श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “दुसरा चंद्रही आभाळी धाडणारी आई!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
आभाळातला चंद्र सूर्यानं त्याच्या पोतडीत लपवून ठेवला की अमावस्या नावाचा अंधार दाटून येतो. वाटतं… आता जगाला उजेड नावाच्या अमृताचं दर्शन या जन्मी काही घडणार नाही. मग प्रतिपदेची प्रतीक्षा अपरिहार्य होऊन जाते… पण तोवर आभाळाचा जीव खालीवर होत राहतो. देश नावाच्या आभाळाला असं चंद्राशिवाय फार क्षण राहता येत नाही. हे आभाळ मग पृथ्वीकडे आशेने पाहतं… आणि किमान आपली मराठी माती तरी त्याला विन्मुख पाठवीत नाही.. अन्यथा या देशाच्या ललाटी आणखी एक कायमचा अंधार लिहिला गेला असता!
… तिचं नाव तारा…. ताराबाई…. मराठ्यांच्या इतिहासात अमर झालेल्या राणीसाहेबांचे नाव. तिच्या पदरात दैवाने एक नव्हे दोन नव्हे… तीन चंद्र घातले. रवी, राम आणि सुभाष. या मुलांच्या नावांपुढे तिने मोठ्या हौसेने चंद्र रेखून घेतला.
… अयोध्येच्या दशरथ राजेसाहेबांच्या राणीसाहेब कौसल्या यांचे सुपुत्र श्री राम यांनी चंद्र खेळायला पाहिजे.. असा हट्ट धरला होता. हिच्या रामाच्या नावातच चंद्र होता. या रामचंद्राने असुरांच्या विनाशासाठी शस्त्र हाती धरले आणि तो वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे २५ जानेवारी २००२ रोजी फौजेत भरती झाला. जन्मापासून म्हणजे २८ जून, १९८१ पासून गोव्याच्या सुंदर भूमीत बालपण, आणि तारुण्यातील आरंभीची वर्षे व्यतीत केलेला रामचंद्र. कुठे सुंदर गोव्याची भूमी आणि कुठे डोंगर, पहाडांनी वेढलेल्या सीमा. राजस्थानचे वाळवंट त्याला नारळ पोफळीच्या बागांची याद करून द्यायच्या. पाण्याचा समुद्र आणि सियाचीन मधला बर्फाचा समुद्र… बरोबरी कशी होणार?
त्याचं खरं काम नव्हतं शस्त्र चालवण्याचं. सेनेला अभियांत्रिकी साहाय्य करण्यासाठी त्याची नेमणूक होती…. कोअर ऑफ इंजिनियर्स मध्ये तो सॅपर बनला! आपल्या सैन्यासाठी पूल, इमारत उभारून देणे, शत्रूसाठी भूसुरुंग पेरून ठेवणं, वेळप्रसंगी ते शोधून निकामी करणे, युद्धात शत्रूचे पूल, इमारती उध्वस्त करणं या कामांत रामचंद्र निपुण झाले. पण प्रत्येक सैनिकाला शत्रूवर थेट चालून जात त्याच्याशी दोन हात करायला आवडत असतं… किंबहुना सैन्यात असणं म्हणजे युद्ध… आणि रामचंद्र यांना ही संधी चालून आली.
काम कोणतंही असो, सेनेत प्रत्येकाला शस्त्रास्त्रे चालवायला शिकवलं जातं. योगायोगाने सॅपर रामचंद्र शिवाजीराव शिंदे यांना ४४, राष्ट्रीय रायफल्स मध्ये Deputation वर काश्मीरमध्ये बोलावून घेण्यात आले. आता रामचंद्र यांची भूमिका बदलली होती. नव्या तुकडीत नवे वातावरण आणि प्रचंड ताणतणाव याला हा तरणाबांड गडी सरावला.
