सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ सुभद्रा – लेख क्र. ६ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
सारी नक्षत्रं ओंजळीत घेऊन मी उभे होते. सारी ओंजळ मी पार्थांच्या अंगणात रिती केली पण ती नक्षत्रं अंगणात सांडलीच नाहीत, वरच्यावर कुठेतरी विरून गेली. कां? याचे उत्तर शोधते आहे, या सांजवेळी सौंधावर उभी राहून! मागे पाहतांना सारं लख्ख आठवतंय!!
तात आणि देवकी माता यांचा बंदिवास संपला होता. तातांसाठी त्यांच्या बलवान पुत्रांनी सुवर्णानं मढलेली द्वारका नगरी दिमाखात उभी केली होती. अशा सुख समृद्धीत माझा जन्म झाला. नाव ठेवलं सुभद्रा! भद्र म्हणजे कल्याण! कल्याण करणारी! म्हणजे इतरांचं? माझं काय? आठवतोय तो फक्त माझ्या दुःखाचा पाढाच! एकदा कुंती आत्या सर्व मुलांना घेऊन आली होती. त्यावेळी पार्थांना मी प्रथम पाहिलं आणि पहिल्याच दृष्टी- भेटीत जायबंदी झाले. हळूहळू मलाही उमगलं की माझं स्थानही त्यांच्या हृदयातच आहे. ही गोष्ट श्रीकृष्ण दादांच्याही नजरेतून सुटली नाही. ते तर सरळ सरळ माझ्यासमोरच पार्थांना म्हणाले, ” अर्जुना आमची सुभद्रा आम्ही तुला देणार. एकदा फक्त बलराम दादांशी बोलून घेतो.” मला तर अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. मग मी विवाहाची स्वप्नं रंगवायला लागले. रोजच पार्थांची वाट पाहू लागले. आपणहून विवाहाचा विषय काढायचा तरी कसा? पण पार्थानीच एकदा मला सांगितलं की, ” अजून युधिष्ठर दादांचा विवाह व्हायचा आहे. कौरव तर आमच्या विनाशाचीच वाट पाहत आहेत. एकदा सगळं स्थिरस्थावर झालं की मोठ्या सन्मानाने तुला घेऊन जाईन.” वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात होतं तरी काय!!
मग तो लाक्षागृहाचा प्रसंग! बापरे!! पांडवांचं क्षेमकुशल समजण्यास मार्गच नव्हता. शेवटी न राहून कृष्ण दादांना विचारलं. म्हणाले, ” तू अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नकोस. एक लक्षात ठेव राजकन्येच्या अंगी अष्टकला असाव्यात, असा दंडक आहे. त्यात तू परिपूर्ण व्हायला हवं. विचाराला अन् आचाराला वळण लागायला हवं.” दादांच्या शांत असण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला आणि मग हायसं वाटलं. नंतर समजलं, पांडव मातेसह वेष बदलून ब्राह्मण वेषात माधुकरी मागून, एका झोपडीत दिवस कंठीत आहेत. पण इतकं कष्टप्रद जीवन! कसंसच वाटलं! माझा मात्र वाट पाहण्याचा कालावधी आणखी वाढला.
त्याच गडबडीत द्रुपद राजाने आपल्या कन्येचं स्वयंवर मांडलं. ब्राह्मण वेषातच पार्थ स्वयंवराला गेले. त्यांनी द्रौपदी मिळवली पण त्यावेळी माझ्या मनावर किती आघात झाले झाले असतील याची जाणीव कुणालाच नव्हती. ना दादांना, ना पार्थांना! विवाहानंतर पांडवांना अर्धं राज्य म्हणून खांडव वन दिलं गेलं. दादा आणि पार्थ यांनी विश्वकर्म्याच्या सहाय्याने तिथे स्वर्ग निर्माण केला. मयराक्षसानं तर मय सभा उभी केली. दादा एकेक वर्णन करून सांगायचे, मग तर कधी जातोय अन् सारं पाहतोय, असं झालं होतं. हळूहळू पांडवांनी आपल्या राज्याची भरभराट केली. आता सारं स्थिरस्थावर झालंय असं वाटत होतं पण माझं दुर्भाग्य ते माझ्या मागूनच येत होतं. का ते माझ्या पुढेच होतं कोणास ठाऊक! नियमांचा भंग केल्याबद्दल पार्थांना बारा वर्षाचा वनवास पत्करावा लागला. ते तीर्थयात्रेला बाहेर पडले. उत्तरेकडे हिमालयात ऊन, वारा, थंडी, पाऊस सगळं झेलत फिरायचं. काय खात असतील? कुठे झोपत असतील? मला अन्न गोड लागेना. शेज सुद्धा खुपायला लागली. पुन्हा माझी प्रतीक्षा सुरू! तब्बल बारा वर्षांची!
कृष्ण दादांकडून पार्थांची खुशाली कळत होती. पण इतर बातम्या काळजाला घरे पाडणाऱ्या होत्या. पार्थांचा नाग लोकात उर्वशीशी झालेला विवाह! मणिपूरची राजकन्या चित्रांगदेशी झालेला विवाह! त्यात भर म्हणून की काय बलराम दादांनी माझा विवाह दुर्योधनाशी पक्का केला. ते तर खूप तापट! त्यांच्यासमोर ब्र काढण्याची पण प्राज्ञा नव्हती. काय करावं काही सुचत नव्हतं. कृष्णदादा मूग गिळून गप्प बसले होते म्हणून राग येत होता. पण त्यांनी काहीतरी मनात निश्चित ठरवलं असणार असंही वाटत होतं. कारण त्यांनीच तर पार्थांना वचन दिलं होतं की सुभद्रेचे पाणी ग्रहण तूच करणार! आणि, आणि, तो क्षण आला! माझी प्रतीक्षा संपणार होती. पार्थ प्रभास पट्टण येथे आले आहेत हे कळल्यावर कृष्ण दादा गेले. सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि सुभद्रा हरण झालं! मला एवढा आनंद झाला होता पण तेवढीच भीती पण वाटत होती. बलाराम दादा आता काय करतील? इंद्रप्रस्थास गेल्यावर माझं तिथं स्वागत होईल का? कसं होईल? अनेक प्रश्न मनात रुंजी घालत होते. पण तसं काहीच झालं नाही. बलराम दादांना समजावण्यात कृष्ण दादा यशस्वी झाले, आणि आम्हाला परत घरी नेऊन मोठ्या थाटात आमचं लग्न लावून दिलं. वनवास संपल्यावर आम्ही इंद्रप्रस्थास गेलो. तिथंही मोठ्या उत्साहात आमचं स्वागत झालं आणि माझं सुखाचं पर्व सुरू झालं. महाराणींच्या संगतीत खूप कांही शिकायला मिळालं.लवकरच गर्भाची चाहूल लागली तेव्हा तर माझे डोहाळे पुरवतांना पार्थांनी काहीही न्यून
ठेवलं नव्हतं. मला तेंव्हा धनुष्यबाण खेळण्याची इच्छा होत होती. तेंव्हाच सगळे म्हणत होते, सवाई धनुर्धर जन्माला येणार आणि पांडवांच्या किर्तीत भर घालणार. दादा आणि पार्थ यांच्या गप्पा नेहमी युद्धनीतीच्याच असायच्या. माझी भूमिका श्रोत्याचीच असायची. पण मला वाटायचं उदरातला अंकुर सारं ऐकून हुंकार देतोय. पुत्र जन्म झाला आणि मी तृप्त झाले. पण माझं दुर्दैव? अजूनही जायचं होतं!
दुर्योधनाने द्युताचं आमंत्रण दिलं. महाराणीं सह सारे हस्तीनापूरला गेले. जातांना सहदेव पुत्र श्रुतसेन आडवा आला. जाऊ नका म्हणू लागला आणि सगळ्यांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली. नलराजाचा घात या द्युतानेच केला होता. पण महाराजांना कोण समजावणार? दूत येऊन बऱ्याच गोष्टी सांगायचा पण महाराणी घरी आल्यावर सारं समजलं. समजलं कसलं? सारंच आकलनापलीकडचं होतं. डोकं बधिर झालं होतं. किती रडले मी! वनवासात मलाही बरोबर न्या म्हटलं. पण साऱ्या पांडवपुत्रांचा सांभाळ कोण करणार? त्यांची जबाबदारी कोण घेणार? पतीसेवा धर्म सोडून मला पती आज्ञा पाळावी लागली. पांडव पुत्रांना घेऊन दादांबरोबर द्वारकेस गेले. माझ्या नशिबी पुन्हा वियोग! आता तेरा वर्षांचा!!
तेरा वर्षे, वाटेकडे डोळे लावून बसले होते. कृष्ण दादांनी सारे कुशल आहेत व परत येत आहेत हे सांगितले. त्यावेळी त्यांनी आणखी एक गोड बातमी दिली. विराट राजाची कन्या उत्तरा हिच्याशी अभिमन्यूचा विवाह निश्चित झाला होता. थोड्याच दिवसात राज्य नसलेल्या राजकुमाराचा विवाह मात्र राजवैभवात पार पडला. मला वाटलं आता प्रतीक्षा संपली. सुखच सुख येईल. पण! हा पण, नेहमीच आडवा येतो. ‘सुईच्या आग्रावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही ‘ या कौरवांच्या दर्पोक्तीने युद्धाची ठिणगी पडली. पुन्हा चिंता!! विजय आमचाच होईल याची खात्री होती पण त्यासाठी कोणती किंमत द्यावी लागणार? आपण अर्जुनाचा पुत्र आहोत हे सिद्ध करून अभिमन्यू ने प्राण सोडले. मी उत्तरेला पोटाशी धरून सुन्न होऊन बसले होते. तिच्या पोटात तर आमचा पौत्र वाढत होता. त्यातच महाराणींनी पार्थांना “जयद्रथाचा सूड घ्या नाहीतर मी महाराजांच्या पायाशी देहत्याग करेन” हा निर्वाणीचा इशारा दिला. पार्थांनी जयद्रथाचा सूड घेईन, असा शब्द दिला आणि शब्द पाळला गेला नाही तर अग्नी काष्ठ भक्षण करेन अशी प्रतिज्ञा केली. काय अघोरी प्रतिज्ञा!! मी काय करू? पुत्रशोक करू? उत्तरेला सांभाळू? की पार्थांची चिंता करू?
महाराणींचा जन्म केवळ पांडवांच्या पराक्रमाला, तेजाला उत्थान देण्यासाठी झाला आहे पण माझं जीवन कार्य कोणतं? फक्त पुत्र- पौत्रादिकांचा सांभाळ करणं? महाराणींशी पार्थांचा विवाह मी मान्य केलाच होता. ते तेजाचं तेजाशी मिलन होतं. पण मला प्रीतीची वचनं देऊन चित्रांगदा व उर्वशी यांच्याशी झालेला विवाह? महाराणी या सगळ्याला राजकारण म्हणून सोडून देतात पण मला हे पटत नाही आणि ते राजकारण कळतही नाही. एवढंच कळतं कि इथे भावनांना अधिष्ठान नाही. पुत्रमरणाचे दुःखही करायचं नाही? हे कसलं जिणं! महाराणींचा हक्क मी कधीच नाकारला नव्हता पण माझं स्थान? ते मला कधीच कां नाही मिळालं? म्हणायचे मात्र द्रौपदी माझी सह-धर्मचारीणी आहे पण तू माझ्या हृदयाची अधिष्ठात्री देवता आहेस. पण माझ्या इच्छांचं, अपेक्षांचं काय? त्या तर हर घडी पायदळी तुडवल्या गेल्या, कर्तव्याच्या सोज्वळ नावाखाली!
आज हा उगवता सांजतारा पाहून आठवते ती पार्थांच्या भेटीसाठी आसुसलेली सुभद्रा! अभिमन्यूच्या जन्मानंतर रोमरोमी नक्षत्रांचा साज ल्यालेली सुभद्रा! आता एकटीच आहे. पार्थ या सुभद्रेची एवढी तरी विनंती ऐका, तुमच्या निर्वाणाआधी माझे निर्वाण होऊ द्या. या रित्या ओंजळीत एवढं तरी दान पडू द्या!
– लेख क्र. ६
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







