श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ पाऊणशे वर्षापूर्वीचा पुण्यातला शारदीय नवरात्रोत्सव… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
अनंत चतुर्दशीला निघालेली सार्वजनिक गणेश विसर्जनाची मिरवणूक रात्री तीन-साडेतीन वाजेपर्यंत चाले. गावातील अबालथोर आणि विशेषतः तरुणाई मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी होई. दिवसभर गुलाल उधळत, ढोल, ताशे, वाजवत, लेझीम व इतर खेळ खेळलेली मुले गणेश विसर्जननंतर मात्र अगदी थकून जात. घरी परतताना दोन पावलं उचलण्याचेही त्राण त्यांच्या अंगी उरलेले नसत. घरी गेल्यावर जागा मिळेल तिथे अंग टाकून क्षणात ढाराढूर झोपून जात, पुढचे चोवीस तास! काही मुले तर रस्त्यातील दुकानांच्या फळ्यांवरच विसावत तर काही तालमींच्या कट्ट्यांवर अंग झोकून देत.
गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होई. एक-दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मंडळी पितरांच्या सरबराईला लागत कारण त्यांचे दिवंगत पूर्वज, पितर आता जेवायला खाली पृथ्वीवर येणार असायचे त्यांच्या घरी!
कसबा गणपतीच्या कट्ट्यावर, ओवऱ्यांवर भटभिक्षुक आणि पौरोहित्य करणारी ब्राह्मणमंडळी जमत. बल्लव, आचारी, वाढपी, स्वयंपाकात मदत करणाऱ्या बाया जोगेश्वरी मंदिरच्या परिसरात उपलब्ध असत. कोणीही इच्छुक, गरजू यजमान तिथे जाऊन त्यांना भेटून पुढचे दिवस, मुहूर्त, वेळा ठरवीत आणि भक्तिभावाने ब्राह्मणरूपात असलेल्या आपल्या पितरांना घरी आमंत्रित करून श्रद्धांजली वहात, त्यांना यथेच्छ जेऊ-खाऊ घालीत. यथाशक्ती दक्षिणा देत. या दान, तर्पणादि क्रियाकर्मांनी आणि सुग्रास भोजनाने तृप्त होत्साते हे सर्व पितर आपल्या पुत्रपौत्रादिकांना आशीर्वाद देऊन, संचिताचा उर्वरित कर्मभोग भोगण्यासाठी पितृलोकाप्रत निर्गमन करीत. पुढचे पंधरा दिवस घरोघर ही धांदल चाले.
श्रावण-भाद्रपदात सकाळी डोईवर टोपल्या – दुरड्या – पाट्या – हारे घेऊन ‘आघाडा, दूर्वा, फुले घ्या’ म्हणून गल्ली -बोळातून, आळी-आळीतून, हाळ्या घालत फिरणाऱ्या कष्टकरी महिलांच्या टोपलीत आता एक नव्या द्रव्याची भर पडलेली असे. ते पूजाद्रव्य असे ‘वावरी’, म्हणजे शेतातील माती. फुलांमधे तेरड्याऐवजी तीळ -जवसाची फुले दिसत. घटस्थापनेला त्याची आवश्यकता असते. पंचधान्ये प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असत पण वावरी विकत घ्यावी लागे. त्यासाठी विनियमाचे माध्यम असे केवळ पसाभर धान्य. त्याबदल्यात यजमानीणबाईंना मिळे आघाडा, दूर्वा, फुले आणि घटाला वावरी!
घटस्थापनेपूर्वी नगरातील सर्व मंदिरे धुऊन, झाडून, पुसून लख्ख केली जात, सुशोभित केली जात. यापुढील दहा दिवस सगळ्याच मंदिरात भक्तांची गर्दी होणार असे. त्यावेळी पुण्यात एक सुंदर प्रथा होती. बहुतेक प्रमुख मंदिरांच्या प्रांगणात किंवा सभामंडपात नगरातील विविध कलाकार विविध रंगांनी चितारलेल्या विविध विषयांवरील रांगोळ्या रेखाटत. त्यांना ‘गालिचे’ म्हणत. या रांगोळ्या कधी शिरगोळ्याच्या चूर्णापासून, रांगोळीपासून तर कधी पाना – फुलांपासून काढल्या जात. पाण्यावरच्या तरंगत्या रांगोळ्या हे विशेष आकर्षण असे. रोज नवे चित्र काढले जाई. नवरात्रीचे नऊ दिवस व काही ठिकाणी तर कोजागिरीपर्यंत असे कलाप्रदर्शन चाले. नगरातील रसिक नागरिक सहकुटुंब सहपरिवार हे गालिचे पहायला प्रत्येक मंदिरात आवर्जून जात. कलाकृतीचे व कलाकाराचे कौतुक करीत.
अश्विन प्रतिपदेला पुण्याचे ग्रामदैवत असलेली तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी, भवानी माता, त्वष्टाकासार समाजाची अष्टभुजा, इ. सार्वजनिक अथवा खाजगी देवींच्या मंदिराबाहेर हळद-कुंकवाचे सडे शिंपडले जात. मंदिरे फुलांच्या माळांनी, तोरणांनी सजवली जात. सर्व देवदेवतांच्या मंदिरांमधे जसे घट बसत तसेच देवींच्या मंदिरातही स्थापिले जात. मंदिरातील देवी विविध मौल्यवान वस्त्रालंकारांनी सजवल्या जात. भोवतालचे देखावे आणि देवींची वाहने नित्य नवी, वैविध्यपूर्ण व आकर्षक असत. सकाळपासूनच भक्त देवीदर्शनाला येऊ लागत. संध्याकाळी गर्दी वाढत असे. देवीदर्शनाबरोबर मंदिरातले गालिचे पाहणे हे ही एक महत्वाचे आकर्षण असे.
अशी गर्दी होत असली तरी कोणत्याही मंदिरात केव्हाही सहज व सुलभ प्रवेश मिळे. मंदिरात धक्काबुक्की, रेटारेटी, चेंगराचेंगरी असले प्रकार घडत नसत. चोऱ्यामाऱ्या होण्याचे प्रमाणही नगण्य असे. पोलिसांच्या संरक्षणाची व अनुशासनाची सहसा आवश्यकता भासत नसे. महिलांची टिंगलटवाळी, छेडछाड कोणी काढीत नसे.
घरोघर थाटामाटात घट बसवले जात. नंदादीप प्रज्वलीत केले जात. कर्ती मंडळी, ज्यात महिला व पुरुष दोघेही असत, या पुढचे नऊ दिवस उपवास करीत. या उपवासांचे काही प्रकार असे – केवळ फलाहार, केवळ जलपान, केवळ दुग्धपान, धान्यफराळ, दिवसातून एकदाच भोजन करणे म्हणजे एकभुक्त राहणे इ. इ.
या नऊ दिवसात अनेकजण देवी सप्तशतीचा पाठ करीत. यजमान स्वतः पाठ करू शकत नसेल तर ब्राह्मणाकडून करवून घेत. काहींच्या घरी चंडियाग केले जात. काही धनिक भाविक सप्तचंडी,नवचंडी, शतचंडी असे यज्ञयाग करीत. देवीचे गोंधळ घातले जात. डफ, तुणतुणी आणि संबळी कडाडत. भुत्ये नाचवले जात. सा-या गावाचा आसमंत धुपाच्या गंधाने कोंदाटून जात असे. सकाळी मोरपिसांची टोपी घातलेले वासुदेव दारी येत तर रात्री गळ्यात कवड्यांच्या माळा आणि हाती पेटतलेले पोत नाचवणारे भुत्ये अवतरत. रात्रीच्या मंद मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात पेटते पोत हाती घेऊन फिरणारे भुत्ये मोठे चमत्कारिक, गूढ, रौद्र पण तरीही आकर्षक दिसत.
संध्याकाळी मंदिरामंदिरात व वाड्यावाड्यात भोंडले आयोजित केले जात. पाटावर हत्तीचे चित्र काढून त्या पाटाभोवती महिला, मुली फेर धरून, गाणी गात. दर दिवशी गाण्यांची संख्या वाढविली जाई.
त्या गाण्यांत गणेशदेव, लिंबांचे एकापाठोपाठ घेतलेले झेल, मामंजी, सासरे, त्यांची शेंडी, चंपी, गावच्या वेशीपर्यंत वहात गेलेला तेलाचा ओघळ, त्यात वाहून गेलेला हत्ती, सुनेने लावलेला कार्ल्याचा वेल, खट्याळ भाऊजी, कुजकट वन्सबाई, वेडा आणि त्याची बायको, सासरचा व माहेरचा वैद्य, लोळण घेणारा कृष्ण इ.इ. अशी अनेक पात्रे, व्यक्तिमत्वे एकत्र, एकाच भोंडल्याच्या मंचावर जमत आणि स्त्रिमनातील उसासे – उमाळ्यांना वाट मोकळी करून देत.
शेवटी ‘खिरापती ओळखण्याचा’ उत्कंठावर्धक खेळ संपन्न होऊन, खिरापतींचे वाटप होई. खिरापत वाड्यातल्या प्रत्येकाला मिळे. त्यात मुले, पुरुष, जेष्ठ, अभ्यागत, वृद्ध या साऱ्यांचा समावेष असे.
रात्री मंदिरात, चौकाचौकात, वाड्यातील अंगणात, ओसऱ्यांवर, पेट्रोमँक्सच्या प्रकाशात पट, सारिपाट, गंजिफे खेळले जात. हे खेळ रात्री उशिरापर्यंत चालत, ते उत्तरोत्तर रंगत जात. या खेळात स्त्री व पुरुष दोघेही सहभागी होत. सामुदायिक गरबा, टिपऱ्या, दांडिया खेळण्याची गुजराथी पद्धत महाराष्ट्रात पोहोचली नव्हती.
काहीसा रेंगाळलेला ‘भादवी ताप’ दिवसा जाणवे पण सूर्यास्तानंतर वायुमानातील शीतलताही जाणवू लागे. हवेतला गारवा क्वचित अंगावर काटे उठवी. या दहा दिवसात दोन तीन वेळा तरी विजांचा कडकडाट होऊन आकाशातून ‘हत्ती बरसत’ पण तरीही सकाळी नदीपात्रावर, जलाशयांवर, वृक्षावृक्षातून धुके तरंगताना दिसे.
सार्वजनिक गणेश मंडळे व तालमीतील उत्साही तरुण देवीभक्त भल्या पहाटे फुलांच्या माळा घेऊन, त्या चतुःशृंगी देवीला अर्पण करण्यासाठी रस्त्याने वाजत-गाजत, नाचत, मातेच्या नामाचा जयघोष करीत घेऊन जात.
पुण्याजवळ पण थोडीशी गावाबाहेर असलेली पद्मावती व चतुःशृंगी ही दोन मंदिरे आहेत. पद्मावती सपाटीवर आहे पण चतुःशृंगी देवी मात्र एका टेकडीवर विराजमान आहे. नवरात्रीत तिचे विशेष महत्व आहे. दरवर्षी यानिमित्त तिथे जत्रा भरते. गावोगावच्या जत्रेसारखेच या जत्रेचेही स्वरूप असते. टेकडीच्या पायथ्याशी खाऊ खेळण्यांची दुकाने थाटली जात. नवरात्रींच्या दिवसात खरे पुणेकर एकदा तरी या जत्रेला जातात. एकेकाळी गावाबाहेर असलेले हे स्थान आता गावाच्या अगदी मध्यभागी आले आहे. मंदिराच्या टेकडीला आय टी क्षेत्रातील आँफिसाच्या उंच उंच इमारतीचा वेढा पडलाय. नवरात्रीत आजही तिथे जत्रा भरते पण पूर्वीची मौज आता राहिली नाही.
मी चार-पाच वर्षांचा असताना मला आमच्या शेजारचा गजानन अभ्यंकर काका सायकलवरून चतुःशृंगीला घेऊन गेला होता.
सिमला आँफिसवरून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावर डाव्या हाताला हे चतुःशृंगीचे मंदिर आहे. शनिवारवाडा ते मंदिर तीन चार कि. मी. अंतरावर असावे. या विद्यापीठ रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुने, प्रौढ अनेक वटवृक्ष होते. त्यांच्या पारंब्या जमिनीपर्यंत लोंबलेल्या होत्या. ही झाडे इतकी दाट होती की दिवसा सूर्याची उन्हे सुद्धा रस्त्यावर पडत नसत. आता मात्र हे सगळे वृक्ष छाटले गेले असून दुतर्फा भव्य औद्योगिक कार्यालयांचे प्रासाद उभारले गेले आहेत.
तर, गजानन काकाबरोबर जाताना त्याने अर्धे अंतर पार केल्यावर सायकल थांबविली आणि सायलवरून मला उतरवले. सायकल एका झाडाला टेकवून, मला बोटाला धरून तो रस्त्याच्या कडेला काहीश्या आतल्या भागात घेऊन गेला. तिथे काही न बोलता भक्तिभावाने क्षणभर हात जोडून उभा राहिला. पुढच्या क्षणी त्याने जमिनीवर साष्टांग दंडवत घातला. मी त्याची ही कृती न्यहाळत उभा होतो. उठून उभा राहिल्यावर मी त्याला विचारले, ” हीच का चतुःशृंगी? इथे मंदिर कुठंय? देवी कुठंय? जत्रा कुठंय?” त्यावर तो हसला आणि उत्तरला, “मंदिर पुढे आहे. जाऊ आपण. आत्ता उभे आहोत ते आपल्या स्वतंत्र भारताचे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथेच ‘रँड’ नावाच्या गोऱ्या दैत्याचा ‘चाफेकर’ नावाच्या महापुरुषाने वध केला होता. चल निघू. पुढची कथा जाताजाता सांगतो. ” त्याने रस्त्यात मला चाफेकरांची थरारक कथा ऐकवली खरी पण मला तपशीलात फारशी कळली नाही. त्यावेळी मला समजले नाही पण आज कळतोय त्यांच्या कृतीचा अर्थ. गजाकाका फारसा शिकलेला नव्हता. कुठल्याश्या हाँटेलात, खानावळीत की दुकानात कामाला होता. पण पुण्यातील एका सामान्य माणसाची ही राजकीय जाण आणि राष्ट्रभक्ती किती प्रखर होती पहा!
दिवसामागून दिवस उजाडे. घटावर एकेक माळ सोडली जाई. अश्विन अष्टमी हा नवरात्रीतला सर्वात महत्वाचा दिवस. महिला या दिवशी घागरी फुंकत फुंकत देवींच्या मंदिरात जात. तिथेही घागरी फुंकल्या जात. काहींच्या अंगात देवीचा संचार होत असे. खंडेनवमीला यंत्रांची पूजा होई. काहींचे घट या दिवशीच उठत तर काहींचे दशमीला उठत. दशमी हा नवरात्र उत्सवाचा ऊखेरचा दिवस. हीच विजयादशमी, दसरा.
त्या दिवशी सकाळी, “नवरात्र संपले. दसरा उजाडला. मोरूचा बाप त्याला म्हणाला, मोरू, ऊठ लौकर” या वाक्याने पालक आपल्या झोपलेल्या मुलांना जागे करीत. अभ्यंग स्नान करून, नवे कपडे घालून मुले शाळेत जाण्यासाठी पाटीदप्तर घेऊन निघत. विद्यार्थी आपल्या पाटीवर एकाएकाचे फर्राटेदार सरस्वतीयंत्र रेखाटत. शाळेत पाटीपूजन, सरस्वतीपूजन होई. शिक्षकांना सोने, म्हणजे आपट्याची पाने देऊन,नमस्कार करून, नाचत बागडत घरी येत.
घरोघर पुरणावरणाचा स्वयंपाक केला जात असे. लोकांचे नऊ दिवसांचे उपवास सुटायचे असंत ना. बऱ्याच ठिकाणी दसऱ्याला श्रीखंड करण्याची पद्धत होती. चितळे हे नाव रुळायचे होते. श्रीखंडाचा चक्का गोकुळदासकडून आणीत. चक्क्याचा भाव तीन रूपये शेर होता. सोन्यासाठी पी एन गाडगीळ हे नाव नव्हते. लोक सोन्याच्या खरेदिसाठी कन्हैयालालची पेढी गाठीत. सोने साठ रुपये तोळा भावाने मिळे!
दुपारी मुले शेवंती, झेंडू आणि आंब्याच्या पानांची तोरणे करुन घराच्या दाराखिडक्यांवर लावत. संध्याकाळी पुरुषमंडळी शिलंगणाला घराबाहेर पडत. देव आणि जेष्ठांना सोने देऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन घरी परतत. येताना आठवणीने घरच्या लक्ष्मीसाठी काही खरेदी केली जाई. दारात मालकीण वाट पहात उभी असे. घरधनी येताच त्याला पाटावर बसविले जाई. मग तो आपल्या हातातल्या आपट्याच्या पानांनी समोरच्या पाटावर तांदळापासून बनविलेल्या राक्षचाचे उदर विदारून, त्यात दडविलेले सुवर्णवेढणे बाहेर काढी. पत्नी पतिराजांना औक्षण करी. मग पतिराज कोटाच्या खितातून एक लाल रंगाच्या कागदात गुडाळलेली ओवाळणी व काही आपट्याची पाने ताम्हणात ठेवी. ही असे गृहलक्ष्मीची ओवाळणी, एखादा सोन्यामोत्याचा दागिना किंवा एखाद्या तोळ्याचे पिवळेधमक सुवर्णवेढणे!
त्याकाळी मुलांना दसऱ्याच्या मुहूर्तावर शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश दिला जाई. मी सुद्धा असाच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शाळेत प्रवेश घेतला होता.
तो माझा शाळेचा पहिला दिवस मला स्पष्ट आठवतोय. मोठ्या बहिणीने मला त्या दिवशी स्नान घालते. नवी सदरा-चड्डी नेसवली. केसांना तेल चोपडून, त्यावर निळ्या रंगाची कृष्णछाप जरीची टोपी दडपून, डोळ्यात काजळ फासून मला शाळेत आणून सोडले. हातात काळी कुळकुळीत, कोरी करकरीत दगडी पाटी आणि अंकलिपीचे पुस्तक दिले. वर्गातल्या बाकावर बसून मी बाईंच्या हातात हात देऊन शिक्षणाचा ‘श्री गणेश’ गिरविला. ते साल होतं सन १९५१!
तेव्हापासून आजपर्यंत मी अव्याहतपणे, नित्य नवीन काहीतरी शिकत आलोय, काहीतरी लिहित आलोय! पुढेही हे असेच चालावे ही इच्छा आहे. ईश्वराची इच्छा काय आहे ते त्यालाच ठाऊक!!
वाचकहो, यानिमित्त या शारदीय नवरात्रीच्या व विजयादशमीच्या आपणा सर्वांना अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




खूप छान आठवणींसकट शुभेच्छा फुरसे सर!
बुरसे सर.
ऑटो टायपिंग मधून निराळाच शब्द चालला जातो.