श्री सुधीर करंदीकर
जीवनरंग
☆ “वेगळी सकाळ आणि नव्या मैत्रिणी…” – भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
रोज सकाळी ४० ते ४५ मिनिटे फिरणे यासारखा सुंदर आणि सोपा व्यायाम नाही. फिरतांना छोटीशी पथ्य पाळायची असतात, आणि, ती म्हणजे, फिरतांना हातात मोबाईल नाही आणि घरगुती गप्पा नाहीत. फिरतांना भेटणाऱ्यांना हाय – हॅलो करत चालत राहिलो, तर चेहेरा आनंदित राहतो, आणि मन पण प्रसन्न राहते.
आणि एखादी वेगळी सकाळ अशी पण घडते – –
खरंतर सकाळ ही रोजचं वेगळी असते, पण, आजची सकाळ जरा हटके, म्हणजे वेगळ्यातली वेगळी होती – –
आम्ही सकाळी साधारण ७ – ७. १५ ला बाहेर पडतो. ही वेळ ऑफिसची असल्यामुळे, रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी कंपन्यांच्या बसचे पिक – अप पॉईंट्स आहेत. काही ठिकाणी कॅब चे पिक – अप पॉईंट्स आहेत. त्यामुळे फिरण्याच्या पूर्ण रस्त्यावर, या वेळेला, फुटपाथवर थोड्या थोड्या अंतरावर मुले – मुली – स्त्री – पुरुष ग्रुपनी गाडीची वाट बघत उभे असतात.
काही ठिकाणी २ -३ जण असतात, तर काही ठिकाणी ६ – ७ जण असतात. रोजचे द्रुश्य म्हणजे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. एकतर ही मंडळी फोनवर बोलत असते किंवा चॅट करत असते. काहींच्या कानाला मशीन लावलेले असते. सकाळी सकाळी भेट होते आहे, तर एकमेकांना हाय – हॅलो करणे, एकमेकांची विचारपूस करणे, काही गप्पा मारणे, हा प्रकार कधीच बघायला मिळत नाही.
आज बायकोला सकाळी एका लग्नाला जायचे होते, म्हणून मी नेहेमीच्या वेळेलाच, पण एकटाच फिरायला बाहेर पडलो.
मृत्युंजय मंदिराच्या जवळच, एका स्टॉप जवळ, दोन मुली उभ्या होत्या आणि चक्क मोठमोठयांनी हसत गप्पा मारत होत्या. एकीच्याही हातात मोबाईल नव्हता. दोघींच्या हातात बाजूच्या चहाच्या स्टॉल वरून घेतलेल्या चहाचे ग्लास होते. मुलींनाच असे नाही, पण कुणालाही असे मनमोकळं हसतांना बघितलं, की प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं.
रस्त्यानी जातांना, असं काही वेगळं दिसलं, की आपोआपच आपली पावलं तिथे थांबतात. माझं पण असंच झालं. या रस्त्यानी मी इतके दिवस फिरतो आहे, पण मोबाईल नसणारी आणि एकमेकांशी बोलणारी माणसं, मी पहिल्यांदाच बघत होतो. आणि ती पण विथ स्माइलींग फेस! काय कारण असेल? ही माझी जिज्ञासा जागी झाली.
कारण समजण्याकरता, त्यांनाच विचारणे, हा एकच पर्याय होता.
मी : मॅडम, एक विचारू का?
(त्यांची नावे समजेपर्यंत आपण त्यांना मेघना आणि मनवा म्हणूया)
मेघना : विचारा काका, काहीही विचारा, आम्ही आज एकदम खुश आहोत
मी माझी शंका त्यांना विचारली
मनवा : काका, तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. आज आम्ही एकमेकींना मोबाईल शिवाय बघतो, तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटतं.
मेघना : काका, आज ड्राय-डे आहे
मी : महाराष्ट्रात ड्राय-डे कुठे पाळतात? आणि आता तर सकाळ आहे
मेघना : आमच्या ड्राय-डे चा दारूशी काहीही संबंध नाही. ड्राय-डे ला दारू नसते, आमच्या ड्राय-डे ला मोबाईल नसतो. मृत्युंजय मंदिराजवळ आमचा स्टॉप आहे, श्री शंकराचा वार सोमवार, म्हणून सोमवारी आमचा ड्राय-डे असतो. आज मोबाईलची जागा, हातात नसून आमच्या पर्स मध्ये असते. आणि वापर फक्त आलेला फोन घेण्याकरता किंवा काही फोन करण्याकरता.
मी : वा! काय मस्त आयडिया आहे! तुम्हाला ही कल्पना आली कशी?
मनवा : काका, नुकतेच, आम्ही दोघी युरोपमध्ये स्वीडनला होतो, तीन महिने. तिथे आम्हाला खूप शिकायला मिळाले. ही कल्पना पण त्यातूनच मिळाली. आमच्या ड्राय-डे बद्दल विचारणारे तुम्ही पहिलेच आहात. तुम्हाला ऐकायचे असेल, तर, आमच्या बरोबर चहा घ्यावा लागेल. मी काही उत्तर द्यायच्या आत, तिनी बाजूच्या चहावाल्यांना खूण केली, आणि माझ्या हातात चहाचा ग्लास आला.
मी : मॅडम, तुमची बस किती वाजता आहे? नाहीतर बोलण्याच्या नादात – —
मेघना : कॅब आलेली आहे. ही काय आमची कार उभी आहे. आमचं फ्लेक्सी टायमिंग असतं, उशिरा गेलो, तर तेवढं नंतर थांबायचं! नो प्रॉब्लेम.
आता, ड्राय-डे ची कल्पना कशी आली – – -? त्याचं असं झालं – –
स्वीडनमध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवणारा एकही जण, आम्हाला मोबाईलवर बोलतांना दिसला नाही. आम्हालाही तुमच्यासारखचं आश्चर्य वाटलं. दुसऱ्याच दिवशी, आम्ही तिथल्या एकाला गाठलं, जसं शंका विचारायला तुम्ही आम्हाला गाठलं. तिथे सगळ्यांनाच इंग्रजी येतं.
मी : मॅडम, थोडा फरक आहे. मी दोघींना गाठलं, आणि तुम्ही दोघींनी एकाला गाठलं. त्यांनी पण तुम्हाला चहा ऑफर केला होता का? बरं, गाठल्यावर पुढे काय झालं?
त्या दोघी मला भूतकाळात घेऊन गेल्या ——
मेघना : आम्ही त्यांना विचारलं, की, इथे कोणीच गाडी चालवतांना मोबाईल वर बोलतांना दिसत नाही. पोलीस पकडतात का? दंड जास्त असतो का? लायसन्स जप्त करतात का?
परदेशी माणूस : अहो, गाडी चालवतांना मोबाईल वापरणे, स्वतः करताच धोकादायक असते, हे आम्हाला समजतं नाही का? ते पोलीसानी कशाला सांगायला पाहिजे! उन्हाळ्यात आपण डोक्यावर टोपी घेतो, पावसाळ्यात छत्री घेतो. छत्री नाही घेतली, तर पोलिसांनी आपल्याला पकडायला पाहिजे कां? मॅडम, पाऊस पडतोय, तुम्ही छत्री नाही घेतली – भिजल्यामुळे तुम्हाला ताप येईल – सर्दी होईल. द्या १० युरो दंड.
मी टू व्हीलर चालवतांना हेल्मेट घातले नाही, आणि काही कारणामुळे, रस्त्यावर गाडी घसरून पडलो, तर माझं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही, हे मला नक्कीच समजतं. त्यामुळे माझ्या सुरक्षिततेकरता मी हेल्मेट घालतोच. याच्या करता नियम आणि पोलीस कशाला पाहिजेत? कार चालवतांना आम्ही सीट बेल्ट लावतोच, त्याचं कारण हेच. अर्थात ज्याला मानेचा त्रास असेल, वयस्कर माणसांना हेल्मेट मुळे त्रास होत असेल, तर ते हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट हे व्ययक्तिक सुरक्षिततेकरताच आहे..
मनवा : अहो, पण कार चालवणारे मोबाईल वर का बोलत नाहीत? अपघात झाला तर त्यांना काहीच होणार नसते! चालणाऱ्याचे बारा वाजतात! मग, याकरता काही नियम आहे का? दंड आहे का?
परदेशी माणूस : मॅडम, नियम आला, की, बघायला यंत्रणा आली. दंड आला, की, गैरव्यवहार आला. आणि मॅडम, समजा, माझ्या कारनी, ‘अ ‘, ‘ब’, ‘क ‘, ‘ड’, लोकांना धडक दिली, तर, मला काहीच होणार नाही, हे बरोबर आहे. आता, इतर कुणी असेच ४ -५ लोकांना उडवले आणि त्या ‘अ ‘, ‘ब’, ‘क ‘, ‘ड’, मध्ये माझे आई – वडील असले तर? बायको असू शकते! मुले असू शकतात! मित्र असू शकतात! अशी दुसऱ्यांनी दिलेली धडक मला आवडेल का? नक्कीच नाही. मग, मी दिलेली धडक इतर कुणाला आवडेल का? तर नाही.
‘इस हाथ दे – उस हाथ ले’. व्हेरी सिम्पल. म्हणून गाडी चालवतांना ‘नो मोबाईल’.
– क्रमशः भाग पहिला
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






