श्री मयुरेश उमाकांत डंके
मनमंजुषेतून
☆ पणत्या! ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
माझ्या मुलाच्याच वयाच्या उद्योजकाची आत्ता भेट झाली.. दिवाळीची दिव्यांची खरेदी त्याच्याकडूनच केली..
कोंढव्यात इस्कॉन मंदिराजवळ एका कामासाठी थांबलो होतो. तिथं एका गोणपाटाच्या पिशवीतून मातीच्या पणत्या आणून फूटपाथवरच मांडून हा मुलगा बसलेला.. मला आणि पूर्वाला बघून आमच्याकडे आला. छान गोड हसून पणत्या घेण्यासाठी विचारलं. दहा अकरा वर्षांचं वय. पण अनुभव मात्र दहा वर्षं सेल्स मध्ये काम केल्यासारखा..!
“पणत्या कुठून घेतोस? ”
“तिकडं आमचा एक सप्लायर आहे. त्याच्याकडून घेतो. “
“दरवर्षी विकतोस? “
“नाही. यावर्षीच विकतोय. “
“सुरुवातीला किती पैसे लागले माल खरेदी करायला? “
“दोनशे रुपयांना शंभर हा भाव होता. “
“मग? दोनशे रुपये कसे मिळवले? “
“माझ्याकडे पैसे नव्हते. त्याच्याच स्टॉलवर दोन दिवस काम केलं. चारशे रुपये जमले. तेच वापरले. ”
“ते कसे वापरले? “
“मी माल खरेदी केलाच नाही. चारशे रुपये डिपॉझिट ठेवून माल घेतो आणि रोज रात्री जाऊन हिशोब देतो. “
“आतापर्यंत किती माल विकला? “
“आज तीस डझन विकला. “
“किती दिवस झाले विकतोस? “
“झाले आठ दहा दिवस. “
“मग एकूण किती विकला गेला माल? “
“दोनशे डझन. “
सत्तर रुपये डझन या दराने ह्या मुलानं दोनशे डझन पणत्या विकल्या होत्या. कदाचित पुढच्या चार पाच दिवसांत आणखी दोनशे डझन माल विकेलच. एकूण चारशे डझन पणत्या विकल्या. त्यात डझनामागे तीस रुपये निव्वळ नफा.. आजवरचा एकूण निव्वळ नफा ₹६. ०००/-…! पुढचा साधारण अंदाज बांधला तर एकूण नफ्याची रक्कम बारा हजार रुपयांहून अधिक होईल…!
एका रुपयाचीसुद्धा खरेदी न करता. चारशे रुपये डिपॉझिट ठेवून दहा दहा डझन माल आणून विकून पठ्ठ्याने बारा हजार रुपयांचा नफा कमावला आणि वरून पुन्हा चारशे रुपयांचं डिपॉझिट परत मिळणारच आहे..! ही मुत्सद्देगिरी कुठून शिकला असेल हा मुलगा?
हीच बुद्धी या मुलाला निश्चित अढळपद मिळवून देणार.. हा मुलगा याच गतीनं पुढं जात राहिला तर भविष्यात तो विक्रीकलेतला अमेझॉन होईल. ह्याचं कारण उघड आहे – त्याला आपण स्वतःला कायम Win-Win पोझिशन मध्ये कसं ठेवावं. हे १००% उमगलेलं आहे. “मला उद्या कंपनीतून “अच्छा. टाटा. बाय बाय” असा ईमेल आला तर मी काय करु. ह्या अनिश्चिततेच्या सावटाखाली ही मुलं अडकत नाहीत. ती वेळेवर संधी शोधतात आणि पुढं पुढं जात राहतात.
आपल्या मुलांनी नवा व्यापार किंवा लेगो खेळून आयुष्याचं लॉजिक शिकून घ्यावं असं आपलं धोरण असतं. पण. आपल्याच मुलांच्या वयाची ही मुलं तर जगाच्या पटावर थेट व्यापार करतायत.. आपलं जग हाच केवढा मोठा लेगो आहे आणि हाच सगळ्यात मोठा खेळ ही मुलं वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी खेळतायत…!
मला खात्री आहे की. या मुलाची ही प्रेरणा अशीच कायम राहिली तर. हा मुलगा पुढं जाऊन याच्या कमावलेल्या प्रत्येक रुपयाला पूर्णवेळ कामाला लावणार. महागडे फोन. घड्याळं. महागडे कपडे. चैनीच्या वस्तू यांच्यात पैसे अडकवणार नाही. तो असाच साधा राहिल आणि पैशांना २४*७ कामाला लावेल. तो कदाचित श्रीमंत दिसणार नाही. पण तो श्रीमंत होईल. ती श्रीमंती एखाद्या प्रदर्शनासारखी मांडण्यात त्याला काहीही रस नसेल..
आपलं दुर्दैव हेच आहे की. आपण ह्यांना “गरीब” म्हणतो. ह्यांच्याकडं सहानुभूतीनं बघतो. आपल्याला असं वाटतं की. ह्यांना मदतीची गरज आहे. इथंच आपलं चुकतंय. या मुलांना मदतीची गरज नाहीय. कारण. अतिशय लहान वयात त्यांनी स्वतःला आजमावून पाहिलंय. जगात स्कोप नेमका कशाला आहे. याचं ट्रेनिंग त्यांनी समाजात प्रत्यक्ष वावरुन घेतलंय. ते कुठल्याही परिस्थितीत असले तरीही तरुन जातील. कदाचित इतरांनाही तारून नेतील.
आपण आपल्याला मुलांमध्ये कुठल्याही परिस्थितीतून भक्कम राहण्याचं. स्वतःला आपल्या ध्येयाशी चिकटून राहण्याचं. हिंमत न हरण्याचं. प्रसंगी कोंड्याचा मांडा करुन खाण्याचं धैर्य निर्माण करतो आहोत का? मदतीची खरी गरज तर आपल्याच मुलांना आहे.
असे लोक समाजात वाढले की. समाज आर्थिक महासत्तेच्या चाकांना धावायला लावतो. उद्यमशीलता वाढीस लागते. देशातल्या दारिद्र्यरेषेची पातळी खाली उतरायला सुरुवात होते. समाजातली नवी पिढी स्वयंपूर्णता शोधायला लागते. देशातून पुन्हा सोन्याचा धूर निघायला सुरुवात होते. जग जिंकण्यासाठीचं धाडस आणि प्रेरणा यातूनच निर्माण होते.
कुणी सांगावं. आज रस्त्यावर फूटपाथवर बसून पणत्या विकणारा हाच मुलगा उद्या मोठा नामांकित व्यापारी होईल आणि आपण किंवा आपली मुलं कदाचित त्याच्याच मॉलमधून खरेदी करत असू…
त्याच्याशी दहा पंधरा मिनिटं मस्त गप्पा मारल्या आणि मग एक झकास फोटो काढून घेतला. आज दुपारपासून मला प्रश्न पडलाय – वयाच्या दहाव्या वर्षी विना गुंतवणूक दहा दिवसांत बारा हजार रुपयांचा नफा कमावण्याचं कसब आपल्या मुलांमध्ये कधी येणार?
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक
संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





