सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ गांधारी – लेख क्र. ३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
मी गांधारी ! गांधार देशाचा राजा, सुबल याची कन्या! बालपणापासून मी शिवभक्त होते. सौंदर्य आणि शालीनता यांचा सुरेख संगम माझ्यात आहे असे सारे म्हणायचे. म्हणायचे, राजाला काहीच काळजी नाही, एखादा सुशील, सुकुमार, राजकुमार येऊन तिला घेऊन जाईल. राग, द्वेष, मत्सर, भेदभाव या गोष्टी कधी माझ्या मनाला शिवल्याच नाहीत. जे योग्य आहे, सत्य आहे, मानवतेचा सन्मान करणारे आहे, त्याच गोष्टी रुचल्या.
पितामह भीष्म यांनी दूताकारवी हस्तिनापूर नरेश धृतराष्ट्र, यांच्यासाठी आमचा हात मागितला. पिताश्री खुश झाले. कारण गांधार देश लहान पण समृद्ध होता. त्यामुळे सतत आक्रमणांना तोंड द्यावे लागे. जर ही सोयरीक झाली तर आपलं बळ वाढेल. कोणी आक्रमण करण्याचे धाडस करणार नाही. पण धृतराष्ट्र अंध आहेत हे ऐकल्यावर मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. काय करावं, अशा द्विधा मनस्थितीत ते होते. इतकी चांगली सोयरीक तोडायची हेही अवघड होतं. पिताश्रींची अडचण माझ्या लक्षात आली. मी म्हणाले, “तुम्ही एखादा पराक्रमी राजकुमार पाहिला असता आणि उद्या युद्धात तो अपंग झाला असता तर ? राज घराण्यातील स्त्रियांना कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. माझी ती आहे. तुम्ही मनात कोणताही किंतू न आणता, विवाह निश्चित करावा असं मला वाटतं. ” पिताश्रींना गोष्टी पुढे नेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि विवाह झाला पण एक निश्चय मी मनाशी पक्का केला होता जे सुख माझ्या पतीला मिळत नाही ते सुख मी घेणार नाही. त्यांचं दुःख ते माझं दुःख असेल. आणि मी डोळ्यावर आजन्म पट्टी बांधण्याचा निर्णय घेतला. एका पतिव्रतेचे हेच तर कर्तव्य असते ना! मग त्यात वैषम्य वाटण्याचं कारण काय?
मला शंकराकडून मिळालेल्या वरानुसार शंभर मुलगे झाले. शंभर मुलांचा जन्म, त्यांची निगराणी यात दिवस कसे जात होते कळत नव्हतं. राजमहालाच्या शिस्तीप्रमाणे मुलांना युद्ध कलेचे, राज्य कारभाराचे धडे मिळत होते. राजा पंडूच्या मृत्यूनंतर राणी कुंती आपल्या पाच मुलांना घेऊन हस्तिनापूरला आली आणि त्या मुलांनाही युद्ध कलेचे धडे सुरू झाले. त्या मुलांचं येणं आमच्या मुलांना खटकलं. त्यांचा शूरपणा, कौशल्य पाहून त्यांच्याबद्दल प्रेम वाटण्याऐवजी असूया निर्माण झाली. त्या मुलांना त्रास द्यायला दुर्योधन, दुःशासन यांच्या खोड्या सुरू झाल्या. आम्ही रोज सगळ्यांना एकत्र बसवून नीतिमत्तेचे धडे देत होतो. चांगल्या वर्तणुकीच्या गोष्टी सांगत होतो. पण त्याचा काही उपयोग होतांना दिसत नव्हता. मुलं जशी मोठी होत होती तसा मत्सर वाढतच चालला. त्यातच उद्या हे पांडव, ऐश्वर्याचे वाटेकरी होणार हे नक्की होतं. त्यामुळे तर राजा धृतराष्ट्र, भाऊ शकूनी यांनी या द्वेशात भर टाकायला सुरुवात केली. मुलं कुठे चुकतात हे बघून दुरुस्ती करायची सोडून ती कशी बरोबर आहेत हेच मला पटवायला सुरुवात केली.
सर्वांचे पांडव नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले. रोज एक एक गोष्टी ऐकून माझ्या काळजाला घरे पडत होती. जे चालले आहे हे चांगलं नाही कुठेतरी थांबलं पाहिजे. याने काही चांगलं घडणार नाही. ही सर्वनाशाची नांदी आहे, हे कळत होतं. सगळ्यांना हे सांगून सांगून आम्ही दमलो. धृतराष्ट्र स्वतः अंध असल्याने त्यांच्या मनात प्रथम पासूनच आपण ज्येष्ठ असून राजा होऊ शकत नाही त्यामुळे पंडू राजांवर राग होताच. शकुनी नवे नवे डाव रचण्यात मातब्बर होता. त्याचे डाव सफल करण्यासाठी आमची प्रजा होतीच. मत्सर हा असा रोग आहे की तो कधीच कमी होत नाही. काळा बरोबर वाढत जातो. वैषम्य या गोष्टीचं वाटत होतं की, मी ना धृतराष्ट्रांचं, ना शकुनीचं, ना आमच्या मुलांचं मतपरिवर्तन करू शकले. आई म्हणून मुलांना चांगले विचार देण्यास असमर्थ ठरले. पांडवांच्या चारित्र्यवान, सत्शील, सदाचारी वर्तणुकी पाहिल्या की कुंतीचं कौतुक वाटायचं. आणि आपलं कांहीतरी चुकतंय, या गोष्टीची खंत वाटायची. आम्ही शिवाला साकडं घातलं तरी ते ही प्रसन्न झाले नाहीत. सगळ्या गोष्टी बिघडतच गेल्या. युद्धाची ठिणगी पडली. मुलांना वाटत होतं, भीष्म पितामहांपासून सगळे आपल्या बाजूने लढणार आहेत. तर पांडव व त्यांच्या तोकड्या सैन्याचा पराभव करणे फारच सोपं आहे. युद्ध टाळायचे आम्ही खूप प्रयत्न केले कारण कोणीही हरलं तरी नाश हा कुरुवंशाचाच होणार होता. हीच शक्ती राज्याचा विस्तार करण्यासाठी, काही विधायक कामासाठी खर्ची पडली असती तर!
युद्धाला जाण्यापूर्वी नमस्कार करण्यासाठी पांडव आले. आशीर्वाद देताना ‘यशस्वी व्हा’ म्हणायला जीभ धजावली नाही, ‘पराजित व्हा ‘असं म्हणणं मनातही येणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आम्ही ‘सत्याचाच विजय होवो’ असाच आशीर्वाद देऊ शकलो. युद्धात रोज कुणीतरी धारातीर्थी पडल्याच्या बातम्या येत होत्या. युद्धावर न गेलेले आम्ही सर्व रोज एक मरण मरत होतो. युद्ध संपलं. जी भीती होती तेच झालं. डोळ्यावर पट्टी असून सुद्धा आम्हाला रणांगणावर पडलेला शवांचा खच दिसायचा. त्यांच्या विधवा, त्यांची मुले यांचा आक्रोश ऐकू यायचा. सगळ्या जाणिवाच बधिर झाल्या होत्या. डोकं सुन्न झालं होतं. दुष्टपणा इतक्या पराकोटीला पोहोचला होता की नवजात अर्भकांचीही त्यातून सुटका झाली नाही. आता डोळ्यातून बाहेर पडायला अश्रुही शिल्लक नव्हते. अन्न पाणी तोंडात घेण्याची इच्छा होत नव्हती. जेव्हा कृष्ण व पांडव समोर आले त्यावेळी माझ्या मनात पांडवांबद्दल खरं म्हणजे खूप राग होता. कारण युद्धाचे नियम मोडून त्यांनी सर्व तुल्यबळ योद्ध्यांचे वध केले होते. पण शेवटी असं वाटलं की युद्ध करायला तर आपणच भाग पाडले आणि नियमबाह्य कृत्य करायला कृष्णाने सांगितले. त्यामुळे पांडवांना दोष देण्यात काय अर्थ?कृष्ण मात्र हे युद्ध टाळू शकले असते. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा राग मात्र मी रोधू शकले नाही आणि त्यांना शाप दिला. “जसं भावा-भावात युद्ध घडवून कुरुवंशाचा संहार केलात, तसंच तुमचे यादव ही परस्परात भांडून नष्ट होतील. ” माझ्या, एका सर्वस्व गमावलेल्या मातेच्या, शापात तेवढं बळ होतं की तो खरा ठरेल.
शेवटी आम्ही तिघांनी, मी, धृतराष्ट्र राजे, कुंती, वानप्रस्थाश्रम घेऊन वनात जायचं ठरवलं आणि कांहीं दिवसांतच आम्हाला दावानलाने घेरलं, आमची राख झाली. जे जे आम्ही भोगलं ती आमच्या पापांची फळं असतील तर, हे सदाशिवा!आम्हाला यापेक्षाही वाईट मरण दिलं असतंस तरी चाललं असतं पण आता पुढच्या जन्मी भोगण्यासाठी काही शिल्लक ठेवू नकोस.
माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत त्यांची उत्तरे तुम्ही देऊ शकाल कां? मुलांचे माता पिता म्हणून आम्हीच या संहाराला जबाबदार आहोत कां हो? मी आई म्हणून पूर्ण हरले आहे कां? मुलांना काही चांगल्या गोष्टी सांगणे त्यांचे मन वळवणे एवढंच असतं ना आपल्या हातात? मी माझं कर्तव्य करण्यात कमी पडले कां? कां माझं काहीच संचित नव्हतं, कि हा संहार थांबू शकेल? की डोळ्यावर पट्टी बांधण्याचा माझा निर्णय चुकला होता? सगळ्या प्रश्नांचा भुंगा मेंदू पोखरतोय. कशाचीच उत्तरे सापडत नाहीत!!
मी हरले, पूर्ण हरले!
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








तुमच्या लेखणीतून गांधारी छान व्यक्त झाली.
तुमच्या अभिप्रायामुळे लेखनाला नवीन उभारी मिळेल.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!!