सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “सर आणि मी” – लेखक : सुश्री ज्योत्स्ना संभाजी कदम ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तक : सर आणि मी
लेखिका :ज्योत्स्ना संभाजी कदम.
प्रकाशन :राजहंस.
प्रथम आवृत्ती: २०१०
ज्योत्स्ना कदम यांचं हे आत्मकथन एका वेगळ्याच सहजीवनाची कहाणी सांगणारं आहे. विद्यार्थिनी ते प्रेयसी ते पत्नी या नात्याचा एक अत्यंत थेट आणि सुंदर प्रवास या पुस्तकात अनुभवायला मिळतो. ज्योत्स्ना कदम यांचे पती संभाजी कदम हे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक आणि नंतरच्या काळातले डीन. आणि लेखिका त्यांची विद्यार्थिनी होती. वास्तविक वयात वाजवीपेक्षा जास्त (२५ वर्षे)अंतर असूनही दोन कलाकारांचं हे वैवाहिक जीवन त्यांच्याच शब्दात वाचताना अनेक वेळा थक्क व्हायला होतं. पती-पत्नीच्या नात्यातला एक वेगळ्याच रंगाचा पदर त्यांच्या आत्मकथनातून उलगडत जातो.
या पुस्तकात लेखिकेने अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत. एका वेगळ्या स्तरावरची त्यांची प्रेम कहाणी फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये वाचायला मिळते. त्यांची पहिली भेट, त्यानंतर वाढत जाणारी ओळख, घट्ट होत जाणारं नातं, प्रेमात रुपांतर मग लग्न संसार, मुलं याविषयी त्यांनी विस्ताराने लिहिलेलं आहे पण वाचताना महत्त्वाचं वाटतं ते त्यांचं वेगळं प्रेमातलं पण समंजस आणि वैचारिक नातं.
लेखिकेने स्वतःच्या वैवाहिक जीवनाची कथा सांगत असताना स्वाभाविकपणेच त्यांच्या पतीच्या अनेक सवयी आणि त्यांच्या विचारांबद्दलही जे काही लिहिलं आहे ते अनेक वेळा विचार करायला लावतं. त्या म्हणतात, ”लग्न, विवाह याबद्दलचे ‘कदम’ यांचे विचार अगदी वेगळे होते. त्यांच्या मते विवाह म्हणजे केवळ स्त्री-पुरुषांचं शारीरिक संबंध जोडणं नव्हे तर ते सहजीवन हवं आणि ते मानसिक आध्यात्मिक, ज्ञानात्मक पातळीवर सुसह्य हवं. ही दोन भिन्नलिंगी शरीरं केवळ वंश विस्तारासाठी एकत्र न येता त्यातून जीवन परिपूर्ण व्हायला हवं आणि हे एकरूप जीवन पती-पत्नी याच नात्यापुरतं मर्यादित न राहता त्यात माता, पिता, बहीण, भाऊ, गुरु -शिष्य या नात्यांचं सत्व शोधता यावं. ज्ञ पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर योग्य अयोग्य, बरं वाईट, समाजाचे नीती नियम हे सगळं महत्त्वाचं नव्हतं. मला एकच गोष्ट आतून तीव्रतेने हवी होती ती म्हणजे त्यांचा सहवास. पुढे चांगलं की वाईट होणार हे मला माहीत नव्हतं पण मी जे करते ते माझ्या प्रामाणिक जगण्यासाठी आहे याची मला पूर्ण खात्री होती. वयाच्या पंचविशीतही मी स्वतःच्या अंतः प्रेरणेला पूर्णपणे ओळखून होते. ”
हे सारे किस्से वाचताना जाणवतं ते एक खंबीर, सक्षम, सामाजिक विरोधाला टक्कर देणारं कणखर तरीही हळवं, संवेदनशील आणि स्वतः विषयी अपरंपार विश्वास असणार एक सुंदर स्त्री व्यक्तिमत्व!
घरच्यांच्या विरोधात झालेल्या, आणि परंपराबाह्य लग्नाबद्दल लिहिताना त्या म्हणतात, ” पारंपरिक लग्नातले कोणतेच विधी आम्ही केले नाहीत पण कदमांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. ते घालताना मला म्हणाले, ” हे मंगळसूत्र केवळ आपण लग्न केलं म्हणूनच घालायचं नाही तर ते एक मंगल प्रतीक म्हणून घालायचं. हे जीवनाचे मंगळसूत्र आहे. मी तुला ते आज अर्पण करतो आहे. माझ्याबरोबर तू तुझं सगळं जीवन मंगलकारक बनवायचं आहे. उद्या केव्हाही मी असेन, नसेन तरी तू ते तुझ्याजवळच ठेवायचं आहेस. अगदी गळ्याच्या शपथे सारखं. मी एक व्यक्ती.. तुझा पती म्हणून निमित्त मात्र आहे. आज तुझं लग्न झालं आहे ते ज्ञानाशी, चैतन्य तत्त्वाशी, जे सतत तुझ्याबरोबर राहणार आहे. ही सौभाग्य चिन्हं तू आयुष्यभर जपून ठेव. ”
कारण या लेखनामध्ये सौभाग्य लेण्याविषयीचा जो अर्थ सांगितला होता तो माझ्या मनाला भिडला, पटला आणि त्या सुंदर विचारांच्या प्रवाहात मी अक्षरशः तरंगत राहिले.
अशीच एक अतिशय सुंदर आठवण वाचताना मन हेलावून जातं त्या लिहितात,
“वसंत पंचमीचा दिवस होता. कदम म्हणाले आज मला तुझे स्वागत करायचे आहे. त्यांनी मला पूर्वेकडे तोंड करून बसावयास सांगितले. एका टबामध्ये माझे पाय ठेवून ते स्वतःच्या हाताने पाणी घालून धुतले, पुसले आणि नंतर माझ्या पायावर त्यांनी फुलं वाहिली, कुंकू वाहिले आणि मला त्यांनी नमस्कार केला. “तुझ्यातल्या स्त्रीत्वाची मी आज पूजा केली. तू वयाने जरी लहान असलीस तरी गुणांनी, मानाने मोठी आहेस असं मला वाटतं. ” – – एखाद्या पतीने आपल्या पत्नीच्या गुणांची आणि तिच्यातल्या स्त्रीत्वाची अशा रीतीने कदर करावी, मान ठेवावा आणि तो व्यक्त करावा हे विलक्षण नाही का? वास्तविक दोघेही हाडाचे चित्रकार. कलाकार हे किती मनस्वी असतात आणि जीवनाविषयीची त्यांची दृष्टी, विचार हे किती वेगळे असतात हे या आत्मकथनातून लक्षात येतं.
एके ठिकाणी त्यांनी संभाजी कदम यांच्या चित्रकारितेविषयी लिहिलेलं आहे आणि ते अत्यंत वाचनीय आहे. त्या म्हणतात, ” गर्भवती स्त्रीचं पोर्ट्रेट करायची कदम यांची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती. मला जेव्हा सातवा महिना सुरू झाला तेव्हा कदमांनी मला अशा प्रकारच्या चित्राची कल्पना दिली. पोर्ट्रेट करायच्या दिवशी मला लग्नातली पांढरी सिल्कची साडी नेसायला सांगितली आणि गॅलरी जवळच्या दरवाज्यात उभं रहायला सांगितलं. बाहेरून फार छान प्रकाश येत होता. एखाद्या देवीच्या मूर्तीला सुंदर देव्हार्यात स्थानापन्न करावं असं त्यांनी मला त्यादिवशी त्या ठिकाणी उभं केलं. मी पण अगदी डौदारपणे तिथे उभी राहिले. त्यावेळी क्षणभर मलाही आपण देवी असल्याचाच भास होऊ लागला. कदम आपल्या कामात पूर्णपणे मग्न झाले होते. वास्तविक जड पोट, सतत उभे राहिल्यामुळे पायावर आलेली सूज हे असह्य होत होतं. तरी पण मला हे सगळं सहनही करावसं वाटलं कारण प्रत्येक रंगाचा पॅच, रेषेची लय आणि आकाराचा डौल माझं कोड कौतुक पुरवीत होता. माझं दिसणं आणि असणं दोन्ही त्या क्षणी साजरं होत होतं. या चित्राने माझ्यातला कलावंत आनंदी झाला होता आणि तो आनंद आतल्या गर्भालाही मिळत होता. तिसऱ्या दिवशी पोर्ट्रेट पूर्ण झालं. त्यानिमित्ताने एका गर्भवती स्त्रीचं फुलणं, आकारणं कलावंतांच्या नजरेतून अतिशय प्रभावीपणे साकार झालं होतं. पावित्र्य, शुभ्रता, खूप काही भरभरून सांगणारे डोळे, उदराचा गोंडस आकार, प्रसन्न प्रगल्भ वाटत होता. नव्या अंकुराला जन्म देणारी एक वैश्विक माऊली तिथे साकार झाली होती.
असे कितीतरी प्रसंग या पुस्तकात वाचताना मनाची एक वेगळीच अवस्था अनुभवायला मिळते वास्तविक लेखिकेच्या या आत्मकथनात केंद्रस्थानी आहेत ते त्यांचे पती संभाजी कदम. त्यांच्याविषयीची त्यांनी केलेली वर्णने वाचून आणि त्यातला प्रांजलपणा जाणून
एका वेगळ्याच विचारधारेचा वाचक साक्षी होतो. वास्तविक दोघेही उत्तम चित्रकार आणि एकमेकांसाठी मॉडेल्सही होती. कदमांचे मॉडेल करतानाचाही एक सुंदर अनुभव लेखिकेने सांगितला आहे. “कदम दिसायला रुबाबदार नव्हते उलट अगदी सर्वसामान्य होते पण त्यांचं पोर्ट्रेट करताना डोळे, नाक, ओठ, कान, चेहऱ्याची ठेवण या पलीकडे जाणवत होतं ते त्यांचं अंतरीचं दिसणं या अंतरंगात चेहरा नव्हता. तिथे एक परिपूर्ण संपन्न व्यक्तीमत्व होतं ते मला शोधायचं होतं. त्या व्यक्तिमत्वला संवेदनशील पंचेद्रिये होती ती जगण्याचे सगळे सोहळे संपन्न करीत होती. भोगापेक्षा योगाला जवळ करीत होती. ती आतली लय मला जाणून घ्यायची होती.
पती-पत्नीच्या नात्यांबरोबरच त्यांचं मूळ नातं जे होतं ते मात्र गुरु शिष्याचं होत. त्याही नात्याबद्दल त्यांनी जाणीवपूर्वक लिहिलं आहे.
या पुस्तकात लेखिकेने त्यांच्या कामजीवनावरची थेट वर्णनही केलेली आहेत. थेट आणि प्रामाणिकपणे. पण वाचताना ते अजिबात अश्लील, असंस्कृत वाटत नाहीत. कदमांनी काढलेल्या लेखिकेच्या न्यूड्सवरही त्यांनी भरभरून लिहिले आहे. ते वाचताना एक वेगळ्याच अनुभवाच्या पातळीवर वाचक जातो.
हे पुस्तक वाचताना असं पार पलीकडे गेलेलं स्त्री-पुरुषांचं वेगळं, कलात्मक, काव्यमय नातं शब्दरूपात ठायी ठायी व्यक्त होतं.
५००/६०० पृष्ठे असलेल्या या ज्योत्स्ना कदम यांच्या आत्मकथनात अनेक आठवणी त्यांनी मनमोकळेपणाने सांगितलेल्या आहेत. विद्यार्थी दशेतल्या, प्रेमप्रकरणाच्या, कुटुंबाच्या, सर्वसाधारणपणे आयुष्यात येणार्या समस्यांच्या, मुलांच्या संगोपनाविषयीच्या, आर्थिक चढउताराच्या अनेक भल्याबुर्या आठवणी त्यांनी प्रभावीपणे शब्दरूप केल्या आहेत.
त्यांच्या सहजीवनाचा शेवटही वाचताना मन खरोखर भरून येतं. त्या लिहितात, “कदमांची शेवटची गाठभेट, त्यांनी कडकडून मारलेली मिठी आठवली. त्या शेवटच्या आलिंगनात त्यांनी त्यांच्या जवळची सगळी शक्ती मला देऊन टाकली होती. त्यामुळेच की काय मी हळूहळू शांत होत गेले. माझी अगतिकता निवळत गेली. माझ्या मनानं आता हे सत्य स्वीकारलं होतं. यमानं माझ्या सत्यवानाचं शरीर ओरबाडून नेलं होतं पण त्यांचा आत्मा माझ्या प्रेमाने, माझ्या भक्तिभावाने सांभाळून ठेवला. आमचं संपलेलं अलौकिक सहजीवन अश्रू पुसत मी मान्य केलं पण त्यांच्या आत्म्याला मात्र कुठेही जाऊ न देता परत एकदा अगदी कायमचं आपलंसं करून घेतलं. ”
खूप काही आहे या पुस्तकात. ही नुसतीच प्रेम कहाणी नाही तर दोन कलावंतांनी एकमेकांच्या सोबतीनं जगलेली आयुष्यं आहेत. या कलाप्रेमी माणसांनी आयुष्यातल्याही रंग, रेषा, लय डोळसपणे जपून एक स्त्री पुरुषाचं नातं सामान्य पातळीवरून एका आध्यात्मिक पातळीवर नेलेलं आहे. त्यामुळे एक आत्मिक आणि सकारात्मक अनुभव हे आत्मकथन वाचताना नक्कीच मिळतो.
या पुस्तकात त्यांची सुंदर पेंटिंग्ज पाहायला मिळतात. त्या दृष्टीनेही हे पुस्तक मौलिक आणि देखणं आहे.
हे पुस्तक नक्कीच bold आहे. त्या काळात या पुस्तकावर भरपूर टीकाही झाली. पण म्हणून हे पुस्तक अपयशी ठरत नाही. कलाकाराच्या नजरेने आणि कलाकाराच्या विचारांशी समरस होऊन जर हे पुस्तक वाचले गेले तर वाचनाचा स्वर्गीय आनंद या पुस्तकांमुळे मिळतो हे नक्कीच.
परिचय – सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







राधिका ताई खूप छान आत्मचरित्राचा उत्कंठावर्धक परिचय करून दिला तुम्ही!
धन्यवाद ज्योतीताई