सुश्री शीला पतकी 

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगळ्या वाटेने जातांना☆ सुश्री शीला पतकी 

वेगळ्या वाटेने जाताना – – 

घटना इटली देशातील आहे. जॉन चा मुलगा सॅम काही अपराधामुळे तुरुंगात होता जाॅन म्हातारा झाला होता. तो आपल्या घरात एकटाच. घराच्या मागे खूप मोठा शिवार होतं बॅक यार्ड ज्याला म्हणतात तसं. त्याच्यामध्ये तो थोडी शेती करत असे पण आता त्याला ते झेपत नव्हतं. जमीन खणायची, बी पेरायचे, त्याची निगा राखायची…. यातल्या जमीन खणायची गोष्ट त्याला आता झेपत नव्हती. पण त्याला मनापासून शेती करावी असे वाटत होते. एकट्या जीवाचा तो विरंगुळा ठरावा. त्यांने आपल्या मुलाला सॅम ला तुरुंगात पत्र पाठवलं “प्रिय सॅम, टोमॅटोची शेती करावीशी वाटते पण आता जमत नाही रे.. तू असता तर अंगण खणून दिलं असतं आणि मग मी टोमॅटोची रोप लावली असती. टोमॅटोच्या रोपाने अंगण भरल असत. लाल भडक टोमॅटो किती सुंदर दिसले असते. असो आय लव यू सॅम! “असे म्हणत त्याने ते पत्र पूर्ण केले आणि तुरुंगात पाठवले. सॅमला ते पत्र वाचताना खूप वाईट वाटत होते की आपल्या वडिलांची छोटी इच्छा… कारण त्यांना कामात गुंतून घेणे खूप आवडत होते.. पण आपण नसल्यामुळे ते काही करू शकत नाहीत. मग त्याने तुरुंगातून पत्र पाठवले” प्रिय बाबा बॅकयार्डची जमीन खणण्याच्या भानगडीत पडू नका. मी तेथे खून केलेली प्रेतं पुरली आहेत लव यू सॅम” वडिलांच्या हातात पत्र पडण्यापूर्वी दारात पोलीस उभे राहिले. त्यांनी झडतीचे पत्र दाखवले आणि बॅक यार्डची जमीन खणायला सुरुवात केली. चांगली तीन चार फूट खोल जमीन म्हणून काढली. दिवसभरात संपूर्ण अंगण खणले गेले पण त्यांना कुठेही प्रेतं सापडली नाहीत ते जॉनची माफी मागून निघून गेले. जॉन चे सगळे अंगण खणून झाले होते दोन दिवसांनी मुलाचे पत्र आले “बाबा मी इथे बसून माझे काम केले आहे आता तुम्ही टोमॅटोची रोपे लावा आणि शेती करा लव यू तुमचा सॅम”

या गोष्टीतला सॅम गुन्हेगार आहे पण वेगळा विचार करणार आहे. त्याने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता अंगणात प्रेत दडवल्याचे पत्रात लिहिले तुरुंगातील पत्रे सेंसाॅर होऊन जात असत हे त्याला ठाऊक होते. त्यामुळे वडिलांना अंगण खणू नका तिथे प्रेते आहेत ही सूचना आपोआपच पोलिसांना मिळाली त्यांना ती खरी वाटली आणि त्यांनी ते अंगण पूर्ण करून टाकले. सॅम चे काम आपोआपच झाले होते. जाॅनने त्याच्यामध्ये टोमॅटोची शेती केली त्याचा वेळ चांगला गेला अंगण टोमॅटो ने बहरून आले…..!

या गोष्टीमध्ये आणि आपल्याकडच्या तीन आळशी मुलांची गोष्ट याच्यामध्ये साम्य आहे मरणारा बाप त्या तीन पोरांना सांगतो की शेतामध्ये खजिना पुरून ठेवला आहे मी मेल्यावर तो ऊकरून घ्या. बाप मरून गेल्यावर पोरं संपूर्ण शेत उकरून काढतात. कुठेही खजिना मिळत नाहीत आळशी मुलांनी शेत मात्र संपूर्ण खणून काढलेली असते. मग गावकरी म्हणतात एवढी मेहनत गेली तर पीक तरी लावा. मग ते बिया पेरतात पीक उत्तम येते त्याला पैसेही चांगले मिळतात गावकरी सांगतात अरे हेच तुमच्या वडिलांनी पुरलेले धन…..! आपल्याकडे आणि त्यांच्याकडच्या गोष्टीत फक्त संस्काराचा फरक आहे पण युक्ती मात्र तीच आहे. अशी वेगळ्या दिशेने काम करणारी माणसं यांना आपण आऊट ऑफ बॉक्स असं म्हणूयात.

अशा तऱ्हेने वेगळा विचार करणारी पुढची पिढी निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळं पण असतंच. मुलांना तर खूप वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात. त्यांना त्या कोणाजवळ सांगता येत नाहीत. कारण त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत ते त्यांना कळत नाही. त्या प्रत्यक्षात येतील की नाही याची त्यांना माहिती नसते. पण त्यांच्या डोक्यात मात्र खूप काही वेगळं चाललेलं असतं. मग या मुलांच्या डोक्यातल्या अशा कल्पनांना आपण मूर्त स्वरूप दिले पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात आला आणि ह्या “तुमच्या कल्पना लिहा आणि पाठवा आमच्याकडे” हा प्रकल्प मी हाती घ्यायचे ठरवले आहे. शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे एकत्रीकरण करावे असा विचार आहे. त्याचे आणखीन एक कारण असे की आमच्या पिढीत किंवा आमच्या मागच्या पिढीतल्या शिक्षकानी शिकवले संस्कार दिले पण विद्यार्थ्यांना वेगळ्या वाटेने विचार करायला शिकवण्यात आम्ही कमी पडलो होतो की मग विद्यार्थ्यांना विचार करायला वेळच दिला नाही. गप्प बैस तुला काय करायचे हे आमची पिढी… त्यानंतर आमच्या पुढची पिढी जी होती त्यांना आम्ही… असं काही नसतं रे म्हणून गप्प बसवल. पण आता लक्षात येते की ही पुढची पिढी खूप हुशार आहे त्यांच्या डोक्यात अनेक कल्पना आहेत त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे लहान म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये ते आपल्यापेक्षा अतिशय वेगळा विचार करू शकतात.

याचे एक उदाहरण…… मी एका कार्यशाळेमध्ये एका बाटलीवर एक टाचणी खोचून ठेवली आणि त्यावर एक एक बाय एकचा छोटा चौकोनी तुकडा झोपडी सारखा घडी करून ठेवला आणि मुलाला सांगितले हा फुंकर घालून किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी वापरून हलवायचा नाही. त्यापेक्षा वेगळा काही विचार सुचतो का पहा. मुलं विचार करायला लागले आणि पंधरा मिनिटात एक मुलगा उठून उभा राहिला तो त्या उपकरणा जवळ आला त्यांनी आपले दोन्ही हात एकमेकावर घासले. ज्यायोगे घर्षणाने त्याच्या मधील हवा गरम झाली आणि ते त्यांनी पटकन त्या कागदाखाली धरले गरम हवा वर जाते त्यामुळे कागद हलला आणि फिरला मला त्या विद्यार्थ्यांच्या वेगळ्या विचार करण्याचे कौतुक वाटले. आज तो मुलगा आयआयटी बेंगलोर मधून पास आऊट होऊन बाहेर पडला आहे अशी वेगळी विचार करणारी पिढी आम्हाला हवी आहे. खरं तर हा खूपच छोटा प्रयोग होता पण तो वेगळा विचार करू शकतो हे लक्षात आले त्याच शिबिरामध्ये मी मुलांना सांगितले “आपण एका खेड्यामध्ये सहलीला चाललो आहोत आपल्याबरोबर भाजीपाला ब्रेड बटर फळ घेतलेली आहेत उन्हाळा खूप आहे ती सगळी सामुग्री आपल्याला टिकवायची तर तुम्ही काय कराल? त्यासाठी या खोलीत असलेल्या साहित्याचा वापर करून तुम्ही व्यवस्था करावयाची आहे कोणत्याही वस्तू वापरायला तुम्हाला मुभा” माझ्या संस्थेमध्ये हा प्रयोग चालला होता मुलांनी खोलीत असलेले छोटे टेबल एकमेकावर मांडले पडद्याचा राॅड होता तो त्या टेबलावर ठेवला त्या ठिकाणी पडलेली एक बाटली घेऊन तिला भोक पाडले त्या बाटलीला तिथे असलेल्या कापडाच्या चिंध्या दोरी करून टांगून ठेवता येईल असे बांधून घेतले आणि ती बाटली त्या राॅडला बांधली. त्यानंतर त्या खोलीतला माठ रिकामा होता तो त्यांनी आडणीवर तिरकस ठेवला त्यावर एक पाय पुसणे होतं ते ओले करून त्यावर टाकले बाटलीतील पाणी सतत माठावर पडत राहील अशी व्यवस्था झाली आणि नंतर त्या मुलांनी त्याचे स्पष्टीकरण दिले की “आता या माठामध्ये त्या सगळ्या वस्तू ठेवायच्या जेणेकरून ते सतत गार राहील कारण बाहेरच्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे तेथील उष्णता कमी होईल माठामध्ये गारवा निर्माण होईल तापमान कमी होईल आणि वस्तू ताज्या राहतील” मला त्यांच्या या कृतीचे खूप कौतुक वाटले असेच एकदा मी अमोनिया वायू तयार करून त्याचे गुणधर्म शिकवत होते आणि हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये बुडवलेली काच कांडी अमोनियाजवळ आणली की नवसागराचा धूर येतो हे मी मुलींना फळ्यावर समीकरण मांडून शिकवत होते मुलीने मला विचारले बाई आपल्या पाठीमागील असलेल्या बाथरूम मध्ये हे असाच वास येतो मी म्हणाले बरोबर आहे कारण युरीन मधला युरिया जो असतो त्याचे विघटन होते, उष्णतेमुळे आणि त्यातून अमोनिया सारखे वायू बाहेर पडतात त्यावर त्या मुली म्हणाल्या उन्हाळ्यात तर खूप वास येतो आपण तिथे हायड्रोक्लोरिक आम्लात बुडवलेला कापूस ठेवूया म्हणजे तिथे किती धूर होतोत्यावरूनअमोनिया बाहेर पडतो हे लक्षात येईल मुलींच्या या कल्पनेचे मला खरोखर कौतुक वाटले अशा तऱ्हेने खरं मुलं खूप वेगळ्या वाटेने विचार करत असतात आपण त्यांना ती संधी दिली पाहिजे आणि त्यासाठी वेगळ्या वाटेने जाणारी मुले आणि त्यांची कल्पनाशक्ती यांच्यासाठी मी लवकरच एक प्रकल्प घेत आहे मला खात्री आहे अनेक शाळा मधून वेगळा विचार करणारी मुलं मला नक्कीच मिळतील. तुमच्याही घरी असे एखादे मुल असेल आणि त्याच्या डोक्यात काही कल्पना असतील तर त्या माझ्याकडे जरूर पाठवा! मी वाट पाहतेय…..!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted