सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ जीवनरंग ☆
☆ शॉर्टकट… – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
(स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत चित्रानं आईचा, दीदी आणि भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. भावांना जवळ घेऊन निरोप घेतला आणि मोठ्या हिमतीनं विमानात पाय ठेवला. दुबई एअरपोर्टवर सुरेंद्र सुलेखा तिला न्यायला आले होते. चित्रा सुखरूप दुबईला पोचल्याचा फोन आला तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.) – इथून पुढे – –
साऱ्या विचारांनी, आठवणींनी शिणून राजश्रीला झोपाळ्यावरच डुलकी लागली. जाग आली तेव्हा सुनंदाबाई स्वयंपाक करून निघून गेल्या होत्या. रमेश येऊन त्याचं आवरून पेपर वाचत होता. राजश्री जागी झालेली पाहून त्यानं काळजीन विचारलं, ॓बरं वाटत नाहीये का? किती थकलेला दिसतोय तुझा चेहरा!॔
“ काही नाही. थोडी डुलकी लागली होती. देवाजवळ देवा लावते आणि जेवून घेऊया “ राजश्री उठत म्हणाली.
जेवण झाल्यावर राजश्रीने संध्याकाळी बँकेत कळलेली चित्राच्या अकाउंटची हकीगत रमेशला सांगितली. चित्रा चोरी करणार नाही याबद्दल दोघांचीही खात्री होती.
मग नेमकं काय झालं असेल? चार-पाच महिन्यात एवढे कसले पैसे जमा झाले असतील? अशा विचारांच्या आवर्तात केव्हातरी राजश्रीला झोप लागली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आवरून रमेश दौऱ्यावर चालला होता तेव्हाच राजश्रीलाही जाग आली होती पण तिला उठावसंच वाटेना. पुन्हा चित्राच्या विचारात ती बुडून गेली..
*****
सुरुवातीला आठवड्यातून एकदा चित्राचा ठराविक वेळी फोन येई तेव्हा तिची आई, भाऊ येऊन बसत. स्पीकरवर फोन ठेवला की साऱ्यांना तिचं बोलणं ऐकता येई. आणि तिच्याशी बोलताही येई. दुबईच्या कितीतरी गोष्टी ती उत्साहाने सांगत असे.
॓दीदी इथला एअरपोर्ट, रस्ते अगदी स्वच्छ आणि सुंदर आहेत. रस्त्यावर छान झाडं, फुलं आहेत आणि दिनेश रस्त्यावर इतक्या प्रकारच्या सुंदर मोटारी बघितल्या ना की मला तुझी खुप आठवण येते. किती प्रकारची गाड्यांची चित्रं तू जमविली आहेस. मी येताना आणीन आणखी चित्रं तुझ्यासाठी.
दीदी, सुलेखाताईची जागा पण आपल्यासारखी छान आहे. इथे मॉल्सपण खूप मोठे आहेत. ही दोघही मला बरोबर घेऊन जातात. आम्ही खरेदी करतो, खातो पितो. काळजी करू नका मी मजेत आहे.॔ असं उत्साहाने सांगायची तर कधी आपुलकीने दीदीची, भाईसाहेबांची चौकशी करायची. दहावीत गेलेल्या दिनेशला नीट अभ्यास करायलाही सांगायची.
घरकाम आणि स्वयंपाक या दोन्ही जबाबदाऱ्या चित्रानं घेतल्याने, सुलेखाला अगदी मोकळं छान वाटत होतं. गेली चार वर्ष स्वतः सगळं काम आणि नोकरी करण्यात तिची फार धावपळ झाली होती.
असाच एकदा चित्राचा ठरल्यापेक्षा वेगळ्या वेळी फोन आला होता. ॓दीदी इथे येऊन आता दोन महिने होऊन गेले. मी सुलेखा ताईला माझ्या होम सायन्सच्या कोर्सबद्दल विचारलं. माझी सर्टिफिकेट तिच्याजवळ दिली. पण सुलेखा ताई म्हणाली की तू येईपर्यंत इथलं शैक्षणिक वर्ष अर्धं संपून गेलं आहे. आता तू घरच्या कॉम्प्युटरवर दुपारी प्रॅक्टिस कर. काही नवीन माहिती मिळव.॔ हे सारं ऐकताना चित्राच्या आवाजातली निराशा झाली जाणवत होती.
त्या रात्री मुद्दाम फोन करून राजश्री सुलेखाशी बोलली. पण ॲडमिशनचे काही अवघड नियम गोड भाषेत सांगून सुलेखानं वेळ साजरी केली. पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनची आत्ताच चौकशी करते असेही ती म्हणाली. पण राजश्रीच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. पूर्ण शैक्षणिक वर्ष फुकट गेल्याने चित्राचाही जीव हळहळत होता. तिला मुकाट्याने घर काम आणि बाजारहाट करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. तिच्या पगाराचे पैसे मात्र सुलेखा नियमित पाठवत होती. तरी हळूहळू चित्राच्या फोनमधला उत्साह कमी होत असल्याचं राजश्रीला जाणवलं.
काल बँकेत कळालेल्या माहितीने तर राजश्रीला आणखीनच कोड्यात टाकलं होतं. सुलेखाला सकाळीच फोन करावा असं ठरवून राजश्री स्वतःचं आवरत होती. तेवढ्यात सुनंदाबाई आल्या त्या सांगतंच की, ॓अहो दीदी, चित्रा आज पहाटे अचानक घरी आलीय. तुम्हाला सर्वांना भेटावसं वाटलं म्हणून आले. इतकंच बोलली आणि डोक्यावर पांघरून घेऊन आडवी झाली. आज रात्री ती तुम्हाला भेटायला येणार आहे. माझ्याशी धड काही बोललीच नाही. तुमच्याजवळ बोलेल काहीतरी कदाचित !॔हे ऐकून राजश्रीला चांगलाच धक्का बसला. सुलेखानं साधं फोन करून चित्राच्या येण्याबद्दल कळवलंही नव्हतं. काय झालं असेल नेमकं? राजश्री विचारात पडली. आता रात्रीची आणि चित्राची वाट बघण्याखेरीज उपाय नव्हता.
चित्रा आल्यावर राजश्रीनं तिला स्वतःजवळ सोफ्यावर बसवून घेतलं. पाठीवरून हात फिरवला आणि प्रेमानं विचारलं,॓ बरी आहेस ना बेटा?॔ पण राजश्रीच्या या प्रश्नावर चित्रा बांध फुटल्यासारखी गदगदून रडू लागली. राजश्रीने तिला थोडं रडू दिलं. शांत झाल्यावर चित्रा म्हणाली, ॓दीदी, माझ्या हातून मोठी चूक झालीय. मला क्षमा करा. मी तुमचा माझ्यावरचा विश्वास मोडलाय. काय आणि कसं सांगावं तेच कळत नाहीये….. पण आता मला सगळं सांगायलाच हवं.
तिथे माझा सगळा दिवस कामात जात होता पण रात्री मात्र माझ्या खोलीमध्ये झोपायला गेल्यावर तुमच्या सर्वांच्या आठवणीनं मला फार रडू यायचं. एकटं.. एकटं वाटायचं. तिथे खायला प्यायला कमी नव्हतं पण ज्या उद्देशाने मी इथे आले होते त्या माझ्या शिक्षणाचं काहीच पुढे होत नव्हतं.
सुट्टीच्या दिवशी त्या दोघांबरोबर मला फिरायला मिळायचं. चकचकीत, डोळे दिपवणाऱ्या त्या श्रीमंत जगाचं दर्शनही मोहात पाडणारं होतं. त्या दोघांबरोबर मी पहिल्यांदा मॉलमध्ये गेले तेव्हा त्या उंच सरकत्या जिन्यांवरून मला सावरण्याच्या निमित्तानं सुरेंद्रने माझा हात दाबून धरला, तेव्हाच त्याचा स्पर्श मला वेगळा वाटला. मग लक्षात यायला लागलं की, सुलेखाताई अंघोळीला गेली असेल तेव्हा स्वयंपाकघरात काहीतरी मागायच्या निमित्ताने येऊन तो मला जाणूनबुजून स्पर्श करायचा. दीदी, खरं सांगते इथे तुमच्याकडे मला कसलीच भीती वाटली नाही. भाईसाहेबांबद्दल तर नेहमी आदरच वाटला. पण तिथे सुरेंद्रचं लागट वागणं जाणवायला लागलं होतं.॔
चित्रा पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. चित्राच्या डोळ्यांपुढे तो पहिलाच प्रसंग उभा राहिला…
एकदा सुरेंद्र अचानक ऑफिसमधून लवकर घरी आला. सुलेखाताईला घरी यायला अजून वेळ होता. आपण सोफ्यावर बसून कादंबरी वाचण्यात गढलो होतो. वॉश घेऊन आल्यावर सुरेंद्रनं बॅगेतून एक छान मोठं चॉकलेट काढून आपल्या पुढे धरलं. चॉकलेट घ्यायला हात पुढे केल्यावर तो म्हणाला, ॓अगं, नको. पुस्तक वाचतेयस ना? ते खराब होईल. मीच देतो तुला… असं म्हणत त्यानं अगदी जवळ बसून आपल्या तोंडात चॉकलेट भरवलं. आपण वाचत असलेल्या कादंबरीत नुकताच अशा प्रकारचा प्रसंग रंगवला होता. त्यानं लावलेल्या भारी सेंटचा मंद सुवास, तोंडात विरघळणाऱं चॉकलेट, त्याची भुरळ घालणारी नजर सारं मोहात पाडणारं होतं. त्याच्या मिठीला आपण केलेला प्रतिकार लटका आहे हेही त्याच्या केव्हाच लक्षात आलं होतं…
पण हे सगळं दीदीला कोणत्या तोंडानं सांगणार?
हुंदके थांबल्यावर चित्रा दीदीला एवढंच म्हणाली, दिवसेंदिवस दिवस त्याची लगट वाढत चालली होती. आणि मी कबूल करते की माझाही पाय मोहाच्या घसरगुंडीवर पडला होता. मला सावरायला कुणी नव्हतं.
सुरेंद्र– सुलेखा ताईच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता. खरेदी करायला आम्ही तिघं एकत्रच गोल्डसुक मार्केटला गेलो होतो. सोन्याचा तो चमचमणारा बाजार पाहून डोळे दिपून जात होते. ताईंची पसंती चालली होती. मीसुद्धा मला आवडलेला एक सोन्याचा नेकलेस पुन्हा पुन्हा गळ्याला लावून बघत होते. मागच्या आरशात पाहिलं तर सुरेंद्र ॓छान दिसतोय ॔ अशी पसंतीची मान डोलावत, मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडेच पाहत होता. दोन-चार पगार आपल्याला इथेच द्यायला सांगून तो सेट खरेदी करता आला तर किती छान होईल, या विचाराने झोपेतसुद्धा मला तो हार दिसत होता.॔
थोडं थांबून, पाणी पिऊन चित्रा पुढे सांगू लागली, ॓एखादं सामान आणायचं राहिलं असलं तर मी आमच्या घराजवळ असलेल्या स्टोअरमध्ये जात असे. तिथेच माझी आणि हमीदाची चार-पाच वेळा गाठ पडली होती. ती सुद्धा काही सामान घ्यायला स्टोअर मध्ये यायची. तिच्याशी बोलताना कळलं की तीही हैदराबादहून इथे एका कुटुंबात काम करण्यासाठी आली होती. तिला आठ नऊ भावंडे होती. वडिलांच्या बांगड्या विकण्याच्या व्यवसायात त्यांचं भागत नव्हतं. कुणाच्या तरी ओळखीनं ती दुबईला आली होती. साधारण माझ्याच वयाची होती. इथे तिला घरकाम पुष्कळ होतं. फक्त नियमितपणे तिच्या घरच्यांना तिचा पगार मिळत होता आणि हमीदाला पंधरा-वीस दिवसांनी अम्मीशी फोनवर बोलता येत होतं.
त्या दिवशी सामान घ्यायला मी स्टोअरमध्ये गेले तर हमीदा भेटली. कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून बरं वाटलं. ॓ठहरोना हमिदा. साथ जायेंगे.॔ असं म्हणत तिला थांबवून माझं सामान घेऊन झाल्यावर आम्ही बरोबर निघाले. थकल्यासारखी दिसणारी हमीदा पावले ओढीत सावकाश चालत होती.
– क्रमशः भाग दुसरा
© सौ. पुष्पा चिंतामन जोशी
कोथरूड, पुणे
मो ९९८७१५१८९०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈






