उज्ज्वला केळकर

??

☆ सृजनाचे क्षण… भाग – १ ☆ उज्ज्वला केळकर

परवा एक गंमतच झाली. हरियाणा येथे रहाणारे माझे स्नेही श्री. बलजीत गढवाल ‘भारती’ यांचा मला एक मेसेज आला. खरं तर त्यांचा माझा अलीकडे दोन-तीन वर्षात संपर्क नव्हता. मेसेजचा साधारण आशय असा होता, ‘मी एक पुस्तक काढतोय. ‘लेखक का लिहितात? सुमारे 150 लेखकांकडून मी याबद्दल लेख मागवले आहेत. तुम्हीही तुमचे विचार कळवा. तुम्ही का लिहिता? आणि तुमच्या लेखनप्रवासाबद्दलही लिहा. ’ मेसेज वाचला आणि मी विचारातच पडले. खरंच! मी आत्तापर्यन्त विचारच केला नव्हता, मी का लिहिते? मनात आलं की मी आपली लिहित सुटायची. आता मात्र मी विचार करू लागले, आपण का लिहितो? एकूणच लेखक का लिहितात?

‘लेखक का लिहितात? ’ या विचाराभोवती मन रेंगाळताना, थोडा पूर्वसूरींचा धांडोळा घ्यावासा वाटला. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास या संतांनी काव्यरचना केली, ती ’लोककल्याणासाठी’, त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीचा अनावर उमाळा मनात दाटून आल्यामुळे तो व्यक्त करण्यासाठी. त्यानंतरच्या काळात पंत कवींनी काव्यलेखन केले, ते आपल्या विव्द्त्तेचं प्रदर्शन करून कीर्ती मिळवण्यासाठी. त्यापुढील टप्प्यावर तंत कवींनी काव्ये रचली, ती एक तर वीरश्रीच्या चेतनेसाठी पोवाडे आणि मनोरंजनासाठी लावण्या. नंतरच्या ब्रिटीश काळात, लो. टिळक, आगरकर, म. गांधी, म. फुले यांनी लेखन केलं, ते लोकजागृतीसाठी. स्वातंत्र्याची आकांक्षा, समाज सुधारणा, अंध:श्रद्धेला विरोध, जाती-जातीत आणि स्त्री-पुरुषातील समानता, स्त्री शिक्षणाची गरज आणि महत्व इ. उद्देशाने लेखन केले जात होते. पुढे पुढे लेखनाची आणखीही एक धार यात येऊन मिसळली. इंग्रजी शिक्षणाबरोबरच, इंग्रजी वाङ्मयाचाही परिचय झाला आणि त्या अनुकरणातून पारलौकिक विषयांबरोबर लौकिक विषयांकडेही लेखकांचे मन ओढ घेऊ लागले. आपला परिसर, नातेवाईक, परिचयातले, कल्पनेतले विषय यावर लेखन होऊ लागले.

लेखनातले हे सारे टप्पे मनात येतायेताच, मन विचार करू लागले, ‘आज लेखक का लिहितात? ‘ मी माझ्या एका नावलौकिक असलेल्या मैत्रिणीला विचारले, ‘ तू का लिहितेस? ‘ ती म्हणाली, ‘आपण का बोलतो? दुसर्‍याला काही तरी सांगावसं वाटतं म्हणून! . मीही नेमकी त्याच कारणासाठी लिहिते. ‘ तिचं हे उत्तर ऐकलं आणि मला ‘खूल जा सिम सिम’ म्हंटल्यावर आलिबाबाची गुहा उघडावी, तसं वाटलं. बरोबर! मीदेखील नेमकी याच कारणासाठी लिहिते. व्यक्त होण्याची अनावर ऊर्मी मनात दाटून येते आणि लेखणी कागदावर लिहिती होते. आपण काही पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, अनुभवलेलं असतं. ते दुसर्‍याला सांगावसं वाटतं. पण ते सगळं जसंच्या तसं सांगितलं जातच असं नाही. कधी त्यात काट-छाट होते. कधी भर पडते. कधी वाटतं, हा किंवा ही आत्ता असा न वागता, तशी वागली असती तर? परिस्थिती कशी बदलली असती? मग मनात अनेक विचार, कल्पना रुंजी घालू लागतात. मग त्या वेगळ्या शक्यतांच्या आधारे कविता, कथा, कादंबर्‍या निर्माण होतात. घटितातून अघटिताची पुनर्मांडणी होते. हीच लेखकाची नवनिर्मिती असते. अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा, असे नाही. कल्पनेच्या पातळीवरही घेता येतो.

घटितातून अघटिताची पुनर्मांडणी केलेल्या माझ्या ‘जन्म’ शीर्षकाच्या कवितेचे उदाहरण मी इथे देते. एकदा क्युरेटीन करायचं म्हणून मी दवाखान्यात अ‍ॅडमिट होते. मला ऑपरेशन टेबलवर झोपवले होते. अ‍ॅनॅस्थेसिस्ट येणार म्हणून त्यांची वाट बघत सगळे बाहेर थांबले होते. रूममध्ये मी एकटी. भिंतींवर अनेक शो केसेस. त्यात सर्जरीची हत्यारे, वेगवेगळ्या सुर्‍या, कात्र्या, चिमटे वगैरे… मला एकदमच वस्तुस्थितीचं वर्णन करणारी कविता सुचू लागली. त्याचं सर्वसाधारण स्वरूप असं –

घटका भरत आलेली

जीवघेणी कळ

मस्तक भेदून गेलेली.

ललाटीची रेषा,

वाट हरवून बसलेली.

घड्याळाची टिक टिक 

जिण्याचा तोल साधत 

सांडत असलेली.

एवढ्यात डॉक्टर आले. मला अ‍ॅनॅस्थेशिया दिला गेला. क्युरेटीन झाले. मी शुद्धीवर येऊ लागले. डोक्यात तीच कविता…

ईथरची बाधा, नसानसातून 

शरीरभर भिनलेली….

डोळ्यापुढची वर्तुळे

लाल… हिरवी.. पिवळी… निळी…

काळवंडत गेलेली…

कोसळत्या काळोखात होणार्‍या

पांढर्‍या शुभ्र ठिपक्यांच्या 

लयबद्ध हालचाली.

पाजळत्या रक्तपिपासू हत्यारांची 

लांबच लांब पसरलेली 

अशुभ सावली.

… तेव्हा मी काही बाळंतीण होणार नव्हते, पण मला कवितेचा शेवट सुचला…

संज्ञा बधीर होताना, सारं सारं दूर सरतय.

रक्तात उमलणार्‍या, गुलबकावलीचं हसू,

लाटालाटांनी मनभर उसळतय. अणूरेणू व्यापून उरतय.

जणू ते गुलबकवलीचं फूल म्हणजे बाळ, आता माझ्या हातात येणार आहे…..

– – अशी ही वास्तव आणि कल्पनेची सरमिसळ. दवाखान्यातून घरी येताना मी बाळ नाही, पण कविता घेऊन आले.

वास्तवाचं प्रभावी वर्णन करण्यासाठी योग्य, उचित शब्दकळा निवडतानाही कल्पनेची देणगी लगतेच आणि तितकाच अभ्यासही हवा.

– – एकदा एका संस्थाभेटीने मला दोन कथा दिल्या. संस्थेचं नाव करुणा निकेतन क्रेश. क्रेश म्हणजे संगोपनगृह. मी डी. एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्‍याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा अशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.

 तिथे असलेल्या मदतनीस बाई आम्हाला क्रेशची माहिती सांगत होत्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आसपासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले येत. त्या बोलत असतानाच तिथे एक दीड – पावणे दोन वर्षाची, नुकतीच चालायला लागलेली मुलगी लडखडत आली आणि खाली बसून त्या मदतनीस बाईंच्या पायाला तिने मिठी मारली. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतले. मग म्हणाल्या, ‘क्रेशने अ‍ॅडॉप्ट केलेली ही पहिली मुलगी. एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याची ही मुलगी. सिस्टर मारियाच्या मनात ही मुलगी भरली. त्यांनी त्या भिकारी दांपत्याला संगितले, की ‘आम्ही तुमच्या मुलीला सांभाळू. तिला खूप शिकवू. तिला चांगलं जीवन जगायला मिळेल. पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला आपली ओळख अजिबात द्यायची नाही. बघा. तिचं कल्याण होईल. ’.. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. थोडं एकमेकांशी बोलले. त्यांना वाटलं असणार, निदान मुलीला तरी आपल्यासारखी भीक मागत जगायला नको. त्यांनी नन मारियाची अट मान्य केली. आम्ही हिला खूप शिकवणार आहोत. डॉक्टर करणार आहोत आणि पुढे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवणार आहोत. ’ एव्हाना त्यांनी त्या मुलीला आपल्या दुसर्‍या मैत्रिणीकडे सोपवले होते आणि त्या पुढे माहिती सांगू लागल्या. पण माझं तिकडे लक्षच नव्हतं.

माझं मन त्यावेळी, ती लहान मुलगी, तिचे लेप्रसी झालेले आई-वडील, त्या मुलीला डॉक्टर करून जर्मनीला पाठवायचे क्रेशचे लोक बघत असलेले स्वप्न, यातच गुंतून गेले होते आणि मनात कुठे तरी कथा आकार घेऊ लागली होती.

क्रेशच्या कार्याची माहिती त्या पुढे सांगू लागल्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आसपासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ, गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.

तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती सांगत होत्या. ‘ इथल्या मुलांना जर्मनीतील काही लोकांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा खर्च ते करतात. तिथल्या मुलांना खेळणी पाठवतात. चित्रे पाठवतात. ग्रीटिंग्ज पाठवतात. आम्ही ते सगळं मुलांना देतो पण इथे खेळायला. बघायला. त्यांना खेळणी वगैरे घरी नेऊ देत नाही. आपल्या घराचे फोटोही मुलांचे दत्तक पालक पाठवतात. पत्रे पाठवतात. त्यांनी मग आम्हाला अशी काही पत्रे, खेळणी, ग्रीटिंग्ज दाखवली.

त्या दिवशी त्या क्रेशमध्ये आणखी एक कार्यक्रम होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिथे मुलांसाठी त्या दिवशी चादरी वाटण्यात येणार होत्या. प्रमुख व्यवस्थापिका रेमंड मॅडमनी त्या दिवशी मुलांच्या आयांना बोलावून घेतले होते. हॉलमध्ये सगळे जमले. दोघे शिपाई सोलापुरी चादरींचे गठ्ठे घेऊन आले.

प्रार्थना, सर्व उपस्थितांचे स्वागत झाले. प्रभू येशूची शिकवण, तो सगळ्यांकडे कसा कनवाळू दृष्टीने बघतो, असं सगळं बोलून झालं. मुलांच्या परदेशातील पालकांनी चादरीचे पैसे दिल्याचे सांगितले गेले. तिथे चादरी वाटप सुरू झाले आणि माझ्या मनात कथा साकारू लागली. त्या दिवशी मी घरी आले ती दोन कथांची बीजे घेऊन. एक ‘तहान’ आणि दुसरी ‘पांघरूण. ’

प्रथम ‘तहान कथेविषयी. मी माझ्या कथेत ती लहान मुलगी, जस्मिन, डॉक्टर झालीय, असं दाखवलं. तिथून कथेची सुरुवात. ती मोठी होत गेली, तसं तिला कळलं, आपण लेप्रसी झालेल्या भिकार्‍याची मुलगी आहोत. चर्चपुढे बसलेले ते भिकारी. तिला येता जाता त्यांना न्याहाळायचा, यापैकी आपले कोण आई-वडील असतील ते शोधण्याचा छंद लागतो. आज ती जर्मनीला निघालीय. तिचा निरोप समारंभ होतोय. स्टेजच्या पुढल्या भिंतीवर एक मोठे पोस्टर आहे. येशू ख्रिस्त कुणा शिरमोणी नावाच्या पापी महिलेच्या ओंजळीत पाणी घालतोय. खाली लिहिलं आहे. त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागवतो, त्याला तहान लागत नाही. (वरील पोस्टर मी मिशन हॉस्पिटल – मिरज इथे पाहिलं होतं. ते कथेत इथे वापरलं) जस्मिनला वाटतं, आपण कळायला लागल्यापासून त्याने दिलेल्या पाण्यानेच तर तहान भागावतोय. पण आपल्याला खूप खूप तहान लागलीय. आपले खरे आई-वडील कोण आहेत, हे जाणून घेण्याची तहान. ती निघते. टॅक्सीत बसता बसता त्या भिकार्‍यांकडे जाते. त्यांच्या थाळीत, वाडग्यात हाताला लागतील तसे पैसे टाकते. मनोमन म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला आशीर्वाद द्या. टॅक्सी निघून जाते. चार विझू विझू झालेले डोळे टॅक्सी दृष्टिआड होईपर्यंत त्या दिशेने बघत रहातात.

तर अशी ती ‘तहान’ कथा.

– क्रमशः भाग पहिला 

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments