सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “तिच्या कथा (लघुकथा संग्रह)” – लेखिका : मानसी म्हसकर ☆ परिचय – राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक :  तिच्या कथा (लघुकथा संग्रह)

लेखिका : मानसी म्हसकर

प्रकाशक : अक्षर शिल्प प्रकाशन.

प्रथम आवृत्ती : ५ एप्रिल २०२६

नुकताच अक्षरशिल्प प्रकाशनातर्फे (शेगाव) प्रकाशित झालेला “तिच्या कथा” हा नवोदित लेखिका सौ. मानसी म्हसकर, वडोदरा यांचा लघुसंग्रह वाचनात आल्या. लेखिका मराठी असल्या तरी गुजराथ स्थित आणि गुजराथी भाषेचा पगडा असूनही त्यांनी मायबोलीत आत्मीयतेने केलेलं सुंदर मराठी लेखन वाचून मी खरोखरच प्रभावित झाले.

या कथासंग्रहात दहा कथा आहेत. आणि पुस्तकाच्या शीर्षकानुसार त्या सर्व कथा “तिच्या कथा” आहेत. स्त्रीवादी कथा आहेत. विषयात आणि कथा उलगडण्याच्या पद्धतीत मात्र वैविध्य आहे. एकदा पुस्तक वाचायला घेतले की ते संपूर्ण वाचल्याशिवाय ठेवावेसेच वाटत नाही हा या पुस्तकाचा पहिला यशाचा टप्पा.

द्वंद्व ही या संग्रहातील पहिलीच कथा.

एक वेगळाच विषय.

एक मुलगा, आपण “गे” असल्याचा आणि एका मुलाच्या प्रेमात असल्याचा आणि त्याच्याशी लग्न करण्याचा त्याने घेतलेला धक्कादायक निर्णय त्याच्या आईला प्रांजळपणे सांगतो आणि तिथूनच आईच्या मनातलं द्वंद्व सुरू होतं. मातृत्व की समाज, निसर्ग की समाजाचे नियम या विचारात अडकतं. आईच्या मनातला हा विदारक, भावनिक आणि निर्णयात्मक प्रवास अत्यंत प्रभावीपणे लेखिकेने वर्णिला आहे.

माणुसकी

ही एक भयकथा आहे म्हणायला हरकत नाही. कथेतला नायक एका भयाण काळोखी रात्री सायकलवरून घरी चाललेला असतो. घरी त्याची मुलगी आजारी असते. तिच्याच विचारात चालला असताना एक गूढ घटना घडते आणि आपण एका भूताला घेऊन सायकल वरून प्रवास करत आहोत याची जेव्हा त्याला जाणीव होते त्यानंतर कथेला एक वेगळं वळण मिळत जातं. मनाला खिळवून ठेवणारी ही कथा आहे.

घटना

ही कथा खरोखरच तशी रहस्यमयच आहे. अविश्वासनीय घटना यात घडलेल्या आहेत. शेवट नकारात्मक आहे. घटनाक्रम, त्याविषयीचे वर्णन वगैरे पद्धतशीर असले तरी एकंदर ही कथा मनाची पकड घेत नाही.

याचसाठी केला होता अट्टाहास

कथा खूप सुंदर. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी नवसासायासाने झालेल्या मुलाला वाढवताना केलेले अवास्तव लाड, त्याच्या चुकांवर घातलेली पांघरूणं आणि परिणामी “आपण काहीही केले तरी आपली आई आपले संरक्षण करेलच” या घमेंडखोर मानसिकतेमुळे मुलात बळावलेली गुन्हेगारी वृत्ती आणि त्यातूनच त्याच्याकडून एका कोवळ्या मुलीवर झालेला अत्याचार अखेर आईच्या डोळ्यावर बांधलेली प्रेमाची पट्टी सोडवण्यास कारणीभूत ठरते. आणि त्याच क्षणी आपल्या मुलाला माणूस म्हणून घडवण्यात आपल्यातली आई कमी पडली याची जाणीव तिला होते. समाजात घडणाऱ्या नीच घटनेवर या कथेत, लेखिकेने अतिशय प्रभावी भाष्य केले आहे. आई-पणाच्या हळवेपणातून बाहेर येऊन घेतलेला तिचा निर्णय म्हणजे या कथेतून दिलेला एक सुंदर संदेश ठरतो.

अर्जुनाचे झाड

ही कथा सुद्धा खूप छान आहे. छान लिहिली गेली आहे. आजी- नातीतल्या, झाडांची माहिती देण्यानिमित्त सुरू झालेल्या संवादापासून ते थेट “आजीचा बटवा” या आयुर्वेदिक औषध उद्योगापर्यंत पोहोचलेल्या विद्या नावाच्या एका महिलेची ही यशस्वी कहाणी आहे, लेखिकेने ही कहाणी अतिशय सुंदर रंगवली आहे. आजी नात आणि अर्जुनाच्या झाडावरचे फूल यांच्या मधल्या भावनिक नात्यांची सुरेख गुंफण लेखिकेने या कथेत केली आहे आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधांचे महात्म्यही मांडलं आहे.

परतफेड

परतफेड ही कथा दीर्घ आहे. ५ भागात लिहिलेली आहे. विवाहबाह्य संबंधावर असलेली कथा असूनही यात कुठेही अश्लीलपणा नाही. लेखिकेने एका ठराविक संस्कृतीच्या चौकटीत नायिकेच्या मनाचे विश्लेषण सुंदर पद्धतीने केले असल्यामुळे न पटणाऱ्या बाबीही वाचकाला स्वीकारणे भाग पडते, “असंही असू शकतं, होउ शकतं असा विचार मनात येतो. एकंदर विषयानुसार कथानकाची मांडणी सुरेख झालेली आहे.

कादंबरी

अतिशय सुंदर कथा. एका स्त्रीच्या संघर्षाची, जिद्दीची, सकारात्मक आणि सुखांत कथा.

आवडलेलं वाक्य— वास्तुशांती फक्त घराची नसते मनाची ही करावी लागते

स्वीकार

छानच कथा. सासू- सुनेच्या सुरुवातीच्या दुराव्याची आणि नंतर वात्सल्यात रूपांतर झालेल्या सुंदर नात्यांची गुंफण या कथेत वाचायला मिळते. गैरसमजुतीमुळे नात्यात कसा दुरावा निर्माण होऊ शकतो हे लेखिकेने सुरेख पद्धतीने मांडलेले आहे. त्याच नात्यात गोडवा निर्माण होतानाचं लेखन अगदी स्वाभाविकपणे आणि भावूक शैलीत त्यांनी केलेलं आहे. या कथेत मांडलेली सासु-डे आणि सून-डे ही कल्पनाही आवडली.

बस क्रमांक १०८

आई-वडील बहिणींची जबाबदारी स्वीकारत लग्न करायचं राहून गेलेल्या एका स्त्रीची ही कहाणी आहे. रोज बस क्रमांक १०८ मधून लोकल प्रवास करताना भेटणारी माणसं टिपण्याचा, त्यांच्या अंतरंगात शिरून अथवा त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून, तिच्या हातून चक्क कथा निर्मिती होते. तिच्या कथा सर्वत्र वाचल्या जातात. तिच्या कथांना पुरस्कारही मिळतात आणि या माध्यमातून तिला आनंदी जीवन जगण्याचा एक मंत्र मिळतो. लहानसं साधंच कथानक पण त्यातली वास्तवता लेखिकेने रंजकतेने मांडली आहे. कथा नक्कीच वाचनीय आहे.

१० रिकामी घागर

ही कथा वाचताना मन खरोखरच विदीर्ण होतं. त्याचबरोबर या कथेतून, स्त्रिया एकत्र आल्या तर काय चमत्कार घडवू शकतात असा महत्वपूर्ण संदेशही लेखिकेने दिला आहे.

एक गाव, गावाभोवती वाहणारी नदी आणि पाणवठ्यावर जमणाऱ्या, आपापली दुःखे मनात घेऊन पाणी भरण्याच्या निमित्ताने नदीकाठी जमून मनाला हलकं करू पाहणाऱ्या गावातल्या महिला. त्यांच्यातलीच एक विधवा कुंदा नावाची महिला. एक दिवस एका नराधमांकडून तिच्यावर अतिप्रसंग होतो त्यातूनच तिला दिवस राहतात आणि त्यानंतरचा कुंदावहिनीचा संघर्ष, निर्णय आणि त्या निर्णयास एकजुटीने साथ देणाऱ्या तिच्या सख्या.. रिकामी घागर नावाचे आंदोलन उभारून गाव पंचायतीचा निर्णय कसा बदलायला लावतात याची काळीज फाडणारी ही कथा आहे.

रिकामी घागर हे स्त्रीच्या मातृत्वासाठी वापरलेलं रूपकात्मक शीर्षकही खूप बोलकं आहे.

एकंदर हा दहा कथांचा सुंदर संग्रह.

मा. मानसी म्हसकर यांनी विविध विषयांच्या माध्यमातून स्त्रीच्या व्यथा मांडत त्यावर उपायही सुचवत वाचकांना विचार करायला लावले आहे.

लेखिकेची साधी, सरळ, ओघवती भाषाशैली, वर्णनात्मक लेखन पद्धती, मनोविश्लेषणात्मक लेखन क्षमता, कथानकाची सुयोग्य मांडणी हे प्रत्येक कथेचं वैशिष्ट्य ठरतं. त्यातून त्यांची संवेदनशीलता आणि वैचारिकता जाणवते.

पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच या तिच्या कथा आहेत पण यातली ती कणखर आहे, जिद्दी आहे, चिकाटीची आहे कोसळणारी नाही आणि खरोखरच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साकारलेल्या झाडासारखीच वादळ वाऱ्याशी, ऊन पावसाशी झगडत, तिच्याच मातीत पाय घट्ट रोवून उभी आहे. निर्णयक्षम आहे. हे सुंदर मुखपृष्ठ लेखिकेचे चिरंजीव शालीन म्हसकर यांच्या कल्पनेतून साकारलं आहे.

मा. प्रसाद देशपांडे यांनी या संग्रहाला सुंदर प्रस्तावना दिली आहे. त्यांच्या मतानुसार खरोखरच स्त्रीच्या भावनांचे, नात्यांचे, आणि निर्णयांचे अनेक स्तर या कथांतून उलगडले जातात.

मानसीताई, मनोगतात तुम्ही म्हटलंय, ”स्त्रीमनातील भावविश्व आणि तिच्या निर्णय क्षमतेचा प्रवास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. ”

मानसीताई! तुमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरला आहे.

मलपृष्ठावर शालीनने व्यक्त केलेले आई विषयीचे अभिमानाचे उद्गारही मनाला भिडतात.

अभिनंदन मानसी! आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
4 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments