श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

“द्रष्टा” – लेखिका : सुश्री वीणा गवाणकर – परिचय : श्री श्रीकांत उमरीकर ☆ प्रस्तुती –  श्री हर्षल सुरेश भानुशाली

पुस्तकावर बोलू काही : “ द्रष्टा “

लेखिका: वीणा गवाणकर

पृष्ठे : २१०

मुल्य : ५००₹

साध्या प्रवाही भाषेत वीणाताईंनी हे पुस्तक वाचकांसमोर आणले आहे. केवळ थोरोच नव्हे तर तो अमेरीकेतला सगळा प्रदेश त्या काळानुसार शब्दांतुन जिवंत केला आहे. साध्या साध्या घटनांतून थोरोची घडण उलगडून दाखवली आहे.

थोरोची आई… ‘ सिंथिया निसर्गप्रेमी होती. ती आपल्या मुलांना घेऊन नेहमी निसर्गसहली काढी. वॉल्डन सरोवराकाठी तीन दगडांची चूल मांडून त्यावर एखादा पदार्थ शिजवून खाऊ घाली. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही ती मुलांच्या खाण्याबाबत दक्ष असे. ‘

हेन्रीच्या बालपणीच्या आठवणीत तो गायी चरायला अनवाणी गेल्याची नोंद आहे. तसंच, डोळे फुटलेला एक बटाटा त्याला मिळाला. आपल्या मोठ्या भावंडांच्या मदतीनं हेन्रीनं खड्डे तयार करून ते डोळे लावले. थंडीत तिथं खणलं तेंव्हा भरपूर बटाटे मिळाले… (पृ. १५)अशी नोंद लहानपणीची आहे.

थोरोच्या विचारांवर प्रभाव पाडणारं पहिलं पुस्तक म्हणजे राल्फ वाल्डो इमर्सन यांचं ‘नेचर’. या पुस्तकाने थोरोच्या विचारांना दिशा मिळाली. मानवजात आणि निसर्ग यांच्यात सुसंवादी ऐक्य हवं. हा विचार थोरोला पटला. पुढे त्याची इमर्सन यांच्याशी ओळख तर झालीच शिवाय दाट मैत्रही जुळलं.

हॉवर्ड सारख्या प्रतिष्ठीत विद्यापिठांत थोरो शिकला. पण त्याचे विचार मात्र साचेबद्ध न राहता विस्तारत गेले आणि तो स्वतंत्रतावादी विचारांचा बनला. रेव्ह. ब्राऊन्सन यांच्या एका व्याख्यानानं त्याच्यावर इमर्सन सारखाच प्रभाव पाडला. ‘सरकारने पुढारीपणा घेऊ नये. अनुसरावं. लोकांना मोकळीक द्यावी. लोकांनी सरकार चालवावं अशी मोकळीक हवी. मुक्त लोकांशिवाय मुक्त सरकार सामर्थ्यहीन आहे. (पृष्ठ २०)

थोरोनं शाळेत शिक्षकाचं काम करून पाहिलं. पण त्याला कोंडवाड्यासारखी साचेबद्ध मुलांना शिक्षा करणारी ही व्यवस्था मुळीच आवडली नाही..

आपल्या मोठ्या भावासोबत थोरोनं स्वतःच १८३८ मध्ये शाळा सुरू केली. तीन वर्ष हा उपक्रम चालला. या शाळेत आठवड्यांतुन एकदा मुलांना निसर्ग सहलीवर नेलं जाई. नदीत होडीतून जलविहाराची मौज मुलांना अनुभवायला मिळे. आपलं ज्ञान दाखवुन मुलांना दिपवण्यापेक्षा मुलांना त्यात रस कसा निर्माण होईल याची तळमळ थोरोला होती. मुलांना छापखान्यात नेऊन खिळे कसे जुळवतात हे दाखवले जाई. मुलांना जमिनीचा तुकडा देऊन आपले आवडीचे झाड लावायला सांगितले जाई. (पृ. ४२)

१८४४ मध्ये इमर्सन यांनी वॉल्डन सरोवराकाठची जमीन विकत घेतली. याच जमिनीवर अडीच एकराचा तुकडा त्यांनी थोरोला दिला. याच जागेवर थोरोने त्याची ती ऐतिहासीक कुटी उभारली. काटेरी झाडंझुडूपं साफ केली. रेल्वे कामगारांच्या एका पडीक झोपडीचे सामान सव्वाचार डॉलर्सला विकत घेतले. आणि स्वहस्ते आपलं छोटं घर कुटी आश्रम झोपडी घरटं जे काय म्हणायचं ते म्हणा त्याची उभारणी केली. कुटीच्या दाराला कुलूप नव्हते. खिडक्यांना पडदे नव्हते. ४ जुलै १८४५ रोजी थोरो वॉल्डन सरोवराकाठी या कुटीत रहायला आले.

थोरोचे खाणेही साधेच होते. दगडाची चुल मांडून ते त्यावर अन्न शिजवत. चवळीसारखं कडधान्य, पाण्यात पीठ भिजवून तापलेल्या दगडावर भाजुन घेत, याच दगडावर मासेही भाजत. रोटीच्या पीठात मनुका वापरून पाहिल्या आणि त्यातुनच ‘रेझिन ब्रेड’ चा जन्म झाला. (पृ. ८८)

अशी फार सुंदर वर्णनं पुस्तकात जागजागी आलेली आहेत. वीणाताईंना स्वतःला असलेली निसर्गाची विलक्षण ओढ त्यांच्या शब्दांतुन जिवंतपणे आपल्यापर्यंत थोरोच्या चरित्राच्या रूपाने पोचते हे मला फार महत्वाचे वाटले.

थोरोचे पुढचे आयुष्य अनेक रोमहर्षक घटनांनी भरले आहे. कर न भरल्याने तुरूंगात जाणं असो, स्त्रीयांच्या गुलामांच्या हक्कासाठी लढणं असो की त्याचे गाजलेले पुस्तक वॉल्डनचे लिखाण त्याचे प्रकाशन व प्रसिद्धी असो. या नंतरच्या काळात त्याचा भरपुर प्रवास झाला भरपुर दगदग झाली. जवळच्या लोकांच्या मृत्युने त्यांना अजुनच अंतर्मुख बनवलं. थोरोंच्या विचाराची दिशा बदलून टाकली.

मोठा भाऊ जॉन (ज्यु,) याच्या मृत्युनंतर त्यानं आपल्या रोजनिशीत लिहिलं होतं… ‘… मृत्यूकडे अपघात म्हणुन नव्हे तर सृष्टीनियम म्हणुन आपण पाहिलं तर तो सुंदरच होतो. इतक्या शांत आणि जिवंत निसर्गातलं, सृष्ट भावातलं, अखेर काय म्हणुन मागं उरलं आहे, असं आपल्याला म्हणता येतं… सालोसाल पिकं मरून पडतात म्हणुन का भूमीनं आपली धीर वृत्ती सोडली आहे? वनस्पतीसृष्टी आनंदानं फुलायला आणि सुकायला नि नव्याला वाट करून द्यायला सिद्ध असते. मानवी वनस्पतीचंही तसंच आहे..,’ (पृ. ६०)

६ मे १८६२ ला थोरोनं शेवटचा श्वास घेतला. मानवाला वनस्पतीची उपमा देणारा हेन्री डेव्हीड थोरो शांतपणे मृत्युच्या स्वाधीन झाला.

थोरोचे व्यक्तीमत्व अफाट असे आहे. त्याला मोजक्या २०२ पानांमध्ये बसविण्याचे ‘थोरोचे स्वतंत्रतावादी धनुष्य’ वीणाताईंने उत्तम तर पेललेच पण प्रत्यंचा चढवून त्या विचारांचा बाण बरोबर आपल्या मेंदूचा वेध घेणारा असा सोडला आहे. वाचकांना तो अस्वस्थ करत नेमका परिणाम साधल्याशिवाय रहात नाही.

मी मला भावलेल्या थोरोच्या निसर्गविषयक पैलूचा हा परिचय करून दिला. हे पुस्तक तर वाचाच पण थोरोवर आलेली मराठीतली इतर पुस्तके पण जरूर वाचा.

पुस्तक परिचय :  श्रीकांत उमरीकर 

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments