श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “समजुतीचा घोटाळा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
माणसांच्या विचित्र वागण्यानं समजुतीचा घोटाळा होतॊ.
झालं असं की,
सध्या उन्हाळ्याचे दिवस. रात्र लहान तर दिवस मोठा. सकाळी फार लवकर म्हणजेच साडेपाच-सहालाच जाग येते. नंतर काही केल्या झोप येत नाही. उगीच कूस बदलत लोळत पडायचा कंटाळा येतो म्हणून मग फिरायला जायला सुरवात केली. मोबाइल मुद्दाम घरातच ठेवला. प्रसन्न वातावरण, हळूहळू जागं होणारे शहर, रस्त्यावर गाड्यांची कमी आणि पायी चालणाऱ्यांची संख्या जास्त. आजकाल असलं दृश्य पहायला मिळणं तसं दुर्मिळच.. फार मस्त वाटलं. असो..
सर्वच वयोगटातील लोक बाहेर पडलेले त्यातही ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त. फुटपाथवरुन जात असताना समोरून टी-शर्ट, हाफ पॅन्ट घातलेला, तुळतुळीत टक्कल असलेला पन्नाशीचा माणूस माझ्याकडं पाहत हातवारे करत काहीतरी बोलत होता. आमच्यातलं अंतर जवळपास शंभर फुटांचे होतं. तो नक्की आपल्याकडेच पाहत हातवारे करत आहे ना याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केला पण नीटसा अंदाज आला नाही. त्याचे हातवारे अजूनही चालूच. मी हात उंचावून प्रतिसाद दिला पण शून्य प्रतिसाद.. मला आश्चर्य वाटलं आणि रागही आला. अगदी जवळ आल्यावर लक्षात आलं की तो इयर पॉड लावून फोनवर बोलत होता आणि मला वाटलं की.. , , , माझ्याकडे ढुंकुनही न पाहता शेजारून निघून गेला तेव्हा माझं मलाच हसायला आलं. नशीब बायको सोबत नव्हती नाहीतर तिला चिडवायला अजून एक कारण मिळालं असतं.
पुढे गेल्यावर असेच एकटेच बोलणारे, हातवारे करणारे अनेकजण दिसले पण यावेळेला मी अनुभवानं शहाणा झाला होतो.
काळ बदललाय हेच खरं… पूर्वी एकटाच बडबडणाऱ्या, हसणाऱ्याला वेड लागलंय किंवा डोक्यावर परिणाम झाला असं म्हणायचे. तसं पाहिलं तर आताही तीच परिस्थिती आहे. मोबाईलमुळे डोक्यावर परिणाम झालाच आहे. निसर्गानं बहाल केलेल्या सुंदर सकाळचा अनुभव घेण्याऐवजी मोबाइलला चिकटलेल्यांची खरंतर कीव वाटली.
विचारांच्या तंद्रीतच चौकातल्या बसस्टॉपवर बसलो. शेजारचा हातवारे करत, शून्यात पाहत बोलत होता मध्येच मोठ्याने हसत होता. अजून एक फोन पागल… आपल्याच तंद्रीत असलेल्या त्यानं माझी दखलही घेतली नाही. सतत बडबड चाललेली अन मी शांत बसलेलो. तितक्यात समोरून चाललेले आजोबा आमच्याकडे क्षणभर पाहत थांबले. थोडं पुढे जाऊन त्यांनी मला ‘शुक शुक’ करून बोलावलं.
“काय झालं”मी विचारलं.
“भलेतच डेरिंगबाज आहात”
“का?”
“म्हणजे तुम्हाला माहिती नाही की अजूनही लक्षात आलं नाही”आजोबांच्या प्रश्नांनी गोंधळ वाढला. माझा प्रश्नांकित चेहरा पाहून आजोबा म्हणाले..
“अहो, मिस्टर ज्याच्या शेजारी बसला होता तो वेडा आहे. भीती वाटली नाही ? ” आजोबांचं ऐकून नखशिखांत हादरलो. आजोबा मात्र माझ्याकडं कौतुकमिश्रित विचित्र नजरेनं पाहत होते.
“लोक इतके विचित्र वागतात की कोण वेडं की कोण नॉर्मल ओळखणं अवघड झालयं. ”मी म्हणालो.
“बरोब्बर”
“एवढ्या सकाळी सुद्धा बरेचजण फोनवर बिझी??. “
“ स्मार्ट फोन आल्यापासून माणसांचा बावळटपणा वाढलाय ”आजोबा मार्मिक बोलले.
“खरंय!!तुमचे मनापासून आभार!!”
… हात जोडत आजोबांचा निरोप घेऊन निघालो बसस्टॉपवरच्या वेड्याचं बोलणं सुरूच होतं. तितक्यात समोरून काहीजण एकटेच बोलत येताना दिसल्यावर फुटपाथ सोडून रस्त्यावरून चालायला लागलो…… मनात विचार आला की एक खरंच वेडा आणि बाकीचे.????
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




