श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ एक इसापनीती कथा – शहाणे गाढव ☆ श्री जगदीश काबरे ☆

काही व्यापारी गाढवावर माल लादून व्यापार करीत निघालेले होते. सकाळच्या वेळी एका नदीकाठी व्यापाऱ्यांचा मुक्काम पडला. व्यापारी चुली मांडून स्वयंपाक करू लागले. गाढवे चरत होती. त्यांच्या पाठीवर ओझे तसेच होते.

इतक्यात अशी आवई उठली की, ‘चोर आले, पळा, पळा!’ सगळे व्यापारी घाईगर्दीने पळण्याचा प्रयास करू लागले.

गाढवे मात्र शांतपणे चरत होती. तेव्हा व्यापारी गाढवांना म्हणाले, “अरे, चरता काय? चोर आले, डाकू आले, पळा पळा!

चरणाऱ्या गाढवांपैकी एक शहाणे गाढव होते. या शहाण्या गाढवाने मान वर करून व्यापाऱ्यांना विचारले, “का हो, डाकूंनी जर आम्हाला पकडले तर आमच्या पाठीवरचे ओझे वाढणार आहे काय?”

व्यापारी म्हणाले, “तसे काही नाही. जितके ओझे लादता येणे शक्य आहे तितके आम्ही लादलेलेच आहे. अधिक ओझे वाढण्याची शक्यताच नाही.”

तेव्हा शहाणे गाढव म्हणाले, “समजा आम्ही तुमच्याबरोबर पळालो तर आमच्या पाठीवरचे ओझे कमी होणार काय?”

व्यापारी म्हणाले, “तसेही नाही. हे इतकेच ओझे तुमच्यावर राहणार आहे.”

तेव्हा ते शहाणे गाढव म्हणाले, “जर ओझे वाढणार नसेल, कमी होणार नसेल तर मग तुम्हीच पळा. आम्ही चरतो.”

थोडक्यात काय तर, तोंडदेखल्या घोषणा आणि लांबरुंद व्याख्याने यांना काहीच अर्थ नाही. व्यापारी राज्यकर्त्यांचे ओझे जनतेवर जर तितकेच राहणार असेल तर मग घोषणा ‘घराणेशाही हटाव’ असली तरी काय आणि ‘लोकशाही बचाव’ असली काय, त्यात कोणाला रस वाटण्याचे कारण नाही. सर्वसामान्यांच्या दरिद्री जीवनात काही फरक होणार असेल तरच लोकशाहीला अर्थ असतो. एरवी मोठमोठ्या घोषणा ह्या ढोंगी नेत्यांच्या भूलथापाच असतात. त्यांना दुसरा कोणताच अर्थ नसतो. हे जेवढ्या लवकर आपण लक्षात घेऊ तेवढे बरे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted