सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ जीवनरंग ☆
☆ शॉर्टकट… – भाग – ३ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
(त्या दिवशी सामान घ्यायला मी स्टोअरमध्ये गेले तर हमीदा भेटली. कोणीतरी बोलायला भेटलं म्हणून बरं वाटलं. ॓ठहरोना हमिदा. साथ जायेंगे.॔ असं म्हणत तिला थांबवून माझं सामान घेऊन झाल्यावर आम्ही बरोबर निघाले. थकल्यासारखी दिसणारी हमीदा पावले ओढीत सावकाश चालत होती. )
इथून पुढे – –
॓क्यूं हमीदा, तबीयत ठीक नही है क्या? क्या हुआ?
या माझ्या प्रश्नावर ती म्हणाली, क्या करनेका बहन? अपना नशीबही अच्छा नही. चाचाके मर्जीनुसार कभी उनके रूममे भी जाना पडता है. पैर दबाने के बहाने से बुला लेते है और…. क्या करूं? मेरे फॅमिलीको खाली मेरा पैसा चाहिये. मेरा पासपोर्ट वगैरा सब चाचाके पास ही है. यहा दो बरस पुरे होने के बाद मुझे दो महीने की छुट्टी मिलेगी. तब तक मै वापस नही जा सकती. अभी मैने एक तरकीब सोची है. जब जब चाचा पैर दबाने के लिए बुलाते है, तो मैं पहिले उनसे कुछ अच्छा गहना मॉ॑ग लेती और मेरे बॅग में रखती. सायरा बेगमको सब पता है. लेकिन वो कुछ नही कर सकती. मेरे मेहनत का पैसा तो मेरे घरवालेही खाते है. कम से कम कुछ सोना तो मेरे पास रहेगा. तिचं घर आल्यावर, ॓फिर मिलेंगे.॔ खुदा हाफिज.॔ म्हणून ती निघून गेली.
पण तिचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर वीज पडल्यासारखं झालं. माझी अवस्था तिच्यापेक्षा फार वेगळी नव्हतीच !दिवसेंदिवस सुरेंद्रची मागणी वाढत चालली होती. त्यातच सुलेखा ताईला दिवस गेल्याचं कळलं. मी वरकरणी त्यांच्या आनंदात सहभागी असल्याचं नाटक केलं. पण एकदा सुलेखा ताईला फोनवर कुणाशी तरी बोलताना मी ऐकलं होतं की त्या होम सायन्सच्या डिप्लोमाची फी खूपच जास्त आहे. आता दोन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपली इथून सुटका नाही हे मी मनोमन जाणलं होतं. बाळ.. बाळंतीणीचं करायचं सोडून मला कोण शिकायला पाठवेल? इतकी चांगली हक्काची मुलगी कामाला घरात असताना मला कोण एवढ्यात भारतात पाठवेल?॔
… आणि त्यादिवशी सुरेंद्रने ॓मोठी मागणी ॔ पुढे केली. मी सगळी काळजी घेईन. तुला काही त्रास होणार नाही असं आश्वासनही दिलं.॔ हे कधीतरी घडणारच होतं, म्हणून मीही सावध होते. मुंबईला मी रात्रीच्या ज्युनिअर कॉलेजला जात असताना माझ्याबरोबरच्या काही मैत्रिणी, त्यांनी काल कुठे कसा सेक्सचा अनुभव घेतला ते रंगवून सांगत असंत. अमक्या तमक्या त्या मोठ्या बकऱ्याकडून ठरल्यापेक्षा मी काय जास्त उकळलं, ड्रेस कॉस्मेटिक्स ज्वेलरी सेट कसं मिळवलं. याचं वर्णन करीत. मी त्यांच्या धैर्यापुढे अवाक् होई…. .॔
चित्रा पुन्हा रडू लागली. तिच्या पाठीवर हात फिरवत राजश्री तिला शांत राहायला सांगत होती. पण हे सगळे प्रकार ऐकून राजश्रीच एवढी हादरून गेली होती की आता तिच्याच पाठीवरून हात फिरवायला तिला सावरायला, तिचे डोळे पुसायला रमेश जवळ असता तर फार बरं झालं असतं असं तिला वाटत होतं. आणि एकीकडे हे सारं रामायण ऐकायला तो इथे नाही तेही चांगलं झालं असं वाटत होतं.
काही मिनिटं अशीच शांततेत गेली. थोडं थांबून चित्रा म्हणाली दीदी,॓ कसं सांगू तुला? सुरेंद्रची मागणी मान्य करण्याआधी मी त्याच्यापुढे मुंबईतली महागाई, शिक्षणाचा खर्च, आमची घराची गरज असा सारा पाढा वाचला. त्यानं मला माझ्या मुंबईच्या बँक अकाउंटमध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्याचं आश्वासन देऊन ते पूर्ण केलं. आणि मगच मी त्याच्या स्वाधीन झाले. मी कबूल करते की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. पुरुष सहवासाची आणि प्रत्येक वेळी बँकेत जमा होणाऱ्या पैशाची मला भुरळ पडली. पण मला आता तिथून, या साऱ्या मोहातून लवकर बाहेर पडायचं होतं. मी वेळेवर मुंबईला पोचले नाही तर इथलं शैक्षणिक वर्ष सुरू होईल. मला पुढच्या वर्षात ॲडमिशन मिळणार नाही हे मला माहीत होतं.
दीदी, तुम्हा दोघांना माहितेय की मला पुढे शिकून कॉम्प्युटरचा एखादा कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहायचंय.
॓… आणि माझं नशीब चांगलं म्हणून दुबईच्या त्या मोहमयी, सोनेरी दुनियेतून परतण्याचा ॓शॉर्टकट ॔ मला लवकरच सापडला. काही दिवसांपूर्वी सुलेखाताई, ॓आज मी लवकर घरी येते. दोघी मिळून थोडे लाडू, शंकरपाळे करू.॔ असे सांगून शाळेत गेली. आणि अनपेक्षितपणे, सुखाला चटावलेला सुरेंद्र लवकर घरी आला. त्याला मी ॓आज ताई पण लवकर घरी येणार आहे.॔ असं अजिबात सांगितलं नाही. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे आमच्या प्रेमाचा सिलसिला सुरू असतानाच सुलेखाताई तिच्याकडची किल्ली लावून दार उघडून आत आली. सुरेंद्रला घाईनं माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहून आणि आमच्या चेहऱ्यावरून तिनं काय ते जाणलं.
खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तिला आमचा संशय होताच. पण आज आम्ही रंगेहाथ पकडले गेलो होतो. त्या दोघांची खूप वादावादी झाली. मलाही खूप बोलणी खावी लागली. शक्य तितक्या लवकरचं तिकीट काढून माझी मुंबईला रवानगी करण्याचा निर्णय झाला. मी ताईकडून आठवणीनं माझ्या पासपोर्टबरोबर माझं बारावीचं आणि माझी इतर सर्टिफिकेट्स मागून घेतली आणि मगच माझी बॅग भरायला घेतली. दीदी, मी तुम्हा दोघांची क्षमा मागते. माझा अपराध तुम्ही समजून घ्याल ना?॔
राजश्री काहीही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती. आपण काय करायला गेलो आणि हे काय होऊन बसलं याबद्दल खंत करावी की आपण विश्वासानं दुसऱ्या देशात पाठवलेली दुसऱ्याची मुलगी सुखरूप घरी आली याबद्दल देवाचे आभार मानावे हेच तिला समजेना. डोळे पुसत, जिना उतरणाऱ्या चित्राकडे ती निःशब्द होऊन नुसती बघत उभी राहिली.
मन मोकळं झाल्याने चित्राला आता जरा बरं वाटत होतं. राजश्रीताईकडून घरी येताना चित्राला दुबईतला आणखी एक प्रसंग आठवला…
… एकदा काही खरेदीसाठी ती सुलेखाताई आणि सुरेंद्र एका मॉलबाहेर भेटणार होते. त्या दिवशी सुरेंद्रनं आपल्याला घरी फोन करून ठरल्या वेळेपेक्षा एक तास लवकर तयार राहायला सांगितलं होतं. सुरेंद्रला आवडणारा सुंदर आकाशी रंगाचा ड्रेस घालून आपण तयार झालो. ड्रेसचं आणि आपलं सुरेंद्रनं अगदी ॓साग्रसंगीत ॔कौतुक केलं. बाहेर पडल्यावर गाडी वेगळ्याच दिशेला निघालेली पाहून आपण सुरेंद्रला विचारलं ,॓आपल्याला ताईने तिकडच्या मॉलमध्ये बोलावलं आहे ना ?॔हो. पण त्याआधी एक सरप्राईज आहे बाईसाहेबांना. असं म्हणत सुरेंद्रने गाडी ॓गोल्डसूक ॔ जवळ उभी केली. मागे ताईंबरोबर खरेदीला गेलो होतो तेव्हा आपल्याला आवडला होता तसाच सोन्याचा सेट सुरेंद्रने आपल्यासाठी खरेदी केला. भारावून जाऊन तो सेट पर्समध्ये ठेवताना आपल्याला झालेला आनंद आपण लपवू शकलो नाही. गाडीत बसल्यावर सुरेंद्र म्हणाला, ॓बाईसाहेब याची पुरेपूर वसुली मी करणार आहे बरं !॔आपण खोटं खोटं रागावून त्याला आणखीनच उत्तेजन दिलं होतं. मॉलमधली खरेदी आटोपून, घरी येऊन सारं आवरल्यावर रात्री आपण आपल्या खोलीचं दार लावलं. तो चमचमणारा सुंदर सेट घालून स्वतःला पुन्हा पुन्हा आरशात न्याहाळलं. मग एका जुन्या ड्रेसमध्ये तो सेट गुंडाळून अलगद बॅगेच्या तळाशी ठेवला.
… आत्ता दीदीला सगळं काही सांगताना ही गोष्ट आपल्याला आठवली नाही की हे सांगायचं आपण मुद्दामून टाळलं ?
– समाप्त –
© सौ. पुष्पा चिंतामन जोशी
कोथरूड, पुणे
मो ९९८७१५१८९०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





