डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ सेकंड बेस्ट — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(अपर्णाची जुळी मुलं मनूला फार फार आवडत आणि लाघवी अपर्णा अति माया करी मनूवर.
दिवस कसे पळत होते नुसते. अपर्णाचे मोहित रोहित आता आठ वर्षांचे झाले. अपर्णा संसारात बुडून गेली.)
– इथून पुढे – –
एक दिवस ती मनूला म्हणाली”मनू, माझ्याबरोबर तुझ्या कोणी चांगल्या डॉक्टर असल्या तर येशील का त्यांच्याकडे? ”
मनू म्हणाली “का ग अपर्णा? काही होतंय का तुला? ”अपर्णा म्हणाली मनू, मला छातीत गाठ वाटतेय. पण उगीच शंका नको म्हणून चांगल्या डॉक्टरला दाखवूया. मी अजून यांना पण बोलले नाहीये काही. ”
अपर्णा संकोचून म्हणाली.
मनूने त्याच आठवड्यात डॉ मोने यांची अपॉइंटमेंट घेतली. डॉ मंजिरी मोने मनूची खूप चांगली मैत्रीण होती. अपर्णा आणि मनू डॉ मोनेच्या क्लिनिकवर गेल्या. डॉक्टरांनी अपर्णाला नीट तपासलं.
त्यांनी मनूला सांगितलं आपण यांची बायॉप्सी करूया.
लगेचच त्यांनी छोटासा तुकडा घेतला आणि म्हणाल्या“ मी हा पॅथॉलॉजी ला पाठवते. घाबरू नको अपर्णा. ही गाठ साधी असण्याची शक्यता जास्त आहे. चार दिवसांनी रिपोर्ट मिळेल तुला”.
चार दिवसांनी पॅथॉलॉजी चा रिपोर्ट आला. , दुर्दैवाने ती गाठ malignant होती. मनूला अतिशय वाईट वाटलं.
अपर्णा शांत होती. तिची आई गावाकडून आली. अपर्णाचं mastectomy म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढून टाकायचं ऑपरेशन झालं. भास्कर आणि मनू चोवीस तास तिच्याजवळ होते.
अपर्णा दहा दिवसांनी घरी आली. नंतर केमो थेरपीचे चक्र सुरू झालं. सगळ्या केमो पार पडल्या
मनू ऑफिस मधून रोज अपर्णाकडे जाई. तिला छान खायला करून देई. गप्पा मारून तिचे मनोरंजन करी. अपर्णा बरी झाली. तिचे सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. मनूला खूप आनंद झाला. अपर्णाची आई पुन्हा गावाला गेली.
मुलं आता बारा वर्षांची झाली.
अचानक अपर्णाला पुन्हा बरं नाहीसं व्हायला लागलं. अचानक वजन कमी व्हायला लागलं.
तिला पुन्हा डॉक्टरांकडे नेलं.
अपर्णाच्या कॅन्सरच्या सेकंडरीज आता सगळीकडे पसरल्या होत्या. मध्यंतरीची वर्षे इतकी चांगली गेली आणि अचानक या कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं.
एम आर आय स्कॅन सगळं सगळं झालं. दुर्दैवाने हा कॅन्सर सगळीकडे पसरलेला दिसला. आता ओपन करण्यात काही अर्थ नव्हता.
बिचारी अपर्णा हळूहळू अंथरुणाला खिळली. फक्त वेदना शामक गोळ्या हेच औषध उरले तिच्यासाठी.
अपर्णा शांतपणे सहन करत निमूट पडलेली असे. मनूला तिचे हाल बघवत नसत. भास्कर सतत तिच्या जवळ बसलेला असायचा. मुलं कावरीबावरी होत. अपर्णा आता तर अंथरुणात न दिसण्याइतकी बारीक झाली होती.
कधी ती छान उत्साही असे तर कधी निराशेच्या आवर्तनात गुदमरून जाई.
मनूला विचारी”, मीच का ग मनू, मीच का? मला नाही ग मरायचं इतक्या तरुणपणी. जेमतेम चाळीशी ओलांडलीय मी. यांच्या कितीतरी अपेक्षा स्वप्नं आहेत ना. ती अर्धवट सोडून मी कशी जाऊ मनू? ”
मनूच्या डोळ्यांना धारा लागत.
“अपर्णा, होशील ग तू बरी. आता नवीन गोळ्यांनी तुला बघ छान वाटेल. ”मनू सांगायची. कधी बरे कधी खूप वाईट असे दिवस चालले होते.
आता घरी चोवीस तास ऑक्सिजन सिलिंडर आणून ठेवावा लागला. भास्करने ऑफिस मधून रजाच घेतली. अपर्णाच्या सासूबाई सतत सुनेजवळ बसत होत्या. मनू तर फक्त ऑफिसला जाण्यापुरतीच बाहेर असे. शेवट काय होणार हे सगळ्याना कळून चुकलं होतं.
त्या दिवशी अपर्णा खूप घाबरी झाली. तिला सतत ऑक्सिजन द्यावा लागला. ग्लानीत पडून राहिली अपर्णा.
दुसऱ्या दिवशी मनूने रजा घेतली आणि दिवसभर अपर्णा शेजारी बसून राहिली. अपर्णाने डोळे उघडले.
“मनू मला एक वचन देशील?
मी तर आता चालले. माझा हा संसार मी मधेच सोडून चाललेय. माझी मुलं अडनिड्या वयाची आहेत. नवरा तर फक्त पंचेचाळीस वर्षाचा. माझ्या भास्करशी लग्न करशील?
