सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ शबरी… – लेख क्र. १३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
लग्न म्हणजे किती आनंदाचा दिवस असतो नां! मी त्या दिवशी खूप आनंदी होते. आता मी आईसारखं जुनेर गुंडाळणार! चोळी घालणार! हातात नारनिया, बोटात हंसली, कानात बाळी, नाकात नथनी, गळ्यात कंठा, साखळ्या! खरंच किती दागिने मी घालणार होते! आणि मी तर अज राजाची मुलगी, राजकुमारी! मला कशाची कमतरता कधीच नव्हती. माझे तर दागिने सगळे चांदीचे, मोत्यांनी वेढलेले होते.पण खरंच मला एवढा दागिन्यांचा आनंद होता कां? पण माझ्या सगळ्या सख्यांना खूप उत्सुकता आणि कौतुक होतं. त्यांना असे दागिने पाहायला मिळायचे नाहीत नां! त्यांचे दागिने म्हणजे साधे लाल हिरव्या मण्यांचे.पण मी कशी दिसेन सगळे दागिने घातले की? त्यादिवशी किती मजा करायची आहे. गाणी गायची, फेर धरून नाचायचं. तेवढ्यात ‘श्रमणा’ हाक ऐकू आली आणि मी एकदम दिवा स्वप्नातून जागी झाले. आई मला वेणी घालायला बोलवत होती. पळत गेले. पण आई वेणी घालताना माझ्या कानावर खूप पशुपक्ष्यांचे ओरडणे ऐकू आले. मला कळेना. वास्तविक मला रानात जायला खूप आवडायचं.सगळ्या पक्ष्यांशी मी गप्पा मारायची. खूप बोलायची. त्यांचं सगळं बोलणं मला कळायचं. सगळ्या झाडांची काळजी घ्यायची, पशु पक्ष्यांची काळजी घ्यायची हे मला खूप आवडायचं. पण आत्ता हा येतोय नां आवाज तो खूप चांगला नाहीये. म्हणजे त्यांचा सुखाचा आवाज नाहीये.काहीतरी त्यांना दुःख आहे असं मला वाटायला लागलं. मग मी आईला विचारलं, “एवढा बाहेर पशुपक्ष्यांचा आवाज कां येतोय? इतके सगळे कां जमलेत?” आई म्हणाली, “अगं! उद्या तुझं लग्न नां, मग सगळ्या पाहुण्यांना, गावातल्या लोकांना मेजवानी नको द्यायला? खूप कुठून कुठून राजे आणि त्यांच्या घरातली सगळी मंडळी येणार आहेत जेवायला. राजकुमारीचं लग्न आहे. मग थाटात व्हायला हवंच की! मेजवानी तर काय लक्षात राहील अशी असणार आहे.” पण माझं आईच्या बोलण्याकडे लक्ष होतं कुठं! मी तर फक्त वेणी पूर्ण व्हायची वाट बघत होते. मी लगेच पळत बाहेर गेले. पाहिलं तर खरंच खूप सारे पशुपक्षी प्राणी पकडून आणले होते. मी आल्यावर त्यांनी माझ्याकडे तक्रार करायला सुरुवात केली. काय करावं मला काहीच कळेना. माझ्या लग्नासाठी इतक्या प्राण्यांनी आपला जीव गमवावा? नाही, असं होणार नाही. ह्यांना वाचवण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. काय करावे? सगळ्यांना सोडून द्यावं काय? नाही, पिताजींचा क्रोध! भीती वाटते. आपण जर लग्नालाच नाही म्हणालो तर? तेही चालणार नाही. आता सगळ्यांना बोलावणी केली आहेत. सगळी माणसे येणार, नवऱ्या मुलाकडची पण येणार.सगळ्यांना नाही म्हणून सांगायचं हे शक्यच नाही. महाराज आपल्यालाच बांधून ठेवतील. नाही, तसंही नाही चालणार. काहीतरी वेगळं करायला हवं. रात्र झाली सगळी झोपायला गेली. मला कांही झोप येईना. त्या प्राण्यांचे आवाज कानात घुमत होते. काय करावं काही कळेना. शेवटी हळूच उठले. सगळ्या प्राण्यांना मुक्त केलं. मुक्ततेच्या आनंदात त्यांनी ओरडायला सुरुवात केली. बापरे!आता कोणीतरी उठणार आणि आपण सापडणार!
घाबरले, आणि पळत सुटले. वाट सापडेल तिकडे पळाले. पळता पळता जंगलात आले. आता मात्र घुबडांचे आवाज ऐकू यायला लागले.भितीने अंग थरथरु लागलं. तशी खरं म्हणजे मी जंगलाला किंवा प्राण्यांना घाबरणारी नाही. पण मनातली भीती पण होती नां! आपण काहीतरी चुकीचं करून आलोय,ही. माझ्या घशाला कोरड पडली. जवळ कुठे पाणी पण नव्हतं. उजाडेपर्यंत एका झाडावर चढून बसले. उजाडल्यावर पुन्हा काय करायचं? कुठे जायचं? वाटलं, परत घरी जावं. पण आता लग्न होणार नाही. महाराजांची केवढी नाचक्की झाली असेल!त्यात पळून गेलेली मुलगी परत आली तर तिला मृत्यु शिवाय दुसरा पर्याय नसतो. मग चालत राहिले. बऱ्याच वेळानंतर दूरवर घरासारखं काही दिसलं. जवळ गेल्यावर लक्षात आलं हा आश्रम दिसतोय. इथे ऋषी राहत आहेत वाटतं. काय करावं कळेना. मी भिल्ल जातीची. मला कुठे राहायला हे जागाही देणार नाहीत. शेवटी मी जंगलातच राहायचं ठरवलं. रोज पहात होते ते आश्रमातील ऋषीकुमार सगळा आश्रमाचा परिसर झाडून काढायचे, नदीपासून आश्रमा पर्यंतचा रस्ता स्वच्छ करायचे, त्यांना होमासाठी लागणारी समिधा जंगलातून वेचून आणायचे. मग मलाही वाटायला लागलं की आपण काहीतरी यांना मदत करावी. म्हणून मी ते ऋषी कुमार उठायच्या आधीच उठायची. आश्रमापासून नदीपर्यंतचा रस्ता स्वच्छ करून ठेवायची. आश्रमाचा सगळा परिसर स्वच्छ करायची. त्यांना लागणारं सगळं होमाचं साहित्य आणून ठेवायची. त्यांना काही कळेना,की हे काम कोण करतंय रोज! त्यामुळे एक दिवस त्यांनी मला पकडलं आणि मग मातंग नावाच्या ऋषींसमोर उभं केलं. तो त्यांचाच आश्रम होता म्हणे. त्यांनी मला माझी सगळी माहिती विचारली. मी इथे कां व कशी आले ते मी सगळं सांगितलं. मी शबर जातीची भिल्लीण आहे हे समजल्यावर म्हणाले, ” आज पासून तुझं नांव शबरी! काळजी करू नको. आता मी तुझा पिता! काही लागलं तर मला सांग.” त्यांनी माझी आश्रमातली कामं ठरवून दिली. माझ्यासाठी एक झोपडी बांधून दिली. आता मातंग ऋषींचा आश्रम हेच माझं घर झालं. आश्रमाची सगळी कामं मी करायची. जंगलात जाऊन कंदमुळे फळं आणायची आणि त्यावर गुजराण करायची. त्यावेळी जंगलातल्या पक्ष्यांबरोबर, प्राण्यांबरोबर खूप गप्पा मारायची. असे छान दिवस जात होते. मातंग ऋषी हळूहळू वृद्ध होऊ लागले. मी त्यांना विचारलं, “तुम्ही मला सोडून तर जाणार नाही नां? मी एका पित्याचे घर सोडून आले. आता तुम्ही मला सोडून गेला तर मी कुठे जाऊ?” मातंग ऋषी म्हणाले,” कांही काळजी करू नकोस. कुठेही जायची गरज नाही. या सगळ्या आश्रमाची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आणि आता श्रीराम तुझी काळजी घेतील.” ” हे श्रीराम कोण?” ” कळेल तुला! ते येतील तुझ्याकडे. सगळ्या जगाचा आधार आहेत ते. मग तुला कां नाही आधार देणार!” आणि ऋषींनी देहत्याग केला. मी दुसरा पिताही गमावला.
आता श्रीरामांची वाट पाहत बसले. ऋषी सुद्धा त्यांना आदराने श्रीराम म्हणत होते. कोणी देवासमान व्यक्ती असणार.मी ही मग सतत त्यांच्या नावाचा ध्यास घेतला होता. तो जगाला आधार देतो म्हणत होते. ते कसे दिसत असतील? केव्हा येतील? त्यांना काय आवडत असेल? मी रोज झोपडी समोरची जागा झाडून स्वच्छ ठेवत होते. सकाळी लवकर उठून फुलं आणून त्यांचा हार गुंफून ठेवत होते.त्यांना बसायला रोज नवीन आसन विणून ठेवत होते. कंदमुळे फळं काढून आणून ठेवत होते. प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फळं मिळायची. कधीकधी कांही चांगली निघायची नाहीत. मला वाटायचं श्रीराम आल्यावर आपण त्यांना दिलेली फळं चांगली निघाली नाहीत तर काय करायचं? मग मी रोज ती चाखून बघायची आणि चांगली असतील तेवढीच एका पानावर ठेवून त्यावर दुसरे पान पालथे घालून ठेवायची. ते आल्यावर गडबड नको व्हायला म्हणून सगळं लवकर आवरून तयारी करून ठेवत होते.
एक दिवस एक वानरांची टोळी आली. त्यांना माझ्या तोंडी रामाचं नांव ऐकून आश्चर्य वाटलं. ह्याच नावाचा जप आमचा हनुमान करतो म्हणाले. मग त्यांनी हनुमानाच्या दैवी शक्तींचं रसभरीत वर्णन केलं. वानरांमुळे मला आता दिशा संकेत कळायला लागले होते.
वर्षा मागून वर्षं गेली पण श्रीराम आलेच नाहीत. आता मात्र माझीही गात्रं वृद्धत्वाकडे झुकू लागली होती. पण मी निराश होणार नव्हते. मातंग ऋषी माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाहीत. श्रीराम नक्की येणार. आता डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहत होते. सतत राम नामाचा जप चालला होता. एक दिवस झोपडीवर बसून कावळा ओरडायला लागला. पाखरांनी अंगण भरून गेलं. त्यांच्या चिवचिवाटानं सारा आसमंत प्रफुल्लित झाला. आणि आपण सोळा वर्षाची तरुणी झालो आहोत असा उत्साह माझ्या अंगात संचारला. श्रीराम येणार अशी खात्री झाली. भराभर सगळी तयारी केली. ते येताना दिसले आणि मी त्यांना ओळखलं. त्यांनीही मला ओळखलं. कुठल्या जन्मीचं नातं होतं कोण जाणे! मी त्यांचे पाय धुतले, फुलांचा हार केलेला घातला. आसनावर बसवलं. आणि अगोबाई, आज फक्त बोरंच मिळाली की! आणि ती पण गडबडीत तशीच ठेवली. ती तर आंबटही असतात. मग त्यांना देऊ कशी? आता काय करायचं? मग सरळ मी बोरं चाखून बघितली आणि मग गोड गोड बघून त्यांना खायला दिली. विचारलं मी, “चालेल नां? माफ करा मला उष्टी द्यावी लागली. माझ्या वेडीच्या लक्षातच नाही आलं.” ते म्हणाले, ” कां नाही चालणार? आणि माफी मी मागायला हवी. माफ करशील नां? तुझा राम नामाचा धावा ऐकत होतो गं, पण काय करू मलाच यायला उशीर झाला. माफ कर मला.” “असं काय बोलता देवा! कुठं निघालाय आता. माझी कांहीं मदत होणार असेल तर सांगा. मला माहित आहे तसंच कांहीतरी कारण असणार म्हणून तुम्हाला यायला उशीर झाला.” त्यांनी मला सीता हरणाचे दुःख सांगितले. मी त्यांना लंकेची दिशा सांगितली व हे ही सांगितले की वाटेत हनुमान शूर योद्धा आहे. त्याची व त्याच्या सैन्याची मदत घ्या. आता श्रीराम जायला उठले आणि मला रडूच कोसळलं. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. देवा, मला आता जगायचं नाही. या देहाच्या बंधनातून मुक्त करा. आणि खरोखरंच त्यांनी मला मुक्त केलं. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला सोडवलं. श्रद्धा आणि भक्ती यांचं अमर उदाहरण मागे ठेऊन! कायमचं!!
– लेख क्र. १३.
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






सुंदर रोचक लेख !