श्री नागेश शेवाळकर
विविधा
☆ अधिक मास : महात्म्य!… २ ☆ श्री नागेश शेवाळकर ☆
चित्रबाहू राजाची कहाणी!
महालक्ष्मी विष्णुला म्हणाली, “नाथ, आपण पुरुषोत्तम मासामध्ये दीप प्रज्वलनाची खूप छान माहिती सांगत आहात. आपली वाणी रसाळ आहे त्यामुळे ऐकावेसे वाटते… “
“देवी, तुझी ज्ञानलालसा पाहून मी तुला कथा सांगतो…
सौभाग्य नावाचे एक नगर होते. त्या नगरीचा चित्रबाहू नावाचा राजा होता. तो खूप शूर होता. अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. तो कृष्णाची भक्ती करत असे. दानधर्म करणे ही त्याची आवड होती. एकदा अगस्ती ऋषी त्याच्याकडे आले. चित्रबाहूला खूप आनंद झाला. राजाने ऋषी अगस्ती यांचे स्वागत केले. त्यांची पूजा करताना स्तुतीगान केले. राजा म्हणाला, “ऋषीवर, आपण आलात, मी धन्य झालो. मी माझे राज्य आपल्या चरणी अर्पण करतो. “
“राजा, तुझे राज्य मला नको. तुला भेटून मलाही समाधान वाटले… ” ऋषी बोलत असताना राजाची राणी चंद्रकला तिथे आली. तिने ऋषीला नमस्कार केला. चित्रबाहू राजा म्हणाला,
“ऋषीवर, मला कधीकधी असा प्रश्न पडतो की, माझे असे कोणते पुण्याचे काम आहे की, मला राजपद मिळाले. मोठे वैभव प्राप्त झाले. चंद्रकलेसारखी गुणवान पत्नी मिळाली. “
अगस्ती ऋषी काही क्षण डोळे लावून बसले. थोड्या वेळाने डोळे उघडून ते म्हणाले, “मी डोळे लावून बसलो होते तेव्हा मला तुझ्या पूर्व जन्माची हकिकत समजली. चमत्कार नावाचे एक नगर होते. त्या शहरात मणिग्रीव नावाचा एक मानव राहत होता. मणिग्रीव म्हणजे तू! या जन्मात जसा तू सदाचारी आहेस तसा त्या जन्मात नव्हता. तू अत्यंत पापी होता. तुझ्या पत्नीचे नाव सुंदरी होती. सुंदरी म्हणजेच चंद्रकला! पापी पतीसोबत सुंदरी पत्नीधर्म पाळत त्याच्यासोबत राहत होती. मणिग्रीवाच्या वाईट कामाला, त्रासाला त्याच्या गावातील लोक कंटाळले होते. गावकऱ्यांनी मणिग्रीवाला गावातून हाकलून दिले. बृहद्बल त्या राज्याचा राजा होता. त्याने त्याची सारी संपत्ती जप्त केली. त्याला पत्नीसह जंगलात हाकलून दिले.
अरण्यात राहत असलेले मणिग्रीव आणि त्याची पत्नी प्राण्यांची शिकार करून भूक भागवत असत. त्या दोघांना त्या अरण्यात राहताना बराच काळ झाला. एकेदिवशी त्या अरण्यातून एक तपस्वी जात होता. त्याचे नाव उग्रदेव होते. चालताना थकल्यामुळे उग्रदेवाला चक्कर आली. तो जमिनीवर कोसळला. मणिग्रीव आणि त्याच्या पत्नीने त्याला पाहिले. मणिग्रीवाने त्याच्यावर उपचार केले. उग्रदेव शुद्धिवर येताच त्याला मणिग्रीवाने आपल्या घरी आणले. त्याला फलाहार दिला. मणिग्रीवाने त्याची विचारपूस केली.
“मी यात्रेकरू आहे. चालताना माझा रस्ता चुकला. या अरण्यात फिरत असताना खूप श्रम झाल्यामुळे तसेच खूप भूक लागल्यामुळे गरगरल्यासारखे झाले. मी खाली कोसळलो. बेशुद्ध झालो. तुम्ही मला जीवदान दिले. तुम्ही दोघे या अरण्यात का राहता? तुम्ही कोणत्या नगरीचे आहात. मला तुमची काही मदत करता आली तर आनंद होईल. ” उग्रदेवाने म्हणाला. मणिग्रीव त्याची सारी कहाणी उग्रदेवाला ऐकवून म्हणाला,
“मी अनेक दुष्कृते केली आहेत. त्याची शिक्षा म्हणून मी या अरण्यात राहत आहे. माझ्या या साऱ्या प्रवासात माझी पत्नी माझ्यासोबत राहिली. तिची काहीही चूक नसताना तिला अशी शिक्षा भोगावी लागत आहे. सध्या आम्ही फार दुःख भोगत आहोत. यातून बाहेर पडण्याचा नि सुख, शांती, सदाचाराने राहता येईल असा मार्ग मला सांगावा. “
“तू माझी सेवा केलीस. माझा जीव वाचवलास यामागे निश्चितच काहीतरी ईश्वरी संकेत आहे. तुम्हा दोघांचा भाग्योदय मला समोर दिसत आहे. काही दिवसांतच पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. या महिन्याचे महत्त्व अलौकिक आहे. पुरुषोत्तम मासात भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करावी. कृष्णमूर्तीसमोर संपूर्ण महिना नंदादीप लावावा. देवाला नैवेद्य दाखवावा. हे व्रत अत्यंत लाभदायक आहे. हे व्रत केल्याने तुमचा हा अरण्यवास संपुष्टात येईल असा मला विश्वास आहे. ” असे सांगून उग्रदेव पुढील यात्रा करण्यासाठी निघून गेला.
लवकरच पुरुषोत्तम मास आला. मणिग्रीव आणि सुंदरीने उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाची मनोभावे, यथोचित पूजा केली. त्याचे फळ त्याला मिळाले. मणिग्रीवाच्या स्वभावातील उग्रता नष्ट झाली. मनाला अभूतपूर्व शांती मिळाली. दुष्कर्म करण्याची वृत्ती नाहीशी झाली…
वरील सारा वृत्तांत कथन करून अगस्ती ऋषी म्हणाले, “चित्रबाहू, असा आहे तुझा मागचा जन्म. उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे तू पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्रीकृष्णाची मनोभावे सेवा करताना संपूर्ण महिना दीप लावला. ते पुण्य गाठीशी होते म्हणून या जन्मात हे सारे वैभव तुला प्राप्त झाले. ” असे सांगून अगस्ती ऋषिंनी चित्रबाहू राजाचा निरोप घेतला…
“नाथ, आपण अत्यंत सोप्या भाषेत चित्रबाहू राजाची कहाणी मला ऐकवली. मला खूप समाधान मिळाले… ” लक्ष्मीदेवी अत्यंत प्रसन्नतेने म्हणाली.
००००
फलदायी मौनव्रत!
श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णू बोलत असताना लक्ष्मी म्हणाली, “भगवान, आपण सांगितलेल्या कथा ऐकून पुरुषोत्तम मासाबद्दल म्हणजेच त्या मासाच्या कथा ऐकण्याची उत्कट इच्छा होत आहे. एखादी गोष्ट सांगाल का?”
“देवी लक्ष्मी, आपली इच्छा जाणून मी मौनव्रताची माहिती सांगतो… “
“मौनव्रत? म्हणजे चक्क बोलायचेच नाही… “
“होय! तेही संपूर्ण पुरुषोत्तम मास मौन पाळायचे… “
“काय? महिनाभर बोलायचे नाही? कसं शक्य आहे? तेही पृथ्वीवरील मानवाला?”
“का शक्य नाही? भक्ती करणे साधी गोष्ट नाही. कठीण तपस्या केली तर त्याचे फळही तसेच मिळते. “
“देवा, मला मौनव्रताची माहिती द्यावी. “
“देवी, व्रताची माहिती नक्की देईन पण आपण मौनव्रत धारण करू नका… ” असे म्हणत श्रीविष्णू हसले. सोबत लक्ष्मीही हसली.
