श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “हा रुसवा सोड सखे… पुरे हा बहाणा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… अनबिटन नाईंटीला पोहचलेले दाते काका.. आणि चौऱ्याऐंशीला टेकलेल्या दाते काकू…
पन्नासहून जास्त वर्षांची संसारी वेलसेटल्ड पार्टनरशीप..
हम दो और हमारे दो स्टाईलचं चौकोनी कुटुंब…
प्रत्येकाच्या करियरच्या महत्वाकांक्षेचा परीघ सातासमुद्रापार विस्तारलेला..
मग कानी, डोळी, चित्ती आणि मस्तकी तेच भिनलेले असल्याने करियरचं लिमिटलेस आकाशात हमारे दो ची बाऊंड टू बी भरारी…कांक्षा, महत्वाकांक्षाचा सूर्य तिकडे कधीच मावळत नाही… केशरी, सोनेरी वर्खाची झुलणारी स्वप्नं… डाॅलरच्या भुलभुलैय्याच्या गाळात रुतून बसलेली…
आणि इकडे मायपित्याचें लिमिटेड अवकाशात आशेच्या केंद्र स्थाना भोवती भिरभिरतं.. तो आशेचा सूर्य इकडे उगवायला काकू करतो… आणि निशेचा नैराश्याचा अंधार मनाला ग्रासतो…मन विध्द झाले तरी आर्शिवादाचे कर कल्याणमस्तू सांगत असतात…सातासमुद्राच्या अंतराहून मनाचं कोसोदूर पडलेलं अंतर मात्र तसचं राहतं…
. पंख फुटलेली पिल्लं दूर दूर विहार करती झाली पण पुन्हा म्हणून वळचणीला आली नाहीत… आणि दाते काका काकूंना त्यांच्या कडे जाण्यासाठी मनाची आतुरता असली तरी देहाची उभारी झाली नाही…
सटीसहामाही फोनवरून मुलांच्या काबिल्याचा श्रावण झरझर बरसून जायचा आणि त्यावर मग दोघांच्या मनात हिरवळ दाटे चोहीकडे सारखा आनंद फुलून यायचा… पण ते क्षणैक असायचं.. चुटपुटीचं उनं मात्र घरीदारी कायमच चटके देत असायचं….
आणि वाढत्या वयामुळं पिसंच झडून गेल्यानं दोन वृद्धांच्या पंखातलं बळचं नाहीसं झाल्यानं आपल्या घरट्यात एकमेकांशी संवादाचा किलबिलाट करत राहिले…
कालच्या भुतकाळाची आठवणींची पासोडी सोडत .त्यावर हलकासा सुस्कारा सोडून उरलेल्या आयुष्यातले एकेक दिवस कमी कमी करत … अन रात्र झाल्यावर उद्याचा दिवस आपल्याला दिसेल ना या चिंतेत झोपेचं खोबरंच करत… थकलेले शरीर नि मरगळलेल्या मनास पहाटे पहाटे पेंगत पेंगत कधी निद्रेच्या अधिन होणं… सकाळी दाते काका किंवा काकू यांच्या पैकी जो कोणी लवकर उठत असे त्याचं पहिलं लक्षं त्या झोपलेल्या आपल्या माणसाकडे लागे.. अंगावर पांघरलेली चादरीची श्वासोच्छ्वासने वरखाली होणारी हालचाल पाहून हायसं वाटून घेणं… विशेष करून दाते काकूंचं… त्यांना काकांची काळजी वाटायची आपल्या माघारी त्याचं कसं आणि काय?… आत गलबलून येतयं असं वाटलं की डोळ्यांच्या ओलसर झालेल्या कडा बोटाने निपटून टाकत… अनाकलनीय अनिश्चितते पुढे झुकलेली हतबलता जणू…
आणि दाते काका जर आधी उठले तर.. हि ने एव्हढी साथ दिली म्हणून तर आपला संसार झाला… नव्हे नव्हे तिनेच तो तडीला नेला… आपलं काय तिच्या कुठल्याही कामाचं कौतुक न करता; आमटीला तडतडणारी फोडणी सारखं कायमच तडतडबाजा आपण वाजवला.. संवादाला विवादाचं लोणचं कायमच घरात घातलेले असायचं… पण घर सा़ंभाळण्याचं तिचं कसब अलौकिक असचं होतं… पण आता माझ्या माघारी तिचं कसं नि काय?… कढ भरून आलेला आवंढा घश्यात अडकून राहत होता…
… बघता बघता कापरासारखे दिवस विरत विरत गेले.. तुझी माझी जोडी हिच कायमची हेच शिलालेख वर कोरले गेले… एकमेकांना समजून घेण्याचा नव्हे नव्हे पुरते ओळखून आहोत याचा दावा आता मांडण्यात , तू तू मैं मैं च्या हलक्या सरी वर सरी कोसळत राहिल्या… प्रेमाचं आच्छादन दोघांकडेही होतं ..पण त्याही पेक्षा कुरबुरीच्या पावसात भिजणं त्यांना अधिक पसंत होतं…बराचदा असं होत असे… आणि मग त्यावेळी दाते काकाचं आपली छत्री उघडून दूरवर बसलेल्या काकूंच्या डोक्यावर धरत असतं… समजूतदारपणाचं छत्र…आपण स्वतः भिजतोय ईकडे त्यांचं सहेतुक दुर्लक्ष असायचं .. आणि फुरगुटून बसलेल्या काकूंची छत्री मात्र पावसात तशीच भिजत आपलं लबाड हसू चेहऱ्यावर ओघळत राहायची….वयाची शान वाढवणारा वरवरचा लटका रूसवा काकूंचा काकांच्या प्रेमळ सरींच्या मिनतवारीने फार काळ टिकायचा नाही… आता तुम्ही कशाला पावसात भिजताय.. सर्दी खोकला झाला की आली का मॅरेथॉन करायची पाळी मजवर… असं थोडसं गुश्याने बोलणं… आणा ती माझी कोपऱ्यात पडलेली छत्री.. आणि ही तुमची तुम्ही ठेवून घ्या… काकांच्या चेहऱ्यावरील वक्र रेषा मंदस्मितात वितळून गेल्या… भुरूभुरू पावसानं भिजलेल्या कपड्यांवर वाऱ्याने फुंकर मारली… अन एक गुलाबी प्रेमाचा काटा अंगभर मोहरून गेला…काका नि काकुंवर पाऊस मात्र आता हसत हसत प्रेमाचं शिंपण करत राहिला….
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







