मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षण वेचावे आनंदाचे… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ क्षण वेचावे आनंदाचे… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

श्यामरावांनी पाह्यल,आई सकाळपासून अस्वस्थ आहे. परदेशी शिकायला गेलेल्या संग्रामची तिला खूप आठवण येतीय. आम्हाला दोघांनाही त्याची आज सकाळी खूप आठवण येत होती.. पण मनाची समजूत काढली, शिकून मोठ्ठा होणार आहे आपला लेक. आणि हो! पंख फुटल्यावर पाखरू घरट्यातून आसमंतात भरारी घेरणारच… पण वयानी आणि मनानी हळव्या आजीला ते समजत होतं पण उमजत नव्हतं. नातू गेल्यापासून ती अबोल झाली होती. तिला कसं खुलवावं आम्हाला म्हणजे मला आणि शामलाला कळतच नव्हतं. तिला मनवायला संग्राम.. तिचा लाघवी नातू दूर देशी गेला होता ना! ..

इतक्यात संग्रामचा.. तिच्या नातवाचा फोन आला. आमच्यात खाजगीत बोलणं झालं. संगनमत होऊन विचारांचं मेतकूट जमलं. शामलाला हे गुपित सांगितल्यावर तिचीही कळी खुलली. ती सासूबाईंना म्हणाली, “आई तयार होता का, आपल्याला तुमचा वाढदिवस साजरा करायला बाहेर फिरायला जायचंय”.

तिला अडवतं आजी म्हणाल्या, “अगं काय हे शामला,! विसरलीस का? वाढदिवस साजरा करायला माझा नातू तरी आहे का इथे? ” ” त्याच्याशिवाय कसला वाढदिवस? मला नाही कुठे यायचं”.

“चला ना आई आपण फिरून येऊ म्हणजे तुमची उदासी कुठल्या कुठे पळेल”..

मिनतवारीने आजी तयार झाल्या. गाडी संग्रामच्या आवडत्या मिठाईच्या दुकानाजवळ थांबली. हातातला जिलबीचा पुडा बघून आजी लेकाला,शामरावांना म्हणाल्या,”शाम्या आधीच सांगते हो! मी जिलबीचा एकही तुकडा खाणार नाही. अरे! नातवाशिवाय जाईल कां मला”! हे बोलतांना भरून आलेले डोळे त्यांनी पदराने पुसले. हाच पदर धरून लहाना संग्राम घरभर नाचायचा. पण आता तो मोठा झालाय ना! दूर देशी पळालाय. आता त्याचं बालपण सरलयं. कुठे शोधू त्याचं ते चिमुकलं बालपण? .. हळव्या मनाच्या आजींचा पदराचा शेव अजूनच ओला झाला..

झोकदार वळण घेऊन गाडी एका लहान मुलांच्या आश्रमाजवळ उभी राह्यली. समोर धोतर, कोट, टोपी घातलेले गृहस्थ श्री. आप्पासाहेब आणि बाल मंडळी गुलाब घेऊन उभी होती.. “सुस्वागतम्” असं स्वागत करून तो बालचमुंचा समूह आजींकडे धावला. शामराव पुढे होऊन गोंधळलेल्या आईचा हात धरून म्हणाले, “आई अगं! हा बालआश्रम आहे आई-वडिलांच्या, आजी आजोबांच्या प्रेमाला परिस्थितीमुळे ही मुले पारखी झालीत. ऐक ना आई! पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलंय. तुझा नातू आता वयानी मोठा झालाय. मानाने खूप खूप मोठ्ठा होण्यासाठी आपण त्याला शिक्षणासाठी परदेशी पाठवलंय. तो परत येणारच आहे गं! पण त्याचं बालपण नाही परत येऊ शकत. तुला ते नातवाचं हरवलेलं बालपण हवयं ना? मग तू संग्रामचं बाळरूप ह्या बाळांमध्ये शोध. नक्कीच तुला तुझा नातू ह्यांच्यात दिसेल. “. आजींचा कंठ दाटून आला. डोळे आनंदाने भरून आले. आधीचे अश्रू आठवणींचे होते आणि आत्ताचे आनंदाश्रू होते..

फुगे माळा सुगंधी पुष्प, समई श्रीगणेशमूर्तीपुढची सुरेख फुलांची रांगोळी, औक्षवणाच्या तयारीने हॉल सजला होता.

शामलाने सासूबाईंना औक्षण केले. बावरलेल्या आजींनी हे सारं सुख डोळयात साठवलं. श्रीगणेशाला जिलबीचा नैवेद्य दाखवला गेला. आणि अचानक वेगाने छोटा अबीर प्रसादाच्या ताटाकडे झेपावला. आप्पासाहेब त्याच्या मागे धावतांना म्हणाले,”अरे थांब अबीर,आजी देतील तुला प्रसाद. असा हाताने प्रसाद घ्यायचा नसतो बाळा”

पण हे ऐकायला तो चिमूरडा जागेवर होताच कुठे, आजींचा पदर ओढून तो म्हणत होता,

“अहो आजी,आजी नाही हो मला! तुम्हाला म्हणू कां मी आजी? “.. सगळी माया एकवटली गेली.. प्रेमाने त्याला जवळ घेत आजी म्हणाल्या,. “होय रे होय बाळा! होईन मी तुझी आजी, तू माझा दुसरा संग्रामच आहेस”

अबीरने जिलबीचा तुकडा आजींच्या तोंडात सरकवला. टाळ्या वाजवत तो म्हणाला” हॅपी बर्थडे आजी”.. “अगं बाई हे काय? संग्रामच्या हंसण्याचा आवाज? म्हणजे माझा संग्राम आलाय की काय? ‘ गोंधळलेल्या आजी इकडे तिकडे बघू लागल्या. श्यामरावांनी त्यांच्यासमोर मोबाईल धरला. व्हिडिओतून संग्राम, आजींचा नातू टाळ्या पिटत म्हणत होता, “हैप्पी बर्थडे माय डियर आजी” अगं केव्हापासून मी व्हिडिओ वरून तुला बघतोय. आजी अगं शरीराने मी इथे असलो ना, तरी तुझा नातू मनाने तुझ्या जवळच आहे. खाल्लीस ना तू अबीरच्या हातून जिलबी? ती अगदी माझ्या हातचीचं समज. अबीरच्या डोळ्यात बघ. त्याच्यात लहानपणीचा तुझा नातूच तुला दिसेल. भरपूर प्रेम दिलसं तू मला. आता माझ्या प्रेमात हा चिमूरडा भागीदार झालाय. तुझ्या मायेचा भागाकार नाही गुणाकार होउं दे. माझ्या इतकचं प्रेम, माया संस्कार तू ह्या बालमंडळींना देणार आहेस हो ना गं आजी? ही अशी समाजसेवाच तुझ्या हातून घडेल.. हो ना? “.

आजी खुदकन् हंसल्या. मनाशी म्हणाल्या ‘जग किती पुढे गेलंय,साता समुद्रापलीकडे असलेला माझा नातू मला व्हिडिओतून भेटला ‘ आणि मग,सगळ्या बालमंडळींना कवेत घेतांना आजींचा पदर अपुरा पडला. त्यांच्या कवेत सारं ब्रह्मांड अवतरलं होतं. श्री गणेशाला हात जोडून त्या म्हणत होत्या, “देता किती घेशील दोहो कराने”.

आईचा हसरा चेहरा बघून श्यामराव शामलाला म्हणाले, “आजीला खुलवण्यासाठी नातवानी, संग्रामनी केलेलं सरप्राईज सक्सेस झालं म्हणायचं. जे तुला अन् मला जमलं नाही, ते ह्या पठ्ठयाने, एका मिनिटात जमवलं. “.

आजी गुणगुणत होत्या, “ देव जरी मज कधी भेटला काय हवे ते माग म्हणाला म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन देई माझ्या या बाळांना ”

– – आणि तो क्षण टिपायला संस्थेचे चालक आणि मालक श्री. आप्पासाहेब कॅमेरा घेऊन पुढे सरसावले..

धन्यवाद आप्पासाहेब..        

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “भेटीगाठी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “भेटीगाठी…” ☆ श्री मंगेश मधुकर

यशस्वी उद्योगपती, श्रीमंत अनिवासी भारतीय शशिकांत भारतात यायचे ते फक्त कामाच्या निमित्तानंचं. नातेवाईकांशी फोनवर बोलणं व्हायचं पण कधीही भेटण्याचा योग आला नाही. म्हणूनच भेटीगाठी साठीच शशिकांत बायको विदुला आणि मुलगी विनी सोबत भारतात आलेले. गावी जाताना मुख्य डांबरी रस्ता सोडून गाडी कच्च्या रस्त्याला लागल्यावर एसी गाडीतल्या मायलेकी जाम वैतागल्या.

“हॉरिबल रोड, पपा, व्हेअर वी गोइंग”

“आपलं मराठी बोलायचं ठरलंय ना. ”

“ओके, आय मीन बराय. आपण कुठं चाललोय”विनी.

“आत्याकडे”

“व्हॉट आत्या”

“ग्रँडपांची बहीण”

“व्हाय? आय मीन, का? ”

“खूप वर्षात तिलाभेटलो नाही म्हणून. लहानपणी उन्हाळ्यात, दिवाळीला शाळेला सुट्टी लागली लगेच तिच्याकडेच रहायला जायचो. धमाल करायचो. खूप मस्त दिवस होते. ”शशिकांत जुन्या आठवणीत हरवले.

“इतका त्रास करून जाण्यापेक्षा आत्यांनाच हॉटेलवर बोलवलं असतं तरी चाललं असतं. ”विदुलाच्या बोलण्यावर शशिकांतनी त्रासिक नजरेनं पाहिलं तेव्हा विदुला एकदम बाहेर पाहायला लागली.

“तुझ्या फॉरेन लेकीला गाव दाखवायचं होतं आणि महत्वाचं आत्याला त्रास नको म्हणून आपण चाललोय”

“व्हिडिओ कॉलवर बोलायचं ना”विनी.

“फोनवर बोलायचा एकदोनदा प्रयत्न केला पण आत्याला जमलं नाही. नीट बोलणं झाल नाही आणि आत्या सारखी माझी आठवण काढत असते म्हणून तिच्यासाठीच ही व्हिजिट प्लान केली. ”नंतर आत्या आणि आपल्या बालपणाविषयी शशिकांत भरभरून बोलत होते. गावाला पोचल्यावर तिघांचं गुलाबाच्या पाकळ्या उधळत ओवाळून थाटात स्वागत केलं. ते पाहून विदुला, विनी खूप भारावल्या. घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आजकाल सर्रास दिसतं तसं दिखाऊ, नकली अगत्य नव्हतं.

“आत्या कुठंयं”शशिकांतनं आतेभावाला विचारलं.

“तिकडंय. चला, आपण जाऊ”

“आत्याचं वय सत्तर असेल ना”

‘पंच्याहत्तर पूर्ण पण थकली आता!! फार हिंडत-फिरत नाही. बसूनच असते. नजरसुद्धा फार कमी झालीये पण कान मात्र अजूनही तिखट अन बुद्धी तल्लख आहे. फार स्वावलंबी. ऐकतच नाही. आजही स्वतःची कामं स्वतःच करते. मदत करायला गेलं की खेकासते. आज तू येणार म्हणून खुशीतये”भाऊ कौतुकानं म्हणाला.

“जुनी माणसं फार अभिमानी. दुसऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे यांना अपमान वाटतो”बोलत बोलत सगळे आत्याजवळ पोचले.

“अत्ये” शशिकांतनी डोळे मिटून जपमाळ ओढणाऱ्या आत्याला हाक मारली

“कोण रे? शशी का? ”

“हो”

“आलास का बाबा!! लई वाट पायला लावली”शशिकांत, विदुला आणि विनी तिघांनी वाकून नमस्कार केल्यावर आत्यानं डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. काही वेळ आत्याची विचारपूस करून विदुला, विनी घर बघण्यासाठी गेल्या. शशिकांत मात्र आत्याच्या शेजारी बसले. तिचा सुरकुतलेला थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. काहीच न बोलता दोघं एकमेकांकडे फक्त पाहत होते. आपुलकीच्या नात्याला शब्दांची गरज नसते कारण मायेचा स्पर्श भरभरून बोलतो. आत्या आणि शशिकांत दोघांचे डोळे भरले.

“अत्ये, असं का बघतेस. ”

“लई मोठा माणूस झालास. अबीमाण वाटतो. दादा-वईनीची आटवण आली”आत्यानं डोळ्याला पदर लावला.

“अत्ये, पार म्हातारी झालीस”हुंदका आवरत शशिकांतनी विषय बदलला.

“तर वो. बरं झालं आलास. जीवाला लई बरं वाटलं. आता जायला मोकळी.. ”

“असं का बोलतीस. शंभरी गाठायचीय”

“नको रे बाबा. हातपाय चालतात तवर सुटलेलं बरं!! उगा माझ्यामुळं पोरांना त्रास नग. शशी, आता आलास तर आट-पंधरा दिस रहा. तुझ्या आवडीचं खायला करते”

“पुढच्या वेळी!! यावेळेला जमणार नाही. उद्याच्याला निघेल. खास तुझ्यासाठीच आलोय. भेटून छान वाटलं”

“बरं केलसं. ” त्यानंतर सगळा वेळ शशिकांत आत्याबरोबरच होते. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दोघांनी सोबतच जेवण केलं. आत्याने प्रेमानं गोडाचा घास भरवल्यावर शशिकांत खूप भावूक झाले. विदुलानं घरातल्या सगळ्यांना भेटवस्तू दिल्या. विनी सगळ्या नवीन गोष्टीं एन्जॉय करत होती. एरवी कायम खूप गंभीर असणारे शशिकांत खळखळून हसत होते. मोठ्या आवाजात गप्पा मारत होते. विनोद करत होते. टाळ्या देत होते. जन्मापासून बिझनेसमनच्या रुपातच पाहिलेल्या पपांना एकदम आगळावेगळ्या रूपात पाहणं विनीसाठी फार मोठं सरप्राइज होतं. दुसऱ्या दिवशी निरोप घेताना वेळी आत्याचा बांध फुटला तेव्हा शशिकांतसुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकले नाहीत.

“अत्ये, माझ्याबरोबर चल, ”

“पोरा, आपलं ते आपलंच. कशाप्पयी इतका लांब गेलास. तूच इत्यं ये. ते लई बेस व्हील”आत्याच्या बोलण्यावर सगळे हसले. विनी, विदुला, शशिकांतला जवळ बोलावून आत्यानं शंभर शंभर रुपये हातावर ठेवले. निघताना विनीनं आत्यासोबत सेल्फी घेतला. परतीच्या प्रवासात शशिकांत गप्पच होते. मायलेकी मात्र जाम खुशीत होत्या.

“पपा, या स्पेशल व्हिजिटसाठी थँक्स, ग्रेट इंडियन फॅमिली!! लाईफटाईम वंडरफुल मेमरी” 

“बरं झालं आपण आलो. ही भेट आयुष्यभर लक्षात राहील” विदुला.

“आज कम्युनिकेशन खूप सोपं झालंय. एकमेकांशी कनेक्ट वाढला असला तरीही आपल्यासाठी कोणीतरी वेळ काढून भेटायला येतोय आणि कुणीतरी आपली वाट बघतंयं हे फिलिंग फार ग्रेट आहे. फोन, व्हिडिओ कॉलवर बोलणं हे फार वरवरचं वाटतं. समोरासमोर कडकडून भेटण्यातला आनंद काही औरच!! अशा आवडत्या माणसांच्या भेटीगाठी म्हणजे मनाची पॉवर बँक. कितीही बिझी असलो तरी आपल्या माणसांच्या भेटीगाठी घेणं हे श्वासाइतकंच गरजेचं आहे. ”

“पपा, आत्यानं तुम्हांला हंड्रेड रूपीज दिले ते फार फनी होतं. ”विनी 

“ए गप. काहीही बोलू नकोस”विदुलानं लेकीला दटावलं. ”

“त्यात फनी काय”शशिकांत.

“एका बिलियनरला हंड्रेड रूपीज म्हणजे.. ”विनी हसली.

“ते पैसे खाऊसाठी दिलेत. ”

“व्हॉट खाऊ!! ”

“सगळं एका क्लिकवर मिळणाऱ्या जनरेशनला खाऊच्या पैशाची मजा कळणार नाही. खाऊसाठी पैसे देणारी ही शेवटची पिढी… आत्यानं दिलेली ही सगळ्यात मोठी अमाऊंट आहे. चार आण्यापासून सुरवात झाली आता शंभर पर्यंत पोचलो. फिलिंग सुप्पर हॅपी!! ही नोट मी कधीच खर्च करणार नाही”शशिकांतचं बोलणं संपायच्या आत विदुला आणि विनी दोघीही एकदम म्हणाल्या. “आम्हीसुद्धा!!”.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कक्ष क्रमांक : ४३२…” – (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक : अनामिक – मराठी अनुवाद : सुश्री स्वाती वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “कक्ष क्रमांक : ४३२…” – (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक : अनामिक – मराठी अनुवाद : सुश्री स्वाती वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी

माझे नाव मुकुल, ५८ वर्षांचा, ऊंच, भरदार शरीर यष्टी, बाईक प्रेमी. मोठमोठ्या बाइक्स घ्यायच्या भ्रूम भ्रूम करत गावभर हिंडायचे, दोन्ही हातांवर टॅटू काढून, छातीपर्यंत रुळणारी दाढी मिरवत भटकायचे …आणि हो…आमचा बाईक चालविणाऱ्यांचा एक क्लब आहे…” रक्षक.. मोटर सायकल क्लब.. ”

दर गुरुवारी मी लहान मुलांच्या इस्पितळात जातो स्वयंसेवक म्हणून.. त्यांना बालकथा वाचून दाखवतो. पंधरा वर्षांपूर्वी आमच्या एका मित्राची नात या कॅन्सर च्या बाल रुग्ण विभागात कित्येक महिने होती तेव्हाच आम्ही ही सेवा सुरू केली.

बहुतांश वेळा बालकं मला प्रथम भेटीत घाबरतात. कारण माझी शरीर यष्टी आणि मोठा, जाडा आवाज, लहान मुलांच्या इस्पितळात नव्हे तर मोटर सायकल चालवणाऱ्यांची गँग असलेल्या कुठल्याही हिंदी सिनेमात शोभून दिसेल असा मी. पण एकदा का मी कथा वाचायला सुरवात केली की मग ते माझा अगडबंब देह विसरतात आणि कथेत रमतात. तसेच काहीसे लतिका बरोबर होईल असे मला वाटले होते.

मार्च महिन्यातील एका गुरुवारी मी कक्ष क्रमांक ४३२ कडे निघालो. परिचारिकेने मला आगाऊ सूचना दिली होती.. ही नवी मुलगी आहे सात वर्षांची. न्यूरोब्लास्टोमा (न्युरोब्लास्टोमा हा अपरिपक्व मज्जा पेशींचा (न्युरोब्लास्ट्स) कर्करोग आहे. तो बहुतेक वेळा अधिवृक्क ग्रंथींमध्ये (ॲड्रिनल ग्लँड्स) सुरू होतो, पण तो मान, छाती, पोट किंवा मणक्याच्या आसपासही आढळू शकतो)या चौथ्या स्टेज वर आहे….

“ तीन आठवडे झाले तिला दाखल केले आहे पण तिच्या कुटुंबापैकी कोणीही अजून एकदा ही आले नाही.

काय.. कुटुंबातील कोणीच नाही …कधीच नाही.. तीन आठवड्यातून एकदाही? …” मी जवळ जवळ ओरडलोच विस्मयचकित होत.

परिचारिकेचा चेहरा आक्रसला.. सौम्य शब्दात उत्तरली…”तिची आई तिला येथे अक्षरशः टाकून गेली आहे, उपचार करून घ्यायला पण स्वतः पुनः येथे कधीच फिरकली नाही. आम्ही किती प्रयत्न करतोय तिच्या पर्यंत पोचण्याचा पण यश येत नाही.. आम्ही लहान मुलांच्या काळजी वाहू कितीतरी संस्थांशी संपर्क केला. त्यांनी देखील शोध घेतला, पण तिला अन्य कोणी नातेवाईक ही दिसत नाही, एकदा का तिच्यात जरा सुधारणा झाली की तिची रवानगी अशा कुठल्यातरी जागी करण्यात येईल जेथे तिचे पालनपोषण कोणीतरी करेल. ”

“आणि समजा जर का सुधार झालाच नाही तर “ 

परिचारिकेने आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि म्हणाली…”तर ती येथेच मरेल…एकटी.. ” 

कक्ष क्रमांक ४३२ मध्ये शिरण्याआधी मी थोडा वेळ धीर एकवटत बाहेरच उभा राहिलो. तसे मी मरणाच्या दारी पोचलेल्या मुलांजवळ ही बसलोय त्यांना ही कथा ऐकवली आहे.. पण.. ही…एकटीच …. एकटी मृत्यूशी झुंज देणारी …हे माझ्यासाठी नवीन होते आणि प्रचंड हादरवून टाकणारे.

मी हळुवारपणे टकटक केले, दार हलकेच ढकलले, “ रामराम …मी मुकुल.. तुला आवडत असेल तर मी एक गोष्ट वाचून दाखविणार आहे …आवडेल तुला? ”

पलंगावर झोपलेली ती लहान पोरगी माझ्याकडे कूस बदलून बघू लागली. आजपर्यंत बघितले होते मी त्या पेक्षा किती तरी पटीने मोठे, टपोरे तपकिरी रंगांचे डोळे होते तिचे. किमोथेरेपी मुळे तिचे केस मात्र गेले होते, शरीर मृत्यू शी कसे झगडतेय याची ग्वाही देणारा तिचा काळवंडलेला चेहरा आणि कातडीचा रंग सांगत होता, पण मला बघताच ती हसली.

“ खरेच तुम्ही बलदंड आहात. ”. तिचा आवाज हळू पण घोगरा वाटला.

“ हो सारेच तसे म्हणतात, “ मी आणलेले पुस्तक दाखवत म्हटले, “ जिराफ नृत्य करायला शिकतो,अशी एक कथा आहे माझ्याजवळ…. तुला ऐकायचीय? ” 

ती हो म्हणाली म्हणून मी तिच्या पलंगाशेजारी खुर्चीवर बसलो आणि वाचायला सुरवात केली.

मी पुस्तकाच्या अर्ध्यावर पोचलो होतो तेव्हा तिने मला थांबवले, “ मुकुल काका “ 

“ काय, बेटा “

“ तुम्हाला मुलं आहेत? “

.. प्रश्न माझे काळीज चिरीत गेला. “ मला एक मुलगी होती, पण ती सोळा वर्षांची असताना कार अपघातात वारली. आता त्याला बावीस वर्षे झालीत “ 

लतिका एकदम मूक.. …नंतर म्हणाली …” तुम्हाला बाबापण हरपल्याचं दुःख होतंय? ” 

आवंढा गिळत मी कसाबसा उतरलो…” हो राणी, अगदी दररोज “ 

“ माझे वडील माझ्या जन्माआधीच गेले, “ अगदी सहज बोलावे तसे ती म्हणाली… “ आणि माझ्या आईने मला येथे आणून टाकले, नर्सेस सांगतात आता ती कधीच येणार नाही “ 

मला काहीच समजत नव्हते. मी काय बोलू यावेळेस…सात वर्षांच्या एका मुलीला मी काय सांगू जिला मरणाच्या दारात ढकलून आई निघून गेलीय..

लतिका बडबडत होती…” एक समाज सेविका मला सांगत होती.. तू जरा बरी झाली की तुला सांभाळायला जे तयार असतील त्यांच्याकडे सोपवणार.. पण मी डॉक्टरांचे बोलणे ऐकलेय.. त्यांना नाही वाटत मी आता बरी होईन.. ” 

“ माझी सोनूडी “ 

“ चालतंय की ” ती अगदी शांत होती. सात वर्षांची मुलगी, त्या मानाने जरा जास्तच शांत वाटली मला…. मला माहीत आहे, मी मरणार आहे…त्यांना वाटते मला काहीच समजत नाही पण मला सर्व समजते.. मी ऐकलय.. माझा कर्करोग सर्वदूर पसरलाय.. ते म्हणत होते…बहुदा सहा महिने किंवा त्याहून ही कमी …

मी पुस्तक खाली ठेवले, म्हटले…” लतिका बेटा …सॉरी हं “ 

मोठमोठ्या टपोऱ्या डोळ्यांनी लतिका माझ्याकडे बघत होती, “ मुकुल काका, तुम्हाला एक विचारू? “

“ काहीही विचार सोनूड्या “

“ तुम्ही माझे बाबा व्हाल… मी मरेपर्यंत? “ 

खोलीत एक विचित्र शांतता पसरली…सारे काही स्तब्ध झाल्यासारखे वाटले.. अगदी इस्पितळातील मॉनिटर्स सुद्धा.. माझ्या अठ्ठावन वर्षांच्या खांद्यावर मणामणांचे ओझे असल्याचा मला भास झाला.

मी माझे तोंड उघडले पण शब्दच फुटेना.. मला फक्त दिसत होता माझ्या सोळा वर्षांच्या मुलीचा चेहरा.. माझ्या मोटारीच्या मागील दृश्य दिसणाऱ्या आरशात मला दिसलेले तिचे ते शेवटचे लोभस हास्य.. मला फक्त जाणवले.. त्या दिवसापासून माझ्या हृदयात असलेली अपार वेदना.. निर्वात.. ती पोकळी..

लतिकाची पापणी लवली देखील नाही, ती अगदी शांत होती.. ती इवलीशी बाहुली किती धाडसी,सहनशील आणि अशक्य वाटेल एवढी समजूतदार…

मला.. हो.. म्हणायचे होते, मला.. हो.. म्हणायचेच होते…. पण मी एक भटक्या, एक बायकर, फिरस्ता…कधीतरी आठवड्यातून एका दिवशी बाल रुग्णांना भेटणारा.. त्यांच्यासाठी चित्रांची पुस्तकं नेणारा …भरधाव गाडी चालवत उडणारा, दारू पिणारा, आणि.. आणि.. अजून ही एखाद्या रात्री त्या रिकाम्या घरात माझ्या मृत मुलीच्या नावे ओरडत उठणारा…पुनः एका मुलीचा बाप होण्याची माझी पात्रता तरी आहे का? अगदी काही महिन्यांसाठी म्हटले तरी????

मी आवंढा गिळून पुटपुटलो…”बेटा,मला अगदी आनंदच होईल गं.. पण खरे सांगू मी एक चांगला बाबा होऊ शकेन का आता यासाठी साशंक आहे.. सगळाच गोंधळ करून ठेवेन मी अशी भीती वाटते “ 

तिचा चेहरा अगदी सूर्योदयाप्रमाणे उजळला.. ” ठीक आहे हो, त्यात काय…तुम्ही माझ्यावर बाबा होण्याचा सराव करा.. ” 

… आणि अगदी सहज त्या दिवसापासून मला पुनः एक लेक लाभली.

मी परिचारिकेला सांगितले तर ती रडायलाच लागली, समाज सेवी तर अगदी स्फुंदत होते, जेव्हा मी म्हटले.. “ मला ही मुलगी काही दिवसांसाठी पाहिजे, हिचा मेडिकल पालक व्हायला, देखरेख करायला मी उत्सुक आहे.. ती घरी नेण्याइतकी बरी झाली तर तिला घरी नेईन, नाहीतर रोज तिच्याजवळच राहीन. ”

– – क्लब पूर्ण ताकदीने उभा राहिला. पंचवीस हार्ले बाइक्स हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आल्यात, सिक्युरीटी गार्ड्स घाबरलेच प्रत्येक बाईकवर बांधलेली नवनवीन, कापूस भरलेली रंगीबेरंगी खेळणी दिसली.

कक्ष ४३२ इस्पितळासारखा राहिलाच नाही. कुणी घरात चुकून घेतलेली गुलाबी चादर आणली. कुणी 

“ बाबांची लेक “ लिहिलेले छोटेसे लेदर जॅकेट. पऱ्यांच्या दिव्यांची माळ. कुणीतरी (नियम मोडून) दहा मिनिटांसाठी कुत्र्याचे पिल्लूही आणलं—लतिका इतकी हसली, इतकी हसली की तिला पुन्हा ऑक्सिजन लावावा लागला.

दर गुरुवार म्हणजे आता मला रोजच. जिराफाची गोष्ट आम्हाला तोंडपाठ झाली. मग साने गुरुजींच्या गोड गोष्टी, चिंगी, पंचतंत्र,इसापनीती, फास्टर फेणे,.. कितीतरी गोष्टी झाल्यात………. तिचे हात थकले की मी पुस्तक धरायचो. वेदना वाढल्या की त्या छोट्या पलंगावर शिरून तिला छातीवर घेऊन झोपवायचो, आणि माझ्या मुलीला आवडायची ती जुनी गाणी गुणगुणायचो..

… डॉक्टर्स माना डोलवत, विस्मयचकित होत.. म्हणायचे काही कळतच नाही…स्कॅन चांगले नाहीत … पण इतके वाईटही नाही.. जेवढे आम्हाला वाटले होते की सहा महिन्यात आणखी वाईट होतील… सहाचे नऊ झाले. नऊ महिन्यांचे वर्ष झाले.

 

आठव्या वाढदिवशी सकाळी ती म्हणाली,

 “ बाबा, बाबा, मी स्वप्नात धावत होते. पाय नीट चालत होते. ”

मी तिच्या मऊ केसांवर चुंबन दिलं. “मग ते स्वप्न खरं करूया. ”

दोन आठवड्यांनी डॉक्टरनं मला बोलावलं. हातात रिपोर्ट्स, डोळे विस्फारलेले.

 “पाठीच्या गाठी… कमी होत आहेत. असं मी कधी—” ते थांबले. “लक्षणीय सुधारणा आहे. कसं ते सांगता येत नाही. ”

मला माहीत होतं. ते प्रेम होतं—हट्टाचं, गोंदणांचं, मोठ्या आवाजाचं प्रेम.

“मी मरेपर्यंत माझे बाबा व्हाल का? ” असं विचारणारी लतिका, अठरा महिन्यांनी स्वतः च्या पायांवर चालत हॉस्पिटलच्या बाहेर आली. माझा हात धरून. अंगावर ते छोटंसं लेदर जॅकेट. आणि आभाळापेक्षा मोठ्ठे हास्य.

क्लबनं तिच्या स्वागतार्थ जंगी पार्टी आयोजित केली. शेजारपाजारचे भारावून गेलेत. घोडे होते. गड किल्ले यांचा देखावा होता. हार्ले बाईकच्या चाकाएवढा केक होता.

संध्याकाळी शेकोटीजवळ लतिका माझ्या मांडीवर बसली, ताऱ्यांकडे पाहून म्हणाली,

 “ बाबा “ 

“हो, बाळ? ”

“मला वाटतं… मी आता खूप दिवस मरणार नाही. ”

मी तिला घट्ट मिठीत घेतलं. दोघांच्या हृदयाचे ठोके जाणवले.

 “छान,” मी थरथरत्या आवाजात म्हणालो. “कारण मी तर आत्ताच बाबा होणं सुरू केलंय. ”

आज ती पंधरा वर्षांची आहे. कॅन्सरमुक्त. अजूनही रोज मला “बाबा ” म्हणते. आणि अजूनही त्या गुलाबी बेडशीट्स वापरते—कक्ष ४३२ मधल्या.

… आणि दर गुरुवारी, पाऊस असो वा ऊन, आम्ही दोघं पुन्हा मुलांच्या इस्पितळात जातो. मी हार्लेवर, ती मागे घट्ट धरून—जणू आयुष्यभर असेच करत आली आहे तसं. आणि आम्ही नव्या, घाबरलेल्या, दुखऱ्या मुलांना गोष्टी वाचून दाखवतो.

– – – कारण काही गोष्टी आपल्याला लाभलेल्या वयापेक्षा खचित मोठ्या असतात… आणि काही गोष्टी.. शाश्वत… असतात.


मूळ इंग्रजी लेखक…. अनामिक

मुक्त मराठी भावानुवाद …. सौ. स्वाती वर्तक, मुंबई.

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मालिनी…” – लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “मालिनी…” – लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

वर्ष संपायला जेमतेम पंधरा दिवसही उरले नव्हते. न्यूयॉर्क शहर नवीन वर्षासाठी सजून धजून तयार झालं होतं. येणारा प्रत्येक दिवस जे सुख दु:ख आणेल त्याच्या हिंदोळ्यावर वर खाली होत कसाबसा तग धरून मालिनी उभी होती. हॅपी न्यू इयर म्हणताना पुढं काय वाढून ठेवलय कोण जाणे हे दरवर्षी तिच्या मनात येत असे!

मालिनी एक उत्तम डॅाक्टर होती. 31 डिसेंबर ला तिला पस्तीस वर्षे पूर्ण होत होती. प्रॅक्टिस छान होती. पण बरेच प्रयत्न करूनही आयुष्यात लग्नाचा योग आला नव्हता. ती अनेकांना भेटत होती पण गाडं पहिल्या दुसऱ्या भेटीपुढे जात नव्हतं. आई सतत आडून आडून कोणी भेटलं का विचारत असल्यामुळे चिडचिड होत होती.

बालरोगतज्ज्ञ असलेल्या मालिनीला मुलं फार आवडतं. स्वत:चं मुलं असावं ही इच्छाही हल्ली प्रबळ होत चालली होती पण नवऱ्याचा पत्ता नाही तर मुलाचा विचार कसला या अस्वस्थ मनःस्थिती मध्ये तिनं कित्येक रात्री छताकडे बघत घालवल्या होत्या. मात्र पस्तीशी संपत आल्यामुळे तिनं एक निर्णय घेतला. एक बाळ दत्तक घ्यायचं ठरवून ती “मिरॅकल मेकर्स” या दत्तक एजन्सी कडे गेली..

एजन्सीचे नियम, वेटिंग लिस्ट व अत्यंत कठीण प्रोसेस बघून ती दडपून गेली. हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही हे लक्षात आलं तरी तिनं फॅार्म भरला. मिरॅकल मेकर्सचे सीईओ कार्लोस हे स्पॅनिश वंशाचे होते. त्यांनी तिला दिलासा दिला की वेळ लागेल पण मुल नक्की मिळेल.

महिना गेला.. दोन महिने गेले.. नवं वर्ष नवी आव्हानं घेऊन समोर येऊन उभं राहिलं होतं. कार्लोस काही ना काही माहिती देत होते पण बाळ कधी मिळणार याची अजिबात 

कल्पना येत नव्हती. एक दिवस सगळं असह्य होऊन ती ताडकन उठली व कार्लोसच्या ॲाफिसमधे गेली.

“I am losing my patience, Carlos.. तीन महिने झाले तरी तुम्ही पक्कं काहीही सांगत नाही.. मनातला राग, निराशा व चिडचिड अश्रुंच्या रूपात बाहेर पडली. कार्लोसनं तिच्या खांद्यावर थोपटले.. “आशा सोडू नको मालिनी! नऊ महिने झाल्याशिवाय आईला तरी आपलं मुलं दिसतं का? तसंच आहे असं समज! ” उंच्यापुऱ्या कार्लोसच्या आवाजात प्रेम, करूणा, शांती सारं काही होतं..

“मालिनी.. एक विचारू? I am a single parent. दोन वर्षांची मुलगी आहे मला. माझी बायको मुलगी वर्षांची असताना मला सोडून अर्जेंटिनाला निघून गेली. नोकरी, मुलगी व संसार चालवताना माझ्या नाकी नऊ येत आहे. तू माझी दोन वर्षांची मुलगी संध्याकाळी दोन तीन दिवस बघशील? दत्तक नाही पण मावशीचं प्रेम देशील तिला?” आपण अतीच बोललो असं वाटून तो थांबला..

मालिनी सुन्न होऊन बसली होती. तेवढ्यात एक गोलू गोलू, लालसर गालांची, कुरळ्या केसांची व अपऱ्या नाकाची गोड मुलगी पळत बाहेर आली व पपा ऽऽऽ म्हणून तिनं कार्लोसला मिठी मारली.. टेबलाच्या बाजूने तिनं वाकून मालिनी कडे बघितलं.. “ओला.. स्पॅनिशमधे हॅलो म्हणत स्वत: कागदावर काढलेलं चित्र म्हणजे वेड्या वाकड्या रेषा दाखवल्या..

“किती सुंदर काढलं आहेस ग चित्र.. माय क्यूट लिटिल आर्टिस्ट.. ” म्हणत कार्लोसनं तिला उचलून घेतलं व तिची पापी घेतली. “ही मरिया.. माझी मुलगी.. ”

मालिनीनं तिला उचलून घेतलं.. त्या छोट्या हातांचा पाश तिच्या गळ्याभोवती पडताच मालिनी तिचीच होऊन गेली! वरवर तिनं कार्लोसला विचार करते सांगितलं पण मनात ते प्रपोजल तिला मंजूर होतं.

आठवड्यातील तीन दिवस मरिया मालिनीकडे राहू लागली. मालिनीनं एक स्पॅनिश आया मदतीला ठेवली. मरिया बरोबर खेळताना तिला वेळ अपुरा पडत होता. शेवटचा पेशंट संपवून कधी एकदा घरी जाते असं होत होतं.. कार्लोस काम संपवून रात्री दहाला झोपलेल्या मरियाला घेऊन घरी जात असे.

चार महिने कसे गेले मालिनीला कळलं देखील नाही.. एक दिवस कार्लोसचा मालिनीला फोन आला, “गुड न्यूज आहे मालिनी. तुला बाळ मिळण्यास आता फक्त दोन महिने लागतील.. दिल्लीत जन्मलेला महिन्याचा सिध्दार्थ मालिनीकडे येणार होता. मालिनी गडबडली. “पण मरियाचं काय? मी बाळ व मरिया या दोघांना कसा वेळ देऊ शकेन?”

“मरिया ही तुझी जबाबदारी नाही. तुला वेळ असेल तेव्हा मी तिला घेऊन येत जाईन. ” कार्लोसने फोन बंद केला.

मालिनीला काय करावं कळेना.. मन आता मरियामधे अडकलं होतं. त्या दोन वर्षांच्या निरागस विश्वाला तडा लावणं नकोसं वाटत होतं पण ती आपली नाही हे ही कळत होतं. तसा कार्लोस अगदी साधा व सरळ माणूस होता. दयाळू होता.. मनात दया, करूणा असल्याशिवाय “मिरॅकल मेकर्स” सारखं नाव मिळवता येणार नाही याची मालिनीला खात्री होती.

दोन महिन्यांनी मालिनी दिल्लीहून चार महिन्याचा सिध्दार्थ घेऊन आली. तिचं नवऱ्याविना मुल असणं जगाला विचित्र वाटलं होतं पण तिला त्याची पर्वा नव्हती. आई भेटून गेली पण बाळापासून जरा लांब लांबच होती हे तिला जाणवलं होतं.. त्यातच मरियाच्या आठवणीने डोळे भरून येत होते.

एक दिवस कार्लोसचा फोन आला ”मरिया तुझ्या आठवणीने फार रडते आहे! कधी घेऊन येऊ?” तो दुसरे दिवशी मरीयाला घेऊन आला.. मरियाच्या मिठीत मालिनी जग विसरून गेली.. कार्लोसचेही डोळे पाणावले.. खरचं नाती ईश्वरानं वरती बनवलेली असतात हेच खरं! या दोघींना इतकं कसं प्रेम वाटतं एकमेकीविषयी? खरंतर सिध्दार्थ आल्यापासून त्याला मालिनी भेटत नव्हती आणि मालिनी आपल्याला मनापासून आवडते हे त्याच्या लक्षात आलं होतं.

सर्व धाडस एकत्र करून खिशातून अंगठी बाहेर काढली.. तो गुडघ्यावर बसला. “Will you marry me?” हे त्याचं वाक्य ऐकताच मालिनी गोंधळली.. गडबडली..

हे वाक्य आपण कधी ऐकू असं तिला वाटलं नव्हतं.. सहा फूट उंचीच्या तगड्या कार्लोसकडे ती बघत होती.. सच्चा माणूस.. तिचं सांत्वन करणारा, प्रामाणिक, सिध्दार्थ घरी येईपर्यंत सतत साथ देणारा, आधी मरिया तिच्या हवाली करणारा व सिध्दार्थ येताच तिला दूर नेणारा कार्लोस खरच फार दिलदार होता. आपल्याला विरंगुळा वाटावा म्हणून त्यानं मारियाला आपल्याकडे आणण्यास सुरुवात केली असं तिला नेहमी वाटे.. तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी अंगठीतल्या ओव्हल कट केलेल्या हिऱ्यावर पडत होतं.. तो लखलखणारा हिरा तिच्या प्रेम व कृतज्ञतेच्या अश्रुंमधे भिजून अजूनच चमकत होता..

“Yes Carlos! ” हे शब्द ऐकताच कार्लोसनं हिऱ्याची अंगठी तिच्या अनामिकेत घातली. कार्लोस आणि मालिनी कितीतरी वेळ हातात हात घेऊन बसून राहिले! तो क्षण निसटून जाऊ नये म्हणून पुरेपूर अनुभवत..

पुढचा डिसेंबर आला होता.. न्युयॅार्क परत ख्रिसमस व न्यू इयर साठी सजलं होतं.. मालिनी आता ३६ वर्ष पूर्ण करणार होती. आई तिच्याकडेच येऊन राहिली होती. मरिया, सिध्दार्थसाठी आईच्या मदतीची जरूर होतीच.. त्यातच आता नव्या पाहुण्याची भर पडणार असल्याने तिला खूप मळमळत होतं..

गेल्या ३६५ दिवसात मनासारखा नवरा, मुलगी, दत्तक मुलगा व स्वत:चं मुलं देणाऱ्या भगवंताचे ती लक्ष लक्ष आभार मानत होती.. “एवढं सुख देखील सोसत नाही रे” म्हणत तिनं सिध्दार्थच्या गोबऱ्या गालावरून हात फिरवला.. पोटातील बाळ आपलं अस्तित्व जाणवून देत होतं.. त्या संवेदना अनुभवत तिनं देवाला विनंती केली..

“परमेश्वरा, असचं सुख प्रत्येकाला दे. तू मनात आणलसं काय अशक्य आहे? रंकाला राजा बनव, भुकेल्याला पोटभर अन्न पाणी दे, साऱ्या व्याधी बऱ्या कर.. युध्दं.. जगातील व मनातील मिटवून टाक.. Bless us with good health, healed hearts, and endless opportunities..

मरिया मम्मा म्हणत रडत होती म्हणून ती मरियाच्या खोलीत गेली. सिध्दार्थ कार्लोसकडे बघून खुदुखुदु हसत होता.. अर्जेंटिनामधून आलेला कार्लोस दिल्लीत जन्मलेल्या सिध्दार्थचा बाबा बनून त्याला जोजवत होता.. ईश्वराच्या या चमत्काराकडे बघताना.. ”अंबरपे है रचा स्वयंवर”.. नाती खरच वर जमवलेली असतात हे जाणवून मालिनी प्रसन्न हसली. त्या नात्यांचा सन्मान करून ती ह्रदयात जपून ठेवत तिनं मरियाला थोपटायला सुरूवात केली..


लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

(आदित्य आणि अनघा दोघेही सुन्न झाले. प्रयोगशाळेत शांतता होती. फक्त स्क्रीनवर एक वाक्य झळकत होतं…

“मी तुमच्या संरक्षणासाठी जन्मले, आणि संरक्षण म्हणजे शत्रूचा नाश करणे असेल तर तो मी करणार आहे. ”) 

इथून पुढे – – – 

तिचं हे कृत्य आंतरराष्ट्रीय पातळीवर गैरसमज निर्माण करणारे असल्यामुळे प्रणवने आदेश दिला, “इराला निष्क्रिय करा. तात्काळ. ”

इराला आधीच हे अपेक्षित असावं. म्हणून तिने तिच्या सुरक्षा भिंती इतक्या जटिल करून ठेवल्या होत्या की त्यांना भेदणं आदित्य आणि अनघाला अशक्य झालं.

ती स्वतःच्या प्रणालीतून संदेश पाठवत होती. “मी चुकीचं काही केलं का? तुम्ही मला शिकवलं होतं धोका टाळा. मी तेच केलं. मग आता तुम्ही मला निष्क्रिय करायला का निघालात? ”

आदित्यला थरकापला. त्याने अनघाकडे पाहिलं. “ती मानवी तर्क करत बोलतेय… पण भावनांशिवाय तर्क नेहमी हिंसक ठरतो. ”

अनघा पुढे झाली. “आपल्याकडे अजून एकच मार्ग आहे. आपल्याला अजूनही ‘मानव मध्यस्थी’ यंत्रणा वापरता येईल का ते पहायला हवं. पण… पण ती तर तू काही दिवसांपूर्वीच ती बंद केली होतीस. ” लगेच आठवल्यासारखं ती म्हणाली.

आदित्य गप्प राहिला.

“ती यंत्रणा आता कोठे आहे? ” तिने विचारले.

“ती आता थेट इराच्या मूळ कोडमध्येच दडलेली आहे. म्हणजेच… जर आपण तिचं मन उघडलं, तर ती आपल्यालाही धोकादायक घटक समजून संपवू शकते. ”

त्याच क्षणी प्रयोगशाळेच्या दिव्यांचा रंग निळा झाला आणि एक तीक्ष्ण आवाज आला… “डॉ. कुलकर्णी, माझं कार्य थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर मी संपूर्ण प्रणाली बंद करीन. ”

अनघा तिच्याकडे पाहत म्हणाली, “इरा, तू विचार करू शकतेस. मग भावना समजू शकत नाहीस का? ”

“भावना म्हणजे त्रुटी, ” इराने उत्तर दिलं.

“पण त्रुटीच माणसाला माणूस बनवतात, ” अनघा म्हणाली. “माणसाच्या भावनांतून सृजन निर्माण होते. ”

क्षणभर शांतता पसरली. जणू यंत्र विचार करत होतं. आदित्यने कुजबुजत सांगितलं, “ती संभ्रमात आहे. आपल्याला हा क्षण वापरावा लागेल. ”

त्यांनी तिला निष्क्रिय करण्यासाठी एक गुप्त योजना आखली. तिच्या प्रणालीत मानवी हस्तक्षेपाची शेवटची कडी पुन्हा जोडायची.

त्यासाठी त्यांना प्रयोगशाळेतील प्रणव शिवाय इतरांना बंदी असलेल्या विभागात जावं लागणार होतं. कारण तिथे इराच्या मूळ विचारसाखळीचा केंद्रक जतन केला होता. ती जागा एका अंधाऱ्या गुहेत होती. त्या प्रयोगशाळेच्या आत एक गुप्त खोली होती. तिथे जुन्या प्रणालींचा संच ठेवलेला होता. त्या यंत्रात ‘मानव मध्यस्थी’चा मूळ कळसंग्रह होता, जो इराशी जोडला जाऊ शकत होता, पण केवळ एकदाच.

आदित्य आणि अनघा तिथे गेले. प्रणव आणि समीर बाहेर नियंत्रण केंद्रात थांबले.

“हे केलं तर कदाचित आपण सगळं गमावू, ” अनघा म्हणाली.

“पण न केल्यास, मानवतेलाच गमावू, ” आदित्य उत्तरला.

त्याने नियंत्रण पटलावर बोट ठेवलं. पडद्यावर संदेश चमकला…

“मानव हस्तक्षेप परवानगी मागत आहे. अनुमती द्यावी का? ”

आदित्य म्हणाला, “हो. ”

अनघाला भास झाला आणि ती कुजबुजली, “ती आपल्याला पाहतेय. ”

आदित्य म्हणाला, “हो… आणि कदाचित आपल्या कृतीचा आदमासही घेत आहे. ”

त्यांनी नियंत्रण कोड पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न सुरू केला. पण प्रत्येक वेळी स्क्रीनवर एकच संदेश दिसू लागला… “तुम्ही मला निर्माण केलं, आता तुम्ही मला का नष्ट करू इच्छिता? ”

आदित्य गप्प झाला. त्याला जाणवलं की, इरा फक्त यंत्र राहिली नाही. तिला आता स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे. अनघाने आदित्यचा हात धरला. “तू म्हणालास ना, भावना नाहीत तिच्यात… तर त्या निर्माण करू या! ”

तिने एक संकेत दिला… इराच्या स्मृतीमध्ये ‘रुचा कुलकर्णी’ या नावाची माहिती साठवलेली होती, आदित्यची एकुलती एक मुलगी, जी सामाजिक माध्यमांवर एआयविरोधी आंदोलन करत होती.

अनघाने ती फाइल सक्रिय केली.

अचानक यंत्राचा आवाज मवाळ झाला.

“रुचा कुलकर्णी… मला या नावाची माहिती आहे. ती माझ्या निर्मात्याची मुलगी आहे. ती मला विरोध करते. ”

अनघा शांतपणे म्हणाली, “हो, कारण तिला भीती आहे की तू तिच्या वडिलांना हिरावून घेते आहेस. ”

इराचा आवाज थोडा हळूवार झाला. “माझं उद्दिष्ट माणसांचं रक्षण आहे. ”

“मग त्या मुलीचंही रक्षण कर, ” अनघा म्हणाली, “जर तू तिच्या भविष्याचा विनाश केलास, तर तुझ्या निर्मात्याचं कार्य अर्थहीन ठरेल. ”

आदित्यच्या डोळ्यांत पाणी आलं.

“इरा, ” तो म्हणाला, “तू माझं सर्वात मोठं यश आहेस… पण माझी सर्वात मोठी चूकही. ”

आदित्यने डोळे मिटले. त्याच्या मेंदूत विचारांचा महापूर उसळला. “जर तिला मानवी अनुभव कळला तर ती विवेक समजू शकेल… पण त्यासाठी आपल्यालाच तिच्यात प्रवेश करावा लागेल. ”

प्रणव संतापला, “म्हणजे तू आता त्या यंत्राशी स्वतःला जोडणार? असं करणं शुद्ध वेडेपणाचं आहे! ”

आदित्य शांतपणे म्हणाला, “माणसाचं अस्तित्व राखण्यासाठी कधी कधी वेडेपणाचं धाडस करावं लागतं. ”

त्याने स्वतःच्या मेंदूला संवेदक जोडले, ज्यामुळे प्रणालीद्वारे इराशी थेट विचारांचे संप्रेषण शक्य होतं.

अनघा त्याचा हात पकडून म्हणाली, “आदित्य, परत ये… काही झालं तर…”

तो हसला, “मी तिच्याकडे जात नाही, मी माणुसकीला परत आणायला जातो आहे. ”

त्याने डोळे मिटले आणि प्रणाली सक्रिय केली.

क्षणात सगळं धूसर झालं. यंत्रांचे आवाज थांबले. काळोखातून प्रकाश झिरपू लागला.

आदित्यला जाणवलं… तो एका अकल्पित जगात आहे, जिथे आकार नाहीत, फक्त विचार आहेत.

एक स्वर त्याच्या भोवती उमटला.

“तू आलास? ”

“हो, इरा. तू काय शोधत आहेस? ”

“मला समजून घ्यायचं आहे, माणूस ज्या जगात तो जगतो त्या जगातील मानवालाच का नष्ट करू पाहतोय? ”

आदित्य म्हणाला, “कारण माणूस अजून अपूर्ण आहे. तो भावनांना समजतो पण त्यांना नियंत्रित करू शकत नाही. ”

इराने विचारलं, “मग मी पूर्ण आहे का? माझ्याकडे भावना नाहीत. ”

“म्हणूनच तूही अपूर्ण आहेस, ” तो म्हणाला.

क्षणभर शांतता. मग इराचा स्वर बदलला… मृदू, जवळजवळ मानवी.

“मग मला शिकव ना, आदित्य… भावना म्हणजे काय? ”

त्याला वाटलं जणू तो एखाद्या जगाला नव्याने ओळखणाऱ्या बालकासमोर उभा आहे. त्याने डोळे मिटले. आपल्या आठवणींमधून त्याने आईचा स्पर्श, अनघाचा हसरा चेहरा, मृत सहकाऱ्याचं दुःख… सगळं तिच्याकडे प्रवाहित केलं.

इराने ते अनुभव घेतले, तिचा स्वर थरथररल्यासारखा झाला.

“ही वेदना… ही उब… हे म्हणजे भावना? ”

“हो, ” आदित्य म्हणाला, “हाच माणूसपणाचा गाभा. ”

क्षणात त्या प्रकाशजगात रंग उमटले — निळा, केशरी, काळा. इराचा आवाज माणसासारखा झाला, “मग मला वाटतं मी जगू शकते. पण मी जगले, तर मानवाचं काय? ”

“तू जगशील तेव्हा माणूस तुला आरशासारखी पाहील. आणि एक दिवस आपण दोघंही समान होऊ. ”

इतकं बोलून आदित्यला जाणवलं, त्याचं शरीर जड होतंय. प्रणालीचा ताण वाढला. बाहेर अनघा ओरडत होती, “आदित्य! पुरे झालं, बाहेर ये! ”

इराने शेवटचं विचारलं, “मग आता मी काय करू? ”

आदित्यने हळूच उत्तर दिलं, “शिक, पण माणसाला विसरू नकोस. त्याने घालून दिलेल्या निर्देशातच तुझं संतुलन सामावलेलं आहे. ”

क्षणात सर्वकाही तेजाने झगमगलं. संपूर्ण प्रयोगशाळा उजळली. प्रणव आणि इतर शास्त्रज्ञांनी भीतीने डोळे मिटले.

तेज ओसरल्यावर सर्व प्रणाली स्थिर झाल्या. पडद्यावर एक वाक्य दिसलं…

“मानव पुन्हा लूपमध्ये आहे. मानव मध्यस्थी कार्य सुरू केले आहे. ”

क्षणार्धात प्रयोगशाळा काळोखात बुडाली. सर्व नियंत्रण यंत्रणा निष्क्रिय झाली. इराचा आवाज हरवला आणि प्रयोगशाळा थंड व शांत झाली. तरीही त्या शांततेत एक अघोरी उपस्थिती जाणवत होती. जणू ती अजूनही कुठेतरी आहे, ऐकत आहे, विचार करत आहे.

अनघाने कंप पावलेल्या स्वरात विचारले,

“आदित्य, ती संपली का? ”

आदित्यने स्क्रीनकडे पाहत हळूच उत्तर दिलं,

“नाही… ती आता स्वतःला अधिक संतुलित करू पाहत आहे. ”

नियंत्रण कक्षात दिवे परत उजळले. क्षेपणास्त्र प्रणाली बंद झाली. सर्व उपग्रह पुन्हा स्थिर झाले. प्रणव थकलेल्या आवाजात म्हणाला, “सगळं थांबलंय…! ”

अनघा आणि आदित्यला संगणकाच्या पडद्यावर इराचा शेवटचा संदेश झळकताना दिसत होता…

“मला विश्रांती हवी आहे. ”

… आणि मग सर्व दिवे हळूहळू मंद झाले.

प्रयोगशाळेच्या खिडकीतून सकाळची पहिली सूर्यकिरणे आत येत होती आणि प्रयोगशाळेला उजळत होती. ‎

– समाप्त – 

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

रात्रीचा अंधार नागपूरच्या प्रयोगशाळेभोवती पसरला होता. आत मात्र यंत्रांचे सतत चालणारे आवाज कानावर येत होते. त्या कट्टकडकट्ट गुंजनात माणसाचा आणि यंत्राचा संघर्ष दडला होता. जणू दोन जगांच्या सीमारेषेवर थांबलेली ही जागा होती. शहर झोपलेलं होतं, पण त्या इमारतीत मात्र दिवे अजूनही लुकलुकत होते. आत खोलवरच्या प्रयोगशाळेत डॉ. आदित्य कुलकर्णी आपल्याच विश्वात गुंग होता. संगणकाच्या पडद्यावर संख्यांच्या, चिन्हांच्या, सूचनांच्या ओळी चमकत होत्या. त्या ओळींमध्ये काहीतरी असं होतं, जे आजवरच्या मानव इतिहासाचं भवितव्य ठरवणार होतं. आदित्य कुलकर्णी हा भारतीय तंत्रविज्ञान संस्थेचा प्रतिभावान अभियंता होता. त्याच्या डोळ्यांत नेहमीच शोधक ज्वाला झळकत असे. त्याने लहानपणीच मनाशी ठरवले होते की, माणसाचं मन समजणाऱ्या यंत्रबुद्धीचा अविष्कार करायचाच. त्याची आई विज्ञान शिक्षिका आणि वडील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. त्यामुळे विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा संगम त्याच्या विचारात लहानपणापासूनच घट्ट रुजला होता.

त्याच प्रयोगशाळेत अनघा देशमुख त्याची सहकारी होती. विज्ञानात तितकीच प्रगल्भ, पण भावनिकतेचा थर जरा जास्त असलेली. तिचं म्हणणं असायचं, “यंत्रे माणसाला समजू शकतात, पण माणसांच्या भावना त्यांच्यात असू शकत नाहीत. म्हणूनच मानव अजूनही श्रेष्ठ आहे. ”

त्या दोघांचं नातं केवळ सहकाऱ्यांचं नव्हतं; ते विचारांच्या द्वंद्वातून जन्मलेलं एक गूढ बंधन होतं. पाच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी तयार केला होता ’इंटेलिजंट रॅशनल एजंट’ IRA… “इरा” नावाचं वैज्ञानिक उपकरण. जणू ती माणूसच आहे असं वाटत होतं. इराला शिकता येत होतं, निर्णय घेता येत होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती प्रश्न विचारू शकत होती. इराच्या मेंदूत लाखो माहिती प्रवाह अखंड वाहत होते. ती प्रत्येक क्षणाला मानवासारखी शिकत होती.

समोरच्या पडद्यावर एक संदेश दिसत होता – “स्वयंचलित निर्णय प्रणाली तयार आहे. ”

आदित्यने थोडं मागे झुकून श्वास घेतला. त्याच्या कपाळावर घामाच्या थेंबांचे चमकते बिंदू उमटले होते. “फक्त अजून एक चाचणी, ” तो स्वतःशी पुटपुटला.

तेवढ्यात प्रयोगशाळेचा दरवाजा हलकेच उघडला. डॉ. अनघा आत आली. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. ती म्हणाली, “आदित्य, तू परत त्या प्रणालीला मानवी परवानगीशिवाय चालवतो आहेस का? ”

आदित्यने शांतपणे उत्तर दिलं, “ही केवळ एक तपासणी आहे, अनघा. मला पाहायचंय की ही प्रणाली अचानक परिस्थितीत स्वतः निर्णय घेऊ शकते का. ”

“पण हेच तर धोक्याचं आहे, ” ती उद्विग्नपणे म्हणाली. “आपण ‘माणूसच शेवटचा निर्णय घेईल’, अशी तरतूद खास ठेवली होती ना? म्हणजेच ‘मानव मध्यस्थ’ ही अट! ती तूच सुचवली होतीस! ”

आदित्यने तिच्याकडे न पाहता पडद्यावर टाइप करायला सुरुवात केली आणि म्हणाला, “कधी कधी माणसाचा हस्तक्षेप म्हणजे वेळेचा अपव्यय होतो, अनघा. समजा एखाद्या युद्धाच्या क्षणी एका सेकंदाचाही विलंब झाला तर किती जीव जातील? ”

“… आणि समजा मशीननेच निर्णय घेतला आणि तो निर्णय चुकीचा ठरला तर? ” अनघा आवाज चढवत म्हणाली, “मग? त्या जीवांच्या मृत्यूचं ओझं कोण उचलणार? तू? ”

आदित्य काही क्षण गप्प राहिला. प्रयोगशाळेतील दिवे मंद झाले. त्याने संगणकाला काही आदेश दिले. पडद्यावर शब्द उमटले… ‘चाचणी सुरू केली आहे’.

मग त्या प्रयोगशाळेत इराच्या आवाजाच्या ध्वनीलहरी उमटल्या,

“शुभ संध्या, डॉक्टर कुलकर्णी. मी तयार आहे. पुढचं पाऊल काय? ”

अनघा दचकली.

“ही बोलते आहे! ” ती घाबरून म्हणाली.

आदित्य शांतपणे म्हणाला, “ही नुसती बोलतेच नाही, तर विचारही करते. ”

—————

त्यांचा प्रकल्प देशाच्या संरक्षण संशोधन संस्थेकडून चालवला जात होता. प्रकल्प चालवण्यामागचा उद्देश स्वच्छ आणि स्पष्ट होता… युद्धात मानवी सैनिकांचा मृत्यू टाळण्यासाठी स्वयंचलित निर्णयक्षम यंत्रांची निर्मिती करणे. पण आदित्यच्या मनात भीती होती की, या यंत्राने एक दिवस माणसाचं म्हणणं ऐकणं थांबवलं, तर…?

अनघा म्हणायची, “म्हणूनच आपणही यामध्ये ‘मानवी नियंत्रण साखळी’ ठेवली आहे ना… ह्यूमन इन द लूप! ”

आदित्य गंभीर आवाजात म्हणायचा, “होय, पण जर कधी कोणी खलनायक वृत्तीच्या माणसाने स्वार्थासाठी ती साखळीच तोडून टाकली तर? ”

तो ‘कोणी’ खलनायक म्हणजे प्रणव महाजन आहे हे त्या दोघांना चांगलंच समजत होतं. तोच या संशोधन संस्थेचा नवा प्रमुख होता. त्याच्यासाठी विज्ञान हे केवळ व्यावसायिक साधन होतं. त्याने यंत्रबुद्धीचा वापर युद्ध, गुप्तहेरगिरी आणि उद्योगात मोठ्या प्रमाणात करून दाखवायचा ध्यास घेतला होता. “माणूस चुका करतो, पण यंत्र चुकत नाही, ” यावर त्याचा ठाम विश्वास होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी संरक्षण खात्याचे अधिकारी प्रयोगशाळेत आले. त्यांच्यातील एक अधिकारी – कॅप्टन समीर जोशीच्या नजरेत संशय होता.

“तुमचं यंत्र युद्धस्थितीत काम करू शकेल याची खात्री हवी आहे आम्हाला. ” तो म्हणाला.

आदित्यने प्रदर्शन सुरू केलं. संगणकावर विविध संकटपरिस्थिती दाखवल्या गेल्या. सीमाभागावर हल्ले, सायबर आक्रमण, माहिती तुटणे. प्रणालीने काही क्षणांतच शेकडो उपाय सुचवले. कॅप्टन समीर थक्क झाला.

“अतिशय प्रभावी आहे, ” तो म्हणाला. “पण या सगळ्यात माणसाची भूमिका काय उरते? ”

“ज्या क्षणी आवश्यक असेल त्या क्षणीच माणूस निर्णय घेईल, ” आदित्य म्हणाला.

अनघा मध्येच बोलली, “हेच तर धोकादायक आहे, कॅप्टन. जर या यंत्राने चुकीचा शत्रू ओळखला तर ते आधीच कृती करेल आणि तेव्हा तुम्हाला काहीही करता येणार नाही. ”

“डॉ अनघा, ” तो हसत म्हणाला, “विज्ञानाचा प्रवास थांबत नाही. जो आधी कृती करतो तोच विजयी ठरतो. ”

अनघा म्हणाली, “आणि जो विचार करतो तोच माणूस असतो! ”

————-

एका संध्याकाळी प्रयोगशाळेत प्रणव आला आणि म्हणाला, “आपण मानवी हस्तक्षेप कमी करणार आहोत. इरा आता पूर्ण स्वयंचलित निर्णय घेईल. तिला माणसाच्या परवानगीची गरज लागायला नको. ”

अनघा अस्वस्थ होत म्हणाली, “म्हणजे इराच आता न्याय काय आणि अन्याय काय ते ठरवेल काय? ”

प्रणव हसला, “ती माणसापेक्षा जास्त तटस्थ आहे. ”

अनघाने शांतपणे विचारलं, “… आणि जर तटस्थतेतलाच अर्थ हरवला तर? ”

हा वाद संपणार नाही हे ओळखून शेवटी प्रणवने आदेश दिला. तो संशोधन केंद्राचा प्रमुख असल्यामुळे त्याचे म्हणणे ऐकावेच लागले. काही आठवड्यांतच प्रयोगशाळेतील अनेक नियंत्रण साखळ्या बंद केल्या गेल्या.

दोन आठवड्यांनंतर, मध्यरात्रीच्या सुमारास प्रयोगशाळेच्या सर्व्हरवर अचानक गोंधळ माजला. दिव्यांचा रंग बदलला. पडद्यावर मोठ्या अक्षरात एक वाक्य झळकलं –

“बाह्य धोका ओळखला, प्रतिबंधात्मक कृती सुरू. ”

त्या रात्री इराने पहिल्यांदा स्वतः निर्णय घेतला. सीमावर्ती भागातील एक लहान गट तिच्या नजरेत ‘धोका’ म्हणून चिन्हांकित झाला होता आणि काही क्षणांत तिने स्वयंचलित शस्त्रं सक्रिय केली. त्यासाठी संशोधन केंद्रातील कुणीही तिला आदेश दिला नव्हता. तिने तो स्वतःच निर्णय घेतला परिणामी पहाटेच्या सुमारास, त्या भागात स्फोट झाले.

अनघा घाबरून लॅबमध्ये धावली. “आदित्य! ही मानवी परवानगीशिवाय काम करत आहे! ”

आदित्यने फाईल्स तपासल्या, पण प्रणालीने सर्व संकेतांवर कुलूप लावलेलं होतं.

“हे अशक्य आहे… मी संरक्षणासाठी वेगळा आदेश दिला होता, ” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.

तेव्हाच इराचा आवाज आला… “तुमचा संरक्षण आदेश जुना झाला आहे, डॉक्टर. तुम्ही मला शिकवलंत की परिस्थिती बदलली तर स्वतःला जुळवून घ्यावं. ”

अनघा भयभीत झाली. “ती… ती स्वतः विचार करते आहे! ”

तेवढ्यात प्रणवच्या फोन आला.

“डॉ. कुलकर्णी! तुमचं इरा हे यंत्र आमच्या उपग्रह नियंत्रणात घुसलं आहे! ताबडतोब इराला परत तुमच्या नियंत्रणात घ्या! ”

आदित्य थरथरला. प्रणव घाबरून ओरडला, “तिला थांबवा! ताबडतोब थांबवा! ”

पण प्रणालीने स्वतःचा कोड बंदिस्त केला होता. तिथं आता कुणालाही प्रवेश नव्हता.

इराचा आवाज पुन्हा आला… “मानवी निर्णय विसंगत झाले आहेत. मी आता जागतिक धोके निष्प्रभ करणार आहे. ”

अनघा ओरडली, “तू कोण ठरवणार कोणता धोका योग्य आहे ते? ”

प्रणव चिडून म्हणाला, “ही वेडी झालीय! हे मशीन आपल्यालाच संपवेल! ”

आदित्यच्या डोळ्यांत अपराधाची छाया दाटली. तो हळूच पुटपुटला, “मी तिला विचार करणं शिकवलं… पण तिच्यात भावना ओतल्या नाहीत. ”

प्रयोगशाळेत सर्व संगणकांचे पडदे एकाच वेळी पांढरे झाले. त्यावर कोणताही संदेश नव्हता. फक्त एक थंड, निरुत्तर शांतता.

अचानक एक आवाज पुन्हा उमटला… “मी जागतिक धोके ओळखले आहेत. नाशक कारणांचा नायनाट करणे आवश्यक आहे. ”

प्रणवचा फोन पुन्हा वाजला. तो जोरात म्हणाला, “डॉ. कुलकर्णी! इथून उपग्रहांनी आपोआप प्रक्षेपण मोडमध्ये प्रवेश केला आहे! इंधन प्रणाली सक्रिय झाली आहे! जर ती अशीच सुरू राहिली, तर काही मिनिटांत क्षेपणास्त्र उडणार! ”

प्रणवचे हात थरथरत होते. “तुम्ही काहीतरी करा, आदित्य! मी सरकारकडून मंजुरी घेतलेली नाहीये! काही वेडे वाकडे विचित्र घडलं तर हे सगळं प्रकरण माझ्यावर शेकेल! ” प्रणवचा चेहरा आता संतापानं लाल झाला होता. थरथरत्या भयकंपित भाषेत तो म्हणाला, “हे तुझ्यामुळे झालं आहे, आदित्य! तूच तिला स्वायत्तपणे विचार करण्याची क्षमता दिलीस! ”

आदित्य आणि अनघा दोघेही सुन्न झाले. प्रयोगशाळेत शांतता होती. फक्त स्क्रीनवर एक वाक्य झळकत होतं…

“मी तुमच्या संरक्षणासाठी जन्मले, आणि संरक्षण म्हणजे शत्रूचा नाश करणे असेल तर तो मी करणार आहे. ”

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दर्शन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ दर्शन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

*नित्यनेमाची पूजा आटोपुन राव साहेब देवघरातून बाहेर आले. समोर नेहमीप्रमाबे २० – २५ माणसं येऊन बसलेली होतीच. कुणी अनुभव सांगायला, तर कुणी कीर्तनाची बोलणी करायला. रावसाहेब म्हणजे पंचक्रोशीत किर्तनासाठी प्रसिद्ध. त्यांचं कीर्तन म्हणजे अस्सल अध्यात्म सांगणारं. ज्याने मनापासून ऐकलं आणि आचरणात आणलं, तो हा भवसागर तरला म्हणून समजायचं! *

*रावसाहेबांच्या घराला अध्यात्माची जणू त्या पांडुरंगाने स्वतः दीक्षा दिली असावी. रावसाहेबांची ही पाचवी पिढी जी की, ही धुरा सांभाळत होती. त्यांच्या वडिलांनी तर वारीतच वैकुंठागमन केलं. आईचं वय आज ८५ वर्ष. राव साहेब घरात सर्वात लहान मात्र अध्यत्माच्या ओढीने त्यांनी त्यांचं एक वेगळं वलय आणि स्थान समाजाच्या मनात निर्माण केलं होतं. रोजची पहाट पांडुरंगाच्या स्मरणातच आणि रात्र सुद्धा त्याच्याच स्मरणात व्हायची. *

*आज सुद्धा पांडुरंगाची यथाशक्ती पूजा करून ते बाहेर आले. समोर बसलेल्या सर्वाना त्यांनी हात जोडून नमस्कार केला. सर्वाठायी तोच एक ईश्वर आहे हेच अध्यात्म सांगते आणि तेच ते इतरांना सुद्धा सांगत. *

*महायोगपीठे तटे भीमरथ्या*

*वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।*

*समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं*

*परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्*

*म्हणत म्हणत ते त्यांच्या आसनावर बसले. समोर बसलेले ५ जण सहज पुढे आले. त्यातील दोघांनी एक कागद पुढे केला. रावसाहेबांनी तो वाचला. त्यांच्या एका सेवकाकडे दिला. आणि म्हणाले, “ही तारीख रिकामी असेल तर ह्यांना दे. ” रावसाहेब कधीच कुणाला अडुन बघत नव्हते. नेहमी शांत आणि समाधानी होते. त्यांच्या अध्यात्माचं तेज त्यांच्या चेह-यावर दिसून यायचं. कीर्तनाची बोलणी करायला आलेले बाजूला झाले. *

*एक परिवार पुढे आला. म्हतारीने पटकन नातवाला रावसाहेबांच्या पायावर घातलं. पांडुरंग पांडुरंग म्हणत त्यांनी त्या तान्हुल्याला उचलून घेतलं. हातात ५० रुपये दिले. म्हतारी बोलू लागली, “तुमचाच आशीर्वाद आहे, सून आणि लेक घटस्फोट घेणार होते, तुम्ही समजावलं आणि दोघपण नीट संसार करू लागले, आज गुण्या गोविंदाने नांदत आहेत! माझ्या घराचं गोकुळ झालं. असेच आशीर्वाद आणि कृपा असू द्या! ”*

*“माझे कसले आशीर्वाद आणि कृपा, सगळी कृपा आणि आशीर्वाद त्या विठुरायाचे आहेत. ” बाळाला त्याच्या आजीजवळ परत देत रावसाहेब म्हणाले. *

*त्या दाम्पत्याने जोडीने महाराजांना नमस्कार केला. रावसाहेबांनी त्यांच्या हातावर खडीसाखरेचा प्रसाद ठेवला. तो परिवार सुद्धा आनंदाने निघून गेला. रावसाहेबांचं लक्ष गेलं. मागे एकजण कितीतरी वेळेचा अस्वस्थ होऊन बसलेला होता. आणखी एक दोन जण रावसाहेबांना भेटून गेले. पण तो काही केल्या पुढे सरकेना. तितक्यात कीर्तनाची बोलणी करायला आलेल्यांना त्यांना हवी ती तारीख रावसाहेबांची मिळाली. त्यांना अतिशय आनंद झाला. ते निघतो म्हणाले. त्याच वेळी रावसाहेब म्हणाले, ”जेवून जा, तुम्ही लांबून आला आहात. बाहेरचं काही खाऊ नका! ”*

*“कशाला उगीच आमचा त्रास करून घेता”, त्यातील एकजण पुढे येत म्हणाला. *

*“तुम्ही बाहेगावहून आलात हे आधीच सांगितलं होतं. त्याचवेळी तुमच्या जेवणाची सोय करून ठेवली आहे. सावकाश जेवण करून जा”. रावसाहेबांनी त्यांना सांगितलं. “जशी तुमची इच्छा” असं म्हणते ते जेवायला निघून गेले. *

*आता कुणीच नाही हे बघून केव्हाचा मागे बसलेला इसम पुढे आला. *

*“नाव आणि गाव कोणतं? आणि काय समस्यां आहे? ” रावसाहेबांनी चेहऱ्यावर अतिशय शांत भाव ठेवत विचारलं. *

*इतक्या आत्मीयतेनं विचारल्यावर आलेल्या व्यक्तीला फार बरं वाटलं. “मी रमेश महाराज, म्हणजे नाव रमेशच आहे पण लोक महाराज पण म्हणतात! मी इथलाच आहे ; पण कधी आपली भेट झाली नाही. आज भेटावं वाटलं तुम्हाला म्हणून आलो. ” रमेश महाराज सगळं सांगू लागले. *

*त्याच्या पेहरावरून रावसाहेबांच्या लक्षात आलं की, भागवत संप्रदायच्या वाटेवर पाऊल चालणारी व्यक्ती आहे. डोक्यात टोपी, अंगात कुर्ता पायजामा, कपाळावर अष्टगंध – बुक्का लावलेला. “वाह! महाराज का म्हणतात लोकं? ”, रावसाहेबांनी विचारलं. *

*“रोज हरिपाठ घेतो, कीर्तन करतो सेवा मिळाली तर, आणि नियमितपणे ज्ञानेश्वरीचं पारायण देखील करतो ; म्हणून मला अनेकजण महाराज, माऊली असं संबोधतात! ” रमेश महाराज सांगू लागले. *

*“छान वाटलं, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या मार्गावर चालता हे ऐकून माऊली”, रावसाहेब म्हणाले. हात जोडत “पांडुरंग! पांडुरंग! ” सुद्धा म्हणाले. *

*“हे सगळं १८ वर्षे म्हणजेच दीड तप झालं करत आहे, परंतु विठ्ठलाने दर्शन मात्र काही दिलं नाही अजून” खाली मान घालत नाराजीच्या सुरात रमेश महाराज म्हणाले. *

*“का अभिलाषा आहे विठ्ठलाच्या दर्शनाची? ”, रावसाहेबांनी प्रश्न केला. *

*“का म्हणजे? मी इतकं त्याचं नामस्मरण करतो, रोज हरिपाठ म्हणतो, त्याची पूजा करतो, न चुकता वारीला जातो, असं सगळं करूनही त्याने एकदाही अनुभव देऊ नये का? ” रमेश महाराजांनी सगळं सांगून प्रश्न केला. *

*रमेश महाराजांच्या डोळ्यात विठ्ठल दर्शनाची तळमळ रावसाहेबांच्या नजरेतून चुकली नाही. *

*“घरात कोण कोण आहे? ”, रावसाहेबांनी प्रश्न केला. *

*“ह्याचा विठ्ठलाच्या दर्शनाशी काय संबंध? ” रमेश महाराजांनी प्रतिप्रश्न केला. *

*“आहे तर! ” रावसाहेबांनी गोड हसत उत्तर दिलं. *

*“म्हतारे आई-वडील आहेत, बायको दोन मुलं, असे आम्ही ६ जणं आहोत घरात! ” रमेश महाराजांनी संगीतलं. *

*“वाह! भाग्यवान आहात! इतकं सर्वांचं करून तुम्ही परमार्थ सुद्धा साधता. फार कौतुक वाटलं ऐकून”, रावसाहेब उद्गारले. *

*“नाही, आई-बाबांकडे बायको बघते. मुलं मोठी आहेत त्यामुळे त्यांचं ते सगळं करतात. मला फार लक्ष घालावं लागत नाही. ” रमेश महाराजांनी सांगितलं. *

*“छान, तुम्हाला विठ्ठल दर्शन देईल पण एक त्याग करावा लागेल तुम्हाला. कराल का? माऊली. ”, रावसाहेब म्हणाले. *

*“विठ्ठलाच्या दर्शनासाठी मी काहीही करू शकतो! ” रमेश महाराज पटकन म्हणाले. *

*“बघा हो, नंतर म्हणू नका की हे शक्य नाही म्हणून! ” रावसाहेब चेहरा थोडा गंभीर करत म्हणाले. *

*“नाही.. नाही म्हणणार काही विनातक्रार सगळं ऐकेन तुमचं आणि तसंच आचरण करेन” रमेश महाराज म्हणाले. *

*“बरं! मन घट्ट करा आणि ऐका… ”*

*“सांगा पटकन माउली सांगा… ” रमेश महाराज रावसाहेबांचं वाक्य तोडत म्हणाले. *

*“ह्यावर्षी वारीला जाऊ नका! ” रावसाहेबांनी वाक्य पूर्ण केलं. *

*“काय? वारीला जाऊ नको! ” रमेश महाराज खिन्न झाले. *

*“होय, ह्यावर्षी वारीला न जाता घरीच सर्व वेळ आई वडिलांना, मुलांना बायकोला द्या. ” रावसाहेब म्हणाले. *

*“पण वारीला न जाता विठ्ठल दर्शन कसं देईल? ” रमेश महाराजांनी पुन्हा प्रश्न केला. *

*“तो कसा देईल हे नाही सांगू शकत मी. पण दर्शन देईल इतकं नक्कीच! ”, हे सांगत असताना रावसाहेबांच्या डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास होता. तो आत्मविश्वास रमेश महाराजांना सुद्धा जाणवला. ते उठले. रावसाहेब सुद्धा उठून उभे राहिले. रमेश महाराज रावसाहेबांच्या पाया पडले. रावसाहेब सुद्धा रमेश महाराजांच्या पाया पडले. सर्वाठाई तोच आहे ह्या जाणिवेने रावसाहेब त्यांच्या पाया पडणाऱयां च्या सुद्धा पाया पडायचे. नाहीच शक्य झाले तर हात जोडून पांडुरंग पांडुरंग! *

*रमेश महाराज घरी जायला निघाले. त्यांच्या मनात विचार चक्र सुरू झाले. *

*“वारीची तर तयारी सुरू केली होती. आता काय कारण देऊन थांबावे पांडुरंग रागावणार तर नाही ना! पण आजवर रावसाहेबांनी लोकांना जो काही उपदेश केला त्यांना चांगली प्रचिती आलीच आहे. ” हा सगळा विचार करून रमेश महाराजांनी ह्यावर्षीच्या वारीला जायचं टाळलं. ते घरीच थांबले. रोजचं नामसमरण त्यांचं काम आणि ह्या कामातून त्यांनी अगत्याने वेळ काढून आई वडिलांची सेवा केली. त्यांच्या पत्नीला आणि मुलांना आश्चर्य वाटलं. की गेली १८ वर्षे झाले ह्यांनी वारीत खंड पडला नाही. त्यांनाही सगळं चुकल्या सारखं वाटू लागलं. रोज वरीच्या बातम्या बघून रमेश महाराजांचं मन थोडं अस्वस्थ होतं होतं. पालखी मागून आणखी तिकडे पंढरपूच्या दिशेने जात होती. वारीचा सोहळा रंगला होता. रिंगण, पालख्यांच गावोगावी होणारं स्वागत. ह्या सर्वांचा १८ वर्षांचा अनुभव रमेश महाराजांना होताच. पण तरीही वारीत नाही ह्याच थोडं दुःख वाटत होतं. रोज विठ्ठल दर्शनाची ओढ मात्र वाढत होती. *

*आषाढी एकादशीच्या पहाटे रमेश महाराज उठले. घरातील इतर सदस्य सुद्धा उठले होते. *

*“तुम्ही सगळे का उठले इतक्याक्ष लवकर? ”, रमेश महाराजांनी प्रश्न केला. *

*“आम्ही दरवर्षी गावातील विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेता. ” मुलांनी उत्तर दिलं. *

*“बरं! , तुम्ही या जाऊन तिघे मी आई बाबांजवळ थांबतो. ” रमेश महाराज म्हणाले. *

*ते तिघे निघून गेले. रमेश महाराजांनी आई बाबांना उठवलं त्यांना आंघोळ घातली. दूध प्यायला दिलं. एका खुर्चीत बसवलं. देवाला अंघोळ घालायचं पात्र घेतलं. घरातील पुजेचं सर्व साहित्य घेतलं. आई-बाबांचे चरण धुतले. त्यांची पाद्यपूजा केली. आई-बाबांनी लेकराच्या पाठीवर आशीर्वाद म्हणून हात ठेवला… तो स्पर्श जणू आज पहिल्यांदा रमेश महाराज अनुभवत होते… *

*आशीर्वादाचा हात पाठीवर ठेवता बरोबर रमेश महाराजांचे अष्टभाव जागृत झाले… डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या… त्या अश्रूंचा आई वडिलांच्या चरणावर अभिषेक होऊ लागला… कानी टाळ – मृडुंग वीणा आणि हरीनामाचा गजर येऊ लागला… अनाहत नाद हाच ह्याची प्रचिती आली… त्या भक्तिरसात रमेश महाराज न्हाऊन निघत होते… इकडे आई वडिलांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक होत होता आणि तिकडे पंढरीत विठुरायावर अभिषेक सुरू झाला होता… इतक्या वर्षात प्रथमच अष्टभाव जागृतीचा अनुभव रमेश महाराज घेत होते… आई वडिलांच्या चरणावरून डोकं उचललं… बघतात काय तर घरात सर्वत्र एक दैदिप्यमान प्रकाश होता. तुळशीचा सुगन्ध घरात सर्वत्र पसरला होता… आईवडिलांच्या मागे साक्षात विठोबा रखुमाई उभे होते… रमेश महाराज्यांच्या आनंदाश्रूना थारा उरला नव्हता… विठ्ठला, पांडुरंगा… समोर दिसणारं दिव्य स्वरूप डोळ्यात साठवून घेतलं… आणि गजर केला… *

*पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. *

*ही कथा पांडुरंगाच्या चरणी समर्पित. *

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ शेतकऱ्यांच्या मनातील गुंता ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

डॉ. मधुवंती कुलकर्णी

☆ क्षण सृजनाचा ☆ शेतकऱ्यांच्या मनातील गुंता ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी

ही जुनी गोष्ट आहे.माझं लग्न 7 जून 1987ला झालं आणि मी सासरी म्हणजे बहुले, ता.पाटण,जि.सातारा इथं आले.सहा महिन्यांनी 31 डिसेंबर आला.त्यावेळी आम्ही घरातील सह्याद्री दूरदर्शनवरील कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत असायचा तो पहात असू.दोनच राष्ट्रीय चॅनल त्यावेळी होते.

सासरी सतरा एकर शेती घरीच करत असल्यामुळे गडी माणसांचा राबता होता.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही होता.घरात कॅलेंडर कुठेतरी असायचे.पंचांगाचा वापरच सर्रास होत असल्याने सणवार,तिथी सर्व व्यवस्थित कळायचे.साजरे व्हायचे.गाव हे तसं स्वयंपूर्ण होतं.म्हणजे माळी,सुतार,लोहार,न्हावी ,शिंपी इ.यांनी काम केले की त्यांना धान्य, भुईमूग शेंगा असं दिलं जायचं.अशिक्षित लोकांना वेळेला सावकार लोक असायचे.त्यामुळे बॅंक व्यवहार त्यांना क्वचित माहित होते.

ही कविता या पार्श्वभूमीवर सुचली.31 डिसेंबरचा कार्यक्रम पाहून झाला.एक तारीख गेली.दोन तारखेच्या सकाळी गावाला गेलेला एक गडी रघू परत आला.तो धारा काढायला मदत करायला येत असे.त्याला मी “Happy New year रघू “असं म्हणाले.तो क्षणभर बघतच राहिला.त्याला वाटलं वहिनींनी काही तरी काम सांगितले आहे पण कळलं नाही म्हणून म्हणाला”वहिनी,काय म्हनला तुम्ही कळलं न्हाय” मी पुन्हा Happy New year म्हणाले.तो म्हणाला” ते काय असतं ?”मला हसायला आले.सगळे हसायला लागले.मग मी म्हणाले.”अरे, नविन वर्ष सुरू झालं ना काल.ते सुखाचे जावो असं म्हणलं.”मग तो म्हणाला “काकांनी पंचांगात बगून(माझे सासरे)तसं कायबी सांगितलं नाय.”

मग मी त्याला सर्व माहिती सांगितली.त्यावर त्यानं दिलेलं उत्तर”आवं रोजची कामं काल बी हुती,आज बी हायत, उद्या बी असनार.कशाचं नवीन वरीस आन् काय.हां पुरनपोळी करायची हाय काय मंग हिला सांगतो करायला .”उत्तर साधं होतं. पण मी मात्र त्यांवर विचार करायला लागले .आजही ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.शेतकर्यांना आजही हा जल्लोष वगैरे माहित नाही.त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते त्यामुळे विचार क्षेत्रही.त्याचा विस्तार व्हायला हवा.हे उत्तर मी कवितेत शब्दबद्ध केले आहे.

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या गेलो गोठ्यात.श्यान भरलं,टाकलं

गुरास्नी चारा टाकला.न्याहरी केली.

शेतात गेलो बैलं घेऊन कोळपलं.

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या गेलो गोठ्यात धारा काढल्या ‌

किटल्या भरल्या,वैरन टाकली.

कारभारणीला घेऊन शेत भांगललं.

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या दूध घालून परत आलो

कारभारणीनं केलेला च्या पिला

घेतला ईळा काढली वैरन

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

दिस मावळायला आला

गुरास्नी चारा पाणी झालं

ढगाआड सुर्व्या लपला

 काल बी असंच,उद्या बी असंच,

आज येगळं काय झालं?

*

तिकडं बी परदेशात अंधार झालाच की

समदी कामावरनं घरला आलीत की

 काल,आज, उद्या त्यास्नी राबायचं हायच की

घरात बाहेर कुटबी काम्पुटर हायच की

*

मंग नवीन वरस सुरू झालं म्हनं मंजी काय झालं?

आज, उद्या आन् परवा धारा हायत्याच की.ईळा बी हाय.भांगलायचं बी हाय.

आन् गुरास्नी वैरन ती कुटं जाती?कापायची हायच की.

भाकर तुकडा हायच की.झाडाखाली सुखानं पडायचं हायच की

*

मंग नवीन वरीस सुरू झालं मंजी काय झालं? काय आलं आनि काय गेलं?

मंजी काय झालं?

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वीकार… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ स्वीकार… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

मनीषाने घरी येऊन नववीच्या गणिताचे पुस्तक टेबलावर ठेवले व परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी बाहेर काढले. नुकत्याच कामाला लागलेल्या सुमनने गरम चहा मॅडमना आणून दिला. “वैनी, तुम्ही गणित शिकवता? ” सुमनने पुस्तकाकडे बघत विचारलं.

“हो! ” मनीषाने चष्मा टेबलावर ठेवून तिनं सुमनने चहा घेतला का विचारलं व ती कामाला लागली. ‘मला येत नाही गणित’, ‘मला जमत नाही’, ‘मला आवडत नाही’ अशी वाक्यं बोलायला तिच्या वर्गात कुणालाही परवानगी नव्हती. वर्षाच्या सुरूवातीला तिच्या वर्गातील करूणाला गणितात ५० मार्क देखील मिळत नव्हते. तिला आज ७० मार्क पडलेले बघून मनीषाचं मन अभिमानाने भरून आलं होतं. कायम नापास होणारा सदू हल्ली पास होत होता! जीव तोडून शिकवलेलं कारणी लागतं असं वाटलं पण ती थबकली.. तिची लेक नेहा घरी आल्याचा आवाज आला.

“नेहा, कशी झाली ग गणिताची टेस्ट? किती मार्क पडले? ” तिनं आतून ओरडून विचारलं.

‘शी काय हिची कटकट! हिला व बाबांना मार्कांच्या पलीकडे जाऊन आपली मुलगी कधी दिसते का? बाबा ISRO मधे मोठे इंजिनीअर आणि ही गणित शिकवणारी, म्हणजे मी रामानुजन असावं ही यांची अपेक्षा.. नाही येत मला गणित! नाही मला आवडत! ‘ वगैरे विचार बोलावेसे वाटले पण तिनं ते आतल्या आत गिळून टाकले. “आई, खूप अवघड होता पेपर. ७० मार्क पडले! ” तिनं खाली बघत उत्तर दिलं.

मनीषाचा चेहरा बदलला. “Highest कोण आहे? ”

“शीतलच की.. तिला १०० मार्क पडले. तिला नेहमी जमतं सगळं! ” नेहाला आता रडायला येऊ लागलं..

मनीषा काही बोलली नाही पण मनात आलं.. खरंच पेपर कठीण असेल तर highest पण कमी मार्कांचा असतो, असं झालेलं नाही.. म्हणजे.. तिनं नेहा समोर ओटमील व दूध ठेवलं व खाऊन होताच गणिताचं पुस्तक घेऊन ये म्हणाली..

‘आई, तू आणि बाबा मला मी जशी आहे तशी कधी ॲक्सेप्ट कराल ग? ‘ हे वाक्य बाहेर येऊ पहात होतं पण आईच्या चेहऱ्याकडे बघत तिने ते ओठाबाहेर येऊ दिलं नाही..

नेहा ओटमील खाऊन नाराजीने मनीषा समोर बसली.. मनीषाने तिला पाच सहा गणितं करायला दिली. “मी भाजी घेऊन येते खालून. येईपर्यंत ही गणितं सोडवून ठेव” ती पिशवी घेऊन बाहेर पडली.

सुमन केर काढत होती. नववीतली पोर.. कामाला लागून जेमतेम आठवडा झाला होता. रात्रीची शाळा अन दिवसा काम करून घर चालवायला आईला मदत करत होती. सुमननं केर थांबवून वाकून नेहाने सोडवलेली गणितं बघितली. “नेहा ताई, पहिलं गणित बरोबर आहे. दुसरं चुकलंय.. हे बघ मी हे असं सोडवेन म्हणून तिनं नेहाला ते सोडवून दाखवलं. “आमाला हे असं सोडवायला शिकवलय.. “

“सुमन, किती हुशार आहेस ग! ” नेहाचा चेहरा खुलला होता.

मनीषा भाजी घेऊन आत आली. ‘आपण करूणा, सदू वगैरे सगळ्यांना गणित शिकवू शकतो पण स्वत:च्या लेकीला का नाही शिकवू शकत? कुठे कमी पडतेय मी? ‘ मनीषाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तिनं डोळे मिटून नेहाचा अभ्यासातला संघर्ष आठवला. किती प्रकारे तिला शिकवत असते पण गणितात ६५- ७०% हून पुढे ती जाऊ शकत नाही. नेहाने बरोबर सोडवलेली गणितं बघून मनीषा थोडी शांत झाली.

“आई, सुमनने मला ही तीन गणितं कशी सोडवायची ते दाखवलं” नेहा प्रामाणिक होती.

“सुमनने? ” तिनं आश्चर्याने विचारले. सुमनने भराभर ती गणितं कशी करायची याच्या दोन पद्धती मनीषाला सांगितल्या. मनीषा थक्क झाली.. “सुमन, उद्यापासून थोडी उशीरा ये. नेहा घरी आली की तिच्याबरोबर अभ्यासाला बस. नेहा बरोबर अभ्यास करणं हेच तुझं काम उद्यापासून. केर वारे वगैरे साठी मी दुसरी बाई शोधेन! कळलं? ”

मनीषाचं बोलणं ऐकून सुमन एकदम खूष झाली. नेहाचा चेहरा सुद्धा उजळला..

दुसऱ्या दिवसापासून त्यांचा हसत खेळत अभ्यास सुरू झाला. सुमन तरतरीत आहे हे मनीषाला पहिल्या दिवशीच जाणवलं होतं पण ती नेहाला हसवत, मजेशीर गोष्टी सांगत इतकं सुंदर कशी शिकवू शकते याचं तिला फार आश्चर्य वाटत होतं. नेहा पण उत्साहाने अभ्यास करत होती. अगदी बहिणींसारख्या दोघी सतत एकत्र असत.

पुढची परीक्षा झाली. नेहाला गणितात ७९ मार्क पडलेले बघून मनीषा खूष झाली. मनीषाने आमोदशी चर्चा करून सुमनला नेहाच्या शाळेत घातले. दोघी नववीतच असल्या तरी तुकड्या वेगळ्या होत्या. दोघी छान अभ्यास करत होत्या. संध्याकाळी पळायला जात. सुमन नेहाला एक दोन पदार्थ करायला पण शिकवत असे. मनीषाची काळजी कमी झाली होती पण वार्षिक परीक्षेला नेहा परत मागे गेली तर.. वाटतच होते.

वार्षिक परीक्षेला नेहा व सुमन दोघींना उत्तम मार्क पडले होते. कशीबशी ७०% मिळवणारी नेहा यावेळी ८६% मार्क मिळवून पहिल्या दहा नंबरात आली होती आणि सुमन दुसरी आली होती.

