सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ व्याकरण योद्धा… लेखिका : सुश्री नंदिनी लोंढे ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे ☆

बऱ्याच वर्षांपूर्वी भूलशास्त्राशी संबंधित ब लेख वृत्तपत्रात छापायचे होते. लेख तयार झाला; पण तो कोणाकडून तरी तपासून घेतला पाहिजे असे वाटले. माझ्या विभागप्रमुख मदतीला धावल्या. ‘मम्मीकडून तपासून घेते, ‘ एवढेच उत्तर मिळाले. तपासून झालेल्या लेखांचे टिपण दोन-तीन दिवसांत हाती आले. अधूनमधून दुरुस्त्या दिसल्या अन् शेवटी शेरा होता… ‘ ‘भाषाशैली सुरेख ! मांडण्याची पद्धत उत्तम.!’ तोपर्यंत ‘मॅडमच्या मम्मी’ म्हणजे नक्की कोण याची माहिती मी काढली होती. व्याकरण क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आणि ‘बालभारती’च्या मराठी व्याकरणासाठी झटणाऱ्या वाङ्मयीन लढवय्या अशी बिरुदे मिरवणाऱ्या यास्मिन शेख यांच्याबद्दल वाचत गेले तशी मी थक्क होत गेले!

त्या दरम्यान आमच्या विभागप्रमुख डॉ. शमा भागवत यांच्या घरी जाण्याचा योग आला. दुमदार हिरवाईने नटलेल्या, उच्च अभिरुचीने सजविलेल्या घराच्या दारातच प्रसन्न तेजःपुंज व्यक्तिमत्त्व सामोरे आले. गुलाबी नितळ म्हणावा असा गोरा रंग, गुलाबी साडी, कृश; पण निरोगी ताठ बांधा, स्निग्ध प्रेमळ डोळे आणि चेहेऱ्यावर विलसणारे ऋजू स्मितहास्य. बघता क्षणी मनावर छाप पाडणारे हे राजस आणि लोभस व्यक्तिमत्त्व होते यास्मिन शेख. बोलताना सतत जाणवत होते, ते त्यांचे मराठी भाषेवरील निरतिशय प्रेम, आस्था आणि मनापासून कळकळ.

भूतकाळात डोकावून पाहता विस्मयचकित करणारा त्यांचा इतिहास समोर आला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव जेरुशा जॉन रुबेन. जन्माने ज्यू. जगभर पांगलेले ज्यू भारतातही पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर आले. बघता बघता इथलेच होऊन गेले. इथली संस्कृती, भाषा अवगत करून इथेच रुळले. जेरुशा जन्माने नाशिककर; पण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या आयुष्याची जडणघडण झाली. श्री. पु. भागवत, वसंत कानेटकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या प्रभावाखाली मराठी भाषेत त्यांनी बी. ए. ला सुवर्णपदक पटकावले. अध्यापनाची आवड जोपासण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागल्या. या दरम्यानच कानेटकरांच्या मध्यस्थीने समान आवड असणाऱ्या अझीझ शेख यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि जेरुशा रुबेन यास्मिन शेख झाल्या. शुद्ध आणि सुरेख मराठी बोलताना समोरच्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य टिपताना त्या नेहमीच म्हणतात, ‘भाषेला धर्म नसतो. ज्या राष्ट्राने तुम्हाला आसरा दिला, ज्याने तुमची स्वतःची ओळख पटवून दिली, त्या राष्ट्राची भाषा हीच मातृभाषा असते. ‘

कागदोपत्री, वैचारिक किंवा वैज्ञानिक लेखनासाठीची मराठी ही प्रमाण भाषाच असली पाहिजे याबद्दल त्या आग्रही आहेत. भावभावना पोहोचवण्यासाठी बोली भाषा अवश्य असावी; पण त्यामध्येही इंग्रजी शब्दांचा वापर टाळला पाहिजे, याबाबतीत त्या ठाम आहेत. मराठीच्या दुर्दशेसाठी आपण सारेच कारणीभूत आहोत असे त्या मानतात. त्यावरच्या उपायांचा सतत पाठपुरावा त्यांनी केला. व्याकरणावरील त्यांची पुस्तके ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्द लेखनकोश’ आदर्श मानली जातात. अतिशय रूक्ष वाटणारा हा विषय त्यांनी सहजतेने उलगडून सोपा केला. त्याबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

आजही तेवढ्याच जोमाने त्यांचे लेखन-वाचन सुरू आहे. वर्तमानपत्रात व्याकरणाचे सदर लिहितात. ‘अंतर्नाद’ मासिकात व्याकरण सल्लागाराच्या भूमिकेत भरीव कामगिरी करून उच्चतेचा एक मापदंड प्रस्थापित केला आहे. मुद्रिते तपासताना सकारात्मक राहून सतत कार्यमग्न राहणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देणे हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असावे. आज वयाची शंभर वर्षे पार करताना शरीराबरोबरच त्यांच्या प्रसन्न, नम्र मनाचेही कौतुक वाटते. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण अफलातून स्मरणशक्ती यांची दैवी देणगी त्यांना लाभल्याचे पुन्हा पुन्हा जाणवते. स्वतःच्या हाताने लिहिण्यातील आनंद त्यांना अनेक वर्षे लाभो. त्यांनी हाती घेतलेली ही व्याकरणाची दिंडी घराघरांत जावो आणि यास्मिन शेख यांना नव्या उमेदीने जगण्याचे बळ देवो.

लेखिका : सुश्री नंदिनी लोंढे

प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
SADANAND AMBEKAR
0

सादर नमस्कार 🙏
छान लेख आणि विचार आहेत । मराठी माझी मातृभाषा, गौरवाचा विषय । एक गोष्ट सुरुवाती पासून मी अनुभवली ती ही, कि मुगल आल्याने आपली/देशाची संस्कृति तर प्रभावित झालीच पण त्यात विशेष म्हणजे असे कि आज मराठी भाषे ची लिपी (मोडी) उपयोगात नाही पण भाषेत पण अनेकानेक शब्द अरबी/फारसी/उर्दू चे यथावत वापरीत आलेत जेव्हां कि त्यांचे मराठी समानार्थी शब्द आहेत सुध्दा…. , थोडे लक्ष देऊन बघितल्यास हे दिसून येईल।
या विषयावर मी आपल्या आसपास असलेल्या स्थानिक मराठी लेखक/कवि यांना आपलं मत सांगितले । याची सुधारणा व्हायला हवी असा माझा विचार आहे। शुभेच्छा…..

अ.ल. देशपांडे.उमरीकर, अमरावती.
0

प्रा.यास्मिनताई शेख बद्दल ची माहिती वाचून आनंद वाटला.
” व्याकरणाला भाषा विज्ञाना ची जोड हवी असे सांगणाऱ्या ताईंनी २१/०६/२०२५ ला वयाची शंभरी वर्षं पूर्ण केलीत. त्या आजही सक्रीय आहेत.
मी अंतर्नाद मासिकाचा आजीवन सदस्य होतो त्यामुळे त्यांच्या विषयी माहिती होती.
वीस एक वर्षांपूर्वी मी पुण्याला गेलो असता त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो होतो.
एका सूजाण, प्रगल्भ व्यक्ती च्या त्या भेटीचा आनंद अवर्णनीय आहे.

लेखाबद्दल अभिनंदन.