बारा ऑक्टोबर दोन हजार सहा… दुपारचा एक वाजलेला आहे… मोठी खबर मिळाली होती. शोपियां मध्ये बगेंदर मोहल्ला नावाच्या गावात काही अतिरेकी एका छोट्या घरात डेरा टाकून बसल्याचे समजले… Quick Reaction Team त्वरीत सज्ज ठेवण्याचे आदेश दिले गेले….. या मोहिमेवर तसे सर्वच जायला उत्सुक असतात.. स्वयंस्फूर्तीने रामचंद्र यांनी त्वरित जणू धनुष्यबाण हाती घेतले… छोट्या का असेना.. रावणाशी युद्ध करण्याची संधी आयती चालून आली होती.. पूर्ण तयारीनिशी भारतीय सेना ठरलेल्या लक्ष्यावर चालून गेली. डोंगर, झाडी, दऱ्या आणि स्थानिकांचा अतिरेक्यांना पाठिंबा इत्यादी अडथळे पार करीत आपल्या सेनेने अतिरेक्यांच्या आश्रयस्थानास वेढा घातला! काश्मिरातील युद्ध वेगळं आहे. अनुभवातून शिकत शिकत आपण एक तंत्रशुद्ध पद्धती अंमलात आणलेली आहे. अतिरेकी लपलेल्या/असलेल्या ठिकाणाला नियोजनबद्ध पद्धतीने दोन-तीन वेढे घातले जातात. सोबत सुसज्ज लष्करी वाहने असतात, शक्य तिथे वैद्यकीय पथके सोबत असतात, परिस्थिती पाहून कमी-अधिक क्षमतेची स्फोटके वापरली जातात. हल्ली तर ड्रोन, नाईट विजन कॅमेरा इत्यादी आधुनिक आयुधं हातात आहेत. पण आधीच्या काळात अशा सुविधा नव्हत्या… तरीही भारतीय फौजेने केवळ शौर्य आणि अभ्यासपूर्ण व्यावसायिकतेच्या बळावर ही निकराची लढाई जारी ठेवली आहे…. हे युद्ध दीर्घकाळ चालणार आहे! यात दिल्या जाणा-या बलिदानांची दखल घेण्यात भारतीय जनमानस तितकेसे घेताना दिसत नाही, हे दुर्दैवच. असो.
पण आज परिस्थिती मोठी नाजूक होती! अतिरेकी आणि सेना यांमध्ये एका शाळेची इमारत येत होती… न्यू ग्रीनलॅंड स्कूल…. थोडीथोडकी नव्हे तर सुमारे चौदाशे विद्यार्थी असलेली शाळा… वर्ग सुरू आहेत… अतिरेक्यांना भारतीय सेनेच्या तावडीत आपण फसल्याची जाणीव झाली. त्यांनी आततायी पाऊल उचलण्याआधी या विद्यार्थ्यांना तेथून सुरक्षित हलवणे क्रमप्राप्त आणि अतिप्रधान्याचे होते. मुख्य भीती होती ती म्हणजे अतिरेक्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांची ढाल बनवली तर? अतिरेक्यांना प्रत्युत्तर देताना शाळा आड येणार होती. अतिरेकी भारतीय जवानांना पाहू शकत होते…. आणि त्यांच्यावर नेम सुद्धा धरू शकत होते… तशीच परिस्थिती आपल्या सैनिकांची सुद्धा होती!
लगेचच काही कारवाई केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. अतिरेक्यांना आपले जवान तिथून पळून जाऊ देणार नव्हते… पण या धुमश्चक्रीत जर ते अतिरेकी शाळेत पोहोचले, त्यांनी विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले तर? केवळ काल्पनेनेच हृदयाचा थरकाप उडावा! शाळेतील निष्पाप जीवांना युद्धक्षेत्राच्या बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे गरजेचे आहे… सुरुवातीला बाहेरच्या बाजूला असलेल्या सुरक्षावेढ्यात रामचंद्र यांची नेमणूक होती… त्यांनी आग्रहाने वरीष्ठांची परवानगी मिळवली आणि ते त्वेषाने पुढे झाले! यासाठी त्यांना आडोसा सोडून बाहेर यावे लागले… रामचंद्र आणि त्यांचे साथीदार वेगाने शाळेत घुसले… लहान लहान गट करून त्यांनी मुलांना बाहेर काढायला आरंभ केला आणि अपेक्षेनुसार अतिरेक्यांना गोळीबार सुरु केला. त्यातून जीवाची बाजी लावीत रामचंद्र आणि इतर बहाद्दरांनी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यात यश मिळाले… पण यात वेळही तेवढाच लागला. या सैनिकांवर अतिरेकी अधून मधून गोळीबार करायला मागेपुढे पहात नव्हते… विद्यार्थ्यांना गोळ्या लागतील याची त्यांना तमा नव्हती…. आणि भारतीय सैनिक स्वत:चा जीव गमावून मुलांना वाचवणार होते, यात शंका नव्हती! शाळा रिकामी झाली की सेना पुढे सरकून आपल्याला ठार मारणार याचा अंदाज आल्याने ते अतिरेकी बिथरले… त्यांनी या शेवटच्या गटाच्या दिशेने बेफाम गोळीबार सुरु केला…. रामचंद्र प्रत्युत्तर देऊ शकत होते… पण त्यांनी कमालीचा संयम ठेवला…. ती लेकरं आणि मृत्यू यांच्यात रामचंद्र शिवाजीराव शिंदे नावाचा एक अभेद्य पर्वत उभा ठाकलेला होता… छातीचा कोट करणं म्हणजे काय याचा हा वस्तुपाठ. त्यांच्या हातावर गोळ्या लागल्या… आणि एक गोळी तर डोक्यावरचे शिरास्राण भेदून, डोक्याला मोठी जखम करून निघून गेली… रक्ताची धार लागली!
रामचंद्र मुलांना वाचवण्यात यशस्वी झाले… यात बराच वेळ गेला…. सहा वाजून गेले होते.. थोड्याच वेळात अंधारून येईल… अतिरेकी अंधाराचा फायदा घेऊन पळून जातात असा अनुभव होताच… तोवर अतिरेक्यांनी दुस-या घराचा आश्रय मिळवला होता. रामचंद्र यांनी ते घर बघितले होते… इतर जवानांना ते घर लगेच दृष्टीस पडणे अशक्य होते कारण… मध्ये अनेक अडथळे होते! सहका-यांनी, अधिका-यांनी रामचंद्र यांना माघारी निघून येण्याचा आग्रह धरला… पण रामचंद्र मागे फिरले नाहीत!
त्या घरात लपलेले दोन अतिरेकी रामचंद्र यांच्यावर अचूक गोळीबार करण्याच्या उत्तम स्थितीत होते…. रामचंद्र आता त्या दोन रावणांच्या रोखाने निघाले… एकटेच. हातातली रायफल उसंत घेत नव्हती… समोरून येणा-या मरणाची तमा नव्हती….. अंगावर गोळ्या झेलत रामचंद्र त्या घररुपी लंकेकडे निघाले होते… लंकादहन निश्चित होते. एक स्थानिक आणि एक पाकिस्तानी अतिरेकी…. अशी दोन लक्ष्ये साधायची होती…. रामचंद्र यांनी अचूक शरसंधान केले…. विजयादशमी साजरी झाली… दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबला…. अतिरेक्यांच्या बाजूला पूर्ण शांतता….. रामचंद्र यांच्या दिशेने इतर ठिकाणी असलेले सैनिक धावत आले…. रामचंद्र यांचेही श्वास थांबलेले होते! एक चंद्र मावळून गेला…. त्याची आभा मात्र हळूहळू वाढत जाणा-या अंधाराला प्रकाशमान करीत निघाली होती!
वीरमाता ताराबाई शिवाजीराव शिंदे, राहणार चिचोलीम, मापुसा, गोवा यांचा एक चंद्र अमावास्येच्या समुदात कायमचा बुडाला होता! पुत्राच्या चितेच्या साक्षीने दुसरा सुभाष’चंद्र’ पाठवण्याचा संकल्प सोडला आणि पूर्णही केला! तरुणांनी सैन्यसेवेत जावे, असे वीरमाता ताराबाई यांचा आग्रह आहे!
भारत सरकारने हुतात्मा रामचंद्र शिवाजीराव शिंदे यांना मरणोत्तर शौर्य चक्र देऊन त्यांच्या हौतात्म्याचा गौरव केला. काल त्यांच्या बलिदानाला एकोणीस वर्षे पूर्ण झालीत. त्यांच्या गावी त्यांचे स्मारक उभारले गेलेले असून त्यांच्या बलिदानातून गोव्यातील अनेक तरुणांनी सैन्यसेवेत प्रवेश केला आहे. या वीराची पुरेशी वैय्यक्तिक माहिती मला उपलब्ध झाली नाही. तरीही हा वीर मराठी तरुणांना माहित असलाच पाहिजे म्हणून हे लेखनधारिष्ट्य! जयहिंद!!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





