सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
आज दुसऱ्या भागात : क्रीडा क्षेत्रात चमकणाऱ्या दुर्गा ( काही अपंगत्वावरही मात करून)
५) दिव्या देशमुख
2005 ला नागपूरमध्ये जितेंद्र व नम्रता देशमुख या डॉक्टर दांपत्याच्या पोटी दिव्याचा जन्म झाला. ऑनलाईन बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या 2020 च्या संघाची ती भाग होती.2021 मध्ये भारताची महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाली. 2022 ला बुद्धिबळ ओलंपियाड मध्येही कांस्यपदक जिंकले. 2023 मध्ये आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्य पद जिंकले. टाटा स्टील इंडियन बुद्धिबळ स्पर्धेत महिलांच्या रॅपिड विभागात प्रथम स्थान पटकावले. 2024 च्या शारजा चॅलेंजर्स स्पर्धेची विजेती ठरली. तेव्हाच FIDE वर्ल्डकप ची वीस वर्षाखालील मुलींची विजेती ठरली.45 व्या बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये सांघिक तसेच वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली. 2025 चा महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.आता तिला candidates स्पर्धेसाठी तिकीट मिळाले. त्यात जर ती जिंकली तर वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी पात्र ठरू शकेल.
दिव्याची आक्रमक स्टाईल व फोकस्ड असणं हे तिच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. तिची ओपनिंग ची तयारी खूप चांगली आहे. तिला आपल्याकडून वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया.
६) दीपा कर्माकर
हिचा जन्म 9 ऑगस्ट 1993 रोजी आगरतळा, त्रिपुरामध्ये झाला. तिने वयाच्या 6 व्या वर्षी जिम्नॅस्टिक्सला सुरुवात केली. तिचे प्रशिक्षक होते विश्वेश्वर नंदी. तिची पाऊले सपाट असल्याने ती जिम्नॅस्टिक्स करू शकणार नाही असे तिला सांगितले होते.पायांचे हे आव्हान पेलत असताना तिने जिम्नॅस्टिकसाठीही अत्यंत कठीण प्रकार निवडला होता तो म्हणजे ‘प्रोदुनोव्हा व्हॉल्ट’. समोरच्या बाजूने उडी मारून दोन वेळा हवेत कोलांटी उडी घेऊन जमिनीवर परतताना दोन्ही गुडघे छातीजवळ घेऊन उतरायचे असा हा अवघड प्रकार होता.
2014 मध्ये तिने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. असे करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्याच वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत ती चौथ्या स्थानावर राहिली. त्यानंतर आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. या विजयानंतर, 2016 मधील रिओ ऑलिंपिकमध्ये महिलांच्या व्हॉल्टिंगच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली. 2018 मध्ये तुर्कीतील मेर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये व्हॉल्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होती.
७) साईखोम मीराबाई चानू
हिचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी नॉन्गपोक काकचिंग या मणिपूरच्या इम्फाळ शहरापासून सुमारे ३० किमी अंतरावर मेईतेई कुटुंबात झाला. ती फक्त १२ वर्षांची असताना तिच्या कुटुंबाने तिची ताकद ओळखली. ती लाकडाच्या मोठमोठ्या मोळ्या सहज उचलायची. चानूने मणिपूर येथील स्पोर्ट्स अकादमीमध्ये वेटलिफ्टींगचे प्रशिक्षण घेतले.
चानूने २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ग्लासगो येथे महिलांच्या ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले; गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेच्या २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक जिंकून 2017 ची पुनरावृत्ती केली. २०१७ मध्ये तिने अनाहिम, कॅलिफोर्निया येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.२०२० च्या तोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ४९ किलो गटात रौप्य पदक जिंकले.
अकादमी मध्ये प्रशिक्षण घेताना रोजचा घरापासूनचा प्रवास परवडत नव्हता. म्हणून वाळूच्या ट्रक मधून प्रवास करायची. तिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर कृतज्ञता म्हणून सर्व ट्रक चालकांना बोलावून, त्यांचा सन्मान करून, चरणस्पर्श केला. इतके यश मिळाले तरी तिचे पाय जमिनीवर होते, हे जाणवते.
८) पारूल चौधरी
एप्रिल १९९५ मध्ये उत्तर प्रदेशातील मेरठजवळील जैनपूर गावात जन्मलेली पारुल ही कृष्णपाल चौधरी आणि राजेश देवी यांची मुलगी. १६ वर्षांची असताना तिच्या शाळेत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने भाग घेतला. आणि तिची गती पाहून तिला प्रोत्साहन दिले गेले.
पारुलची पहिली मोठी कामगिरी म्हणजे २०१९ च्या काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकणे.त्यानंतर तिने त्या वर्षी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. 2023 ला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पारुलने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण आणि ५००० मीटर स्प्रिंटमध्ये रौप्य पदक जिंकले. तिने ३००० मीटरच्या शर्यतीत ९ मिनिटांपेक्षा कमी वेळ नोंदवणारी पहिली भारतीय महिला धावपटू म्हणून इतिहास रचला आहे.इतर अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली आहे. तिच्या अतुलनीय यशाचा सन्मान म्हणून 2024 मध्ये तिची उत्तर प्रदेश पोलिस मध्ये DSP म्हणून नेमणूक झाली.
९) वृंदा राठी
ही मुंबईची, जन्म १४ फेब्रुवारी १९८९चा. लहानपणापासून क्रिकेटची आवड होती.मुंबई विद्यापीठाकडून ती क्रिकेट खेळायची. २०१३ च्या Women’s World Cup च्या वेळी तिला स्कोअरर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.त्यावेळी न्यूझीलंडचे अंपायर कॅथी क्राॅस यांच्यामुळे ती प्रभावित झाली व आपणही अंपायर होण्याचे मनाने ठरवून टाकले.२०१४ ला राठीने मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित अंपायर्सची परीक्षा दिली. त्यानंतर चार वर्षांनी बीसीसीआयकडून आयोजित केली जाणारी अंपायरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाली. आणि मुंबईत झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत या महिलांच्या टेस्ट मॅच चे अंपायरिंग करून कसोटी सामन्यातील पहिली भारतीय महिला अंपायर होण्याचा मान पटकावला.
दक्षिण आफ्रिका येथे 2023 मध्ये झालेल्या महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये वृंदा राठीने अंपायरिंग केलं. ती प्रीमियर लीगची फायनल आणि एशियन्स गेममध्ये देखील अंपायरिंग करणारी भारताची पहिली महिला अंपायर ठरली.
तेव्हापासून 34 वर्षाच्या वृंदाने 13 वनडे आणि 43 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग केली आहे. 2020 मध्ये आयसीसी डेव्हलपमेंट पॅनल ऑफ अंपायर्समध्ये तिला बढती मिळाली. वृंदा राठीने 2022 च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये,23 च्या बांगलादेश वूमन्स आशिया कप गेम्समध्ये, 24 च्या श्रीलंकेतील गेम्समध्ये,25 साली नवी मुंबई च्या गेम्समध्ये अंपायरिंग करून तिने जागतिक विक्रम नोंदविला आहे.
अंपायर होण्यासाठी लागणारी चिकाटी, चपळता, एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष्य केंद्रित करण्याची क्षमता, संयम,कोणत्याही हवामानात तासन् तास उभे राहण्याची तयारी असेल तर स्त्रियांना खुणावणारे हे नवे क्षेत्र पादाक्रांत करा.
– भाग २/२.
☆
संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



