श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ पंचधान्यांची हिरवळ… ☆ श्री दिवाकर बुरसे

घटस्थापनेच्या वेळी पत्रावळ किंवा ताम्हणातील वावरीत पेरलेली पंचधान्ये नीट अंकुरत नाहीत. पहिले चार-पाच दिवस तर अंकूर दिसतच नाहीत. आठव्या-नवव्या दिवशी जेमतेम बोटभर गवत उगवते तोपर्यंत घट विसर्जित करायची वेळ येते. त्यामुळे दसऱ्याला धान्यांची हिरवीगार कोवळी लुसलुशीत तृणपाती पांढऱ्या-पिवळ्या शेवंतीसवे केसात खोचून मिरवायला मजा येत नाही अशी अनेक मुली-महिलांची तक्रार असते.

मंडळी, ग्रामीण भागातील महिला अजूनही केसांच्या वेण्या,अंबाडे घालतात. केसात फुले माळतात. शहरी स्त्रियांनी गरज म्हणून, सोय म्हणून, हौस म्हणून, स्टाईल म्हणून बाँबकट, बाँयकट, स्टेपकट, शोल्डरकट, मश्रूमकट यासारख्या ‘कटकटींचा’ शाँर्टकट मार्ग स्विकारल्यामुळे त्यांच्या केसांच्या तक्रारींच्या केसेस कमी झाल्या असतीलही कदाचित, पण या ‘कट’कारस्थानामुळे लांबसडक, दाट, काळ्याभोर केशसंभारावर रंगीबेरंगी सुगंधि फुलांची आरास करण्याच्या आनंदाला बिचाऱ्या मुकल्या आहेत. असो, काळाचा हा महिमा आहे हेच खरं! पण असं असलं तरीही  हाँलमधे सजावटीसाठी त्यांनाही असे हिरवे तृणांकुर मिळाले तर हवेच असतात.

आमच्या घरचा अनुभव सुद्धा एकेकाळी असाच होता पण आता नाही. कारण मी त्यावर एक उपाय शोधला. आता दरवर्षी मी असेच करतो. आपणही करून पहा. मला विश्वास आहे, आपलीही घटाभोवती पेरलेली धान्ये चांगली आठ-दहा इंच उंचीची उगवतील.

तर काय करायचं, घटस्थापनेच्या आधी दोन दिवस ही पंच-सप्त-नव धान्ये म्हणजे गहू, ज्वारी, नाचणी, राळे, नागली सातू, यव, अगदी मूग, मसूर, मटकी, उडीद इ. इ. सुद्धा चालतील, स्वच्छ धुऊन पाण्यात सात-आठ तास भिजवायची. आठ तासानंतर ती पाण्यातून बाहेर काढून, हलकेच पुसून, थोडी कोरडी करून एका स्वच्छ फडक्यात गुंडाळून ठेवायची उबदार जागी. घट बसवायच्या वेळेपर्यंत ही धान्ये अंकुरतील, त्यांना टरारून मोड येतील. अशी आधीच अंकुरलेली धान्ये पहिल्या दिवशी वावरीत पेरली तर सभोवतीची ओलसर माती, हवा, सूर्यप्रकाश यामुळे दुसऱ्या दिवसापासूनच ती जोमाने वाढू लागतील. घट उठेपर्यंत वीतभर किंवा अधिक उंचीची हिरवीगार तृणपाती वर येतील!

यावर्षी हे रहस्य मी घटस्थापनेपूर्वीच  उलगडतोय तुम्हाला तयारीला पुरेसा वेळ मिळावा म्हणून.आठ दिवस आधीच सांगतो मी काय करतो ते. तुम्ही करून पहा आणि सांगा ही आयडियेची कल्पना कशी वाटली ते. सांगा कशाला, सरळ त्याचे फोटो काढून पाठवा. इतरांनाही कळू द्या की तुमचं यावेळचं नवरात्र कसं झालं, दिवसेंदिवस कसं रंगत गेलं आणि दसरा कसा हिरवळला तो!

हो, आणि समजा….

काही राडा झाला, बल्ल्या झाला, गोची झाली तर मला दोष देऊ नका. ‘आपल्याच करण्यात काही तरी चूक झाली’ किंवा ‘आपली धान्ये निकृष्ट होती, जुनाट, मृत होती, माती चांगली नव्हती, पाणी अधिक-उणे झाले’ असं समजून, ते वास्तव  स्विकारून पुढच्यावर्षी पुन्हा हाच प्रयोग करून पहा, यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका!

सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या अनेक शुभेच्छा!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted