श्री सुनील देशपांडे

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “समिधा” – (आत्मकथन) – लेखिका : साधनाताई आमटे – परिचय : रंजना देशपांडे ☆ शब्दांकन व प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

(५ मे हा आदरणीय कै. साधनाताई आमटे यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने समिधा या त्यांच्या आत्मकथनाबद्दल) 

पुस्तक : समिधा (आत्मकथन) 

लेखिका : कै. साधनाताई आमटे

प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन

पृष्ठसंख्या : १८५ 

सत्य हे अद्भुत असूनही अतर्क्य, कल्पनेहूनही रंजक व वास्तवाच्या घटनांमधून तावून सुलाखून निघाल्यानंतर ते साधे, सरळ, प्रांजळ, नर्मविनोदी, पारदर्शक आत्मकथन इतके सुंदर असू शकते की ते वाचकाला खिळवून ठेवते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साधनाताई आमटे यांचे “समिधा” हे आत्मकथनपर पुस्तक.

हे पुस्तक फक्त १८५ पानांचे आहे. परंतु या पानांमध्ये भरलेला अनुभव साऱ्या विश्वाला व्यापून राहण्या एवढा प्रचंड आहे याची जाणीव पुस्तक वाचल्यानंतर येते. पुस्तकाचे सामर्थ्य जसे त्या आत्मकथनामागील प्रांजळ व अद्भुत अनुभवांचे आहे, तसेच ते अद्भुत उत्तम रीतीने शब्दबद्ध करणाऱ्या श्री सीताराम प्रभू यांचेही आहे. पारंपरिक अर्थाने ही आत्मकथा नव्हे आणि आत्मचरित्रही नव्हे. हे आहे जीवनानुभवांच्या आठवणींचे संकलन.

या जीवनयात्रेची सुरुवात होते तीच मुळी नागपुरातील घुले शास्त्री पासून. शिवकालीन गंगाधर भट्टांचे वंशज घराणे, सनातनी धार्मिक जुन्या परंपरांना चिटकून असलेले. साधनाताई दहा वर्षाच्या असताना वडील वारले आणि सर्वात धाकट्या दोन महिन्याच्या बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी साधनाताईंवर पडली. त्या वयापासून त्यांच्या मातृत्वाच्या भूमिकेचा विकास झाला आणि पुढील आयुष्यात हजारो कार्यकर्त्यांची माता म्हणून जीवनातील एका गावी कार्याचा पाया रचला गेला.

त्यांच्या बालपणीच्या जीवनाकडे पाहिल्यास त्यांच्या स्वभावातील भावुकता, वैचारिकता व कर्तव्य कठोरता यांचा उगम त्याच्यावरील संस्कारातून झाला हे निश्चित.

बाबा आमटे यांचे त्यांच्या घरचे आगमन आणि नंतर त्यांच्या भावविश्वात व त्यांच्या जीवनातील प्रवेश हा सारा अनुभव योगायोगाचा व अतर्क्य असा आहे.

कोणी एक संन्यस्त वेषधारी ब्रह्मचारी त्यांचे घरी येतो काय! त्यांच्या इंदूला पाहिल्यावर त्याची ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा विरघळून पडते काय! अन ते या मुलीला मागणी घालतात काय! सारेच अतर्क्यआहे. खरे तर या संन्यासी सुखवस्तु घराण्यातील त्या काळी सुद्धा घरदार, शेतीवाडी, बंगला, मोटार व इतर सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना, वकिलीचे शिक्षण झालेले, चांगली मानाची नोकरी असताना सुद्धा या मुलाने हा मार्ग का पत्करला असेल याची या मुलीला काही कल्पना नसते. परंतु तो काही देशकार्य करतो आहे एवढीच जुजबी माहिती या इंदूला होती.

लग्न ठरल्यानंतर बाबांशी झालेला पत्रव्यवहार व इतर घटना प्रत्यक्ष वाचणे हा एक अनोखा अनुभव ठरावा.

चोरांशी झालेल्या झटापटीत अंगावर झालेल्या सुऱ्यांच्या जखमांमुळे ठिकठिकाणी बँडेज बांधलेला नवरदेव बोहल्यावर पाहण्याचा प्रसंग कल्पनेपेक्षाही विलक्षण ठरावा. तरीही संपूर्ण नास्तिक व स्वतःच्या कार्यावर अमाप श्रद्धा, कार्य सामर्थ्यावरील निस्सिम विश्वास असलेला पती व परमेश्वरावर असीम श्रद्धा असणारी पत्नी यांच्या संसाराचा प्रवास जाणून घेणे खूपच उद्बोधक आहे यात शंका नाही.

पेशाने वकील असलेले बाबा आमटे समाजसेवेचे व्रत अंगीकारून म्युन्सिपालिटीचे अध्यक्ष, अनेक मान्यवर संस्थांचे पदाधिकारी असताना स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हरिजन आदिवासी लोकांना त्यांच्या माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलनकर्ते झाले.

त्या काळात श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कल्पनेतील ‘श्रमाश्रम’ नावाचा समाजकार्याचा प्रयोग, प्रकृती अस्वास्थ्य व आर्थिक तंगीमुळे मध्यावर सोडून देणे भाग पडले. अशा बिकट परिस्थितीत त्यांचा पहिला मुलगा प्रकाशचा जन्म झाला.

परंतु त्या नंतरच्या एक दोन वर्षातील आर्थिक तंगी व प्रकृती अस्वस्थ असूनही या काळात सुद्धा एका नव्या समाजसेवेच्या प्रकल्पाचा विचार या दांपत्याने कसा केला असेल हे समजणे तर्कशास्त्राच्या पलीकडेच आहे.

एका विलक्षण योगायोगाने घडलेल्या लहानशा प्रसंगाने या दांपत्याचे सर्व जीवनच पालटून टाकले आणि महारोगी सेवा समिती या महान प्रकल्पाचा जन्म झाला.

स्वतःच्या जगण्याची भ्रांत असलेल्या, स्वतःची प्रकृती वरचेवर त्रास देत असताना एक ते दीड वर्षाचा मुलगा, त्याचा सर्व सांभाळ आईच्या ममतेने करीत महारोग्यांच्या सेवेचे कार्य आरंभणारा हा महापुरुष आणि साधनाताईंच्या स्वतःच्या आजारपणामुळे पतीची होणारी ओढाताण. असहाय्यपणे पहात क्षयरोगाशी झुंज देणारी पत्नी हा अनोखा संसार कोणाच्याही कल्पनेत सुद्धा बसणारा नाही.

अशाही परिस्थितीत रोगाशी यशस्वीपणे लढा देऊन, सद्य आनंदवन म्हणून ज्ञात असलेल्या शहरी वस्तीपासून दूर अशा एका झुडपी जंगलात मिळालेल्या एका ओसाड जमिनीवर हे पती-पत्नी, लहान मुलगा व सहा महारोग्यांसह येतात. प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, तल्लख बुद्धिमत्ता व प्रभावी शब्द एवढ्याच सामर्थ्यावर आनंदवन नावाचे नंदनवन फुलवितात. हा इतिहास वाचताना डोळ्यातून झरणारे अश्रू वाचकाला आवरता येत नाहीत.

या सर्व कार्यामध्ये कार्यकर्त्यांची मानसिकता व पतीचा संतापीपणा जपत, मुलांवर सुसंस्कार करत, सर्व टप्प्यांवर सक्रियपणे सहभागी होत आपल्या पतीच्या कार्ययज्ञात स्वतःची आहुती देणारी ही समिधा, आपल्या मनातील एक कोपरा केव्हा काबीज करते हे समजत सुद्धा नाही.

आनंदवनाची उभारणी व विकास होत असतानाच साधनाताईंची प्रकाश व विकास ही मुले मोठी होत होती. स्वतःच्या मुलांना शहरी शाळेत न घालता कामगार व मजुरांची मुले ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत याही मुलांचे शिक्षण करण्याच्या विचारांमध्ये त्यांच्या स्वतःच्या संस्कारांवरील विश्वासाचे दर्शन होते. निर्भयता, आत्मविश्वास व इतरांवर संस्कार करण्याची क्षमता या त्रिसूत्रीतून बाबांनी कार्यकर्त्यांची आनंदवनातील मानसिकता घडविली. परंतु स्नेह, समानता, प्रेम, सहिष्णुता इत्यादी कोमल भावांमधून एक अतूट भावबंध निर्माण करून कार्यकर्त्यांच्या मनात शाश्वत नात्याची गुंफण करून साधनाताईंनी बाबांच्या कार्याला एक वेगळेच परिमाण बहाल केले. हे वेगळे परिमाण घेऊन आजही आनंदवन एका अनोख्या भावविश्वासाचे प्रतीक बनले आहे.

महारोग्यांना सामान्य माणसाचे जीवन बहाल करताना नुसते जगणे मिळवून देण्याबरोबरच भावविश्व ही फुलविण्याचे काम बाबांचा विरोध असतानाही तो मोडून काढून साधनाताईंनी केले. स्वतःच्या मतांबद्दल आग्रही राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी प्रसंगी पतीच्या मताविरोधात भूमिका घेऊन ती भूमिका निभावण्याचं त्यांचं धैर्य लोकविलक्षणच.

सहा कुष्ठरोग्यांसह एका ओसाड जमिनीवर, समाजसेवेच्या माध्यमातून कुष्ठरुग्ण सेवेची वसाहत उभी करून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सुविधा उभ्या करण्यापर्यंतचा टप्पा ओलांडल्यानंतर त्यांना नवीन साहसाचे धुमारे फुटले नसतील तरच नवल आणि बाबांच्या वाणीने एक नवा एल्गार उच्चारला. “निर्मितीचं एक नातं जमिनीशी आहे. कारण तीच आहे जन्मदात्री साऱ्या भविष्याची”.

अशा नव्या भविष्याच्या स्वप्नांसाठीही तरुण कार्यकर्त्यांना आवाहन केले गेले. साधनाताई म्हणतात, “आपल्या बुद्धीचा कस श्रमाच्या माध्यमातून जो पडताळून पाहतो तोच कार्यकर्ता. तो बुद्धिजीवीही असावा आणि श्रमजीवीही तर असावाच असावा. ” या आवाहनाला प्रतिसाद देत युवक बिरादरीच्या माध्यमातून श्रमसंस्कार छावण्यांना प्रतिसाद देत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेक तरुण उत्साही कार्यकर्ते या अभियानात सामील झाले. परंतु इतके सर्व होत असताना या सर्व कार्यकर्त्यांची भोजन व्यवस्था करण्याबरोबरच त्यांचे मन आणि भावना जपण्याचे कार्य करणाऱ्या धीरोदात्त साधनाताईंची प्रतिमा एवढी मोठी दिसते की ती साऱ्या भाव विश्वाला व्यापून राहते.

एक प्रकल्प पूर्णत्वास आणतानाच दुसऱ्या प्रकल्पाची शून्यातून सुरुवात. पुन्हा कष्ट, जिद्द व अपरंपार दृढविश्वास याच भांडवलावर परत तीच जीवनाची संघर्षमय चाकोरी.

त्यातूनच पुढे आनंदवन, सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा, गोकुळ असे एकामागून एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प उभे राहत गेले. समाजकार्याची एक एक नवी परंपरा निर्माण करणारे हे प्रकल्प या माउलीच्या असीम त्यागाची महती गातात.

स्वतःची उच्चशिक्षित मुले सुना, नातवंडे यांनाही या कार्यात झोकून देताना पाहून अत्यानंदाने कृतकृत्य भावनेनेसर्व व्यवस्था त्यांच्यावर सोपवून बाबा व साधनाताईंनी पुन्हा नर्मदेच्या काठी एकांतवास पत्करून पुन्हा कष्टमय जीवनाची साथ सोडली नाही. नर्मदा बचाव आंदोलनात सहभाग व प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाईलाजाने त्यातून घ्यावी लागलेली माघार. यामुळे काहीसे व्यथित होऊन परंतु स्वतःच्या कार्याच्या प्रगतीने समाधान पावत आपले जीवन सार्थकी लागल्याच्या भावनेने हे आत्मकथन संपते. पण हिमालयापेक्षाही उत्तुंगतेच्या दर्शनाने भारावलेला वाचक अंतर्मुख होतो.

अंतर्मुख होऊन विचार करायला लागल्यावर आजची तरुण मुलामुलींची विचारधारा व त्यांची मानसिकता थोडी तरी बदलण्याचे सामर्थ्य या पुस्तकात नक्कीच आहे हे जाणवते.

साधनाताईंनी ‌अग्निदिव्य म्हणावीत अशा प्रसंगातून निर्भयपणे वाटचाल केली आणि हे सारे सहजतेने आनंदाने सोसताना त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य टिकवले. बाबा आमटे व साधनाताईंच्या स्वभावातही आपणास विरोधाभास जाणवतो. त्यांनी बऱ्याच वेळेला पत्नीच्या होरपळीकडे डोळेझाक केली तरीसुद्धा बाबांच्या वादळी जीवनात त्यांना साधनाताईंनी आयुष्यभर साथ दिली. हे सर्व आपल्या तरुण पिढीने नक्कीच अभ्यासण्यासारखे आहे. साधनाताई व बाबा आमटे यांचे सहजीवन म्हणजे एका समृद्ध सहजीवनाचा नमुनाच आहे.

सहजीवनातील यशस्विता ही एकमेकातील अहं आड न येता दोघांनीही एक एक पायरी खाली येऊन सहजीवनातील आनंद फुलवण्यात आहे. पती-पत्नी एकमेकांच्या सहवासात आनंदी समाधानी असतील तर त्या कुटुंबातील वातावरणही उत्फुल्ल, कुटुंबातील नातेसंबंध निकोप, मोकळे व मैत्रीपूर्ण राहतात. मुलेही समृद्ध वातावरणात राहतात व पहिल्या पिढीपेक्षाही दुसरी पिढी काकणभर जास्तच चांगले कार्य करण्याकडे प्रवृत्त होतात.

हे सर्व अभ्यासल्यावर असे वाटते, काळ कोणताही असो, पूर्वीचा असो की आजचा असो. मुलांवर निकोप संस्कार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या पालकांमध्ये असणे हे गरजेचे आहे. साधनाताईंची तिसरी पिढीही आजच्या काळातीलच नाही का? त्यांची तिसरी पिढीही आत्ताच्या वातावरणातही सुसंगत असेच जीवन जगताना दिसत आहे. ते साधनाताईंच्या समृद्ध विवेकशील संस्कारांमुळेच.

हेच नाही का साधनाताई व बाबा आमटे यांच्या समृद्ध व उत्तम सहजीवनाचे फलित?

परिचय : रंजना देशपांडे

शब्दांकन व प्रस्तुती : सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments