डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ आग – भाग १ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

किती घोर अन्याय होता हा!

इतक्या आल्हाददायक वातावरणात घरातच राहणे ही अत्यंत कठोर शिक्षा होती. बर्फाळ दिवस उलटल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये हवामान जेमतेम दोन-तीन महिने कृपावंत व्हायचे. लोक घराबाहेर पडायचे. असे कांही सुखद दिवस मुक्कामास येत नाहीत तोच आसमंताला धूर घेरून टाकत असे. लोकांना घरातच राहण्याचा सावधगिरीचा इशारा देण्यात येई. निव्वळ मोजक्या दिवसांच्या प्रखर उन्हामुळे धरतीवर इतकी उष्णता निर्माण व्हायची की जंगलात घर्षणामुळे आग लागायची. आग इतक्या भयानक वेगाने पसरायची जणू हजारो किलोमीटर व्यापलेल्या जंगलाच्या या अग्निकुंडात समिधाच अर्पण व्हायच्या! या आगीच्या दाहकतेचा अनुभव घेणारी अनेक शहरे रिकामी केली जायची. जिकडे तिकडे आग, आग आणि फक्त आगीचेच साम्राज्य.

कॅनडातील अल्बर्टा येथील जळणारी आणि जाळणारी वनराई!

वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यांवर स्वार होत आगीतून निघणारा घनदाट धूर दशदिशांत स्वैर संचार करायचा आणि एडमंटन आणि कॅलगरीसह अनेक शहरांना आपल्या कवेत कवटाळून घ्यायचा. हे अग्निचक्र साधारणपणे दरवर्षी नित्यनेमाने सुरूच असायचे. वातावरण प्रदूषित करीत जाणारे हे धूम्रवलय अल्बर्टा प्रांत आणि त्याच्या पल्याड देखील विनासायास अनिर्बंधरित्या पसरत राहायचे. अग्निज्वालांचे भीषण तांडव इतके तीव्र असायचे की बहुतेक प्रभावित क्षेत्रात सरकारी प्रयत्न निष्प्रभ ठरायचे. दूरवर फैलावत चाललेले धुराचे वलय हेच दर्शवीत असायचे की आगीचे भीषण स्वरूप किंचितही कमी झाले नव्हते. ही प्रदीप्त अग्निज्वाळा वारा नेईल त्या दिशेने त्याच्या संगतीत प्रचंड आवेगाने फरफटत जात आणखीनच क्रियाशील होत होती.

बाहेर जाऊन मोकळी स्वच्छ हवा अनुभवू इच्छिणाऱ्या लोकांचे स्वागत करायला धुराची उबदार वाकळ सज्ज असायची. त्यांची इच्छा असो कां नसो, त्यांना एक तर या गरम पांघरुणात स्वतःला लपेटून घ्यावे लागे, किंवा त्याची ऊब नकोशी असल्यास स्वतःला घरात कोंडून घ्यावे लागे. हाच तो वन्य वणवा. मी जंगलीपणाच्या आहारी गेलेल्यांच्या पाशवी जिद्दीविषयी ऐकले होते. मात्र या वन्य वणव्याच्या जिद्दीने पेटवलेला प्रकोप प्रथमच डोळ्यांसमोर प्रकटला होता. जणू शिवशंकराने त्याचा प्रलयंकारी आग ओकणारा तिसरा नेत्र उघडलाय असा आभास होत होता. कुठल्याही उपायाने या आगीचा क्रोध शमण्याचे चिन्ह दिसत नव्हते. अनियंत्रित गुंडगिरी अंगात भिनलेल्या झुंडीसारखी ही आग कोणाच्याच आटोक्यात येत नव्हती. आता तर सैरावैरा धावणाऱ्या या अग्निज्वाळांचा जणू स्वतःवरील ताबा नष्ट झाला होता.

मेघांचा वेगळाच हट्ट होता, न बरसण्याचा. मग सृष्टी हतबल झाली. पावसाचा एकही थेंब झिरपला नाही आसमंतातून! हेलिकॉप्टरच्या मदतीने पाडण्यात आलेल्या कृत्रिम पावसाच्या सरींनी देखील कांहीच साध्य झाले नाही.

शेवटी उरली ती भडकलेली आणि करपून टाकणारी आग, आतली आणि बाहेरचीही! आतून आणि बाहेरूनही पेटलेली आग. बाहेर असलेली जंगलातील आग सर्वांना दिसत होती. पण आतल्याआत मला होरपळून टाकत धगधगणारी आग माझी स्वनिर्मित होती. त्या आगीच्या धुराने मला वेढून टाकले होते. त्या ज्वालांत मी एकटा जळत होतो, माझ्या मुलाशिवाय, लिली या माझ्या लाडक्या पत्नीशिवाय, माझ्या कुटुंबाशिवाय. शेवटी एकल माणसाची कुठली ओळख तरी असते कां?

कालपर्यंत जे कुटुंब डेरेदार वृक्ष होते, ते आज फक्त एक निष्पर्ण पोकळ खोड उरले होते, तेही घटस्फोट या शब्दाच्या साखळ्यांनी जखडलेले! संबंधविच्छेद होताच मला आता त्या प्रेमबंधनाने दोन जीवांना जोडणाऱ्या प्रत्येक धाग्याचा स्पर्श स्मरत होता. एक वेळ अशी होती की लिलीचा सुंदर चेहरा पाहिल्याशिवाय मला करमत नसे. तिकडे तीही तितकीच बेचैन असायची. या उन्मादात जगाला विसरून जात आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. आम्ही तासनतास बोलत असू. या संवादाचे चक्र कधीच थांबत नसे. आम्हाला एकमेकांचा विरह अजिबात सहन होत नसे. आमचे लग्न देखील मोठ्या थाटामाटात झाले, म्हणतात ना ‘बिग फॅट वेडिंग’, तसे!

लग्नानंतर मोहक स्मितहास्य करणारा लिलीचा चेहरा माझ्यासाठी दररोज जणू नवतीचे नजराणे घेऊन येत होता. तिचे ते खळखळणारे हास्य कानांत साठवून घेण्यासाठी माझे कान आसुसलेले असायचे. ते मधुर हास्य कायम राहावे यासाठी मी नाना क्लुप्त्या करून पाहत असे. कधी तर मी तिला तिच्या आवडत्या उपाहारगृहात घेऊन जायचो, तर कधी शॉपिंग मॉलमध्ये! या सर्वांहूनही तिला रम्य निसर्गाच्या सानिध्यात राहणे खूप आवडायचे. त्यासाठी मी दर महिन्याला तिची आवड ध्यानात घेत सहलीची योजना आखायचो. कधी कॅम्पिंग करायचे, कधी गिर्यारोहण तर कधी क्लाइंबिंग! तीही प्रणयाराधनात मागे नव्हती. ती माझ्या आवडीचे पदार्थ अगदी निगुतीने रांधायची आणि मला प्रेमाने खाऊ घालायची. ते पदार्थ आवडल्याचे निदर्शक असलेले माझे थम्सअपसहित मनमुराद हास्य बघताच तिचा चेहरा लाजेने लालेलाल व्हायचा. त्या गुलाबी दिवसांत आम्ही एकमेकांमध्ये बेभानपणे इतके हरवून जायचो की आम्हाला जगाची कसलीच पर्वा नसायची.

बेधुंद करणाऱ्या पहाटवेळा आणि अत्यंत आतुरतेने ज्यांची प्रतीक्षा केली जायची त्या उन्मत्त रात्री. प्रत्येक दिवशी हे असेच व्हायचे. कामावर जायचे अगदी जीवावर यायचे.

“ऐक ना, आज कामावरून सुट्टी घेऊ या. “

“वैद्यकीय रजा घेऊ या. ” 

“नको, त्यापेक्षा वर्क फ्रॉम होम (घरून काम) करणे ठीक राहील. ”

या संभाषणानंतर आम्ही पुन्हा एकदा इतके निकट यायचो की आमच्यामध्ये शब्दाचा देखील आडपडदा येऊ शकत नसे. कामाचा कुठलाच ताणतणाव आम्हाला दिवसाढवळ्या देखील जवळ येण्यापासून रोखू शकत नव्हता. बस, एकच गोष्ट मनात भिनली होती, आम्ही पूर्ण समर्पणभावनेने एकमेकांमध्ये विलीन झालो होतो. जणू आमचे वेगळे अस्तित्वच नव्हते. प्रत्येक दिवसाचा प्रारंभ मंदगतीने होत असे, पण नंतर जसजसा तो पुढे सरकत असे, तसतसा घड्याळाच्या काट्यांच्या मागे पळत जातांना इतका व्यस्त होत असे की तो कधी संपायचा ते आम्हाला कळतही नसे. दोघांच्याही मनांत एकमेकांच्या अधिकाधिक सामिप्याव्यतिरिक्त इतर कुठलीच कामना नव्हती.

हर्षोल्लास आणि प्रेमानुभवांचा अमर्याद खजिना दिवसागणिक वर्धमान होतच होता. आम्ही असे आनंदलहरींवर तरंगत असतांनाच आमच्या प्रेमाच्या वेलीवर एक पुष्प उमलले. बिट्टू आमच्या आयुष्यात आला. सुखाच्या वर्तुळाचा घेर चौपट झाला. आता आम्ही दोघांचे तीन झालोत. आमच्या घराला आता खरे घरपण आले. ते जणू एक पवित्र मंदिर झाले. असे म्हणतात की कळसावर कोणीही अधिक काळ थांबू शकत नाही, त्याला खाली उतरावेच लागते. आम्ही देखील मात्र तृप्ततेच्या शिखरावर असतांनाच या पूर्णत्वास गेलेल्या घराच्या भिंतींना भेगा पडल्या. या भेगांनी भिंती अशा कांही खोलवर पोखरल्या गेल्या, की त्या भूकंप आल्यासारख्या हादरून जायला लागल्या. कदाचित आमच्या जीवनातील आनंदपर्व संपवण्याची काळालाच घाई झाली असावी. तसेही सगळ्या वेळा सारख्या थोड्याच असतात?  बिट्टू सहा महिन्यांचा होता होता आमच्या प्रेमाची गंगा उलट्या दिशेने प्रवाहित होत गेली. आमच्या प्रेमाचा पतंग जितक्या वेगाने उंच उंच उडत गेला होता, त्यापेक्षा अधिक वेगाने तो खाली आला. या पतंगाची फाटून पार दुर्दशा झाली होती. आता प्रत्येक क्षणी दुसऱ्याची मदत करायला आम्ही हात आखडता घेत होतो.

कटू संवादांच्या मालिकेने घर बेचैन व्हायचे.

“रात्रभर बिट्टू रडत होता. पण तुला एकदाही उठून बघावेसे वाटले नाही की तो इतका कां रडतोय? “

“अगं, त्याला भूक लागली असेल, दूध तर तूच पाजणार होतीस ना, मी उठून काय करणार होतो? ” 

“अरे, तो दरवेळी दुधासाठी उठत नाही. ” 

“मग मला उठवायचे की. “

“कधीतरी स्वतः होऊन काहीतरी करायचे ना. प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी कां?  कधीतरी तू समजून घ्यायला नको कां?  

“बरं बाई, मी खरोखर मूर्खच आहे. तुला कोणत्या वेळी काय हवे असते हे मला समजू शकत नाही. ” 

ती पाय आपटत तरातरा निघून जायची. या लहान सहान गोष्टी मोठमोठ्या मतभेदांच्या भेगांचा पाया आणखीनच मजबूत करायच्या. हातातील वस्तू जमिनीवर आदळत होत्या, त्यांचा आवाज वाढायला लागला की मी घराबाहेर निघून जायचो. हळूहळू कर्कश झालेल्या संवेदना आता धीट झाल्या होत्या. हे चिडचिड करणारे आवाज आता त्रासदायक व्हायला लागले. त्यांचे माझ्या मनावर आणि शरीरावर वाढत चाललेले ओझे मला सहन होईनासे झाले. कर्णकटू कोलाहल आता सतत माझ्या कानांशी अरेरावी करीत खोल घुसत होता. आता कुठलेही मधाळ शब्द कडव्या विषासारखे वाटायला लागले. आम्ही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे तीक्ष्ण वाग्बाण चालवत असतानांच मध्येच निरागस बिट्टूचे रडणे टिपेला जात असे. कोणे एके काळी प्रेमाचे मंदिर असलेले आमचे घर जणू तिघांच्या आवाजाने कातावून जात स्वतःच उच्चरवाने आक्रोश करीत होते. प्रेमाच्या गुलाबपाण्याने शिंपलेल्या मायाळू भिंतीचे आता कठोर सिमेंट आणि मजबूत मातीच्या लिंपणाने एका भावविहीन डोलाऱ्यात कधी रूपांतर झाले ते आम्हांला कळलेच नाही.

“इतक्या जोरात ओरडत जाऊ नकोस, लिली. माझी नाही तर किमान बिट्टूची तरी काळजी घे. “

“तू इथे असतांना ओरडल्याशिवाय काहीच होत होत नाही रे! त्याशिवाय तुला ऐकायला येतं कुठे? ” 

“हो, सगळी चूक माझीच आहे! “

माझं, माझं, माझं… माझ्या कानाभोवती घोंघावणाऱ्या या शब्दांनी मला धक्का बसला. मी भानावर आलो, कारण हे माझं घर नव्हतं तर समुद्रकिनारा होता. मात्र माणसांच्या गर्दीतही मी इथे एकटाच होतो. पण ते किंचाळणारे आवाज माझा पाठलाग करत होते. गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!

गरम वाळू माझ्या शरीराला खोलवर टोचत होती. मला हेच तर हवे होते. एकाच वेळी जितकी जमेल तितकी उष्णता देऊन टाक म्हणावं. उष्णतेला तोंड देण्यासाठी समुद्राचे जलसिंचन तयार होतेच. पाण्यात डुबकी मारून झाल्यावर ते सुकवण्यासाठी फिरून गरम उन्हात सूर्यस्नान. क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा पाठशिवणीचा खेळ!

.

– क्रमशः भाग पहिला 

हिन्दी कथालेखिका : डॉ. हंसा दीप 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments