श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ कारगिल युद्धाने घडवलेला वायू योध्दा… अंतराळवीर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
वाहत्या पाण्याला धार असते.. तशी समशेरीला सुद्धा असतेच. पाण्याच्या धारेत आणि ते ही पवित्र क्षेत्रातल्या पाण्याच्या धारेत स्नान घडले तर पुण्यप्राप्ती होते, असे मानतात. युद्धाच्या तीर्थक्षेत्रात या समशेरीच्या धारेमध्ये रुधीरस्नान घडले तर तीर्थक्षेत्री घडलेल्या स्नानापेक्षाही अधिकचे पुण्य लाभते.. नव्हे या धारेत पडलेला चिरंजीव होऊन जातो! आणि हे योद्धे पुन:पुन्हा अवतार घेत राहतात अशीही धारणा आहे! अर्थात हा अवतार प्रत्येकवेळी देहाच्या स्थितीतच असेल, असे नसते. वीर त्यांच्या विचारांच्या रूपाने पुन्हा जन्म घेतात.
२७ मे, १९९९. स्क्वाड्रनलीडर अजय आहुजा मिग-२१ लढाऊ विमान घेऊन त्यांच्या एका सहका-याचा शोध घेत उड्डाण करीत होते. फ्लाईट लेफ्टनंट के. नचिकेता मिग-२७ घेऊन कामगिरीवर गेले होते.. ते परतलेच नव्हते.. त्यांचा काही ठावठिकाणासुद्धा लागत नव्हता. नियतीच्या मनात भलतेच चालले होते त्याक्षणी. के. नचिकेता यांच्या विमानावर स्टिंगर मिसाईलने हल्ला यशस्वीरीत्या चढवून विमान धराशाई केले होते… मात्र विमानातून अगदी ऐनवेळी उडी घेउन के. नचिकेता साहेब जमिनीवर उतरले.. पण पाकिस्तानी हद्दीत असल्याने तेथील जनतेच्या आणि पुढे लष्कराच्या तावडीत सापडले होते. भविष्यात त्यांची सुखरूप सुटका होणार होती… पण दरम्यानच्या काळात त्यांना शोधण्यास निघालेल्या आहुजा साहेबांच्या नशिबी मात्र मृत्यू लिहिलेला होता. आहुजा साहेबांच्याही विमानाचा वेध त्याच मिसाईलने घेतला… साहेबांनी यशस्वीरीत्या बाहेर उडी घेतली… तेही पाकिस्तानी हद्दीत उतरले… तेथील लष्कराच्या तावडीत सापडले… आणि भयावह छळ झाल्याच्या खुणा असलेले त्यांचे पार्थिव काही दिवसांनी पाकिस्तानाने भारताच्या ताब्यात दिले!
या सा-या बातम्या चौदा वर्षांचा एक शाळकरी पोरगा मोठ्या उत्सुकतेने पहात, ऐकत होता. हुतात्मा सैनिकांची पार्थिवे देशाच्या विविध भागांत पोहोचत होती… त्यांच्या जयजयकारात सारा देश एकमुखाने सहभागी होत होता… सुरुवातीचे अपयश पचवत भारतीय वायुसेनेने घुसखोरांना सळो की पळो करून सोडले. सरते शेवटी सत्यच पुन्हा जिंकले. आणि याच घटनांचा परिणाम या मुलाच्या हृदयावर होत गेला… त्याने ठरवले… अशीच आभाळ भरारी घ्यायची! आणि त्याने ते स्वप्न सत्यात उतरवून दाखवलेच.
बारावीची परीक्षा झाली होती आणि अभ्यासात कुशाग्र बुद्धी असल्याने निकालाची चिंता नव्हतीच. आता मोकळ्या वेळेत नेमके काय करावे, हे सुचत नव्हते. त्यात घरामध्ये लगीनघाई सुरु झाली होती… थोरल्या बहिणीचे लग्न ठरले होते. बहिणीचा एकुलता एक भाऊ तर अशावेळी धावपळ करायला पाहिजेच… भावोजीचा कान पिरगळून त्यांना बहिणीला सुखी ठेव अशी प्रेमळ धमकी देताना त्यांच्याकडून बक्षिसी उकळायची संधीही मिळणार होती.
एकेदिवशी तोही प्रसंग अगदी समोर येऊन उभा राहिला… पण याच नेमक्या प्रसंगी भाऊराया जणू कुठे अंतर्धान पावलेला होता. काल दीदीचे लग्न लागले… रात्री उशीरापर्यंत धामधूम सुरु होती. आज दुपारी दीदी सासरी निघणार होती.. अगदी ती सजवलेल्या मोटारीत बसण्याची वेळ आली तरी भाउसाहेब नजरेस पडत नव्हते… बरं काही सांगूनही गेलेले नव्हते! वडिलांच्या रागाचा पार आभाळाला टेकला होता. समोरासमोर भेट झाली असती तर श्रीमुखात भडकावली जाणे निश्चित होते. एवढ्यात स्वारी धापा टाकीत लग्नघरात पोहोचली… घामाघूम! सायकल दामटत कुठून आला होता कोण जाणे… सायकल मंडपाच्या दारातच फेकून देऊन तो दीदीकडे धावला… तोवर सारेच रडू लागले होते. तो वडिलांच्या नजरेला नजर न भिडवता थेट दीदीजवळ गेला… ”जरुरी काम से गया था! ” दीदी त्याच्याकडे पहातच राहिली!
त्याच्या एका मित्राने U. P. S. C. (एन. डी. ए. प्रवेश) परीक्षेचा अर्ज विकत आणला होता खरा… पण हे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही याची त्याला लवकरच खात्री पटली होती. अभ्यासातली हुशारी, शारीरिक क्षमता आणि लाखो परीक्षार्थी बसणार असलेल्या परीक्षेत देशभरातून निवडल्या जाणा-या मोजक्या तरुणांमधला एक तरूण होण्याची क्षमता आपल्यापेक्षा आपल्या दोस्तात अधिक आहे, हे त्याने ताडले… आणि तो अर्ज याच्या हाती सोपवला!
बहिणीच्या लग्नाची गडबड, घरी कुणालाही काहीही सांगितलेलं नाही… मामला चोरीचा! चोरून लपून अभ्यास सुरु होता. परीक्षेचे तारीख हाती पडली आणि चेहरा पडला… दीदीच्या लग्नाच्या दुस-याच दिवशी घरापासून काही किलोमीटर्स वर परीक्षा केंद्र होते. शुभेच्छा द्यायला कुणाला सांगितले तर असायला हवे होते की… त्यामुळे अक्षरश: लगीनघरातल्या गोंधळाचा अचूक फायदा घेत साहेब परीक्षेला पोहोचले… स्व-चालीत दुचाकीवर… अर्थात सायकलवर. परतीचा प्रवासही त्याच दोन चाकांवर झाला! वधू पाठवणीच्या प्रसंगात याचा अपराध तसा दुर्लक्षिला गेला… आणि एन. डी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याच्या बातमीने सारा काळोख संपला! वडिलांना आपल्या लेकाचा अभिमान वाटला.. आता याला थांबवण्यात अर्थ नव्हता… असा त्यांनी विचार केला. आणि २००२ या वर्षातल्या एका भल्या पहाटे साहेब राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कोंढवा गेटवर हजर होते… त्यांनी २००५ मध्ये लष्करी अधिकारी म्हणून मोठ्या दिमागात त्यावेळी अंतिम पग म्हणून संबोधले जाणारे आणि हल्लीचे प्रथम पग देशाच्या सेवेत टाकले. हवाईदलाचे आकर्षण तर होतेच सुरुवातीपासून… तीच शाखा मिळाली. इंडियन एअर फोर्स अकादमी मध्ये पुढील प्रशिक्षण पार पडले… आणि शुभांशु शंभू दयाल शुक्ल नावाचा देखणा, उमदा लढाऊ वैमानिक भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवारत झाला… एक स्वप्न असे प्रत्यक्षात उतरले! एस. यु. ३० एम. के. आय. , मिग २१, मिग २९, जग्वार, हॉक, डोर्निअर, ए. एन. ३२ अशी आधुनिक विमाने लीलया उडवणे, त्यांचे परीक्षण करणे यात शुक्ल साहेबांनी महारत प्राप्त केली. दोन हजार तासांचा उड्डाण अनुभव गाठीशी आला!
शालेय जीवनापासून परिचित असलेल्या आणि पुढे दंतवैद्य अर्थात dentist बनलेल्या doctor कामना मिश्र यांच्याशी विवाह करण्याची मनोकामनाही अर्थात पूर्ण झाली. एका पुत्राच्या जन्माने या विवाहाला एक चैतन्य प्राप्त झाले! फावल्या वेळेत… जो अगदी दुर्लभ असतो सैनिकी सेवेत… साहेबांनी चक्क कुंडली-ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास केला. शास्त्र आणि ज्योतिषशास्त्र अशी मजल मारणा-या शुक्ल साहेबांच्या कुंडलीत एक अभूतपूर्व नसला तरी द्वितीय स्थान पक्के करणारा योग होता.. हे त्यांना कदाचित त्यावेळी ठाऊक नसावे.
तसे मित्र परिवारात मस्करी करणारे पण एरव्ही अत्यंत अबोल असणारे आणि तरीही चेह-यावर मंद हसू वागवणारे शुक्ल साहेब सातत्याने अभ्यासात, सरावात दंग असत.
तुम्ही सर्जिकल स्ट्राईक मध्ये असालच की… असं कुणी आडमार्गाने विचारल्यावर ते म्हणत… दुसरे विषय आहेत की बोलायला…. कामाबद्दल काय सांगत बसू! आणि पुढे एक अक्षरही बोलायचे नाहीत. २०१९ वर्ष उजाडले. Institute of Aerospace Medicine या भारतीय हवाई दलाच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्थेने Indian Human Spaceflight Programme हाती घेतला. त्यात अंतराळवीर निवडीच्या प्रक्रियेत शुक्ल साहेबांचे नाव अग्रभागी होते. अत्यंत कठोर चाचण्या झाल्यावर शेकडो उमेदवारांमधून शुक्ल साहेब पहिल्या चार मध्ये आले.. आणि २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भारताच्या पहिल्या मानव सहित अंतराळ मोहिमेसाठी निवडल्या गेलेल्या अंतराळवीरांच्या यादीत शुभांशु शुक्ल यांचे नाव जाहीर केले. १९९९ मध्ये सुरु झालेला एक विचार २०२४ मध्ये एका प्रचंड उंचीवर येऊन ठेपला!
International Space Station अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊन विविध प्रयोग करण्याची संधी देणा-या अतिशय खर्चिक आणि महत्त्वाकांक्षी Axiom 4 मोहिमेत शुक्ल यांची पायलट म्हणून निवड होणे यात काही आश्चर्य नाही… त्यामागे कठोर परिश्रम आहेत. राकेश शर्मा साहेबांनी अंतराळात पहिल्या भारतीय पावलाचा ठसा उमटवला… दुसरे पाऊल शुभांशु शुक्ल साहेब यांचे असणार आहे. NASA-Space X- ISRO या तीन प्रबळ संस्थांच्या संयुक्त आयोजनात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय हे बिरूद त्यांना लाभणार आहेच. या अंतराळ यानातील या एका आसनाची भारतीय रुपयांतील किंमत सुमारे पाचशे कोटी इतकी असणार आहे… पण १४५-५० कोटी लोकसंख्येच्या या देशांत ही रक्कम दरडोई अगदी काही रुपयांत होईल. पुढे यशस्वी होणारच असलेल्या मानव सहित गगनयान चांद्र मोहिमेची ही एक मुहूर्तमेढच जणू उभारली जात आहे, असे म्हटले पाहिजे.
खराब हवामानामुळे दोन वेळा पुढे ढकलले गेलेले हे उड्डाण येत्या काही दिवसांत यशस्वी होईल, अशी खात्री आहेच. शुभांशु शुक्ल साहेब हे आपले खरे हिरो आणि भारताने पैलू पाडलेला एक हिरा आहेत… त्यांच्या या यशातून प्रेरणा घेतीलच आपली मुले. त्यासाठी मुलांना, तरूणांसमोर या बातम्या, ह्या घडामोडी सातत्याने आल्या पाहिजेत. शुक्ल साहेबांचे उड्डाण पाहण्यासाठी देश एकवटला पाहिजे… ही दृश्ये पाहून आपल्याला भावी शूर सैनिक गवसणार आहेत. जय हिंद! ‘शुक्स’ अर्थात शुक्ल साहेबांना १९ जून रोजी होणार असलेल्या उड्डाणासाठी आधीच शुभेच्छा आणि अभिनंदन!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







