘नको,नाही म्हणले तरीही.. ‘ तू कशाला चहा करतोयस? आता मी आहे ना..मी करते चहा ‘ असं म्हणलं तरीही… चहा तूच करायचा आहेस हे लक्षात ठेव. “
“ए, मी नाही हं करणार चहा..”
ती आपली मस्करी करत आहे असे वाटून तो काहीसा लाडात येऊन, काहीसा चेष्टेने म्हणाला.
“ म्हणजे ? एकच लक्षात ठेव.. तू करणार आहेस म्हणजे करणार आहेस.. “
ती काहीशा कठोरपणे म्हणाली .तिच्यातल्या या बदलाने तो आवाक होऊन तिच्याकडे पहात असतानाच ती हसत हसत म्हणाली,
“ कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे ठाऊक आहे ना..? आत जायचं नाही ना तुला ?”
त्याने दचकून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. ती नेहमी जशी दिसते त्याहून वेगळीच भासली त्याला. तो अंतर्बाह्य थरारला. ‘ ही अशी काय वागतेय ? हिच्याशी एवढे प्रेमाने, समजुतीने वागूनही अगदी शांतपणे धमकी काय देतेय ?.. काही वाद, भांडण झाले असते आणि रागाच्या भरात बोलली असती तरी एकवेळ ते समजून घेण्यासारखं होते पण तसे काहीच नसताना, हे काय म्हणायचं ?…’ त्याच्या मनात विचार आला. त्याला तिच्या अशा वागण्याचं काहीच कारण कळेना पण तिच्या त्या वाक्याने त्याच्या मनात भीतीने घर केलं. तो मनोमन काहीसा घाबरलाय हे तिला जाणवले.. ती स्वतःशीच हसल्यासारखं हसून त्याला म्हणाली,
“ अरे, गंमत केली तुझी..”
ती ‘गंमत’ म्हणाली असली तरी ती गंमत नाही हे त्याच्या ध्यानात आलं होतं.
” आणि आपली ही गंमत कुणाला सांगायची नाही हं ! कुणाला म्हणजे कुणालाच. तुझ्या आई-बाबांनाही नाही. राहील ना हे तुझ्या लक्षात ? “
तो तिच्या बोलण्याने, तिच्यातील बदलाने अवाक होऊन तिच्याकडे पहातच राहिला होता.
फाल्गुनीचे लग्न ठरल्याची बातमी नातेवाईकात पसरली. तसे लपवण्यासारखे काही नव्हतेच. चारचौघासारखे पत्रिका बघून , दोघांच्या पसंतीने ठरलेल लग्न होते. शीतलच्या डोक्यावरचे ओझे उतरले अशी एक सर्वसाधारण प्रतिक्रिया नातेवाईक, शेजारीपाजारी होती.
फाल्गुनीला मोठं करताना, तिचे शिक्षण, संस्कार याची जबाबदारी एकट्या शीतलनेच पार पाडली होती. प्रसाद बाबा म्हणून घरात होता. तसे तर चारचौघात दाखवण्यापुरता एक बिझनेस होता. जेमतेम उत्पन्न ही होते. पण तरी संसारात शीतल एकटीच होती.
फाल्गुनीचा नवरा ओजस एका साॅफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. सहा आकडी गलेलठ्ठ पगार, घर गाडी कशालाच कमी नाही. मोठ्या बहीणीचे लग्न होऊन ती तिच्या संसारात रमली आहे. त्याचे आईवडील रत्नागिरीत नोकरी करत असल्याने घरात कायम दोघेच राजाराणी.. हे समजल्यावर शीतलचा प्रवास बघणारे म्हणाले, “पोरीने नशीब काढले.. आईच्या कष्टाचे चीज झाले.”
शीतलला फाल्गुनीचे लग्न वेळेत ठरल्याचा फार आनंद झाला होता. फाल्गुनीचे सासर माहेर यात फारसे अंतर नव्हते ही अजून एक जमेची बाजू होती. शीतलला वाटले आपले माहेर पण जवळ असते तर परिस्थितीत खूप बदल झाला असता.
प्रसादशी लग्न होऊन शीतल पुण्यात आली. तिचे माहेर कोकणातले कुडाळचे. शीतलला लहानपणापासून शहराचे आकर्षण. तिचे शिक्षण झाले. तिच्या आईबाबांनी तिच्याकरता स्थळे बघायला सुरुवात केली.
मध्यम उंचीची, चारचौघींसारखी, सावळा रंग नि तरतरीत नाकाची शीतल स्वभावाने नावासारखीच शीतल होती. तिला वाटायचे, शहरातला नोकरदार मिळाला तर टुकीने संसार करता येईल. छोट्या गावात मोठ्या गावाची काय मजा असणार?
एका मध्यस्थाने पुण्यात रहाणाऱ्या प्रसादचे स्थळ आणले. स्वतःचा रहाता वाडा, सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले वडील, दोन विवाहीत भाऊ, लग्न झालेली एक बहिण ही माहिती घरच्यांना पुरेशी वाटली. पुढे चारेक महिन्यात चांगल्या मुहूर्तावर लग्न करून ती पुण्यात आली.
लग्नाआधी प्रसादचा स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे एवढच तिला माहिती होते. ती एका शाळेत ज्युनियर शिक्षक म्हणून कामास होती. लग्नाआधी दोघे फारसे भेटलेच नाहीत त्यामुळे मनात रंगवलेले चित्र गृहीत धरून शीतलने प्रसादच्या घराचे माप ओलांडले.
हातावरच्या मेंदीचा रंग उतरण्यापूर्वीच तिला जाणीव झाली प्रसादच्या बेफिकीर स्वभावाची. त्याचा व्यवसाय होता पण तो मनापासून काम करत नसे. पोटापुरते मिळेल एवढ्यावर तो मात्र तो नक्कीच कमवत होता.
घरातली कोणतीच जबाबदारी घ्यायला प्रसाद तयार नसे. चार मित्र गोळा करावेत, गप्पा माराव्यात, बाहेर खावे प्यावे हेच त्याचे शौक होते. त्याच्या या बेफिकीर, लहरी वागण्यामुळे त्याला घरीदारी फारशी किंमत नव्हती.
शीतलच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरले. तिने प्रसादला समजवायचा हरप्रकारे प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.
तिने आधीच्या नोकरीच्या अनुभवाच्या जोरावर एका शाळेत नोकरी करायला सुरुवात केली. तिचे नियमीत पैसे येऊ लागल्यावर प्रसाद अधिक बेजबाबदार झाला. दोन वर्षांनी फाल्गुनीचे आगमन त्यांच्या संसारात झाले. जबाबदारी वाढली ती शीतलची! प्रसादच्या वागणूकीत फारसा फरक पडला नाही.
फाल्गुनीच्या तिसऱ्या वाढदिवसाला शीतलच्या मनात फाल्गुनीला सोन्याचे डूल करावे असे होते. तिने हौसेने पगारातून पैसे साठवले होते. बँकेत पैसे काढायला गेली तेव्हा प्रसादने खात्यातून काही पैसे काढले होते. उरलेल्या पैशात फाल्गुनीचे कानातले झाले नसते. शीतलचा पारा चढला. तिने घरी येऊन खूप आदळआपट केली. फाल्गुनीचे कानातले होणार नाही याचे प्रसादला वाईट वाटले पण हे वाईट वाटणे फोल असणार हे तिला समजून चुकले होते.
तिच्या सासूबाई तर हरल्या होत्या मुलासमोर. सासऱ्यांच्या सांगण्यावरून तिने प्रसादच्या नकळत दुसरे खाते काढले. त्याचे चेकबुक, पासबुक सासूबाईंकडे ठेवले. दर महिन्यात त्या खात्यात ती पैसे साठवू लागली.
प्रसादने चौकशी केली. “एवढे पैसे कशाला लागतात काढायला?” त्याने पासबुक बघत विचारले.
“सलग दोन महिने घर चालवून बघा. किती नि कुठे पैसे लागतात हे समजेल.” तिने पोळी लाटता लाटता त्याला ठणकावून सांगितले.
“जास्त ऐट करू नको पैशाची..”
“पैशाची ऐट म्हणता? माझ्या पैशावर चाललय घर. ना गाठीशी पैसा ना अंगावर दागिना. नवऱ्याच्या जीवावर बायकोला आवडते ऐट करायला, ज्यादिवशी तुम्ही माझी हौस पुरवाल तेव्हा करेन ऐट! समजले? ” तिने हल्ला परतवला.
प्रसाद समजून चुकला होता. बायको बदलू लागली आहे. प्रसंगी उलट उत्तर देऊ लागली आहे. याकरता तोच जबाबदार होता.
मे महिन्याच्या सुट्टीत प्रसादच्या फॅब्रिकेशन युनिटचा एक माणूस प्रसादला शोधत घरी आला. तो घरी नव्हताच. शीतलने फाल्गुनीला घेतले नि गाडीवर काढून ती तिकडे पोचली. यापूर्वी ती तिकडे आली होती. तिला आलेले बघून कामगार चपापले. तिने तिथेच शेडमध्ये बसून काय प्राॅब्लेम झाला आहे हे समजून घेतले. अर्ध्या तासात तिने प्रश्न सोडवला. युनिटचे लाईट बिल भरायचे होते. एकदोघांचे पगार राहिले होते. तिने येणी किती आहेत ते तपासले नि कपाळावर हात मारून घेतला. पुढल्था दोन दिवसात तिने तिथली व्यवस्था लावून दिली. प्रसादला समजले तेव्हा तो खजील झाला. पुढचे दोनचार महिने चांगले गेले. शीतलला वाटले सुधारली परिस्थिती पण अशी इतक्यात तिची सुटका नव्हती.
फाल्गुनी आईची तारांबळ बघत मोठी झाली. ती हुशार होती, मेहनती होती. भरभर शिकत गेली. आईला त्रास होऊ नये याचा फाल्गुनीचा प्रयत्न बघितला की शीतलला रडू यायचे. ‘इतके समंजस बाळ दिलंय देवाने पोटी.. मी कमी पडले आई म्हणून!’ ती सर्वांना डोळ्यात पाणी आणून सांगायची.
फाल्गुनी शिकत असताना शीतलने तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मायलेकींच्या जगात प्रसाद आता कुठेच नसायचा. त्याचेही वय होऊ लागले होते पण सवयी, बेफिकीरीत फारसा फरक नव्हता. घरात दोन तट पडल्यासारखे झाले होते. प्रसाद एकाकी झाला होता.
फाल्गुनीचे घरचे केळवण म्हणून घरचे सगळे जमले होते. पंचपक्वान्नाचा बेत होता. लाल रंगाचा सोनेरी जरतारी काम असलेला अनारकली घातलेली फाल्गुनी खरच सुंदर दिसत होती. तिच्या थट्टेला उत आला होता. तिचे हसणे, लाजणे बघून शीतलला भरून येत होते. ही सासरी गेली की मी एकटी पडणार या विचाराने तिचे डोळे पाण्याने भरून येत. तिच्या जावेने तिच्या पाठीवर थोपटताच शीतल तिच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडू लागली. हसरे वातावरण एकदम तंग झाले.
“बाई गं, लेकीची पाठवणी सोपी नसते आईला. जगरहाटी आहे ती. पोटात किती तुटते ते लग्न झालेल्या मुलीची आईच फक्त जाणे.” सासूबाईनी तिची समजूत घालायचा प्रयत्न केला. शीतलने समजून पदराने डोळे पुसले. कोणीतरी पाण्याचा ग्लास आणून दिला त्यातले पाणी प्यायली.
एवढ्यात फाल्गुनी पुढे आली म्हणाली, “आई, आजी, काहीतरी बोलायचंय मला. पाठवणी माझी एकटीची नाही आईची पण होणार आहे..पण ती तयार झाली तर..” सगळे फाल्गुनीकडे आश्चर्याने बघू लागले.
“म्हणजे ग काय? ” शीतलने विचारले.
“आई, पंधरा दिवसांपूर्वी आपण कुडाळला गेलो होतो. तेव्हा तु शिकवायचीस ती शाळा दाखवलीस. मी संध्याकाळी देवीचे दर्शन घेऊन येताना सहजच शाळेत गेले. तिथे योगायोगाने माझी भेट तिथल्या मुख्याध्यापिकांशी झाली. त्यांना वाटले मी शाळेची माजी विद्यार्थीनी आहे. त्यांना तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना तुझी प्रगती ऐकून खूप छान वाटले.
त्यांनी रस दाखवला तेव्हा तुझा बायोडेटा माझ्या मोबाईलमधे होता तो दाखवला. तुझ्या इतका अनुभव असणारे शिक्षक शाळेला हवे आहेत असे त्या म्हणाल्या. तु तयार झालीस तर शाळेची दुसरी शाखा या जूनपासून सुरू होते आहे तिकडे तुला पर्यवेक्षिका म्हणून रूजू होता येणार आहे. पगार, महागाई भत्त्यात वाढ आहेच, पण मानही वाढेल.” फाल्गुनी सांगत होती आणि ऐकणारे चकित होत होते.
“आई, खूप केलस घराकरता नि माझ्याकरता. आता स्वतःकरता जगून घे, नवे अनुभव घे. नाही आवडले तिकडे तर मोकळ्या मनाने इकडे परत ये.. पण आलेली संधी घालवू नकोस. तुझ्या माहेरच्या माणसात, तुझ्या लाल मातीत मनमुराद आनंद लुट. तुझा हक्क आहे त्यावर.” फाल्गुनी मनातले बोलत होती.
“कुडाळला? मी अजिबात जाणार नाही. किती छोटे गाव आहे ते.” प्रसाद म्हणाला.
“बाबा, या सीनमध्ये तुम्ही तुमच्या कारखान्यासकट पुण्यातच रहा. आईला एकटीलाच जाऊ दे.” हे ऐकताच प्रसादला खूप राग आला.
फाल्गुनी आणि शीतल वगळून त्याला फारसे कोणी कधी मोजलेच नव्हते. त्याला अजून एकटेपणाच्या झळांची जाणीव नव्हती. शीतल थक्क झाली. जे घडत होते ते अविश्वसनीय होते. शीतलचे सासूबाई नि सासरे यावेळीही तिच्या पाठीशी होते. ते दोघे फार थकले होते. सूनेने आनंदी रहावे असे मात्र त्यांना वाटत होते.
फाल्गुनीच्या लग्नाबरोबरीने शीतलच्या पाठवणीची पण तयारी सुरू झाली. नव्या जोमाने शीतलने जमवाजमव केली.
फाल्गुनी आणि ओजस पुण्यात परत आल्यावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शीतलने पुणे सोडले नि डोळ्यात स्वप्न घेऊन कुडाळच्या गाडीत पाऊल ठेवले.
लेखिका- सुश्री अनघा किल्लेदार
पुणे, २४/०२/२०२३
संग्राहक – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