श्री दिवाकर बुरसे

??

☆ स्मशानभूमि, ज्ञानभूमि… – भाग – २ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

(“आपल्या धर्मात एक फार चांगली रीत आहे. अग्निसंस्कार झाल्यावर, म्हणजे मृताचा मस्तकभंग झाल्याचा ध्वनी ऐकल्यावर जेव्हा आप्तेष्ठ स्मशानातून निघून जाऊ लागतात, तेव्हा तिथं स्मशानात जमलेल्या आप्तेष्ठांमधे जो वयानं सर्वात जेष्ठ असेल अशा व्यक्तीनं, अग्निसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचं सर्वांसमक्ष अभिनंदन करावं. त्यानं केलेल्या या पुण्यकर्माचं कौतुक करावं म्हणजे इतरांनाही अशी सत्कर्मे करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. ते ही आपल्या जिवलगांविषयी आदरभाव, कृतज्ञता बाळगून अशी कर्मं करण्यास उद्युक्त होतात. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि प्रथा पुढेही चालू रहातात.) 

इथून पुढे – – 

मला जवळ बोलावण्यामागे त्यांचा जो हेतू होता तो त्यांनी बोलून दाखविला. म्हणाले, “इथं जमलेल्या समाजात मीच वयानं जेष्ठ दिसतो. माझं वय आता सत्त्याऐंशी आहे. म्हणून मलाच हे कर्तव्य करायला हवे. तुमच्या भावाचं अभिनंदन करायला हवं. मी त्यांच्याशी, इतर लोकांशी बोलू शकतो का? ” मी म्हणालो, ” अहो भाग्यम्! निश्चित बोलू शकता. यामुळे सर्वांना बरंच वाटेल. चार ज्ञानाच्या गोष्टी समजतील. ” 

“ज्ञानाविषयी म्हणशील तर ज्ञानदानही सत्पात्री करावं. गुरूनं शिष्य नीट पारखून, त्याची योग्यता तपासून मगच त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्ञान द्यावं. अशिष्याला ज्ञान देऊ नये. ‘अशिष्याय न देयम्’ असं शास्त्रवचनच आहे.

स्मशान हे ज्ञानदानासाठी सर्वात पवित्र स्थान आहे. स्मशानात अगदी एखाद्या चांडाळानं जरी ज्ञानयाचना केली तर गुरुनं त्याच्या अधिकाराचा, योग्यायोग्यतेचा कोणताही विचार न करता त्याला अवश्य ज्ञान द्यावं असंही शास्त्र सांगतं. इथं जमलेले तुम्ही तर सर्व ज्ञानाचे अधिकारी आहात. मी अवश्य बोलेन.

तुला व्यक्तिशः मात्र तत्वज्ञानाचं सार असणारा आचार्यांचा एक श्लोक सांगतो. जमेल तसं, वेळ मिळेल तेव्हा यावर चिंतन करीत रहा. कल्याणमस्तु! “

स्वामींनी स्मशानभूमीत मला सांगितलेला श्लोक आणि त्याचा अर्थ असा…

किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं

स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे।

चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने

किं तत्रामहतो भवान्परमकं ज्योतिस्तद्स्मि प्रभो।।

स्पष्टीकरण:- 

‘किं ज्योतिः तव? ‘- कोणता प्रकाश तुझ्या उपयोगाला येतो? दिवसा सूर्याचा ‘रात्रौ प्रदीपादिकं’ – दिव्यामुळं. (दिवा नसल्यास चंद्र, अग्नी इ. मुळं) ‘स्यादेव’- असूदे! पण ‘रविदीपदर्शनविधौ किं ज्योति? ‘ सूर्य, दिवा इ. च्या ज्ञानाचं साधन कोणतं? ‘आख्याहि हे’ ते मला सांग. ‘चक्षुः’ (हो महाराज) डोळे. ‘तस्य निमीलनादिसमये किं? ‘ हे डोळे झाकल्यावर कशानं ज्ञान होतं? ‘धीः’ म्हणजे बुद्धीनं. ‘धीयो दर्शने किं? ‘ आणि बुद्धीचं ज्ञान कशानं होतं? ‘तत्राहम्’ – (हे बुद्धीचं ज्ञान व्हायला) मीच कारणीभूत आहे. आचार्य पुढे म्हणतात, ‘अतो भवान् परमकं ज्योतिः’ म्हणून या सर्वांना (सूर्य, चंद्र, दिवा, बुद्धी, डोळे) प्रकाश देणारा तूच आहेस. तूच परंज्योती स्वयंप्रकाश आत्मा आहेस!

स्वामींचा प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकत होतो. आमच्या या चर्चेत अर्धा पाऊण तास गेला असेल. तेवढ्यात जळणाऱ्या चितेतून ‘फट्’ असा ध्वनी उमटला. दोन-तीन निखारे ढासळले. काही ठिणग्या, सूक्ष्म धूम्ररेखा आणि अग्निशिखा बाहेर पडल्या. हे पाहून स्वामीजी बोलायचं थांबले आणि म्हणाले, “आता खऱ्या अर्थानं देहातील पंचही प्राणांचं उत्क्रमण झालं आहे. पार्थिवही पंचत्वात विलीन झालं आहे. आता इथंच थांबूया. येवढं पुरे. चला, लोक निघून जातील. त्यापूर्वी त्यांच्याशी बोलू. “

मी सर्वांना एकत्र जमवून, दोन मिनिटं मौन पाळून, समुदायिक श्रद्धांजलि अर्पण करायची विनंती केली. मौन झाल्यानंतर स्वामींनी पुढे येवून जमलेल्या सर्वांसमक्ष दादाचं अभिनंदन केलं, आभार मानले आणि समाजाला दोन तात्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या.

ते म्हणाले, “सज्जनहो, हा मृत्युलोक आहे. इथं येणाऱ्या आपल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. जीवन क्षणभंगुर आहे हे स्मशानात आल्यावर कळतं आणि मनात वैराग्य उत्पन्न होतं. पण हे वैराग्य अल्पकाळ टिकणारं असतं. ‘मैथुन वैराग्य’, ‘प्रसूति वैराग्य’ आणि ‘स्मशान वैराग्य’ ही तिन्ही प्रकारची वैराग्यं अल्पजीवी असतात. ज्ञानप्राप्तीतून येणारं निर्भय वैराग्य चिरकाळ टिकतं आणि त्यातून माणूस अध्यात्माच्या वाटेवरून प्रवास करीत आपलं कल्याण साधतो. असो.

गेलेली व्यक्ती उत्तरायणात, महिन्याच्या शुक्लपक्षात, दिवसाच्या पूर्वार्धात गेल्यानं शास्त्रात सांगितल्या प्रमाणे ती निश्चितच प्रकाशमार्गानं उर्ध्वगतीला जाणार आहे. असा मृत्यु केवळ पुण्यवान माणसालाच प्राप्त होतो. शरीर नष्ट झालं तरी आत्मा अमर आहे हे आपण जाणता. तेव्हा शोक करू नये. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळत राहतील. ईश्वर सर्वांचे कल्याण करो. येवढं बोलून स्वामींनी आपलं अल्पसं पण प्रामाणिक, परिणामकारक प्रबोधनपर निवेदन संपविलं.

स्वामींचे आभार मानून, त्यांना वंदन करून मीही इतरांबरोबर स्मशानातून घरी जायला निघालो. नळावर जाऊन हातपाय धुतले आणि जाता जाता पुन्हा स्वमींकडे पाहिलं. स्वामी हात उंचाऊन सर्वांना निरोप देत तिथेच उभे होते. बाजूच्या काळोखात जळणारी चिता आणि तिच्या केशरी प्रकाशात कौपीनधारी स्वामींची मूर्ती उठून दिसत होती. त्यांचे तेजस्वी पण दयार्द्र डोळे विशेष चमकत होते!

काही दिवसात आमचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. जो तो आपापल्या उद्योग व्यवसायात व्यस्त झाला. अशी काही वर्षं गेली.

१९८५-८६ (नक्की वर्ष आठवत नाही) च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही कुटुंबियांनी चारधाम यात्रेला जायचं ठरवलं. प्रवासाचं नियोजन करताना कळलं की या यात्रेत उत्तरकाशी हे स्थान लागतं. मला एकदम मामाच्या अंत्यविधीच्या वेळी स्मशानात भेटलेल्या स्वामी चिद्विलासानंदभारतींची आठवण झाली. ते उत्तरकाशीहून पुण्यात आले होते त्यावेळी. म्हणजे ते इथल्याच कुठल्यातरी मठात, आश्रमात असणार असा तर्क करून मी या यात्रेत त्यांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. त्यासाठी वेळ पडल्यास उत्तरकाशीत दोन दिवस वास्तव्य करायचं निश्चित केलं.

जेव्हा प्रत्यक्ष उत्तरकाशीत गेलो तेव्हा समजलं की इथं बरेच आश्रम आहेत. आपले स्वामीजी नक्की कुठल्या आश्रमात असतील हे कसं कळणार? त्यांच्या नावाखेरीज आपल्याला तर त्यांच्याविषयी अधिक काहीच माहित नाही. आपण त्यांना त्यांच्या नावाखेरीज अधिक काही विचारलंच नव्हतं. मग त्यांचा शोध घ्यावा कसा? कुणाला विचारावं? त्यांना कुठं शोधायचं? कसं शोधायचं?

मी ठरवलं आता प्रत्येक आश्रमात चौकशी करायची. कुठंतरी सापडतील की. निदान त्यांची काही तरी माहिती तर मिळेलच. हाँटेल मालकाच्या मदतीनं एका स्थानिकाला बरोबर घेऊन मी माझी ‘श्रीस्वामीशोधमोहीम’ सुरू केली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो आणि एकेका आश्रमाला भेट द्यायला सुरवात केली. दिवसाचा पूर्वार्ध अगदीच वाया गेला. उपलब्ध माहिती इतकी त्रोटक होती की त्या माहितीवरून अनोळखी परगावात केवळ टोपण नावावरून एखादी व्यक्ती मिळणं जवळ जवळ अशक्य होतं. मी निराश झालो. ‘आता थांबावं, उगाच कालापव्य नको’ असं मनात येऊ लागलं तोच रस्त्यानं समोरून दोन तरूण जटाधारी साधक येताना दिसले. माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

मी त्यांना हाटकलं, अभिवादन केलं आणि विचारलं, “स्वामिजी, मी महाराष्ट्रातून आलोय. मला इथं कुठल्यातरी मठात राहणारे स्वामी चिद्विलासानंदभारती यांना भेटायचं आहे. मला त्यांच्या मठाचं नाव माहित नाही पण ते इथंच उत्तरकाशीत वास्तव्याला असतात. पुण्यात त्यांचा आणि माझा परिचय झाला होता. त्याला आता पाच वर्षं झाली. आपण मला काही मार्गदर्शन करू शकाल का? ” 

पुण्याचा उल्लेख ऐकल्यावर त्यातला एक जण जरा चमकला आणि चटकन म्हणाला, “आप हमारे आश्रम चलिये। हमारे गुरुजी शायद कुछ बता सकेंगे उनके बारेमे। चलिये हमारे साथ। आश्रम यही, नजदीकही है।” 

आम्ही त्यांच्या मागून आश्रमात गेलो. त्यांनी आम्हाला आपल्या गुरुजींसमोर उभं केलं. मी गुरुजींना वाकून नमस्कार केला. आशीर्वाद देत त्यांनी मला आसन ग्रहण करण्याची विनंती केली तसा मी जवळच्या दर्भासनावर बसलो.

गुरुजी मधुर वाणीनं म्हणाले, “कहियेजी, आप किसे ढूँड रहे है? आपको क्या चाहिये।” यावर मी त्यांना स्वामींविषयी माझ्याकडे होती तेवढी माहिती सांगून मला स्वामींच्या दर्शनाची तीव्र इच्छा असल्याचं सांगितलं. माझं सगळं म्हणणं शांतपणे, एकाग्रतेनं ऐकल्यावर गुरुजींनी एक दीर्घ उच्छ्वास सोडला केवळ, आणि गप्प बसले. मी आधीरतेनं म्हणालो, “क्या हुवा गुरुजी? मैने कुछ गलत तो नही कहाँ? ” त्यावर गुरुजींनी पुन्हा एक सुस्कारा सोडला आणि म्हणाले, “नहीजी, आप बिलकुल उचित स्थानपर आए है, परंतु आनेका समय अनुचित चुना आपने। स्वामी चिद्विलासानंदभारतीजी यही रहते थे।”

“रहते थे? अर्थात्? अब यहाँ नही रहते? कही बाहर गये है? वो अब कहाँ हो सकते है? आप हमे कुछ बता सकते है? ताकि हम वही जाकर उनका दर्शन करेंगे।” मी आधीरतेनं एका श्वासातच प्रश्नावर प्रश्न विचारले. गुरुजींनी आकाशाकडं पाहिलं आणि विषण्णपणे उद्गारले, “ओंम् शांति, शांति शांतिः। वत्स, स्वामिजी तीन वर्ष पूर्व, वृद्धावस्थाके कारण समाधिस्थ हो गये।मृत्युसमय उनकी आयू पूरे नब्बे वर्षकी थी। उनका अंतिम संस्कार यही नदीके तटपर किया गया और उपर समाधि स्थापित की गयी।” 

ही दुःखद वार्ता ऐकून मला फार वाईट वाटलं. मी तसाच व्यथित मनानं आसनावर बसून राहिलो. डोळे नकळत पाझरू लागले!

भावनावेग मंदावल्यावर मी स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर गुरुजींनी जे सांगितलं ते ऐकून मी पुरेपूर हादरलो. गुरुजींनी सांगितलं की, “गेल्या वर्षी उत्तर काशीला भूकंप झाले, भूस्खलने झाली, नद्यांना महापूर आले. त्यात स्वामींजींची समाधी वाहून गेली. अक्षरशः ‘गंगार्पणमस्तु’ झाली. नदीचा आकार बदलला आणि काठचा भूगोलही बदलला. आता स्वामींच्या केवळ स्मृती विद्यमान आहेत! ‘

दहा मिनिटं कोणी काहीच बोललो नाही. नंतर मी उठलो. गुरुजींना वंदन केलं आणि आश्रमाबाहेर पडलो. दूर अंतरावरून संथपणे वाहणारी नदी दिसत होती. तिच्याकडे पाहताना मला वाल्मिकी रामायणातला श्लोक आठवला

यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महादधौ

समेत्यच व्यपेयातां तद्वत् भूतसमागमाः।l

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाहि गाठ।l

– समाप्त – 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments