वाचताना वेचलेले
☆ बाई ग… लेखिका : सुचरिता ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆
जो दिवस साजरा करण्याची मुळात वेळच येता कामा नये
ज्यासाठी अभिनंदन, शुभेच्छा, कार्यक्रम, विकृत विनोद, सण-समारंभ, भाषणं, सत्कार, व्याख्यान इत्यादी सोहळ्याची गरजच उरता नये
मनातून नष्ट न होणाऱ्या असमानतेच्या एकदिवसीय टोचणीदिनाचं अस्तित्वच असता नये
या तात्पुरत्या शिराळशेठी दिवसाचं काय करायचं, हे नुमजून हळदीकुंकू गजरा-कजरा,साडी,दागिने वगैरे करणाऱ्या स्त्रियांची कीव करावी लागू नये
ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या अंधाऱ्या कपारीपर्यंत पोचताना स्वातंत्रसूर्याची वेळ संपून अवेळी संध्याकाळ होऊ नये
पन्नास टक्यांतील काही टक्क्यांना काही प्रमाणात जोखडातून मुक्तता मिळाली म्हणजे घोडं गंगेत न्हालं असं ठाम विधान प्रचलित होऊ नये
थेट गर्भापासून तिरडीपर्यंत सर्व स्थितीत विकल्या जाणाऱ्या देहांचं बाजारअस्तित्व अमान्य करण्याचं झापडबंद सुखासीन आंधळेपण तुला येऊ नये
एक दिवस वगळता उरलेले तीनशे चौसष्ठ दिवस ज्यांचे आहेत त्यातले शंभर टक्के सगळेजण खलनायकच असतात, असा उलटा एकेरी भ्रम उराशी धरण्याचा मंदपणा तुझ्यात असू नये
म्हणून
तू
लवकरात
लवकर
शहाणी
हो
त्यासाठी
विचार
करायला
सुरुवात
कर
हाच
एक
उपाय
आहे
*
लेखिका:सुचरिता
प्रस्तुती: स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





