राधिका भांडारकर
☆ “ तिला पाहिले मी… ☆ राधिका भांडारकर ☆
नऊ आठची गाडी स्थानकात आली होती. ती ब्रिजच्या पायर्यांवरून धावत धावत हातातली पर्स आणि काही किरकोळ सामान सांभाळत कशीबशी गाडीपाशी येउन आत शिरली.
तेव्हाच तिला मी पाहिलं. जराशी उंच, सावळीच पण तजेलदार, सडपातळच पण भरीव वक्षस्थळे असलेली ती कशी माझ्या नजरेतच बसली. सुंदर नव्हती पण काहीतरी अपील होता तिच्यात. आणि काहीसे पिंगट आणि जरासे मोठे डोळे.
सारंच क्षणात हृदयाला भेदून गेलं होतं.
घंटी बज गयी. पण पुढे काय?
अरेच्चा! चढता चढता तिच्या मनगटावरचं घड्याळ निसटलं आणि त्याच क्षणी गाडी सुटली. मी ते घड्याळ उचललं.
दिवस खरोखरच सुंदर गेला. मनातल्या मनात तिचा विचार करताना आणि तिला पाहतानासुद्धा.
दुसर्या दिवशी नउ आठला मी रेल्वे स्थानकावर. ती आधीच आलेली होती.
निळी शिफॉनची साडी. त्यातून जाणवणारी तिची बारीक कमर आणि झिरपणारं पातळ पोट. मनात वाहणारे सगळे स्त्रोत बांधून ठेवले. तिच्या जवळ गेलो.
“हे घड्याळ. तुमचंच ना? काल गाडीत घाईघाईने चढत असताना निसटलं तुमच्या हातावरून. ”
तिनं अक्षरश:माझ्या हातून ते घड्याळ झपाट्याने घेतलं.
“अय्या! how sweet of you! खूप थँन्क्स. ”
धडधडत गाडी आली आणि गेलीही.
कसं आहे ना? आयुष्य म्हणजे सिनेमा,
कादंबरी, कथा काही नसते.
त्यादिवशी तिला मी पाहिले. ती मनात बसली. ती बेचैनी अनुभवली.
पन्नास वर्षानंतरही ती डिलीट नाही झालेली. आहे अजूनही मनात आहे. जशी पाहिली होती तशीच.
सध्या ती काय करत असेल?
कधीकधी गुपचूप चुपके चुपके मी उगीचच तिला फेसबुकवर शोधतोही.
एकमात्र वाटते, अशा मूर्खपणातही
मनातला एक चोरटा रोमँटिक कोपरा ताजा राहतो.
माझ्यासारख्या सभ्य, संस्कारशील, निष्ठा सांंभाळणार्या संसारी व्यक्तीसाठी.
© राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈




