श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘महर्षि व्यास, वाल्मिकींचे गुरु.. ‘गुरुंचेही गुरु’ – देवर्षी नारद – भाग – २ ’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
देवर्षि नारदांच्या सर्व उपदेशांचे सार असे की ‘सर्वदा सर्वभावेन निश्चिन्तितै: भगवानेव भजनीय:’ म्हणजे सर्वदा सर्वभावाने निश्चिंत होऊन केवळ भगवंताचेच ध्यान करावे. नामस्मरण करुन आनंदात असावे.
श्री विष्णूचे अनन्य भक्त
देवर्षि नारद भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. ते भगवंताची भक्ति आणि माहात्म्य याच्या प्रचारासाठी आपल्या वीणेचा मधुर झंकार करीत, भगवंताचे गुणगान करीत निरंतर भ्रमण करीत असतात. त्यांना भगवंताचे मन म्हणतात. ते अप्रत्यक्षरूपात भक्तांना सहाय्य करतात. त्यांचे मंगलमय जीवन विश्वाचे मंगल करण्यासाठी समर्पित आहे. ते ज्ञानाचे स्वरूप, विद्येचे भांडार, आनंदसागर आणि सर्व भूतमात्रांवर प्रेम करणारे, विश्वकल्याण चिंतणारे आहेत. म्हणूनच सर्व युगात, सर्व लोकात, सर्व विद्यांमधे, समाजातील सर्व वर्गांमधे नारदांचे एक महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे. केवळ देवतांनीच नव्हे तर दानवांनीही त्यांचा सदैव आदर केला आहे. वेळोवेळी सर्वांनी त्यांचा परामर्श घेतला आहे. श्रीमद्भागवत म्हणते की सृष्टिमधे भगवंतांनी देवर्षि नारदांच्या रूपात तीसरा अवतार घेतला आणि ‘सात्वततंत्र’, ज्याला ‘नारद पंचरात्र’ पण म्हणतात, त्याचा उपदेश दिला. यात सत्कर्मांद्वारे भव-बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. नारद हे ऋषिमुनींचे देवता आहेत व त्यांना ‘ऋषिराज’ म्हणूनही ओळखले जाते.
महाभारताच्या सभापर्वातील पांचव्या अध्यायात नारदांच्या व्यक्तिमत्वाचा करून दिलेला परिचय असा आहे… देवर्षि नारद वेद आणि उपनिषदांचे मर्मज्ञ, देवतांचे पूज्य, इतिहास – पुराणांचे विशेषज्ञ, पूर्वी होऊन गेलेल्या कल्पातील घटना जाणणारे, न्याय व धर्माचे तत्त्वज्ञ, शिक्षा, व्याकरण, आयुर्वेद, ज्योतिष आदिचे प्रकांड विद्वान, संगीत विशारद, प्रभावशाली वक्ता, मेधावी, नीतिज्ञ, कवि, महापंडित, बृहस्पतिसारख्या महाविद्वानांच्याही शंकांचे समाधान करणारे, धर्म -अर्थ- काम – मोक्ष या पुरुषार्थांचे यथार्थ ज्ञाता, योगबाळावर समस्त लोकांचे सर्व समाचार जाणण्याचे समर्थ, सांख्य आणि योग शास्त्रांचे सम्पूर्ण रहस्य जाणाणारे, देवता व दैत्यांना वैराग्य विषयाचे उपदेशक, कर्तव्य -अकर्तव्य यातील भेद करण्यात दक्ष, समस्त शास्त्रात प्रवीण, सद्गुणांचे भांडार, सदाचाराचे आधार, आनंदाचे सागर, परम तेजस्वी, सर्व विद्यानिपुण, सर्वांचे हित करणारे आहेत. अठरा महापुराणांमधे एक नारदोक्त पुराण; ‘बृहन्नारदीय पुराण’ या नावाने प्रख्यात आहे.
वायुपुराणात देवर्षि पदाचे लक्षण वर्णन असे केले आहे… देवलोकात प्रतिष्ठा प्राप्त करणा-या ऋषिगणांना देवर्षि म्हणून ओळखले जाते. भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांचे ज्ञाता, सत्यभाषी, कठोर तपस्येमुळे लोकविख्यात, गर्भावस्थेतच अज्ञान रूपी अंधकाराला नष्ट केल्यामुळे ज्यांना ज्ञानाचा प्रकाश लाभला आहे असा मंत्रवेत्ता आपल्या सिद्धिंच्या बळावर सर्व लोकात सर्वत्र संचार करण्यास सक्षम, समादेश घेणा-या लोकांनी वेढलेले, देवता, द्विज आणि नृप देवर्षि म्हणून ओळखले जातात.
असे असले तरी जनसाधारण देवर्षिंच्या रूपात केवळ नारदच परिचित आहेत. त्यांच्याइतकी प्रसिद्धि व लोकप्रियता अन्य कोणालाच लाभली नाही. वायुपुराणात सांगितलेली देवर्षि पदाची सारी लक्षणे नारदांच्या ठाई दिसतात.
मत्स्यपुराणात वर्णन आहे की श्री नारदजींनी ‘बृहत्कल्पप्रसंग’ मधे ज्या अनेक धर्म-आख्यायिका सांगितल्या आहेत, २५, ००० श्लोकांचा हा महाग्रंथच नारद महापुराण आहे. सध्या उपलब्ध असलेले नारदपुराण २२, ००० श्लोकांचे आहे. ३, ००० श्लोक कमी आहेत. प्राचीन पांडुलिपिचा काही भाग नष्ट झाल्यामुळे असे झाले असावे.
नारदपुराणात सुमारे ७५० श्लोक ज्योतिषशास्त्रवर आहेत. यात ज्योतिषाचे तीन स्कंधात सिद्धांत, होरा आणि संहिताची सर्वांगीण चर्चा केली आहे.
नारदसंहिता नावाने उपलब्ध अशा अजून एका ग्रंथात पण ज्योतिष शास्त्राच्या सर्व विषयांचे विस्तृत वर्णन मिळते. यावरून हे सिद्ध होते की देवर्षि नारद भक्तिप्रमाणे ज्योतिष विषयाचेही प्रधान आचार्य होते.
कीर्तन परंपरा
भारत देश विविधतेने नटलेला आहे हे सर्वज्ञात आहे. विविध भाषा, विविध, वेषभूषा, विविध संगीत परंपरा, विविध लोककला, विविध कथाकीर्तन परंपरा, किती किती म्हणून सांगावे! पण येवढी विविधता असली तरी संस्कृती एक आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडेही भक्तिमार्गात कीर्तन परंपरा आहेत. त्यात वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन व नारदीय कीर्तन, या तीन मुख्य कीर्तन परंपरा विशेष लोकप्रिय आहेत.
वारकरी कीर्तन परंपरा संत नामदेवांनी विशेष लोकप्रिय केली. त्यापूर्वी ती अस्तितौवात असेलही, तरी भागवत किंवा वारकरी कीर्तन परंपरेत नामदेवांचे नाव अग्रस्थानी आहे.
नामदेव महाराज उत्तम कीर्तन करीत असंत. असे म्हणतात की, नामदेव कीर्तन करू लागले की स्वतः विठ्ठल त्यांचे कीर्तन ऐकायला येऊन बसत. कीर्तनातील नामघोष करताना नामदेवांबरोबर स्वतः श्रीहरी सुद्धा तल्लीन होऊन नाचायला लागंत. नाचताना ते येवढे तल्लीन होत की स्वतः नेसूचा पीतांबर कधी फिटला याचेही हरीला भान रहात नसे!
रामदासी कीर्तन परंपरेचे प्रणेते श्री समर्थ रामदासस्वामी आहेत. या कीर्तनाचा वर्णविषय असतो प्रभु रामचंद्रांचे लीलाचरित्र वर्णन.
नारदीय कीर्तन परंपरा सर्वात प्राचीन आहे. तिचे प्रवर्तक स्वतः देवर्षी नारद आहेत. यात श्रीविष्णु राम, श्रीकृष्ण, विठ्ठल, यासारखे त्यांचे अवतार व देवतांच्या लीलांचे गुणगान तसेच थोर वैष्णव संतचरित्रांचे कथन, वर्णन केले जाते. काव्य, नाट्य, अभिनय, गायन, वादन, नर्तन या सर्व कलांचे प्रदर्शन करून हरिकथा अधिकाधिक रंगवून सांगितल्या जातात.
जगातील एकमेव नारद मंदीर महाराष्ट्रात व तेही पुण्यात आहे. तिथे नारदीय कीर्तनाचे विद्यापीठही आहे. हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनी हौसेने तिथे कीर्तनकला शिकून जगभर आपली कीर्तने सादर करीत आहेत.
सध्या धार्मिक चित्रपट, टी व्ही मालिका, नाटके इ मधे नारदांचे जे चित्र दाखवले जाते ते देवर्षिच्या महानतेपुढे अगदीच ठेंगणे ठुसके आहे, सवंग आहे. नारदांचे पात्र ज्या प्रकारे रंगविले जाते त्यावरून नारद केवळ भांडणे लाऊन गंमत बघणारा, अंगविक्षेप, शब्दच्छल व कोट्या करणारा विदूषक वाटावा.
प्रकांड पांडित्य असलेल्या विराट व्यक्तिमत्वावर केलेला हा सरळ सरळ अन्याय आहे. ते लोक नारदजींचा उपहास करणारे, श्रीहरिच्या या अंशावताराचा अवमान करण्याचा अपराध करणारे आहेत.
भगवंताच्या अधिकांश लीलांत नारदजी अनन्य सहयोगी असतात. ते भगवंताचे पार्षद आहेतच खेरीज देवता गणांचे प्रवक्ता पण आहेत. नारदजी ख-या अर्थाने ‘गुरुंचे गुरु’ आहेत, देवांचे ऋषी- ‘देवर्षि’ आहेत!
ऋषीपंचमीनिमित्त सर्व ऋषी, महर्षींना साष्टांग नमस्कार.
— समाप्त —
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





