सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – २ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
आज दुसऱ्या भागात : क्रीडा क्षेत्रात चमकणाऱ्या दुर्गा ( काही अपंगत्वावरही मात करून)
१) स्मृती मानधना
सांगलीची शान! स्मिता व श्रीनिवास मानधना यांची मुलगी. जन्म मुंबईत झाला पण दोनच वर्षात ते माधवनगरला आले. तिचा भाऊ क्रिकेट खेळायचा. त्याची 19 वर्षाखालील मुलांमध्ये महाराष्ट्राच्या टीम साठी निवड झाली. त्याचा खेळ बघून स्मृतीला प्रेरणा मिळाली. नऊ वर्षाची असतानाच तिची पंधरा वर्षाखालील महाराष्ट्राच्या टीम मध्ये निवड झाली. अकरा वर्षाची असताना 19 वर्षाखालील टीम मध्ये निवड झाली. 2013 ला गुजरात विरुद्ध खेळताना एक दिवसीय सामन्यात तिने 150 बॉल मध्ये नाबाद 224 धावा केल्या आणि ती एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. आणि इथे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. २०१६ ला सर्वात जास्त धावा करणारी खेळाडू झाली आणि टीमला चॅलेंज ट्रॉफी मिळवून दिली. 2016 ला आयसीसी महिला टीम मध्ये निवड झालेली ती एकमेव भारतीय महिला होती. नंतर दुखापतीमुळे पुढे पाच महिने खेळू शकली नाही पण ती हरली नाही. पुन्हा नव्या दमाने 2017 च्या वर्ल्ड कप साठी सज्ज झाली. 2019 ला सर्वात जलद 24 बॉल मध्ये 50 धावा करणारी पहिली महिला ठरली. 2019 चा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा तिला मान मिळाला. ODI मध्ये सर्वात जास्त म्हणजे 10 शतके करणारी व सर्वात जास्त म्हणजे 4000 धावा काढणारी पहिली महिला खेळाडू ठरली. 2025 ला तिने T20 मध्ये पहिले शतक झळकवले व ती T20, ODI, व टेस्ट या तीनही प्रकारात शतके झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली.
२ )सायना नेहवाल
हरियाणातील हिसार मध्ये राहणारे डॉक्टर हरवीर सिंह व उषा रानी नेहवाल यांची सायना ही मुलगी. ती लहान असतानाच ते हरियाणा मधून हैदराबादला आले. तिची आई, वडील दोघेही हरियाणातील राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू होते. सायना साधारण आठ वर्षाची असतानाच सायनाला तिचे आई-वडील बॅडमिंटन खेळण्यासाठी आपल्याबरोबर घेऊन जात होते. बॅडमिंटनची आवड ही वारसा हक्कानेच मिळालेली होती. 2006 मध्ये प्रतिष्ठित आशियाई उपग्रह बॅडमिंटन टूर्नामेंट जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू बनली. फिलिपिन्स ओपन मधील फोर स्टार स्पर्धा जिंकणारी तसेच ती स्पर्धा जिंकणारी आशियातील सर्वात तरुण खेळाडू असणारी ती पहिली भारतीय महिला. 2008 मध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियन जिंकणारी पहिली भारतीय महिला. ऑलिंपिक गेम्स मध्ये क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला. बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणारी ती पहिली भारतीय बॅडटमिंटनपटू ठरली. सायना नेहवालच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच देशात बॅडमिंटनचे महत्त्व आणि लोकप्रियतेत वाढ झाली. सायनाच्या खात्यात तब्बल २१ आंतरराष्ट्रीय विजेतेपदं जमा आहेत. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद दोनवेळा जिंकणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू आहे.
३ ) ओइनम बेम्बेम देवी
इम्फाळमध्ये जन्मलेल्या, वाढलेल्या बेम्बेम देवी यांनी लहानपणीच त्यांच्या परिसरातील मुलांसोबत फुटबॉल खेळायला सुरुवात केली. स्वतः फुटबॉलचे चाहते असूनही, बेम्बेमचे वडील, ओइनम नागेशोर सिंग, त्यांच्या मुलीला हा खेळ खेळण्यास विरोध करत होते आणि त्यांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.तथापि, बेम्बेमला फुटबॉलची आवड होती. तिचे वडील नसताना घराबाहेर पडायची, तिची किट बॅग उचलायची आणि फुटबॉल मैदानावर धावायची. मैदानावर दुखापती होत,मग वडील रागवायचे. तिने दुखापती लपवण्यासाठी पूर्ण पँट घालण्यास सुरुवात केली.
१९९१ मध्ये, तिला स्थानिक क्लब YAWA ने सामील केले आणि चार वर्षांच्या आत, ती मणिपूर पोलिस फुटबॉल संघाकडून खेळू लागली. तिच्या कुटुंबासाठी किटसारखी मूलभूत वस्तू परवडणे कठीण होते, स्पर्धांसाठीचा प्रवास खर्च तर दूरच होता, आणि दुसऱ्या खेळाडूकडून मिळालेला ट्रॅकसूट बेम्बेमसाठी मौल्यवान वस्तू बनला.
१९९४ पर्यंत, तिच्या उत्कृष्ट कामगिरीने राष्ट्रीय प्रशिक्षकांचे लक्ष वेधले होते. १९९५ मध्ये, वयाच्या १५ व्या वर्षी, बेम्बेम हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारतीय जर्सी घालून मैदानात उतरली. तिथून, तिला मागे वळून पाहावे लागले नाही. स्पर्धेनंतर जेव्हा बेम्बेम मणिपूरला परतली तेव्हा तिला स्थानिक फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक एस. एकेंद्र सिंग यांच्या रूपात एक मार्गदर्शक मिळाला. त्यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली, बेम्बेम एक खेळाडू म्हणून बहरली.
१९९६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बेम्बेनने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच वर्षी, ऑल मणिपूर फुटबॉल असोसिएशन (एएमएफए) ने तिला वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार दिला.१९९८ मध्ये, बेम्बेमला मणिपूर पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून भरती करण्यात आले. या नोकरीतून तिला मिळणारा पगार तिच्या कारकिर्दीला चालना देण्यासाठी खूपच कमी होता, परंतु बेम्बेमने तिच्या आर्थिक अडचणींचा तिच्या खेळावर परिणाम होऊ दिला नाही. राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर बेम्बेमने पहिल्यांदाच राष्ट्रीय महिला अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला तेव्हा मणिपूर संघाने ही स्पर्धा जिंकली. बेम्बेमने ज्या १९ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भाग घेतला त्यापैकी तिने १६ विजेतेपदे जिंकली, ज्यात तिच्या राज्य संघाची कर्णधार म्हणून ९ विजेतेपदे आहेत. तिने भारतीय पुरुष संघापेक्षा महिला संघाला उच्च जागतिक क्रमवारीत नेले.
४ ) शीतल देवी
तिला जन्मत:च दोन्ही हात नाहीत. फोकोमेलिया या दुर्मीळ आजारानं तिला ग्रासलं होतं. या आजारात अवयवांची एकतर वाढच होत नाही किंवा ते अर्धवटच राहतात. तिच्या बाबतीतही तेच झालं. निसर्गाचा हा ‘न्याय’ हसतमुखानं तिनं स्वीकारला. दोन्ही हात नसले तरी आजही सर्व गोष्टी ती स्वत:च करते.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात १० जानेवारी २००७ रोजी तिचा जन्म झाला. २०१९ मध्ये किश्तवार येथे झालेल्या एका युवा कार्यक्रमात तिनं सहभाग घेतला होता. लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी तिला तिथे पाहिलं. प्रशिक्षक अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वाधवान यांनी तिचा आत्मविश्वास पाहून तिला तिरंदाजीचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं.
तिला काही कृत्रिम अवयव देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण, तपासणी केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, कोणत्याही कृत्रिम अवयवांचा तिला काहीही उपयोग होणार नाही. त्यावेळी तिनं प्रशिक्षकांना सांगितलं, माझे पायच माझे हात आहेत. पायांनी मी अनेक गोष्टी करू शकते. एवढंच काय, मी झाडावरही चढू शकते! शीतलनं हे सांगितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. दोन्ही हात नसतानाही कोणी झाडावर कसं चढू शकतं? शीतलची जिद्द आणि आत्मविश्वास पाहून प्रशिक्षकांचाच हुरूप वाढला. पण, याआधी दोन्ही हात नसलेल्या कोणत्याच विद्यार्थ्याला त्यांनी प्रशिक्षण दिलेलं नव्हतं. त्यांनाही खूप अडचण येत होती.
२०२२ मध्ये चीनमध्ये झालेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत तिरंदाजीत वैयक्तिक प्रकारात तिनं तब्बल दोन सुवर्णपदकं जिंकून पदकांची लयलूट केली.
पॅरिसमध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत राकेशकुमारच्या साथीनं तिनं कांस्यपदकही पटकावलं. एकलव्याला तर फक्त उजव्या हाताचा अंगठाच नव्हता, पण या तरुणीला दोन्ही हात नसतानाही धनुर्विद्येत कोणालाही लाजवेल असं कौशल्य तिनं प्राप्त केलं. अतिशय उत्कंठावर्धक स्पर्धेत इटलीवर मात करून भारतानं कांस्यपदक जिंकलं! दोन्ही हात नसतानाही तिरंदाजी करणारी, अंतरराष्ट्रीय आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पदकं पटकावणारी ती भारताचीच नव्हे, तर जगातली पहिली महिला आहे!
प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शीतलला त्यांच्या कंपनीच्या कोणत्याही श्रेणीची कोणतीही कार निवडण्यास सांगितलं होतं. हवे ते बदल करून ही कस्टमाइज कार ते तिला भेट देणार होते. पण, स्वाभिमानी शीतल म्हणाली होती, १८ वर्षांची झाल्यावर मी तुमची ही भेट स्वीकारेन! ते म्हणाले, शीतल, माझं आश्वासन पूर्ण करण्याची वाट मी पाहतो आहे!
– भाग २/१.
☆
संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



