सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ हनुमद्रामायण ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

राम अवतार समाप्त झाला. हनुमानाला खूप दुःख झाले. हिमालय पर्वतावर आपल्या अरण्यातील निवासस्थानी तो परत गेला. आपल्या सर्व प्रियजनांच्या आणि मित्रांच्या मृत्यूच्या बातम्या त्याला ऐकाव्या लागल्या. विमनस्क अवस्थेत तो हिमालयाच्या उतरणीवर एकांतात ध्यानधारणा करू लागला. त्याला वाटले आपण आपल्या स्वामींच्या सर्व थोर पराक्रमांची नोंद करून ठेवावी. ज्या पर्वत शिखराच्या खाली त्याची गुहा होती, ते शिखर चकाकत्या स्फटिकापासून बनलेले होते. आपल्या हिऱ्यासारख्या नखांनी त्याने त्यावर रामाची कथा कोरण्यास सुरुवात केली. देववाणी संस्कृत मध्ये वर्षानुवर्षे तो त्यात रमून गेला. वाल्मिकींना ही वार्ता कळली. कुतूहल वाटून ते त्या ठिकाणी आले. त्यांची उत्सुकता पाहून हनुमान त्यांना उचलून एका कड्यावर घेऊन गेला. सावकाश वाचा म्हणाला. वाल्मिकी वाचत राहिले. ती कथा त्यांना अत्यंत भावली. हनुमानाच्या भक्तीच्या प्रभावाने ते भारावून गेले. कथा संपल्यानंतर त्यांच्या मुखावर आनंद आणि दुःख दोन्ही छटा चमकून गेल्या. हनुमानाने नम्रपणे विचारले, “महर्षी, माझे काही चुकले आहे का? ” वाल्मीकि म्हणाले, ” तुझी उत्कृष्ट कलाकृती पाहून मला काही सुचत नाही. बारा वर्षे कष्ट घेऊन मी जी कथा लिहिली ती कथा तुझ्या या कलाकृती पुढे तुच्छ आहे. ” हनुमान अवाक् झाला. त्याला वाल्मिकी ऋषींच्या चिंतेचे कारण कळले. त्याने ताबडतोब पर्वतावरील ज्या शिळांवर काव्य रचले होते त्या शिळा ओढून काढल्या. आपल्या खांद्यावर रचल्या. दुसऱ्या खांद्यावर वृद्ध ऋषींना बसवले आणि तो समुद्रावर गेला. समुद्राच्या मध्यावर आल्यावर तो जोराने ओरडला, ” माझ्या स्वामींना मी हे अर्पण करीत आहे. “” असे म्हणून त्याने आपल्या कथेची आवृत्ती समुद्रात सोडून दिली. सर्व लिखाण समुद्राच्या तळाशी गेले. शर्मेने आणि अपराधी भावनेने एक शब्दही न बोलता वाल्मिकी ऋषी बघतच राहिले. त्यांच्या मनात विचारा आला, जर याने मला समुद्रात फेकून दिले असते आणि आपली अद्भुत कथा वाचवली असती तर अधिक बरे झाले असते. हनुमान आनंदी होता. त्याने ऋषींना त्यांच्या आश्रमात नेऊन सोडले. तो म्हणाला,

“मी केवळ वेळ घालवण्यासाठी हे लिखाण करत होतो. आपण कृपया झाल्या गोष्टीची चिंता करू नये. “

हनुमान सामीनिष्ठ होता. एका कवीचा दुखरा अहंकार जोपासण्यासाठी त्याने स्वतः स्वतःची उत्कृष्ट कलाकृती बुडवली. हे सर्वात पहिले आणि थोर रामायण होते. त्याचे नाव हनुमद्रामायण. मूळ वेद संहितेप्रमाणेच हे रामायण देखील नष्ट झाले. आणि केवळ तुकड्यांच्या रूपात शिल्लक राहिले.

हनुमानाने वाल्मिकींना वंदन केले. वाल्मीकींनी त्याला आशीर्वाद दिला व म्हणाले, ” हे वायुपुत्रा, अन्य युगात मी पुन्हा जन्म घेईन आणि तुझ्या सेवेला वाहून घेईन. मी तुझे स्तुतिगान गाईन आणि इतरांनाही ते गायला शिकवेन. तू सांगितलेली कथा मी सामान्य माणसाच्या भाषेत पुन्हा एकदा सांगेन. ” हनुमान हसून म्हणाला, ” श्रीरामांचा विजय असो. “

असे म्हणतात की, रामचरितमानस रचणारे संत तुलसीदास म्हणजेच महर्षी वाल्मिकीच होते.

त्यानंतर महाकवी कालिदासाच्या काळात एक शिळा वाहत किनाऱ्यावर आली. पण त्यावर लिहिलेली लिपी कुणालाच कळेना. कालिदासाने खूप खटपट करून त्याचा प्रयत्नपूर्वक उलगडा केला आणि तो हनुमानाने लिहिलेल्या हनुमान रामायणाचा एक भाग आहे असा शोध लावला. एका अजरामर श्रेष्ठ कलाकृतीचा निदान एक श्लोक तरी वाचायला मिळाला म्हणून तो स्वतःला खूप भाग्यवान समजत असे.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

सुंदर!