श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “सुन्या आणि सुन्याची बायको…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
साडेसहा-सातची वेळ, आल्हाददायक वातावरण, ऊन तापलं नसल्यानं अनेकजण फिरायला, व्यायामाला बाहेर पडलेले. रस्त्यावर गाड्यांची फार वर्दळ नव्हती. एवढ्या सकाळी एका ठिकाणी मात्र गर्दी जमलेली. दुकान उघडायची वाट पाहण्याऱ्या आसुसलेल्या नजरा. हे रोजचचं दृश्य. दिवस उगवला की अनेक पावलं आपसूक देशीच्या दुकानाकडं वळायची.. त्यांच्यापैकीच एक होता ‘सुन्या’.
चाळीशीच्या आसपास वय, बिगारी काम करायचा. वाटलं तर कामावर जायचं नाहीतर चौकातल्या रिकामटेकड्यांबरोबर टाईमपास हेच रुटीन. बायको चार घरची धुणी-भांडी करून घर चालवायची. सुन्या बेफाम प्यायचा. त्याच सवयीनं तब्येतीची वाट लागली तरी नाद सुटला नाही. दोन मुली बायकोच्या पदरात टाकून अकाली गेला.
देशीच्या दुकानासमोरच चार दिवसांपूर्वी सुन्यानं जीव सोडला तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. रोजच्या बैठकीतल्या मित्राच्या जाण्यानं जो तो हादरला. दुकानात भरलेला ग्लास हातात घेऊन त्याचीच चर्चा.
– – “आमचे परमस्नेही, हितचिंतक, नित्यनियमाने भेटणारे, अल्पभाषी, कायम स्वतःच्या तंद्रीत असणारे, आमचे सन्मानीय ग्राहक “सुन्या”(पूर्ण नाव माहीती नाही) यांची उणीव कायम भासणार. आमच्या भरभराटीत, त्यांचाही खारीचा वाटा आहेच. सकाळ, दुपार, संध्याकाळ असं वेळेचं कोणतचं बंधन न पाळता, त्यांनी आमच्या सेवेचा लाभ घेतला. कधीच भेट चुकवली नाही. साथ सोडली नाही. आता कायमचे दूर गेले. वाईट एवढंचं वाटते की, रोजचं गिर्हाइक कमी झालं… त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”
– दुकान मालकानं सुन्यासाठी लावलेला हा फ्लेक्स सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. सुन्याची बायको पोरींना घेऊन दुकानाजवळ आली. अक्षरं जुळवत जमेल तसं वाचताना भावनांचा उद्रेक होतं होता. त्याभरात कडेवर बसलेल्या रडणाऱ्या मुलीवर खेकसलीसुद्धा. फ्लेक्स वाचल्यावर नवऱ्याच्या आठवणीनं तिला खूप भरून आलं. डोळे घळाघळा वहायला लागले आणि खूप संताप झाला. रंग उडालेल्या साडीच्या पदरानं डोळे पुसत दुकानाकडं पाहत तिनं करकचून शिव्या हासडल्या आणि पचकन थुंकली. एकदा नाहीतर तीनदा. वाटोळं होवो, किडे पडो म्हणत मोठ्या पोरीच्या हाताला धरून तरातरा चालायला लागली. पोरगी मात्र मागे वळून वळून फ्लेक्सवरचा बापाचा हसरा फोटो कौतुकानं पाहत होती. त्याचवेळी दुकानात घरादाराला वाऱ्यावर सोडून, प्रॉब्लेम्सपासून पळणारे अनेक “सुन्या” जमा झाले होते.
– – पाच दिवसांपूर्वी मला ही बातमी समजली होती. तेव्हा खूप वाईट वाटलं. माझ्याकडं घरकाम करणाऱ्या संगीताचा नवरा सुन्या गेला. कित्येकदा पैसे मागायला यायचा. तोंडओळख होती. परिचयातला माणूस तडकाफडकी गेला की पुढचे काही दिवस अस्वस्थेत जातात. माझंही तसंच झालेलं. डोक्यातून ‘सुन्या’ जात नव्हता. बेल वाजल्यावर मी दार उघडलं. समोर संगीताला पाहून धक्काच बसला.
“संगीता तू…. ”
“हा कामाला आलीय”
“अगं पण.. ”
“नवरा जाऊन पाचच दिवस झालेत ह्येच ना”
“हो, पंधरा-वीस दिवस तरी घरी थांबायचं. ”
“तो जिवंत असताना तरी काय कामाचा होता. म्हणून आता त्याच्यासाठी घरी बसू. ”
नवऱ्याबद्दलचा संताप, राग संगीताच्या चेहऱ्यावरून, बोलण्यातून जाणवला. उगीच विषय वाढवायला नको म्हणून जास्त काही बोलले नाही. कामं झाल्यावर निघताना संगीता म्हणाली
“ताई, मगा बोल्ले त्याचा राग आला का? “
“नाही गं… पण जरा… “
“डोक्यावर परिणाम झालाय वाटलं असलं पण जे घडलं त्ये व्हणारच व्हतं. जरा लवकर झालं इतकंच. त्या बेवड्याइषयी काही वाटत नाही. फक्त पोरींचा ईचार करतेय. दोघींना लई शिकवायचयं. तुमची मदत पाहिजे. ”
“नक्की, काय मदत पाहीजे ते सांग. किती पैसे? ”
“पैसे नको. तुमच्या वळखीनं एखादी नोकरी मिळाली तर उपकार व्हतील. धुणी भांडीची कामं अन नोकरी दोनी करलं. ” परिस्थिती माणसाला घडवते अन बिघडवते सुद्धा. परिस्थितीला आपण सामोरं कसं जातो यावर सगळं अवलंबून असतं. संगीताच्या धैर्याचं, हिंमतीचं, दूरदृष्टीचं फार कौतुक वाटलं.
—
दहावीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ. गर्दीनं हॉल भरलेला. त्यातच रंजना, रूपाली आई संगीतासोबत बसलेल्या. स्टेजवर एकेकाचं कौतुकसोहळा सुरू असताना निवेदक म्हणाला “आणि आता सर्वात महत्वाचा सत्कारासाठी कुमारी रंजनाला स्टेजवर आमंत्रित करतो. रंजना फक्त शाळेतच नाहीतर आपल्या जिल्ह्यात पहिली आलीये. जल्लोषात तिचं स्वागत करा. ”निवेदकाचं बोलणं संपायच्या आता टाळ्या सुरू झाल्या. सगळे रंजनाकडे पहायला लागले ती बावरली. वर्गशिक्षिका स्टेजवर घेऊन गेल्या तेव्हा रंजनाचे हातपाय लटपटत होते. सत्कार करताना गोल्ड मेडल दिल्यावर भावूक झालेली रंजना डोळ्यातलं पाणी रोखू शकली नाही. माईक हातात होता पण शब्द फुटत नव्हते. पाण्याचा घोट घेऊन रंजनानं सुरवात केली. “सर्वांना नमस्कार, खरं सांगायचं तर हे सगळं स्वप्न वाटतय. या यशाचं श्रेय हे माझी शाळा, शिक्षक, मित्र-मैत्रिणी या सर्वांचं आहे. मला खूप सांभाळून घेतलं आणि वेळोवेळी मदत केली हे उपकार जन्मभर विसरणार नाही. सर्वांना मनापासून धन्यवाद! ! ”स्टेजवर डोकं टेकवत सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून रंजनानं पुढे बोलायला सुरवात केली “या मेडलवर सगळ्यात मोठा हक्क माझ्या आईचा आहे. काही वर्षापूर्वी वडील गेले. घरची परिस्थिती हलाखीची. आजी, काका यांनी जबाबदारी टाळण्यासाठी आईला बोल लावत हात झटकले. घराबाहेर काढलं. पुढे सगळाच अंधार. अशा परिस्थितीत आईनं हिंमत सोडली नाही उलट ती डबल आत्मविश्वासानं कामाला लागली. नोकरी आणि धुण्याभांड्याची कामं करत आम्हांला शिकवलं. मुलींचं शिक्षण एवढं एकच ध्येय उराशी बाळगून ती जगतेय. तिला शिकायचं होतं पण परिस्थितीमुळे शिकता आलं नाही आणि लग्नानंतर सगळंच बदललं पण आवड कायम होती. म्हणूनच यंदा आईनं माझ्याबरोबर दहवीची परीक्षा दिली. दोघींनी सोबत अभ्यास केला आणि ४९% टक्के मिळवून आई पास झाली. आईच्या जिद्दीचा, कष्टाचा, लढाऊ वृत्तीचा खूप अभिमान आहे. घरदार, नोकरी सगळं सांभाळून आईनं मिळवलेलं यश माझ्यापेक्षा फार फार मोठयं. जास्त काही बोलत नाही, आईला स्टेजवर बोलवते. मम्मे स्टेजवर ये. ”आईकडे पाहत रंजनानं म्हणाली. सगळे पहायला लागल्यावर बावरलेल्या संगीतानं पदरामागे चेहरा लपवला.
धाकट्या रुपालीनं आईला स्टेजवर नेलं. पुढे येत रंजनानं मेडल आईच्या गळ्यात घातलं आणि वाकून नमस्कार केला तेव्हा संगीताचा बांध फुटला. लेकीला कुशीत घेऊन डोळ्यातल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. वातावरण एकदम भावुक. सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवत संगीताला मानवंदना दिली.
“मम्मे, बोल. ”
“कोण मी? नाय वो”संगीतानं माइक मागे ढकलला.
“असं काय करते. बोल ना. ” रंजनानं आईचा हात घट्ट पकडला तेव्हा थरथरत्या हातानं संगीतानं माइक घेतला “नमस्ते. काय अन कसं बोलायचं ते माहीत नाय पण आज भारी वाटतयं. समदयांना ‘थेंकू’. माज्यासाठी लई आनंदाचा दिस हाये. पोरींचा बाप पक्का दारुडा त्यातच संपला. बायकोच्या जिवावर जगत होता. पैसे दिले नाहीतर मारायचा. बारा वर्षापूर्वी गेला आणि आम्ही सुटलो. जे झालं ते चांगलंच झालं”भरून आल्यानं संगीता बोलायची थांबली. तिचं बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसला. हॉलमध्ये शांतता.
“नवरा गेला अन चांगलं झालं ह्ये ऐकून जरा ईचीत्र वाटलं असेल पण माज्या बाजूनं ईचार करा. त्याच्या जाण्यानं नावापुरता असलेला आधार संपला आणि आमचं नवीन आयुक्ष सुरू झालं, लई संकट आली. येकापेक्षा येक अनुभव आले. एकटी बाई सोबत दोन पोरी बघून फायदा घेण्यासाठी टपलेली माणसातील जनावरं जवळून बघितली तरी सर्वांना पुरून उरले. काही चांगली माणसं सुद्धा भेटली त्यांनीच आधार दिला मदत केली मणून तर आत्ता इतं तुमच्यासमोर बोलतेय. नवरा असता तर अजूनही मार खात बसले असते अन माज्या पोरी.. ” माइक बाजूला ठेवून संगीता डोळे मिटून उभी राहिली. पुन्हा एकदा शांतता. सर्वांना नमस्कार करून संगीता, रंजना, रूपाली स्टेजवरून उतरल्या. कार्यक्रम संपल्यावर संगीता भोवती गर्दी झाली. सगळे अभिनंदन, कौतुक करत होते, सेल्फी काढत होते. संगीताचा पार गोंधळ उडाला. मला पाहून कावरीबावरी संगीता घोळक्यातून सुटका करत धावत आली.
“बरं झालं ताई, तुम्ही भेटलात. पार कसंतरीच वाटत होतं”
“अभिनंदन! ! संगीता. तू खरंच ग्रेट आहेस”
“रंजीनं नावं काढलं. शिकायची जुनी ईचा व्हती पोरींनी आग्रह केला अन तुम्ही शिकवणी घेतली म्हणून”
पाया पडण्यासाठी वाकलेल्या संगीताला कडकडून मिठी मारली. चेहरा ओंजळीत धरून एकटक पाहत राहिले.
“ताई, काय झालं. असं का पाहताय. ”
“तू भारियेस! ! खूप भोगलसं. सहन केलंस पण हार मानली नाहीस. शेवटी जिंकलीस. ”
“पोरीना लई शिकवणार, मोठं हापिसर करणार. ”
“नक्की करशील. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हो अजून एक.. आता बारावी…. ”
“हा नक्की……. ”नेहमीच्या उत्साहानं संगीता म्हणाली.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




