सौ.अस्मिता इनामदार
इंद्रधनुष्य
☆ सर्पमित्र – ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆
साप म्हंटलं की आपण खूप घाबरून जातो. बऱ्याचवेळा आपल्या अंगणात, घरात आलेल्या सापाला आपण मारून टाकतो. खरं तर त्यातले ९० % साप हे बिनविषारी असतात. पण माणूस हा विचार करतच नाही. तसेही ते आपणहून कधीच आपल्याला दंश करत नाहीत. त्यालाही स्वत:च्या जिवाची भिती असते. आपण त्याला डिवचतो मग रागाने तो आपल्याला चावतो.
खरे तर साप हा आपला मित्रच आहे. पूर्वी साप हे जंगलात, रानात, शेतात राहणारे जीव आहेत. आपणच आता त्यांच्या अधिवासावर आक्रमणाचा अन्याय केला आहे. सृष्टीतला प्रत्येक जीव हा एकमेकांसाठी पूरक व उपयोगी आहे. साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. शेतातल्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या उंदरांचा तो फडशा पाडतो. उंदीर, बेडूक, अन्य कीटक हे त्याचे अन्न आहे. म्हणूनच त्यांची वस्ती शेतातल्या बिळात असते. पण चुकून आपला पाय त्यांच्यावर पडतो व स्वसंरक्षणासाठी तो आपल्याला चावतो. यामुळेच आपण साप दिसला रे दिसला की त्याच्या जिवावर उठतो. पण त्याच्यामुळेच शेतातले पर्यावरण अबाधित असते.
याशिवाय या सर्पराजांबद्दल इतर गोष्टीही आपल्याला माहीत आहे का? सर्प आपल्याला पुष्कळ गोष्टीत मदत करतात. तुम्हाला माहीतच असेल की समुद्रमंथनात वासुकीचाच उपयोग केला. त्यातून निघालेले हलाहल शंकराने प्राशन केल्यावर घशाला होणारा दाह शमवायला त्याच्या गळ्याभोवती सर्पकंठीच उपयोगाला आली. गणपतीबाप्पाच्या कंबरेला सर्पाचीच मेखला असते. नागपंचमीचा सण तर आपल्या हिंदूच्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो. सणांचा महिना श्रावण तर याच्याच सुरुवातीने होतो. नदीकाठी असलेल्या वारुळातल्या या रहिवाशाला पुजायला माहेरवाशिणी, मुली, बायका मोठ्या आनंदात जातात. त्या मोकळ्या हवेत आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात. हवेतला प्राणवायु आपल्या पर्यावरणाची गरज आहे. श्रावणात वाचल्या जाणाऱ्या कथेतसुध्दा नागपंचमीची कहाणी असते. ही सगळी उदाहरणे नुसती पोपटपंची नाहीय तर त्यातूनही पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे.
सध्या बऱ्याच प्रमाणात सर्पांबद्दल जनजागृती झालेली दिसून येते. सापांना मारण्यापेक्षा साप पकडणाऱ्याना बोलावून त्यांना जिवंत पकडून रानावनात सोडून दिले जाते. सांगली जिल्ह्यातल्या बत्तीसशिराळा या गावात नागपंचमीला बरेच नाग-साप पकडले जात होते. त्यावर सध्या बंदी घातलेली आहे. जैन धर्मात तर कुठलीही प्राणीहत्या मान्यच नाही. त्यांच्याकडे जर असे साप वगैरे निघाले तर ते मारत नाहीत.
परदेशात सापांच्या कातडीपासून पर्सेस, कोट वगैरे बनवलेल्या वस्तूंना खूप मागणी आहे, त्यासाठीही सापांची तस्करी केली जाते. पण हे सर्व करत असताना आपण आपलेच नुकसान करत आहोत हे माणसाच्या लक्षातच येत नाही. सध्या बऱ्याच ठिकाणी प्राणीमित्रांच्या संस्था निघाल्या आहेत. अशा संस्थेत इतर प्राण्यांबरोबर सापांनाही उपचार केले जातात.
एकूण साप हा आपल्याला उपयोगी प्राणी आहे. पर्यावरणाला मदत करणारा एक महत्वाचा घटक आहे हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
© सौ. अस्मिता इनामदार
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




