श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ # माझं गं ते लेकरू… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
आता माझ्यापासून जरा देखील तुला दूर ठेवणार नाही समजलं…
त्या शहराच्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात तुला पडलेला.. पाहीला…
छे.. छे.. तुला तिथे कुणी टाकून दिला होता…
कदाचित तुझा कंटाळा आला असावा वा तुझ्यापेक्षा अधिक चांगला टेडी त्यांनी घरी आणला असणार. मग तुला अडगळीत ठेवण्यापेक्षा… तुला तिथून काढून तुझ्या रिकाम्या जागेवरच त्या नव्याला बसवले असणार… अशीच असते दुष्ट निर्दयी दुनियेची रीत बरं का माझ्या लेकरा…
मी तुला त्या कचऱ्याच्या कोंडाळ्यात उदासपणे पडलेला पाहून माझं मातेचं मन द्रवलं बघं… मला राहवलं नाही आणि तो कचरा तिथून हलवण्याच्या आधीच मी तुला तिथून उचललं… माझ्यातल्या मातृत्वाचा पान्हा वाहू लागला… तुला बघितलं हातात घेतलं आणि खरं सांगायचं तर तिथंच तुला छातीशी कवटाळून घेतलं… होय तू माझा आहेस आणि मी तुझी माय आहे… तिथं दुसरं कुणी येऊन माझ्यापासून तुला हिसकावून घेऊन नये याची मी खबरदारी घेत राहिले…
किती सुंदर आणि गुबगुबीत लेकरू माझं… हो आता ते माझ्या कुशीत आहे म्हणजे माझचं झालं नाही का..
कसं काय दगडाचं काळीज असतं एकेकाचं.. या निरागस, निष्पाप लेकराला असं उघड्यावर आणि असल्या घाणेरड्या उकिरड्यावर टाकायचं धाडस कसं होतं म्हणते मी… त्या लेकराचा काय दोष आहे बरं त्यातं…
माझ्या दृष्टीला ते पडलं म्हणून बरं झालं अन्यथा जरा जरी उशीर झाला असता तर कुत्र्या मांजरांनी, कावळ्या गिधाडांनी त्याचे लचकेच तोडले असते….
पण नियतीची लिला अजब असतेच हेच खरे… आता हेच बघाना गेली कित्येक वर्षे मला मातृत्वाची इच्छा होती… पण नियतीने माझ्या नशिबी वांझपणाचा शिक्का कायमचा कोरला असल्याने मला ते सुख कधीच मिळणारं नव्हतं… पण म्हणून काही माझ्या मध्ये असलेलं मातृहदयाची अमृतमय भावना अंत:करणात वसलेली होती तिचं काय.. तिला सारखं वाटायचं आपण असं प्रकट कधी होणार, कधी उफाळून येणार याच्या प्रतिक्षेत होती… मी इतरांच्या लेकरांवर खूप खूप माया, प्रेम भरभरून केले अगदी समरसून स्वताचं असल्यासारखे… पण शेवटी ते दुसऱ्याचं आहे उपरं आहे याच्या मर्यादा आल्या नि माझं मनं व्यथित व्हायचं.. आपली कुस उजवली नाही, वांझोटी म्हणून हेटाळणी झाली… एका स्त्रीच्या अंतकरणाच्या नि तिच्या जगण्याच्या चिंध्या चिंध्या केल्या… काही तिची म्हणणाऱ्या घरातल्या माणसांकडून नि त्या ढोंगी, मतलबी समाजाकडून… माझं अपत्यहिनाचं दुख त्यांनी समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही… आणि या उदासीन, नैराश्याच्या वेळी मला तू दिसलास… मला माझ्या जीवनाची नवी वाट गवसली..
मी तुला आता चांगलं पालनपोषण करीन… तुझ्यावर माझ्यात इतके दिवस दडलेला मातृत्व नि वात्सल्याचा मायेचा झऱ्यात आकंठ बुडवून ठेवेन… तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालयं बघ माझं…. तुझ्यासाठी आता कितीतरी कष्ट उचलण्याचं बळं आलयं बघ माझ्यात… आता तू आणि मी.. मी आणि तू बस्स मला आता इतर जगाची जरूरी नाही… तू मिळालास आणि माझ्या स्वप्नांची परिपूर्तता झाली….
इतरांना काय म्हणायचं ते खुशाल म्हणोत… या वेडीला खेळण्यातील निर्जीव टेडीला आपलं लेकरू समजून आपल्या मातृत्वाची हौस भागवतेय कशी बघा…
हो हो आहेच मी वेडी… एका वांझ असलेल्या स्त्री ला मातृहदय नसते असं का बरं तुम्हाला वाटत… आणि हे एक निर्जीव खेळणं आहे याची कल्पना मला नसावी इतकी ही मी वेडी नाही… पण म्हणून काही सलणारं सत्य जीवनभर कवटाळून बसण्यापेक्षा जे दिसतयं त्या समोर तरी त्यावर भरभरून आपल्या मातृत्वाचा, मायेचा वात्सल्याचा झरा असा झरझर वाहू दिला तरी या माझ्या वैराण वाळवंटी जिवनात आभासी का होईना पण आनंदाची हिरवळ नाही का फुलणार! …
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