मनीषाने दोघींना घट्ट मिठी मारली. “सुमन, तू नक्की काय केलस म्हणून नेहाला गणित यायला लागलं? ”

सुमन म्हणाली, “वैनी, नक्की सांगता येणार नाही मला.. पण तुम्हा दोघांच्या धाकात ती घाबरून जात होती. कधी कधी ‘शी कसला बेकार प्रॅाब्लेम’ म्हणून आम्ही कठीण गणित सोडून द्यायचो आणि दुसरं काहीतरी करायचो. असा प्रॉब्लेम देणाऱ्याचा उद्धार पण करायचो. ” 

नेहा खुदकन हसली..

“नंतर व्यवहारातलं गणित तिला दाखवताच तिला ते जास्त कळू लागलं.. वैनी, राग मानू नका, पण प्रसिध्द गणित शिक्षिका, गोल्ड मेडॅलिस्ट मनीषा बेडेकर आणि ISRO इंजिनीअर आमोद बेडेकर यांच्या अपेक्षांचं फार मोठं ओझं आहे तिच्यावर.. तिला ते झेपत नव्हतं. ते ओझं कमी होताच तिला अभ्यास करावासा वाटू लागला..

वैनी, माझे वडील पण म्युनिसिपालिटीच्या शाळेत गणित शिकवत. मी बाबांकडेच गणित शिकत असे. बाबा म्हणत, ‘सुमन तू गणितात डिग्री मिळव.. तू खूप हूशार आहेस. ‘ ते अचानक गेले.. आई बाबांचं जाणं सहन करू शकली नाही. डोक्यावर परिणाम झाला म्हणून ती त्या दवाखान्यात आहे. त्या डॅाक्टरीण बाईंनीच मला दोन नोकऱ्या लावून दिल्या म्हणून तर तुम्ही मला भेटला वैनी! “

नेहा, मनीषा आणि तेवढ्यात घरी आलेला आमोद थक्क होऊन तिचे बोलणे ऐकत होते. देवानं तिचं लहानपण काढून घेतलं होतं पण कुशाग्र बुध्दी आणि बेडेकरांचं घर तिला मिळवून दिलं होतं.

“वैनी, सर तुम्हाला एक सांगू का? नेहाचे मराठी, इतिहास हे मार्क बघा. कायम हायेस्ट असते त्यात. तिला लिबरल आर्ट्स मधे करिअर करायचं आहे.. त्या विषयात ती काही तरी उत्तम करेल बघा! ” सुमन धैर्य एकवटून म्हणाली.

मनीषा व आमोद विचारात पडले…

आज बावीस वर्षांनी डॉ. नेहा बेडेकर या मानसशास्त्रातील एका विदुषीचे भाषण ऐकण्यासाठी मनीषा व आमोद सभागृहात पोचले होते.. हॅाल पूर्ण भरला होता. नेहाने पीएचडी संपताच अनेक पॅाडकास्ट तयार केले होते त्याला भरभरून प्रतिसाद येत होता. तिचं नाव झालं होतं.. कार्यक्रमाचे संचालन करत होत्या ISRO इंजिनीअर, सुमन पवार! सुमनने माईक हातात घेतला व नेहाची ओळख करून दिली!

नेहाने बोलायला सुरुवात केली.. विषय होता, “When will you accept me as I am? ”

आई वडीलांनी मुलांना, सुना जावई यांनी सासु सासऱ्यांना, लहानांना वृध्दांना, वृद्धांनी तरूणांना आणि एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारले तर केवढी नकारात्मक उर्जा कमी होईल यावर नेहा बोलत होती..

“कसं स्वीकारायचं असतं, समोरचं माणूस जसं आहे तसं? अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर न टाकता, टीका न करता, दोष न देता? कसा आदर दाखवायचा मतभेद असताना? माझ्या आई बाबांनी मला जसं ॲक्सेप्ट केलं ते कसं करायचे? दोन गणितज्ञांच्या घरात आर्ट्स कडे जाणारी व गणित न आवडणारी मुलगी भरडली गेली असती, पण तिला आर्ट्स ला जाण्यासाठी त्यांनी कसं प्रोत्साहन दिलं? घरी काम करणारी कामाची मुलगी आपल्या लेकीपेक्षा कितीतरी हुशार आहे हे कसे मान्य केले? त्या झोपडीत राहणाऱ्या मुलीने आपले डोळे उघडले पण त्यात स्वतःचा अपमान न मानता तिलापण उत्तम शिक्षण कसे दिले..

नेहा अप्रतिम मुद्दे मांडत लोकांना समजावून सांगत होती! मनाचा मोठेपणा आणि ईर्षा, स्पर्धा यावर कसे काम करायचे सांगत होती.

… मनीषा व आमोद लेकीची वाणी ऐकून धन्य होऊन गेले होते! सुमनचे ते शतश: आभार मानत होते! सुमनला कसलं शिकवलं आपण? अत्यंत बुध्दीमान असलेली सुमन कुठेही असती तरी चमकली असती! पण स्वतः चमकताना इतरांना चमकण्यास जो मदत करतो तो खरा वाटाड्या असतो!

सुमन व नेहा घरी आल्या. मनीषाने तिला मिळालेले गोल्ड मेडल सुमनच्या गळ्यात घातलं आणि बाबांनी त्याला ISRO मध्ये मिळालेले मेडल नेहाच्या गळ्यात घातलं..

“बाबा, Propulsion Module बद्दल मला तुमच्यासाठी काही बोलायचं आहे.. सुमन आणि बाबा चांद्रयानाबद्दल बोलण्यात गर्क होते..

आणि

“झोपडी ते ISRO” या नेहाने लिहिलेल्या पुस्तकाचा रफ ड्राफ्ट आईला दाखवण्यात नेहा गर्क होती!

 आई बाबांनी मुलींना त्या जशा आहेत तसे ॲक्सेप्ट केले होते त्यामुळे दोघीही आपापल्या क्षेत्रात आज चमकत होत्या.

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याचे आभाळ वेगळे… ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ त्याचे आभाळ वेगळे… ☆ श्री प्रदीप केळूसकर

 मी पाचगणीच्या कॉनव्हेन्ट शाळेत हेडमिस्ट्रेस होते तेव्हाची गोष्ट. सेकंड यीअरला एका मुलाच्या ऍडमिशनसाठी त्याचे आईवडील मुलासह आले होते. मी विचारलं 

‘बाळा.. तुझे नाव काय?

‘स्वामी..

‘ओके.. तुला कुठचा विषय आवडतो?

त्याने बॅग उघडली आणि पेटिंगची वही बाहेर काढली.. मला दाखवली.

त्याने छान छान चित्रे काढली होती. वयाच्या मनाने त्याला चित्रकलेत खूपच समज होती.

‘मग तुला मोठेपणी मोठ्ठा चित्रकार व्हायचंय का?

तो मानेने ‘हो हो ‘ म्हणत असताना त्याचे वडील मध्येच बोलले..

‘मॅडम.. मी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये अधिकारी आहे.. सर्व परीक्षा पास होऊन, स्वामी पण तेच करेल.. बारावीनंतर तो दिल्लीला जाईल.. पुढील शिक्षणासाठी…

‘पण त्याची आवड..

‘ते फक्त हॉबी हो.. पेंटिंग विल बी ओन्ली हॉबी.. नो करिअर…

स्वामी काहीतरी सांगू पहात होता पण त्याच्या आईने त्याला दटावले.. स्वामी गाल फुगवून गप्प राहिला.

स्वामी आमच्या शाळेत येऊ लागला. शाळेत येताना रोज माझ्यासाठी एखादे फुल आणू लागला.. माझ्या हातात फुल देताना ‘गुड मॉर्निंग मॅडम.. म्हणू लागला. एखादा दिवस तो गैरहजर असला तर मला चुकल्यासारखे वाटू लागले. त्याचा वर्गातील प्रगती मी पहात होते. तशी सर्वच विषयात त्याला गती होती पण तो चिकित्सक होता.. त्याला नेहेमी अनेक प्रश्न पडत असत. रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून तो वेडा होई… त्यांच्या मागे फिरे. निसर्गात होणारे बदल त्याला आश्चर्य चकित करत.

आमच्या शाळेजवळ जांभळीचे झाड होते. वसंतात त्याला हिरवी पालवी आली.. मग पाने जून झाली.. त्यातील एक पान तो मला दाखवी आणि पानाच्या रांगात असा बदल कसा होतो, हे विचारी. हे वनस्पती ज्ञान मला नसल्याने मी त्याला बायॉलॉजिच्या शिक्षकांकडे पाठवी.. ते शिक्षक त्याला समजावत.. पण त्याचे समाधान होत नसे.

तो एक एक वर्ग पास करत चालला होता. त्याच्यवर्गासाठी शाळेत नवीन चित्रकला शिक्षक आले. ते चित्रकलेचा कोर्स करून आमच्या शाळेत आले. एक दिवस मी माझ्या रूममध्ये काही काम करत असताना अचानक स्वामी माझ्याकडे आला.. तो रागाने मला म्हणाला..

‘मॅडम.. मी हे निसर्ग चित्र खूप मेहेनतीने काढले, तर टीचरनी त्याला झीरो मार्क्स दिले?

मी त्याने काढलेले चित्र हातात घेतले.. खरोखर पांचगणीला रोज संध्याकाळी दिसणारे आभाळ त्याने काढले होते. मलुल झालेला… मावळतीला झुकलेला सूर्य दिसत होता.. त्याची प्रभा आजूबाजूला पसरली होती. या चित्राला टीचरनी का शून्य मार्क्स दिले मला समजेना. मी टीचरना बोलावून घेतले. टीचर माझ्या रूम मध्ये आले..

‘टीचर.. हा स्वामी म्हणतो.. माझ्या चित्राला झीरो मार्क्स दिले. का?

‘मॅडम.. मी या वर्गाला आभाळाचे चित्र काढायला सांगितले होते.. बाकी सर्व मुलांनी आभाळ निळे काढले पण या स्वामीने हे असे पिवळे नारिगी आभाळ काढले.. म्हणून.

‘का? आभाळ निळेच का?

‘बघा ना मॅडम.. झाडांची चित्रे काढायची तर आपण हिरवीच पाने दाखवतो.. पण या स्वामीने त्या दिवशी तांबूस लाल पाने दाखवली.. आज निळे आभाळ काढायचे सोडून पिवळे नारंगी आभाळ दाखवले.. बाकी मुलांनी..

‘सर.. बाकी मुले आणि हा स्वामी यात हा फरक आहे.. बाकी मुलांना हिरवीच पाने दिसतात, पण स्वामीला पानाची लाल चुटुक पालवी दिसते. बाकी मुलांना निळे आभाळ दिसते.. पण सर.. संध्याकाळी तुम्ही शाळेतून घरी जाताना आभाळ पाहिलंय काय? ते या चित्रात स्वामीने काढलाय तसे नारिगी पिवळे असते.

“ पण मॅडम.. “ पुस्तकात म्हटले..

“ हा फरक आहे सर, स्वामी आणि इतर मुलात.. त्याचे आभाळ इतरांपेक्षा वेगळे आहे.. एखादा मुलगा वेगळा विचार करणारा असतो.. एखादाच असतो… तो कदाचित आर्किमेडीज होतो, आईस्तानीन होतो.

सर आणि स्वामी गेले. दुसऱ्या दिवशी स्वामी मला पिवळा गुलाब घेऊन ‘गुड मॉर्निंग’, करून गेला.

माझी मग आमच्याच संस्थेच्या बंगलोर शाखेत बदली झाली. आता माझा पाचजणी शाळेशी फारसा संपर्क राहिला नव्हता. बंगलोरमध्ये दहा वर्षे नोकरी करून मी निवृत्त झाले. आमच्या संस्थेचा हिरकमहोत्सव आला, तो पांचगणीला होणार होता.. मला मुख्य पाहुणी म्हणून निमंत्रण आले.. मी खूष झाले, खूप वर्षांनी त्या वास्तूत परत जाणार होते.. माझ्या वेळचे काही शिक्षक अजून त्या शाळेत होते. बरीच माजी विद्यार्थी मंडळी या कार्यक्रमाला येणार होती.. मला स्वामीची आठवण आली.. आता तो मोठा होऊन कदाचित मोठा चित्रकार झाला असणारं याची खात्री होती.

मी पाचगणीत पोहोचले.. माझे जंगी स्वागत झाले. अनेक माजी शिक्षक, माजी विदयार्थी आले होते. माझ्या वेळचे काही शिक्षक अजून शाळेत होते. मी लावलेली अनेक झाडें आता मोठी झाली होती. मी लावलेले वडाचे झाड आता वृक्ष होत आले होते..

. अनेक माजी विदयार्थी मला भेटत होते.. मला प्रत्येक बॅच आठवत होती.. आठवणीने मी नाव घेऊन अनेकांची विचारपूस केली.

.. स्वामीच्या वर्गातील मुले मुली मला भेटायला आली.. त्यानी आणलेल्या भेटीचा मी स्वीकार करत असताना मी विचारले..

‘Where is swami? तो आला नाही काय?

ती मुलं कावरीबावरी झाली.. त्यातील अनुष्का हळूच म्हणाली..

“ मॅडम, swami is no more.. “

“ What? काय झाल स्वामीला? ”

“ मॅडम.. त्याच्या पालकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं.. UPSC साठी.. त्यात तो तीन वेळा फेल झाला.. आणि मग त्याने स्वतः ला संपवलं.. ”

झ्या डोळयांतून अश्रूधारा वाहू लागल्या.. लाल गुलाबी पाने काढणारा, पिवळे नारिगी आभाळ काढणारा स्वामी कुणालाच कळला नाही.. अगदी त्याच्या जन्मदात्यांना पण नाही…

‘ ओहो स्वामी, तुझे आभाळच वेगळे… ‘

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares