श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५९ आणि ६० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५९ – – – 

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी |

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी |

मनी कामना राम नाही जयाला |

अति आदरे प्रीति नाही तयाला ||५९||

अर्थ : हे मना, नाना प्रकारच्या अनंत कल्पना तू करीत राहिलास तर भगवंताचे दर्शन कदापिही शक्य नाही. ज्याच्या अंतरात वासना असतील, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची कामना निर्माण होणे शक्य नाही आणि भगवंताविषयी कामना नसेल तर त्याच्यावर आदरयुक्त प्रेम कसे राहील?

(कल्पिता – कल्पना करणे, कल्पकोटी – अनंत/ नाना प्रकारच्या)

विवेचन : आपल्या जीवनात कल्पनेचे देखील काही एक विशिष्ट स्थान आहे. आपल्या मनातील कल्पना चांगल्या आणि विधायक असतील तर व्यवहारात त्या प्रत्यक्षात येऊ शकतात, त्यांचा उपयोग होतो. परंतु त्या कल्पनांना जर योग्य दिशा नसेल आणि त्या विधायक नसतील तर त्या जीवनाचा नाश करू शकतात. सदैव कल्पनेच्या राज्यात रमणारा माणूस व्यवहारात अयशस्वी होतो. त्याला धड प्रपंचही जमत नाही आणि धड परमार्थही तो करू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या अवतीभवती नेहमी पाहतो.

समर्थांनी दासबोधात सांगितले आहे की आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. ज्याला प्रपंच नीट करता आला नाही त्याला परमार्थ कसा जमणार? म्हणून आपल्याला यशस्वी प्रपंच करून परमार्थाकडे वाटचाल करायची आहे. अस्थिर मनाने प्रपंच आणि परमार्थ ही साधणार नाही.

कल्पना करीत राहणे हा मानवी स्वभाव आहे. या कल्पनाच आपल्याला विषयांच्या राज्यात घेऊन जातात आणि त्यांच्या तीव्र ओढीने विषयांचे सेवन आपल्याकडून घडते. साहजिकच भगवंतापासून आपण दूर जात असतो. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मनामध्ये विषय चिंतन आणि भगवंत या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राहू शकत नाहीत. मन एकाच गोष्टीला पूर्णपणे वाहिले पाहिजे.

परमार्थाकडे वाटचाल करताना मनामध्ये वासना असता कामा नये. वासना असतील तर आपल्याला भगवंत हवा, अगदी मनापासून हवा असे वाटणारच नाही. जोपर्यंत आपल्याला भगवंत हवाच आहे असे मनापासून वाटत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही.

भगवंत हवा आहे असे मनापासून वाटत असेल तर विषयाकडे धावणारी वृत्ती सवयीने हळूहळू कमी करायला हवी. त्यासाठीच नामस्मरण, पूजा, सत्संग, साधना इ. गोष्टी सांगितल्या आहेत.

पण विषयाकडे धावणारे मन नाना प्रकारच्या कल्पना करीत राहते. मनाची शक्ती अपार आहे. परंतु आपण या शक्तीचा योग्य वापर करण्यापेक्षा गैरवापरच जास्त करीत असतो. दिशाहीन आणि निरुपयोगी कल्पना मनाला थकवा आणतात. म्हणूनच मनाला प्रयत्नपूर्वक योग्य मार्गावर आणायला हवे आणि त्याला योग्य दिशा द्यायला हवी. मला भगवंत हवा आहे अशी निव्वळ इच्छा करून तो प्राप्त होणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवेक आणि वैराग्य धारण करावे लागेल. भगवंत हवा असेल तर अन्य सर्व इच्छांचा त्याग करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या गोष्टीचा नित्य सहवास लाभला की त्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होते. त्याप्रमाणेच सतत भगवंताचे नाम घेत गेल्याने त्याच्याबद्दल आदरयुक्त प्रेम निर्माण होईल.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात दिवसभर कोणत्या प्रकारच्या कल्पना सर्वाधिक येतात – विधायक की विषयप्रधान?

२) मी वास्तवात जगतो का, की कल्पनांच्या जगात जास्त वेळ घालवतो?

३) मला खरोखर भगवंताची ओढ आहे का, की ती केवळ एक वरवरची इच्छा आहे?

४) मी माझ्या मनाला जाणीवपूर्वक योग्य दिशेला वळवण्यासाठी काही प्रयत्न करतो का (नामस्मरण, वाचन, सत्संग)?

– – – – – 

श्लोक क्र. ६० – – – 

मना राम कल्पतरू कामधेनू |

निधी सार चिंतामणी काय वानू|

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता|

तया साम्यता कायसी कोण आता |६०|

अर्थ : हे मना राम म्हणजे भगवंत कल्पतरू, कामधेनू आहेत. ते निधी, सार, चिंतामणी… सारे सारे काही आहेत. हे सगळे शब्द त्यांचे वर्णन करण्यासाठी कमी पडतात म्हणून समर्थ म्हणतात की त्यांचे कसे आणि काय वर्णन करू? त्यांच्याच योगाने आणि सत्तेने सर्व काही घडत आहे. त्यांची तुलना किंवा साम्य कशाशी दाखवता येईल?

(चिंतामणी – इच्छिलेली वस्तू देणारा, वानू – वर्णन करू)

विवेचन : या श्लोकात समर्थ श्रीरामांच्या भक्तीची महती आपल्याला सांगतात. श्रीरामांबद्दल बोलताना त्यांनी वेगवेगळी विशेषणे वापरली आहेत. श्रीराम कामधेनू, कल्पतरू, निधी सार, चिंतामणी सारे सारे काही आहेत असे समर्थ म्हणतात. या एकेक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया.

कल्पतरू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा एक वृक्ष. त्याच्या छायेत बसून जी कल्पना करावी ते सर्व आपल्याला प्राप्त होते. कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी दिव्य गोमाता. निधी म्हणजे कुबेराचे भांडार किंवा खजिना, चिंतामणी म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा काल्पनिक मणी.

प्रभू रामचंद्र भक्तांचे सर्व मनोरथ पुरवणारे आहेत. ते कल्पतरू, कामधेनू आहेत. आपल्या भक्तांना काहीही कमी पडणार नाही याची काळजी ते घेतात. इच्छिलेले सर्व काही देणारे ते आहेत. ते निधी म्हणजे कुबेराचे भांडार आहेत. कुबेराचे भांडार म्हणजे समृद्ध खजिना! कशाचीही कमी नाही. म्हणजेच श्रीरामाच्या भक्तांना कसलीही कमी पडणार नाही. त्यानंतर समर्थ म्हणतात की ते सार आहेत. सार म्हणजे महत्त्वाचे तत्व! या विश्वामध्ये सार म्हणजे फक्त एक श्रीराम. बाकी सर्व काही असार. एका वाक्यात सांगायचे झाले तर रामनाम ही सर्व कुलुपांची अशी एक किल्ली आहे की ज्यामुळे सर्व कुलुपे विनासायास उघडतात.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात परमेश्वराला प्रार्थना करताना म्हटले आहे, “जो जे वांछील, तो ते लाहो. ” म्हणजे ज्याला ज्याला जी जी इच्छा होईल ती ती गोष्ट प्राप्त होवो. अर्थात या ठिकाणी इच्छा म्हणजे सदिच्छा किंवा चांगली इच्छा हे गृहीत आहे. भक्ताच्या चांगल्या इच्छाच भगवंत पुरवेल. आणि श्रीरामांच्या भक्तांना वाईट इच्छा कशी होईल? म्हणून आपल्या भक्तांच्या मोक्षाच्या, दर्शनाच्या सर्व कामना तो दयानिधी पुरविल.

वर निधी म्हणजे कुबेराचा खजिना असे आपण म्हटले आहे. परंतु निधी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आणखी वेगळा आणि थोड्या व्यापक अर्थाने घेता येईल. निधी म्हणजे साठा. निधी म्हणजे समुद्र. श्रीराम म्हणजे गुणांचा साठा, दयेचा आणि करुणेचा समुद्र. आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा न करणारा असा तो आहे. त्याच्या गुणांचे काय वर्णन करावे? त्यासाठी शब्द कमी आहेत. तो कोणासारखा बरं आहे? तर त्याच्यासारखा तोच!

अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने? असा तो आहे. तो द्यायला बसला की आपली झोळी अपुरी पडेल. म्हणून काही मागायचे तर त्याच्या जवळच मागावे. जो सगळे काही आहे जो, सारसर्वस्व आहे, त्याच्याजवळ मागण्याचे सोडून इतरांजवळ मागण्यात काय हशील?

व्यवहारामध्ये आपली इच्छापूर्ती किंवा वासनापूर्ती करणारी सारी साधने गौण आहेत. त्या इच्छा, त्या वासना कधी संपतच नाहीत. भगवंत जेव्हा आपली इच्छापूर्ती करतो, तेव्हा काही मागायचे राहतच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ” काय उणे आम्हा विठोबाचे पायी? ” अशी भक्ताची अवस्था होते. मन शांत, तृप्त होते आणि अत्यंत सामर्थ्यशाली बनते. कोणतीही आणि कशीही विपरीत परिस्थिती आली तरी ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, असा भक्त डगमगत नाही. असे समाधान देणारा भगवंत हा एकमेवाद्वितीय आहे. त्याची बरोबरी कशानेही होणार नाही.

स्वसंवाद :: 

१) मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाह्य साधनांवर जास्त अवलंबून आहे का, की परमेश्वरावर विश्वास ठेवतो?

२) “मला अजून काही हवे आहे” ही भावना माझ्यात कितपत आहे? की “काय उणे आहे? ” अशी तृप्ती आहे?

३) मी जे मागतो, ते खरोखर माझ्या कल्याणासाठी आहे का, की केवळ वासनापूर्ती आहे?

४) माझ्या जीवनात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?

५) मला भगवंत “सर्वस्व” वाटतो का, की अजूनही इतर गोष्टींमध्येच माझा जास्त विश्वास आहे? (क्रमशः)

– क्रमशः श्लोक श्लोक ५९ आणि ६०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted