श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “हरवलेले जुने पावसाळी दागिने !…” – लेखक – श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
– – – गार्टर्स आणि क्लिपा !
पूर्वी सायकल स्वाराच्या उजव्या पायातील पॅन्ट, लेंगा किंवा धोतर हे पोटरीपर्यंत वर घेऊन, क्लिपने बांधलेले असे. तर पाऊस सुरू झाल्यावर पॅन्टच्या दोन्ही पायांना क्लिपा बांधून ठेवल्या जात असत. आजच्या काळातील मंडळींना कदाचित हे माहितीही नसेल. पण पूर्वी हे अगदी सहज पाहायला मिळत असे. सायकलच्या उजव्या बाजूला असलेल्या साखळीला पूर्वी सरसकट चेन गार्ड बसविलेला नसे. त्यामुळे सायकल नीट फिरण्यासाठी या साखळीमध्ये घातले जाणारे तेल, पोटरीच्या खाली पॅन्ट किंवा लेंग्याला लागत असे. हे कपडे रोज खराब होत असत. मशीन ऑईल असल्यामुळे ते पटकन निघत नसे. पूर्वी १०० लिंबाची शक्ती असलेले साबणही नव्हते.
तर पावसाळ्यामध्ये सायकल चालवताना दोन्ही चाकांमधून चिखल उडत असे. आणि तेव्हाही पॅन्ट, लेंगा, धोतर यांचा पोटरीखालचा भाग चिखलाने खराब होत असे.
यासाठी पूर्वी सायकल स्वार दोन महत्त्वाचे दागिने वापरत असत. त्यांचे काम एकच असे. ते म्हणजे पॅन्ट, लेंगा, धोतर पोटरीपर्यंत घट्ट बांधून ठेवणे ! यासाठी गोल आकाराच्या पण स्टेथॉस्कोपप्रमाणे उघडू शकणाऱ्या (कृपया सोबतचे फोटो पहावेत) लोखंडी पट्ट्यांच्या क्लिप्सची जोडी किंवा ताणणाऱ्या रबराच्या कापडीपट्टीला हूक लावून त्यांची जोडी बनवली जात असे. या दोन्ही गोष्टी वापरून वरील हेतू सहजपणे साध्य करता येत असे. पुण्यात पूर्वींपासून स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणावर सायकल वापरत असत. त्यावेळी नऊवारी साड्या नेसण्याची प्रथा असल्यामुळे त्यांना देखील या क्लिप्स वापरणे सोयीस्कर पडत असे. मोठ्या आकारात पुरुषांसाठी व लहान आकारात स्त्रियांसाठी अशा दोन प्रकारच्या क्लिप्स उपलब्ध होत्या. तेव्हां पोलिसदलात मोठ्या प्रमाणावर सायकलचा वापर केला जात असे. निळा किंवा खाकी गणवेश वापरणारे पोलीस दादा तेव्हा पोटरीभोवती त्याच रंगाचा, पट्टा गुंडाळत असत. त्यांना या क्लिप्स वापरता येत नसत. कांही बूटमोजेवाले साहेबलोक त्यांच्या मोज्यांमध्ये पँट कोंबून ठेवत असत. तर काही ब्रिटिश साहेब आपली पँट पोटरीपर्यंत दुमडून होणाऱ्या घडीला, पेपर क्लिपसारखी मोठी क्लिप लावीत असत. पण हा प्रकार फारसा प्रचलित नव्हता. गमबूट हा एक खात्रीचा मार्ग उपलब्ध होता. पण हे बूट खूप वजनदार असल्यामुळे ते सफाईने वापरणे शक्य होत नसे. तसेच गमबुट्स हे अधिकतर सफाई कामगार, कारखान्यातील मजूर, बांधकाम मजूर वापरत असल्यामुळे त्याचा स्टेटस कमी समजला जात असे.
ब्रिटिशांच्या आगमनाच्या आधी भारतामध्ये पंचा, धोतर, लेंगा, लुंगी, सुरवार असे सहज गुडघ्यापर्यंत मुडपून घेता येणारे कपडे वापरले जात असत. ब्रिटिशांच्या पाटलोणींबरोबरच या क्लिपाही आल्या असाव्यात.
या क्लिप्स वापरणे हे त्यामानाने जास्त लवकर रूढ झाले. अशा गोल क्लिप्सना आणि रबरी पट्ट्यांना ” गार्टर्स किंवा क्लिपा ” म्हणत असत. गार्टर्स हे स्टेनलेस स्टील प्रमाणे चकचकीत किंवा प्लास्टिक आवरण असलेल्या काळया रंगाच्या लोखंडी पट्टीचे असत. इलॅस्टिक रबरी गार्टर्स हे पांढऱ्या व काळया रंगांमध्ये किंवा रंगीबेरंगी लेस सारख्या प्रकारचे असायचे. नंतरच्या काळामध्ये या रबरी गार्टर्सना क्लिप आणि हूक ऐवजी वेलक्रो लावण्यात आले होते.
पूर्वी अनेक ठिकाणी पूर्ण मातीचे रस्ते असल्यामुळे चिखल आणि तो उडण्याचे प्रमाण प्रचंड असे. त्यासाठी या गार्टर्सच्या वापराबरोबरच सायकलच्या दोन्ही चाकांना मागच्या बाजूला रबरी मडगार्डस वापरले जात असे. अन्यथा पुढील चाकातून तोंडापर्यंत आणि मागील चाकातून पाठीवर, डोक्यापर्यंत चिखल उडत असे. रबरी स्लीपर्स वापरणाऱ्यांची पावसात होणारी रंगरंगोटी आपण पहिली असेलच. चाकांवर लावलेल्या पत्र्याच्या अर्धगोल पन्हळीच्या (याला फेंडर्स असे म्हणतात) मागच्या टोकांवर आठ ते दहा इंच लांब आणि सुमारे सहा इंच रुंद असे रबरी तुकडे, मडगार्ड्स म्हणून बसविले जात असत. उडणारा चिखल याच्या आड अडविला जात असे. या मडगार्ड्सवर विविध उत्पादनांच्या जाहिरातीही केल्या जात असत. अशीच एक माझ्या संग्रहातील जोडी, सोबतच्या फोटोमध्ये अवश्य पहा.
आता व्यायामासाठी घरातल्या घरात सायकल चालवली जाते. पण शहरातील रस्त्यांवर दैनंदिन सायकल चालविणे धोक्याचे आणि तथाकथित स्टेटसला बाधा आणणारे ठरत आहे. तरीही शहराबाहेर अजूनसुद्धा सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
सायकलच्या विविध प्रकारच्या आणि आवाजाच्या घंटा, हँडलच्या खाली पुढच्या बाजूला विविध प्रकारची बोधचिन्हे, रंगीबेरंगी दिवे, वीज निर्मिती करणारे डायनॅमो, कॅरियर्स, हँडलवर किंवा चाकांच्या अक्षाभोवती फिरणारी रंगीत फुले, विविध प्रकारचे स्टँड्स अशा कितीतरी गोष्टींमध्ये आता नाविन्यपूर्ण आणि कलात्मक प्रकार पाहायला मिळतात. पण एकेकाळी अत्यावश्यक असणारे हे गार्टर्स नावाचे दागिने मात्र आता इतिहास जमा झाले आहेत.
लेखक : श्री मकरंद करंदीकर.
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







