श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

 नारद भक्तीसूत्र – २७.

ईश्वरस्याप्यभिमानद्वेषित्वात् दैन्यप्रियत्वाच्च ॥ २७ ॥

अर्थ : ईश्वराचाही अभिमानाशी द्वेषभाव आहे व दैन्याशी म्हणजे लीनतेशी प्रियभाव आहे.

विवेचन : मागील पंचविसाव्या सूत्रात भक्ती ही कर्म, ज्ञान व योग यांहून श्रेष्ठ आहे, असे सांगितले आहे आणि ती फलरूपा आहे असे पुढे सूत्र सव्वीसमध्ये म्हटले आहे.

कर्म, ज्ञान व योग या साधनांत अहंकार उत्पन्न होण्याचा संभव असतो. कर्म करणारी मंडळी कर्मठ होताना आपण पाहतो आणि अशा लोकांना कर्माभिमान, ज्ञानी लोकांना ज्ञानाभिमान आणि योगी लोकांना योगाभिमान होण्याची शक्यता जास्त असते.

सामान्यतः विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अभिमान कोणाला नसतो…? अहो, हुशार माणसाला असतो, ढ माणसाला असतो, अनाडी माणसाला असतो, खेड्यातल्या माणसाला असतो, शहरातील माणसाला असतो, जवळजवळ सर्वांना असतो….! अहो, एखादा भिकारी एखाद्याच्या घरी भीक मागायला आला तर त्याला मी भीक देण्या इतपत मोठा आहे याचा अभिमान असतो आणि एखाद्याने त्या भिकाऱ्याला भीक देत नाही म्हटलं, तर तो भिकारी त्याला म्हणतो, की तुझे काही शेवटचे घर नाही, अख्खा गाव आहे मी तिथे जाऊन भीक मागेन….! थोडक्यात हा अभिमान कमीअधिक प्रमाणात सर्वांना असतो.

एका भक्ताचे उद्‌गार प्रसिद्ध आहेत चाखाचाहे प्रेमरस राखाचाहे मान । दो खड्‌ग एक म्यानमें देखे सुने न कान ॥’ याबद्दल एक कथा प्रसिद्ध आहे.

– – ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी रहात नाहीत, त्याप्रमाणे जिथे अभिमान असतो, तिथे भक्ति रहात नाही, आणि अर्थातच तिथे भगवंत राहूच शकत नाही. किंबहुना खरा भक्त कधीच मी काही करतो असे म्हणूच शकणार नाही. तो म्हणेल भगवंताच्या कृपेनं झालं….!

एक छोटीशी कथा आहे. कदाचित आपल्याला माहित असेल. दोन शिष्य तपश्चर्या करीत होते. दोघांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. बारा वर्षे पूर्ण होताच देव प्रसन्न झाला. दोघांना म्हणाला की दोघांची तपश्चर्या उत्तम चालू आहे. पण तुम्ही दोघांनी आणखी १२ वर्षे तपश्चर्या करण्याची गरज आहे. त्यावर एक पटकन तयार झाला. तो म्हणाला, इतकेच ना, देवा तुला यात आनंद आहे ना, मग मी अगदी मनापासून आणिक १२ वर्षे तप करेन. दुसरा जरा वैतागला. तो म्हणाला देवा, अमुक माणसाने फक्त चार वर्षे तप केले, त्याच्यावर तू लगेच प्रसन्न झालास, माझ्या बाबतीत तू पक्षपात करत आहेस…!

गोष्ट इथे संपली…

आपल्याला अनेक उदाहरणे माहित आहे. दौपदिला कृष्णाने वस्त्र पुरवली..! कधी पुरवली? जेव्हा ती संपूर्ण शरणागत झाली, देवा, आता तुझ्याशिवाय माझे कोणी नाही, तू माझी लाज राख…!

सर्वसामान्य मनुष्याला स्वतःवर, त्याच्या आप्तस्वकीयांवर विश्वास असतो, साठवलेल्या पैशावर विश्वास असतो…..! जेव्हा मनुष्यावर प्रसंग येतो, तेव्हा मात्र देवाशिवाय आपले कोणी नाही, याची अल्पशी जाणीव त्याला होत असते…..! जे अशा जाणिवा अधिक दृढ करू शकतात, ते साधक अवस्थेला जातात आणि हळूहळू आपली प्रगती साधून घेत असतात…

.. देवाला दैन्य आवडते असे या सूत्राच्या शेवटी सांगत आहेत. दीन म्हणजे गरीब असा एक अर्थ आहे. अर्थात सर्वच बाबतीत गरीब.

अमुक एक वेडे एकत्र तरी त्यातून एक शहाणा मनुष्य तयार होईल असे म्हणणे ज्याप्रमाणे मूर्खपणाचे होईल, अगदी त्याचप्रमाणे मी देवापेक्षा मोठा होईन, असे म्हणणे धाडसाचे होईल.

देवळात जाताना चप्पल बाहेर काढणे म्हणजे आपला अभिमान बाहेर काढून ठेवण्यासारखे आहे. पूर्वी आई सोवळी बसायची. तेव्हा आई जवळ जायचे असल्यास सर्व कपडे काढून जावे लागायचे. देव आणि सोवळ्यातील आई यात विशेष फरक नाही. देवासमोर जाताना आपण दीन होऊन जावे. थोडक्यात संपूर्ण शरणागत होईन जावे. मी नाही तूच आहेस असा दृढ भाव ठेवता आला तर देव लवकर भेटू शकतो….!

श्रीमंतीची व्याख्या संत पुढील प्रमाणे करतात. ज्याची मागणी जितकी कमी तितका तो जास्त श्रीमंत सामान्य मनुष्याला कितीही मिळालं तरी ते पुरेसे होत नाही, त्यामुळे त्याचे दैन्यपणा संपत नाही.

.. सद्गुरू श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, सर्व देण्याची गरज नसते फक्त सर्व स्व देता आला तरी त्याला देवाची प्राप्ती होऊ शकते….!! 

कृपा हा ईश्वराचा स्वभाव आहे. मेघाचा स्वभाव वर्षाव करणे, चंद्राचा शीतलता देणे, सूर्याचा प्रकाश, त्याप्रमाणे दयामय प्रभूचा स्वमाव दीनावर प्रेम करून त्याचे दैन्य दूरर करणे हाच आहे. आर्त द्रौपदी, गजेंद्र दीन शबरी, सुदामा या सर्वांची उदाहरण याची साक्षभत आहेत. तत्त्वतः सर्व जीव स्वभावतः दीनच आहेत, परतंत्र आहेत ते त्या पूनी अंशभूतच आहेत. म्हणून परमात्म्याचे त्यांच्यावर सहज प्रेम असणारच, परंतु अनादी अज्ञानजन्य अभिमानामुळे ते स्वतःस दीन व ईश्वराचा अंश समजत नाहीत व ईश्वरप्रेमाची अपेक्षाही करीत नाहीत. तो अभिमान हा आपल्या अंशभूत जीवांना घातक असतो. म्हणूनच ईश्वर त्या अभिमानाचा द्वेष करतो व तो दूर करतो. तसेच जीवास अभिमान बाळगण्याचा अधिकार नाही असे समजून जे स्वतःस दीन समजतात त्यांच्यावर प्रेम करतो असे नारदमहर्षी या सूत्राच्या द्वारे सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्रे क्र. २७.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments