प्रभा हर्षे
जीवनरंग
☆ संस्कार…! लेखक : श्री चंद्रशेखर गोखले ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆
दुसरीत असताना एक धडा होता, एका शाळेत वार्षिक तपासणी सुरू असते. पाहुणे येतात, दोन मुलांना वर्गासमोर उभे करून विचारतात… सांगा बघू या दोघात श्रीमंत कोण आहे? एक दात किडका, हडकुळा मुलगा उभा असतो पण त्याच्या अंगावर मखमली सदरा असतो, टेरीकाँट्ची विजार असते, गळ्यात सोन्याची साखळी असते, पायात महागडे बुट असतात.
दुसरा मुलगा सुदृढ असतो, स्वच्छ दातांचा, हसतमूख, पण त्याचा गणवेश साधा असतो, त्याच्या गळ्यात दत्तात्रेयाचा काळा धागा असतो, पायात साध्या चपला असतात. मुलं काय पहिल्या मुलाकडॆ श्रीमंत म्हणून बोट दाखवतात.
कसले हे धडे? या पासून काय धडा घ्यायचा आम्ही? गरीब श्रीमंत हा भेद मात्र. त्या कोवळ्या वयात मनात जो ठसला तो पन्नाशी गाठे पर्यंत… तेंव्हा माझ्या डोळ्या समोर श्रीमंत मुलगा म्हणून यायचा तो आमच्या वर्गातला अर्णव तळवलकर… तो राहायलाही आमच्या समोर होता. ज्या काळात शेखर, मकरंद, उदय, शैलेश, दिलीप अशी ठरलेली नावं ऐकीवात होती त्या काळात या तळवलकारांच्या मुलाचं नाव अर्णव होतं. त्याच्या धाकट्या बहिणीचं नावही असच खास… जयजयवंती.
तशी अर्णवकडची प्रत्येक गोष्टच खास होती, त्या काळात त्याच्या हॉलमधे फ्रीज होता, घरात गुळगुळीत फरशी होती, शोभिवंत कार्पेट होतं, जेवायला बसण्यासाठी डायनींग टेबल होतं, फुलदाणीत कायम ताजी फुलं ठेवलेली असायची. टेबलावर डीशमधे रसरशीत फळं ठेवलेली असायची.
त्याची आई बिनबाह्यांचा ब्लाऊज घालायची, घरात वावरताना पायात स्लीपर घालायची, अर्णवच्या बाबांना अरे तुरे करायची..
आणि आमच्याकडे? सतत ओचा पदर खोचलेली, सतत कामात गर्क असलेली माझी आई. एक अंधारं स्वैपाकघर जिथे सतत तळणीचं काम चालायचं, एक दुरमुखलेली बैठकीची खोली.. दोन खुर्च्या कधीकाळी घेतलेल्या. आलेली पत्र अडकवण्यासाठी एक तार खिडकीत लटकलेली असायची. वेलजी भाई अँड सन्सचं फुकटात मिळालेलं बटबटीत कँलेंडर दुसर्या खिळ्यावर फडफडत असायचं.
केवढा हा विरोधाभास? कधी अर्णवकडे जावं लागलं तर, तर त्याची आई भूतदया दाखवल्यासारखं माझ्याशी चांगलं वागायची, अर्णवला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नसायचा. पण त्याची आई माझ्यासमोरच त्याला समजवायची.. “असं नाही करायचं, शेखर तुझ्या वर्गात आहेना? ” तो माझ्याकडे आणखिनच तुच्छतेने बघायचा. कारण शाळेत बाई माझ्याशी कशा वागतात हे त्याला माहीत होतं. म्हणूनच मला सुद्धा त्याच्याघरी जायला मनापासून आवडायचं नाही. पण जावं तर लागायचच
कारण अर्णवची आई आमच्या आईकडून थालीपिठाची भाजणी, चकल्या, चिवडा, कुळथाचं पीठ असं काही ना काही घेत असायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे नकद द्यायची. आणि माझ्या हातावर पेपरमिंटची गोळी. एव्हाना पंचक्रोशीत माझ्याकडे दयेनं पाहणार्यांची संख्या वाढतच होती. त्यात अर्णवची आई आघाडीवर होती, ‘ छायाताई बघ किती कष्ट करतात? कुणासाठी? तुझ्यासाठीच ना? मग अभ्यास नको करायला? ’ हे समीकरण मला तेंव्हाही लक्षात यायचं नाही.. अजूनही येत नाही, आई कष्ट करते त्या बदल्यात मी अभ्यास करायचा? … मग आईचं सामान पोहचवून यायचो, गरम गरम पातेलं शेगडीवरून उतरवायला मदत करायचो, वाळवणं सांभाळायचो ते कशाच्या बदल्यात होतं?
पण कोणताही प्रश्न विचारायचा मला अधिकार नव्हता. कारण एक दोन वर्ष माझी दांडी उडाली होती. आता अर्णवही माझ्या वरच्या इयत्तेत गेला होता. तो काळ असा होता की, तुम्ही शालेय जीवनात अपयशी ठरलात की तुमचा जन्म वाया गेला. मग नाही नाही ते दोष तुम्हाला येऊन चिकटणार, जो बोलणार नाही तो आळशी… समोरचा आपल्याशी असा का वागतो? हे तेव्हा बरेचदा लक्षातच यायचं नाही.. एकदा असच झालं… ,
तेंव्हाचं आमचं पार्लं म्हणजे तुरळक वस्तीचं टुमदार गाव होतं. तिन्हीसांजेआधीच सामसूम व्हायची. इतकी की लोकलचा आवाज गावात घुमायचा, तशी त्या काळातही अर्णवची आई सोबत कामवाली घेतल्याशिवाय फिरायची नाही, ते ही ती दोन पावलं मागे.. अर्णवची आई पुढे, बाईच्या हातात पिशव्या, अर्णवच्या आईच्या हातात फक्त पर्स. पण त्या दिवशी काय झालं कोण जाणे… प्रार्थना समाजच्या इथल्या चिंचोळ्या रस्त्यावरून ती एकटीच चालली होती, वातावरण अंधारलेलं, रस्त्यावर तुरळक रहदारी, तिच्या हातात सामानाच्या पिशव्या… योगायोग असा की माझ्या आधी अर्णव तिथूनच सायकलवरून पास झाला, तेंव्हा आम्ही दोघे टिळक मंदिराच्या व्यायाम शाळेत जायचो. एकदमच बाहेर पडायचो. पण त्याच्या बाबानी त्याला नवीन स्टायलीश सायकल घेऊन दिल्यापासनं त्याच्या लेखी माझा भाव आणखीनच घसरला होता. तो पुढे निघून गेला.
मला आश्चर्य वाटलं. आम्हाला आई रस्त्यात अचानक दिसली की कोण आनंद व्हायचा,… अक्षरश: आम्ही उड्या मारायचो.. जरा हातातली पिशवी घे असं आईला सांगावं लागायचं नाही. ते आपोआपच आमच्याकडून घडायचं. आम्ही सगळीच भावंड आईसाठी वेडी होतो. पण अर्णव मात्र भुर्र्कन निघून गेला, मी त्याच्या आईपाशी थांबलो. म्हंटलं ‘आज उशीर झाला तुम्हाला…’
त्या ‘हो अरे…’ म्हणत काहीतरी बोलल्या. मी म्हणालो, द्या पिशव्या मी घरी नेऊन पोहोचवतो. त्याना पण ओझं जडच झालं होतं. त्या सुखावल्या. पटकन पिशव्या माझ्या सायकलला लावल्या, आणि मी निघणार… तेव्हढ्यात त्यांनी मला थांबवलं. क्षणात, क्षणापुरता त्यांचा अविर्भाव बदलला.
तो बदल, त्यांचा तो सावधपणा, त्याही वयात मला खटकणारा होता. सावध होत, त्यांनी सहजपणाचा आव आणत त्यांची पर्स काढून घेतली. त्यांच्या या कृतीला अनेक पदर होते. माझी कौटूंबीक पार्श्वभूमी, माझी शालेय प्रगती, माझ्याबद्दल मारले जाणारे शेरे, ताशेरे… निमूट राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी निमूट पुढे झालो.
काळही पुढे जात होता. अर्णव वारेमाप शिकला. मधे दोन तीन वर्ष अमेरिकेला सुद्धा होता… मी पण सुचेल ते लिहित होतो. नशिबाने हात दिला होता, त्या आधी घर सोडलं. पार्लं कायमचं सुटलं होतं, अर्णवचं लग्न झालं, त्याचे बाबा गेले, जयजयवंती सासरी गेली, हे सगळं कानावर येत गेलं. माझी गोष्टही माझ्या परीने पुढे सरकत होती.
मग “मी नवा ” हे आणखी एक पुस्तक बाजारात आलं. या पुस्तकाच्या निमित्ताने दिलिपभाईनी एक कार्यक्रम पार्ल्याचा मार्केटमधल्या राममंदिरात ठेवला. तिथे अर्णवची आई आली आणि मला भेटायला थांबली. जाताना इतकेच म्हणाली, “ उद्या मला इथेच भेटशील का? माझं महत्वाचं काम आहे. ”
मी उमाकडे बघितलं. तिने मला कळेल अशी मान तुकवली आणि भेटायची वेळ ठरली. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो सुद्धा… औपचारीक बोलणं गरजेपुरतं झाल्यावर त्या म्हणाल्या, “ माझं एक महत्वाचं काम आहे “… असं म्हणत त्यानी एक पुरचूंडी माझ्या हवाली केली. म्हणाल्या यात चवदा तोळे सोनं आहे. कसंही करून तू हे जयूला नेऊन दे. मी जाणं शक्य नाही आणि ती आली तरी मी हे करू शकत नाही. कारण माझ्यावर सुनेचा आणि नातवंडाचा पहारा असतो. हे अर्णवच्या हाती लागलं, तर हे सुद्धा तो गिळून टाकेल. घर आणि काही पाँलीसीज त्याने फसवून माझ्या सह्या घेऊन बळकावलं आहेच, घर त्याने त्याच्या नावावर करून घेतलंय, हे त्याच्या सी ए नेच मला सांगितलय. मी मला माहीत नसल्याचा आव आणून त्या घरात खोट्या मानाने राहते, पण मी पुर्णपणे त्याच्या कह्यात आहे.
… आधी घर स्वच्छ ठेवायला धडपडत होते. आता सगळं नीट आहे हा लोकांचा गैरसमज टिकवायला धडपडते आहे. मला माहीत आहे, मी गेल्यावर हा जयुच्या तोंडाला पानं पुसणार आहे. देवदयेनं तिला काही कमी नाही, पण तरी आईकडून असं काहीतरी मला तिला द्यायचं आहे… पिशवीतून पर्स काढून घेणार्या त्याच होत्या. ती पुरचुंडी स्विकारणारा मीच होतो. भोवतीचं पार्लंही तेच होतं पण.. पण काळ बदलला होता..
– – मला काय वाटतं माहितिये, यशाने तो माणूस बदलत नाही, पण त्याच्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलतो…
त्यांनी जयजयवंतीचा घाटकोपरचा पत्ता दिला, सवड झाली की जा म्हणाल्या..
मी घाईने म्हणालो “ इतकं जोखमीचं काम, सवडीनं जा काय… मी उद्याच जातो. तुम्ही तिला तसं कळवून ठेवा…”
– – खरं सांगतो ती चवदा तोळ्यांची पुरचुंडी खिशात जपून ठेवली आणि डॊळ्यासमोर त्या धड्यातली दोन मुलं उभी राहीली… त्यांच्या जागी अर्णव आणि मी दिसायला लागलो आणि श्रीमंतीचा खरा अर्थ समजला…
… घेतलेली कामगिरी उद्या चोख बजावल्यावर तर, अर्णव माझ्याशेजारी उभा राहूच शकत नव्हता…
लेखक : श्री चंद्रशेखर गोखले
प्रस्तुती : प्रभा हर्षे
९८६०००६५९५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