मला सगळं माहीत आहे ग, तुझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्याने सांगितलं होतं मला. आम्ही एकमेकांपासून कधीही काही लपवलं नाही ग. मलाच वाईट वाटायचं की तुझ्यासारख्या गुणी मुलीला भास्करने का नकार दिला असेल? आणि मग माझ्यात होकार देताना त्याने काय पाहिलं असेल?
केवढं मोठं मन तुझं ग, हे सगळं विसरून तू माझ्यासारख्या सामान्य मुलीशी मैत्री केलीस. ”
अपर्णा दमून गेली. तिला धाप लागली. मनूने तिचा हात हातात घेतला. अपर्णाला झोप लागली हे बघून तिने हळूच तिला पांघरूण घातले आणि ती घरी आली.
आई ही मनूची सगळ्यात जवळची मैत्रीण.
“मनू, बरी आहे का ग अपर्णा? काय ग देव तरी. दृष्ट लागावी असा संसार करत होती पोर आणि हे काय ग अरिष्ट? ”मनूच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.
मनू, नक्की काय झालंय? तू अस्वस्थ का?
मनूच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आईला अपर्णा म्हणाली ते सगळं सांगितलं.
आई म्हणाली, तू काय म्हणालीस मग तिला? ”
आई, तुला काय वाटतं, मी काय करावं? ”आई गप्प बसली.
“मनू, मला काही सुचत नाहीये ग. एकीकडे वाटतं तुझा संसार उभा रहावा, इतक्या उशिरा का होईना..
मनू शांत होती. ”आई मी अपर्णाला हो म्हणणार नाही. त्या जात्या जिवाला मी खोटे वचन नाही ग देणार.
आई, तुला सगळं माहीत आहे. मी भास्करवर मनापासून प्रेम केलं. पण तो मला कधीच आपलं म्हणाला नाही. त्याचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि नाही. ,
त्याच्या अपर्णाबरोबरच्या संसारात तो पूर्ण सुखी होता. मीसुद्धा मनोमन आनंदच मानला त्यांच्या सुखात. अपर्णा माझी खरोखर जिवलग मैत्रीण झाली.
ती म्हणाली मला, भास्कर पण तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.
आई, पण मलाच आता त्याच्याशी लग्न नाही करावंसं वाटत.
माझं कोवळ्या वयातलं प्रेम त्याला नको होतं.
तो कधीही माझा नव्हता. मग आता हा निष्क्रीय संसार मी का करू? मला त्याच्यावर काही सूड नाही ग उगवायचा.
पण तूच सांग, वठलेल्या झाडाला पुन्हा तो कोवळा बहर येईल का?
मी खरोखर त्याला माझं मानलं पण असं जबरदस्तीनं थोडंच कोणी आपल्यावर प्रेम करतं का?
बरं मी तयार झालेही लग्न करायला जयशी.. तर त्या जयची आई मध्ये आली आणि लग्न मोडलं माझं. माझ्या नशीबातच लग्न नाहीये कदाचित.
आता जर मी भास्करशी लग्न केलं तर मला त्या संसारात जागोजागी अपर्णा दिसेल.
भास्कर तिला कसा विसरेल आई?
माझ्याशी लग्न ही एक तडजोड करणार आहे तो.
त्याचा अवेळी विस्कटलेला संसार सावरायला मी हवीय त्याला.
त्याचे गोड मुलगे मला मनू मावशी म्हणतात. एकदम मी त्यांच्या आईची जागा कशी घेऊ? पण मलाच हे काहीच नकोय.
मला सगळे नक्की स्वीकारतील.
ओळखीची मुलगी बरी हाही विचार तेही करतील.
भास्करसुद्धा ही तडजोड म्हणूनच करणार.
त्याच्या आयुष्यत फक्त अपर्णाच होती आणि रहाणार.
मी आता एक स्वतंत्र बाई झालेय.
मला आता ही तडजोड जमणार नाही आई.
खर बोलायचं तर मला त्याच्या संसारात तो देऊ करत असलेलं हे दुय्यम स्थान नकोय.
हे सेकंड बेस्ट म्हणतात तसं आहे. पहिलं नाही म्हणून दुसरं स्वीकारणं.
मी भास्करची कधीही प्रायॉरिटी नव्हते आणि नाही. अजूनही नाहीये.
मला नाही आता या दुय्यम स्थानावर जायचं. मला आता अपर्णाने सजवलेला तिचा संसार नको. मला तिची सतत आठवण येत राहील तिथे.
आई, मी अपर्णाला असं वचन देणार नाही.
ती गेल्यानंतर काय करायचं हा सर्वस्वी भास्कर आणि त्याच्या कुटुंबीयांचा प्रश्न आहे. तूच सांग. मी बरोबर करतेय ना? ”
मनू आईला मिठी मारून हुंदके देऊन रडायला लागली. आईने तिला जवळ घेतलं. आपल्या या अतिशय सद्गुणी मुलीसाठी आईला अत्यंत वाईट वाटलं. काय विचित्र योग असावेत या मुलीचे असं मनात आलं आईच्या.
बाळा, तुझं बरोबर आहे. तू मनाविरुद्ध नको लग्न करू भास्करशी.
एवढ्या मोठ्या पोस्टवर नोकरी करतेस तू मनू. पुन्हा या संसारात पडणं जर तुला मनापासून नको असलं तर नको पडू. तू जो निर्णय घेशील तो मला, बाबांना मान्यच असेल.
त्याच रात्री अपर्णा गेलीच.
मनूने तिला वचन देण्याचा किंवा न देण्याचा अवघड प्रश्न उभाच राहिला नाही.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



