डॉ. धनंजय देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ किसी राह में… किसी मोड पर… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
हल्ली “रियुनियन” हा प्रकार (म्हणजे कार्यक्रम) होतात न – लहानपणीचे मित्र नंतर मोठे झाल्यावर एकमेकांचे पत्ते शोधून व्हाट्स ग्रुप करतात आणि नंतर कधीतरी ठरवून एक दिवस पिकनिकला जातात.
…. तर असाच एक ग्रुप पिकनिकवर येतो. मात्र यात एक थोडा बदल केलेला असतो की, प्रत्येकाने आपल्या जीवन साथीदाराला सोबत आणायचे.
सुरुवातीला याला काहीजण विरोध करतात. पण शेवटी हो ना हो ना करत करत सगळे तयार होतात आणि पिकनिक निघते.
शाळेतल्या त्यावेळच्या सर्वांच्या लाडक्या हेडमास्तर गुरुजींना चीफ गेस्ट म्हणून सोबत घेतलं जात.
*
वाटेत गप्पा गाणी जोक्स सुरु असतात. विशेषतः नवरा बायकोवरच्या जोक्सची संख्या जास्त असते. त्यातही खासकरून “बायका” विषयावर जास्त.
आणि शेवटी सगळेजण छान मूडमध्ये बुक केलेल्या रिजॉर्टवर पोचतात. बँगा वगैरे ठेवून झाल्यावर थोडं फ्रेश होऊन सगळेजण रिजॉर्टच्या त्या हॉलमध्ये जमतात. त्यावेळी हेडमास्तरांना भाषण करण्याची विनंती केली जाते.
ते म्हणतात, “आज मी भाषण करणार नाही पण तुमचा आग्रहच आहे तर इथे भिंतीवर एक बोर्ड आहे ते लक्षात आल्यावर वाटलं की एक गेम खेळूया”
सगळेजण एकदम खुश. “कसला गेम गुरुजी? ” विचारतात
“थांबा न एक मिनिट” असं म्हणून गुरुजी तिथल्या एका महिलेला उठवून समोर बोलावतात. आणि सांगतात की
“इथे बोर्डवर अशा तीस लोकांची नावे लिही, जे तुला आवडतात. ”
ती मग नावे लिहिते. त्यात सुरुवातीला आई वडील पती मुलं, इतर नातेवाईक मग शेजारी, ऑफिसातले सहकर्मचारी अशी यादी लिहिते.
गुरुजी तिला म्हणतात, “आता यातली अशी दहा नावे पुसून टाक जी फारशी आवडत नाहीत किंवा नसली तरी चालतील अशी”
ती मग ऑफिसातल्या दहा जणांची नावे पुसते.
गुरुजी आता सांगतात, “अजून दहा नावे पुसून टाक”
ती मग शेजारी लोकांची दहा लोकांची नावे पुसते.
गुरुजी : “आता शिल्लक दहा मधून अजून पाच पूस”
ती मग नातेवाईकाची पाच नावे पुसते.
आता शिल्लक राहतात तिचे आई, वडील, पती, आणि दोन मुले
गुरुजी : आता यातली २ नावे पूस
ती गोंधळते पण धीर करून स्वतःच्या आई वडिलांचे नाव पुसते
(आता हॉल मध्ये बसलेले सगळेच हळूहळू गंभीर होत जातात. कारण आता हा गेम राहिला नसून ती महिला जणू स्वतःचे मन समोर मांडत आहे असं लक्षात येत.)
गुरुजी : आता तीन नाव राहिली त्यातली दोन पुसुन टाक
ती थोड्या उदास मनाने दोन्ही मुलाची नावे पुसते.
**
शेवटी फक्त पतीचे नाव शिल्लक राहते. गुरुजी तिला हलकेच थोपटून शांत करतात.
हॉलमध्ये सन्नाटा.
शेवटी गुरुजी तिला विचारतात.
“आता सुरुवातीपासून तू जसे जसे नावे पुसत गेलीस त्यामागचा तुझा विचार सांग”
ती सांगू लागते, “सुरुवातीला मी ऑफिसातली नावे पुसली. कारण ते तर सतत बदलत असतात. नंतर मी शेजाऱ्याची नावे पुसली. कारण शेजारी सुद्धा आयुष्यभर तेच असतील असे नाही. तेही बदलत असतात किंवा आपण तरी घर बदलून दुसरीकडे जाऊ शकतो म्हणून ती पुसली.
नंतर नातेवाईकाची पुसली. कारण नात्याची असली तरी शेवटी ती लांबच असतात. कठीण प्रसंगी ते येतीलच असं नाही.
नंतर खूप धीर एकवटून आई वडिलांची नावे पुसली. कारण त्यांनी अतिशय छानपणे मला वाढवून कर्तव्य पार पाडलं आहे. समाधानी आहेत ते आणि कसलीच अपॆक्षा माझ्याकडून त्यांना नाही. सध्या दोघेही ऐशीच्या घरात आहेत. आज न उद्या त्यांची साथ सुटणार आहेच. म्हणून पुसली.
शेवटी मुलांची नावे मात्र काळजावर दगड ठेवून पुसली. कारण मुलं मोठी झाल्यावर त्यांना माझी गरज असेलच असे नाही किंवा कदाचित भविष्यात ते परदेशी सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे ती पुसली.
मात्र माझा पती शेवट्पर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहणार आहे. याची मला खात्री आहे. कारण तसे आमचे एकमेकांचे सहजीवन आहे. आणि विशेष म्हणजे या तुमच्या शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत. मी नाहीय. पण तुम्ही सर्वानी आम्हालाही सामावून घेतले. त्याचाच आनंद जास्त आहे. ”
असं म्हणून ती थांबली. पूर्ण हॉल मध्ये एकदम शांतता पसरली. आणि अचानक गुरुजींच्या टाळ्यांचा आवाज झाला. त्यात इतरांनीही त्याच्या टाळ्यांचा कडकडाट मिसळला.
*
गुरुजीं म्हणाले, “जी बाब हिने सांगितली ती खरीच आहे. त्याचप्रमाणे ते सर्व इथल्या पुरुषांनाही लागू असणार. त्याच्याही लिस्टमध्ये शेवटचं नाव पत्नीचेच असणार, याची मला खात्री आहे”
असं म्हणून गुरुजींनी खिशातून मोबाईल काढून त्यातून एक गाणं निवडून क्लिक केलं….
*
किसी राह में, किसी मोड़ पर
कहीं चल न देना तू छोड़ कर
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
किसी हाल में, किसी बात पर
कहीं चल न देना तू छोड़ कर
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
*
डॉ. डीडी क्लास : मात्र आयुष्याच्या प्रवासात काही कारणाने या “हमसफर”चा हात सुटला, मार्ग वेगळे झाले तरी आजवर एकत्र असताना छान जगलेले काही क्षण आठवून पुढे जात राहावे, ना की कटू आठवणी सतत सोबत ठेवत स्वतःला त्रास करून घ्यावा. कारण न जाणो पुढच्या एखाद्या वळणावर वेगळ्या भूमिकेतून ती हमसफर व्यक्ती समोर आली तर छानसे हसून दोन शब्द बोलता आले तरी पुरे….. त्यावेळी “कसा आहेस ” किंवा “कशी आहेस” इतकं म्हणत एखादी मस्त कॉफी घ्यावी अन “मिलते है ब्रेक के बाद” म्हणावं!
© डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





