श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ ‘हे देवाघरचे देणे’… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
तो सुप्रसिद्ध गायक स्व. मुकेश यांचा जन्मदिवस होता. आणि मला जुनी गाणी ऐकण्याची आवड असल्याने त्यांचे ‘ मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है.. ’ हे सदाबहार गीत योगायोगाने ऐकत होतो. हे गीत पडद्यावर राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झाले असून सुमन कल्याणपूर आणि मुकेश यांचे हे अजरामर आणि अवीट गोडीचे द्वंद्वगीत आहे. आपला असा समज होण्याची शक्यता आहे की मी आज स्व. मुकेश यांच्याविषयी किंवा या गीताविषयी बोलणार आहे पण खरे तर मला सांगायचे आहे ते वेगळेच. जेव्हा राजेंद्रकुमार वैजयंती मालाला म्हणतो की ‘ मेरा प्यार भी तू है…’ तेव्हा त्याला तिच्या ठायी निसर्गातील सगळ्या गोष्टी असलेल्या प्रतिबिंबित होतात. निसर्गातील फुलात, सगळ्या निसर्ग सौंदर्यात जणू तिचाच भास त्याला व्हायला लागतो. किंवा दुसऱ्या एखाद्या गीतात एखादा प्रियकर आपल्या सुंदर प्रेयसीकडे पाहून म्हणतो, ‘ तेरे चेहरेसे नजर नही हटती, नजारे हम क्या देखे…’ असे चित्रपटातील नायक आणि नायिकेचे प्रेम आपण नेहमी पडद्यावर पाहतो. किती छान वाटते हे सगळे बघायला आणि ऐकायला सुद्धा.. ! सगळे कसे romantic…! ‘ क्या यही प्यार है…? ‘
आपल्याला चित्रपटातील, टी व्ही वरील मालिकातून नायक नायिकेचे प्रेम बघायची इतकी सवय झालेली आहे की हे सगळे आपण पाहतो ते म्हणजेच प्रेम असा आपला समज होत असतो. इतकं ते आपल्या रक्तात भिनलेले असते जणू. मंगेश पाडगावकर यांची ‘ प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं.. ’ या ओळी आम्हाला पाठ असतात किंवा ऐकून माहिती असतात. पण खरं प्रेम कसं असतं ? ‘ प्रेमा तुझा रंग कसा ?’ प्रेम हे सर्वव्यापी आहे. प्रेमाला स्वतःचा मुळचा रंग नाही. प्रेम हे पाण्यासारखे असते. ‘ पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो लगे उस जैसा… ’ एक सुंदर मराठी गीत आहे, ‘ प्रेमाला उपमा नाही, हे ते देवाघरचे देणे.. ’ खरंच किती सुंदर शब्द आहेत ! प्रेम हे देवाघरचे देणे आहे.
प्रेम हे जीवनाच्या वेलीवर उमललेले सर्वात सुंदर फुल आहे ! फुलासारखेच नाजूक आणि सुंदर. जणू काही ‘ जपून हाताळा ‘ दुष्ट आणि क्रूर मानवी भावनांनी ते करपून जाते. त्याला सतत मायेचे पाणी घालावे लागते नाही तर ते कोमेजण्याचा धोका असतो. प्रेमाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रेम दिल्याने वाढते. जेवढे देऊ त्याच्या अनेक पटींनी परत मिळते. जसे शेतात काही मुठ दाणे पेरावे आणि अनेक पटींनी पीक घ्यावे. What we give, we get back in abundance. प्रेम दिले तर प्रेम मिळेल आणि द्वेष पेरला तर द्वेशाचेच पिक येईल. म्हणूनच तर आपण ‘ पेरावे तसे उगवते ‘ असे म्हणतो. एकदा गौतम बुद्धांकडे एक गरीब माणूस आला. तो म्हणाला, ‘ महाराज मी गरीब का आहे ते सांगावे. ’ बुद्ध त्याला म्हणाले, ‘ तू तुझ्याजवळ असलेले लोकांना देत नाहीस म्हणून तू गरीब आहेस. ’ त्याने विचारले की माझ्याजवळ काय आहे देण्यासारखे ? बुद्ध म्हणाले, ‘ अरे लोकांना प्रेम तर देऊ शकतोस की नाही, लोकांशी प्रेमाने तर बोलता येईल की नाही ?’ मग बघ तू गरीब राहणार नाहीस. किती सुंदर उपदेश बुद्धांचा… !
खरे प्रेम कसली अपेक्षा करीत नाही. आई आपल्या मुलांवर निरपेक्ष प्रेम करते. तिला कोणती अपेक्षा असते ? आपल्या वृद्धापकाळी आपल्याला हे मूल सांभाळील या भावनेनेच ती त्याचे सगळे करते का ? पित्याचेही मुलांवर असेच निरपेक्ष प्रेम असते. त्यांनी आपल्या आईवडिलांना वृद्धापकाळी सांभाळायचे की नाही हा प्रश्न या प्रेमापुढे गौण ठरतो. असेच प्रेम भावंडांचे एकमेकांवर असते. पण जिथे नात्यात स्वार्थ आला तिथे प्रेम संपते. स्वार्थ, कपटीपणा या सारख्या भावनांनी प्रेमाचे फुल करपते. पती पत्नींचे एकमेकांवरील प्रेम असेच निरपेक्ष असते, असले पाहिजे. लग्नानंतरचे मंतरलेले जादुई दिवस काही वर्षातच भुरकन उडून जातात. मग वास्तवाला सामोरे जावे लागते. एकमेकांच्या स्वभावातील दोष, उणीवा जाणवू लागतात. पण खरे प्रेम या सर्व गुणदोषांसह समोरच्याचा स्वीकार करते. तसे नसेल तर ते खरे प्रेम नाहीच असे समजायला हरकत नाही.
मी वाचलेली एक गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा मोह आवरत नाही. एका डॉक्टरांचे हे निवेदन आहे. ते त्यांच्याच शब्दात. “ सकाळची ८. ३० ची वेळ. माझ्या दवाखान्यात कोणीही रुग्ण नव्हता. एवढ्यात एक ८० वर्षांचे वृद्ध गृहस्थ दवाखान्यात आले. त्यांच्या अंगठ्याला जखम झालेली होती. तिला टाके घातलेले होते. हे टाके काढण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. ते मला म्हणाले डॉक्टर, लवकर माझी जखम बघा आणि टाके काढा. मला दुसरीकडे जायचे आहे. माझी नऊ वाजताची दुसरीकडे appointment आहे. दवाखान्यात गर्दी नसल्याने मी त्यांचा रक्तदाब इ. तपासला. आणि त्यांच्या जखमेचे परीक्षण करू लागलो. जखम बऱ्यापैकी भरली होती. मी सहाय्यक डॉक्टरांना टाके काढण्याचे साहित्य घ्यायला सांगितले.
जखमेचे टाके काढले आणि जखमेची मलमपट्टी करताना त्यांच्याशी बोलू लागलो. मी विचारले, तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांकडे जायचे आहे का ? त्यावर ते म्हणाले, मला माझ्या पत्नीला भेटायला जायचे आहे. ती शुश्रुषा गृहात आहे. मी दररोज सकाळी तिच्यासोबत नाश्ता करतो. मग मी विचारले की कशी आहे त्यांची तब्येत ? त्यावर ते म्हणाले ती वृद्धापकाळी होणाऱ्या विस्मृतीच्या आजाराने (Alzheimer Disease) ग्रस्त असून गेली पाच वर्षे अंथरुणावर आहे. मी विचारले की तुम्हाला उशीर झाला तर त्या काळजी करतील का ? यावर ते म्हणाले की गेली पाच वर्षे ती मला ओळखत नाही. त्यामुळे माझी काळजी करण्याचा प्रश्नच येत नाही.
मी आश्चर्यचकित होऊन विचारले की त्या तुम्हाला ओळखतही नाहीत आणि तरीही तुम्ही गेली पाच वर्षे त्यांना नियमाने भेटायला जात आहात ? यावर त्यांनी दिलेले उत्तर मला थक्क करणारे होते. ते म्हणाले, मग काय झाले ? ती जरी मला ओळखत नसली तरी मी तिला ओळखतो ना.. ! अशा वेळी साथ सोडायची का ? आणि त्यांनी माझा हात हलकेच थोपटला. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यातील नकळत येणारे अश्रू मी रोखले. “
असे असते खरे प्रेम. खरे प्रेम केवळ शारीरिक नसते किंवा romantic ही नसते. खरे प्रेम म्हणजे जे काही आहे, असणार आहे या सगळ्यांचा स्वीकार करणे. जगातील सर्वात सुखी दिसणाऱ्या माणसांना सर्वच गोष्टी उत्तम मिळालेल्या असतात असे नाही पण जे काही मिळाले आहे त्यातून सर्वोच्च आनंद मिळवण्याची त्यांची क्षमता आणि मानसिक तयारी असते. म्हणूनच ते सुखी आणि समाधानी असतात.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




