श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ महाराष्ट्राचा लोकोत्सव.. वारी – एक अनुभव!… माहिती संग्राहक : श्री सदानंद पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
वारीमध्ये चालणारा एक ते दीड लाख लोकांचा समूह म्हणजे, एक फिरते गावच… या गावाला सुविधा पुरविणारा व्यावसायिकांचा वर्ग पालखीसोबत असतो. वारीचा मार्ग हा अनेकांचा पोटापाण्याचा मार्ग आहे. यामध्ये चहाच्या गाडय़ा, नाश्ता-जेवणाची दुकाने, दाढी कटिंग करणारे, प्रवासातील गरजेची गोष्ट म्हणजे, चप्पल दुरुस्ती, बॅगा दुरुस्ती, मोबाईल चार्जिग करून देणारे, असे अनेक व्यावसायिक आहेत. याशिवाय स्थानिक लोकांसाठीसुद्धा जत्रेमध्ये असतात तशी दुकाने असतात. हे लोकसुद्धा वारीसोबत व्यवसाय करत फिरत असतात…..
पालखी सोहळ्यात ओळख असो अथवा नसो, एकमेकांचा उल्लेख ‘माऊली’ असा केला जातो, हे तर सर्वाना माहीत आहेच… येथे विठ्ठलच विठाई होतो. संत ज्ञानेश्वर वारक-यांसाठी ज्ञानेश्वर माऊली बनतात. हा लिंगबदल फक्त नावापुरता राहत नाही. कामाची वाटणीसुद्धा काही प्रमाणात बदलते…..
शहरामध्ये पुरुषांचा घरकामातील सहभाग आता वाढत असला व तो कौतुकाचा नसून त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे याची जाणीव निर्माण झाली असली, तरी सर्वत्र अशी परिस्थिती नाही…..
अनेक पुरुषांचा घरी ज्या कामांशी संबंध येत नाही, अशी कामे ते वारीमध्ये करतात… स्वयंपाकामध्ये मदत करणे – भाजी खरेदी, चिरणे, बनवणे, भात लावणे क्वचित प्रसंगी शिरा, भजी वगैरे पदार्थ बनवण्यात पुरुष सहभागी होतात, मदत करतात. पंगत वाढण्याची जबाबदारी मुख्यत्वे पुरुषांकडे असते. चपाती, भाकरी बनवण्याचे काम मात्र अजून महिला वर्गाकडे आहे. वारीत सहभागी होणा-या स्त्रिया अनेकदा विसाव्याच्या ठिकाणी ओव्या म्हणतात. अनेक लोकदैवतांचे वर्णन ओव्यांमधून आले आहे. पण विठ्ठलाविषयी असलेल्या लोकगीतांचे वैशिष्टय़ म्हणजे यामधील विठ्ठल- रुक्मिणीला घरकामात मदत करणारा आहे…..
रुक्मिणी धुणे धुवायला चंद्रभागेवर जाते, तेव्हा कपडे घासण्याचे, पिळण्याचे काम विठ्ठलाकडे असते… ‘चंद्रभागेच्या पात्रामध्ये सोनियाचा विळा, रुक्मिणी धुणं धुते, देव विठ्ठल देतो पिळा’ किंवा ‘रुक्मिणी धुणं धुते देव घसा-याला बसं, दोघांच्या प्रीतीचं चंद्रभागेला हसू येतं’ सर्व संतांना त्यांची नित्यकर्म करताना देवाने मदत केल्याचे दाखले संतसाहित्यामध्ये आले आहेत…..
यामध्ये जनाबाईंना आंघोळीला पाणी काढणे, त्यांची वेणी घालणे वगैरे कामे आहेत… स्त्रियांनी रचलेल्या या लोकगीतात रुक्मिणीला मदत करणारा देव उभा केला आहे…..
वारीमध्ये नवीन येणा-या लोकांना वरील गोष्टी तर अनुभवायला मिळतातच… शिवाय महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या जीवनशैली असणा-या, वेगळ्या आर्थिक स्तरातून येणा-या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. कोकणी, अहिराणी, खान्देशी, तेलुगू-कन्नडमिश्रित अशा वेगवेगळ्या महाराष्ट्री भाषा बोलणा-या लोकांची गाठ पडते. आता नवीन पिढीच्या पोषाखामध्ये सर्वत्र एकसारखेपणा येतो आहे. पण जुन्या पिढीत पोषाखाची विविधता बघायला मिळते…..
सर्व संतांच्या समाधीस्थानापासून त्या-त्या संतांचे पालखी सोहळे निघतात… अर्थात यामध्ये ज्ञानेश्वरमाऊली व तुकाराम महाराजांचा पालखीसोहळा अधिक प्रसिद्ध आहे…..
या पालखी सोहळ्यामध्ये लाखांहून अधिक लोक सहभागी असतात… एवढय़ा लोकांच्या सामान वाहतुकीसाठी चार हजारांहून अधिक ट्रक व पाण्यासाठी टँकर, आरोग्यसेवेसाठी अॅम्ब्युलन्स व काही छोटी वाहने अशी पाचशेएक वाहने या सोहळ्यात असतात…..
पालखीसोबत वारक-यांचा प्रवास सुरू झाला की, गर्दीमुळे वाहनांना पुढे जाणे शक्य नसते… त्यामुळे तंबू व इतर सामानाची वाहतूक करणा-या वाहनांना सकाळी पालखीची वाटचाल सुरू होण्याआधी, पुढच्या गावासाठी निघावे लागते. त्यामुळे तंबूमध्ये मुक्काम करणा-या वारक-यांना पहाटे तीनच्या सुमारास उठावे लागते. लवकर उठून, तंबू पाडून, सर्व सामान भरून ट्रक पुढे पाठवले जातात. त्यानंतर प्रात:विधी उरकून, सोय असल्यास अंघोळ वगैरे उरकून घेतात. पाऊस नसेल, तर झाडाखाली किंवा मुक्कामाच्या जागीच प्लास्टिकचा कागद अंथरून एखादी डुलकी घेतात. पूर्वी घोंगडी व आता ज्याला कागद म्हणतात ती प्लॅस्टिकची खोळ ही वारीमधील एक बहुपयोगी वस्तू आहे…..
झोपताना, बसताना खाली अंथरण्यासाठी व पाऊस आला की, छत्रीऐवजी याचा उपयोग होतो… हा कागद अंगावर घेतला की, छत्रीप्रमाणे हात अडकून राहत नाही, त्यामुळे पाऊस चालू असतानासुद्धा टाळ-मृदंग वाजवता येतो. स्वत:बरोबर टाळ, मृदंग, वीणा, पिशवी या सर्वाचेच पावसापासून संरक्षण होते. पाण्याची सोय नसेल, तर आंघोळ पहिल्या विसाव्यापाशी होते. सकाळी प्रवास सुरू झाला की, साधारण दीड तासाने ठरलेल्या ठिकाणी पहिला विसावा होतो. स्थानिक भाविक पालखीचे दर्शन घेतात, तर वारकरी नाश्ता करून घेतात. नाश्त्याची सोय दिंडीतर्फे केली जाते. स्थानिक लोकांतर्फेसुद्धा अन्नदान केले जाते…..
त्यानंतर पुन्हा प्रवासास सुरुवात होते. दुपारी जेवणासाठी विसावा होतो… पाऊस नसेल, तर शेतात, माळावर मोकळ्या जागेत छान पंगती बसतात. पाऊस असेल, तर मात्र जेवणाची तारांबळ होते. अशा वेळेस डोक्यावर कागद पांघरून जेवण करतात. काही दिंडय़ांनी मंदिर, कार्यालय, एखाद्या इमारतीचे पार्किंग अथवा तत्सम ठिकाणाची व्यवस्था केलेली आहे. अर्थात लहान गावांमध्ये सर्व दिंडय़ांना अशी व्यवस्था मिळणे शक्य नाही…..
संध्याकाळी चारच्या सुमारास पुन्हा एक विसावा होऊन रात्री सहा ते सातच्या सुमारास पालखी मुक्कामी पोहोचते… तंबू व इतर सामान घेऊन जाणारे ट्रक आधीच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. ट्रकसोबत पुढे गेलेले लोक तंबू ठोकणे, स्वयंपाकाची तयारी वगैरे करतात. तंबू ठोकण्यापूर्वी पाऊस झाला असेल, तर चिखल बाजूला ओढून मग तंबू ठोकतात. तंबूच्या कडेने चर काढतात, त्यामुळे तंबू ठोकल्यावर पाऊस झाला, तर पाणी तंबूमध्ये न येता कडेने वाहून जाते. दिवसभर दमून चालून आलेले लोक जेवण करून, गप्पा मारत लवकरच झोपी जातात…..
या नित्यक्रमाशिवाय उभे रिंगण, गोल रिंगण, धावा, भारुडं वगैरे नैमित्तिक गोष्टीसुद्धा असतात… यापैकी रिंगणांचे आकर्षण तर खूपच आहे…..
अनेक वर्षे एकाच दिंडीमध्ये चालणा-या लोकांचे एक मैत्रीचे नाते तयार होते… एकाच तंबूत राहणा-या लोकांचा तर एक परिवारच तयार होतो. वर्षाने होणारी गाठभेट. मग सुरुवातीचे एक-दोन दिवस एकमेकांची विचारपूस करण्यात जातात. सध्या सोशल मीडियाच्या काळात नवीन पिढी एकमेकांच्या संपर्कात आहे. पण, अजूनही अनेक लोकांचा संपर्क व भेट फक्त वारीमध्ये होते…..
वारकरी असलेल्या किंवा वारकरी संप्रदायाविषयी आस्था असणा-या लोकांना दहा-पंधरा दिवस भजन करण्याचा, ऐकण्याचा आनंद मिळतो… नवीन भजनी मंडळींना वारीमध्ये भजनाचे प्राथमिक धडे मिळतात व वारक -या किमान जे काही अभंग पाठ असणे आवश्यक आहे, ते अभंग पाठ होतात. तर इतरांना नवीन चाली शिकण्याची संधी मिळते. संतविचारांवर, सोहळ्यातील बदलत्या गोष्टींबद्दल चर्चा होते. पालखीसमोर रोज कीर्तन होते. दिवसभराचे चालणे व पालखीपासून मुक्कामाचे ठिकाण दूर असल्याने उपस्थिती तशी कमी असते. पण, काही लोक नियमित अथवा जमेल तसा याचा लाभ घेतात. याशिवाय काही दिंडय़ांमध्ये प्रवचने होतात. याचाही लाभ होतो. या सर्वज्ञात अनुभवासोबत अनेक वेगळे अनुभव घेण्यासाठी लोक वारीमध्ये सहभागी होत आहेत…..
वारीमध्ये सुख-सोयी वाढल्या असल्या तरी, याचा अर्थ वारीमधील दिनक्रम अगदी आपल्या रोजच्या घरच्याप्रमाणे असतो असे नाही… किमान मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या आहेत, पण तरीही अनेक तडजोडी कराव्या लागतात. अर्थात हे अपेक्षितच आहे. या वेगळेपणामुळेच वारी अनुभवण्याची उत्सुकता अनेकांना आहे…..
वारकरेतर वर्गामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी व निवृत्त नोकरदारांमध्ये या सामूहिक प्रवासाचे आकर्षण वाढत आहे… रोज १५ ते २५ किमी चालणे, तंबूमध्ये, मंदिरात, ओसरीवर तर कधी उघडय़ा माळावर मुक्काम, आपले कपडे आपण धुणे, दिवसभर प्रवासात व पावसाळी हवेत ते वाळण्याची दक्षता घेणे, आपल्यापेक्षा वेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातील लोकांशी संवाद साधणे, भजन, भोजन सर्व गोष्टी सामूहिक, कोणी आजारी पडले, तर त्याची काळजी घेणे, एकमेकांची सुख-दु:ख जाणून घेणे, या अनुभवाचे आकर्षण लोकांना वारीकडे ओढत आहे…..
काही लोक पालखीसोबत चालण्याऐवजी ट्रकसोबत पुढे जाऊन मुक्कामाची पूर्वतयारी करतात… यामध्ये तंबू ठोकणे, तंबूभोवती चर खोदणे, आधीच पाऊस झाला असेल, तर चिखल बाजूला करणे, लाईटची व्यवस्था करणे, अनुदानित गॅस, रॉकेल विक्रीकेंद्र शोधून तेथून गॅस, रॉकेल वगैरे आणणे, भाजी खरेदी, स्वयंपाक वगैरे गोष्टी येतात. अपवादात्मक काही दिंडय़ांनी यासाठी सेवक वर्ग नेमला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी व इतर भाविक वारीमधे सहभागी होतात; किंबहुना ‘ज्या देशातले लोक पंढरीला येतात, तो महाराष्ट्र’ अशी महाराष्ट्राची एक नवी व्याख्या इरावती कर्वे यांनी केली आहे…..
महाराष्ट्राच्या विविध भागातून व काही प्रमाणात गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लोक वारीमधे सहभागी होतात… १९६५ च्या सुमारास आळंदीच्या पालखीमध्ये पाचेक हजार लोक सहभागी होत, असा उल्लेख दि. बा. मोकाशींच्या पुस्तकात आहे. मधल्या काही वर्षामधे सुकर झालेला प्रवास, वारीच्या मार्गावर वाढलेल्या सुविधा, दळणवळणाची व संपर्काची वाढलेली साधने यामुळे वारीमध्ये सहभागी होणा-या लोकांची संख्या वाढली आहे…..
☆
लेखक : श्री संकर्षण कऱ्हाडे
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





