श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 292
☆ मल्हार… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
पावसा मल्हार ते गाऊन गेले
पीक माझे का कसे वाहून गेले
*
ठार केले बिन विषारी साप आम्ही
शेत मग उंदीर हे खाऊन गेले
*
पंचनाम्याला दिली का हूल त्याने
लाच देणे द्यायचे राहून गेले
*
होय मंत्र्याचाच दौरा काल झाला
दैन्य आकाशातुनी पाहून गेले
*
हे पुन्हा आलेत काळे घातपाती
मेघ आकाशात ते टांगून गेले
*
लागली माती चिमुटभर चप्पलेला
कार्यकर्ते चाटण्या धावून गेले
*
वाद आले ते मिटवण्या काल होते
अन घराला आग बघ लावून गेले
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





