सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
आजच्या तिसऱ्या भागात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाची आहुती देणाऱ्या दुर्गा ज्यांना इतिहासाने महत्वाचे स्थान दिले नाही.त्यांनी बलिदानाने मिळवलेले स्वातंत्र्य ‘यावश्र्चंद्र दिवाकरौ’ अबाधित ठेवण्याची जबाबदारी आता पुढच्या पिढ्यांनी घेणे हीच त्यांना श्रद्धांजली!!
१) झलकारी बाई
यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला. लहान असतानाच आई वारली. झलकारी बाई मुळातच धाडसी शूर होती. तिने कुऱ्हाडीने कसे वाघाला मारले, काठीने कसे चित्त्याला मारले, अशा तिच्या कथा फार प्रसिद्ध होत्या. तिने मग युद्ध कलेचे शिक्षण घेतले. तिचा विवाह राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यातील सेनापती पुरण कोरी यांच्याशी झाला. तिच्या शूर पणाच्या कथा ऐकून राणी लक्ष्मीबाई यांनी तिला ‘दुर्गा’ या महिला तुकडीच्या विभागाचे प्रमुख केले. हळूहळू ती राणीची विश्वासू सल्लागार झाली. तिचा चेहरा मोहरा, शरीराची ठेवण ही राणी लक्ष्मीबाईंसारखी होती. १८५७ च्या युद्धात तिचे पती किल्ल्याचे रक्षण करताना हुतात्मा झाले.आता शत्रू आत शिरणार हे लक्षात येताच झलकारीने राणीचा पोशाख घातला व युद्धाला सज्ज झाली. राणी लक्ष्मीबाईंना तिचा पोशाख दिला व मुलाला घेऊन पळून जाण्याचे सुचवले. शत्रूला व त्यांच्या सैन्यालाही राणी लक्ष्मीबाईच आहेत असे वाटल्याने कांही गोंधळ न होता घनघोर युद्ध झाले. त्यात झलकारी हुतात्मा झाली. पण राणी पळून जाण्यात यशस्वी झाली. केवढा हा त्याग,आपल्या राणी प्रती असणारी निष्ठा!!
झलकारीने युद्धात मोठी मदत केली असली तरी इतिहासाने तिला कुठेही स्थान दिले नाही. त्यामुळे तिच्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांच्या समाजाच्या कथातून, गीतातून ती अजून त्यांच्या हृदयात शूर झलकारी स्थान निर्माण करुन आहे. झलकारीच्या स्मरणार्थ सरकारने तिचा फोटो असलेले पोस्टाचे तिकीट काढले आहे.
२) दुर्गा भाभी
यांचा जन्म अलाहाबाद येथे गुजराथी कुटुंबात झाला. अकराव्या वर्षी त्यांचा विवाह, भगवती चरण वोहरा, या सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन च्या सदस्याशी झाला. त्यांची दुर्गा ही पत्नी, म्हणून त्या सर्वांच्या दुर्गाभाभी झाल्या. त्या असोसिएशन बरोबरच त्या नौजवान भारत सभेच्या पण सक्रिय कार्यकर्त्या होत्या.त्या सभेचे प्रमुख, लाला लजपत राय, यांच्यावर लाठीचार्ज झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर जतिनदास यांनी लाठीचार्ज विरोधात उपोषण सुरू केले. 63 दिवसांच्या उपोषणानंतर तेही मृत्यूमुखी पडले. त्यांच्या लाहोर ते कलकत्ता अंत्ययात्रेचे नेतृत्व दुर्गा भाभींनी केले. प्रचंड जनसमुदाय सामील झाला होता.
विधानसभेच्या घटनेनंतर त्यांनी लॉर्ड हेलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या पकडल्या गेल्या व तीन वर्षे तुरुंगवास भोगावे लागला. आणि त्या खटल्यात आपल्या साथीदारांना सोडविण्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने विकले. पतीसोबत दिल्लीतील ‘हिमालयीन टॉयलेट्स’ नावाचा बॉम्ब तयार करण्याचा कारखाना चालविण्यास मदत केली. सॅंडर्सला मारल्यानंतर सुखदेव, राजगुरू यांना पळून जाण्यास मदत करण्यासाठी त्या भगतसिंग ची पत्नी बनल्या व आपल्या तान्ह्या मुलालाही बरोबर घेतले, कुटुंब खरे वाटावे म्हणून! राजगुरू हा नोकर म्हणून बरोबर घेतला. असे नावे बदलून, वेष बदलून ट्रेन मधून ते पळून गेले. व दुर्गा भाभी नंतर बाळासह परत आल्या. नंतर भगतसिंग पकडले गेले. त्यांना सोडविण्यासाठी बॉम्ब चा वापर करताना दुर्गा भाभींच्या पतीच्या हातातच बॉम्ब फुटला व त्यातच ते मृत्युमुखी पडले. पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या गव्हर्नर वर गोळ्या झाडण्यासाठी गेल्या, पण ते सापडले नाहीत. पण सार्जंट टेलर व त्याच्या पत्नीवर गोळ्या झाडून त्यांनी आपल्या पतीला श्रद्धांजली वाहिली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी मुलांसाठी शाळा काढली व त्यातच त्या रमल्या. 92 वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. अशा धाडसी, शूर दुर्गाभाभींना मानाचा मुजरा!!
३) राणी अवंतीबाई
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात मोहिनीचा जन्म झाला.लहानपणापासून तिरंदाजी, अश्वसंचलन याची तिला आवड होती. 17 व्या वर्षी तिचा विवाह रायगडचे महाराजा लक्ष्मणसिंह यांचे पुत्र विक्रमादित्य यांच्याशी झाला.व मोहिनी ची अवंती झाली. तिला दोन मुलगे झाले. लक्ष्मणसिंहांच्या मृत्यू नंतर विक्रमादित्य राजा म्हणून राज्यकारभार पाहू लागले. पण त्यांचे काही वर्षातच मानसिक संतुलन बिघडत गेले. ईस्ट इंडिया कंपनीने राजाला वेडा घोषित करून राज्य बळकवण्याचा प्रयत्न केला. पण अवंतीने प्रसंगावधान राखून पतीला व पुत्राला हाताशी धरून शासनाची धुरा सांभाळली. नंतर राजाच्या मृत्यूनंतरही तिने धैर्य व चातुर्याने राज्य सांभाळले. तेवढेच नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीचे मनसुबे पूर्ण होऊ नयेत म्हणून आसपासच्या राजांना पत्र पाठवून, काहींना बांगड्या पाठवून सजग राहण्याचा संदेश दिला. इंग्रज सेना व क्रांतिकारी यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. त्यात अवंतीबाईंची सेना वरचढ ठरली. त्यामुळे वाडिंग्टन रणक्षेत्र सोडून पळून गेला. पण त्याला काही फितुरांची मदत मिळाली. ती घेऊन तो पुन्हा चालून आला. अवंतीबाई इंग्रज सैन्यावर तुटून पडल्या. पण तेवढ्यात त्यांच्याच सैन्यातील फितूराने पाठीमागून तलवारीचा घाव घातला व राणी धारातीर्थी पडली.
देशाचे स्वातंत्र्य अशा फितुरांनीच घालवले हा इतिहास आहे. त्यावरून पुढील पिढीने सजग राहून ‘यावश्र्चंद्र दिवाकरौ’ स्वातंत्र्य सूर्य तळपत ठेवला पाहिजे. ही राणी अवंतीबाईंना योग्य श्रद्धांजली ठरेल.
४) राणी गाइदिनल्यू
यांचा जन्म 26 जानेवारी 1915 ला मणिपूर येथील गावात झाला. त्यावेळी मणिपूर हे ब्रिटिश राजवटीखाली होते. त्या तेरा वर्षाच्या असताना त्यांची भेट जदोनांग यांच्याशी झाली. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या क्रांतिकारी आंदोलनात सहभागी झाल्या. नंतर ते आंदोलन मणिपूर व नागा गावांमध्ये पसरले. या आंदोलनात क्रुर ब्रिटिश नीती विरोधात शस्त्रांचा वापर केला गेला. 1931ला जदोनांग यांना अटक झाली व फाशी देण्यात आली.नंतर राणी गाइदिनल्यू नेता बनल्या. अवघी १६ वर्षांची मुलीने अवघे चार हजार सशस्त्र नागा सैन्य घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात विद्रोह केला. लोकांना कर न भरण्याची विनंती केली. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस ठेवले होते. पण त्या सापडल्या नाहीत.एकदा अचानक नागा सैन्याने आसाम रायफल्स वर हल्ला केला.इंग्रजांनी चिडून नागांची गावेच्या गावे बेचिराख केली. एकदा अचानक इंग्रजांनी प्रति हल्ला करुन राणीला अटक केली व जन्मठेपेची शिक्षा दिली.
भारतीय स्वातंत्र्यानंतर राणीची सुटका झाली.१९९३ला त्यांचा मृत्यू झाला.त्यांना अनेक पुरस्कार दिले, त्यांच्या नावे पोस्टाचे तिकीट व एक नाणेही काढले.जवाहरलाल नेहरू त्यांना ‘पहाडाची कन्या’ म्हणत. तिच्या धाडसाला त्रिवार वंदन!!
५) मातंगिनी हाजरा
यांचा जन्म १९ ऑक्टोबर १८६९ मध्ये बंगालमधील होलगा गावी झाला. बारा वर्षाची असताना त्रिलोचन हाजरा यांच्याशी विवाह झाला. सहाच वर्षात त्या विधवा झाल्या. मजुरी करून उदरनिर्वाह करू लागल्या. गावाच्या सुखदुःखात सहभागी झाल्यामुळे लोक त्यांना ‘माॅं’ म्हणत.
स्वतंत्रता आंदोलनाच्या मोर्चाच्या वेळी शंख ध्वनी करून त्यांनी मोर्चाचे स्वागत केले व सभेमध्ये तन- मन-धनाने संघर्ष करण्याची शपथ घेतली. मिठाचा सत्याग्रह, कर बंदी आंदोलन यात त्या सहभागी झाल्या. आंदोलन दाबून टाकण्यासाठी गव्हर्नर अँडरसन आले. त्यांच्या विरोधात मोर्चा काढला. त्यावेळी या सर्वात पुढे होत्या. पोलिसांनी त्यांना पकडले व सहा महिन्यांचा सश्रम कारावास झाला. भारत छोडो आंदोलनात रॅलीसाठी पाच हजार लोकांना त्यांनी गोळा केले. सरकारी डाक बंगल्यावर रॅली नेली. पोलिसांनी बंदूक रोखल्या. मातंगिनी एका कठड्यावर उभी, हातात झेंडा घेऊन घोषणा देत होती. गोळ्या सुटत होत्या मातंगिनी जखमी होत होती. पण तिने शेवटपर्यंत झेंडा पडू दिला नाही. वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणा देणे बंद केले नाही. तिथेच ती शहीद झाली. अशा या शहीद क्रांतिकारक महिलेस आमचा सलाम!!
– क्रमशः भाग ३/१
☆
संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