“ऐका, आता. मौनव्रत म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये दररोज एक वेळ जेवण करायचे आणि जेवण होईपर्यंत बोलायचे नाही… “
“देवा, आपण पण असे आहात ना! अहो, महिनाभर मौन ही कल्पनाच अंगावर भीतीचे शहारे आणणारी आहे. फक्त जेवताना बोलायचे नाही हे व्रत त्यामानाने सोपे वाटत असले तरीही ते तितके सोपे नाही. भगवान, मला सांगा, हे व्रत कुणी केले आहे का?”
“हे व्रत मुनीवरांनी केले आहे. “
“काय? देवर्षी नारदांनी हे व्रत केले आहे? कधी, का, कशासाठी?”
“सांगतो. पूर्वीच्या जन्मात नारद मुनी दासी पुत्र होते. पुरुषोत्तम मासात हे मौनव्रत धारण केल्याने पुण्य मिळते म्हणून त्या दासी पुत्राने ते व्रत मनोभावे केले. हे व्रत केल्याने त्याला साधुंचा सहवास लाभला. साधुंच्या सोबत कुरुक्षेत्र येथे त्याने अधिक मासाचे औचित्य साधून तीन दिवस मौनव्रत पाळले. त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी नारदाला अनेक विद्यांची शिकवण दिली. आपल्या शिष्याला त्यांनी मानसपुत्र मानले. असा आहे मौनव्रताचा महिमा तोही अधिकमासातील!”
“महाविष्णू, मुनीवराची ही माहिती मला नव्हती. आपण ती सांगितली. मी धन्य झाले. “
“लक्ष्मीदेवी, प्रत्यक्ष इंद्रदेवाला या व्रताचा फायदा झाला हे तुला माहीत आहे का?”
“काय सांगता? इंद्रदेवाने मौनव्रत पाळले पण का? अशी कोणती वेळ इंद्रावर आली की, त्यांनी मौनव्रत धारण केले. “
“सांगतो ऐक. पूर्वी अवंतीनगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव वेदशर्मा! तो अत्यंत ज्ञानी, योगी होता. वेदशर्मा वृद्ध झाला असताना अधिकमास आला. तेव्हा वेदशर्माने उपवास करण्याचा विचार केला. परंतु तो शरीराने थकला होता. इच्छा प्रबळ होती परंतु शरीर साथ देईल का नाही ही शंका होती. तो विचारात असताना चमत्कार घडला. एका रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात एक दिव्य पुरूष अर्थात देव आले. ते म्हणाले, “वेदशर्मा, तू तुझ्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उपवासाचे व्रत निश्चितच करू शकशील. तू मौनव्रत अवश्य कर. “
ते स्वप्न म्हणजे ईश्वरी संकेत मानून वेदशर्माने मौनव्रत धारण केले. ईश्वरी शक्ती पाठीशी असल्याने त्याने ते व्रत पूर्णत्वास नेले. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले. त्याला आशीर्वाद देताना वरदानही दिले. त्यामुळे वेदशर्माने परोपकाराची अनेक कामे केली. त्याचे भाग्य फळाला आले. त्याला श्रीविष्णुने विमान पाठवून वैकुंठात नेले. वैकुंठात जात असताना प्रत्यक्ष इंद्राने त्याला थांबवले. इंद्र म्हणाला, “वेदशर्मा, तू पुण्यवान आहेस. सध्या माझे वृत्रासुरासोबत युद्ध सुरू आहे. तू पुरुषोत्तम मासामध्ये मौनव्रत पाळले होते. तुला त्याचे फळ मिळाले. माझी अशी इच्छा आहे की, तुला जे फळ प्राप्त झाले आहे, त्यापैकी फक्त एका दिवसाचे पुण्य मला द्यावे. त्यामुळे मी वृत्रासुरासोबतचे युद्ध खातरीने जिंकू शकेल. ” इंद्राची इच्छा परोपकारी वृत्ती असलेल्या वेदशर्माने तत्काळ पूर्ण केली. तो वैकुंठात निघून गेला. इंद्रदेवाने वेदशर्माकडून प्राप्त झालेल्या फळामुळे वृत्रासुराचा युद्धात पराभव केला…
“देवी लक्ष्मी, असा आहे, अधिक मासातील मौनव्रताचा फायदा किंवा फळ!”
“भगवान, खरे आहे. मौनव्रत हे तसे कठीण वाटत असले तरीही त्याचे फळ मात्र अलौकिक आहे. ” लक्ष्मी म्हणाली.
००००
अधिक मासातील पर्वकाळ!
भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या संवादातून भक्तांना अधिक मासासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळत होती. लक्ष्मीने विचारले, “माधवा, मला एका गोष्टीची उत्सुकता लागली आहे. ती म्हणजे, अधिक मासात कोणते पर्वकाळ येतात? त्याची वैशिष्ट्ये नि त्यापासून भक्तांना होणारे लाभ याबाबत माहिती सांगावी. “
“अवश्य! देवी, मला माहिती आहे, हे प्रश्न तू स्वतःसाठी नव्हेतर भक्तांच्या ज्ञानासाठी, उत्कर्षासाठी विचारत आहेस. पुरुषोत्तम मासात व्यतिपात, पोर्णिमा, वैधृती, द्वादशी तसेच अमावस्या हे पाच पर्व येतात. व्यतिपात या पर्व काळात उपासनेमुळे यमधर्म समाधानी होतो. व्यतिपाताच्या दिवशी सुवर्ण दानाचे महत्त्व आहे, तप करून आणि तेरा फळे दान केल्यास पुण्यफळ मिळते. जे भक्त पोर्णिमेच्या दिवशी धार्मिक विधी करतात तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळतो. ज्या दिवशी वैधृती असते त्यादिवशी स्नान, होमहवन आणि दान करतो त्या भक्ताला इच्छित ते सारे मिळते. पुरुषोत्तम मासातील द्वादशीचा योग साधून खुद्द पुरुषोत्तम प्रसन्न होतो. अमावस्या हे अधिक मासातील शेवटचे पर्व! यादिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून यथाविधी, यथाशक्ती दानधर्म, अन्नदान केल्यास आपले पूर्वज आनंदी होतात. “
“हरीहर, पाच पर्वांची माहिती नि चार पर्वांचे महत्त्व खूप छान, सोप्या भाषेत सांगितले. त्रिविक्रमा, आता द्वादशी ह्या पर्वाचेही महत्त्व सांगावे. “
“रमादेवी, आपण किती एकरुप होऊन ऐकत आहात हे या प्रश्नावरून लक्षात येते. आपली जिज्ञासू वृत्ती खरेच वाखाणण्याजोगी आहे. ऐक. अधिक मासातील एकादशीला उपवास करावा. द्वादशीचे महत्त्व अपरंपार आहे. कुण्या भक्ताला अनेक तीर्थयात्रांचे पुण्य घरबसल्या मिळवायचे असेल तर त्याने आवळीच्या झाडाजवळ जावे. त्या झाडाच्या बुंध्याशी (अर्थात जे झाड नैसर्गिकरित्या नष्ट झालेले असते. परंतु जमिनीवर खोडाचा भाग शिल्लक राहतो) केलेले पिंडदान थेट आपल्या पूर्वजांना मिळते. तसेच ब्राह्मणाला अन्नदान करावे. शक्य असेल त्याने पुढील दाने अवश्य करावीत ती म्हणजे भूमीदान, वस्रदान, गोमाता दान करावे. तुप मिसळून केलेले अन्नदान करावे. हे दान खूप फलदायी आहे. विष्णुप्रिये,
तुझी ज्ञानलालसा पाहून तुला दानाची अधिक माहिती देतो. व्यतिपात, द्वादशी आणि पोर्णिमा या तीनही दिवशी किंवा कोणत्याही एकादिवशी तुपामध्ये तेहतीस अनारसे तळावेत. त्यावर स्वच्छ कापड झाकावे. त्याची पूजा करावी. भोजन दक्षिणेसह ते ब्राम्हणास दान करावे. म्हणजे भरपूर पुण्य मिळते. असा आहे अधिक मासातील पर्वकाळाचा महिमा!”
” हे पद्मनाभा, खरेच अधिक मासातील पर्वकाळाची माहिती आपण खूप छान सांगितली आहे. श्रीहरी!”
००००
पुरुषोत्तम मास: स्नान महात्म्य!
पुरुषोत्तम मासाच्या कथा तन्मयतेने ऐकणाऱ्या लक्ष्मीदेवीने पतीला विचारले, “हृषिकेशा, आपण अधिक मासाची भरपूर माहिती दिली आहे. आता फक्त एकच सांगावे, या मासात स्नानाचे काही महत्त्व आहे का?”
“देवी, अगदी योग्य विचारलेस, त्यासंदर्भातील तुला एक कथा सांगतो. त्या कथेतून तुला स्नानाचे महत्त्व समजून येईल. ऐक. शिवपुरी नावाचे एक नगर होते. हे नगर शंकराला अतिशय प्रिय होते. गोकर्ण पर्वताच्या सान्निध्यात हे नगर वसलेले होते. नगरातील लोक अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. पूजा, भजन, वेदमंत्र, प्रवचन, कीर्तन यात रमणारे नागरिक सतत धर्मकार्ये करत. अशा या पावन भूमीत विप्रदास नावाचा मनुष्य राहत होता. सोबत त्याची पत्नी होती. दोघेही सत्शील, धर्मपरायण होते. धार्मिक विधी ते आवडीने करत. गोकर्णाच्या पायथ्याशी गोकर्णी नावाची नदी होती. तिथेच एक शिवलिंग होते. सारणेश्वर या नावाने ते शिवलिंग प्रसिद्ध होते. गोकर्णी नदीत स्नानाचे अपरंपार महत्त्व होते. अधिक मासाचे औचित्य साधून विप्रदासाने त्याच्या पत्नीसह संपूर्ण महिना नदीत स्नान केले. महिन्याच्या शेवटी केलेल्या कार्याचे उद्यापन केले. ब्राह्मणांना भोजन-दक्षिणा देऊन दोघेही मोठ्या आनंदाने घरी निघाले. थोडे चालून जाताच शेकडो प्रेतात्मे अचानक त्यांच्यासमोर आले. दिसताक्षणी कुणीही घाबरेल असेच त्यांचे राहणीमान होते. परंतु विप्रदास घाबरला नाही. तो निर्भीडपणे त्या प्रेतात्म्यांच्या समोर उभा राहिला. त्या प्रेतात्म्यांनीही विप्रदासाकडे पाहिले. त्याचा परिणाम असा झाला की, त्या प्रेतात्म्यांची क्रुरशक्ती नष्ट झाली. अनेक प्रेतात्मे शांत झाले परंतु बरेचसे प्रेतात्मे क्रुर दिसत होते. त्यांच्याकडे पाहताच विप्रदासाची पत्नी खूप घाबरली. ती दूर जाऊन लपली. विप्रदासाने प्रेतात्म्यांना विचारले,
“आपल्या सर्वांची अशी दुर्गती का झाली?” त्यावर अनेकांनी त्यांनी पूर्वजन्मात केलेल्या पापांची माहिती दिली. त्यांची कहाणी ऐकून विप्रदास त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली. त्याने अधिक मासात गोकर्णी नदीत केलेल्या स्नानापैकी सात दिवसांच्या स्नानाचे पुण्य त्या प्रेतात्म्यांना दिले. तत्काळ चमत्कार घडला. त्या सर्व प्रेतात्म्यांना पूर्वीचे शरीर प्राप्त झाले. ते स्वर्गात गमन करते झाले. ” असे सांगून भगवान विष्णू थांबले. लक्ष्मीदेवी म्हणाली,
“हे संकर्षणा, पुरुषोत्तमा, आपण पुरुषोत्तम मासाची सर्वंकष महत्त्व खूप उत्कृष्टपणे सांगितले आहे. आपण सांगितलेला महिमा ऐकून भक्तगण मोठ्या भक्तिभावाने अधिक मासाचे व्रत, पूजा करतील हे नक्की!
जय श्रीकृष्ण! जय भगवान विष्णू!!
अधिकमास महात्म्य समाप्त!
००००
© श्री नागेश शेवाळकर
पुणे
मोबा. ९४२३१३९०७१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





