सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ येसूबाई – लेख क्र. ५ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
आम्ही येसूबाई शिर्के! “आस्ते कदम, महाराज गडपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टीत, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराज ” म्हणजेच आबासाहेबांची स्नुषा आणि या सिंहाच्या छाव्याची पत्नी! समाधान इतकच आहे की आमची एवढीच ओळख न राहता, स्वराज्य टिकवण्यासाठी कोणत्याही हाल अपेष्टा सहन करणारी, गादीवर बसण्याचा शाहूंचा अधिकार असतानाही त्यांना औरंगजेबाच्या पिंजऱ्यात सोडून राम राजांना गादीवर बसवणारी, धूर्त, त्यागी येसू!
तसं आम्हाला राजकारण व युद्ध यांचं बाळकडू, कर्तबगार सरदार, आमचे वडील, पिलाजीराव शिर्के यांच्याकडूनच मिळालेलं! युवराज्ञी होणं म्हणजे काय असतं हे तर बालवयातच सोसावं लागलं. शिवाजी महाराजांनी संभाजी राजांसह आग्र्याहून सुटका करून घेतली हे तुम्हाला ठाऊकच आहे. पण त्यावेळी शंभूराजांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना दडवून ठेवले होते व युवराजांचा काळ आला अशी आवई उठवली. ती खरी ठरवण्यासाठी आम्हाला विधवेचं जीवन जगावं लागलं. नवरा जिवंत आहे हे ठाऊक असून काळजावर दगड ठेवावा लागला. “स्वराज्याचे लचके तोडणारा मग तो कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही” हे ब्रीद असल्यामुळे आमच्या सख्या भावाबरोबर युद्ध करावे लागले. आम्ही जिंकलो पण आमचं माहेर कायमच तुटलं आणि भोसल्यांचा एक शत्रू वाढला. त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागले.
आबासाहेबांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे गादीवर बसले पण संकटांची मालिकाच त्यांच्यापुढे उभी राहिली. तसे राजकारणात ते आमची मसलत घ्यायचे. सल्ला विचारायचे. त्यामुळेच त्यांनी आम्हाला ‘ स्त्री सखी राज्ञी जयति ‘ असा शिक्का बहाल करून शिक्के कट्यारीचे पद दिले होते. त्यादिवशी, हो! त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना परोपरीने सांगितले “जाऊ नका. स्वकीयांनीच विषप्रयोग करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. बाहेरच वातावरण अजूनही चांगलं नाही. दगा फटका होण्याची शक्यता आहे. ” पण हट्टी स्वभाव! आणि पुढचं सगळं विधीलिखित घडायचं होतं नं!
औरंगजेबाने कपटानं त्यांना कैद केलं. पण आम्ही डगमगलो नाही. आम्हाला ठाऊक होतं, हा सिंहाचा छावा कशालाच घाबरणार नाही. अगदी मृत्यूलाही नाही! स्वराज्यावर कोणतीही आच येऊ देणार नाही.
खरं वैधव्य आल्यावर आम्हाला मात्र हा साज शृंगार उतरवून हातात तलवार घ्यावी लागेल, हे ध्यानी आलं. आता आमची कसोटी होती. रायगडाला औरंगजेबाचा वेढा पडला. आम्हाला शिवरायांची शिकवणच होती कि प्रसंगी गड किल्ले जाऊ द्यावेत ते परत मिळवता येतात पण स्वराज्य टिकवावे ते परत मिळवता येत नाही. आम्ही आपली बाजू आता कमकुवत आहे हे मनोमन जाणून, ताबडतोब रामराजांना राज्याभिषेक केला. आमचाच पुत्र वारसा हक्काने राजा झाला असता पण रामराजांना मानणारी सरदार मंडळी बरीच होती. त्यामुळे अंतर्गत वाद कमी करण्यासाठी आम्ही ही खेळी केली आणि राजा, राजधानी तातडीने जिंजीला हलवली. या कानाचा त्या कानाला पत्ता लागू दिला नाही. आणि आठ नऊ महिने आम्ही गड लढवला. अखेर औरंगजेबाची सरशी झाली आणि त्याने आम्हाला व आठच वर्षांच्या आमच्या शाहूला कैदेत टाकलं. त्याच्याच छावणीत ठेवलं. त्यामुळे छावणीचा मुक्काम जिथे असेल तिकडे आमची फरपट व्हायची. त्याही काळात आम्ही शाहूंना राज्यकारभार आणि युद्धाचे धडे देत राहिलो. १७०० साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे जेष्ठ पुत्र दुसरे शिवाजी गादीवर बसले. पण राज्यकारभारात ते निष्णात नसल्यामुळे प्रधानमंत्री म्हणून मुत्सद्दी पेशव्यांची नियुक्ती करण्यात आली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी कर्ज काढून, फौजा उभारून, सर्व शत्रूंचा पराभव केला. सगळे सरदार एकत्र आणले व स्वराज्य मजबूत करायला सुरुवात केली.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आमची दिल्लीला रवानगी करण्यात आली. दिल्लीला अंतर्गत बंडाळी, भाऊबंदकी, तंटे सुरू झाले. याचा फायदा घेऊन पेशव्यांनी आमच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. ‘ मराठ्यांनी दिल्लीकडे वळून सुद्धा पहायचं नाही’ या अटीवर त्यांनी शाहूंची सुटका केली पण आम्हाला ओलीस ठेवले. कदाचित शाहूंची सुटका करण्यामागं हा उद्देश असेल की आता छत्रपती पदासाठी भावाभावात भांडणे सुरू होऊन, मराठ्यांचा पाडाव करणे सहज साध्य होईल. आणि आम्ही ओलीस असल्यामुळे मराठे मोंगलांना त्रास देणार नाहीत. पण मुत्सद्दी कारभाऱ्यांनी दोन स्वतंत्र गाद्या निर्माण केल्या. शाहूंना सातारची गादी व दुसरे शिवाजी यांना कोल्हापूरची गादी दिली.
ज्या सय्यद बंधूनी फारूख सियरला गादीवर बसविले, त्याच्याशीच त्यांचे वितुष्ट निर्माण झाले आणि फारुख सियरला संपविण्यासाठी सय्यद बंधूंनी मराठ्यांकडे मदतीचा हात मागितला. त्यावेळी मराठ्यांशी तह करावा लागला. तहा मध्ये पहिली अट आमच्या सुटकेची होती. अखेर फारूख सियरचा शेवट झाला. आणि महंमुद शाह गादीवर बसला.
बारा वर्षांच्या दिल्लीच्या वनवासातून आमची सुटका झाली आणि आम्हाला पुत्र भेटीचा अपूर्व आनंद मिळाला. आम्हाला शाहूंचा अभिमान वाटला. मराठ्यांचे राज्य कलेकलेने वाढत चालले होते. आपले निशाण नर्मदा पार गेलेले पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आणि आम्ही सुखाने डोळे मिटले. पण ही कैदेतली २९ वर्षे कशी काढली ते आमचं आम्हालाच माहित!
वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं कि आमच्या त्यागाची, कर्तृत्वाची दखल इतिहासाने कधीच घेतली नाही. केवळ एक स्त्री होतो म्हणून!
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






