श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 296
☆ मुठीतली वाळू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
नशिबानं गाठ मारताना
करकचून मारायला हवी होती
पण
सरगाठ मारली
चुकून
की
जाणूनबुजून
माहित नाही
मुठीतली वाळू सुटावी
तशी सुटत गेली
कळलंच नाही
वाळू की गाठ…
काय चुकलं
वाळू मुठीत नको
ओंजळीत धरायला हवी होती
पण तेव्हा
कळलं नाही
आणि आता
कळून उपयोग नाही…
कारण आता
ती नाही
समुद्र नाही
वाळू नाही
व
गाठ मारायला
पदरही नाही…!
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



